आपल्यापैकी अनेक जण अतिशय कल्पक असतात. निरनिराळी डिझाइन्स, वॉल आर्ट सारख्या कलांच्या माध्यमातून आपल्या कल्पकतेचा वापर करून निरनिराळी प्रोडक्ट्स इत्यादी तयार करण्याचे कसब काहींच्या अंगी असते. याच कौशल्याचा वापर जर अर्थार्जनासाठी करता आला तर अनेक कलाकारांना स्वतःच्या कलागुणांना वाव देण्याची संधी तर मिळेलच त्याशिवाय त्याद्वारे उत्तम अर्थार्जनही करता येऊ शकेल.
त्याचबरोबर जर तुमची स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट असेल तर अनेक ‘कस्टमाईझ’ (Customize) केलेली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा पर्यायही ही अर्थार्जनाच्या दृष्टीने उत्तम ठरू शकतो. यादृष्टीने ऑन डिमांड प्रिंटिंग हे कार्यक्षेत्र सध्या लोकप्रिय ठरत आहे. म्हणूनच या कार्यक्षेत्राची निवड करायची झाल्यास त्याबद्दल विस्तारपूर्वक माहिती करून घेणे आवश्यक आहे. प्रिंट ऑन डिमांड साठी व्यावसायिकाने स्वतःची इ-कॉमर्स साईट कशी तयार करावी किंवा त्यासाठी इतर कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याबद्दलची माहिती, या व्यवसायाची सुरुवात करताना असणे गरजेचे ठरते
‘POD’ किंवा ‘प्रिंट ऑन डिमांड’ यालाच ‘ऑन डिमांड प्रिंटिंग’ असेही म्हटले जाते. हे एक प्रकारचे ई-कॉमर्स मॉडेल असून याद्वारे ग्राहकांनी निवडलेली डिझाईन्स एखाद्या प्रॉडक्ट वर प्रिंट करून, ही प्रोडक्ट्स ‘कस्टमाईझ’ केली जातात. ऑन डिमांड प्रिंटिंगच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यावसायिकाला स्वतःहून कोणत्याच साधनसामग्रीची जुळवाजुळव करण्याची आवश्यकता नसते. त्याऐवजी व्यावसायिकाने केवळ एखाद्या POD प्लॅटफॉर्म सोबत संलग्न होऊन ग्राहकांच्या मागणीची पूर्तता या प्लॅटफॉर्म द्वारे करायची असते. त्यानंतर ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादनांवर प्रिंटिंग करण्याची आणि ही उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित POD प्लॅटफॉर्मची असते.
प्रिंट ऑन डिमांड ही एका अर्थी ‘ड्रॉप शिपिंग’ची पद्धत म्हणता येऊ शकेल. यामध्ये व्यावसायिकाला या व्यवसायासाठी लागणारी इन्व्हेंटरी किंवा प्रोडक्ट्सचे शिपिंग या सर्व गोष्टींची आखणी करण्याची आवश्यकता नसते. या सर्व गोष्टींची जबाबदारी व्यावसायिकावर नसून हे व्यवस्थापन पाहणाऱ्या त्रयस्थ प्लॅटफॉर्म कडे असते. त्यामुळे कस्टम-मेड उत्पादनांच्या ‘स्टॉक होल्डिंग’ साठी व्यावसायिकाला कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. एकदा ग्राहकाने एखाद्या प्रॉडक्टची ऑर्डर दिल्यानंतरच त्या प्रोडक्टवर प्रिंटिंग होऊन प्रॉडक्ट तयार केले जाते.
