ऑनलाइन-व्यवसाय

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती

तुम्ही कधी Zomato वरून तुमच्या आवडीचे पदार्थ मागवले आहेत का? हो, अनेकदा.. तुम्ही कधी Uber किंवा Ola च्या माध्यमातून कॅब बुक करून प्रवास केला आहे का? हो, हे तर आम्ही नेहमीच करतो. ऑफिसमध्ये बसून सुद्धा तुम्ही कधी BookMyShow द्वारे सिनेमाची तिकिटे बुक करून त्या सिनेमाचा आनंद लुटला आहे का? हो, हे तर शुक्रवारच आमच ऑफिस मधील पहिल काम असत… तर मग अभिनंदन… तुम्ही डिजिटल युगात जगत आहात जिथे बरीच कामे ही चुटकीसरशी साध्य होतात. पण या सर्व गोष्टी आज आपल्याला एवढ्या सहज उपलब्ध का झाल्या आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर याला दोन प्रमुख कारणे आहेत आणि ती म्हणजे इंटरनेटचा वाढता प्रसार आणि डिजिटल मार्केटिंगचा योग्य वापर. यातील इंटरनेट आणि मोबाईल तर आता माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांनंतच्या तयार झालेल्या आधुनिक गरजा होऊन बसल्या आहेत, मग ती व्यक्ती शहरातील असो किंवा गावातील, विश्वास बसत नसेल तर हे पटवून देणारी ही आकडेवारी पहा:

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती 15

(Source: https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/for-the-first-time-india-has-more-rural-net-users-than-urban/articleshow/75566025.cms)

म्हणजेच आज भारताची अर्ध्याहून जास्त लोकसंख्या ही विविध डिजिटल माध्यमांवर सक्रिय आहे आणि यातून डिजिटल मार्केटिंगला असलेले महत्व नक्कीच अधोरेखित होते. कमी किंमतीत उपलब्ध असलेले स्मार्टफोन आणि त्याच्या जोडीला मिळणारी जलद इंटरनेट सुविधा यामुळे डिजिटल माध्यमे वापरणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. कोणी गेम खेळण्यासाठी, कोणी शॉपिंग करण्यासाठी, कोणी मनोरंजनासाठी तर कोणी आर्थिक व्यवहारांसाठी विविध डिजिटल माध्यमांचा आपल्या मोबाईलद्वारे उपयोग करत आहेत.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती 16

(Source: https://www.xakbox.com/growth-of-digital-marketing-in-india-2019/)

ही एवढी सगळी माहिती आणि आकडेवारी सांगायचे तात्पर्य एकच – जर तुम्ही व्यावसायिक बनून ऑनलाईन माध्यमातून पैसे कमवायचा विचार करत असाल तर डिजिटल मार्केटिंगशिवाय हे कदापि शक्य होणार नाही. तुम्ही व्यवसाय ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा – डिजिटल मार्केटिंग ही काळजी गरज आहे याची पक्की खूणगाठ तुम्हाला बांधून ठेवावी लागेल आणि त्यासाठीच डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे, आजच आमच्या पोर्टलला सबस्क्राईब करा आणि डिजिटल संधींची अनेक दारे तुमच्यासाठी खुली करून घ्या. पण तत्पूर्वी डिजिटल मार्केटिंगचे हे महत्वाचे फायदे समजून घ्या:

  • स्थानिक ते जागतिक पातळीवर (Local to Global) तुमची उत्पादने प्रदर्शित करण्याचा सोपा मार्ग
  • पारंपरिक साधनांच्या तुलनेत अत्यंत कमी खर्चिक
  • पारंपरिक मार्केटिंगच्या तुलनेत उत्तम आणि खात्रीशीर ROI
  • तुमचे उत्पादन ज्या ग्राहक वर्गाला लागू होते (महिला, पुरुष, युवक, वृद्ध ई.) त्यांनाच ते दाखविण्याचे पर्याय उपलब्ध
  • ऑनलाईन जगात व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या मार्केटिंग पर्यायांची उपलब्धता
  • तुमच्या स्पर्धकांबद्दल संपूर्ण माहिती एका क्लिक वर उपलब्ध
  • केलेल्या जाहिरातीचे मोजमाप करणे अत्यंत सोपे – सहज समजेल अशी आकडेवारी तंत्रज्ञानाच्या मदतीने वेळोवेळी मिळविता येते
  • प्रत्यक्ष चालू वेळेत जाहिरातीचा प्रभाव समजणे सोपे
  • ग्राहकांना लगेच प्रतिसाद देणे अत्यंत सोपे
  • हवी तशी जाहिरात बनविणे किंवा त्यात बदल करणे यासाठी अनेक सोपे टूल्स उपलब्ध
  • तुमच्या क्षेत्रातील नावाजलेल्या व्यावसायिकांशी थेट स्पर्धा करण्याची संधी

काय मग, येतंय ना लक्षात डिजिटल मार्केटिंगचे महत्व. आम्ही या लेखात अगदी सोप्या भाषेत म्हणजे तांत्रिक गोष्टींचे कोणतेही ज्ञान नसलेल्या व्यक्तीला सुद्धा समजेल अशा पद्धतीने डिजिटल मार्केटिंग या संकल्पनेची महत्वाची माहिती दिली आहे. छोटे-मोठे व्यावसायिक, ऑनलाईन नवउद्योजक आणि अगदी डिजिटल मार्केटिंग शिकू पाहणारे विद्यार्थी या सर्वांसाठी हा लेख नक्कीच उपयुक्त असाच आहे.

