फॅशन डिझायनिंग – प्रसिद्धी, पैसा आणि प्रतिष्ठा देणारा व्यवसाय

फॅशन उद्योग आजच्या वेगाने भरभराट होत असलेल्या उद्योगांपैकी एक उद्योग बनला आहे. या उद्योगाने मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बाजार मिळविला आहेच पण आजकालच्या तरुण पिढीला या उद्योगाचे मोठे आकर्षण असल्याचेही दिसून येत आहे. याचे एक कारण म्हणजे या उद्योगात मिळणारा पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा.

कपडे घालणे याचा अर्थ शरीर झाकणे इतका मर्यादित नाही. कपडे माणसाचे व्यक्तिमत्व उठावदार बनविण्यास हातभार लावतातच पण ते व्यक्तीला आत्मविश्वास देत असतात. रोजची आणि एक महत्वाची गरज असलेल्या कपड्यांना कलात्मक स्वरुपाची किंवा प्रतिभेची जोड ज्यांना देता येते त्याच्यासाठी फॅशन डिझायनिंग हे नक्कीच चांगले करियर बनू शकते. अर्थात त्यासाठी फॅशनचा चांगला सेन्स हवा तसेच त्यासाठी आवश्यक ते ज्ञान असेल तर आणखीन उत्तम. फॅशन डिझायनरचा व्यवसाय घरच्या घरी सुद्धा सुरु करता येतो.

फॅशन डिझायनर म्हणून काम करताना विविध प्रकारच्या कपड्यांची माहिती, तयार नजर हवीच पण रंगसंगतीचे खोल ज्ञान हवे. बाजारात नवे काय येतेय यावर सतत लक्ष ठेऊन बाजारातील ट्रेंड बाबत जागरुकता हवी. हा व्यवसाय लघु व्यवसाय म्हणून सुरु करताना गुंतवणूक म्हणाल तर फॅशन डिझायनिंग साठी तुम्ही जे प्रशिक्षण घेतले असेल त्यासाठी आलेला खर्च इतकीच असू शकते. पण कपड्याचे विविध पॅटर्न म्हणजे नमुने बनविताना कौशल्य हवे, सर्जनशीलता हवी आणि प्रतिभा हवी. विशेष म्हणजे हा व्यवसाय अगदी एकहाती म्हणजे एकट्याने सुद्धा करता येतो.

भारतात फॅशन उद्योगाची स्थिती

भारतीय फॅशन उद्योग जगातल्या मोठ्या उद्योगातील एक मानला जातो. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे देशाच्या सव्वा अब्ज लोकसंख्येला गरजेचे असलेले कपडे पुरविण्याचे काम या उद्योगात केले जाते. भारतात स्थानिक टेक्सटाइल उद्योगाची उलाढाल ३३ अब्ज डॉलर्सची आहे तर अनस्टीच कपडे उद्योगाची उलाढाल ८ अब्ज डॉलर्सची आहे. टेक्सटाइल आणि क्लोदिंग उद्योगाचा एकूण उद्योगातील उत्पादन हिस्सा १४ टक्के इतका आहे.

फॅशन डिझायनर कसे बनाल..?

फॅशन डिझायनर बनण्याचे दोन मार्ग आहेत. पारंपारिक आणि व्यवहार्य मार्ग म्हणजे फॅशन डिझायनिंगचे योग्य शिक्षण घेणे. यात सर्टिफिकेट, पदविका, पदवी घेता येते. दुसरा मार्ग म्हणजे असे शिक्षण घेतलेले नसले तरी तुम्हाला कपडे डिझाईन करण्याचा छंद असेल तर हा छंदच व्यवसायात बदलणे. अनेक जणांचे असे म्हणणे आहे की फॅशन डिझायनिंग कार्यासाठी पदवी हवीच असे नाही. पण खरे सांगायचे तर या व्यवसायात जम बसविणे, स्वतःचा दबदबा निर्माण करणे सहज सोपे नाही. त्यासाठी या कलेची मनापासून आवड हवी, नवनवीन प्रयोग करण्याची तयारी हवी आणि भरपूर कष्ट करण्याची तयारी हवी. हे असेल तर तुम्ही यशस्वी फॅशन डिझायनर बनू शकता. या व्यवसायात यशस्वी होण्याचा कोणताही टेलरमेड फॉर्म्युला नाही याची जाणीव सुटू देता कामा नये.