POD कार्यक्षेत्राचे स्वरूप :
प्रिंट ऑन डिमांडचा व्यवसाय करत असताना यामध्ये निरनिराळ्या प्लॅटफॉर्म्सचा वापर केला जात असतो. त्याचबरोबर या व्यवसायाची सर्वसाधारण प्रक्रिया अशा स्वरूपाची असते :
१. स्वतःचे स्टोअर स्थापित करणे- ऑन डिमांड प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करताना व्यावसायिकाला सर्वप्रथम स्वतःचे स्टोअर स्थापित करणे आवश्यक असते. व्यावसायिकाने कोणत्या प्रकारचा p.o.d. प्लॅटफॉर्म निवडला आहे यावरून दोन महत्त्वाच्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. सर्वप्रथम ‘प्रिंटफुल’ किंवा ‘प्रिंटीफाय’ यांसारख्या प्रिंट ऑन डिमांड सेवांचा थेट संपर्क ‘शॉपिफाय’ (Shopify) , ‘बिग कॉमर्स’(Big commerce) किंवा ‘एत्सी’ (ETSY) सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सशी असतो. जर व्यावसायिकाचे स्वतःचे ऑनलाईन स्टोअर असेल, तर या मोठ्या आणि नामांकित POD प्लॅटफॉर्म्स द्वारे व्यावसायिक आपल्या प्रोडक्ट्सची विक्री करू शकतो. जर विक्रेत्याकडे स्वतःची ई-कॉमर्स साईट नसेल, तर त्याला स्वतःची प्रोडक्ट्स एखाद्या नामांकित POD प्लॅटफॉर्मद्वारे प्रदर्शित करता येऊ शकतात. ‘झॅझल’ (Zazzle) व ‘रेड बबल’(Red Bubble) सारख्या साईट्सद्वारे व्यावसायिकाला स्वतःचे प्रोफाईल तयार करता येऊन त्याद्वारे त्याच्याकडे असलेली प्रोडक्ट्स प्रदर्शित करता येऊ शकतात.
२. POD व्यवसायासाठी दुसरी महत्वाची पायरी म्हणजे विक्रेत्याने स्वतः तयार केलेली डिझाइन्स किंवा त्याला विक्रीसाठी उपलब्ध करायची असलेली निरनिराळी प्रोडक्ट्स ई-कॉमर्स साईटवर अपलोड करणे. एकदा व्यावसायिकाने त्याला हव्या असलेला POD प्लॅटफॉर्मची निवड केल्यानंतर किंवा POD साईटवर स्वतःचे प्रोफाईल तयार केल्यानंतर त्याने त्याच्याकडे असलेली डिझाइन्स किंवा प्रोडक्ट्सचे नमुने या साईट द्वारे ग्राहकांच्या माहितीसाठी प्रदर्शित करावेत. व्यावसायिकाने जर त्याच्या प्रोडक्ट्सच्या विक्रीसाठी एखाद्या POD फुलफिलमेंट सेवेची निवड केली असेल, तर त्या सेवेद्वारे व्यावसायिक त्याला हवी असलेली प्रोडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. उदाहरणार्थ एखाद्या पेंटरला त्याने तयार केलेल्या पेंटींग्जची विक्री करायची झाल्यास त्याच्या संग्रही असलेले तयार कॅनव्हास त्याला POD साईटवर प्रदर्शित करता येतात. तसेच एखाद्या व्यावसायिकाने टीशर्टसवर प्रिंट करता येण्यासारखी आकर्षक डिझाइन्स तयार केली असल्यास, ही डिझाइन्सदेखील त्याला POD साईटद्वारे प्रदर्शित करता येतील.
