माणसाची अन्न किंवा खाद्य ही मुलभूत गरज आहे. यामुळे खाद्य पदार्थ नेहमीच भरपूर मागणी असणारे उत्पादन ठरते. ज्यांना व्यवसाय करायचा आहे आणि त्यासाठी फार भांडवल गुंतवायचे नाही, तसेच मोठी जागा नाही अश्यांसाठी अन्न प्रक्रिया उद्योग हे आदर्श व्यवसाय ठरू शकतात. विविध प्रकारे अन्न धान्य वापरून टिकाऊ खाद्यपदार्थ बनविणे असे या उद्योगाचे स्वरूप असते. येथे आपण ज्या अन्न प्रक्रिया उद्योगांची माहिती करून घेत आहोत ते सहज सुरु करता येणारे, कमी भांडवलाची गरज असलेले आणि फायदेशीर होतील असे उद्योग आहेत.
भारताचा विचार केला तर आपल्याकडे खाद्यान्न क्षेत्राची वाढ प्रचंड वेगाने होत असून यात नफा होण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. भारतीय अन्न आणि किराणा बाजार हा जगातील सहा नंबरचा मोठा बाजार असून अन्न प्रक्रिया उद्योग एकूण खाद्यान्न बाजाराच्या ३२ टक्के इतका आहे असे आकडेवारी सांगते.
आपला देश मोठ्या लोकसंख्येचा आहे आणि त्यामुळे दाट लोकवस्तीच्या देशात तुमच्या उत्पादनांना नेहमीच बाजार उपलब्ध होतो. शिवाय बँका आणि इतर वित्तीय संस्था विविध प्रकारची कर्जे आणि अनुदाने या उद्योगासाठी देतात. त्यामुळे असे कोणते उद्योग आपण करू शकतो याची माहिती करून घेणे आवश्यक ठरते.
केळी वेफर्स
कच्या केळ्याचे काप करून विशिष्ठ द्रवात बुडवून नंतर उन्हात किंवा ओव्हन मध्ये वाळविले जातात आणि नंतर ते तळून खाल्ले जातात. हा आपल्याकडचा आवडता स्नॅक आहे. जेवणानंतर मुखशुद्धी किंवा काहीतरी तोंडात टाकायला म्हणून सुद्धा केळी वेफर्सना अनेकांची पसंती आहे. हे उत्पादन स्थनिक बाजारात विकले जाते किंवा मोठ्या प्रमाणावर केले तर निर्यातही करता येते.
या उद्योगाची सुरवात छोट्या प्रमाणावर करता येते. वेफर्स हे रेडी टू ईट खाद्यप्रकारात मोडतात. त्याला मागणीही खूप आहे. उपभोक्त्या कडून प्रचंड प्रमाणावर खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच एफएमसीजी क्षेत्रात या उद्योगाचा समावेश होतो. चांगल्या प्रतीचे केळी वेफर्सना शहरी,नागरी भागात खूप मागणी आहेच पण छोटी शहरे, उपनगरे सुद्धा या उत्पादनाचे चांगले बाजार म्हणून उदयास येत आहेत.
जेथे केळी उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते, अशा ठिकाणी आपले वास्तव्य असेल तर तेथेच हा व्यवसाय सुरु करणे योग्य ठरते. त्यासाठी जागा छोटी पुरते तसेच फार गुंतवणूक करावी लागत नाही.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
पोहे उत्पादन
भारतीय उपखंडात अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे पोहे. अनेकांच्या न्याहरीचा हा महत्वाचा घटक असून फोडणीचे पोहे, दही पोहे, दुध पोहे, चिवडा किंवा नुसते तिखट मीठ आणि थोडे तेल लावून केलेले पोहे अशा विविध प्रकारांनी ते वर्षभर कुठल्याही मोसमात खाल्ले जातात. पोहे हे परिपूर्ण अन्न मानले जाते म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत कुणीही ते खाऊ शकतात आणि त्यात पोषण मूल्यांचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे पोह्यांना सतत मागणी असते.
