डिजिटल इन्फ्लुएन्सर कसे आणि का बनावे ?

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण आज महिना लाखो रुपये कमवत आहेत, असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. तुमचा यावर खरंच विश्वास आहे का? नाही… तर मग एकदा या आकडेवारीवर देखी नजर टाका..

डिजिटल इन्फ्लुएन्सर कसे आणि का बनावे ?
डिजिटल इन्फ्लुएन्सर कसे आणि का बनावे ? 4

(Image Source – https://www.statista.com/)

जगातील नामवंत फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो याचे फॅन फॉलोअर्स हे २०० मिलियन पेक्षा जास्त असून प्रत्येक प्रायोजित पोस्टमागे तो $१ मिलियन (अंदाजे ७.५ कोटी रुपये) कमवितो. आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचेही ५० मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स असून तो सुद्धा प्रत्येक प्रायोजित पोस्टमागे अंदाजे ८८ लाख रुपये कमवितो. (यातील १% कमाई जरी साध्य झाली तरी आपल्यातील अनेक जण खुश होतील)

पण तुम्ही म्हणाल हे तर खूप मोठे मोठे सेलिब्रिटी झाले…तर असेही अनेक सामान्य लोक आहेत जे या प्लॅटफॉर्म्सचा वापर करून सेलिब्रिटी झाले आणि आज याच माध्यमातून ते महिन्याला लाखो रुपये सुद्धा कमावीत आहेत. पण कोण आहेत हे लोक आणि महिना लाखो रुपये कमविणे कसे ह्यांना शक्य होते? तर या लोकांना तांत्रिक भाषेत ‘Influencer’ असे म्हणतात. पण म्हणजे नक्की काय…

तर Influencer म्हणजे अशी व्यक्ती जी सोशल मीडियावर विविध वस्तूंची जाहिरात करुन किंवा त्यांची शिफारस करुन उत्पादनावर किंवा सेवेच्या संभाव्य खरेदीदारांवर प्रभाव पाडण्याची क्षमता ठेवते. आता निश्चितच तुम्हाला कळल असेल…

पण कोण आणि कसे होऊ शकतो Influencer? 

तर Influencer कोणीही होऊ शकतो पण त्यासाठी काही ठराविक टप्पे हे नक्कीच आत्मसात करावे लागतात.

तुम्हालाही Influencer व्हायची इच्छा आहे का ? तुम्हीही महिना लाखो कमवू इच्छिता का ?

पण तुम्हाला जर असे वाटत असेल की याद्वारे तुम्ही एका रात्रीत स्टार होऊन लाखो रुपये सहज कमवू शकाल, तर तो तुमचा गोड गैरसमज आहे. तुम्ही निश्चितच लाखो रुपये कमवू शकाल पण त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम, संयम, एकाग्रता, दृढनिश्चय आणि दूरदृष्टी या पंचसूत्रीचा अवलंब करावा लागेल.

तत्पूर्वी हे ही जाणून घ्या कि आजच्या घडीला Influencer मार्केटिंग एवढ महत्वाचे का आहे ??

डिजिटल इन्फ्लुएन्सर कसे आणि का बनावे ?
डिजिटल इन्फ्लुएन्सर कसे आणि का बनावे ? 5

(Image Source – https://neilpatel.com/)

चला तर मग जाणून घेऊया Influencer होण्याचे काही खास सिक्रेट्स…

(लाखो रुपये कमविण्याची तुमची खरच प्रबळ इच्छा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत वाचा कारण यातील प्रत्येक आणि प्रत्येक टप्पा हा एकमेकांशी जोडलेला आहे.)

 • स्टेप : फायदेशीर Niche ची यादी करा तुम्हाला आवडणाऱ्या टॉपिकची निवड करा

तुम्ही Niche हा शब्द या पूर्वी ऐकला आहे का? हो…तर मग पुढे जाऊ आणि नाही तर मग आधी त्याचा अर्थ समजून घेऊ.