३.एखाद्या POD प्लॅटफॉर्मशी संलग्न झाल्यानंतर व्यावसायिकाच्या संग्रही उपलब्ध आलेली प्रोडक्ट्स किंवा डिझाइन्स ग्राहकांना पाहता येऊ शकतात. जर व्यावसायिक एखाद्या फुलफिलमेंट साईटचा वापर करीत असेल, तर त्याला या साईट्सद्वारे त्याची प्रोडक्ट्स ग्राहकांपर्यंत पोहोचविता येतात. जर व्यायसायिक मार्केटप्लेसचा उपयोग करीत असेल, तर त्या मार्केटप्लेसचा प्रोव्हायडर व्यावसायिकाच्या प्रोडक्ट्सचे मार्केटिंग करतो. असे जरी असले, तरी व्यावसायिकाला देखील स्वतःच्या प्रोडक्ट्सचा प्रसार करता येतो, व त्याने शेअर केलेल्या प्रोडक्ट लिंक्सच्या माध्यमातून ग्राहकांना ही प्रोडक्ट्स पाहता येऊ शकतात. सरते शेवटी ग्राहकांपर्यंत प्रोडक्ट्सची माहिती पोहोचविणे हेच या सर्व प्रक्रियेचे उद्दिष्ट असते. जेव्हा ग्राहक एखाद्या प्रोडक्टला किंवा डिझाईनला पसंती देऊन त्याची मागणी करतात, तेव्हा त्या प्रोडक्टचे प्रिंटींग, तयार प्रोडक्टचे पॅकेजिंग आणि शिपिंगद्वारे प्रोडक्ट ग्राहकापर्यंत पोहोचविण्याचे काम POD प्लॅटफॉर्मद्वारे केले जात असते. एकदा ही खरेदी-विक्रीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली, की प्रोडक्ट्सद्वारे प्राप्त झालेली मिळकत व्यावसायिकाला प्राप्त होत असते.
प्रिंट ऑन डिमांड सारख्या व्यवसायाची निवड करताना त्याबद्दलच्या काही सकारात्मक आणि नकरात्मक बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यवसाया प्रमाणेच याही व्यवसायाचे काही फायदे आणि तोटे आहेत. या व्यवसाया द्वारे होणाऱ्या फायद्यांच्या बद्दल बोलायचे झाल्यास याचा सर्वात मोठा फायदा असा, की हा व्यावसाय प्रस्थापित, म्हणजेच ‘सेट अप’ करणे अतिशय सहजसाध्य आहे. या व्यवसाया साठी आवश्यक असलेल्या POD प्लॅटफॉर्म्सचा वापर करणे ही तितकेसे अवघड नाही. यासाठी व्यावसायिकाला केवळ POD प्लॅटफॉर्म द्वारे स्वतःची प्रोफाईल तयार करावी लागते. एकदा ही प्रोफाईल तयार झाली, की व्यावसायिकाची प्रोडक्ट्स व डिझाइन्स ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होते. या व्यवसायाचा दुसरा मोठा फायदा असा, की या व्यवसाया मध्ये व्यावसायिकाला कोणत्याही प्रकारच्या इंव्हेंटरीची (Inventory) किंवा प्रोडक्ट्सच्या स्टॉक कॉस्टची चिंता करावी लागत नाही, या व्यवसाया मध्ये प्रोडक्ट्स आधी पासूनच तयार करण्यासाठी व्यावसायिकाला कोणत्याही भांडवलाची गुंतवणूक करावी लागत नाही, कारण ग्राहकाने एखादे प्रोडक्ट किंवा डिझाईन पसंत केल्यानंतरच त्या प्रोडक्टची निर्मिती व प्रिंटींग, ग्राहकाच्या मागणीनुसार केले जाते. त्यामुळे आधीपासून तयार केलेली प्रोडक्ट्स जर विकली गेली नाहीत, तर त्यापायी भांडवल गुंतून पडण्या सारख्या समस्या या व्यवसाया मध्ये क्वचितच उद्भवताना दिसतात. तसेच ग्राहकाच्या मागणीनुसार प्रोडक्ट्स तयार केली जात असल्याने प्रोडक्ट्सचा पुरवठा अपुरा पडला असल्याची समस्याही या व्यवसाया मध्ये पाहायला मिळत नाही.