फॅशन डिझायनिंगचे कोणतेही प्रशिक्षण न घेता जेव्हा तुमची आवड किंवा छंद म्हणून या उद्योगात पाउल टाकता तेव्हा सर्व जबाबदारी तुमच्यावरच येत असते. तुमचे स्वप्न पूर्ण करताना तुम्हाला तुमचे प्रयत्न, वेळ, उर्जा पणाला लावावी लागते.

तयारी कशी कराल

१)शिवण कौशल्य – बेसिक शिवण येणे हे किमान आवश्यक कौशल्य आहे. फॅशन डिझायनर कडे हे कौशल्य असलेच पाहिजे. शिवणाचे तंत्र अवगत असेल तर डिझायनिंगचे आराखडे किंवा स्केचेस बनविणे सोपे जाते. प्रत्येक फॅशनसाठी कोणत्या कपड्याची निवड करायची याचेही ज्ञान हवे. कापडाचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध असतात. त्यांचा वापर तुम्ही विविध प्रयोगासाठी करून पाहू शकता. तुम्ही करणार असलेले डिझाईन अशा अनेक घटकांवर अवलंबून असते.

अशावेळी अन्य डिझायनर्सचे काम काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे. अन्य डिझायनर्सच्या कामाचे तुम्ही बारकाईने निरीक्षण केले तर असे दिसून येईल की त्यावर त्याचा खास ठसा म्हणजे सिग्नेचर स्टीच, स्टाईल व तंत्रज्ञान यावर त्यांचे काम आधारित आहे. हे अनुभव, प्रयोग, संशोधन व कामावरची पकड यातून साध्य करता येते. तुम्ही जेव्हा व्यवसायाची सुरवात करता तेव्हा ही कौशल्ये अधिक अचूक बनविण्यासाठी खूप वेळ खर्च करावा लागतो. त्यातूनच तुमची खास शैली तयार होत असते.

२) डिझायनिंग- कपडे डिझाईन करून तुमचे कलेक्शन तयार करणे म्हणजे अनेक महत्वाच्या घटकांना एकत्र करून एक सुंदर साखळी बनविण्यासारखे आहे.

आराखडा किंवा स्केचिंग– कपडे डिझाईन करण्याच्या प्रक्रियेतली ही पहिली महत्वाची पायरी. आउटफिट तयार करण्याचा हा सांगाडा. त्यासाठी प्रथम कच्चे स्केच काढणे हा चांगला मार्ग असतो. प्रत्यक्ष कपडा नजरेसमोर आणणे आणि तो स्केच स्वरुपात कागदावर रेखणे यात फरक आहे. कागदावरच्या आराखड्यात सुधारणा करण्यास वाव असतो. म्हणून एकच कपड्याची अनेक स्केचेस करायची तयारी असणे महत्वाचे.

  • कापडाची निवड – आपण जे कापड निवडले आहे त्यातून नक्की काय बनवायचे ही याची दुसरी पायरी म्हणता येईल. तुम्ही अनेक पॅटर्नस, प्रिंट्स निवडून त्यातून तुमचे कौशल्य वापरून नवीन डिझाईन बनवू शकता. पण त्यात योग्य रंग, त्याच्या योग्य शेड निवडल्या गेल्या नसतील तर कपड्याचा प्रभाव पडत नाही. प्रत्येक रंगाच्या अक्षरशः हजारो शेड असतात त्यातून योग्य शेडची निवड करणे ही एक कला आहे त्यासाठी नजर तयार हवी.

जेव्हा तुम्ही एखादे विशिष्ट कलेक्शन पाहता, तेव्हा असे दिसते की त्या डिझायनरने एक ठराविक थीम घेऊन प्रत्येक रंग व पॅटर्नवर भरपूर काम केले आहे. त्यामुळे कपड्याचा एकप्रकारे तोल सांभाळला गेला आहे.

