चेल्सीचा व्यवसायाचा अनोखा फंडा

अनेक जण स्वतःचा व्यवसाय सुरु करतात. तो व्यवसाय काही उत्पादन करणारा असेल तर ती उत्पादने बाजारात किती संख्येने विकली जातील यावर व्यावसायिकाची कमाई ठरते हा व्यवसायाचा प्राथमिक नियम म्हणता येईल. पण अमेरीकेच्या न्युयॉर्कमध्ये राहणारी चेल्सी याला अपवाद म्हटली पाहिजे.  म्हणूनच तिच्या व्यवसायाची गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे.

आपण तयार केलेला माल न विकताही प्रचंड कमाई करण्याचा पराक्रम चेल्सी करते आहे. चेल्सी बेकिंग करते आणि विविध प्रकारचे केक तयार करते. मात्र,  ते केक ती कधीच विकत नाही. तरीही तिची कमाई खूप आहे. व्यवसायाचा हा अनोखा फंडा चेल्सीने कसा आत्मसात केला हे तिनेच तिच्या शब्दात सांगितले आहे. चेल्सी ‘चेलस्वीट क्लब’ नावाचा ऑनलाईन चॅनल चालविते आणि केक बेकिंग संदर्भात अनेक संबंधित उपद्व्याप करते.  मात्र, ते केक विकत नाही.  येथे तिनेच तिच्या व्यवसायाची माहिती दिली आहे.

बेकिंग पार्श्वभूमी नाही-

चेल्सीला स्वयंपाकाची कधीच आवड नव्हती. परिणामी आई, आजी बरोबर तिने स्वयंपाकघरात कधीच काम केले नाही. तिच्याकडे कोणत्याही पारंपारिक अथवा खास रेसिपीज नव्हत्या तसेच बेकिंगची कोणतीही पार्श्वभूमी तिला नव्हती. वयाच्या २२ व्या वर्षी तिला आपण केक बनवावे अशी इच्छा झाली.  चांगली नोकरी हाताशी असतानाही तिने वाढदिवसासाठीचे केक बनवायचे ठरविले आणि तिचे आयुष्य बदलून गेले.

चेल्सी सांगते, रोज नवी चव, रोज नवे डेकोरेशन हे काम खुपच आव्हानात्मक होते. चेल्सीने बनविलेले केक खूप आकर्षक आणि उत्तम दर्जाचे असतात.  त्यामुळे अनेकांकडून तिला वाढदिवसासाठी केक बनवून देण्याची विचारणा होते तेव्हा मात्र ती ठामपणे माझे केक विक्रीसाठी नाहीत असे सांगते. चेल्सी सुरुवातीला दिवसभर नोकरी करून घरी परतल्यावर केक बनवत असे. तिने केक बनविण्यासाठी कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. त्यामुळे केक बनविण्याची सुरवात चुकत- माकतच झाली. पण त्यामुळे नाउमेद न होता ती चुका दुरुस्त करत राहिली, सोप्या रेसिपी बनवायच्या, असा निर्णय घेऊन त्या शेअर करत राहिली. त्यातून अन्य होम बेकर्सना प्रोत्साहन मिळत असे असे चेल्सी सांगते.

केक बनवून ते न विकताही आपण चांगले पैसे मिळवू शकतो हे लक्षात येताच तिने २०१८ मध्ये तिची कॉर्पोरेट फायनान्स क्षेत्रातील नोकरी सोडली आणि आता पूर्ण वेळ ती हाच व्यवसाय करते.

चेल्सी स्वीट क्लब-

चेल्सी स्वीटच्या माध्यमातून तिचा अनेकांशी परिचय झाला, खूप लोकांच्या ओळखी झाल्या आणि त्यातून कमाईच्या अनेक साधनांची साखळी तयार झाली. अर्थातच सोशल मीडियाचा त्याला मोठा हातभार लागला हेही खरे. तरीही अनेकांना एक प्रश्न पडायचा की इतके सुंदर आणि यमी केक बनवून चेल्सी ते विकत नाही तर त्याचे करते काय? चेल्सी सांगते माझे केक इन्स्टाग्राम, टिकटॉक, फेसबुक व्हिडीओ वर शेअर करून मी हे केक मित्रपरिवार, कुटुंबीय, शेजारी याना वाटून टाकते.