छोटी शहरे, गावे, खेडी, उपनगरे अशा कोणत्याही ठिकाणी पोह्याची गिरणी सुरु करता येते. हा व्यवसाय करायला सोपा, कमी जागेत होणारा आणि कमी भांडवलाची गरज असलेला आहे. स्थानिक पातळीवर कच्चा माल सहज उपलब्ध होऊ शकतो. भारतात भात, गहू, मका अशा विविध धान्यापासून पोहे बनविले जातात.
काजू प्रक्रिया उद्योग
किमान गुंतवणुकीत चांगला फायदा देणारा हा व्यवसाय आहे. कच्चा काजू १५० रुपये किलोने मिळू शकतो आणि विक्रीसाठी तयार काजूला प्रतवारी नुसार किलोला किमान ८०० रुपयांपासून १२०० पर्यंत भाव मिळू शकतो. काजू उत्पादक क्षेत्रात हा व्यवसाय करणे योग्य असले तरी कच्चा काजू दीर्घकाळ टिकत असल्याने त्याची वाहतूक अडचणीची ठरत नाही त्यामुळे कुठेही हा व्यवसाय सुरु करता येतो.
यासाठी लागणारी यंत्रसामुग्री अगदी कमी आणि फार महाग नसलेली आहे. एका खोलीत सुद्धा काजू प्रक्रिया उद्योग सुरु करता येतो. काजू विविध प्रकारे आहारात समाविष्ट केला जातो. काजूचा बोंडापासून तयार होणारा द्रव रंग उद्योगात मोठी मागणी असलेला पदार्थ आहे.
कच्चे काजू सूर्यप्रकाशात वाळवून पोत्यात साठविले जातात. त्यानंतर बॉयलर मध्ये वाफेवर मऊ शिजवून कुशल मजुरांच्या कडून त्यावरील आवरण काढले जाते आणि ते ड्रायर मध्ये वाळविले जातात. नंतर काजुवर असलेले लालसर रंगाचे साल काढल्यावर काजू तयार होतो. प्रतीनुसार त्याला भाव मिळतो. काजुच्या सालीतून निघणारा द्रव पदार्थ रंग बनविताना वापरला जातो.
काजू अनेक प्रकारे खाल्ले जातात. नुसते तयार काजू, खारविलेले काजू, तळलेले काजू तसेच खाल्ले जातात तर मिठाई बनविणारे हलवाई, बिस्किटे, कुकुज बनविणाऱ्या बेकरी, चॉकलेट बनविणारे यांच्याकडून सुद्धा काजूंना चांगली मागणी असते.
चीज केक बनविणे
चीज केक साठी कच्चा माल म्हणजे चीज, साखर, स्ट्रॉबेरी, आटा, अंडी, मका, वनस्पती तेल, स्टार्च, मीठ, प्रिझरव्हेटीव्ह आणि रंग व इसेन्स, चीज केक अनेक प्रकारात आणि अनेक स्वादात बनविले जातात. त्यात लिंबाच्या स्वादापासून ते चॉकलेट, भोपळा स्वाद अशी प्रचंड रेंज असते. हा व्यवसाय छोट्या स्वरुपात सुरु करता येणारा आहे.
डाळ गिरण्या
भारतात जेथे रोजच्या आहारात डाळींचा समावेश मोठ्या प्रमाणावर होतो तेथे, डाळी तयार करण्याचा व्यवसाय नक्कीच फायदेशीर ठरतो. भारतात डाळ पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आणि बहुतेक सर्व राज्यात घेतले जाते. डाळी बनविण्याचा उद्योग म्हणजे डाळ गिरणी मोठ्या प्रमाणावर केला तर त्यातून जास्त फायदा होतो हे खरे असले तरी छोट्या प्रमाणावर हा उद्योग करुनसुद्धा चांगला नफा कमावता येतो. भारतात अन्न प्रक्रिया उद्योगात डाळी तयार करणे हा तीन नंबरचा मोठा उद्योग आहे. तांदूळ आणि गहू या नंतर डाळ गिरणीचा नंबर येतो.