Niche म्हणजे विशिष्ट प्रकारच्या उत्पादन किंवा सेवेसाठी बाजारपेठेचा एक विशिष्ट विभाग. म्हणजे योगा हा जर टॉपिक तुम्ही निवडत असाल तर त्यात ‘महिलांसाठी योगा’, पुरुषांसाठी योगा’, गर्भवती महिलांसाठी योगा, युवकांसाठी योगा, ऑफिसमध्ये करता येण्यासारखा योगा, हे जे काही विशेष भाग आहेत त्यांना Niche म्हणतात. थोडक्यात सांगायचे तर Micro Level वर करावयाचे काम.

आज डिजिटल माध्यमांवर ‘सुई मध्ये दोरा कसा ओवावा’ यापासून ते ‘मोठमोठ्या मशीन कश्या चालवाव्यात’ इथपर्यंतची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. कोणी पाककलेत तज्ज्ञ आहे तर कोणी हस्तकलेत तज्ज्ञ आहे. तुम्ही कशात तज्ज्ञ आहात? नाही माहिती…काळजी करू नका तुम्ही तज्ज्ञ असलेच पाहिजे असे नाही पण असा टॉपिक तुम्ही निवडला पाहिजे की ज्यामध्ये तुम्हाला खूप आवड आहे, ज्यावर तुम्ही तासनतास न थकता बोलू शकता, ज्यावर काम करायला तुम्हाला कधीही कंटाळा येत नाही. खालील तक्त्यामध्ये २०२० – २०२५ मध्ये चालू शकणारे काही लाभदायी Niche टॉपिक आणि त्यांचे उपप्रकार दिले आहेत दिले आहेत. बघा यातील कोणता तुमच्या जिव्हाळ्याचा आहे.

मुख्य Nicheउपप्रकार
फायनान्सस्टॉक्स, इन्व्हेस्टमेंट, फॉरेक्स, पर्सनल फायनान्स
फिटनेसयोगा, न्यूट्रिशन, हेअर लॉस, वेट लॉस
ट्रॅव्हलट्रॅव्हल सेफ्टी, बजेट ट्रॅव्हल, सोलो ट्रॅव्हल, लकझरी ट्रॅव्हल, ट्रॅव्हल फ्लाईट डील्स आणि कूपन्स
गॅजेट्स आणि टेकनॉलॉजिकॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स, मोबाईल फोन, सॉफ्टवेअर, लेटेस्ट टेकनॉलॉजी
लाईफस्टाईललाइफस्टाइल सल्ला, फॅशन, ब्युटी टिप्स

(वरील टॉपिक लिस्टमध्ये तुम्हाला स्वारस्य नसल्यास, तुमच्या आवडीच्या विषयांबद्दल Google वरून माहिती मिळवा आणि तुमचा Niche टॉपिक त्यानुसार निवडा.)

 • स्टेप : तुम्हाला सोयीस्कर असणाऱ्या चॅनेल / प्लॅटफॉर्मची निवड करा

आजच्या डिजिटल युगात Influencer म्हणून उदयास येण्यासाठी १० हून अधिक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचा टॅलेंट संपूर्ण जगात पोहचवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्युब, लिंक्डइन, पोडकास्ट यासारख्या अनेक प्लॅटफॉर्म्सवर तुम्हीसुद्धा Influencer म्हणून नाव कमावू शकता पण त्यासाठी गरज आहे ती तुमचा कल ओळखण्याची. खालील काही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा व जाणून घ्या कोणता चॅनेल / प्लॅटफॉर्म हा तुमच्यासाठी अतिशय सोयीस्कर आहे.

 • तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे का ? इतरांच्या फोटोपेक्षा तुम्ही काढलेले फोटो हे खास असतात का ? हो..नक्कीच..तर मग इंस्टाग्राम हा तुमच्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तुमची ही आवड फेसबुक किंवा स्नॅपचॅटवर सुद्धा उत्तम प्रकारे प्रदर्शित करता येऊ शकते.
 • व्हिडिओग्राफीमध्ये तुमचा हातखंडा आहे का? व्हिडिओ बनविण्याच्या काही भन्नाट कल्पना तुमच्या डोक्यात आहेत का ? हो…तर मग युट्युबवर तुमच्या व्हिडिओज तुम्हाला नावलौकिक देऊ शकतील.
 • तुमच्यात उपजतच लिखाण कौशल्य आहे का ? तुमच्या आवडीचे विषय तुम्ही शब्दांद्वारे उत्तम प्रकारे मांडू शकता का ? निश्चितच…मग ब्लॉगिंग करून (लेख लिहणे) तुम्ही उत्तम प्रकारे अर्थार्जन करू शकता.
 • चालू घडामोडींवर तुम्ही अगदी थोडक्यात पण प्रभावी भाष्य करू शकता का ? तुमचा हजरजबाबीपणा ही तुमची जमेची बाजू आहे का ? हो..तर मग ट्विटर हे माध्यम खास तुमच्यासाठी बनलेले आहे.
 • तुमचा आवाज हा भारदस्त किंवा श्रवणीय आहे का ? फक्त तुमच्या आवाजाच्या व बोलण्याच्या कौशल्यावर तुम्ही लोकांना खिळवून ठेऊ शकता का ? हो..तर मग पोडकास्ट या माध्यमाद्वारे तुम्ही तुमचा आवाज दूरवर पोहचवू शकता.
 • B2B म्हणजेच व्यावसायिक क्षेत्राला लागणारे तज्ञ् मार्गदर्शन करण्यात तुमची हातोटी आहे का ? एखादा व्यवसाय उभारून त्यात यशस्वी कसे व्हावे याचे तुम्ही उत्तम मार्गदर्शन करू शकाल का ? हो..मग लिंक्डइन या प्लॅटफॉर्मवर तुमच्यासाठी Influencer होण्याची चांगली संधी आहे.

वरील प्रश्नांमधून तुमचा कल ओळखण्यात तुम्हाला मदत होईलच पण त्याचसोबत तुम्हाला हे ही जाणून घ्यावे लागेल की तुमचे संभाव्य फॉलोअर्स हे कोणत्या चॅनेलचा जास्तीत जास्त उपयोग करतात. कारण ‘व्यक्ती तशी प्रकृती’ त्याचप्रमाणे ‘चॅनेल तसे फॉलोअर्स’. खालील चित्रात कोणते क्षेत्र हे कोणत्या चॅनेल्सचा प्रभावीपणे वापर करतात हे दर्शविले आहे. ते समजून घ्या व योग्य चॅनेलची निवड करा.

डिजिटल इन्फ्लुएन्सर कसे आणि का बनावे ?
डिजिटल इन्फ्लुएन्सर कसे आणि का बनावे ? 6

(Image Source – https://neilpatel.com/)

 • स्टेप : तुम्ही निवडलेल्या Niche आणि चॅनेलवरील टॉप Influencers ची यादी बनवा त्याचा बारकाईने अभ्यास करा 

चला इथेपर्यंत तुमचा विषय (Niche) व चॅनेल याची योग्य निवड झाली असे ग्राह्य धरू. पण हे तर बेसिक काम झाले. खरे टेक्निकल काम आता सुरु होईल. ज्याप्रमाणे कोणताही व्यवसाय सुरु करण्याआधी आपण त्या क्षेत्रातील यापूर्वीच पाय रोवलेले किंवा नावाजलेले ब्रॅण्ड्स शोधून काढतो, त्याचप्रमाणे तुम्हालाही तुम्ही निवडलेल्या Niche व चॅनेलवर प्रसिद्ध असलेले Influencers शोधून काढावे लागतील. 