केक तयार करायला खर्च येतोच आणि तो छानपैकी वसूलसुद्धा होतो तो चेल्सीने स्वीकारलेल्या आणि अमलात आणलेल्या विविध मार्गांनी. ‘चेल्सीस्वीट बेकिंग क्लब’ वर चेल्सी दर महिन्याला सिझनल रेसिपी दाखविते. ती सर्वानी करून पहावी यासाठी प्रयत्नशील असते. इन्स्टाग्रामवर ती प्रत्यक्ष केक बनवायची प्रात्यक्षिके दाखविते. तिला ग्राहकांच्या खूप ऑर्डर येतात पण माझे केक विक्रीसाठी नाहीत, असे सांगताना ती अजिबात संकोच करत नाही.

मास्टरी कशातच नाही-

चेल्सी सांगते, मी अनेक उद्योग करते पण माझी कशातच मास्टरी नाही. पैसे मिळविण्यासाठी ती कोणते मार्ग वापरते याविषयी बोलताना ती म्हणते खूप मार्गांनी मी पैसे मिळविते. ते आहेत ब्लॉगिंग, ऍफिलीएट लिंक, खासगी केक बेकिंग वर्ग, कार्पोरेट इव्हेंट होस्ट करणे, युट्युब चॅनल, फेसबुक व्हिडीओ, फूड नेटवर्क साठी कंटेंट, सोशल मीडिया पेड पार्टनरशिप याविषयी सविस्तर माहिती चेल्सी देते ती अशी-

ब्लॉगिंग-

चेल्सी सांगते, काही काळापूर्वी स्वयंपाक करणे, पदार्थ बनविणे किंवा बेकिंग करण्यासाठी नव्या पाककृती पाककला पुस्तकातून शोधल्या जात असत. आता हा काळ मागे पडला. म्हणजे नव्या रेसिपीचा शोध संपला नाही पण त्या ऑनलाईन शोधल्या जातात. त्यासाठी गुगल आहेच. अनेक बेकर प्रसिद्ध शेफच्या रेसिपीज फॉलो करतात. सोशल मीडियावर एखाद्या बेकरच्या रेसिपीज अधिक लोकप्रिय होतात तेव्हा त्याच्यावर लोकांचा विश्वास बसलेला असतो. हौशी बेकर्स ब्लॉगसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाचतात.

चेल्सीला ब्लॉग लिहायचा अनुभव नव्हता पण तिचे केक्स लोकांना फार आवडतात असे लक्षात आल्यावर ब्लॉग लिहिण्याचा विचार तिच्या मनात आला. ब्लॉग कसा लिहावा, जुन्या पोस्ट अपडेट कश्या करायच्या या साठी तिने परिश्रम करून ज्ञान मिळविले. अर्थात ब्लॉग लिहिणे हे वेळ खाणारे काम आहे. ब्लॉग लिहिण्याची सुरवात केली तेव्हा चेल्सी नोकरी करत होती. नोकरीवरून परतल्यावर बेकिंग, कंटेंट क्रिएशन, व्हिडीओ एडीट करणे अशी कामे तिला करावी लागत.

ब्लॉगिंग वर आपले पूर्ण नियंत्रण राहू शकते आणि कोणावरही अवलंबून न राहता अगदी स्वतंत्रपणे करता येणारा हा प्रकार आहे हे तिच्या लक्षात आले. अर्थात आपला ब्लॉग अनेकांनी वाचावा यासाठी काही काळजी घ्यावी लागते. ब्लॉग मधील कंटेंट आकर्षक आणि वाचकाला खिळवून ठेवणारा हवाच पण त्याचबरोबर ब्लॉग, सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन (एसइओ) फ्रेंडली हवा. चेल्सी सांगते या संदर्भात अजूनही शिकण्यासारखे खूप आहे. ब्लॉगवर किती ट्रॅफिक आहे त्यानुसार जाहिराती मिळतात आणि कमाई होते.