चला तर मग ‘डिजिटल मार्केटिंग’ या विषयाची सविस्तर माहिती समजून घेऊ:

Table of Content

  • डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
  • डिजिटल मार्केटिंग का करावे?
  • डिजिटल मार्केटिंगचे १३ फायदे (Digital Marketing Vs. Traditional Marketing)
  • डिजिटल मार्केटिंगचे प्रकार
  • डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?

तुम्ही रस्त्याने किंवा हायवे वरून प्रवास करत असताना अनेक मोठे मोठे होर्डिंग्स पाहिले असतीलच, सिग्नलला उभे राहिले असताना कोणी तरी तुम्हाला कधी ना कधी एखादे पॅम्फ्लेट नक्कीच दिले असेल, वर्तमानपत्रात तर रोज नवनवीन जाहिराती आपण पाहतच असतो आणि टीव्ही सुरु असताना दर दोन चार मिनीटांनी विविध ब्रॅण्ड्स आपल्या उत्पादने किंवा सेवांचे प्रदर्शन करत असतात..या सगळ्या घडामोडी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून निव्वळ मार्केटिंग आहे. आपल्या सेवा आणि आपले प्रॉडक्ट्स लोकांपर्यत पोहचावे म्हणून अनेक व्यावसायिक वेळ आणि पैसा खर्च करून योग्य वेळी व योग्य ठिकाणी करत असलेल्या पारंपरिक जाहिरातींचा हा प्रकार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील अनेक नवीन शोधांनी याच जाहिरात व मार्केटिंचे स्वरूप काळानुरूप बदलले आहे आणि हे नवीन आणि प्रभावी स्वरूप म्हणजे ‘डिजिटल’ हे आहे. पण डिजिटल म्हणजे काय हो ? तर आपण वापरत असलेली अनेक तांत्रिक साधने म्हणजेच इंटरनेट, स्मार्टफोन, संगणक, लॅपटॉप, आयपॅड, स्मार्ट टीव्ही जी की पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक साधने आहेत आणि याच विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे केलेले मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय.

ही काही उदाहरणे पहा म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल:

  • Google वर एखादे उत्पादन शोधत असताना अशा जाहिराती तुम्हाला दिसतील.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती 17
  • एखादी वेबसाईट तुम्ही काही कामानिमित्त पाहत असाल तर अशा पॅनेल ऍडस तुम्ही पाहिल्याच असतील.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती 18

(Source: https://www.equinetacademy.com/what-is-digital-marketing/)

  • Google सर्च इंजिनद्वारे तुम्ही काही माहिती शोधत असाल तर अशा जाहिराती तुम्ही नक्कीच पाहिल्या असतील.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती 19

(Source: https://www.equinetacademy.com/what-is-digital-marketing/)

  • तुमच्या मोबाईल वर जर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम यांसारखे सोशल मीडिया ऍप्स वापरत असाल तर अशा प्रकारच्या अनेक जाहिराती रोज तुम्ही पाहत असाल.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती 20
  • YouTube या लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर एखादी व्हिडिओ पाहत असताना मधे-मधे येणाऱ्या जाहिराती तुम्ही अनुभवल्या असतीलच.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती 21

(Source: https://www.kiranrkg.com/blog/youtube-ads/google-adwords-instream-vs-discovery-ad-on-youtube-1/)

वरील सर्व उदाहरणे हेच दर्शवितात की एक व्यावसायिक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल माध्यमांचा प्रभावी वापर करून लोकांपर्यंत अगदी सहजरीत्या आपले प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस पोहचवू शकतात आणि यालाच सोप्या भाषेत डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात.

आता तुम्हाला नक्कीच कळाले असेल की डिजिटल मार्केटिंग काय असते. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग करणे खरंच गरजेचे आहे का? हो..नक्कीच. असे आम्ही का म्हणतोय ते पुढील मुद्द्यात समजून घेऊ.

  • डिजिटल मार्केटिंग का करावे ?

