बहुमजली इमारती असतात त्याप्रमाणे उभ्या प्रकारात केलेली शेती किंवा बाग याना अनुलंब म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग असे म्हटले जाते. अशी शेती करण्याचे मुख्य कारण म्हणजे विशेषतः शहरी भागात उपजाऊ जमिनीचे कमी झालेले प्रमाण आणि दुसरे म्हणजे घरच्याघरात, कमी जागेत चांगले उत्पादन घेण्याची सुविधा. उंच सांगाडे उभारून त्यात अनेक प्रकारच्या वनस्पती, झाडे झुडपे, भाज्या, फळे पिकविण्याची ही पद्धत. आता त्याला मातीशिवाय म्हणजे हायड्रोपोनिक शेती तंत्राची साथ मिळाल्यामुळे याकडे भविष्यातील अन्न गरजा पुरविणारी शेती म्हणूनही पाहिले जात आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे ही आधुनिक हायड्रोपोनिक व्हर्टिकल शेती घराबाहेर मोकळ्या जागेत किंवा घरातल्या घरात सुद्धा करता येते. दाट लोकवस्तीच्या शहरात जेथे जागा कमी आहे तेथे तर अशी शेती हे वरदान ठरू शकते.
व्हर्टिकल हायड्रोपोनिक्स म्हणजे नक्की काय
व्हर्टिकल फार्मिंगचा अर्थ आहे बहुमजली पद्धतीने पिके घेणे. व्हर्टिकल हायड्रोपोनिक्स या नावावरून बोध होतो तो मातीविना आणि बहुमजली शेती यांचा संयोग करून केलेली शेती. शहरी, नागरी भागात अनेक पातळ्यांवर वनस्पती वाढवून माती शिवाय केलेली शेती असेही म्हणता येतील. हा प्रकार टॉवर हायड्रो, टॉवर गार्डन, व्हर्टिकल ग्रो सिस्टीम या नावांनीही ओळखला जातो.
शेतीची ही पद्धत वास्तविक नवी नाही. या प्रकारच्या शेतीचे संदर्भ प्राचीन काळात म्हणजे इसवी सन पूर्व ५०० काळात आढळतात. त्यावेळी असलेल्या बॅबीलीयोन संस्कृतीत हँगिंग गार्डन म्हणजे अधांतरी बागा होत्या आणि त्यात फुले, झुडपे तर काही वेळा झाडेही वाढविली जात असत. आता आधुनिक काळात हायड्रोपोनिक व व्हर्टिकल गार्डन या जणू एकमेकांसाठीच निर्माण झाल्या असाव्यात असे म्हणता येतील.
व्हर्टिकल किंवा अनुलंब शेती मातीचा वापर करून किंवा अन्य माध्यमे वापरूनही करता येते पण त्यामुळे टॉवरचे वजन वाढण्याचा धोका असतो. हायड्रोपोनिक मध्ये वरच्या थरांचे वजन किमान ३० टक्क्यांनी कमी करणे शक्य होते. याचाच दुसरा अर्थ म्हणजे अधिक पातळ्यांवर शेती करता येणे शक्य होते.
या प्रकारच्या शेतीचे मुख्य आव्हान म्हणजे सर्व पातळ्यांवरील वनस्पतींना पुरेसे पाणी, पोषक द्रव्ये आणि प्रकाश योग्य मात्रेत मिळायला हवा. बॅबिलीयोन संस्कृतीत या पद्धतीची शेती डोंगर उतारावर केली जात असे. त्यामुळे डोंगरातून खाली येणारे पाणी वापरता येत असे तसेच हे पाणी हाताने उभारलेल्या बंधातून जागोजागी सिंचन पद्धतीने दिले जात असे. आता २१ व्या शतकात हे काम पाण्याचे पंप वापरून अधिक सुलभतेने करणे शक्य झाले आहे.
वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी आणि वाढीसाठी लागणारा प्रकाश हा दुसरा मुख्य घटक. या प्रकारच्या शेतीत घराबाहेर शेती करताना सूर्यप्रकाश पुरेश्या प्रमाणात मिळेल या पद्धतीने झाडे लावून तर घरात करताना आवश्यक प्रकाश इलेक्ट्रिक दिव्यांच्या माध्यमातून देणे शक्य आहे. इनडोअर शेतीचा मुख्य फायदा म्हणजे ती कमी जागेत करता येते हा.