योग्य सुरुवात करण्यासाठी तुम्ही निदान २०-३० Influencersची तरी अगदी सूक्ष्म अशी यादी बनवा. यासाठी तुम्ही UpInfluence किंवा HypeAuditor यासारख्या विविध टूल्सचा वापर करू शकता आणि जर हे ही तुम्हाला अवघड वाटत असेल, तर सरळ Google Spread Sheet किंवा MS -Excel चा वापर करा. कोणतेही टूल वापरा पण लक्षात ठेवा, ही जी माहिती तुम्ही गोळा कराल तीच तुमची पुढील कामाची दिशा ठरवेल. थोडा वेळ जास्त घ्या, पण या कामात हलगर्जीपणा करू नका आणि तोंडी गोष्टी लक्षात ठेवायच्या तर भानगडीत पडूच नका, अनेकजण हा सोपा मार्ग स्वीकारतात आणि येथेच फसतात. 

एकच ध्यानात ठेवा – ‘पाया भक्कम तर इमारत भक्कम’…

या Influencers चा अभ्यास करण्यासाठी खालील गोष्टींची नोंद करा:

 • Influencer चे नाव 
 • त्याच्या चॅनेलचा URL 
 • त्यांची संपर्क माहिती 
 • त्यांच्या फॉलोअर्सचा आकडा 
 • त्याने अपलोड केलेल्या फोटो किंवा व्हिडिओजचा आकडा 
 • त्यांच्या पोस्टची ताळेबंदी (शेअर, लाईक, कंमेंट, टॅग्स ई. ची आकडेवारी)
 • त्यांच्या पोस्टची नियमितता
 • त्यांच्या पोस्टचे प्रकार
 • तो कोणकोणत्या ब्रॅण्डशी संबंधित आहे याची माहिती
 • तो कोणाकोणाला फॉलो करतो
 • या क्षेत्राशी निगडित त्यांचा इतर व्यवसाय असेल तर त्यांची माहिती
 • कोणकोणत्या डिजिटल माध्यमांवर तो सक्रिय आहे याची माहिती

वरील माहिती खूप मोठी वाटत असली तरी ती योग्य प्रकारे नोंदवून ठेवा. कारण हा अतिशय सूक्ष्म अभ्यास तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्याची योग्य माहिती देईल आणि या आधारेच तुम्हीही तुमचा प्लॅन करून या क्षेत्रात दीर्घकाळासाठी टिकून राहाल. शेवटी निर्णय तुमचा आहे – तुम्हाला नशीब आजमावयाचे आहे की ते कमवायचे आहे. दोन्ही मध्ये फरक एकच – कठीण परिश्रम.

 • स्टेप : विविध युक्त्या वापरून भन्नाट कंटेन्ट तयार करा तो नियमितपणे तुमच्या चॅनेलवर अपलोड करत राहा

आता तुम्ही दररोज, आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा याप्रमाणे तुमचा कंटेन्ट अपलोड करणे सुरु करा. 

पण कंटेन्ट म्हणजे काय? 

तर कंटेन्ट म्हणजे तुमचे ज्ञान व तुमची आवड लोकांपर्यंत पोहचविण्याचा एक प्रभावी पर्याय मग तो एखादा फोटो, व्हिडिओ, लेख किंवा व्हॉइस रेकॉर्डिंग सुद्धा असू शकते. तुमच्या चॅनेलच्या गरजेनुसार तुम्ही नियमितपणे दर्जेदार कंटेन्ट अपलोड करत राहा. पण एक लक्षात ठेवा तुमच्या फॉलोअर्सची मागणी काय आहे. – त्यांना कंटेन्ट किती नियमितपणे हवा आहे आणि त्यानुसार तुमचे ‘कंटेन्ट कॅलेंडर’ बनवा आणि ते तंतोतत पाळण्याची सवय लावून घ्या. यासाठी खालील काही उपाययोजनांचा अवलंब करा.