रिटेल व्यवसायामध्ये ग्राहकाच्या मागणीनुसार प्रोडक्ट्सचा पुरवठा करणे, तसेच प्रोडक्ट्सचा अतिरिक्त स्टॉक बाळगणे ही मोठ्या फिकिरीचे काम असते. तसेच यामध्ये प्रोडक्ट्सचे पॅकेजिंग आणि शिपिंगचे कामही मोठे जोखमीचे असून या सर्व कामांची जबाबदारी खुद्द रिटेल व्यावसायिकाची असते. मात्र प्रिंट ऑन डिमांड सारख्या व्यवसाया मध्ये ही सर्व प्रक्रिया सांभाळण्याची जबाबदारी POD प्लॅटफॉर्म्स द्वारे पार पाडली जात असते. यामध्ये प्रोडक्टचे प्रिंटींग, पॅकेजिंग आणि शिपिंग या सर्व कामांचा समावेश असतो. प्रिंट ऑन डिमांडचा व्यवसाय असा आहे, ज्यामध्ये विक्रेत्याला त्याने तयार केलेली, त्याला हवी ती डिझाइन्स प्रदर्शित करण्याची मुभा असते. त्यामुळे स्वतःच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी व्यावसायिकाला मिळत असते. व्यावसायिकाने प्रदर्शित केलेली डिझाइन्स ग्राहकांना पसंत पडल्यास त्या प्रोडक्टची मागणी ग्राहक करतात. या मागणीची पूर्तता POD प्लॅटफॉर्म द्वारे केली जाते. त्यामुळे प्रोडक्टचे प्रिंटींग, पॅकेजिंग, शिपिंग यासर्व कामांमध्ये गुंतून न पडता नवनवीन डिझाइन्स किंवा प्रोडक्ट्सच्या निर्मितीवर व्यावसायिकाला स्वतःचे लक्ष केंद्रित करता येते.
या व्यवसायाचे जसे अनेक फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असा, की या व्यवसाया मध्ये व्यावसायिकाला मोठा नफा मिळण्याची शक्यता फारशी उद्भवत नाही. मुळात या व्यवसाया द्वारे तयार केली जाणारी प्रोडक्ट्स, ही ग्राहकाच्या खास मागणीवरून तयार केली जात असतात. त्यामुळे होलसेल बाजारपेठे मध्ये मिळणाऱ्या प्रोडक्ट्सच्या किंमती पेक्षा या प्रोडक्ट्सची किंमत बरीच जास्त असते. त्यामुळे मुळातच किंमत जास्त असलेल्या प्रोडक्टमध्ये आणखी दरवाढ करून व्यावसायिकाला त्याद्वारे जास्त नफा कमविणे शक्य नसते. उदाहरणार्थ, ‘प्रिंटफुल’ (Printful) या POD प्लॅटफॉर्म द्वारे तयार करण्यात आलेल्या एका टीशर्टची किंमत साधारण २५ डॉलर्स इतकी असते. मात्र ‘अलिबाबा’ (Alibaba) सारख्या इ-कॉमर्स वेबसाईट द्वारे असे टीशर्ट होलसेल भावामध्ये खरेदी करता येणे शक्य असून, इथे एका टी शर्टची किंमत केवळ ७ डॉलर्स पर्यंत असते. मात्र यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी, कि ‘अलिबाबा’ सारख्या साईट्स वरुन खरेदी केलेल्या प्रोडक्ट्सची किंमत जरी कस्टम-मेड प्रोडक्ट्सच्या तुलने मध्ये पुष्कळ कमी असली, तरी या साईट वरून प्रोडक्ट्स मागविताना साईटने निर्देशिलेल्या किमान संख्येनुसार ही प्रोडक्ट्स मागवावी लागतात. म्हणजेच या साईटवरून टीशर्ट सारखे प्रोडक्ट मागविताना किमान एक हजार टीशर्ट्स मागविणे अनिवार्य असते.
