या ७ ऑर्गेनिक व्यवसाया मधून करा भरघोस कमाई

भारतासारख्या विशाल देशात विविध प्रांतात हवामान, जमीन, पाणी यांची विविधता असल्याने अनेक प्रकारांनी येथे कृषी उत्पादने आणि त्यांच्याशी संबंधित जोड व्यवसाय केले जातात. प्रत्येक राज्याची काही खास पिके, उत्पादने आहेत. कृषी व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी अधिक धान्य उत्पादन होणे गरजेचे असते. यामुळे पिके घेताना अधिक उत्पादन मिळावे यासाठी जसा रासायनिक किंवा कृत्रिम खतांचा वापर केला जातो तसेच किडी, कीटकांपासून पिकांना संरक्षण मिळावे यासाठी कीड आणि कीटक नाशके मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. 

कृत्रिम खतांच्या दीर्घकाळ आणि अतिवापराने जमीनचा कस कमी होत जातो आणि क्षार साठून राहिल्याने अनेकदा जमिनी नापीक होतात. तसेच कीड आणि कीटकनाशकांच्या अति वापराने सुद्धा पिकांची गुणवत्ता, कस कमी होतो, द्राक्षे, आंबा, संत्री अश्या अनेक फळांमध्ये कीटकनाशकांचा अंश उतरतो आणि अशी फळे, भाज्या माणसाच्या शरीराला नुकसान पोहोचवितात हे आता सिध्द झाले आहे.

परिणामी नैसर्गिक पद्धतीने वाढविलेली धान्य उत्पादने, फळे, भाज्या किंवा नैसर्गिक चाऱ्यावर, आहारावर पोसलेल्या जनावरांचे दुध व त्यापासून बनलेले दुग्धजन्य पदार्थ याना आजकाल मागणी वाढते आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही नैसर्गिक अन्नधान्याचे फायदे समजू लागले आहेत. नैसर्गिक उत्पादनांच्या मागणीची सुरवात झाली ती ऑर्गेनिक फळे आणि भाज्या यांच्यापासून. मात्र आजकाल ऑर्गेनिक फूडच्या मागणीचा विस्तार अन्नधान्ये, डाळी, चहा, मसाले, तेलबिया पासून दुध आणि दुग्धजन्य पदार्थांपर्यंत झालेला पहायला मिळत आहे.

याचाच उपयोग करून आपण ऑर्गेनिक व्यवसाय सुरु करण्याचा विचार नक्की करू शकतो. ऑर्गनिक फूडचे फायदे आता सर्वांच्याच लक्षात येऊ लागले आहेत. ऑर्गेनिक फूड याचा अर्थ ठोकळमानाने कृत्रिम रसायने, कीटक नाशके, कृत्रिम खतांचा वापर न करता पिकविलेले अन्नधान्य असा घेता येईल. याचा अर्थ ही पिके घेताना खते किंवा कीटकनाशके वापरलेली नाहीत असा मात्र नाही. तर नैसर्गिक सेंद्रीय खते, कंपोस्ट आणि कडूनिंब पाणी फवारा, गोमुत्र, मिठाचे पाणी या सारखी नैसर्गिक कीड आणि कीटकनाशके वापरून वाढविलेली पिके असा आहे.

कृत्रिम खते आणि कीड, कीटक नाशकांच्या वापरातून वाढविलेल्या पिकांमुळे पर्यावरणाचा तोल बिघडून प्रदूषण वाढते आहेच पण त्यामुळे कॅन्सर, हृदयविकार, यकृताचे विकार, व्याधी यांचेही प्रमाण वाढते आहे असे संशोधने सांगतात. जगभरात यावर संशोधन केले जात आहे.

आपण या लेखात कोणत्या प्रकारचे ऑर्गेनिक व्यवसाय करता येतात याची माहिती घेणार आहोत. जे शेतकरी आहेत किंवा ज्यांच्या मालकीची शेतजमीन आहे ते कुणीही हे व्यवसाय करू शकतीलच पण ज्यांच्याकडे अशी सुविधा नाही तेही असे व्यवसाय करू शकतील. शेतकरी शेतीला पूरक जोड व्यवसाय म्हणून या व्यवसायांचा विचार करू शकतील.

वनौषधी– 

ज्यांच्या कडे शेतजमीन आहे त्यांना हा व्यवसाय चांगला फायदा देणारा ठरू शकतो. आजकाल नैसर्गिक औषधे म्हणून वनौषधीचा वापर वाढत चालला आहे. शेतकरी त्यांच्या शेतात, शेताच्या बांधावर अथवा मोकळी जमीन असेल तेथे वनौषधी लागवड करू शकतात. आपल्याकडे पूर्वीपासून आजीचा बटवा ही संकल्पना आहे. म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून किरकोळ दुखण्यांवर केलेले उपचार. त्यात तुळस, बेल, कोरफड अशा वनस्पती पासून अश्वगंधा, शतावरी, आवळा, हिरडा, हळद, अशा वनस्पती वापरल्या जातात. या वनस्पतीची लागवड शेतकरी त्याच्या शेतात करून वनौषधी उत्पादन घेऊ शकतात. अश्या शेकडो वनस्पती आपल्याकडे पिकविता येतात.