मार्केटिंग म्हणजे काय तर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी आपली उत्पादने आणि सेवा यांचे प्रदर्शन करून ग्राहकांना त्याकडे आकर्षित करणे. आजचे युग अनेक मार्गांनी डिजिटल होत चालले आहे कारण १० पैकी किमान ६ जणांकडे तरी स्मार्टफोन किंवा लॅपटॉप आणि १० पैकी किमान ८ जणांकडे इंटरनेट वापरण्याची सुविधा उपलब्ध आहे म्हणजेच सकाळी ऑफिसला निघण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत लोकांचा डिजिटल माध्यमे वापरण्याकडे असलेला कल वाढतच आहे. खर वाटत नाहीये, तर लोक डिजिटल माध्यमांचा कसा प्रभावी वापर करत आहेत ते पहा.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती 22

(Source: https://www.xakbox.com/growth-of-digital-marketing-in-india-2019/)

एक व्यावसायिक म्हणून डिजिटल मार्केटिंग का केले पाहिजे यासाठी खालील काही प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारून पहा:

  • जर तुमचा ९०% ग्राहकवर्ग हा विविध डिजिटल माध्यमांवर सक्रिय असेल तर अशा ठिकाणी तुमच्या व्यवसायाची जाहिरात करणे योग्य नसेल का?
  • तुमचे सर्व प्रतिस्पर्धी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून तुमचे हक्काचे ग्राहक खेचण्यात यशस्वी झाले तर तुम्ही स्पर्धेत मागे पडणार नाही का?
  • पारंपरिक मार्केटिंग साधनांच्या तुलनेत कमी खर्चात उत्तम आणि खात्रीशीर निकाल मिळणार असतील तर त्याचा वापर न करणे म्हणजे स्वतःच्या हाताने पायावर कुऱ्हाड मारणे असे होईल का?
  • तुमच्या व्यवसायासाठी ग्राहक मिळवणे हेच जर तुमचे अंतिम उद्दिष्ट असेल तर त्यासाठी काळानुरूप तुमच्या व्यवसायात जसे तुम्ही बदल करता तसेच तुमच्या जाहिरातीच्या पद्धतींमध्ये बदल करणे योग्य नाही का?

वरील सर्व प्रश्नांची उत्तरेच तुम्हाला पटवून देतील की डिजिटल मार्केटिंग करणे का गरजेचे आहे.

आता तुम्हाला थोडे स्पष्ट झाले असेल की डिजिटल मार्केटिंग काय आहे आणि ते का गरजेचे आहे पण हे चित्र अजून स्पष्ट करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊ.

  • डिजिटल मार्केटिंगचे १३ फायदे – (Digital Marketing Vs. Traditional Marketing)

काही वर्षांपूर्वी म्हणजेच पकडून चालू की १५-२० वर्षांपूर्वी रेडिओ, टेलिव्हिजन, वर्तमानपत्रे, होर्डिंग्ज, मॅगझीन, पॅम्फ्लेट यासारख्या पारंपरिक माध्यमांचा वापर करून व्यावसायिक आपल्या उत्पादनांची, सेवांची किंवा काही खास ऑफर्सची जाहिरात करत असे कारण त्यावेळेस जाहिरातीसाठी एवढीच साधने उपलब्ध होती पण इंटरनेट आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे आज पारंपरिक माध्यमांच्या सोबतीलाच अनेक डिजिटल माध्यमे सुद्धा जाहिरातींसाठी उपलब्ध आहेत. सध्याच्या काळात (आणि इथून पुढच्याही काळात) डिजिटल माध्यमांद्वारे मार्केटिंग करण्याचे फायदे कोणते आहेत ते आपण पाहू. (सरळ भाषेत सांगायचे झाले तर डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा कसे प्रभावी ठरू शकते हे तुम्हाला समजेल)

  1. स्थानिक ते जागतिक पातळीवर (Local to Global) तुमची उत्पादने प्रदर्शित करण्याचा सोपा मार्ग:

पारंपरिक साधने वापरून तुम्हाला व्यवसायाची जाहिरात ही ठराविक भोगौलिक भागाकरताच दाखविता येते जसे की शहर, राज्य किंवा देशपातळीवर पण डिजिटल मार्केटिंगचा वापर करून अगदी जगभरात कुठेही तुमच्या व्यवसायाची जाहिरात करून तुम्ही नवीन ग्राहक जोडू शकता. तुम्ही जर ड्रॉपशिपिंग, प्रिंट-ऑन-डिमांड या स्वरूपाचे ऑनलाईन व्यवसाय करणार असाल तर संपूर्ण जगभर तुमचा व्यवसाय पसरविणे फायद्याचे ठरते आणि हे सहज शक्य होते डिजिटल मार्केटिंगच्या विविध क्लुप्त्या वापरून.