तुम्हाला कच्च्या मालाचा पुरवठा सातत्याने होतो का यावर या उद्योगातील नफा अवलंबून आहे. डाळ उत्पादक क्षेत्रात हा व्यवसाय सुरु करणे चांगले कारण त्यामुळे कच्चा माल सतत उपलब्ध राहतो. आपल्याकडे तूर, उडीद, मुग, मसूर, मटकी, पावटा, हरबरा अश्या अनेक धान्यापासून डाळी बनविल्या आणि खाल्ल्या जातात.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
पीठ गिरणी
अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनविताना विविध धान्याची पीठे वापरली जातात. रोजच्या आहारात गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि डाळी यांची पीठे वापरली जाण्याचे प्रमाण भारतात मोठे आहे. छोटी जागा आणि गिरणी एवढीच या व्यवसायाची गरज आहे. कमी भांडवलात आणि कमी जागेत होणारा हा व्यवसाय असून गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी, धान्ये एकत्र करून भाजून केलेल्या भाजण्या, मेतकुट, वरी, साबुदाणा, नाचणी अशी अनेक पीठे दळून देता येतात.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
पापड
आपल्याकडे उन्हाळी वाळवणे यात पापड, कुरडई, सांडगे अश्या पदार्थांचा समावेश आहे. पैकी पापड उद्योग छोट्या स्वरुपात अगदी घरगुती पातळीवर सुद्धा सुरु करता येतो. यासाठी करावी लागणारी गुंतवणूक अगदी कमी आहे. पापडाचे अनेक ब्रांड बाजारात असले तरी घरगुती, स्थानिक पातळीवर बनलेल्या पापडांचे बाजारपेठेवर वर्चस्व आहे. हॉटेल्स, होस्टेल्स, रेस्टॉरंट, विद्यार्थी होस्टेल, खानावळी,, रिसोर्ट अश्या सर्व ठिकाणी पापडाना मागणी असते. उत्तम चव आणि मुग, बटाटा, उडीड, पोहा, नाचणी असे विविध प्रकारचे पापड असतील तर तुमच्या उत्पादनांना चांगली मागणी येऊ शकते.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
बटाटा वेफर्स
कुरकुरीत, खमंग बटाटा वेफर्स हे भारतातील फारच लोकप्रिय रेडी टू ईट स्नॅक आहे. शिवाय त्यासाठीचा कच्चा माल म्हणजे बटाटे वर्षभर उपलब्ध असतात. वेफर्स बनविण्याची प्रक्रिया सोपी आणि यंत्रसामुग्रीची फार गरज नसलेली आहे. नागरीकरणाचा वाढता वेग, लोकसंख्या वाढ आणि तरुण पिढी कडून पॅकेज फूड ला मिळत असलेला चांगला प्रतिसाद पाहता हा व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो. छोट्या प्रमाणावर उद्योग करायचा विचार असेल तर बटाटा वेफर्स हा चांगला पर्याय आहे. छोट्या जागेत हा व्यवसाय होऊ शकतो आणि रिटेल वितरणासाठी हे योग्य असे उत्पादन आहे.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
सोया चंक्स किंवा सांडगे
कष्टाची तयारी असलेले कुणीही हा व्यवसाय करू शकतात. त्याचा मुख्य कच्चा माल म्हणजे सोयाबीन पीठ, शेंगदाणा पीठ. ही पीठे बारीक करून एकत्र मिसळली जातात, थापून त्याचे कटिंग केले जाते. प्रथिनांचा उत्तम स्त्रोत असलेले हे सोया चंक्स बाजारात चांगली मागणी असलेले उत्पादन असून त्यासाठी मध्यम स्वरुपाची गुंतवणूक करावी लागते.
टूटीफ्रूटी तयार करणे
या प्रोसेस फूड साठी कच्चा माल म्हणजे कच्ची पपई, आकर्षक रंग, साखर, प्रिझरव्हेटीव्ह. केक, बेकरी उत्पादने, ब्रेड, बिस्किटे, आईस्क्रीम यात टूटीफ्रूटी चा वापर केला जातो. पपई हे बारा महिने आणि कुठेही मिळणारे फळ आहे. कमी गुंतवणुकीत टूटीफ्रूटी तयार करण्याचा व्यवसाय सुरु करता येतो. तरुण उद्योजकांना ही चांगली संधी ठरू शकते.