या प्रकारच्या शेतीचे फायदे काय
भविष्यातील अन्न उत्पादनचा महत्वाचा प्रकार म्हणून अनेक शेती तज्ञ व्हर्टिकल गार्डनिंग ला पसंती देत आहेत. छोट्या जागेत सुद्धा या प्रकारच्या शेतीतून अधिक उत्पादन मिळविणे शक्य होते आणि शहरी किंवा नागरी शेती म्हणूनही या शेतीचा विचार केला जात आहे.
हायड्रोपोनिक्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या प्रकारासाठी उपजाऊ मातीची गरज नाही. ही शेती व्हर्टिकल किंवा बहुमजली पद्धतीने केली तर त्यात माती नसल्याने तण वाढणे किंवा कीड पडण्याचा धोका जवळजवळ नाहीच. शिवाय टॉवर वजनाला हलके राहत असल्याने ही शेती पद्धत जास्त व्यावहारिक म्हणता येते.
या पद्धतीने शेती केल्याने ज्या जागेत तुम्ही इतरवेळी एक झाड वाढवू शकता तेवढ्याच जागेत चार पाच झाडे वाढविणे शक्य होते. शिवाय पोषण द्रव्ये, पाणी आणि प्रकाश योग्य मात्रेत दिला गेल्याने उत्पादन चांगले मिळते. पोषण द्रव्ये वाहून जाण्याचे भय राहत नाही, कमी पाणी वापरात येते. व्हर्टिकल हायड्रोपोनिक टॉवर बंदिस्त जागेत उभारता येतात, आहे तेच पाणी यात पुन्हा पुन्हा वापरता येते आणि ही यंत्रणा पूर्णपणे स्वयंचलित केली तर देखभाल करण्याचा वेळ कमी करता येतो.
काही तोटे
कोणताही व्यवसाय करताना त्याचे जसे फायदे असतात तसेच काही तोटेही असतात आणि बहुमजली शेती सुद्धा त्याला अपवाद नाही. व्हर्टिकल हायड्रोपोनिक पद्धतीचा प्रथमच प्रयोग करणाऱ्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. त्यातील काही अशी
जेव्हा हायड्रोपोनिक शेती समपातळीवर केली जाते तेव्हा सर्व वनस्पतींना पाण्यातून दिली जात असलेली पोषक द्रव्ये सहजतेने देता येतात कारण एकाच पातळीवर पाण्याचा प्रवाह असतो. पण जेव्हा उभ्या किंवा बहुमजली पद्धतीने ही शेती केली जाते तेव्हा वरच्या पातळीतील वनस्पतींना पाणी देण्यासाठी अधिक क्षमतेचा पंप वापरावा लागतो. इतकेच नव्हे तर पाणी देण्याच्या सिस्टीमचे डिझाईन अतिशय काळजीपुर्वक करावे लागते अन्यथा खालच्या पातळीवरील वनस्पती पाण्यात बुडण्याचा धोका निर्माण होतो.
तुम्ही आउटडोर व्हर्टिकल फार्मिंग करत असला तर उतरत्या पातळीत वनस्पती लावून सर्व वनस्पतींना पुरसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेऊ शकता. पण घरात अशी शेती करायची तर बहुमजली पद्धतीने वनस्पती लावाव्या लागतात कारण तेथे जागेचा प्रश्न असतो. अश्या वेळी सर्व वनस्पतींना पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी प्रत्येक पातळीवर स्वतंत्र दिवे लावावे लागतात.
जेव्हा तुम्ही व्हर्टिकल फार्मिंगचा पर्याय निवडता तेव्हा तुम्हाला नेहमी एखाद्या जागेत जितक्या वनस्पती वाढू शकल्या असत्या त्यापेक्षा अधिक संख्येने वनस्पती लावण्याची संधी असते. अर्थात यासाठी खर्च वाढतो. शिवाय पाण्यासाठी मोटर, पंप, प्रकाशासाठी दिवे लावावे लागतात. त्यामुळे वीज खर्च वाढतो. पाणी प्रवाहाकडे सतत लक्ष ठेवावे लागते.
ही सारी आव्हाने असली तरी आज उपजाऊ जमीन ज्या पद्धतीने कमी होत आहे ते पाहिले तर बहुमजली शेती काळाची गरज असू शकते त्यामुळे ही आव्हाने फार मोठी आहेत असे म्हणता येणार नाही.