2.पारंपरिक साधनांच्या तुलनेत अत्यंत स्वस्त:

वाढत्या महागाईनुसार जाहिरात संसाधनाचा खर्चही तेवढाच वाढला आहे आणि फक्त व्यवसायाची जाहिरात करण्यावरच तुम्ही भरमसाठ पैसे खर्च केले तर नफ्याचे गणित जुळविणे कठीण होऊन जाते. डिजिटल मार्केटिंगचा योग्य वापर करून तुम्ही अगदी कमी खर्चातही तुमचा व्यवसाय व्यवस्थितरीत्या तुमच्या संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहचवू शकता. उदाहरणासाठी खालील खर्चाची ताळेबंदी पहा:

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती 23

(Source: https://www.xakbox.com/growth-of-digital-marketing-in-india-2019/)

चित्रात दर्शविल्याप्रमाणे २००० लोकांपर्यंत पोहचण्यासाठी पारंपरिक जाहिरात साधने वापरून किती खर्च येऊ शकतो आणि तेवढ्याच लोकांपर्यंत पोहचण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचे पर्याय वापरून किती खर्च येऊ शकतो हे तुमच्या सहज लक्षात येईल आणि यातून तुम्हाला नक्कीच अंदाज आला असेल की पारंपरिक पद्धतीने केलेली जाहिरात आणि डिजिटल पद्धतीने केलेली जाहिरात यातील खर्चात केवढी मोठी तफावत आहे. डिजिटल मार्केटिंग हे अतिशय स्वस्तात करता येत असल्याने आज जवळपास सर्वच व्यावसायिक त्याचा प्रकर्षाने वापर करत आहेत.

3.उपलब्ध आकडेवारी व ग्राहकांच्या कलानुसार मार्केटिंग प्लॅन करता येतो:

एखाद्या रेडिओ चॅनेल वर तुम्हाला जाहिरात करायची असल्यास नक्की किती लोक ती जाहिरात ऐकतील याचा योग्य अंदाज बांधणे थोडे कठीणच आहे अगदी तसेच वृत्तपत्रांचे सुद्धा आहे, नक्की किती लोक तुमची जाहिरात पाहू शकतील हे कोणी ठोसपणे सांगू शकणार नाही पण डिजिटल माध्यमांचे याबाबतीतील गणित अधिक खात्रीशीर आहे. कोणत्या डिजिटल माध्यमांवर किती व्यक्ती आहेत याची योग्य आकडेवारी तुम्हाला त्या कंपनीच्या मार्केटिंग विभागाकडून किंवा अगदी इंटरनेटवर सुद्धा मिळू शकते (खालील चित्रात उदाहरणासाठी जशी दाखविली आहे तशी) आणि त्यानुसार तुम्ही कोणत्या डिजिटल माध्यमांवर आपल्या व्यवसायाची जाहिरात करणे योग्य ठरू शकते याचा अंदाज बांधून त्यानुसार तुमच्या जाहिरातींचे प्रभावी प्लॅनिंग व आखणी करू शकता.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती 24

(Source: https://www.xakbox.com/growth-of-digital-marketing-in-india-2019/)

वृत्तपत्रे वाचून कोण काय खरेदी करत आहे हे तुम्ही सांगू शकाल का? नाही… पण डिजिटल माध्यमांवर विविध समूहातील लोक (म्हणजे स्त्री, पुरुष, तरुण) काय खरेदी करत आहेत याची स्पष्ट आकडेवारी तुम्हाला उपलब्ध होते. यामुळे तुम्हाला ग्राहकांचा कल ओळखणे सोपे जाते आणि त्यानुसार कोणती उत्पादने किंवा ऑफर्स चालू शकतात हे ठरवून तुम्ही त्याला अनुसरून तुमचे ब्रॅण्डिंग किंवा मार्केटिंगचा प्लॅन करू शकाल.

4.पारंपरिक मार्केटिंगच्या तुलनेत उत्तम आणि खात्रीशीर ROI:

एखाद्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या होर्डिंगवर तुमच्या व्यवसायाची जाहिरात केली तरी सुद्धा त्यामुळे तुम्हाला किती ग्राहक मिळू शकतील किंवा व्यवसायात याचा किती फायदा होईल हे खात्रीशीर कोणीही सांगू शकणार नाही पण हेच डिजिटल मार्केटिंगच्या बाबतीत लागू होत नाही. विविध डिजिटल माध्यमांद्वारे कोणत्या व्यावसायिकांना किती ग्राहक प्राप्त झाले आहेत किंवा किती फायदा झाला आहे याची खात्रीशीर आकडेवारी तांत्रिक पद्धतीने सहज उपलब्ध होते. तुमच्या व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी खर्च केलेला पैसा तुम्हाला किती नफा मिळवून देतो (ROI) याचे फायदेशीर गणित फक्त डिजिटल मार्केटिंगद्वारेच शक्य होते.