  • तंत्रज्ञानाची सर्वांगीण माहिती की तात्पुरते ज्ञान – कपडा शिवणे हेही खरे तर एक शास्त्र आहे. याचे कारण म्हणजे तुम्ही तुमचे स्केच पुढच्या पातळीवर नेऊन प्रत्येक कपड्याची जणू ब्लू प्रिंट बनवत असता. प्रत्येक व्यक्तीचा बांधा किंवा शरीर आकार वेगळा असतो. त्यामुळे कोणता साईज कोणत्या श्रेणीत बसवायचा याची माहिती हवी. मोठ्या कंपन्यांमधून अशा विविध कामांसाठी मोठा ताफा किंवा लवाजमा असतो. कपड्याचे साईज ठरविणे, प्रत्येक साईजनुसार पेहराव तयार करणे हे एखाद्या पझल मध्ये योग्य तुकडे बसवून पझल पूर्ण करण्यासारखे आहे.

फॅशन डिझायनरकडे नुसते कौशल्य असून उपयोग नसतो तर अफाट कल्पनाशक्ती सुद्धा हवी. बहुतेक वेळा फॅशन डिझायनर्सना फॅशन ट्रेंड्स, डिझायनची स्केचेस करणे, कपड्याची निवड करणे अशा उत्पादनाच्या सर्व अंगांचा भाग बनणे आवडते. कपडा हा आयुष्याचा प्रत्येक टप्प्यावरच नाही तर सर्व उद्योगांचा एक भाग आहे. कारण कोणत्याची थरातील व्यक्ती असली तरी तिला कपडे लागतात. फॅशन डिझायनर म्हणून तुम्ही ही प्राथमिक गरज तुम्ही पूर्ण करत असता आणि त्यासाठीच तुम्हाला पैसे दिले जात असतात.

व्यवसाय नोंदणी

फॅशन डिझायनरचा व्यवसाय सुरु करताना प्रथम सेटअप हवा. व्यवसायाचे जे नाव ठरविले असेल त्या नावाचे बँक अकौंट काढावे. अर्थात हे ऐच्छिक आहे. फॅशन व्यवसाय प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप किंवा लिमिटेड लायबेलिटी पार्टनरशिप अथवा कंपनी अशा नोंदणीने सुरु करता येतो.

ज्यांना हा व्यवसाय अर्धवेळ करायचा आहे त्यांच्यासाठी प्रोप्रायटरशिप आदर्श ठरते. वर्षाची उलाढाल १० लाखांपर्यंत असेल तर हा पर्याय चांगला. पण पूर्ण वेळ व्यवसाय करणार असला तर किंवा फॅशन बुटिक काढायचे असेल तर लिमिटेड लायबेलिटी पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा पर्याय विचारात घेता येतो. कारण यात भागीदार घेणे, भांडवल मिळविणे सोपे जाते.

कर्ज किंवा इक्विटी भांडवल

बहुतेक व्यवसायात बीज भांडवल हे प्रमोटर, कुटुंब किंवा मित्रमंडळी याच्याकडून घेता येते. फॅशन बिझिनेसना प्रमोटर्स किंवा प्रवर्तक पाहिले फंडिंग करतात. पण त्याशिवाय क्लोदिंग स्टोर काढायचे असेल तर ठराविक भांडवल लागते त्यासाठी बँक कर्ज मिळू शकते. बँक यासाठी मुदतीची कर्जे देतात. शिवाय फॅशन बुटिक इंटिरीअर, वर्किंग कॅपिटल साठीही बँक कर्ज मिळू शकते.

वेगाने विकसित होत असलेल्या फॅशन व्यवसायांना प्रायव्हेट इक्विटी फंडिंग किंवा अंजेल फंडिंग मिळू शकते. तुम्ही एखाद्या आधुनिक तंत्राचा वापर करून व्यवसाय सक्षम करत असाल तर त्यासाठी सुद्धा असे फंडिंग मिळू शकते. प्रायव्हेट इक्विटी फंडिंग असलेली भारतातील काही प्रसिद्ध फॅशन व्हेन्चर्स म्हणून मियान्त्रा, जबोंग, झीवामे, येपमी यांच्याकडे बोट दाखविता येईल.