प्रिंट ऑन डिमांड व्यवसायाच्या बाबतीत अडचणीचा ठरणारा आणखी एक मुद्दा असा की प्रोडक्टचे डिझाईन जरी ग्राहकाच्या पसंतीनुसार प्रोडक्टवर प्रिंट होत असले, तरी याचे पॅकेजिंग POD प्लॅटफॉर्म द्वारे केले जात असते. त्यामुळे तयार प्रोडक्ट जितके आकर्षक असते, तितके आकर्षक त्याचे पॅकेजिंग असेलच असे नाही. त्यामुळे प्रोडक्ट हातात पडल्यानंतर त्याच्या ‘अनबॉक्सिंग’बद्दल असलेल्या ग्राहकाच्या उत्साहाचा, सर्वसाधारण दिसणाऱ्या पॅकेजिंगमुळे विरस होऊ शकतो. तसेच संपूर्ण निर्मितीची व खरेदी-विक्रीची प्रक्रिया POD प्लॅटफॉर्म्सच्या मार्फत केली जात असल्याने व्यावसायिकाला या प्रोडक्ट्सना स्वतःचा आगळा ‘पर्सनल टच’ देता येत नाही. तसेच प्रोडक्ट समवेत एखादे फ्री गिफ्ट किंवा स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड (Visiting card), ब्रोशर (Brochure) यांसारख्या वस्तूही व्यावसायिकाला ग्राहकां पर्यंत पोहोचविता येत नाहीत. त्यामुळे व्यावसायिकाचा आणि ग्राहकांचा प्रत्यक्ष संपर्क होणे, या व्यवसाया मध्ये तितकेसे शक्य होत नाही.
एखाद्या व्यावसायिकाला त्याच्या द्वारे तयार प्रोडक्ट्स अथवा डिझाइन्सची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून स्वतःचा खास ब्रँड बाजारात आणायचा असल्यास त्यासाठी प्रिंट ऑन डिमांडचा पर्याय अयोग्य ठरतो. प्रिंट ऑन डिमांडसारख्या व्यवसायामध्ये ग्राहकाच्या पसंतीने, व त्याने केलेल्या मागणीनुसार प्रोडक्ट्स तयार होत असतात. त्यामुळे मागणी नसताना या प्रोडक्ट्सची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणे शक्य नसते. तसेच प्रोडक्टची निर्मिती करताना ग्राहकाच्या मागणीनुसारच हे प्रोडक्ट तयार होत असल्याने सर्व साधारण पणे बाजारामध्ये लोकप्रिय असणारी प्रोडक्ट्स या व्यवसाया द्वारे उपलब्ध करून देता येत नाहीत. या उलट ‘अलिबाबा’ सारख्या ‘ड्रॉप शिपिंग’ (Drop shipping) साईटवर सर्वच प्रकारची उत्पादने ग्राहकांना स्वस्त भावा मध्ये खरेदी करता येतात.
अलिबाबा सारख्या साईट्सवर उपलब्ध असणाऱ्या उत्पादनांच्या बाबतीतले रिव्ह्यूज (reviews), ग्राहकांचे प्रोडक्ट संबंधीचे अनुभव, रेटिंग्ज (ratings) इत्यादी महत्वपूर्ण डेटा या साईट्सच्या मार्फत उपलब्ध केलेला असतो. या डेटाच्या माध्यमातून प्रिंट ऑन डिमांडच्या व्यवसाया मध्ये कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकाला ग्राहकांच्या खरेदीचा, पसंतीचा कल दिसून येतो. याद्वारे ग्राहकांना पसंत पडतील अशी प्रोडक्ट्स डिझाईन करणे व्यावसायिकाला शक्य होऊ शकते. मात्र यासाठी व्यावसायिकाला सातत्याने प्रयत्नशील राहणे आवश्यक ठरते. टीशर्ट्स (T-Shirts), कॉफी मग्ज (Coffee mugs), कॅप्स (caps) यांसारख्या प्रोडक्ट्सची मागणी मोठी असल्याने जे व्यवसायिक ही उत्पादने डिझाईन करीत असतील, त्यांच्या साठी प्रिंट ऑन डिमांडचा पर्याय चांगला आहे. मात्र जे व्यवसायिक अगदी ठराविक, खास पद्धतीची प्रोडक्ट्स डिझाईन करीत असतील, अश्या व्यावसायिकांना POD प्लॅटफॉर्म्स फारसे लाभदायक ठरत नाहीत. उदाहरणार्थ, खिडक्यांसाठी कस्टम-मेड ब्लाइंड्स, किंवा एखाद्या विशिष्ट कापडा पासून तयार करण्यात येणारे पोशाख या सारख्या प्रोडक्ट्सना मुळातच मागणी कमी असण्याची शक्यता असते. त्यामुळे अश्या प्रोडक्ट्स चा खपही फारसा होत नसतो.