5.तुमचे उत्पादन ज्या ग्राहक वर्गाला लागू होते (महिला, पुरुष, युवक, वृद्ध ई.) त्यांनाच ते दाखविण्याचे पर्याय उपलब्ध

तुमच्या व्यवसायाची जर वर्तमानपत्रात जाहिरात करायची असेल तर ‘ही जाहिरात फक्त महिलांनीच पाहिली पाहिजे’ अशी अट तुम्ही वर्तमानपत्राच्या जाहिरात विभागाला करू शकाल का? शक्यच नाही. रेडिओवरील तुमची व्यवसायाची जाहिरात ही फक्त तरुणाईनेच ऐकली पाहिजे म्हणून तुम्ही काही करू शकाल का? काहीही नाही. मग अशा खास समूहांसाठीच जर तुमचा व्यवसाय कार्यरत असेल तर तुम्ही कशी जाहिरात कराल? पर्याय एकच – डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंगच्या विविध माध्यमांवर काही खास अटी घालून जसे की फक्त महिलांसाठी, फक्त पुरुषांसाठी, फक्त वयोवृद्धांसाठी, ठराविक वयोगटासाठी, ठराविक क्षेत्रासाठी आणि अशा अनेक प्रकारच्या उपलब्ध विकल्पांनुसार तुमचे प्रभावी मार्केटिंग करून तुमच्या योग्य ग्राहक वर्गापर्यंत सहज पोहचू शकाल आणि यालाच मार्केटिंगच्या भाषेत Targeting करणे असे म्हणतात. खाली उदाहरणासाठी Facebook वर तुमची जाहिरात कशाप्रकारे Target करता येऊ शकते यासाठी उपलब्ध विकल्प पहा.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती 25

(Source: https://www.clickz.com/wp-content/uploads/2016/07/ad-targeting-options.png)

6.२४ तास – कधीही आणि कुठेही मार्केटिंग किंवा ब्रॅण्डिंग करता येते:

वर्तमानपत्र हातात पडल्या पडल्या किंवा रेडिओ चालू केल्या केल्या तुमच्या व्यवसायाची जाहिरात ग्राहकांना अनुभवायला मिळाली पाहिजे अशी जर तुमची अट असेल तर त्यासाठी लाखोने पैसे खर्च करावा लागेल आणि हे सगळ्यांनाच शक्य होईल असे नाही. पण एखादी वेबसाईट सुरु झाल्यावर किंवा Google वर एखादे उत्पादन शोधल्यावर किंवा YouTube व्हिडिओ चालू केल्यावर लगेच तुमची जाहिरात दाखविणे डिजिटल मार्केटिंगमध्ये तेवढे खर्चिक नक्कीच नाही. पारंपरिक माध्यमांद्वारे मार्केटिंग करत असताना तुम्हाला ‘कधी आणि कुठे’ याच्या मर्यादा नक्कीच आल्या असतील पण डिजिटल माध्यमे तुम्हाला ‘कधीही आणि कुठेही’ याची व्यवस्था करून देते आणि म्हणूनच याद्वारे तुम्ही २४ तासात कोणत्या ठरविक वेळी आणि कोणत्या ठिकाणी तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग केले पाहिजे हे ठरवू शकता.

7.मार्केटिंग कॅम्पेनचे अचूक मोजमाप:

याआधी जसे आपण म्हणालो की पारंपरिक माध्यमांद्वारे केलेल्या मार्केटिंगची निश्चित आकडेवारी मिळविणे किंवा ती मांडणे तितके सोपे नाही कारण वर्तमानपत्रातील जाहिरात नक्की किती लोकांनी पाहिली आहे? रेडिओवरील तुमची जाहिरात नक्की किती लोकांनी ऐकली आहे? होर्डिंग वरील तुमचा बॅनर किती लोकांच्या नजरेस पडला आहे, तुम्ही वाटायला दिलेले पॅम्फ्लेट नक्की किती लोकांच्या हातात पडले आहेत याची आकडेवारी तुम्ही फक्त अंदाजे आणि ढोबळमानाने लावू शकता. पण डिजिटल माध्यमांद्वारे केलेल्या मार्केटिंग कॅम्पेनची सविस्तर आकडेवारी जसे की किती लोकांनी जाहिरात पाहिली, किती लोकांनी त्याद्वारे खरेदी केली, किती लोक खरेदी करू इच्छित आहेत ईत्यादी तुम्हाला स्पष्ट कळते आणि म्हणूनच पारंपरिक मार्केटिंगच्या तुलनेत डिजिटल मार्केटिंगचे मोजमाप करणे सोपे आणि खात्रीशीर आहे.

8.प्रत्यक्ष चालू वेळेत जाहिरातीचा प्रभाव समजतो:

एकदा का तुम्ही पारंपरिक माध्यमांवर तुमचे मार्केटिंग केले की त्याचा प्रभाव हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसांनी कळतो पण डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्ही करत असलेले मार्केटिंग किती प्रभावी ठरत आहे हे वेळोवेळी म्हणजे अगदी दर तासाला तपासून त्यानुसार त्या मार्केटिंग प्लॅन मध्ये बदलही करू शकता किंवा ती जाहिरात बंदही करू शकता. धनुष्यातून एकदा सोडलेला बाण परत येत नाही हे पारंपरिक माध्यमांना योग्य लागू होते पण धनुष्यातून एकदा सोडलेला बाण हवा तेव्हा थांबविता येतो हे डिजिटल माध्यमांचे वैशिष्ट्य आहे.