मध प्रक्रिया
मधातून मेण व अन्य मिसळलेले पदार्थ बाहेर काढून शुध्द मध तयार करायची ही प्रक्रिया आहे. त्यात हाताने चालविण्याचे मशीन आणि इलेक्ट्रिकवर चालणारे मशीन असे दोन पर्याय आहेत. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि घरातल्या घरात सुद्धा हा व्यवसाय करता येतो.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
द्राक्षाची वाईन
द्राक्षाचा रस आंबवून किंवा फर्मेंट करून त्यापासून द्राक्षाची वाईन बनविली जाते. याचा मुख्य कच्चा माल म्हणजे द्राक्षे. यात बऱ्यापैकी गुंतवणूक करावी लागते शिवाय तयार वाईनचे योग्य मार्केटिंग आणि उद्योग धोरण ठरवून त्याप्रमाणे व्यवसाय करावा लागतो.
सोया सॉस
सोयाबीन, गहू, मीठ हा कच्चा माल वापरून सोया सॉस बनविला जातो. अनेक प्रकारचे सोया सॉस बनविता येतात मात्र त्यासाठी उत्पादन प्रक्रिया वेगवेगळी आहे. छोट्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरु करता येतो.
हिंग तयार करणे
भारतीय स्वयंपाकात स्वाद आणि औषधी म्हणून हिंग प्राचीन काळापासून वापरात आहे. छोट्या प्रमाणावर कुणाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर हिंग तयार करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरु करता येतो.
भारतात केवळ स्वयंपाकातील रुची आणणारा एक पदार्थ इतकाच हिंगाचा वापर मर्यादित नाही तर औषधी म्हणून तसेच सौंदर्यप्रसाधने, आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठीही हिंगाला मोठी मागणी आहे. भारतीय भोजनाची कल्पना मसाल्यांच्या वापराशिवाय करता येत नाही. आपल्याकडे देशभर सर्वत्र हिंगाचा वापर स्वयंपाकात स्वाद येण्यासाठी तसेच वातहारक म्हणून दररोज केला जातो. शुध्द स्वरूपातील हिंग अतिशय तीव्र वासाचा असतो त्यामुळे त्यात गव्हाच्या पीठाप्रमाणे काही अन्य पदार्थ मिसळून त्याचा वास कमी केला जातो. असा हिंग वापरला जातो.
हिंगाला निर्यातीच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे योग्य व्यवस्थापन आणि मार्केटिंग करून हा व्यवसाय सुरु केला तर तो फायदेशीर ठरू शकतो.
आले-लसूण पेस्ट
भारतीय पदार्थात वापरल्या जाणाऱ्या मसाले पदार्थात हळद, हिंग, मोहरी, जिरे या प्रमाणेच आले आणि लसूण यांच्या वाटणाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. पदार्थाला खमंग चव, थोडका तिखटपणा देण्यासाठी आणि औषधी गुणधर्मानी परिपूर्ण म्हणून आले लसूण वाटण विविध पदार्थात वापरले जाते. पचन क्रियेला उत्तेजन देणारे हे पदार्थ आहेत. आजही अनेक घरात ताजे आले लसूण वाटून ते वापरण्याकडे कल असला तरी वेळेची बचत, हाताशी तयार मिळावे यासाठी अनेक महिला वर्ग आले लसूण तयार पेस्ट वापरण्यास प्राधान्य देतात.
हॉटेल्स, रेस्टॉरंट, खानावळी आणि चविष्ट स्नॅक्स तयार करून विकणाऱ्यांचीही अशा तयार पेस्टला मागणी खूप आहे. याची उत्पादन प्रक्रिया अगदी सोपी असून हा व्यवसाय घराच्या घरी सुद्धा आणि कमी भांडवलात सुरु करता येतो. व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असलेल्या हौशी उद्योजकांना हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो शिवाय अधिक कष्टाची तयारी असेल तर निर्यातीच्या संधी सुद्धा आहेत.
