
कोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय
स्वतंत्रपणे काही उद्योग व्यवसाय करायची इच्छा आहे आणि कमी गुंतवणुकीत चांगला फायदा हवा आहे, लहान जागेत उत्पादन पूर्ण क्षमतेने घेता यायला हवे अशीही इच्छा आहे, त्या नवउद्योजकांनी कोल्ड प्रेस तेल घाणा या व्यवसायाचा विचार जरूर केला पाहिजे. या व्यवसायाचे आपल्या मराठी भाषेतील आखूड शिंगी, बहुगुणी म्हैस असेही वर्णन करता येईल. आजकाल आहार आणि आरोग्य या बाबत जनता खुपच जागरूक झाली आहे. आहारात घेतले जाणारे तेल, तूप हे तर फारच जिव्हाळ्याचे विषय बनले आहेत. कोणती तेलं रोजच्या आहारात असावीत, ती रिफाईंड हवीत की डबल फिल्टर्ड याचाही विचार केला जात आहे. आहाराशिवाय मसाज, औषधे, वंगण, डिटर्जंट बनविण्यासाठी सुद्धा तेलांचा वापर होतो. आपल्याकडे वनस्पतीजन्य तेलांचा वापर प्रामुख्याने आहारात केला जातो. नवीन संशोधनातून जास्त प्रक्रिया न झालेली तेलं आहारात घेणे आरोग्यासाठी हितकर आहे असे सिद्ध होऊ लागल्याने कोल्ड प्रेस घाणी मध्ये तयार झालेले तेल वापरण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. ही तेलं थोडी महाग असली तरी जास्तीचे पैसे देण्यास लोक तयार आहेत, असेही दिसून आले