पैसे कसे मिळवायचे – फॅशन डिझायनर म्हणून काम करत असताना पैसे मिळविण्यासाठी अनेक मार्ग आज उपलब्ध आहेत. त्यासाठी विविध प्रकारचे करार किंवा कॉन्ट्रक्ट करून काम करून देता येते आणि त्यासाठी मोबदला घेता येतो. आजकाल यातही बदल होतो आहे. फॅशन डिझायनर ताजा ट्रेंड फॉलो करण्यासाठी अनेक गोष्टी करतात. त्यासाठी त्यांना सोशल मिडियासारखी ‘वंडर पेजेस’ उपलब्ध आहेत. फॅशन डिझायनर तेथे स्वतःला कलाकार किंवा क्रिएटर म्हणून ब्रांड करू शकतात. अपारंपरिक मार्गाने या व्यवसायात पैसे मिळविण्याचे अनेक मार्ग आहेत.

१) फॅशन ब्लॉगर –

घर बसल्या ब्लॉग तयार करता येतो. कुणीही ब्लॉग उघडून त्याला हवी ती माहिती तेथे पोस्ट करू शकतो. या ब्लॉगना सुद्धा चांगला प्रेक्षक किंवा दर्शक असतो. फॅशन ब्लॉग सुरु करणे हा त्याचा क्रिएटीव्ह फॉर्म म्हणता येईल. यातून ब्लॉगरची पर्सनल स्टाईल दर्शविता येते. विकीपिडिया वर याची माहिती आहेच. फॅशन ब्लॉग लिहिताना अनेक गोष्टी कव्हर करता येतात. कपड्यांचे विशिष्ट प्रकार, अॅक्सेसरीज, ब्युटी टिप्स, तयार कपडे बाजारपेठेतील विविध ट्रेंड्स, सेलेब्रिटी फॅशन चॉइस, स्ट्रीट फॅशन ट्रेंड्स अशा या अनेक गोष्टी आहेत. कपड्यांच्या पलीकडे जाऊन तुमचे नाव लोकांच्या नजरेत भरणे, डिझायनर म्हणून तुमची ओळख निर्माण करताना तुमची स्टाईल दाखवून फॉलोअर्स मिळविणे, त्यातून ग्राहकवर्ग तयार करणे आणि त्यातून पैसा कमविणे ब्लॉगच्या माध्यमातून साध्य करता येते.

२)डिझाईन विक्री –

घरबसल्या डिझायनर व्यवसायात कमाई करण्याचा हाही एक चांगला मार्ग आहे. मोठ्या फॅशन साईट्ससाठी तुम्ही तुमची डिझाईन विकू शकता. प्री ऑर्डर नसताना तुम्ही या साईटना अगोदर काही कच्चे आराखडे किंवा स्केचेस दाखवून त्याच्याकडून ऑर्डर मिळवू शकता. अर्थात त्यासाठी स्केचिंग प्रॉपर पद्धतीने केलेले आणि व्यवस्थित हवे. मोठे फॅशन डिझायनर्स किंवा साईटवर सुद्धा तुम्ही डिझाईन विकून पैसे कमावू शकता.

दुसरा मार्ग म्हणजे जे अगोदर ऑर्डर देतील त्यांना डिझाईन विकणे. त्यासाठी काही ठराविक पातळीवर जाहिराती करणे किंवा सोशल मिडियावर चांगले फॉलोइंग असणे अधिक फायद्याचे ठरते. उदाहरण द्यायचे तर एखादी महिला किंवा तरुणी तिच्या विवाह सोहळ्यासाठी युनिक ड्रेसच्या शोधात असेल तर ती तुमच्याकडे या कामासाठी येऊ शकते. कदाचित ती स्वतः तिला कसे डिझाईन हवे त्याची कल्पना देईल. त्यानुसार तुम्ही स्केच करून देऊन त्यासाठी पैसे आकारू शकता.

फॅशन डिझाईन विकण्यासाठीचे काही बाजार खालीलप्रमाणे

नाईनटीन्थ अमेंडमेंट- येथे तुम्ही प्रत्यक्ष उत्पादन तयार करण्यापूर्वी तुमचे डिझाईन शेअर करू शकता. तेथे ४५ दिवसात तुमच्या डिझाईन साठी १० ऑर्डर आल्या तर कपडा तयार केला जातो आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशातून तुम्हाला डिझाईनचे पैसे दिले जातात.

एटसी डॉट कॉम (etsy.com)-  येथे तुमचे डिझाईनच ग्राहकाला विकले जाते.