अर्थात या वनौषधी वाढविताना कृत्रिम खते, कीटकनाशके यांचा वापर करायचा नाही तर सेंद्रीय खते आणि नैसर्गिक कीडनाशकेच वापरायची याचे पथ्य पाळायला हवे. या वनौषधीना औषध उत्पादकांकडून चांगली मागणी येतेच पण तुमची जागा छोटी असेल तर वनौषधी पॅकेजिंग करून थेट ग्राहकांना तुम्ही विकू शकता. किंवा रिटेल आउटलेट मध्ये पुरवू शकतात.

ऑर्गेनिक डेअरी, डेअरी उत्पादने 

शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून डेअरी व्यवसाय करू शकतात तसेच शेती नसली तरी डेअरी व्यवसाय करता येतो. शेतकऱ्यांना डेअरी व्यवसाय अधिक सोपा जातो कारण जनावरांचा चारा शेतातून मिळविता येतो. तुम्ही ऑर्गेनिक डेअरी व्यवसाय करू शकता. यात जनावरे नैसर्गिक खाद्यावर पोसली जातात. कृत्रिम खते अथवा कीड, कीटकनाशकांचा वापर न करता वाढलेली कुरणे, जंगले, गायराने येथील चाऱ्यावर गुरे पोसणे हे यात जसे महत्वाचे आहे त्याचबरोबर जनावरांना जादा दुध यावे किंवा त्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून कृत्रिम औषधे, हार्मोन्स, अँटीबायोटिक्स यांचाही वापर केलेला असता कामा नये.

इतकेच नव्हे तर जनावरांचे ब्रिडिंग करतानाही जनुकीय अभियांत्रिकी म्हणजे कृत्रिम ब्रिडींग केले जाऊ नये असेही यात अभिप्रेत आहे. जे ऑर्गेनिक फार्मिंग करत आहेत किंवा ऑर्गेनिक फार्मिंग करणे हे ज्याचे ध्येय आहे त्यांना हा जोड व्यवसाय चांगली कमाई करून देणारा ठरू शकतो.

आजकाल आपण जे दुध किंवा दुग्धजन्य पदार्थ वापरतो त्याची गुणवत्ता ग्राहक लक्षात घेऊ लागले आहेत. दुधात भेसळ नको याची जशी खात्री ग्राहकाला हवी आहे तशीच दुधात कीटकनाशकांचा अंश नसावा, प्रदूषक द्रव्ये नसावीत यासाठीही ग्राहक आग्रही आहे. तीच बाब दुग्धजन्य पदार्थांबाबत सुद्धा आहे. त्यामुळे या ऑर्गेनिक डेअरी व्यवसायाला चांगली भरभराट नजीकच्या काळात अपेक्षित आहे.

ऑर्गेनिक पशुपालन 

नैसर्गिक पशुपालन करणे हाही एक चांगला व्यवसाय म्हणता येतील. ऑर्गेनिक पशुपालन म्हणजे जनावरांचे पोषण करताना नैसर्गिक, पर्यावरणात सहज मिसळून जाणारी पण तरीही पर्यावरणाला पोषक अशा पदार्थांचा वापर करणे तसेच जनावरांचे आरोग्य सांभाळताना कृत्रिम औषधे, हार्मोन्स यांचा वापर न करणे आणि जनावरांचे नैसर्गिक ब्रिडींग यांचा समावेश होतो. शेती करणारे कुणीही हा व्यवसाय सहज करू शकतात. घरगुती वापरापुरते दुध, दुग्धजन्य पदार्थ अथवा फळे, भाजीपाला पिकविता येतोच पण जर तुम्हाला त्याचा व्यवसाय करायचा असेल तर ही उत्पादने ऑर्गेनिक आहेत याचे प्रमाणपत्र संबंधित संस्थेकडून घ्यावे लागते.

ऑर्गेनिक फिशफार्म किंवा मत्स्यशेती 

आरोग्यपूर्ण, रोगमुक्त मासे मिळविणे हा या शेतीचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे मत्स्यपालन करताना प्रतीजैविके म्हणजे अँटीबायोटीक्स, हार्मोन यांचा वापर न करता केलेले मस्यपालन. विपरीत परिस्थितीत सुद्धा जेथे मासे पाळले जात आहेत तेथील वातावरण नैसर्गिक राखणे यात महत्वाचे असते.

