थोडक्या भांडवलात करता येणारे 7 खाद्य व्यवसाय

माणसाच्या आयुष्यातील तीन मुलभूत गरजा म्हणजे अन्न, हवा आणि पाणी हे आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. माणसाची जात, जमात, धर्म, वंश, जेंडर काहीही असो, तो श्रीमंत असो, गरीब असो सर्वांच्या या प्राथमिक गरजा आहेत. भूतकाळातही याच गरजा होत्या, वर्तमान काळातही आहेत आणि भविष्यात सुद्धा राहणार आहेत. तुमच्या देशाची अर्थव्यवस्था भक्कम असो किंवा ढासळलेली असो, या मूळ प्राथमिक गरजा बदलत नाहीत. या दृष्टीने कायम मागणी असलेली गरज आहे अन्न किंवा खाद्यपदार्थ यांची.

तुमचा स्वतःचा काही व्यवसाय सुरु करण्याचा विचार असेल पण त्यासाठी भांडवल कमी असेल तर तुम्ही खाद्यपदार्थ संबंधित व्यवसायांचा नक्की विचार करू शकता. यासाठी फार मोठ्या भांडवलाची गरज नसते तर उत्तम नियोजन आणि उद्योगासाठी आवश्यक परवाने, परवानग्या यांची गरज असते. शॉप अॅक्ट, एफएसएसएआय नियमानुसार आवश्यक परवाने आणि परवानगी त्यासाठी घ्यावी लागते.

अर्थात या व्यवसायात पाउल घालायचे ठरवत असाल तर तुम्हाला काय परवडेल याचा जसा विचार करायला हवा तसेच नक्की कोणते पदार्थ आपण बनवू शकतो आणि त्याचा खप किती याचाही आढावा घ्यायला हवा. एकदा हा निर्णय झाला की सर्वप्रथम व्यवसायाची नोंदणी करायला हवी. तसेच बाजार नक्की करून हिशोब काटेखोर ठेवायला हवा.

छोट्या भांडवलात करता येणाऱ्या अशा काही उद्योगांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

१)घरगुती खाद्य पदार्थ – महिला वर्गासाठी हा व्यवसाय चांगली कमाई करून देणारा ठरू शकतो. घरात बसल्या बसल्या हा व्यवसाय करता येतो. मुळात आपल्या देशात घरोघरी काही ठराविक पदार्थ विशेष निमित्ताने केले जात असतात. उदहारण द्यायचे तर चकल्या, विविध प्रकारचे चिवडे, लाडू, बर्फी, करंज्या, शंकरपाळी, कडबोळी असे पदार्थ. महिला वर्गाला हे पदार्थ बनविण्याची सवय असतेच फक्त ते मोठ्या प्रमाणावर, व्यवसाय म्हणून बनवायचे असतील तर थोडी जादा तयारी करावी लागते.

विशेष म्हणजे यासाठी जास्त भांडवल लागत नाही. घरात असलेली उपकरणे वापरता येतात. मोठ्या प्रमाणावर पदार्थ बनविण्यासाठी मोठी भांडी. कढया, चाळण्या, मोठी तसराळी आणि केलेले पदार्थ ठेवण्यासाठी मोठे डबे लागतात. ऑर्डर नुसार किंवा विक्रीसाठी म्हणून हे पदार्थ अगोदर तयार करून ठेवता येतात. पॅकिंग करून विकता येतात. मग तुम्ही थेट ग्राहकांना विका अथवा असे पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांना द्या किंवा ऑनलाईन स्टोरवरून त्यांची विक्री करू शकता.

पदार्थांचा दर्जा सांभाळणे यात फार महत्वाचे आहेच पण किमती रास्त असतील तर हा व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो.

 अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

https://miatmanirbhar.com/snack-bussiness/

२)घरगुती जेवण डबे –

शहरी भागात किंवा मेट्रो सिटी मधील लोकांचे आयुष्य अतिवेगवान बनले आहे. त्यामुळे अनेकांना घरी व्यवस्थित जेवण ज्याला आपण चौरस आहार म्हणू शकतो म्हणजे भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, चटणी असा आहार बनवायला पुरेसा वेळ नसतो. मोठ्या शहरातून अनेक लोक नोकरी व्यवसाय निमित्ताने एकटे राहत असतात. सतत बाहेरचे खावे लागत असल्याने त्यांची घरगुती जेवणाला अधिक पसंती किंवा प्राधान्य असते. त्यामुळे जेवणाचे डबे देणे हा व्यवसाय चांगला नफा देणारा व्यवसाय ठरतो.

