सर्वात लोकप्रिय स्नॅक बटाटा चिप्स (Potato Chips)

पण आसपास नजर टाकली तर बटाट्याचे चिप्स हा खाद्य प्रकार किती लोकप्रिय आहे याचे दर्शन  आपल्याला घडते. त्यावरून आपल्याला त्याला असलेली मागणी तर कळेलच पण ही मागणी पुरी करताना किती प्रकारचे चिप्स तयार केले जात असतात याचीही कल्पना येईल. बाजारात साध्या चिप्स बरोबरच आकाराने आणि चवीने किती प्रकारची विविधता साधली जाते हे बघण्यासारखे आहे. बसस्टँड, रेल्वे स्टेशन, चित्रपट नाट्यगृहे, करमणुकीचे अन्य कार्यक्रम करणारी सभागृहे, अनेक प्रकारच्या पार्ट्या, विवाह समारंभातले भोजनाचे समारंभ, निरनिराळ्या प्रकारच्या बैठका, पर्यटन स्थळे,  पिकनिक स्पॉटस्, मद्यपान गृहे आणि उपाहारगृहे अशा अनेक ठिकाणी बटाट्याच्या कापांना मागणी असते. 

एरवी तर हे काप खाल्ले जातातच पण विशेष करून उपवासाला ते चालत असल्याने धार्मिक स्थळांवर आणि मंदिरांत त्यांना विशेष मागणी असते. भारतात बटाट्याच्या चिप्सची फार मोठी बाजारपेठही आहे आणि अनेक लोक चिप्स तयार करून, विकून त्यातून मोठा नफाही मिळवत असतात. बटाटा हा या प्रकारातला सर्वात मोठा कच्चा माल. शिवाय तळण्याचे तेल हाही उत्पादन खर्चातला मोठा घटक असतो. हा उद्योग आपण घरगुती उद्योग म्हणून सुरू करणार असू तर मजुरीही लागेल. पण स्वयंचलित यंत्रांचा मोठा वापर करून मोठ्या प्रमाणावर हा उद्योग केला तर मजुरीवरचा खर्च कमी होतो पण यंत्रांवरची गुंतवणूक वाढते. 

अगदी लहान प्रमाणावरही हा उद्योग सुरू करता येतोे. तरीही त्यात चांगला नफा कमावता येतो कारण बटाटा चिप्सला चांगली मागणीही असते आणि त्यांना चांगली किंमत आकारली तरी ग्राहकांची फार काही तक्रार नसते कारण शेवटी चिप्स खाणारे ग्राहक चांगल्या पेर्ईंग कॅपॅसिटीचे असतात आणि ते हौसेने चिप्स खात असतात. मोठ्या शहरातल्या काही चित्रपटगृहात ५० ग्रॅम वजनाच्या चिप्सना २० ते २५ रुपये आकारले जातात. तरीही ग्राहकांची तक्रार नसते. एकुणात नफ्याचे प्रमाण  जास्त असते. तेव्हा या व्यवसायात पडायला काही हरकत नाही.

चिप्सच्या धंद्याला किमान ३५ हजार ते २० लाख रुपयांपर्यंत भांडवल लागते. तेव्हा  आपल्याला किती भांडवल गुंतवून हा धंदा करायचा आहे हे आपण ठरवायचे आहे. जशजशी भांडवलाची गुंतवणूक वाढत जाईल तसतशी ऑटोमेटिक यंत्रांचा वापर वाढत जाईल आणि हाताने करायची कामे कमी होतील. मात्र २० लाखापर्यंत गुंतवणूक केली  उत्पादन खर्च कमी होईल पण कच्चा मालही जास्त वापरावे लागेल आणि उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्याच्या विक्रीची जबाबदारीही वाढेल. म्हणून जास्त गुंतवणूक करणारांना आधी विक्री व्यवस्था उभारावी लागेल.

बटाटा हा कच्चा माल कमीत कमी दराने कसा मिळेल याचा विचार आधी केला पाहिजेच पण तरी तो दर्जेदार तसेच वेफर्स बनवायला योग्य असणेही गरजेचे आहे. काही मोठ्या कंपन्या आपल्याला हवा असेल त्या वाणाचा बटाटा शेतकर्‍यांकडून खास करून तयार करून घेतात. त्यासाठी बियाणाचा पुरवठा करतात. आधी दर निश्‍चित करून तयार माल आपल्यालाच विकला जाईल याचे करार करतात. ही गोष्ट सर्वांनाच शक्य नाही. मात्र लहान प्रमाणावर धंदा करणारांनी बाजारावर लक्ष ठेवून  आपल्याला हवा तो बटाटा विकत घ्यावा.