आजकाल पर्यावरण, प्रदूषण या बाबत जनजागृती मोठ्या प्रमाणावर होते आहे. त्यामुळे मासेपालन करताना माशांना दिले जाणारे खाद्य सुद्धा रसायने मुक्त असले पाहिजे. त्यासाठी वाईल्ड फिश पासून बनविलेले फिश मिल वापरता येते. त्यात पारा अथवा अन्य विषारी द्रव्ये नसतात.

मत्स्य पालन ओपन नेट पद्धतीनेही करता येते. मात्र ऑर्गेनिक फिश ओपन नेट पद्धतीने करू नये. यात समुद्रात किंवा जलाशयात अंतराअंतरावर जाळ्या किंवा पिंजरे बांधले जातात. पण यामध्ये पिंजरे गंजण्याचा धोका असतो तसेच पाण्यात सांडपाणी, कारखान्यातली विषारी रसायने, टाकाऊ पदार्थ मिसळून पाणी प्रदुषित होण्याचा धोकाही असतो. मस्त्य शेती खाऱ्या पाण्यात करता येते तशीच गोड्या पाण्यातही करता येते. रोहू, टेंच, तिलापिया, ट्राऊट, रावस, झिंगे, कोलंबी, चिंगुल, कालवे, शिंपा, सी बास, सी ब्रिम, मुसेल सारखे अनेक प्रकारचे मासे येथे वाढविता येतात.

ऑर्गेनिक स्टोअर 

ऑर्गेनिक फळे, भाज्या किंवा धान्ये पिकविणे आपल्याला शक्य नसले तरी आपण ऑर्गेनिक स्टोर्स सुरु करू शकता. यात ऑर्गेनिक चहा, कॉफीचे दुकान काढता येते किंवा हेल्दी ऑर्गेनिक पदार्थ विकता येतील. मात्र या व्यवसायात केवळ तुमची उत्पादने नाही तर जागा कुठे आहे हा कळीचा प्रश्न बनतो. जागा मोक्याच्या ठिकाणी असणे हा यशाचा पाया मानता येईल.

खूप वर्दळ असलेल्या जागी, समुदायाचा सपोर्ट आहे असे ठिकाण या स्टोर्स साठी उपयुक्त आहेच पण पायी जाणारे पादचारी सुद्धा येथे सहज येऊ शकले पाहिजेत हे पहावे. तसेच स्टोर्सची प्रसिद्धी हवी. प्रसिद्धी कशी करता यावर सुद्धा व्यवसायाचे यश, अपयश ठरू शकते. किराणा दुकाने, ऑर्गेनिक फूड विकणारी व्हीटॅमीन शॉप यांच्याबरोबर तगडी स्पर्धा करावी लागते.

सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर करोना साथी सारख्या काळात जगभरात रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी वाढविणारे पदार्थ जोरदार मागणीत आहेत. हर्बल औषधे, नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या डाळी, ज्वारी, बाजरी, रागी सारखी धान्ये मागणीत आहेत. भारतात ही धान्ये मोठ्या प्रमाणावर पिकविली जातात. त्याची प्रसिद्धी, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि निर्यात असा व्यवसाय करता येतो. कृषी मंत्रालयातील अधिकारी सांगतात त्याप्रमाणे या मालाला खूप मागणी आहे.

ऑर्गेनिक कॅनिंग 

नैसर्गिक पद्धतीने पिकविलेली फळे, भाज्या यापासून जाम, लोणची यांचे जार पँकिंग किंवा कॅन पँकिंग करता येते. त्याची विक्री ऑनलाईन किंवा स्टोअर्स मधून करता येते. मात्र हे पदार्थ तयार करताना कृत्रिम रंग, स्वाद किंवा सुगंधाचा वापर करू नये. पूर्वीच्या काळी घरात मुरंबे, लोणची केली जात त्यावेळी कृत्रिम रंग, स्वाद आणि सुगंधी द्रव्ये उपलब्ध नव्हती. तरीही हे पदार्थ टिकाऊ आणि चवीला उत्तम दर्जाचे असत. त्या धर्तीवर हे पदार्थ बनविता येतात.

 ऑर्गेनिक भाज्या, बियाणी 

अनेकांना ऑर्गेनिक पद्धतीने भाज्या, फळे पिकविण्याची इच्छा असते पण त्यासाठी बियाणे कुठून आणावे हे माहिती नसते. तुम्ही त्यांना यासाठी मदत करू शकता. ऑर्गेनिक बियाणी विक्री हा त्याचा मार्ग आहे. त्यासाठी फार गुंतवणूक करावी लागत नाही. चांगला दर मिळायला हवा असेल तर आयात केलेली बियाणी हवीत. मात्र बियाणी आयात करायची असतील तर स्थानिक कृषी विभागाकडून आयात, निर्यात नियम जाणून घ्यावेत. अनेक देशात बियाणी आयात करण्यास बंदी आहे. यामागे त्याच्या देशातील इको सिस्टीमचे संरक्षण व्हावे या हेतू असतो.

शेअर करा