ऍफीलीएटेड लिंक्स-

चेल्सी अमेझॉन ऍफीलीएटेड प्रोग्रामचा भाग बनली आहे. मार्केटिंग प्रोग्रामवर मोफत साईन अप करता येते. चेल्सी सांगते, येथे माझ्या केकला कुणीही नुसते क्लिक केले तरी थोडे पैसे फी म्हणून मिळतात आणि एखाद्याने खरेदी केली तरी पैसे मिळतात. चेल्सी तिच्या ब्लॉगमधलेच प्रॉडक्ट जे वाचकाना उपयुक्त आहेत तेच देते. रेसिपी, केक डिझाइन्स, केकवर सापाच्या कातडीचे डिझाईन किंवा अशीच अन्य काही युनिक डिझाईन्स बनविण्यासाठी लागणारी उपकरणे, सिलिकॉन मोल्ड याची माहिती देताना चेल्सी स्वतः काय वापरते आणि ते साहित्य कुठे मिळते याचीही माहिती देते.

खासगी बेकिंग वर्ग-

खासगी बेकिंग वर्ग हा चेल्सीच्या कमाईचा आणखी एक मार्ग आहे. नोकरी सोडल्यावर चेल्सीने अन्य बेकर्सशी कनेक्ट होण्याचा हा मार्ग शोधला. चेल्सीच्या मते बेकिंग क्लास घेउन एकाच वेळी अनेकांना शिकविणे आणि एकट्याला शिकविणे यात फरक आहे. एकट्याला शिकविण्यामुळे त्याचे डेकोरेशन स्कील सुधारण्यास खूप मदत होते. त्यासाठी कोणती नवीन तंत्रे वापरता येतात त्याचे डेमो देता येतात.

सर्वात महत्वाचे म्हणजे चेल्सी या वर्गांची जुळणी तिच्या सोयीने करू शकते. महिन्यात असे किती क्लास घ्यायचे, आठवड्यातील कोणते दिवस घ्यायचे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य मिळते. एखाद्या महिन्यात कामाचा लोड जास्त असला तर चेल्सी असे वर्ग कमी घेते किंवा काम जास्त नसेल तर जादा वर्ग घेऊ शकते. अर्थात चेल्सी मोठ्या गटांनासुद्धा शिकविते आणि त्यासाठी ती कलीनरी एज्युकेशन संस्थेत जाते.

कार्पोरेट इव्हेंट्स-

आपल्यामध्ये शिकविण्याची हातोटी आहे हे चेल्सीला समजून चुकले आहे. त्यातून तिने कार्पोरेट इव्हेंट मध्ये ‘लाईव्ह डेमो’ देण्याचे काम सुरु केले. येथे ती शक्यतो कप केक शिकविण्यास प्राधान्य देते. त्यामुळे तिला किचनची गरज पडत नाही. हे काम ती कंपनीच्या कॉन्फरन्स रूममध्ये सुद्धा करू शकते. कप केकचा पसारा कमी पडतो हे आणखी एक कारण. चेल्सी सांगते. अशा वर्गात खूप मजा येते हे खरे असले तरी एकाचवेळी अनेकांना शिकवायचे असल्याने तयारी खूप करावी लागते. शिवाय नंतरच्या आवराआवरीलासुद्धा वेळ लागतो. चेल्सी साधारणपणे महिन्यात एखादा कार्पोरेट इव्हेंट घेते.

