कमी गुंतवणुकीत एखादा चांगला फायदेशीर व्यवसाय करता यावा यासाठी अनेक उत्सुक असतात. त्यातही महिला वर्गाची घरच्या घरी बसून एखादा व्यवसाय करता येत असेल तर अधिक पसंती असते. ज्या महिला, विद्यार्थी, किंवा अगदी नोकरदार महिलांना काही कौशल्य अवगत आहे आणि दुसऱ्यांना प्रेझेंट देण्यासाठी हटके अशा काय वस्तू देता येतात याची जाण आहे त्याच्यासाठी गिफ्ट बास्केट हा एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो.
गिफ्ट बास्केट ही कल्पना नवी नाही. कित्येक वर्षे लोक एकमेकांना गिफ्ट देत आले आहेत आणि यापुढेही देत राहणार. उलट ऑनलाईन खरेदीची सुविधा आणि जवळजवळ दररोज बाजारात येत असलेल्या अनेक आधुनिक उपयुक्त वस्तू यामुळे गिफ्ट किंवा भेटवस्तू देण्यात अधिक विविधता आलेली दिसून येते आणि हा ट्रेंड वाढता आहे. बहुतेकजणांना आयुष्यात किमान एकदा तरी गिफ्ट मिळालेली असते आणि त्यांनीही कुणाला ना कुणाला किमान एकदा तरी गिफ्ट दिलेली असते. हे प्रमाण लक्षात घेतले तर या व्यवसायात संधी प्रचंड आहे हे सहज लक्षात येईल.
हा व्यवसाय स्टार्ट अप म्हणून सुरु करावा अशी इच्छा असलेल्यांना येथे थोडे मार्गदर्शन करण्याच्या हेतूने हा लेख लिहिला आहे. तुमच्या एखाद्या छंदाचे रुपांतर या व्यवसायात करणे शक्य आहे. हा व्यवसाय गंभीरपणे केला तर नक्कीच फायदेशीर आहे यात शंका नाही. घरातूनच तुम्ही हा व्यवसाय करणार असाल तर जागेसाठी खर्च करावा लागत नाही. अगदी तुम्ही ९ ते ५ या वेळात नोकरी करून सुद्धा हा व्यवसाय मॅनेज करू शकता. त्यातून काही खास वस्तू तुम्ही स्वतः तयार करत असाल तर गिफ्ट बास्केट हटके बनू शकते आणि आकर्षक गिफ्ट बास्केट चांगली कमाई करून देतात. नोकरदार तरुणी, गृहिणी, मध्यमवयीन महिला, शिक्षण सुरु असेलेले विद्यार्थी किंवा निवृत्त झालेले लोक हा व्यवसाय सहज करू शकतात.
योजना तयार हवी-
कोणताही व्यवसाय सुरु करताना त्याची सविस्तर योजना अगोदर तयार हवी. गिफ्ट बास्केट व्यवसायात प्रत्येक व्यक्ती तुमची ग्राहक असू शकते असे मानले तरी प्रत्येक ग्राहकाला तुम्ही विक्री करू शकत नाही. कारण ग्राहकाला हव्या असलेल्या सर्व आयटम मध्ये तुम्ही एक्स्पर्ट असाल असे नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपले टार्गेट ग्राहक कोण हे सर्वप्रथम ठरविता आले पाहिजे.
यात ग्राहकांचे दोन प्रकार पडतात पाहिला म्हणजे वैयक्तिक ग्राहक आणि दुसरा कार्पोरेट ग्राहक. तुम्ही या दोन्ही वर्गासाठी गिफ्ट बास्केट देणार असाल तर गिफ्ट बास्केटचे प्रचंड कलेक्शन तुम्हाला करावे लागेल. कारण प्रत्येक प्रसंगासाठी काही विशेष गिफ्ट देण्यास ग्राहकांचे प्राधान्य असते. दोन्ही प्रकारच्या ग्राहकांसाठी व्यवसाय करायचा तर भांडवल जास्त गुंतवावे लागेल. तुम्हाला कमी खर्चात व्यवसाय करायचा असेल तर खास ग्राहक वर्गाची निवड करणे योग्य ठरते. यामुळे गिफ्ट बास्केट मध्ये काही युनिक खासियत ठेवणे शक्य होते.
गिफ्ट बास्केट प्रकार-
सर्व साधारणपणे गिफ्ट बॉक्सेस ज्या निमित्ताने ग्राहक देणार असतो त्यानुसार विशिष्ट गिफ्ट बास्केटला ग्राहकाचे प्राधान्य असते. पण तुम्ही त्यात काही नाविन्य आणू शकत असाल तर ग्राहक त्याचा विचार करण्यास तयार होतो. ग्राहकाच्या चॉइस प्रमाणे म्हणजे कस्टमाइज गिफ्ट बॉक्सेस तयार करून दिल्या तर हा ग्राहक पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येऊ शकतो. सुरवातीला हा प्रयत्न जरूर करायला हवा.