 • कंटेन्टच्या आयडिया मिळविण्यासाठी तुमच्या क्षेत्रातील Influencers च्या पोस्ट नियमितपणे पाहा व त्याचप्रमाणे चालू घडामोडींवरही लक्ष ठेवा.
 • तुमच्या क्षेत्रात अगोदर कोणी टाकलेली माहिती चोरू नका. तुम्ही त्या माहितीचा अभ्यास करा व त्या अनुषंगाने तुमचीही माहिती वेगळ्या पद्धतीने मांडा. 
 • तुमचे वेगळेपण जपणे तुम्हाला जमले तर तुमच्या कंटेन्ट सोबत तुम्ही विविध प्रयोग किंवा युक्त्या वापरून तुमच्या फॉलोअर्सवर अधिक प्रभाव पडू शकता.
 • एक वाक्य लक्षात ठेवा – ‘ज्याची ज्ञानाची मांडणी यथायोग्य त्यालाच मिळती फॉलोअर्स अनेक लक्ष’

म्हणजे काय तर तुम्हाला विषयाची सखोल माहिती आहे पण त्याची योग्य आणि सुटसुटीत मांडणी करणे जर तुम्हाला जमले नाही तर तुम्ही काय सांगता हे समोरच्याला (तुमच्या फॉलोअरला) निश्चितच कळणार नाही आणि एकदा का जर तो गोंधळला तर तो परत परत तुमच्या पोस्ट पाहणार नाही. 

 • Google वर सहज मिळणारी माहिती, अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मसवर उपलब्ध होणारी अद्ययावत आकडेवारी आणि त्याचे सोपे विश्लेषण यामुळे आजचा वाचक, व्ह्युवर किंवा फॉलोअर हा अतिशय चोखंदळ झाला आहे आणि यामुळेच तुमच्याकडे असलेली माहिती अतिशय प्रभावीपणे तुम्ही कशी मांडता याला खूप महत्व आहे. म्हणजेच जर तुम्ही एखादा फोटो टाकला तर त्याबद्दलची विशेष माहिती (जागा, वेळ, त्या फोटोतील वेगळेपण), तुमच्या व्हिडिओमधील आकर्षक इफेक्ट्स, तुमच्या लिखाणातील आकडेवारी व त्याची मांडणी, तुमच्या बोलण्यात वापरले जाणारे तरुणाईचे लोकप्रिय शब्द या गोष्टींचा तुम्ही कसा वापर करता यावरच तुमचे फॉलोअर्स हे टिकूनही राहतील व तेच Mouth Publicity द्वारे तुम्हाला अनेक लोकांपर्यंत पोहचवतील. 

शेवटी काय तर तुमच्या कंटेन्टचा ‘दर्जा’ हा तुमच्या फॉलोअर्सच्या ‘गरजा’ कशा पूर्ण करतो यावर तुमची फॉलोअर्स संख्या अवलंबून आहे.

 • स्टेप : तुमच्या फॉलोअर्सच्या संपर्कात राहा त्यांच्या शंका, कमेंट्स, सल्ले यांना लवकरात लवकर उत्तर द्या.

एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीने टी.व्ही. किंवा इतर पारंपरिक माध्यमांद्वारे जाहिरात केल्यास त्यावर तुम्ही केलेली कंमेंट, त्या जाहिरातीबद्दलची तुमचे प्रश्न याला कधी उत्तर मिळाले आहे का ? नाही ना..तस पाहिले तर या माध्यमांवरचे सेलिब्रिटी हे सुद्धा Influencer च असतात पण त्याच्यापर्यंत तुम्ही सहज पोहचू शकत नाही.

