आपल्या नेहमीच्या कमाई खेरीज थोडी अधिकची कमाई करायची इच्छा अनेकांना असते आणि त्यासाठी काही स्वतःचा व्यवसाय सुरु करता येईल का याची चाचपणी केली जात असते. या संदर्भात अनेक प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय करता येतात हे खरे असले तरी आपल्या छंदाचे जर व्यवसायात रुपांतर करता येत असेल तर त्यासारखे दुसरे काय असणार? तुम्हाला पाळीव प्राण्यांची आवड असेल आणि त्यातही कुत्री अधिक आवडत असतील तर एका वेगळ्या व्यवसायाचा विचार तुम्ही करू शकता.
तुम्हाला सकाळ संध्याकाळ फिरायला आवडत असेल आणि चालण्याचा व्यायाम आवडत असेल तर हा वेगळा व्यवसाय तुम्ही नक्कीच करू शकता कारण या व्यवसायाची ती मुख्य गरज आहे. हा व्यवसाय आहे डॉग वॉकर म्हणजे कुत्री फिरवून आणण्याचा व्यवसाय.
परदेशात हा व्यवसाय करण्याऱ्या कंपन्या आहेत. भारताचा विचार केला तर येथेही हा व्यवसाय उभरता आहे. आणि या व्यवसायात म्हणावी तितकी स्पर्धा अजून तरी नाही. त्यामुळे तुम्हाला या
व्यवसायात बस्तान बसविण्याची चांगली संधी आहे. हा व्यवसाय म्हणजे नियमित उत्पन्न मिळणारा व्यवसाय आहे पण त्यासाठी काही प्राथमिक कौशल्य हवे. कुत्री फिरविण्याचा अनुभव, कुत्र्यांची वर्तणूक समजण्याची क्षमता, आणि थोडे प्रशिक्षण असेल तर हा व्यवसाय तुम्ही सहज सुरु करू शकता.
डॉग वॉकर व्यवसाय नक्की कधी सुरु झाला
डॉग वॉकर व्यवसायाचा इतिहास मनोरंजक आहे. यासंबधी सर्च केल्यावर असे दिसते की १९३५ मध्ये बिल्डिंगसुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या जेम्स डेल याने ‘डेली डॉग वॉकिंग सर्विस इंक’ नावाची कंपनी सुरु केली होती. तर पाहिला डॉग वॉकर म्हणून न्युयॉर्कचा रहिवासी जिम बक याचे नाव घेतले जाते. तो घोड्यांना प्रशिक्षण देत असे. या अनुभवाचा उपयोग त्याने डॉग वॉकर व्यवसायासाठी केला. जिम चांगल्या सधन कुटुंबातील होता आणि १९६४ मध्ये त्याने कार्पोरेट नोकरी सोडून पूर्ण वेळ डॉग ट्रेनर आणि डॉग वॉकर हेच काम सुरु केले त्यासाठी त्याने टीमचा तयार केली होती.
चेन्नईमध्ये एका तरुणाने हा व्यवसाय सुरू केला. तो अमेरिकेतून एम.बी.ए. होऊन शिकून आलेला होता आणि नोकरी करायची नाही अशी त्याची प्रतिज्ञा होती.एकेदिवशी तो पहाटेच मॉर्निंग वॉकला गेला असताना त्याला एक लठ्ठ श्रीमंत माणूस आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला बाहेर पडलेला दिसला. कुत्र्याची साखळी त्या मालकाने हातात घेतलेली होती आणि कुत्रा त्याला फरफटत घेऊन चालला होता. त्याची तारांबळ या मुलाने बघितली आणि त्याच्या डोक्यात एक नवा व्यवसाय जन्माला आला. त्याने त्या व्यापार्याला थांबवले आणि म्हणाला, ‘अंकल आपला कुत्रा फारच त्रास देतोय्, मी फिरून आणू का?’ त्या अंकलला कुत्रे पाळायची हौस होती, परंतु रोज सकाळी त्याला फिरवून आणण्याचीही कटकट नको होती. त्याला बरेच वाटले. त्याने या मुलाला विचारले, ‘रोज माझ्या कुत्र्याला पहाटे फिरवून आणण्याचे किती पैसे घेशील?’ त्याला पटकन् उत्तर देता आले नाही, पण थोडा विचार करून तो म्हणाला, ‘रोज एक तास कुत्र्याला फिरवून आणीन, महिन्याला तीन हजार रुपये द्या.’ व्यापार्याने ते कबूल केले. पण हा कल्पक उद्योजक त्या तीन हजारावर थांबणारा नव्हता. त्याने आपल्या घराच्या परिसरात अनेक घरांमध्ये जाऊन कुत्र्याची समस्या असणार्या लोकांच्या भेटी घेतल्या. त्याला 40 जणांनी कुत्रे फिरवून आणण्याचे काम दिले. लहान कुत्र्याला दोन हजार रुपये आणि मोठ्या कुत्र्याला तीन हजार रुपये दरमहा असा दर त्याला मिळाला.