गिफ्ट बॉक्सेसचे काही लोकप्रिय प्रकार असे की सण उत्सवानिमित्त दिल्या जाणाऱ्या गिफ्ट (नाताळ, नववर्ष, दिवाळी, दसरा, राखीबंधन असे उत्सव). वाढदिवस, विवाह, साखरपुडा, डोहाळजेवण, बारसे, परीक्षेतील यश, नवीन घरात प्रवेश, व्हेलेन्टाईन्स डे सारखे तरुणाईचे खास दिवस, गेट वेल सून सारख्या शुभेच्छा, काही विशेष कामगिरी बद्दल कौतुक म्हणून, हनिमून, निवृत्ती, सिंपथी अश्या अनेक कारणांनी गिफ्ट दिल्या जातात. अर्थात यातून दिल्या जाणाऱ्या वस्तू प्रसंगानुरूप वेगळ्या असू शकतात.
गिफ्ट देताना ज्या माणसाला द्यायची त्याच्या वयाचा विचार सुद्धा ग्राहक करतो त्यामुळे अगदी, ग्रीटिंग कार्ड आणि चॉकलेट, फुलांच्या बुके पासून महागड्या वस्तूपर्यंत त्यात खूप प्रकार अंतर्भूत होतात. यामुळे आपण कोणत्या प्रकारच्या गिफ्ट बास्केट पुरवू शकतो याचाही विचार अगोदर करायला हवा.
हा व्यवसाय खरोखरच फायदेशीर होतो का?
व्यवसाय सुरु करणाऱ्याच्या मनात हा विचार नक्कीच येत असणार. नव्हे तो यायलाच हवा. कारण नुकसान व्हावे म्हणून कुणीच व्यवसाय करणार नाही. व्यवसाय सुरु करताना तो फायदेशीर कसा होऊ शकतो याची काही कारणे देता येतात.
या व्यवसायात संधी किती-
जगभरच्या बाजाराचा विचार केला तरी गिफ्टींग इंडस्ट्री प्रचंड वेगाने वाढताना दिसते. वेगाने वाढ होणाऱ्या व्यवसायात या इंडस्ट्रीचा नंबर बराच वरचा आहे. या व्यवसायात खाद्य उद्योगाप्रमाणे डोमेस्टिक आणि कार्पोरेट असे दोन्ही क्षेत्रातील ग्राहक आहेत. कारण ज्यांना गिफ्ट दिली जाते आणि जे देतात असे दोघेही ग्राहक असतात. त्यामुळे तुम्ही काही क्रिएटीव्ह, युनिक देत असाल तर ते नक्कीच पसंत केले जाते त्याचे कौतुक केले जाते.
या व्यवसायात गिफ्ट बास्केट ऑनलाईन विक्री सुद्धा सहज करणे शक्य असते. यात एक लक्षात घ्यायला हवे की तुमचा ग्राहक हा मध्यमवर्गीय किंवा त्यावरच्या इन्कमपातळीतील असतो. त्यामुळे आपल्या गिफ्ट बास्केटचा प्रकार ठरविताना याचाही विचार करायला हवा. तसेच गिफ्ट बास्केटना वर्षातील काही विशेष दिवसात अधिक मागणी असणार हे जसे खरे तसे वर्षभर छोट्या स्वरुपात का होईना पण गिफ्ट मागणी असतेच. त्यानुसार व्यवसायाची जुळणी आणि तयारी केली असेल तर कार्पोरेट हॉलीडेज, दिवाळी सारखे मोठे सण, व्हेलेंटाईन डे सारखे विशेष दिवस अश्या वेळी मोठ्या ऑर्डर मिळवून आपल्या नफ्याची सरासरी राखता येते.
व्यवसाय फायदेशीर ठरावा यासाठी काही टिप्स
किती जागा आवश्यक–
घरातून हा व्यवसाय तुम्ही करणार असलात तरी व्यवसायासाठी थोडी जागा लागणार. म्हणजे काही टेबले, स्टोरेज रॅक्स, तुम्ही ज्या वस्तू बनवत असाल त्यासाठी आवश्यक उपकरणे, साहित्य ठेवण्याची व्यवस्था यासाठी घरातच वेगळी जागा हवी.