युट्युब, फेसबुक चॅनल कमाई-

चेल्सीने कमाईचे साधन म्हणून सोशल मीडियाचा अतिशय हुशारीने वापर केला आहे. ती इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुक अश्या माध्यमाचा वापर करते. इन्स्टाग्रामवर ती व्हिडीओपेक्षा वेगळा कंटेंट देते. युट्यूबवर १ हजार युजर्स झाले की कमाई सुरु होते. त्यासाठी १२ महिन्यात ४ हजार तास वॉचटाईम असावा लागतो. फेसबुकवर १० हजार फॉलोअर्स व ३० हजार मिनिट व्युज असतील तर कमाई चांगली होते. दीर्घ व्हिडीओ ही एक प्रकारची शिकवणी असते. ३ ते १२ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये केकचे मिश्रण कसे बनवायचे यापासून डेकोरेशन तंत्रापर्यंत दाखविता येते. अर्थात तुमच्या सगळ्याच व्हिडीओवर पैसे मिळत नाहीत पण काही व्हिडीओ व्हायरल झाले तर त्यातून चांगली कमाई होते.

चेल्सीच्या म्हणण्यानुसार एकदा का तुमची व्हिडीओची भक्कम लायब्ररी तयार झाली की त्याचे रिटर्न दीर्घकाळ मिळत राहतात.

पेड पार्टनरशिप-

पेड पार्टनरशिप म्हणजे कंटेंट निर्माण करण्यासाठी कंपन्यांबरोबर करार करणे. असा कंटेंट तयार करून जगभर सोशल मीडिया चॅनलवर शेअर केला जातो. बहुतेक वेळा पेड पार्टनरशिप म्हणजे एखादा ब्रँड, त्याच्या उत्पादन किंवा विक्रीला चालना देण्यासाठी योजलेली एकप्रकारची अवेअरनेस मोहीम असते. यात ब्रँडकडे अनेकवेळा पार्टनरशिपसाठी ठराविक बजेट नाही असेही होऊ शकते. त्यामुळे संबंधित ब्रँडला तुमच्याबरोबर काम करायचे असले तरी त्यासाठी पैसे मिळत नाहीत.

यामुळे चेल्सी स्वतः कुठल्याही ब्रँडशी संपर्क साधत नाही, तरब्रॅंडनेच तिच्याबरोबर संपर्क साधावा यासाठी प्रतीक्षा करते. जेव्हा ब्रॅंडच तुमच्याशी संपर्क साधतात त्याचा सरळ अर्थ असतो की त्यांच्याकडे पार्टनरशिपसाठी वेगळे बजेट आहे. तुमचे काम त्यांना माहिती असते आणि म्हणूनच ते तुमच्याशी भागीदारी करण्यास उत्सुक असतात. ब्रँडबरोबर भागीदारी मिळवून देण्यासाठी अनेक एजंटसुद्धा असतात. मात्र, चेल्सी स्वतंत्रपणे काम करते आणि भागीदारीसाठी एजंटची मदत घेत नाही. एजंट पर्सेंटेजवर काम करतात.

डिजिटल कंटेंट कॉन्ट्रीब्युटर-

पेड पार्टनरशिपपेक्षा हा थोडा वेगळा प्रकार आहे. यात मिडिया कंपनीसाठी कंटेंट तयार करायचे असतात. चेल्सीकडे गेली काही वर्षे दीर्घ मुदतीचे विविध कंपन्यांबरोबर केलेले करार आहेत. चेल्सी सांगते यात तुम्ही तुमच्या चॅनलसाठी केलेला कंटेंट शेअर करू शकता.

चेल्सी बेकिंग, डेकोरेशन केलेल्या केकचे फिल्मिंग तिच्या स्वयंपाकघरातच करते आणि संबंधित कंपनीला फुटेज देते. हे काम आव्हानात्मक आहे आणि मजा वाटेल असेही आहे. त्यातूनही चेल्सी चांगली कमाई करते.

एकंदरीत चेल्सीचे बिझनेस मॉडेल असे आहे. ते पारंपारिक नाही. तरीही चेल्सी सांगते, तिला यातून मिळणारा आनंद म्हणजे ती नेहमीच कामात राहते आणि बोअर होत नाही. उलट कामाची ओढाताण, कंटेंट क्रिएशनवर फोकस अशी आव्हाने ती एन्जॉय करते.

—————-

शेअर करा

Leave a Comment