भारतीय संस्कृतीमध्ये माणूस, वनस्पती आणि प्राणी या सजीवांचे विशिष्ट स्थान प्राचीन काळापासून मान्य केले गेलेले आहे. भारतीय संस्कृतीत पाळीव प्राण्यांना जितके महत्व आहे तितकेच वन्य जीवांना सुद्धा आहे. भारतीय संस्कृती मध्ये अनेक देव देवता आहेत आणि विशेष म्हणजे अनेक देवतांचे स्वतःचे वाहन अनेक प्राणी आहेत. त्यामुळे आपल्याकडे पशु पूजनाची पद्धत सुद्धा आहे. आजच्या आधुनिक काळात सुद्धा ग्रामीण भारतात गाय, बैल, शेळ्या मेंढ्या, असे पशुधन शेतकऱ्याकडे असणे संपन्नतेचे मानले जाते. शहरी भागात सुद्धा अनेक घरात पाळीव प्राणी असतात.
घरात पाळण्यासाठी म्हणून ज्या प्राण्यांना शहरी जीवनात मोठी मागणी आहे ती कुत्री, मांजरे आणि मासे याना. त्यातही कुत्री अधिक लोकप्रिय आहेत करण ती फ्रेंडली असतात, माणसांसोबत सहज राहू शकतात आणि मुख्य म्हणजे घराला सुरक्षा देतात. आता यामध्ये सोबत मिळणे हाही एक भाग जोडला गेला आहे. अर्थात कुत्रा पाळणे हे जबाबदारीचे काम आहे आणि ते पूर्ण लक्ष देऊन करावे लागते. त्यातून घरातील व्यक्तींना कामानिमित्ताने काही वेळासाठी घराबाहेर राहावे लागत असले तर या कुत्रांकडे पाहणार कोण असा मोठा प्रश्न निर्माण होतो.
तुम्ही प्राणी प्रेमी असाल आणि त्यातही कुत्र्यांविषयी तुम्हाला अधिक जिव्हाळा असेल तर लोकांच्या या अडचणीचा फायदा तुम्हाला पैसे मिळविण्यासाठी करून घेता येतो तो डॉग डे केअर सेंटर सुरु करून. डे केअर म्हणजे एक प्रकारचे पाळणाघर असेही म्हणता येईल. आज प्राणी घरात आणून पाळण्याची किंवा दत्तक घेण्याची क्रेझ वाढली आहे. पण कुत्र्यासारख्या प्राण्याची आवड आणि पाळण्याची इच्छा असूनही अनेकांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला घरात कुणी नाही म्हणून कुत्रे पाळणे अवघड होते. तेथे ही डे केअर सुविधा अत्यंत उपयुक्त ठरताना दिसत आहे.
पुण्यात अशाच एका कल्पक मुलाने कुत्र्यांचे पाळणाघर सुरू केले आहे. लोकांची गरज लक्षात घेऊन त्याच्या डोक्यात ही आयडियाची कल्पना आली. लोक कुत्री पाळतात, ती त्यांची हौस असते. परंतु कुत्रे पाळणे ही एक जबाबदारी असते. विशेषत: पूर्ण कुटुंबाला सहलीवर जायचे असेल किंवा कोणत्याही घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून सहकुटुंब जायचे असेल तर कुत्र्याचे काय करावे, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. अशा लोकांची गरज लक्षात घेऊन या मुलाने कुत्र्याचे पाळणाघर सुरू केले आहे. कुत्रे पाळणार्यांनी खुशाल सहकुटुंब परगावी जावे, जाताना कुत्र्याला आपल्या पाळणाघरात सोडावे आणि कुत्रे सांभाळल्याबद्दल लोकांनी त्याला पैसे द्यावेत असे त्याने जाहीर केले आहे. त्यातून त्याला चांगला पैसा मिळतो. खिशात दमडा नसताना एक चांगला व्यवसाय सुरू झाला.