ही पद्धत असे काम करते
बहुमजली हायड्रोपोनिक शेती करण्याची अनेक तंत्रे आहेत. एब अँड फ्लो म्हणजे पूर आणि निचरा, न्युट्रीयंट फिल्म टेक्निक म्हणजे एनएफटी, आणि अन्य काही. पण या सर्वात एनएफटी अधिक उपयुक्त ठरते कारण ते सोपे आणि सहज आहे.
या तंत्रात पाण्याचा एक पातळसा प्रवाह सतत वाहता असतो. पोषण द्रव्ये मिसळलेले हे पाणी वनस्पतीच्या मुळांवरून सतत वाहत राहते. आणि या प्रकारच्या शेतीसाठी ते उपयुक्त ठरते.
व्हर्टिकल हायड्रोपोनिक टॉवर
या टॉवर मध्ये ट्यूब सिस्टीम पंपासह असते. येथे वरच्या पातळीवरील वनस्पतींना पाणी मिळण्यासाठी ही यंत्रणा काम करते. त्यानंतर गुरुत्वाकर्षण नियमाने हे पाणी आपोआप खालच्या पातळ्यांवर येत राहते आणि तेथून साठवणूक टाकीमध्ये परत येते. यात सिंगल ट्यूब पाण्यासाठी वापरली जाते पण त्याला अनेक फाटे किंवा चॅनल विविध पातळ्यांवरील वनस्पतींना पाणी मिळावे यासाठी करणे आवश्यक असते. त्यातून वनस्पतींना पोषक द्रव्ये पाण्यातून पुरविली जातात.
डीआयवाय डिझाईन
या प्रकारात पीव्हीसी पाईप वा थोडा जाड ड्रेनेज पाईप मध्यवर्ती टॉवरसाठी वापरला जातो. त्यावर ठराविक अंतरावर छोटी छोटी छिद्रे प्रत्येक झाडासाठी केली जातात. वनस्पती, नेट कपचा वापर करून या पाईपला जोडल्या जातात. त्यामुळे वनस्पतींच्या मुळांवरून पाणी वाहते. या टॉवर डिझाईन मध्ये वनस्पती सर्वसाधारणपणे ४५ अंशाचा कोन करून वाढविल्या जातात.
झिगझॅग डिझाईन
व्हर्टिकल फार्मिंग करताना हायड्रोपोनिक पद्धतीसाठी व्हर्टिकल टॉवर हवाच असे नाही. आउटडोर डिझाईन मध्ये अनेक पीव्हीसी पाईप डायगोनल किंवा कर्ण पद्धतीने अरेंज केले जातात. त्याचे झिगझॅग डिझाईन केले जाते. वनस्पती नेट कप मध्ये ९० अंशाचा कोन करून लावल्या जातात. यात एनएफटी तंत्राचाही वापर करता येतो. पाणी, पोषण द्रव्ये पंप करून सर्वात वरच्या पाईप मध्ये खेचले जाते आणि तेथून खाली पाण्याचा सतत प्रवाह वाहता राहतो. घरात अशी शेती करताना कृत्रिम प्रकाश महत्वाचा ठरत असल्याने टॉवर, व्हर्टिकल सिस्टीम मध्ये वनस्पती तिरक्या कोनात लावणे हा चांगला पर्याय असतो.
व्हर्टिकल लाईटचा वापर यासाठी करणे ही चांगली पद्धत आहे कारण सिलिंग म्हणजे छतावर लाईट पॅनल्स लावले तर सर्व वनस्पतींना पुरेसा प्रकाश मिळत नाही या उलट व्हर्टिकल लाईट पॅनलचा वापर केला तर वेगवेगळ्या उंचीवर वाढत असलेल्या सर्व वनस्पतींना सम प्रमाणात प्रकाश पुरविला जातो.
व्हर्टिकल टॉवर मध्ये वेलींना आधार देण्यासाठी ट्रेलीस किंवा विशिष्ट प्रकारच्या वायर वापरता येतात.
साधा व्हर्टिकल हायड्रोपोनिक टॉवर असा उभारावा
घरच्याघरात अगदी साध्या पद्धतीचा व्हर्टिकल टॉवर उभा करण्यासाठी खालील साहित्याची गरज असते.
या साठी काही बेसिक हत्यारेही लागतील. ती खालील प्रमाणे
साठवण टाकी म्हणून घेतलेल्या १८ लिटर बादली किंवा टब च्या झाकणाला योग्य आकाराचे भोक पाडून त्यात पीव्हीसी पाईप बसवायचा आहे. ते करताना आपल्या सिलिंगची उंची आणि इनडोर मध्ये किती उंचीपर्यंत आपण वनस्पती लावणार याचा विचार करून त्यानुसार पाईपची उंची ठरवावी लागते. स्टँडर्ड टॉवर साठी ५ फुट पाईप वापरला जातो.