9.हवी तशी जाहिरात बनविणे किंवा त्यात बदल करणे यासाठी अनेक टूल्स उपलब्ध:

पारंपरिक माध्यमांवर मार्केटिंग करण्याचे काही ठराविक नियम आहेत आणि त्याअनुषंगानेच तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग तुम्हाला करावे लागते डिजिटल माध्यमांवर मार्केटिंग करायलाही काही नियम आहेत पण ते पारंपरिक माध्यमांच्या तुलनेत तितके जटिल नाहीत आणि म्हणूनच तुम्ही कधी फोटो वापरून, कधी व्हिडिओ वापरून, कधी दोनही एकत्र वापरून आपले प्रभावी मार्केटिंग करू शकता आणि यामध्ये तुम्ही वेळोवेळी अगदी सहजरीत्या बदलही करू शकता कारण यासाठी अनेक सोपी टूल्स डिजिटल माध्यमांवर उपलब्ध आहेत.

10.ग्राहकांना त्वरित प्रतिसाद देता येतो:

आजचा काळ हा २०-२० चा काळ आहे आणि ग्राहकवर्गही तसाच वेगवान आहे म्हणजेच ग्राहकांच्या एखाद्या प्रश्नाचे किंवा शंकेचे निरसन लगेच झाले नाही तर ते दुसऱ्या व्यावसायिकांकडे वळू शकतात. यासाठीच तुम्हीही ग्राहकसेवेसाठी तत्पर असणे गरजेचे आहे आणि हे शक्य होते डिजिटल मार्केटिंगमुळे. तुमच्या एखाद्या जाहिरातीवर जर ग्राहकांनी काही मागणी किंवा शंका उपस्थित केली तर त्यांना तुम्ही त्याचवेळेस लगेच उत्तर देऊन त्यांचा तुमच्यावरील विश्वास वृद्धिंगत करू शकता.

11.इतर व्यावसायिकांशी थेट स्पर्धा करता येते:

व्यवसायातील आपले स्पर्धक कोण आहेत हे वेळेवरच तुम्ही ओळखू शकलात तर तुम्हाला स्पर्धेत उतरून त्यांचा सामना करण्यासाठी ठरविक वेळ मिळतो. तुमच्या व्यवसायातील स्पर्धकांची माहिती, त्यांचे कॅम्पेन, त्याचा प्रभाव, त्याचा खर्च ही सर्व माहिती तुम्हाला डिजिटल माध्यमांवर उपलब्ध होते आणि या माहितीचा योग्य वापर करून तुम्हाला स्पर्धा करणेही सोपे जाते.

12.ऑनलाईन जगात व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या मार्केटिंग पर्यायांची उपलब्धता:

जग आता हळूहळू ऑनलाईन होत चालले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही आणि म्हणूनच व्यवसायांनासुद्धा ऑनलाईन व्हावेच लागेल. सगळे व्यवसाय काही एकाच डिजिटल माध्यमावर आपले मार्केटिंग करत नाहीत कारण प्रत्येक व्यवसायला कोणते डिजिटल माध्यम फायदेशीर ठरू शकते याचा त्यांनी अभ्यास केलेला असतो किंवा करणे गरजेचे आहे. रोज नव्याने अनेक वेबसाईट्स, मोबाईल ऍप्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बाजारात येत आहेत आणि थोडक्याच कालावधीत ती लोकप्रिय सुद्धा होत आहेत. म्हणजेच डिजिटल माध्यमांद्वारे मार्केटिंग करून व्यवसायात टिकून राहण्यासाठी आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरणासाठी काही लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा लोक करत असलेला वापर समजून घ्या:

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती 26

(Source: https://www.xakbox.com/growth-of-digital-marketing-in-india-2019/)

13.ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रभावी माध्यम:

आजचा ग्राहक हा प्रत्यक्ष खरेदी करण्यापूर्वी तुमचा डिजिटल माध्यमांवर असलेला वावर, तुमचा तिथला प्रभाव आणि तुम्ही करत असलेले डिजिटल मार्केटिंग तपासून पाहतो आणि मगच काय तो निर्णय घेतो म्हणजेच डिजिटल माध्यमांवर असलेले तुमच्या व्यवसायाचे प्रभावी अस्तित्व ग्राहकांना विश्वास प्रदान करतो.

काय मग मित्रांनो, आल का लक्षात डिजिटल मार्केटिंग आजच्या काळात किती महत्वाचे आहे ते? हो, हे तर अगदी स्पष्ट झाले आहे. तर याच डिजिटल मार्केटिंगचे प्रकार आपण थोडक्यात पाहू कारण हा विषय थोडा मोठा असल्याने यावर स्वतंत्र लेख आम्ही सादर करूच.

