पापडाची आता फॅक्टरी झाली धंदा कोणता करावा असा प्रश्‍न अनेक तरुण विचारतात. एखादा व्यवसाय करून श्रीमंत व्हावे अशी महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात असते पण नेमका कोणता धंदा करावा याबाबत ते संभ्रमात असतात. खरे तर असा संभ्रम असण्याचे काही कारण नाही. आपल्या आसपास नजर टाकली तर लक्षात येईल की, काही तरी करून बाजारात विकले जाते किंवा कसली तरी सेवा बहाल केली जाते त्या सर्व सेवा आणि ती उत्पादने हा धंदाच असतो. पण कोणत्या धंद्यात कोणती आणि किती आव्हाने आहेत, कोणत्या धंद्यात नेमकी किती स्पर्धा असेल आणि तिला आपण तोंड देऊ शकू की नाही असा प्रश्‍न असतो. 


त्याशिवाय आपण असेही पहातो की काही धंदे छान चालतात पण काही वर्षांनी पहावे तर त्याचा मागमूसही रहात नाही. काही दिवसांपूर्वी एस टी डी सेंटर हा छान धंदा होता पण तो आता बंदच पडला आहे कारण फोनशी संबंधित तंत्रज्ञान बदलले आहे. काही धंद्यात काही दिवस चलती असते पण काही दिवसांनी त्यातल्या मालाची मागणीच आटून जाते. म्हणजे धंदा निवडताना याही गोष्टींचा विचार करावा लागतो. तसा विचार केला असता असे लक्षात येते की, खाण्याच्या धंद्यात कितीही स्पर्धा असली तरी या धंद्यात कधीही मंदी येत नाही कारण माणसाला खायला लागतच असते. माणसाची खाण्याची गरज संपेल तेव्हाच हा खाद्यपदार्थांचा धंदा अडचणीत येईल.


थोडक्यात सांगायचे झाले तर जी वस्तू खाऊन फस्त होते किंवा जळून भस्म होते तिचे उत्पादन करावे. ते धंदे अविरत चालतात. त्यांना शाश्‍वत उद्योग असे म्हणतात. आपण अशाच एका उद्योगाचा विचार करणार आहोत. तो उद्योेग आहे पापड उद्योग. हाही असाच सतत चालणारा उद्योग आहे. कारण भारताच्या सगळ्या भागांत जेवणात पापड खाल्ला जात असतो. त्याला प्रचंड मागणी असते. 


आपल्याला  पापड म्हटल्यावर उडदाचे आणि मुगाचे पापड आठवतात. पण पापडाची अनेक भावंडे असतात. बटाट्याचे पापड, ज्वारीचे पापड, शाबुदाण्याचे पापड, तांदळाचे पापड असे अनेक प्रकारचे पापड असतात. खास गुजराती पदार्थ म्हणून ओळखला जाणारा खाकरा हाही एक पापडाचाच प्रकार आहे. या सगळ्यांत पालक, टमाटो, लसूण, मेथी, असे अनेक प्रकार असतात. पापड आणि खाकरा यांची एक मोठी दुनियाच आहे. पापडाचा धंदा करणारा कोणी अडचणीत आला आहे आणि त्याचा धंदा बंद पडला आहे असे कधीही आढळणार नाही.

याचे कारण आहे त्याची मागणी प्रचंड आहे आणि पापड तयार करणे हे मोठे कष्टाचे आणि चिकट काम आहे. त्याला फार वेळ द्यावा लागतो. म्हणून लोक पापड विकत आणूनच वापरतात. परिणामी अनेक महिला आपले घरकाम सांभाळून थोडा वेळ पापड लाटण्याला देतात आणि फावला वेळ कारणी लावून छान पैसाही कमावतात. काही महिलांच्या आयुष्यात संकटे येतात. महिलेवरच घराला आधार देण्याची वेळ येते अशा वेळी अनेक महिलांनी पापड लाटून घरे सावरली आहेत

असे असले तरी आता ते दिवस मागे पडले आहेत. पूर्वी कोणी तरी लहान मोठ्या प्रमाणावर हा धंदा करायचा. पापडाचे पीठ मळून त्याच्या बोट्या करून तो काही महिलांना द्यायचा. त्या महिला आपल्या  घरात बसून पापड लाटायच्या आणि ते परत करायच्या. त्यांना शेकड्याच्या प्रमाणात मजुरी मिळायची. यात मटेरियलच्या किंमतीइतकीच पापड लाटण्याचीही मजुरी जायची आणि त्या मजुरीपोटी पापडाची किंमत तर वाढायचीच पण या प्रक्रियेत अनेकांचे हात लागल्याने पापड स्वच्छ रहात नसत.आता हाताने पापड लाटण्याचे दिवस संपले. मुगाचे आणि उडदाचे पापड तरी आता कोणी हाताने तयार करीत नाही.  पीठ मळणे. पापड कापणे, वाळवणे ही सारी कामे आपोआप होणारी यंत्रसामुग्री आता उपलब्ध झाली आहे. इतर अनेक धंद्यांप्रमाणेच याही व्यवसायात माणसाच्या कामाला पर्याय असलेली यंत्रे अवतरली आहेत. शंभर महिला एका दिवसात जेवढे पापड लाटू शकतील तेवढे पापड अशा स्वयंचलित यंत्रांवर काही तासात लाटले जातात. त्यांना वाळवण्यासाठीही काही प्रयास करावे लागत नाहीत. त्या यंत्रातच पापड वाळवण्याचीही सोय असते. अशा रितीने हे पापड कमीत कमी मनुष्य बळात तयार होतात आणि त्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन त्यांची स्पर्धात्मक कमी दरात विक्री करता येते.