यात जेवण बनविणे आणि संबंधित ग्राहकापर्यंत ते वेळेत पोहोचविणे असे दोन भाग येतात. घरात जेवण बनवणार असलात तरी ते मोठ्या प्रमाणावर आणि खूप लोकांसाठी बनवावे लागते. त्यासाठी मोठी भांडी, जादा गॅस सिलिंडर, डबे, पातेली, साठवण सामान लागते. अर्थात त्यासाठी साधारण १० हजार रुपये खर्चावे लागतात. डबे पोहोचविण्यासाठी मागे बॉक्स बसविलेली दुचाकी उपयुक्त ठरते. शिवाय भाज्या, धान्य, मसाले, पँकिंग साठी साहित्य हे खर्चात धरावे लागते. तरीही या व्यवसायात फारशी गुंतवणूक करावी लागत नाही.

तुमचे पदार्थ एकदा का ग्राहकांच्या पसंतीला उतरले की फारशी प्रसिद्धी करावी लागत नाही.. पदार्थाची गुणवत्ता राखणे आणि रोजच्या जेवणात व्हरायटी ठेवणे जमले की घरच्या घरून हा व्यवसाय करता येतो. घरातील अन्य कुटुंबीयाची मदत होऊ शकते.

 अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

टिफिन बॉक्स व्यवसाय

३)ज्यूस शॉप

भारतात वर्षातील बराच मोठा काळ गरम हवामानाचा असतो. अश्या वेळी विविध फळांचे ज्यूस नागरिकांसाठी लाईफ सेव्हर ठरत असतात. त्यामुळे ज्यूस शॉपचा व्यवसाय सुद्धा विचार करण्यासारखा आहे. अर्थात यासाठी मुख्य आवश्यकता आहे ती योग्य जागा. मग ती भाड्याची असो वा मालकीची. ते जमणार असेल तर अन्य गुंतवणूक करावी लागते ती चांगला ज्यूसर, फळे, रेफ्रिजरेशन बॉक्स, ग्लासेस. या व्यवसायात दुकानात फळे डिस्प्ले करण्यासाठी काउंटर असणे आवश्यक असते.

वापरली जाणारी फळे उत्तम दर्जाची हवीत. अशी फळे रास्त किमतीत ठोक फळ व्यापाऱ्याकडून खरेदी करता येतात. दुकानाच्या जागेची किंमत हा मोठा खर्च आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा व्यवसाय एकट्याने करता येत नाही. त्यासाठी मदतनीस हवा. हे काम कुटुंबातील व्यक्ती करणार असतील तर प्रश्न नाही अन्यथा १-२ कर्मचारी पगारी नेमावे लागतात.

ज्यूस शॉप चांगले चालण्यात ते कुठल्या जागी आहे यालाही फार महत्व आहे. शाळा, कॉलेज, कार्यालये, बाजारपेठ अशी सतत वर्दळ असलेल्या ठिकाणी जागा असेल तर हा व्यवसाय चांगला नफा मिळवून देऊ शकतो.

४)बेकरी उत्पादने

आजकाल कोणत्याही प्रसंगाचे निमित्त साधून कुकीज, केक, पेस्ट्रीज, बिस्किटे, ब्राऊनिज असे पदार्थ खाल्ले जातात, अनेक घरात हे रोजच्या आहाराचा एक भाग बनले आहेत. हे पदार्थ घरच्या घरी बनवून व्यवसाय करता येतो. ग्राहकांना थेट विकणे किंवा अन्य दुकानाच्या मार्फत, ऑनलाईनवर, आउटलेट मध्ये असेही विकता येतात.

या पदार्थांचा मुख्य खप त्याच्या आकर्षकपणावर असतो. यात वैविध्य खूप आहे. त्यामुळे इन्स्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांचे आकर्षक स्वरुपातील फोटो टाकले तर अधिक ग्राहक मिळू शकतात. हे पदार्थ दिसतात कसे आणि चवीला कसे याच्यावरही ग्राहकांचा प्रतिसाद अवलंबून असतो.

या व्यवसायाची मुख्य गरज म्हणजे चांगला ओव्हन आणि मिक्सर. त्यासाठी साधारण ४० हजार खर्च धरावा लागतो. शिवाय विविध आकाराचे ट्रे, मोल्ड, केकची भांडी, कप केकचे मोल्ड असे सामान लागते. शिवाय मैदा, साखर, लोणी, क्रीम, विविध प्रकारचे खाद्य रंग, सजावटीचे सामान, सुकामेवा, चॉकलेट चिप्स, विविध स्वादाचे इसेन्स असा माल लागतो. यासाठी साधारण ५० हजाराचा खर्च येऊ शकतो.

 अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

असा सुरु करू शकता घरगुती बेकरी उद्योग

५)चहा कॉफी दुकान

दिवसाची चांगली सुरवात करण्यासठी गरमागरम वाफाळता चहा, कॉफी ही अनेकांची गरज आहे तसेच दिवसभरच्या दमणुकीनंतर शिणवटा घालविण्यासाठी, मित्रमंडळाच्या सोबत गप्पांचा अड्डा जमविण्यासाठी सुद्धा चहा कॉफी हातभार लावत असते. त्यामुळे चहा कॉफीचे दुकान हा कमी भांडवलात करता येणारा व्यवसाय विचारात घेता येतो. चहा कॉफी सोबत सामोसे, भजी, पॅटीस असे ताजे पदार्थ किंवा नानकटाई, बिस्किटे, क्रीम रोल असे बेकरी पदार्थ सर्व्ह करण्याची सुविधा करता येते.