या कल्पक तरुणाने आपल्या भागातल्या काही बेकार पोरांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना दरमहा एक हजार रुपये वेतनाच्या बोलीवर दररोज एक तास दोन कुत्रे फिरवून आणण्याची जबाबदारी दिली. दोन कुत्र्यांबद्दल त्याला पाच हजार रुपये मिळत होते आणि त्याच्या हाताखाली काम करणार्या माणसाला तो एक हजार रुपये देत होता. म्हणजे प्रत्येक कुत्र्यामागे एक ते दोन हजार रुपये त्याला मिळत होते. म्हणजे त्याची महिन्याला जवळपास 60 ते 80 हजार रुपये एवढी कमाई सुरू झाली होती. यासाठी त्याने उद्योजक प्रवृत्ती पणाला लावली होती. लोकांच्या घरोघर जाऊन, भेटी घेऊन कुत्री मिळवली होती आणि त्यासाठी आपले संभाषण कौशल्य पणाला लावले होते. शिवाय पैशांची वसुली आणि एक हजार रुपये वेतन घेणारी मुले कुत्रे फिरविण्याचे काम व्यवस्थित करतात की नाही हे बघण्यासाठी त्याचे व्यवस्थापन कौशल्य उपयोगाला आले होते आणि आपल्या या गुणसंपदेच्या जोरावर त्याने स्वत:चा एक व्यवसाय एकही पैसा न गुंतवता उभा करून दाखवला होता.
तुम्ही सुद्धा तुमचा व्यवसाय वाढतोय असे वाटले तर मदतनीस घेऊ शकता. हे मदतनीस योग्य प्रकारे काम करत आहेत वा नाही यावर नजर ठेवावी लागते. त्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तुमचे मदतनीस जी कुत्री फिरायला नेतात, त्या घरी भेट देऊन योग्य सेवा मिळते ना याची विचारणा करायचीच. पण मदतनीस ज्या कुत्राना फिरायला नेतात ती मदनिसाला पहिल्याबरोबर आनंदाने उड्या मारत असतील तर त्याचे काम योग्य आहे हे ओळखता येते.
गुंतवणूक नाही-
डॉग वॉकर व्यवसायात फारच कमी किंवा अजिबात गुंतवणूक करावी लागत नाही. या निमीत्ताने तुम्ही प्राणी संबंधित उद्योगात प्रवेश करू शकता. तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर काही बाबी अगोदरच निश्चित करायला हव्या त्या अशा.
तुम्ही एकट्याने हा व्यवसाय करणार आहात का मदतीसाठी काही लोकांना नेमणार आहात हे ठरवायला हवे. परदेशात सोल प्रोप्रायटर किंवा लिमिटेड लायबीलिटी कंपनी असेही या व्यवसायाचे स्वरूप आहे.एकट्याने व्यवसाय करणार असाल तर व्यवसायाची सर्व जबाबदारी तुमच्यावर असते.आपल्याकडे त्या संदर्भात काय नियम आहेत याची माहिती अगोदर घ्यायला हवी.प्रत्येक राज्य,शहरानुसार हे नियम वेगळे असू शकतात.