लेमोनेड
लिंबाच्या स्वादाचे, थकवा दूर करून ताजेपणा देणारे हे पेय भारतात लिंबू पाणी या नावाने लोकप्रिय आहे. प्राचीन काळापासून भारतात लिंबू पाणी पिण्याची पद्धत आहे. लेमोनेडचे उत्पादन नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. विशेषत भारतासारख्या उष्ण हवेच्या देशात त्याला मोठी मागणी आहे आणि त्यामुळे या व्यवसायात चांगली संधी आहे. विशेषतः उन्हाळ्यात हे थंडगार पेय म्हणून सेवन केले जाते.
शहरीच नव्हे तर आजकाल भारतातील मोठ्या शहरांप्रमाणे छोटी शहरे आणि खेडोपाडी सुद्धा बाटलीबंद पाणी, ज्यूस याना मागणी वाढते आहे. त्यामुळे असे बाटलीबंद लेमोनेड तुम्ही तयार करून विकू शकता. एका आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी दरडोई बाटलीबंद पेये पिण्याचे प्रमाण ६ बाटल्या असे आहे. दिल्लीत हेच प्रमाण दरडोई, वर्षाला ५० असे आहे.
नुडल्स तयार करणे
लघु उद्योग स्वरुपात तुम्ही नुडल्स तयार करायच्या उद्योगाचा विचार करू शकता. अर्थात स्थानिक मागणी कशी आहे त्याचा आढावा घेऊन साध्या, अंडा नुडल्स, मसाला नुडल्स, व्हार्मिसेली, मॅक्रोनी, स्पाघेटी , पास्ता असे विविध इन्स्टन्ट प्रकार तुम्ही तयार करू शकता.
या व्यवसायाला जोड म्हणून आणि नफ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी रेडी टू कुक सुप्स नुडल्स साठीची मशीन वापरून बनविता येतात. भारतात नुडल्स हा खाद्यप्रकार अतिशय वेगाने लोकप्रिय झाला असून त्यांना चांगली मागणी आहे. देशातील बहुतेक सर्व घरात हा प्रकार आवडीने खाल्ला जातो. शिवाय रेस्टॉरंट, कॅन्टीन, स्ट्रीट फूड स्टॉल्स, क्लब्ज, यांच्याकडून ही मोठ्या प्रमाणात नुडल्स खरेदी होत असते. यात आशिया प्रशांत देशात निर्यातीचा संधी मोठ्या प्रमाणावर आहेत. मध्यम स्वरुपाची गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरु करता येतो. अर्थात यासाठी रिटेल वितरण व व्यवसाय कौशल्ये यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
खाकरा तयार करणे
खास गुजराथी, मारवाडी पदार्थ अशी ओळख असलेला कुरकुरीत, खमंग आणि कोणत्याही वेळी खाता येणारा खाकरा आता सर्व भारतीयांच्या जिभेवर विराजमान झालेला पदार्थ आहे. गव्हाच्या पिठापासून आजही गुजराथी, जैन घरात खाकरे बनतात आणि हा पदार्थ दीर्घकाळ टिकणारा असल्याने त्याला बाजारात मागणी चांगली आहे. गुजराथी जैन घरात नाश्त्यासाठी खाकरा खाल्ला जाण्याची पद्धत असली तरी दुपारचा चहा, किंवा कधीही काहीतरी हलके खाण्याची इच्छा झाली की खाकरा आवर्जून आठवतो अशी आजची परिस्थिती आहे.
प्रवासात सहज नेता येणारा, डाएट प्रेमी, हलका आहार घेणारे अश्या अनेक थरातील लोकांना खाकरा चालतो. अगदी दुर्गम भागात ट्रीपला गेला असाल तर तेथेही खाकरा जगण्यासाठी आवश्यक उर्जा देणारा ठरतो असे आल्प्स पर्वत रांगा मध्ये ट्रेकिंगला जाणाऱ्या ट्रेकर्सचा अनुभव आहे. दाक्षिणात्य डोसा, इडली प्रमाणे खाकरा सुद्धा आता जागतिक मान्यता असलेला पदार्थ बनला आहे. अगदी कमी गुंतवणूक करून घरच्या घरी खाकरे बनविण्याचा व्यवसाय फायदा मिळवून देण्याच्या दृष्टीने चांगला व्यवसाय ठरू शकतो.
