फूड ट्रक व्यवसाय

आज शहरांची लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत चालली आहे त्यामुळे अनेक प्रकारचे व्यवसाय गरजेचे ठरू लागले आहेत. बाहेरून शिक्षण, नोकरी निमित्ताने शहरात येणारा मोठा वर्ग आहे आणि त्यामुळेही शहरातून रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, घरगुती डबे अश्या अनेक व्यवसायांची वाढ प्रचंड वेगाने होते आहे. त्यात आजकालच्या ट्रेंडमध्ये फूड ट्रकची भर पडली आहे. परदेशातून फूड ट्रक चांगलेच रुळले आहेतच पण भारतात सुद्धा आता चांगल्या संख्येने फूड ट्रक दिसू लागले आहेत.

जर तुम्हाला मनापासून पदार्थ बनविण्याची आवड असेल आणि तुमच्या हाताला चांगली चव असेल, परिचित, नातेवाईक यांच्यात तुम्ही बनवत असलेल्या पदार्थांचे चांगले कौतुक होत असेल तर तुम्हीसुद्धा हा व्यवसाय सुरु करण्याबाबत विचार करू शकता. रेस्टॉरंट सुरु करण्यापेक्षा हा व्यवसाय कमी गुंतवणूक करून सुरु करता येतो आणि योग्य प्रकारे नियोजन केले तर फायदेशीर सुद्धा ठरू शकतो.

फूड ट्रक मध्ये दोन पर्याय प्रामुख्याने दिसतात. एक छोटे ट्रक किंवा डबल डेकर ट्रक. हा व्यवसाय करतना ट्रक ही मुख्य गुंतवणूक असली तरी सुरवात भाड्याने ट्रक घेऊन किंवा सेकंड हँड ट्रक खरेदी करून करता येते त्यामुळे कमी पैसे गुंतवावे लागतात. तुम्ही ट्रक कुठे उभा करणार, कोणते खास पदार्थ देणार यावर या व्यवसायाचे यश अवलंबून आहे. अर्थात, त्यासाठी जाहिरात, प्रसिद्धीची जोड देता येते. सर्वमान्य जाहिराती आणि सोशल मीडियाचा कुशलतेने वापर त्यासाठी करून घेता येतो. आपला ब्रँड, लोगो वेबसाईट असेल तर जास्त प्रसिद्धी होते.

या व्यवसायासाठी काही परवाने घ्यावे लागतात. खाद्यपदार्थाशी संबंधित असल्याने नियमानुसार अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग याचे परवाने लागतातच पण ट्रक असल्याने वाहन विभागाचे काही परवानेसुद्धा आवश्यक ठरतात. त्याचबरोबर कामगार वर्ग लागतो. मुख्य म्हणजे शेफ लागतात तसेच डिलिव्हरी देणार असला तर डिलिव्हरी बॉईज लागतात. भागीदारीतसुद्धा हा व्यवसाय सुरु करता येतो.

कमी गुंतवणूक, कमी मनुष्यबळ आणि खाद्यपदार्थ विक्रीत असलेले प्रचंड मार्जिन म्हणजे नफा अधिक होतो हे खरे असले तरी काही आव्हाने सुद्धा पेलावी लागतात. त्यात मुख्य आव्हान आहे ते स्पर्धेचे! रास्त दरात उत्तम दर्जाचे पदार्थ विकताना सुरवातीला नफा थोडा कमी मिळतो. त्याचबरोबर हवामान, ट्रकसाठी चांगली जागा मिळविणे यासारखी आव्हानेही पेलावी लागतात. स्वच्छता राखणे ही महत्वाचे जबाबदारी असते आणि काटेकोरपणे तिचे पालन करावे लागते.

 अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

शेअर करा

Leave a Comment

error: Alert: Content is protected !!