ग्राहक कोण-
डॉग वॉकर हा सेवा क्षेत्रातील व्यवसाय आहे. त्यामुळे येथे तुमचा ग्राहक कोण असेल हे समजून घ्यायला हवे. आजकाल अनेक घरातून एखादा पाळीव प्राणी पाळण्याची क्रेझ आहे. त्यातही कुत्री
ही सर्वाधिक मागणी असलेली आहेत. कुत्रा पाळण्यास प्राधान्य देण्यामागे अनेक कारणे आहेत. कुत्रा हा माणसाचा चांगला सोबती आहे. आजकाल अनेक कुटुंबात एकच अपत्य असते आणि त्याला कंपनी म्हणून कुत्रा पाळला जातो. एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, मुले शिक्षण,नोकरी निमित्ताने घराबाहेर पडल्याने एकटे राहणारे पालक, मोठे घर असले तर राखण करण्यासाठी, आवड म्हणून, भावनिक गरज म्हणून अशी ही अनेक कारणे देता येतील.
कुत्रा पाळायचा तर त्यासाठी त्यांच्या खाण्यापिण्यापासून ते तब्येती पर्यंत अनेक व्यवस्था कराव्या
लागतात. त्यात कुत्र्याला रोजचा व्यायाम ही सुद्धा आवश्यक बाब ठरते. नवीन कुत्रा घरात आला की सुरवातीला त्याला फिरवून आणण्याचा मालकाला उत्साह असतो पण नंतर तो मावळतो असे दिसून येते. अनेकदा वेळेअभावी ते शक्य होत नाही. वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांना हे काम करणे अशक्य असते याचे मुख्य कारण म्हणजे कुत्र्याच्या चालण्याच्या वेगाशी ते जुळवून घेऊ शकत नाहीत. अश्या वेळी डॉग वॉकरचा विचार केला जातो.
व्यवसाय सुरु करताना या गोष्टी लक्षात घ्या
कुत्रा फिरविण्याचे काम ठराविक वेळेत म्हणजे बहुदा सकाळी किंवा सायंकाळी करावे लागते.
व्यवसायाचे बेसिक कौशल्य म्हणजे तुम्हाला कुत्र्याबरोबर मैत्री जमविण्याची हातोटी हवी. कुत्र्याची वर्तणूक समजून घेता यायला हवी. म्हणजे कुत्रा दमलाय का, त्रासलाय का, आजारी आहे का, तो आक्रमक कधी होतो, त्याला कोणता आणि कश्या प्रकारचा व्यायाम हवा याची माहिती हवी. हा अनुभव कुत्र्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था किंवा या विषयातील तज्ञाच्या हाताखाली काम करून मिळविता येतो.
कुत्रा फिरायला नेताना कोणतीही इंज्युरी म्हणजे दुखापत कुत्र्याला किंवा कुत्र्यामुळे अन्य कोणाला होता कामा नये याची काळजी घ्यावी लागते. कुत्रा अनेकदा लिश ओढतो त्यावेळी कुत्राच्या मानेला हादरे बसणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते तसेच कुत्रा कधी जलद चालतो, पळतो किंवा एखाद्या जागी उभाच राहतो त्यानुसार आपली चाल ठेवावी लागते तसेच लिश वर नियंत्रण ठेवावे लागते.
कुत्रा लिश ओढत असेल तर त्याला स्वतःकडे न ओढता तो शांत होईपर्यंत पुढे चालणे थांबवावे लागते.रस्त्यावरून फिरताना अनेकदा कुत्री अन्य भटक्या कुत्र्यांच्या अथवा दुसऱ्यांच्या कुत्रांच्या अंगावर धावून जातात तसेच अनेकदा रस्त्यातून चालत असलेल्या लोकांच्या अंगावर धावून जातात अश्यावेळी त्याचे लक्ष विचलित करून त्याला काही खाऊ देण्याची गरज असते.
कुत्री फिरायला नेताना त्या माद्या असतील तर त्यांची वैद्यकीय हिस्ट्री माहिती करून घ्यावी लागते. माजावर आलेल्या मादी कुत्र्यांना फार सांभाळावे लागते आणि हे काम फार अवघड आहे याची जाणीव हवी.
तुम्हाला तुमची क्षमता आणि सीमा याची पूर्ण जाणीव हवी. व्यवसायाची सुरवात करताना एकच कुत्रें एकावेळी नेण्यापासून करावी आणि चांगला सराव झाला की मग ही संख्या वाढविता येते.एकच वेळी अनेक कुत्री फिरायला नेताना ती कोणत्या जातीची आहेत हे पाहायला हवे. जर्मन शेफर्ड, लॅब्रेडोर या जातीची कुत्री पाळण्यासाठी मोठे प्राधान्य आहे पण ती वर्किंग डॉग्स म्हणून ओळखली जात असल्याने त्यांना भरपूर व्यायाम द्यावा लागतो. त्यामुळे अश्या कुत्र्यांसोबत छोट्या आकाराची पामेरियन, बुलडॉग सारखी कुत्री नेणे योग्य नसते.