सुगंधी सुपारी
भारतीय जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून सुपारी खातात. तोंडाला ताजेपणा देणारी सुपारी लहान मुलांपासून वृद्ध व्यक्ती अशी सर्व वयोगटात आवडीने खाल्ली जाते. कच्ची सुपारी खाण्याचे प्रमाण कमी असले तरी प्रक्रिया करून तयार केलेली मसाला अथवा सुगंधी सुपारी विशेष लोकप्रिय आहे. छोटे पॅक करून सुगंधी सुपारीचे अनेक प्रकार विक्रीसाठी उपलब्ध करता येतात.
रोठा सुपारी, चिकणी सुपारी यापासून ही मसाला सुपारी बनविली जाते. त्याला वेलदोडा, केशर, चंदन, कपूर असे विविध स्वाद ते ते पदार्थ वापरून देता येतात. छोट्या प्रमाणावर हा उद्योग सुरु केला तरी खूप फायदा मिळू शकतो. यासाठी लागणारा कच्चा माल बाजारात सहज उपलब्ध होतो आणि कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय घराच्या घरी सुद्धा करता येतो.
टोमॅटो प्रक्रिया
टोमॅटो सर्वत्र मिळणारा आणि त्यावर प्रक्रिया करून अनेक प्रकारची उत्पादने तयार करता येणारा असा आहे. टोमॅटोवर प्रक्रिया करून बनविले जाणारे सॉस, केचप, प्युरी, ज्यूस प्रचंड लोकप्रिय आहेत. याचबरोबर टोमॅटो पल्प सुद्धा मोठ्या प्रमाणावर बाजारात खपतो. अन्य उद्योगांना या पदार्थाचा पुरवठा तुम्ही करू शकता.
विशेष म्हणजे टोमॅटो प्रकिया विशेष अवघड किंवा क्लिष्ट नाही. साधी मशिनरी आणि उपकरणे त्यासाठी पुरेशी ठरतात. सिझन मध्ये टोमॅटो खूप स्वस्त मिळतात. तर ऑफ सिझन ला त्यांच्या किमती वाढतात. टोमॅटो मध्ये पोषण मूल्ये चांगल्या दर्जाची आहेत. त्यामुळे टोमॅटो प्रक्रिया उद्योगात नफ्याच्या संधी मोठ्या आहेत. टोमॅटो केचप किंवा सॉस उद्योग चांगला नफा मिळवून देऊ शकतो. छोट्या प्रमाणावर, कमी गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरु करता येतो.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
आम पापड बनविणे
नावावरून लगेच लक्षात येते की हा आंब्यापासून बनविला जाणारा पदार्थ आहे. त्याला आंब्याचे साठे असेही म्हणतात. भारतात सर्वत्र आंबा अतिशय आवडीने खाल्ला जातोच पण आंब्यापासून बनणाऱ्या अनेक पदार्थांना मोठी मागणीही आहे. विशेष म्हणजे आम पापड नावाने प्रसिध्द असलेल्या या पदार्थाला देशभर मागणी आहे.
आंबा हे फळ जरी वर्षातील ठराविक काळात मिळणारे म्हणजे सिझनल असले तरी आंब्यापासून अनेक टिकाऊ पदार्थ बनविता येतात त्यातील आम पापड हा एक पदार्थ आहे. यासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक नाही तसेच यंत्र घ्यावे लागत असले तरी बँकेकडून लोन मिळू शकते. लघु उद्योगांसाठी केंद्र सरकारने अनुदाने जाहीर केली आहेत त्याचा फायदाही या उद्योगाला मिळू शकतो.