अर्थात अशी महागडी यंत्रसामुग्री बाजारात आली असल्याने लहान मोठ्या पापड उद्योगांचा काही त्यांच्यासमोर पाड लागणार नाही असे दिसते. मग कमी गुंतवणूक करणारांनी या व्यवसायात येऊच नये का ? असा प्रश्‍न विचारला जातो. त्यावर एक इलाज आहे. पापड तयार करण्याची यंत्रे दोन प्रकारची आहेत. त्यातली फुल ऑटोमेटिक (Fully-automatic) मशीन महाग आहे मात्र सेमी ऑटोमेटिक ( Semi-automatic) यंत्रेही बाजारात आहेत. त्यात पापड वाळवण्याचे काम माणसाला करावे लागते एवढेच. या सेमी ऑटोमेटिक आणि कमी क्षमतेच्या यंत्रांच्या साह्याने व्यवसाय केला तरीही चांगला फायदा होतो कारण या यंत्रांत पापट  लाटण्याचे काम आपोआप होत असते.

साधारणत: मूग, उडीद पापड आणि खाकरा हा यंत्रावर तयार होतो पण शाबुदाण्याचे पापड यंत्र्यावर तयार होत नाहीत. ते हातांनीच करावे लागतात. त्यांना बाजारात चांगली मागणी आहे. हे पापड उपवासाला चालतात. मात्र ते तयार करतानाही शक्यतो यंत्रांचा वापर करावा. तशी काही यंत्रे बाजारात मिळतात का याचा शोध घ्यावा. तांदळाचे, ज्वारीचे आणि बटाट्याचे पापड तयार करणे हाही पापड उद्योगाचाच एक भाग आहे. ते पापड तयार करण्याचे तंत्र वेगळे आहे. ते आपल्या महाराष्ट्रात परंपरेने जतन केले गेलेले आहे.

त्याचा वापर करून आपण हे पापड तयार करू शकतो. अशा पापडांना मोठ्या दुकानांत आणि मॉलमध्ये ग्राहक मिळेलच याची आता काही शाश्‍वती नाही पण ते तयार करून घरोघरी नेऊन विकता येतात. त्यातले बटाट्याचे पापड आता दुकानांत मिळायला लागले आहेत. तेही उपवासाला चालतात. ते यंत्रांवर तयार करावे लागत नाहीत म्हणून त्यांना आपण वाटेल तो आकार देऊ शकतो. आता बाजारात साधारण मध्यम आकाराचे आणि वेफर्सच्या आकारेचेही बटाटा पापड मिळायला लागले आहेत. 

शाबुदाण्याचे पापडही लहान आकारात मिळतात. त्यांना रंग देऊन आकर्षक बनवण्याचीही कल्पकता काही लोकांनी दाखवली आहे. या उद्योगात आपण जशी मोठी मशिनरी मिळवू शकतो तसा धंदाही मोठा करता येतो. मात्र त्यात काही कोटी रुपयांचेही भांडवल गुंतवता येते आणि काही लाखातही सेमी ऑटोमेटिक यंत्रात काही लाखातही धंदा उभा करता येतो. मोठ्या धंद्यातल्या कमायीला काही मर्यादा नाही पण लहान प्रमाणात हा धंदा करूऩ पाच सहा लोकांना कामही देता येते आणि महिन्याला साधारणत: एक ते दोन लाख रुपयांचा नफाही कमावता येतो. या धंद्यात माल विकायला प्रयत्न करावे लागतातच पण काही नाविन्य निर्माण केले तर विक्री सोपी जाते. गरज पडल्यास घरोघरही जाऊन विक्री करण्याची तयारी असायला हवी. मॉल, मोठी किराणा दुकाने, डिपार्टमेंटल स्टोअर्स यातून विक्री करता येते.   

शेअर करा

This post was last modified on November 26, 2020 9:25 PM

Share
Tags: Rcontent

Recent Posts

कोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय

स्वतंत्रपणे काही उद्योग व्यवसाय करायची इच्छा आहे आणि कमी गुंतवणुकीत चांगला फायदा हवा आहे, लहान…

2 years ago

Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा

तुम्ही कधी कोणाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी सल्ला दिला आहे का? हो...परंतु हा सल्ला देताना…

2 years ago

प्रिंट-ऑन-डिमांड – बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय

तुम्ही कल्पक आहात का? तुमच्या कल्पकतेचा तुम्ही योग्य वापर करत आहात का? तुमची नोकरी अथवा…

4 years ago

घरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग

व्यवसाय सुरू करताना व्यावसायिक जागेची निवड, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, दुकान किंवा कार्यालय यासाठी आवश्यक साधन…

4 years ago

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती

आजच्या या संगणक आणि डिजिटल युगात ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक चांगली कमाई करत…

4 years ago

कमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग

माणसाची अन्न किंवा खाद्य ही मुलभूत गरज आहे. यामुळे खाद्य पदार्थ नेहमीच भरपूर मागणी असणारे…

4 years ago