यात जागा किती हवी यावर भांडवल ठरते. जागा छोटी असेल किंवा ग्राहकांना बसता येईल अशी मोठीही घेता येते. जागा मालकीची की भाड्याने घेतलेली यावर भांडवल कमी का जास्त गुंतवावे लागणार हे ठरते. मुख्य म्हणजे जागा मोक्याची हवी. कॉलेज, कार्यालये, गर्दीच्या बाजारपेठा, थियेटर्स अशा ठिकाणी दुकान असेल तर ग्राहक जास्त संखेने येतील.

अन्य खर्चात गॅस, भांडी, स्नॅक मांडून ठेवण्यासाठी काउंटरची सोय, त्याचबरोबर कच्चा माल म्हणजे दुध, चहा, कॉफी पावडर, मसाले, स्टोव्ह, असा खर्च येतो. दुकान छोट्या जागेत सुद्धा सुरु करता येते.

)जॅम, मुरांबे

फळांपासून बनविले जाणारे जॅम, मुरांबे यांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते. अनेकांच्या घरात जॅम ब्रेड हा ब्रेकफास्ट असतो. दुकानातून अनेक प्रकारचे जॅम, जेली, मुरांबे मिळतात. पण घरच्या घरी हे पदार्थ बनले असतील तर ग्राहक त्यांना प्राधान्य देतात असे दिसून येते. आरोग्य आणि चवीच्या दृष्टीने घरी बनविलेले जॅम, जेली, मुरांबे अधिक पसंतीस उतरतात. हे पदार्थ घरी बनविणे फारसे अवघड नाही.

भांडवलाचा विचार केला तर त्यासाठी स्टरलाईज भांडी, साठवण करण्यासाठी भांडी हवीत. त्यासाठी साधारण १५ हजाराचा खर्च येतो. फळांच्या किमती, अन्य कच्चा माल किती लागेल हे तुमच्या व्यवसायाची उलाढाल किती यावर ठरते. तयार पदार्थाची ऑनलाईन विक्री घरूनच करता येते किंवा छोटी प्रदर्शने, खाद्य जत्रा, तंबू मार्केट, मेळे अश्या ठिकाणीही विक्री करता येते.

७)चॉकलेट बनविणे

बाजारात सातत्याने मागणी असलेला पदार्थ म्हणजे चॉकलेट असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. विशेष म्हणजे घराच्या घरी सुद्धा चांगल्या प्रकारची चॉकलेट बनविता येतात. चॉकलेटची गुणवत्ता सांभाळणे त्यात महत्वाचे आहे तसेच मोठ्या प्रमाणावर वैविध्य असणे आवश्यक आहे. तुम्ही चांगल्या दर्जाचा कच्चा माल वापरत असला तर चॉकलेट उत्तम दर्जाची बनतात.

यासाठी उत्तम दर्जाचा कोकाआ नेब्स (कोकाआ सत्व), कोकाआ बटर, साखर, सुका मेवा, काजू, अक्रोड, सारखे नट्स, क्रीस्पीज वगैरे आवश्यक असतात. तसेच विविध आकारासाठी विविध प्रकारचे मोल्ड किंवा साचे हवेत. यासाठी दोन प्रकारची उपकरणे मुख्यत्वे लागतात. पाहिले म्हणजे जास्त क्षमता असलेला ज्यूसर आणि योग्य प्रकारे मिश्रण होण्यासाठी मेलेजार. कोकाओ नेब्स पासून लिकर काढल्यावर त्याचे कोकाओ बटर, साखर, सुका मेवा घालून अगदी मऊ, गुळगुळीत मिश्रण करावे लागते ते काम मेलेजार मध्ये होते.

चॉकलेट रॅप करण्यासाठी विविध प्रकारचे पॅकेजिंग करावे लागते. गिफ्ट पॅक, दुकानासाठी देण्याचे किंवा किरकोळ विक्रीचे साधे पॅक ठेवावे लागतात. अनेक खास प्रसंग, वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस वगैरे सारख्या प्रसंगाना खास गिफ्ट पॅक बनविता येतात. चॉकलेट विक्रीसाठी दुकानाची गरज नाही. घराच्या घरी, ऑनलाईनवर किंवा विविध बेकऱ्या, दुकानातून किंवा खाद्य जत्रा, प्रदर्शने, अशा ठिकाणी सुद्धा चॉकलेट विक्री करता येते.

 अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

घरगुती चॉकलेटस बनवून करा भरपूर कमाई
शेअर करा
error: Alert: Content is protected !!