प्रिंट ऑन डिमांड या व्यवसाया मध्ये काही प्रोडक्ट्स अतिशय लोकप्रिय ठरत आहेत. यामध्ये पुरुषांचे, स्त्रियांचे आणि लहान मुलांचे टी शर्ट्स, टॉप्स, ड्रेसेस, लेगिंग्ज, स्कर्ट्स, शॉर्ट्स, हूडीज् यांसारखे प्रकार लोकप्रिय आहेत. तर अॅक्सेसरीज मध्ये बॅग्ज, ज्वेलरी, सॉक्स, हॅट्स, कॅप्स्, वायजर्स, यांसारख्या प्रोडक्ट्सन चांगली मागणी असते. POD प्लॅटफॉर्म्स द्वारे विकल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्स मध्ये वॉल आर्टचा ही समावेश आहे. यामध्ये पोस्टर्स, वॉल डीकॅल्स, कॅनव्हास प्रिंट्स, फ्रेम्ड आर्ट, वॉल टॅपेस्ट्रीज यांसारख्या प्रोडक्ट्सचा समावेश आहे. होमवेअर प्रोडक्ट्स अंतर्गत निरनिराळ्या आकारांची आणि डिझाइन्सची कुशन्स, कुशन कव्हर्स, मग्स, टॉवेल, ब्लँकेट्स, या वस्तू लोकप्रिय आहेत. टेक अॅक्सेसरीज मध्ये स्मार्टफोन कव्हर्स, पॉप सॉकेट्स सारख्या वस्तूंना ग्राहकांकडून चांगली मागणी असते.
प्रिंट ऑन डिमांड या व्यवसाया बद्दल थोडक्यात सांगायचे झाले, तर या प्रकारच्या ड्रॉप शिपिंग व्यवसाया साठी अगदी माफक भांडवलाची आवश्यकता असते. या व्यवसाया मध्ये नवागतां साठी देखील उत्तम संधी उपलब्ध आहेत. तज्ञांच्या मतानुसार या व्यवसाया मध्ये तोट्यांच्या मानाने फायदे अधिक आहेत, तसेच इ-कॉमर्स व्यवसाय क्षेत्र सध्या सातत्याने विकसित होत असून प्रिंट ऑन डिमांड हा व्यवसायही चांगली प्रगती करीत आहे. त्यातून व्यावसायिकाला आर्थिक नफा फारसा मिळत नसला, तरी याद्वारे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता ही नाममात्र असल्याने या व्यवसायाचा विचार जरूर केला जाऊ शकतो.
This post was last modified on November 26, 2020 8:59 PM
स्वतंत्रपणे काही उद्योग व्यवसाय करायची इच्छा आहे आणि कमी गुंतवणुकीत चांगला फायदा हवा आहे, लहान…
तुम्ही कधी कोणाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी सल्ला दिला आहे का? हो...परंतु हा सल्ला देताना…
तुम्ही कल्पक आहात का? तुमच्या कल्पकतेचा तुम्ही योग्य वापर करत आहात का? तुमची नोकरी अथवा…
व्यवसाय सुरू करताना व्यावसायिक जागेची निवड, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, दुकान किंवा कार्यालय यासाठी आवश्यक साधन…
आजच्या या संगणक आणि डिजिटल युगात ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक चांगली कमाई करत…
माणसाची अन्न किंवा खाद्य ही मुलभूत गरज आहे. यामुळे खाद्य पदार्थ नेहमीच भरपूर मागणी असणारे…