कच्चा माल खरेदी-
गिफ्ट बास्केट व्यवसायासाठी तुम्हाला अनेक प्रकारचे सामान लागते. सर्वात मोठी खरेदी म्हणजे विविध आकाराच्या, प्रकारच्या आणि विविध किमतीच्या गिफ्ट बास्केट. ज्या वस्तू गिफ्ट बास्केट मध्ये द्यायच्या त्या वस्तू किंवा गिफ्ट, सजावटीचे सामान, फुगे, विविध आकाराच्या रंगाच्या रिबन्स,, कलर्स, गिफ्ट कार्ड्स, ग्रीटिंग कार्ड्स, सेलोटेप अश्या अनेक वस्तू लागतील. त्या एकच दुकानातून मिळतील असे नाही. या वस्तूंची खरेदी शक्यतो होलसेल दुकानातून केल्यास पैशांची बचत होते. ऑनलाईन बाजारात सुद्धा अनेक वस्तूंवर वेळोवेळी डिस्काऊंट दिले जात असतात त्यावर लक्ष ठेऊन तेथूनही खरेदी करता येते.
मोठी ऑर्डर असेल तर पुरेसा कच्चा माल संग्रही हवा. त्यामुळे वेळेत आणि चांगल्या क्वालिटीच्या गिफ्ट बास्केट ग्राहकांना पुरविणे शक्य होते तसेच ग्राहकांचा विश्वास मिळविता येतो. यामुळे रिपीट ग्राहक संख्या वाढते. जास्त प्रमाणावर खरेदी केली तर सवलती जास्त मिळू शकतात.
दर ठरविणे-
तुमच्या व्यवसायात हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. कोणत्या ग्राहक वर्गासाठी आपण गिफ्ट बास्केट देणार त्यानुसार दर ठरविणे भाग असते. त्यातून नफ्यासह आपला खर्च निघायला हवा याची काळजी घेताना ग्राहकाला समाधान होईल अशी किंमत ठेवावी लागते. ती स्पर्धात्मक हवी. तुमच्याकडे येणारा ग्राहक अन्य ठिकाणी किमतींची चौकशी करून आलेला आहे हे गृहीत ठरून त्याच्याशी व्यवहार करावा लागतो.
जर अन्य ठिकाणांपेक्षा तुमची किंमत जास्त आहे असे ग्राहकाला वाटत असेल तर ती का जास्त आहे याचे समाधानकारक उत्तर देता येणे हे व्यवसायाचे कौशल्य आहे.
तुम्ही गिफ्ट बास्केट विक्रीसाठी ऑनलाईन स्टोरचा पर्याय सुद्धा वापरू शकता. त्यामुळे अधिक सहजतेने ग्राहक येऊ शकतात. छोटे ऑनलाईन स्टोर हा चांगला पर्याय आहे. इंटरनेट माध्यमातून विक्री करणारी अनेक स्टोर्स आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या गरजा सांगितल्या तर त्या लक्षात घेऊन अशी स्टोर स्थापन करण्याचे काम अनेक कंपन्या करून देतात.
व्यवसायासाठी हे सुद्धा गरजेचे –
ग्राहक तुमच्याकडून खरेदी करणार आहे त्यामुळे इनव्होइस करून त्याला खरेदी केलेल्या वस्तूची पावती द्यायला हवी. त्यासाठी आवश्यक स्टॉक हाताशी हवा. तुमच्या सर्व गरजा भागवेल अशी फ्री अकौंटींग सोफ्टवेअर बाजारात उपलब्ध आहेत.
याशिवाय बिझिनेस कार्ड्स, ब्रोशर, फ्लायर्स, कार्पोरेट ग्राहकांसाठी ब्रोशर्स आणि कार्ड्स अवश्य हवीत.
जाहिरात, प्रसिद्धी –
कोणताही व्यवसाय करताना त्याच्या वाढीसाठी जाहिरात आणि प्रसिद्धी आवश्यक असते. तुमच्या गिफ्ट बास्केटच्या घरगुती व्यवसायासाठी प्रायव्हेट नेटवर्किंग, तोंडी प्रसिद्धी, ऑनलाईन जाहिरात असे मार्ग निवडता येतात. गुगल माय बिझिनेस, सोशल मिडिया प्लॅटफ्रॉम, व्हॉटस अप, फेसबुक, पिंटरेस्ट सारखी माध्यमे वापरू शकता. तसेच गिफ्ट बास्केट बाजारात नवे काय याबाबत अपडेट राहणे, लोकप्रिय आयटम कोणते हे पाहणे आणि नेहमीचे आयटम देताना सुद्धा नवीन आकर्षक पॅकेजिंग पद्धती स्वीकारणे यामुळे तुमच्या स्पर्धकांच्या दोन पावले पुढे राहणे शक्य होते.
ई-स्टोअर
ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला गरज आहे एका व्हर्चुअल (आभासी) दुकानाची आणि यासाठी तुम्ही एकतर स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट सुरु करू शकता किंवा Shopify सारख्या खास ई-स्टोअर सुरु करण्यासाठी आवश्यक सर्व बाबी पुरविणाऱ्या जबरदस्त प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. एक यशस्वी नवउद्योजक होण्याचे तुमचे स्वप्न साकार करायचे असेल तर उत्तम आणि किफायतशीर सुरुवात नक्कीच फायद्याची ठरू शकते आणि यासाठीच नव्याने जर तुम्ही एखादा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असाल तर आम्ही तुम्हाला Shopify चा वापर करा हे प्राधान्याने सुचवू. का ?