नोकरी केली असती तर काय मिळाले असते, त्यापेक्षा चांगले पैसे घरात बसून मिळतात. त्यासाठी फार काही करायचे नाही, फक्त लोकांचे कुत्रे सांभाळायचे. त्याला सुद्धा खायला, प्यायला देऊन साखळीने बांधून टाकले की काम भागते. त्यासाठी फार काही करावे लागत नाही. मात्र असा व्यवसाय शोधण्यासाठी कल्पक बुद्धी लागते, भांडवलाची गरज नसते
भारतात आज आकडेवारी पहिली तर या सेवा व्यवसायाचा विकास प्रचंड वेगाने होताना दिसतो आहे. तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी थोडे मार्गदर्शन येथे केले आहे.
कसा सुरु कराल हा व्यवसाय-
या व्यवसायात तुम्हाला कुत्र्यांसंबंधी जेवढे ज्ञान असेल ती तुमची ताकद समजायला हवी. कारण तुम्ही डे केअर सुरु करणार म्हणजे विविध प्रजातीच्या कुत्र्यांकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागणार. अनेक जातीची कुत्री पाळली जातात आणि त्या प्रत्येक जातीची काही वैशिष्टे आहेत. त्यांच्या सवयी, त्यांचे टेम्परामेंट, अन्नाच्या सवयी, त्याच्यासाठी आवश्यक असणारा व्यायाम, वेळ पडल्यास करावे लागणारे प्राथमिक उपचार आणि त्यांना हाताळण्याची पद्धत याचे पूर्ण ज्ञान तुम्हाला असणे गरजेचे आहे.
कायदा नियम-
तुमच्या व्यवसायाची व्याप्ती आणि तुम्ही देत असलेल्या सुविधा यानुसार व्यवसाय नोंदणी करावी लागते. जेथे डे केअर सेंटर चालविणार तेथेच तुम्ही कुत्र्यांची पिले विक्रीचा व्यवसाय करणार असाल तर त्यासाठी शॉप व एस्टॅब्लीशमेंट अॅक्ट खाली नोंदणी करावी लागते. इनडोर केनल साठी जागेच्या आकाराच्या संदर्भात काही अटी आहेत. प्रत्येक राज्यानुसार हे नियम वेगळे आहेत.
व्यवसायाचे नाव-
व्यवसाय सुरु करण्यापूर्वीच तो कोणत्या नावाने सुरु करायचा याचा विचार केला गेला पाहिजे. नाव असे असावे की त्यातून तुमच्या व्यवसायाचे स्वरूप प्रतीत झाले पाहिजेच पण नाव वाचून ग्राहकांना विश्वास वाटायला हवा. नाव आकर्षक, सुटसुटीत असावे.
जागा कुठे असणे फायद्याचे-
अनेक जण डॉग डे केअर आणि डॉग होस्टेल किंवा डॉग बोर्डिंग यात गल्लत करतात. कुत्री मालक काही दिवसांसाठी बाहेरगावी जाणार असतील किंवा अन्य काही कारणांनी कुत्रे काही दिवसांसाठी बाहेर पाठवावे लागणार असले तर त्यांच्यासाठी डॉग होस्टेल किंवा डॉग बोर्डिंग असतात. येथे कुत्र्यांना राहण्यासाठीची व्यवस्था असते आणि त्यामुळे अश्या व्यवसायाला जागा मोठी लागतेच पण अनेकदा हा व्यवसाय शहराबाहेर मोकळ्या जागेत केला जातो.
डॉग डे केअर मध्ये कुत्री फक्त दिवसा आणि तेही काही तासांसाठी सांभाळली जातात. त्यामुळे या व्यवसायाची जागा रहिवासी भागात त्यातही जेथे पाळीव कुत्र्यांची संख्या अधिक आहे त्या भागात असेल तर ते फायद्याचे ठरते. अश्या मध्यवर्ती जागी तुम्ही डे केअर सेंटर चालवीत असाल तर मालक कामावर जाताना कुत्र्यांना सहज सोडू शकतात आणि सायंकाळी परत नेऊ शकतात.