पण डिजिटल प्लॅटफॉर्म्सचे काय ? येथे पण तसेच होते का ? तर निश्चितच नाही…

येथे असणाऱ्या प्रत्येक Influencer ला हे नक्कीच माहिती असते की आपल्या फॉलोअर्सच्या कंमेंटला, रिअक्शनला व प्रश्नांना जेवढे लवकर आपण रिप्लाय देऊ तेवढा त्यांचा तुमच्यावरील विश्वास हा वृद्धिंगत होतो आणि पर्यायाने ते तुमच्या पोस्ट नियमितपणे फॉलो करतात आणि म्हणूनच पारंपरिक Influencers पेक्षा डिजिटल Influencers ला जास्त मागणी असून ती या पुढे वाढतच जाणार आहे. तुमच्या फॉलोअर्सला तुमच्याशी कनेक्टेड ठेवण्यासाठी खालील काही टिप्स वापरात आणा:

 • तुमच्या फॉलोअर्सच्या कंमेंटला वेळोवेळी उत्तरे (रिप्लाय) देत जा. यामुळे तुमचे अस्तित्व हे खरे आहे हे कळणे त्यांच्यासाठी सोपे जाते. डिजिटल माध्यमांवर अनेक खोटी किंवा फसवी अकाउंट्स असतात आणि त्यामुळेच लोकांचा विश्वास संपादन करणे व तो जतन करणे, हे आव्हान तुम्हाला पेलावे लागेल.
 • तुमच्या फॉलोअर्सची पण माहिती ठेवा, वेळप्रसंगी त्यांना खास टिप्पणी करून चकित करा (जसे की वाढदिवस, काही खास प्रसंग, तुमचा त्यांच्याशी झालेला सवांद). तुमचा अनपेक्षितपणे आलेला एखादा छोटासा संदेश सुद्धा तुमचा फॉलोअर्स सोबत असलेला ऋणानुबंध कायमस्वरूपी घट्ट करू शकतो.
 • तुमच्या क्षेत्रातील काही नावाजलेल्या Influencer शी सवांद साधण्याची संधी तुमच्या फॉलोअर्सला उपलब्ध करून द्या.
 • तुम्ही ज्या ब्रँड किंवा कंपनीचे प्रमोशन कराल त्यांच्या खास ऑफर्स किंवा डिस्काउंट तुमच्या फॉलोअर्ससाठी राखून ठेवा.
 • तुमच्या फॉलोअर्सचा तुमच्या पोस्टवर काही आक्षेप असेल, तर तो शांतपणे समजून घ्या व जर तो योग्य असेल, तर त्याप्रमाणे पोस्ट अद्ययावत करा आणि जर तो अयोग्य असेल, तर प्रेमाने त्यांना समजवा. उगाचच त्यांच्याशी वाद घालू नका. तुमचा एक चुकीचा रिप्लाय तुमचे अनेक फॉलोअर्स तुमच्यापासून लांब करू शकतो.       
 • धार्मिक, राजकीय व सामाजिक विषयांवर भाष्य करताना सखोल अभ्यास करूनच, जी योग्य असेल ती बाजू समर्पकपणे मांडा. कोणतीही आक्षेपार्ह विधाने करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवून स्वतःला व इतरांना अडचणीत आणू नका.
 • तुमच्या फॉलोअर्सवर प्रभाव पडणे म्हणजे त्यांना अक्कल शिकविणे नसून तुमची कला, तुमचे गुण, तुमची योग्यता त्यांच्यासमोर प्रदर्शित करणे आहे. 
 • ऑनलाईन कोर्स बनविणे कोणासाठी फायद्याचे आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर आम्ही सांगू इच्छितो की कोणीही स्वतःचा ऑनलाईन कोर्स बनवून तो विकू शकतो कारण यासाठी ना कुठल्या मोठ्या भांडवलाची गरज आहे ना की कुठल्या तंत्रज्ञानात प्राविण्य मिळविण्याची गरज आहे. तुम्हाला इतरांपेक्षा काय वेगळे माहिती आहे आणि त्याचे तुम्ही कोर्स स्वरूपात कसे रूपांतर करू शकतात एवढेच इथे महत्वाचे आहे.
 • ऑनलाईन क्लासेस कसे घ्यावे यावरील माहिती साठी खालील लेख वाचू शकता 