मधु मेहींसाठी खास पदार्थ
केवळ भारतातच नाही तर जगभरात मधुमेही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. भारतात हे प्रमाण खुपच अधिक आहे. या रुग्णांना रोजच्या आहारात नैसर्गिक आरोग्यपूर्ण पदार्थ घेणे आवश्यक असल्याने अश्या पदार्थांना मोठी मागणी आहे. त्यामुळे असे पदार्थ तयार करून विकले तर त्यातून चांगला नफा मिळविता येतो.
अर्थात त्यासाठी कोणते पदार्थ बनवायचे याची योग्य निवड महत्वाची ठरते. आपल्या पदार्थांसाठी मार्केटिंग धोरण आखणे हा महत्वाचा भाग आहे. त्यादृष्टीने रेडी टू इट बरोबर रेडी टू कुक असे दोन्ही प्रकारचे पदार्थ ठरविता आले पाहिजेत. यात खूप पर्याय आहेत. विविध प्रकारच्या मिठाया, आईसक्रीम, जॅम,जेलीज, डायट पेये, बेकरी उत्पादने, डेअरी उत्पादने असे विविध पर्याय निवडू शकता. या उत्पादनांना बाजार संधी मोठी आहे.
मधुमेही साठी योग्य लो ग्लायसेनिक म्हणजे पदार्थातील कर्बोहायड्रेट मुळे रक्तशर्करा न वाढणारे पदार्थ, साखर विरहीत अथवा कृत्रिम स्वीटनर वापरून बनविलेले पदार्थ याना चांगली मागणी आहे. हा व्यवसाय फार गुंतागुंतीचा नाही आणि छोट्या प्रमाणावर गुंतवणूक करूनही सुरु करता येतो.
चिंच पेस्ट किंवा चिंच चटणी (चिंचेचा कोळ)
चिंचेची चटणी किंवा चिंचेचा कोळ अनेक प्रकारे भारतीय पद्धतीच्या पदार्थात वापरला जातो. चटण्या, कढी, सांबार, सरबते अश्या अनेक पदार्थात त्याचा वापर होतोच पण चिंचेची गोड चटणी विशेष लोकप्रिय आहे. चटकदार भेळ, रगडा पॅटीस, अशा गाड्यांवर मिळणाऱ्या पदार्थात तसेच समोसा, वडा पाव अश्या अनेक लोकप्रिय पदार्थात चिंचेची चटणी रुची वाढविण्याचे काम करते. भारतात तसेच पाकिस्तान सुद्धा चिंचेची चटणी लोकप्रिय आहे.
तयार झालेल्या चिंचेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण २० टक्के, तंतूचे प्रमाण ६ टक्के तर कर्बोदके ६७ टक्के अश्या प्रमाणात असतात. चिंचेचा कोळ नाशवंत आहे त्यामुळे दररोजच्या वापरासाठी पॅकबंद पाकिटाना चांगली मागणी असते. कच्ची चिंच पाण्यात भिजवून त्याचा कोळ काढणे सोपे असले तरी आजच्या धावपळीच्या आयुष्यात ते जमतेच असे नाही. यामुळे मोठी शहरे, मेट्रो बरोबर छोट्या शहरातूनही या उत्पादनाला मागणी वाढती आहे.
This post was last modified on December 20, 2020 5:37 PM
स्वतंत्रपणे काही उद्योग व्यवसाय करायची इच्छा आहे आणि कमी गुंतवणुकीत चांगला फायदा हवा आहे, लहान…
तुम्ही कधी कोणाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी सल्ला दिला आहे का? हो...परंतु हा सल्ला देताना…
तुम्ही कल्पक आहात का? तुमच्या कल्पकतेचा तुम्ही योग्य वापर करत आहात का? तुमची नोकरी अथवा…
व्यवसाय सुरू करताना व्यावसायिक जागेची निवड, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, दुकान किंवा कार्यालय यासाठी आवश्यक साधन…
आजच्या या संगणक आणि डिजिटल युगात ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक चांगली कमाई करत…
आपल्या रोजच्या आयुष्यात लागणारया ज्या वस्तू आहेत त्यात स्वच्छतेसाठी साबण ही एक महत्वाची गरज आहे.…