अर्थात डे केअर साठी जागा प्रशस्त हवी. घरातच तुम्ही हा व्यवसाय करणार असाल आणि घराभोवती मोकळी जागा असेल तर त्याला कुंपण असणे योग्य. अश्या जागी तुम्ही कुत्र्यांसाठी प्ले एरिया, एखादा छोटा तलाव तयार करू शकता. घराभोवती गवत असेल तर तेथेही कुत्री मोकळेपणाने खेळू शकतात. याचे कारण म्हणजे कुत्री अतिशय चपळ आणि उत्साही असतात. त्यांना खेळायला आवडते. आजकाल कुत्रे मालक कुत्र्यांना पिंजऱ्यात ठेवण्यास किंवा साखळी बांधून ठेवण्यास फारसे तयार नसतात. त्यामुळे तुमच्या डे केअर मध्ये केज फ्री सुविधा असेल तर त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
सेवा कोणत्या-
कुत्र्यांसाठी डे केअर सेंटर सुरु करताना तुम्हाला कुत्रांविषयी सर्व माहिती असणे आवश्यक आहेच पण जे तुमच्याकडे त्यांची कुत्री काही काळासाठी सोडणार आहेत त्यानाही तुमच्याशी बोलल्यावर कम्फर्टेबल वाटले पाहिजे. कुत्रे सोडून जाताना किंवा नेताना तुमची तेथे उपस्थिती असेल तर अधिक योग्य ठरते. कुत्रा सोडल्याचे आणि नेल्याची नोंद असावी. कुत्र्याने दिवसभरात काय खाल्ले, औषधे दिली का याची नोंदणी हवी. समजा एखाद्या कुत्र्याला अचानक उपचाराची गरज पडली तर ते कुठे केले आणि काय केले याची माहिती मालकांना दिली जावी.
या सुविधा देणे आवश्यक
तुमच्या डॉग डे केअर मध्ये आकारानुसार कुत्र्यांचे वेगळे गट करणे गरजेचे असते. अगदी लहान पिले असतील तर त्याच्यासाठी क्रेच सुविधा असणे योग्य ठरते. कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी वेगळी जागा असल्यास उत्तम तसेच कुत्र्यांना पाणी सहज मिळेल यासाठी योग्य जागा हवी. कुत्री सतत खेळत असतील तर त्यांना वेळोवेळी पाणी पाजावे लागते त्यासाठी ही सुविधा आवश्यक ठरते.
अनेक डे केअर सेंटर मध्ये एअर कंडीशन, वेब कॅम्स ही सुविधा दिली जाते. त्यामुळे मालक वेळ मिळेल तेव्हा लॉग ऑन करून त्याची लाडकी कुत्री कशी आहेत, काय करत आहेत हे पाहू शकतात.
पेट सिटींग –
डॉग डे केअर व्यवसायाशी निगडीत असलेला आणखी एक व्यवसाय म्हणजे पेट सिटींग. डे केअरच्या जोडीला तुम्ही हा व्यवसाय मनुष्यबळ असेल तर करू शकता. यात सुटीनिमित्त, काही कामासाठी वा अन्य काही कारणांनी कुत्रे मालक बाहेरगावी जाणार असतील तर त्याच्या घरी जाऊन कुत्र्यांची काळजी घेतली जाते.
यात केवळ कुत्रीच नाही तर कोणतेही पाळीव प्राणी असू शकतात. ज्याच्याकडे सिटींग साठी जायचे तेथे कोणता प्राणी आहे आणि मालकाच्या आवडी लक्षात घ्याव्या लागतात. काही प्राणी काळजी घेण्यास सोपे असतात. उदाहरणार्थ कुत्री, मांजरे किंवा पक्षी. यातून सुद्धा चांगला पैसा मिळविता येतो. तुम्ही ज्यांच्याकडे पेट सिटींग साठी जाणार त्यांचे घर जवळ असेल तर दिवसातून दोन वेळा चक्कर मारून प्राण्याचे जेवण, पाणी, फिरविणे अशी सेवा देऊ शकता.