  • डिजिटल मार्केटिंगचे प्रकार:

विविध ऑनलाईन आणि सोशल माध्यमांद्वारे करण्यात येत असलेल्या डिजिटल मार्केटिंगचे प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत. इथे आम्ही तुम्हाला फक्त यांची तोंडओळख करून देत आहोत जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठे कुठे डिजिटल मार्केटिंगचा प्रभावी वापर करता येऊ शकतो.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ..? संपूर्ण माहिती 27
  • Search Engine Marketing (SEM) (सर्च इंजिन मार्केटिंग):

ग्राहक जर सर्च इंजिनद्वारे एखादे उत्पादन किंवा सर्व्हिस शोधण्याचा प्रयत्न करत असतील आणि तुम्ही ती सर्व्हिस किंवा उत्पादने उपलब्ध करून देत असाल तर तुमची वेबसाईट ही त्या रिजल्ट पेजवर पाहिल्या क्रमांकांवर कशी येईल यासाठी केलेला उहापोह म्हणजे Search Engine Marketing (SEM) होय. यामध्ये तुमची वेबसाईट ही आपोआप उत्तम रँक मिळवते (Organic Result) किंवा मग त्यासाठी तुम्ही Google ला पैसे मोजता (Paid Result). Search Engine Marketing हे प्रामुख्याने Search Engine Optimization (SEO) आणि Pay-Per-Click (PPC) याद्वारे साध्य केले जाते.

  • Content Marketing (कंटेन्ट मार्केटिंग):

ग्राहक त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच माहितीच्या शोधात असतात आणि त्यांची हीच नस ओळखून विविध प्रकारची माहिती तुम्ही ग्राहकांना पुरविली तर ते नक्कीच प्रभावित होतील. यामध्ये माहितीसोबतच तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग साध्य करता येते आणि यालाच Content Marketing असे म्हणतात. Content Marketing प्रामुख्याने ब्लॉग्स, ई-बुक्स, इन्फोग्राफिक, प्रश्नावली, सोशल मीडिया पोस्ट याद्वारे केले जाते.

  • Display Advertising (डिस्प्ले अड्वर्टायजिंग):

ज्याप्रकारे रस्त्यावर होंर्डिंग्स किंवा बॅनर आपण पाहतो त्याचप्रकारे डिजिटल माध्यमांवर सुद्धा मार्केटिंग करता येते आणि त्याला Display Advertising असे म्हणतात. याचा वापर प्रामुख्याने वेबसाईटवर केला जातो.

  • Mobile Marketing (मोबाईल मार्केटिंग):

आज जवळपास प्रत्येक नागरिकाकडे किंवा घरात एकाकडे तरी स्मार्टफोन हा आहेच आणि म्हणूनच मोबाईलवर सुद्धा तुमच्या व्यवसायाचे प्रभावी मार्केटिंग करण्यासाठी Mobile Marketing च्या विविध युक्त्या तुम्हाला मदत करतात. यामध्ये प्रामुख्याने मोबाईल ऍप्स, सोशल मेसेजिंग ऍप्स, टेक्स्ट मेसेजेस याद्वारे तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग करता येते.

  • Social Media Marketing (SMM) (सोशल मीडिया मार्केटिंग):

तुमच्या ग्राहकांशी थेट जोडण्याच्या आणि त्यांच्या मनात तुमचा व्यवसाय रुजविण्याचा सर्वात जवळचा आणि किफायतशीर पर्याय म्हणजे Social Media Marketing (SMM). आज १० पैकी किमान ७ ग्राहक तरी विविध सोशल प्लॅटफॉर्म्स वर सक्रिय आहेत आणि इथे तुमच्या व्यवसायाचे आकर्षक मार्केटिंग करणे नितांत गरजेचे बनलेले आहे. Facebook, Whatsapp, Instagram, Twitter, LinkedIn, Pinterest, YouTube, Snapchat यासारखे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तुम्ही मार्केटिंग साठी वापरू शकता.

  • E-mail Marketing (मेल मार्केटिंग):

आज अनेक जण हे इन्स्टंट मेसेजिंगचा जरी वापर करत असले तरी ई – मेल द्वारे केलेले व्यवसायाचे मार्केटिंग ई-कॉमर्स क्षेत्राशी निगडित व्यवसायांना चांगले यश मिळवून देत आहे. तुमचे प्रॉडक्ट, सर्व्हिस, काही खास ऑफर्स, डिस्काउंट कूपन्स, ग्राहकांना आवडेल अशी महत्वाची माहिती तुमच्या ग्राहकांपर्यंत खात्रीशीरपणे पोहचविण्यासाठी ई -मेल मार्केटिंग चा प्रभावी वापर केला जात आहे.

  • Affiliate Marketing (ऍफिलियेट मार्केटिंग):

इंटरनेटवर लोक प्रामुख्याने माहितीच्या शोधात येत असतात जसे की उत्पादनाची किंमत, त्याबद्दल इतर लोकांचे मत, त्याचे फायदे, ते मिळण्याचे योग्य ठिकाण ईत्यादी. आणि ही माहिती पुरविणारेसुद्धा अनेक लोक आहेत ज्यांना ब्लॉगर्स असे संबोधले जाते. अशा ब्लॉगर्सला तुम्ही त्यांच्या लिखाणामध्ये किंवा त्यांच्या वेबसाईट वर तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग करायला लावून त्याद्वारे ग्राहक किंवा सेल्स मिळवता आणि त्याबदल्यात तुम्ही त्या ब्लॉगर्सला ठराविक कमिशन देऊ करता. यालाच Affiliate Marketing असे म्हणतात. ई-कॉमर्सशी निगडित व्यवसाय या मार्केटिंग पद्धतीला जास्त प्राधान्य देतात.