या प्रमाणे आणखी काही कंपन्या अशा- नॉट जस्ट लेबल, शॉपीफाय, शॉपटीक्स, फ्रेशन अप, ऑफकाईंड, वोल्फनबॅजर, लाँच माय वेअर, सिल्कफ्रेड, मॉडली, मेक मनी डिझाईन टी शर्ट्स इत्यादी.

  • ऑनलाईन फॅशन डिझायनिंग सेवा –

ऑनलाईन डिझायनिंग सेवा देण्याचे काम सुद्धा घरात बसून करता येते. त्यासाठी ऑनलाईन स्पेस घेऊन तेथे तुम्ही काय सेवा देता याची जाहिरात द्यावी लागेल. अर्थात या कामी तुम्ही सोशल मिडियाचा वापर करू शकता. तुमच्याकडे येत असलेल्या प्रतिक्रिया, रेफरन्स देऊन तुम्ही येथे ग्राहक मिळवू शकता. असे ग्राहक तुम्हाला त्यांना गरज असलेल्या कपड्याची मापे, पैसे पाठविणे ही कामे ऑनलाईन करू शकतील आणि तुम्ही कपडे डिझाईन करून, आवश्यक असल्यास शिलाई करून योग्य त्या पद्धतीने त्यांना घरपोच डिलीव्हरी देऊ शकता.

तुमचे स्वतःचे कार्यालय किंवा दुकान नसेल तर ही पद्धत अतिशय उत्तम ठरते. कपडे डिझाईन आणि शिलाई साठी आवश्यक यंत्रे, साहित्य घरात ठेवता येते आणि ग्राहक सुद्धा त्याच्या घरी बसून त्याला काय हवेच त्याची प्री ऑर्डर देऊ शकतो.

  • फॅशन इन्फ्लुएन्सर

तर Influencer म्हणजे अशी व्यक्ती जी  आपल्या लाखो फॉलोअर्स ला सोशल मीडियावर विविध वस्तूंची जाहिरात करुन किंवा त्यांची शिफारस करुन उत्पादनावर किंवा सेवेच्या संभाव्य खरेदीदारांवर प्रभाव पाडण्याची क्षमता ठेवते.

आजच्या डिजिटल युगात Influencer म्हणून उदयास येण्यासाठी १० हून अधिक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचा टॅलेंट संपूर्ण जगात पोहचवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्युब, लिंक्डइन, पोडकास्ट यासारख्या अनेक प्लॅटफॉर्म्सवर तुम्हीसुद्धा Influencer म्हणून नाव कमावू शकता.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

फॅशन डिझायनर म्हणून तुमच्या ब्रांडला व तुम्हाला किती ओळख/ प्रसिद्धी मिळवायची हे पूर्ण तुमच्यावर अवलंबून आहे आणि ती तुमचीच जबाबदारी आहे. या व्यवसायात तुम्ही जेवढी प्रसिद्धी आणि गुडविल मिळवू शकला तेवढी यशाची संधी जास्त असेल. व्हिडीओ बनवून तुम्ही तुमची कारागिरी, कौशल्ये, तुमचे वेगळेपण दाखवू शकता. 

आजकाल अनेक व्यक्ती कुठल्याही प्रकारचे व्हिडीओ इंटरनेटवर टाकत असतात. तुमच्याकडे असलेले फॅशन कौशल्य याचाही उपयोग पैसे मिळविण्यासाठी होऊ शकतो.फॅशन डिझायन संबंधातील वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवून तुम्ही या प्लॅटफॉर्म्सवर टाकू शकतात.

  • अन्य ब्रांड किंवा कंपन्यांसाठी काम

समजा फॅशन डिझायनर म्हणून स्वतःचा ब्रांड निर्माण करण्यात तुम्हाला काही अडचणी येत असतील तरी त्यामुळे फारसे काही बिघडले असे समजण्याचे कारण नसते. घरातल्या घरात एकट्याने तुम्ही काम करत असला तरी फ्रीलान्सर टेलर किंवा फॅशन इलस्ट्रेटर किंवा फॅशन डिझायनर म्हणूनही तुम्ही काम करून पैसे मिळवू शकता. यात एखाद्या ब्रांड कडून तुम्हाला डिझाईन कसे हवे याची स्पेसिफिकेशन्स दिली जातात आणि तुम्ही त्याप्रमाणे कपडा शिवून द्यायचा असा एक प्रकार आहे.