आपल्या घरी जसे आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, आपली नाती सांभाळतो तसेच आपले फॉलोअर्स हे ही आपले कुटुंबच आहे असे मानून त्यांनाही तसेच सांभाळले तर नक्कीच तुम्ही Influencer म्हणून यशस्वी व्हालच पण एक आदर्श व्यक्ती म्हणून तुमचा वेगळा प्रभाव पडण्यास सुरुवात होईल.

 • स्टेप : तुमच्या Niche मधील टॉप २५४० Influencers सोबत चांगले संबंध जोडा 

आता सुरुवातीला तुम्ही बनविलेली Influencers ची यादी तपासा. यातील जास्तीत जास्त लोकांशी चांगले संबंध किंवा मैत्री बनविण्यास सुरुवात करा. कारण हे असे लोक आहेत जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन, मोलाचा सल्ला किंवा एखादे गुपितही सांगू शकतील. त्यांनी या अगोदरच तुम्ही निवडलेल्या Niche मध्ये नाव कमविले असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच तुम्हालाही होईल. या साठी खालील टिप्सचा योग्य वापर करा.

 • यशस्वी लोकांच्या सहवासात असल्याने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व आपणही यशस्वी होऊ शकतो असा आत्मविश्वास आपल्यात निर्माण होतो.
 • जेव्हा जेव्हा अशा Influencer शी संपर्कात यायची संधी निर्माण होईल, तेव्हा ती नक्कीच चुकवू नका किंवा टाळू नका व या संधीचे सोन्यात रूपांतर करा म्हणजेच त्यातून जेवढे शिकता येईल तेवढे शिका व त्याची नोंद करा.
 • त्यांच्या प्रभावाने तुम्ही एखादी पोस्ट अपलोड करणार असाल तर ती त्यांना टॅग करायला विसरू नका व जिथे शक्य असेल तिथे त्यांना त्याचे योग्य श्रेय द्या. याने तुमचा एक वेगळाच प्रभाव त्यांच्यावर राहील व भविष्यात त्यांच्याकडूनही काही प्रोजेक्ट्स मिळविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
 • तुमची फॉलोअर्स संख्या वाढविण्यासाठी तुमचे संपर्क क्षेत्र वाढविणे गरजेचे असते आणि जेवढे जास्त influencers तुमच्या संपर्कात असतील तेवढ्या जास्त विविध संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील.
 • तुमच्या चॅनेलवर गेस्ट पोस्ट करण्यासाठी या Influencer ला विनंती करा. अशाने तुमच्या चॅनेलची प्रसिद्धी व विश्वासहर्ता वाढीस लागेल. 
 • कोणतीही अपेक्षा न ठेवता काही खास प्रसंगी त्यांना भेटवस्तू, कुपन्स, प्रोमोकोड पाठवत राहा. 

खऱ्या आयुष्यात जसे मित्रांचा समूह वेळप्रसंगी आपल्याला मदत करतो त्याचप्रमाणे यशस्वी Influencers चा समूह तुमच्या पाठीशी असल्याने Influencer म्हणून नावारूपास येण्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होतो.

 • स्टेप : विविध इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर स्वतःचे मार्केटिंग करा

तुम्हाला आता नक्कीच कळाले असेल की Influencer होण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे लागेल. पण येथेच तुमचे काम संपणार नाही. जसे एखादे प्रॉडक्ट तयार झाल्यावर त्याचे योग्य मार्केटिंग करणे गरजेचे असते तसेच Influencer म्हणून तुमचा उदय होण्यासाठी तुम्हालाही वेगवेगळ्या डिजिटल माध्यमांवर स्वतःचे मार्केटिंग करावे लागते. जसे की आपण या अगोदरच पाहिले, जितके वेगळे प्लॅटफॉर्म तितके वेगळे फॉलोअर्स आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तुमच्या Niche मध्ये रुची असणाऱ्या फॉलोअर्सला तुमच्याशी जोडून ठेवल्याने तुमची फॉलोअर्स संख्या नक्कीच वाढत जाते. यासाठी खालील मोजक्या टिप्स उपयोगी पडू शकतात.