कुत्राची नुसती आवड असणे आणि ती फिरायला नेणे यात फरक आहे याची जाणीव असणे आवश्यक आहे.भारतात काही शहरात कुत्र्यांनी रस्त्यावर घाण केली तर त्यासाठी दंड आकाराला जातो.हे लक्षात घेऊन कुत्र्यांना योग्य ठिकाणी ठराविक वेळाने नेऊन त्याला शीशु करण्याची सवय लावणे आवश्यक आहे. आसपास कुणी हरकत घेणार नाही अशी जागा त्यासाठी निवडायला हवी शिवाय रस्त्यात घाण केलीच तर प्लास्टिक बॅग सोबत ठेऊन ती वेळीच उचलण्याची तयारी हवी.
फिजिकल फिटनेस-
डॉग वॉकर हा डिमांडिंग जॉब आहे. त्यासाठी तुम्हाला स्वतः फिट राहावे लागते. कुत्रा हा मुळातच उत्साही प्राणी आहे. त्यात मोठ्या आकाराची कुत्री असतील तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आणि त्याला हाताळण्याचे कौशल्य हवे. या कुत्र्यांना नियमित व्यायाम लागतो त्यानुसार त्यांच्याकडू व्यायाम करून घेणे हा या कामाच अविभाज्य भाग आहे.
आपण या व्यवसायासाठी किती वेळ देऊ शकतो हे अगोदर निश्चित करून त्यानुसार किती कुत्री स्वीकारायची हे ठरविणे महत्वाचे आहे.
सेवा दर कसा ठरवावा-
कुत्रा फिरविणे हे काम बहुतेकवेळा मिनिटांच्या प्रमाणे ठरविले जाते.अर्धा तास, एक तास अशी ही वेळ असते. या वेळेसाठी किती फी आकारायची हे ठरविताना काही गोष्टी विचारात घेऊन ती ठरविणे योग्य ठरते. हे काम करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरापासून दूर जावे लागत असेल तर जाण्यायेण्याचा खर्च आणि वेळ फी आकारताना विचारात घेतला पाहिजे.
एकावेळी तुम्ही किती कुत्री फिरवणार आहात त्यानुसार आकारणी करावी.एखाद्या ग्राहकाला त्याचा कुत्रा अन्य कुत्र्यांसोबत न्यावा असे वाटत नसेल तर त्यासाठी जास्ती फी आकारता येते.कुत्रा कोणत्या ब्रिडचा यावर त्याचे चालणे आणि व्यायाम अवलंबून असतो त्यामुळे सरसकट सर्व जातीच्या कुत्र्यांसाठी एकच दर नको.
घ्यायची काळजी–
जे ग्राहक तुमच्याकडून सेवा घेणार आहेत त्यांचा पूर्ण पत्ता, फोन नंबर, ई मेल, आणीबाणी आल्यास त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, कुत्र्याचे ब्रिड, रंग, जन्मतारीख, हेल्थ हिस्ट्री, पूर्वीच्या इंज्युरीज, अॅलर्जी, कुत्र्याच्या पशुवैद्याचे नाव, त्यांच्या क्लिनिकचा पत्ता यांची नोंद तुमच्याकडे हवी.
ग्राहकाशी तुम्ही कोणत्या सेवा देणार आहात याचा स्पष्ट उल्लेख असलेला करार करणे योग्य. तुम्ही कुत्र्याला प्रशिक्षण देणार असाल तर त्याचा वेगळा दर लावता येतो. तसेच समजा कुत्रा मध्येच रस्त्यात आजारी झाला किंवा त्याला काही दुखापत झाली तर डॉक्टर कडे नेणे हेही त्यात समाविष्ट करता येते आणि त्यासाठी वेगळा चार्ज आकारता येतो.