बटाटा मोठ्या आकाराचा असावा. तो पूर्ण पिकलेला लिबलिबीत असता कामा नये. फार मऊ पडलेल्या बटाट्याचे काप चांगले होत नाहीत. साधारणत: वेफर्स हे तळूनच केले जातात पण काही प्रकारच्या बटाटा वेफर्समध्ये ते तळले जात नाहीत. तसे कच्चे आणि खारवलेले वेफर्स हे उपवासासाठी पसंत केले जातात. ते तयार करताना त्यांचे काप हातानेच केले जातात. त्यासाठी खास प्रकारची किसणी वापरली जाते. त्यांनी तयार केलेले काप मीठ टाकलेल्या पाण्यात उकळून घेतले जातात आणि वाळवून ठेवले जातात. ते बरेच दिवस टिकतात. ते काळे पडता कामा नयेत याची दक्षता घेतली जाते. त्यासाठी काप केल्याबरोबर ते पाण्यात टाकतात. काप करताना ते पातळ असावेत. पारदर्शक असले की छान पातळ काप तयार होतात. 

अशा रितीने केलेले वेफर्स तळूनही केले जातात पण त्यातल्या सार्‍या क्रिया या हाताने केल्या जातात. उत्पादन क्षमता कमी असते. उत्पादनाचा खर्चही वाढतो.

पण साधारणत: चिप्स तयार करण्यासाठी पाच ते सहा प्रकारच्या क्रिया केल्या जातात:-

१.धुलाई आणि उकळणे

२.  बटाटा सोलणे (पिलींग मशीन)  व काप करणे

३. वाळवणे

४. तळणे

५. मसाला मिसळणे

६. पॅकिंग

या सवर्र् कामांची यंत्रे बाजारात मिळतात. आपल्या क्षमतेनुसार ती कमी जास्त किंमतीची आणि  क्षमतेची अशी खरेदी करावीत.

वेफर्स तयार करताना त्यात वापरला जाणारा मसाला हा आपला खास असावा. त्यात काय काय घालावे आणि किती प्रमाणात घालावे याचा फॉर्म्युला आपण स्वत:च तयार करावा. तयार वेफर्स पाकिटात घालणारी म्हणजेच पॅकिंगचीही मशीन मिळते. तिचा वापर करण्याआधी आपल्या वेफर्सचे नाव नक्की करावे आणि ते नाव पाकिटावर छापावे. या धंद्यासाठी अन्न आणि औषध कार्यालयाचा परवाना लागतो. त्यांच्या नियमानुसार पाकिटावर काय काय छापायचे हे समजून घेतले पाहिजे. 

बटाटा वेफर्स सोबत उपवासाला लागणारा बटाट़्याचा चिवडाही तयार करता येतो. त्यालाही चांगली मागणी असते. त्यासाठी बटाटा किसावा लागतो आणि तळून चिवडा तयार केला जातो. त्यात गरजनुसार मालमसाला, शेंगादाणे आणि चांगली किंमत येत असेल तर किसमिस आणि काजूही मिसळले जातात. मात्र या व्यवसायात पॅकिंग आकर्षक असले पाहिजे. तसे साध्या प्लॅस्टिकच्या पिशव्यातही ते विकले जातात पण त्यांना चांगली किंमत येत नाही. 

या व्यवसायास सुरूवात करताना लहान प्रमाणावर करावी आणि मार्केटिंगविषयी आत्मविश्‍वास येत जाईल तस तसे एक एक यंत्र खरेदी करून धंदा वाढवावा. मध्यम स्वरूपाची गुंतवणूक करून दरमहा किमान ५० ते ६० हजार रुपये प्राप्ती होऊ शकते आणि आपण या निमित्ताने दहा पाच लोकांना रोजगारही पुरवू शकतो.

लीड  – आजकाल वेफर्सचा वापर किती वाढला आहे ? सगळीकडे ते वापरले जातात. उपवासालाही ते लागतात. आपल्या देशात बटाटा विपुल प्रमाणावर आणि माफक किंमतीला मिळतो. फारशी तांत्रिक गुंतागुंत नसलेला आणि सहज बाजारपेठ मिळणारा हा उद्योग कोणालाही करता येईल आणि ३५ हजारापासून ते २० लाखापर्यंत गुंतवणूक करण्याची क्षमता असणार्‍या कोणालाही करता येईल.

डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

ई-स्टोअर

ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला गरज आहे एका व्हर्चुअल (आभासी) दुकानाची आणि यासाठी तुम्ही एकतर स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट सुरु करू शकता किंवा Shopify सारख्या खास ई-स्टोअर सुरु करण्यासाठी आवश्यक सर्व बाबी पुरविणाऱ्या जबरदस्त प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. एक यशस्वी नवउद्योजक होण्याचे तुमचे स्वप्न साकार करायचे असेल तर उत्तम आणि किफायतशीर सुरुवात नक्कीच फायद्याची ठरू शकते आणि यासाठीच नव्याने जर तुम्ही एखादा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असाल तर आम्ही तुम्हाला Shopify चा वापर करा हे प्राधान्याने सुचवू. का ?

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

शेअर करा

Leave a Comment

error: Alert: Content is protected !!