वनस्पती ज्यात लावायच्या ते नेटकप जेथे बसवायचे त्यानुसार पाईपवर खुणा करून घाव्या लागतात. यात पाईपच्या सर्व बाजूनी म्हणजे ३६० डिग्री पृष्ठभागाचा वापर करून घेता येतो. नेटकपच्या आकारानुसार पीव्हीसी पाईपच्या आकाराचा अंदाज घेऊन तेथे अगोदर छोट्या आकाराचे पीव्हीसी पाईप कापून नेट कप साठी होल्डर म्हणून वापरता येतात. छोट्या पाईपचे हे तुकडे मुख्य पाईपला जेथे छिद्रे केली आहेत तेथे ४५ अंशांचा कोन साधला जाईल या प्रकारे चिकटवून घ्यायचे आहेत.
मोटर आणि ट्यूबचा वापर करून खालच्या साठवण टाकीतील पाणी आणि पोषण द्रव्ये टॉवरच्या टॉपवर पाणी घ्यायचे. हे पाणी रेन वॉटर सिस्टीम प्रमाणे खालच्या थरांवर झिरपून येते. त्याच्या माध्यमातून वनस्पतींना पोषक द्रव्ये पुरविली जातात.
या पद्धतीने शेती करण्यासाठी आदर्श वनस्पती कोणत्या?
या पद्धतीने शेती करताना वेगाने वाढणाऱ्या वनस्पती, हर्ब्स योग्य ठरतात. विशेषतः टॉवर पद्धतीत
लेट्युस, केल, चार्ड, मस्टर ग्रीन, कोलार्ड ग्रीन (काही कोबीचे प्रकार), पालक अश्या पाने असलेल्या भाज्या
अन्य वनस्पती मध्ये काही फुले, तुळस, कोथिंबीर, पुदिना, बडीशेप, चाईव्ह, ब्रोकोली, कांद्याच्या जातीची काही रोपे लावता येतात. शिवाय टोमॅटो, काकडी, एगप्लांट, मिरी, स्ट्रोबेरी अशी फळे, भाज्या घेता येतात.
निष्कर्ष
व्हर्टिकल हायड्रोपोनिक्स ज्यांना शेतीसाठी जमीन नाही पण शेतीची आवड आहे त्याच्यासाठी वरदान म्हणता येईल. घरातल्या घरात यामुळे उत्पादन घेणे शक्य होते. आजकाल अनेक व्यावसायिक प्रकारचे रेडीमेड ग्रोईंग किट्स बाजारात उपलब्ध आहेत. ज्या अर्थी या किट्सना चांगली मागणी आहे त्या अर्थी अशा प्रकारच्या शेतीत लोकांचा रस वाढत चालला आहे असे अनुमान काढता येईल.
शहरी भागात याला अधिक चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. या प्रकारची शेती करताना भांडवल जास्त घालावे लागते किंवा काही आव्हाने स्वीकारावी लागतात हा याचा दोष असू शकेल पण बारकाईने विचार केला तर त्याचे फायदे अधिक आहेत. भविष्यकाळाचा विचार केला तर हे तंत्रज्ञान नक्कीच उपयुक्त आहे असा निष्कर्ष काढला जातो.
This post was last modified on November 26, 2020 2:58 AM
स्वतंत्रपणे काही उद्योग व्यवसाय करायची इच्छा आहे आणि कमी गुंतवणुकीत चांगला फायदा हवा आहे, लहान…
तुम्ही कधी कोणाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी सल्ला दिला आहे का? हो...परंतु हा सल्ला देताना…
तुम्ही कल्पक आहात का? तुमच्या कल्पकतेचा तुम्ही योग्य वापर करत आहात का? तुमची नोकरी अथवा…
व्यवसाय सुरू करताना व्यावसायिक जागेची निवड, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, दुकान किंवा कार्यालय यासाठी आवश्यक साधन…
आजच्या या संगणक आणि डिजिटल युगात ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक चांगली कमाई करत…
माणसाची अन्न किंवा खाद्य ही मुलभूत गरज आहे. यामुळे खाद्य पदार्थ नेहमीच भरपूर मागणी असणारे…