व्यवसाय प्रसिद्धी –
तुम्ही डॉग वॉकर या व्यवसायात उतरत असलात तर तुमच्या व्यवसायाची प्रसिद्धी करायला हवी. त्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यापैकी काही असे
बिझिनेस
कार्ड छापणे, जाहिरात देणे, व्हेटरनरी क्लिनिक मधून तुमच्या व्यवसायाची माहिती देण्यासाठी सुविधा निर्माण करणे, सुपरमार्केट, डॉग ग्रुमर्स, पेट स्टोर्स अश्या ठिकाणी जाहिरात लावणे.
स्थानिक भागात मित्र, परिचित यांच्याकडे कुत्री असतील तर त्याच्यासोबत काही वेळ घालवून अनुभव मिळतो आणि हा व्यवसाय तुम्ही सुरु करत असल्याची माहिती देता येते. त्यासाठी जाहिरात करण्याची गरज भासत नाही आणि हेच लोक तुमच्या व्यवसायाची माहिती त्यांच्या परिचितांना देतात.
व्यवसायाचा लोगो आणि फोन नंबर असलेले टीशर्ट कुत्री फिरविताना घालणे हाही एक मार्ग अनेकजण वापरतात.मोठी शहरे, नव्याने वसलेल्या वसाहती येथे जाऊन काही ओळखी करून घेता येतात. तेथे कुत्री पाळण्याचे प्रमाण किती आहे याची माहिती मिळवून तेथे आपल्या व्यवसायाची माहिती देता येते.
डिजिटल मार्केटिंग
तुमच्या ग्राहकांशी थेट जोडण्याच्या आणि त्यांच्या मनात हा व्यवसाय रुजविण्याचा सर्वात जवळचा आणि किफायतशीर पर्याय म्हणजे Social Media Marketing (SMM). आज १० पैकी किमान ७ ग्राहक तरी विविध सोशल प्लॅटफॉर्म्स वर सक्रिय आहेत आणि इथे तुमच्या व्यवसायाचे आकर्षक मार्केटिंग करणे नितांत गरजेचे बनलेले आहे. Facebook, Whatsapp, Instagram, Twitter, LinkedIn, Pinterest, YouTube, Snapchat यासारखे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तुम्ही मार्केटिंग साठी वापरू शकता. फेसबुक सारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून विविध ग्रुप जॉईन करता येतात आणि तेथे आपल्या व्यवसायाची माहिती देता येते.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
आव्हाने समजून घ्या-
या क्षेत्रात सध्या खूप स्पर्धा नाही पण भविष्यात ती असेल याची जाणीव ठेऊन दर्जेदार सेवा सुरवातीपासून देणे योग्य ठरते.दुसरे म्हणजे वर्षभर विविध प्रकारच्या हवामानात सुद्धा हे काम करावे लागते. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असला तरी त्यानुसार वेळेत बदल करून काम करावे लागते.
कुत्री न आवडणारी जनता हे आणखी एक आव्हान आहे. त्यामुळे कुत्रे फिरविताना या लोकांना थोडा जरी त्रास झाला तरी त्यांच्याकडून तुमाच्याविरोधात तक्रार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अति उत्साही कुत्री फिरायला नेताना वर्दळ कमी असेल अशी ठिकाणे शोधावी लागतात.पाळीव प्राण्याची
आवड असलेले जसा हा व्यवसाय करू शकतात तसेच शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सुद्धा हा व्यवसाय करून जास्तीची कमाई करू शकतात.
This post was last modified on November 25, 2020 7:08 AM
स्वतंत्रपणे काही उद्योग व्यवसाय करायची इच्छा आहे आणि कमी गुंतवणुकीत चांगला फायदा हवा आहे, लहान…
तुम्ही कधी कोणाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी सल्ला दिला आहे का? हो...परंतु हा सल्ला देताना…
तुम्ही कल्पक आहात का? तुमच्या कल्पकतेचा तुम्ही योग्य वापर करत आहात का? तुमची नोकरी अथवा…
व्यवसाय सुरू करताना व्यावसायिक जागेची निवड, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, दुकान किंवा कार्यालय यासाठी आवश्यक साधन…
आजच्या या संगणक आणि डिजिटल युगात ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक चांगली कमाई करत…
माणसाची अन्न किंवा खाद्य ही मुलभूत गरज आहे. यामुळे खाद्य पदार्थ नेहमीच भरपूर मागणी असणारे…