  • Influencer Marketing (इन्फ्लुएन्सर मार्केटिंग):

ज्याप्रकारे टीव्ही वरील जाहिरातीत प्रसिद्ध अभिनेते आपल्याला वेगवेगळ्या व्यवसायांचे मार्केटिंग करताना दिसतात त्याचप्रकारे डिजिटल माध्यमांवर ज्यांचा चांगला प्रभाव आहे, ज्यांची फॉलोअर्स संख्या लक्षणीय आहे त्यांना या क्षेत्रात इन्फ्लुएन्सर असे म्हणतात. या इन्फ्लुएन्सरला सोबत घेऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग करून त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील ग्राहकांवर आपला प्रभाव पाडून व्यवसायात चांगली प्रगती करू शकता.

  • Video Marketing (व्हिडिओ मार्केटिंग):

मोबाईल व वेगवान इंटरनेटच्या स्वस्त आणि सहज उपलब्धतेमुळे व्हिडिओ कन्टेन्टचा लोक सर्वात जास्त उपभोग घेत आहेत आणि म्हणूनच तुमच्या व्यवसायाचे व्हिडिओद्वारे केलेले मार्केटिंग म्हणजे व्हिडिओ मार्केटिंग होय. YouTube सारख्या व्हिडिओ प्लॅटफॉर्म वर तुम्ही मार्केटिंग करून अनेक ग्राहकांपर्यंत तुमचा व्यवसाय प्रभावीपणे पोहचवू शकाल.

  • Audio Marketing (ऑडिओ मार्केटिंग):

रेडिओ वरील मार्केटिंग सोबतच तुम्ही आता विविध डिजिटल ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा (जसे की Spotify, Podcast) तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग करू शकता. आता तर Google Home, Amazon Alexa यासारखी नवनवीन स्मार्ट ऑडिओ उपकरणे नव्याने बाजारात येत आहेत ज्याद्वारे तुमचे ऑडिओ मार्केटिंग करणे अजून सोपे होणार आहे.

शेवटी काय तर… 

अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर ‘व्यवसाय तोच टिकेल जो असेल डिजिटल’. पारंपरिक मार्केटिंग माध्यमे प्रभावी नाहीत किंवा त्यांचा वापर करू नका असे आमचे म्हणणे नाही परंतु बदलत्या काळानुसार आणि ग्राहकांच्या गरजांनुसार व्यवसायाचे मार्केटिंग स्वरूप Traditional वरून Digital करावे लागेल हे तर तुम्हाला नक्कीच पटले असेल आणि यासाठीच एक वाक्य मार्केट मध्ये चांगलच प्रसिद्ध झाले आहे – ‘डिजिटल पे रहोगे, तो ही फायदेमे रहोगे’. कमी खर्चात प्रभावी मार्केटिंग करण्याची संधी तुम्हाला विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे उपलब्ध होत आहे पण यासाठी डिजिटल मार्केटिंगची फक्त वरवरची माहिती वापरून तुम्ही तितकासा प्रभाव पाडू शकणार नाहीत आणि म्हणूनच एकतर तुम्ही स्वतः याचे सखोल ज्ञान प्राप्त करा किंवा दर्जेदार आणि खात्रीशीर डिजिटल एजन्सीची निवड करा. कारण शेवटी एक व्यावसायिक म्हणून ‘जिथे आपला ग्राहक तिथे आपले विपणन (Marketing)’ हे अंगीकारणे तुमच्याच हिताचे राहील.

शेअर करा

This post was last modified on November 4, 2020 9:38 PM

Share
Tags: Rcontent

Recent Posts

कोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय

स्वतंत्रपणे काही उद्योग व्यवसाय करायची इच्छा आहे आणि कमी गुंतवणुकीत चांगला फायदा हवा आहे, लहान…

2 years ago

Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा

तुम्ही कधी कोणाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी सल्ला दिला आहे का? हो...परंतु हा सल्ला देताना…

2 years ago

प्रिंट-ऑन-डिमांड – बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय

तुम्ही कल्पक आहात का? तुमच्या कल्पकतेचा तुम्ही योग्य वापर करत आहात का? तुमची नोकरी अथवा…

4 years ago

घरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग

व्यवसाय सुरू करताना व्यावसायिक जागेची निवड, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, दुकान किंवा कार्यालय यासाठी आवश्यक साधन…

4 years ago

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती

आजच्या या संगणक आणि डिजिटल युगात ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक चांगली कमाई करत…

4 years ago

कमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग

माणसाची अन्न किंवा खाद्य ही मुलभूत गरज आहे. यामुळे खाद्य पदार्थ नेहमीच भरपूर मागणी असणारे…

4 years ago