फॅशन कंपन्या किंवा ब्रांड साठी तुम्ही असे काम करत असला तरी यातली चांगली गोष्ट अशी की तांत्रिकदृष्ट्या तुम्ही संबंधित कंपनी किंवा ब्रांड बरोबर काम करत असला आणि त्यासाठी पैसे घेत असला तरी तुम्हाला कामाचे पूर्ण स्वातंत्र उपभोगता येते. एकदा का यातून तुम्ही तुमचे लक्ष्य गाठू शकता अशी परिस्थिती आली की संबंधित कंपन्या किंवा ब्रांड बरोबर बांधिलकी मुळे येणारया ताणतणावांना तुम्ही बाय बाय करू शकता. कारण या क्षेत्रात अश्या अनेक कंपन्या आहेत ज्यांना तुमची गरज भासू शकते.

  • ऑनलाईन फॅशन कोर्स घेणे

जगभरात आज ऑनलाईन शिकवण्या किंवा टिचिंग करण्याचा पर्याय मोठ्या प्रमाणावर स्वीकारला जात आहे. याचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता. ऑनलाईन शिकवणीचा ट्रेंड वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पारंपारिक शिकवणीच्या तुलनेत येथे कामाच्या तासांचे वेळापत्रक लवचिक असते. यातून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते तसेच सहज संवाद साधण्याची सुविधा असते. शिवाय ऑनलाईन मटेरियलचा पुनर्वापर आपण करू शकतो.

तुमच्या कौशल्याचा वापर करून ऑनलाईन कमाई करण्यासाठी तुम्ही जे कोर्स देणार त्याचे प्रमोशन करायला हवे. त्यासाठी फॅशनचे शिक्षण घेण्यात रस असलेले गरजू विद्यार्थी, फॅशन उद्योगातील कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचायला हवे. त्याचे अनेक मार्ग आहेत. त्यासाठी अगोदर कोर्स तयार करायला हवा. हे तयार केलेले कोर्स म्हणजे अभ्यासक्रम तुम्ही ऑनलाईन विकू शकता. हे कोर्स कसे तयार करायचे याचे मार्गदर्शन करणारे टीचेबल, उदेमी, लर्न डॅश असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत. हे मार्गदर्शन येते मोफत मिळते.

तुमच्याकडे असलेले फॅशन कौशल्य किंवा तुमचा फॅशन डिझायनिंगचा छंद याचाही उपयोग पैसे मिळविण्यासाठी होऊ शकतो. तुमच्यापेक्षा ज्यांना तुम्हाला येत असलेल्या विषयाची कमी माहिती आहे त्यांना तुम्ही तो शिकवू शकता. यासाठी तुम्ही अनुभवी किंवा गुरु असण्याची गरज नाही. यात शिकविण्याचा अनुभव हा दुय्यम मुद्दा असतो. एकदा का तुम्ही ऑनलाईन कोर्स प्रसिध्द केला की तो खरेदी करणारे विद्यार्थी आपोआप मिळू लागतात.

याची सर्वात चांगली बाब म्हणजे कोर्स तयार करून विक्रीला आला की तुम्ही तुमची अन्य कामे करत असतानाही यातून पैसा मिळत राहतो. अगदी दिवसाचे चोवीस तास आणि आठवड्याचे सात दिवस तुमची कमाई वेगळा वेळ खर्च न करता सुरु राहते. त्यामुळे ऑनलाईन टिचिंग कोर्स अधिक लोकप्रिय ठरत आहेत. असेही दिसून येते की आजचे यशस्वी ऑनलाईन टीचर तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक आहेत फक्त त्यांना जे अवगत आहे त्याबद्दल बोलण्याची, लोकांना शिकविण्याची आवड आहे. आज कित्येक जण या अश्या ऑनलाईन टिचिंग मधून प्रचंड कमाई करत आहेत. विशेष म्हणजे हे शिक्षक तज्ञ आहेत असेही नाही पण त्यांना त्यांचे ज्ञान शेअर करण्याची इच्छा आहे.