 • तुम्ही ज्या प्लॅटफॉर्म किंवा चॅनेलवर लक्ष केंद्रित केले आहे, त्या व्यतिरिक्त इतर कोणते प्लॅटफॉर्म तुम्ही वापरू शकता याचा अभ्यास करा.
 • त्या चॅनेल्सवर कोणत्या प्रकारचे कंटेन्ट हे प्रभावी ठरू शकतात या अनुषंगाने तुमचा कंटेन्ट तयार करा.
 • तुमच्या फॉलोअर्सला त्यांच्या इतर डिजिटल माध्यमांवर असणाऱ्या Circleमध्ये तुमच्या नावाची शिफारस करण्यास सांगा.
 • तुमचा परिवार, तुमचे मित्र, तुमचे सहकारी यांनाही तुम्ही करत असलेल्या कामाची माहिती वेळोवेळी देत जा. याने तुमचे नेटवर्क वाढीस लागेल व तुमची महती नकळत सर्वदूर पसरेल.
 • योग्य प्रकारे व प्रभावी डिजिटल मार्केटिंग कसे करावे, हे शिकून त्याप्रमाणे तुमचे कौशल्य, तुमची उपलब्धता लोकांपर्यंत व विविध ब्रॅण्ड्स पर्यंत पोहचवा.

ज्ञान हे साठवून ठेवल्याने कुजू शकते पण तेच ज्ञान इतरांना वाटल्याने ते फुलूही शकते. म्हणूनच स्वतःचे मार्केटिंग करताना कोणतीही लाज बाळगू नका. तुमच्या ज्ञानाचा कोणाला कुठे कसा उपयोग होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. एक प्रभावी व्यक्ती होण्यासाठी आधी तुमच्यातील प्रभावाची इतरांना माहिती होणे गरजेचे असते. 

शेवटी काय तर ….

ना एका रात्रीत Influencer तयार होतो ना की त्याचा प्रभाव…

एक यशस्वी Influencer होण्यासाठी तुमचा प्रवास कसा असू शकतो हे आपण अगदी सविस्तरपणे पाहिले आहे. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ या म्हणीप्रमाणे नुसते वाचून तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही तर त्यासाठी तुम्हाला योग्य ती कृती नक्कीच करावी लागेल.

कोणताही ब्रँड किंवा कंपनी Influencer म्हणून तुमच्या नावाचा तेव्हाच विचार करेल जेव्हा तुमची फॉलोअर्स संख्या, त्यांच्याशी तुमची Connectivity, त्यांचा response टाईम आणि तुमचा त्यांच्यावर असलेला योग्य प्रभाव यामुळे जर त्यांची सर्व्हिस किंवा एखादे प्रॉडक्ट याचा उत्तम खप होईल.

तुम्हाला जर स्वतःच्या कौशल्यावर विश्वास आणि खात्री असेल तर Influencer बनून महिन्याला समाधानकारक कमाई करण्याच्या हा मार्ग तुम्ही नक्कीच स्वीकारावा.

शेवटी म्हणतात ना – ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे’…प्रयत्न करण्यास काय हरकत आहे. संधीची वाट बघत राहणे आणि स्वतः संधी शोधणे यातला फरक ज्याला कळतो तोच यशाच्या शिखरावर पोहचतो.

Influencer कसे व्हावे यासाठीची आमची ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला कळवा तसेच कोणतीही शंका किंवा मार्गदर्शनासाठी आमच्याशी संपर्क साधा.

शेअर करा