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
गिफ्ट बास्केट मध्ये कोणत्या वस्तू दिल्या जातात–
हस्तकौशल्याच्या विविध वस्तू, सॉफ्ट टॉइज, फुले, चॉकलेट, काही खास खाद्यपदार्थ, खेळणी, मेकअप साहित्य, विविध प्रकारचे साबण, सेंट, लहान मुलांसाठी विशेष वस्तू, टीशर्ट, कप, मग्स, ग्लासेस, फोटो अल्बम, डायपर गिफ्ट बॅग्ज, विविध पर्सेस, फिडींग सेट्स, लोशन्स अश्या अनेक वस्तू यात समाविष्ट करता येतात.
काही खास पेंटींग्स, अँटीक्स, दुर्मिळ चित्रे, पुस्तके, वाईन्स अश्या वस्तूंचाही समावेश चोखंदळ ग्राहकांसाठी करता येतो. गिफ्ट बास्केट बनविताना तुमचे प्रतिस्पर्धी कश्या बनवितात याचे निरीक्षण करावेच पण ऑनलाईन साईटवरून खूप कल्पना मिळू शकतात. आवश्यक भासल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा. या विविध बास्केट मधून काय विकले जातेय यावर सुद्धा लक्ष केंद्रित करणे फायद्याचे ठरते.
हे नक्की लक्षात घ्या-
वैयक्तिक स्वरूपाच्या गिफ्ट बास्केट तयार करून देताना सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की तुमचा ग्राहक हा प्रामुख्याने महिला वर्ग असणार. भारतात किंवा अगदी परदेशात सुद्धा महिला वर्ग समाजातील असा वर्ग आहे की त्यांना अनेक वेळा गिफ्ट मिळालेल्या असतात तसेच त्यांनी दुसऱ्यांना दिलेल्याही असतात. त्यामुळे त्यांच्या गरजा जाणून घेऊन तुम्ही गिफ्ट बास्केट बनवून देत असाल तर त्या तुमचे कायमचे ग्राहक बनू शकतात.
दुसरे म्हणजे बायको, आई, गर्लफ्रेंड अश्या कोणत्याही भूमिकेत महिला असल्या तरी गिफ्ट खरेदीची जबाबदारी बहुतेक वेळा त्यांच्यावरच सोपविलेली दिसते. अगदी पुरुषांसाठी गिफ्ट घ्यायची असली तरी आणि नातेवाईक, सहकारी याच्यासाठी गिफ्ट द्यायची असली तरी महिलाच प्रामुख्याने गिफ्ट खरेदी करायला आलेल्या दिसतात.
मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या गिफ्ट बास्केट लक्षात घेऊन स्टँडर्ड बास्केट तयार ठेवायला हव्यात. किमान सहा ते वीस स्टँडर्ड बास्केट ठेवल्या तर विविध रेंज, साईज, दर यांचा मेळ साधता येतो. समजा चॉकलेट गिफ्ट बास्केट असतील तर खूप साईज आणि प्राईज रेंजच्या बास्केट असतील तर ग्राहक त्याच्या बजेटनुसार निवड करू शकतो.
कार्पोरेट साठी गिफ्ट बास्केट देणार असाल तर वर्षातून साधारण दोन किंवा तीनवेळा द्याव्या लागतात. कंपनी डे, प्रमोशन्स, निवृत्ती, वाढदिवस, दिवाळी सारखे महत्वाचे सण या निमित्ताने कार्पोरेट खरेदी होते असे दिसून येते.
—————
This post was last modified on November 26, 2020 9:07 PM
स्वतंत्रपणे काही उद्योग व्यवसाय करायची इच्छा आहे आणि कमी गुंतवणुकीत चांगला फायदा हवा आहे, लहान…
तुम्ही कधी कोणाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी सल्ला दिला आहे का? हो...परंतु हा सल्ला देताना…
तुम्ही कल्पक आहात का? तुमच्या कल्पकतेचा तुम्ही योग्य वापर करत आहात का? तुमची नोकरी अथवा…
व्यवसाय सुरू करताना व्यावसायिक जागेची निवड, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, दुकान किंवा कार्यालय यासाठी आवश्यक साधन…
आजच्या या संगणक आणि डिजिटल युगात ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक चांगली कमाई करत…
माणसाची अन्न किंवा खाद्य ही मुलभूत गरज आहे. यामुळे खाद्य पदार्थ नेहमीच भरपूर मागणी असणारे…