कर्मचारी कसे आणि किती हवेत-
कुत्र्यांसाठी डे केअर हे एकट्या माणसाचे काम नाही. त्यामुळे तुम्हाला काही मदतनीस नेमावे लागतात. पाळीव प्राण्यांची आवड असलेले, त्याचे मायेने आणि योग्य काळजी घेऊन करणारे मदतनीस हवेत. त्यामुळे निवड करताना काळजीपूर्वक केली जावी. तुमच्याकडे किती कुत्र्यांसाठी सोय आहे त्यानुसार मदतनीसांची संख्या ठरवावी.
बरेचवेळा कुत्री मोकळी सोडलेली असतात आणि दिवसभर ती अन्य कुत्र्यांसोबत असतात अश्यावेळी त्यांच्यावर नजर ठेवणे फार महत्वाचे असते. मदतनीस घेताना ते कुत्र्यांना औषधे देऊ शकतील, वेळोवेळी गोंजारू शकतील, वेळ पडल्यास जेवण भरवू शकतील, हट्टी कुत्र्यांना व्यवस्थित हाताळू शकतील असे नेमावे. शिवाय व्यवसायाची जाहिरात करू शकणारे क्रिएटीव्ह असल्यास अधिक सोयीचे ठरते.
या व्यवसायासाठी विविध मदतनीसांचा स्टाफ लागतो. क्लिनिंग वॉशिंग करणारे, पायाभूत देखभाल करणारे मदतनीस हवेत तसेच बुकिंग करणारे, हिशोबनीस, ब्लॉग, वेबसाईट सांभाळणारे असेही मदतनीस लागतात. व्यवसायाचा व्याप किती मोठा त्यानुसार ही गरज ठरते. शिवाय पशु डॉक्टर वेळ पडल्यास चेक अप करण्यासाठी हवा. लसीकरण, आणीबाणी आल्यास उपचार ते देऊ शकतात. व्यवसाय छोटा असल्यास पार्ट टाईम मॅनेजर चालू शकतो. तसेच सुटीच्या दिवसात विद्यार्थी वर्गाला व्हॉलींटीअर म्हणून काम करण्याची संधी देता येते. त्यामुळे त्यांना पेट्सची काळजी कशी घ्यायची याचे ज्ञान मिळते.
सेवेचे दर कसे ठरवावे-
डे केअर मध्ये प्राणी दिवसभरासाठी किंवा काही तासांसाठी पाठविले जाणार हे लक्षात घेऊन दर ठरवावे लागतात. कुत्रा किती वेळ राहणार, त्यावेळात त्याला खाणे पिणे द्यावे लागणार का, फिरवून आणावे लागणार का, विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे का हे पाहून दर ठरविता येतात. तासावर, आठवड्यावर अथवा महिन्यावर सुद्धा दर ठरविता येतात. किंवा दिवसांवर दर ठरविता येतो.
एकाचा घरातून एकापेक्षा जास्त कुत्री येणार असतील तर त्यांना थोडा डिस्काऊंट देण्याची सुविधा देणे योग्य ठरते. कोणत्या जातीचे कुत्रे आहेत त्यानुसार वेगळे दर ठेवता येतात. सुरवातीला हे दर ग्राहकाला सहज परवडतील असे पण त्यातून तुमचा खर्च निघून थोडा फायदा होईल यानुसार आखणी करावी.
मार्केटिंग कसे कराल
कुत्र्यांचे सोशलायझेशन होणे हे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही परिस्थितीत आणि अन्य कुत्रांसोबत ती सहज राहू शकतात. कुत्र्यांसाठी डे केअर सुविधा हा व्यवसाय अजून मोठ्या प्रमाणावर रुळलेला नाही. त्या मानाने डॉग बोर्डिंग सुविधा अनेक ठिकाणी दिली जात आहे. पण बहुतेक ठिकाणी केज सेटअप किंवा केनल म्हणजे कुत्र्यांसाठी घरे असे त्याचे स्वरूप आहे आणि अशी बोर्डिंग किंवा होस्टेल बहुदा गावाबाहेर आहेत. डे केअर सुविधा मात्र मध्यवस्तीत मिळते त्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद आहे.