ऑनलाईन क्लासेस कसे घ्यावे यावरील माहिती साठी खालील लेख वाचू शकता 

  • फ्रिलान्स फॅशन डिझायनर

फॅशन डिझायनर म्हणून काही खास ग्राहकांसाठी काम करूनही तुम्ही पैसे मिळवू शकता. हे ग्राहक अन्य ग्राहकांच्या ऑर्डर घेणे, त्यांच्यासाठी डिझाईन करणे, कपडा तयार करणे आणि त्याची डिलीव्हरी देणे अशी कामे करत असतात.

एखादे कलेक्शन, फॅशन लाईन डिझाईन करून ऑनलाईन विक्री करणे किंवा स्थानिक बुटिक किंवा स्टोर्स मध्ये त्याची विक्री करणे यातून कमाई करता येते.

दुसरा मार्ग म्हणजे कॉस्च्युम डिझाइन करून इव्हेंट ऑर्गनायझर, थिएटर कला मॅनेजर, शॉर्ट फिल्म मेकर, चित्रपट सेलेब्रिटी यांच्याशी संबंध प्रस्थापित करणे व त्यातून पैसे मिळविणे

आणखी एक मार्ग म्हणजे तुमच्या स्थानिक भागातील प्रभावशाली व्यक्तीना टार्गेट करून त्यांच्यासाठी कपडे डिझाईन करून स्वतःची ओळख निर्माण करा. या व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी ट्विटर सारख्या माध्यमांचा वापर करता येतो.

तुम्ही कपडे शिवण्यात अधिक कुशल असलात तर ग्राहकांना त्यांच्या आवडीप्रमाणे कपडे शिवून देऊ शकता किंवा एखाद्या डिझायनरचे सहाय्यक म्हणून काम करू शकता.

पॅटर्न डिझायनर कामावर ठेऊन तुम्ही विविध पॅटर्न बनवून घेऊ शकता आणि तुमची शिलाईतील कौशल्ये वापरून कपड्यांचे कलेक्शन बनवून त्याची ऑनलाईन विक्री करू शकता. अर्थात यासाठी तुमचे शिलाई काम अतिशय सफाईदार हवे आणि फिनिशिंग उत्तम दर्जाचे हवे. यासाठी खूप पेशन्स हवा तसेच पुरेसा वेळ सुद्धा देता यायला हवा.

याची सुरवात करण्यासाठी काही बेसिक आयडिया

एकदम कापडे बनविण्यापेक्षा सुरवात बॅग्ज, मस्त पाउचेस यांचे छोटे कलेक्शन बनवून त्याची ऑनलाईन विक्री करा. स्थानिक प्रदर्शनात सहभागी व्हा. दुसऱ्यांसाठी शिलाईचे काम करून द्या.

फ्रीलान्स डिझायनर म्हणून पैसे आकाराने किती आणि कशी कराल

फ्री लान्सर डिझायनर म्हणून काम करताना तुम्ही तासाच्या हिशोबाने, प्रोजेक्ट नुसार किंवा दर महिना असे चार्ज करू शकता. अर्थात एका तासात बनविल्या गेलेल्या स्केच साठी एक तास शिलाई करून मिळणाऱ्या पैश्यापेक्षा कमी रक्कम मिळणार हे गृहीत धरायला हवे. त्यामुळे पैसे आकारताना तुमचा किती वेळ खर्च झाला, कपड्यासाठी कोणते मटेरियल वापरले, तुमचे प्रयत्न आणि कष्ट, आलेला एकूण खर्च याचा अंदाज घेऊन आकारणी करायला हवी.

तुम्ही तासांवर कामाचे दर ठरविणार असला तर www.yourrate.co येथे तुम्हाला तुमची योजना बनविण्यासाठी मदत मिळू शकते.

तुमच्या कामासाठी किंवा एखाद्या ऑर्डर साठी तुम्ही जी किंमत ग्राहकाला सांगितली आहे ती तीन हप्त्यात घेणे हा एक चांगला मार्ग आहे. पहिला हप्ता ऑर्डर घेताना, दुसरा डिलीव्हरीच्या आधी आणि तिसरा डिलीव्हरी देताना अशी ही विभागणी करता येते.

—————-

शेअर करा