या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर संधी आहेत पण त्यासाठी योग्य ठिकाणी आपली माहिती कळायला हवी. त्यासाठी जाहिरात करायला हवी. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक मासिके, वर्तमानपत्रे, ब्रोशर, पँप्लेट वाटणे असे अनेक मार्ग आहेत. पशुवैद्यक, पेट शॉप, पेट स्टोर्स अश्या ठिकाणी तुम्ही जाहिराती लावू शकता. त्यात तुम्ही देत असलेल्या सुविधांचा आवर्जून उल्लेख हवा.
डॉगी बर्थडे पार्टीज, केक, डेकोरेशन, कुत्रांसाठी विविध प्रकारचे खेळ अश्याही युनिक कल्पना तुम्ही अमलात आणू शकता.
डिजिटल मार्केटिंग
शक्य असले तर वेबसाईट बनवावी, ब्लॉग असावा, व्यवसाय माहिती देण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा हुशारीने वापर करून घेता येतो. मित्र, परिचित, नातेवाईक, शेजारीपाजारी याना तोंडी सांगता येते. ग्राहकांना नियमितपणे सिझनल डिस्काऊंट, ऑफर्स, प्रमोशनल पॅकेज विषयी वेळोवेळी माहिती देण्याची खबरदारी घेतली जावी.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
व्यवसाय विकास संधी किती-
आज अनेक घरांमधून प्राणी पाळले जात आहेत आणि आपल्या लाडक्या पाळीव प्राण्याला अधिक आनंदी, खुश कसे ठेवता येईल या साठी मार्ग शोधले जात आहेत असे दिसून येत आहे. कुत्र्यांच्या गरजा, त्यांच्या आवडी या संदर्भातील जागरुकता वाढीला लागली आहे आणि त्यामुळे त्यासाठी थोडा जास्त खर्च करण्याची मानसिकता प्राणी मालकांमध्ये वाढली आहे. तुम्हीही मनापासून आणि प्रेमाने व अगदी काळजी घेऊन असे प्राणी सांभाळणार असला तर तुमच्या व्यवसायासाठी स्काय इज लिमिट असे म्हणता येईल.
आव्हाने कोणती-
सर्वात मोठे आव्हान म्हणजे ग्राहकाला एकमेकांची ओळख नसलेली इतकी कुत्री एकत्र कशी राहू शकतील ही शंका असते त्याचे निराकरण तुम्हाला करता आले पाहिजे.
यासाठी कुत्र्यांचे सोशलायझेशन होणे का आणि किती महत्वाचे आहे हे त्यांना पटवून देता येण्याची हातोटी हवी. त्याचा अनुभव ग्राहकांना आला की आपोआप तुमचे काम सोपे होते. ग्राहकाला त्याचा लाडका कुत्रा डे केअरची वेळ झाल्यावर किती उत्सुकतेने जाण्यासाठी अधीर होतो हे एकदा कळले की ग्राहक निश्चिंत होतात असा अनुभव आहे.
यासाठी कुत्रा सोडायला आल्यावर किंवा परत नेताना तुम्ही उपस्थित असणे, चौकशी करणे, त्यांच्या लाडक्या कुत्र्याने दिवसभर काय काय खोड्या केल्या याची माहिती देणे उपयुक्त ठरतेच. पण तुमचे डे केअर सेंटर आहे, बोर्डिंग नाही त्यामुळे ठरलेल्या वेळेला कुत्र्याला सोडणे आणि परत घेऊन जाणे याची वेळ ग्राहकाने पाळली पाहिजे याची समज गोड शब्दात देता यायला हवी. तसेच कोणत्याही परिस्थितीत रात्री कुत्रे सांभाळले जाणार नाही याची जाणीव अगोदरच करून देणे गरजेचे असते.