अनेकांना आपण एखादा व्यवसाय सुरु करावा अशी इच्छा असते पण नक्की कोणता व्यवसाय निवडावा याचा निर्णय घेता येत नाही. कुणालाही करता येणारे अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. त्यासाठी लागणारे भांडवल कमी जास्त असू शकते तसेच प्रत्येक व्यवसायाच्या, जागा, उपकरणे यांच्या गरजा वेगळ्या असू शकतात. पण आपली आवड जपली जाईल आणि त्यातून काही कमाई करता येईल असेही काही व्यवसाय आहेत. त्यात सध्या वेगाने वाढत असलेल्या पाळीव प्राणी संदर्भातील व्यवसाय या दृष्टीने विचार करण्यासारखे आहेत. या व्यवसायातून काय मिळणार असे एखाद्याला वाटू शकते पण आजची विभक्त कुटुंबे, घरात एकच किंवा अजिबात अपत्य नसणे, ज्येष्ठ नागरिकांना एकेकटे राहण्यामुळे जाणवणारा एकटेपणा अश्या अनेक कारणांनी हे व्यवसाय चांगल्या वेगाने वाढत आहेत. पाळीव प्राण्यांशी संबंधित कोणते व्यवसाय करता येतात याची माहिती येथे घेऊ.
आज अनेक कुटुंबात एखादा पाळीव प्राणी विशेषतः कुत्रा पाळला जात आहे. घरातल्याची आवड म्हणून, कधी मुलांचे हट्ट म्हणून कुत्री, मांजरे, मासे पाळले जातात तर कधी घरी गुरेढोरेही पाळली जातात. पण हौस आणि आवड म्हणून जे पाळीव प्राणी पाळले जातात ते त्या कुटुंबाचा एक घटक असल्याप्रमाणे त्यांना वागविले जाते त्यांची काळजी घेतली जाते. त्यामुळे घरातील सदस्य स्वतःसाठी जशी काही वस्तूंची खरेदी करतात त्याप्रमाणे या पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा खास खरेदी केली जाते. आजकालचे ट्रेंड्स पाहिले तर ऑर्गेनिक फूड, होमिओपॅथी उत्पादने, घड्याळे, मोबाईल, शूज सारख्या चैनीच्या महागड्या वस्तू खरेदीचे प्रमाण वाढते आहे. तशीच खरेदी या पाळीव प्राण्यांसाठी केली जाते.
अति श्रीमंत आणि पाळीव प्राण्यांची आवड असलेल्या कुटुंबातून तर त्यांच्या पेट्स साठी ब्युटी पार्लर, फॅशन शो मध्ये त्यांचा सहभाग, नटण्या मुरडण्यासाठी विविध कपडे, बूट, स्पा यांचीही सेवा घेतली जाते. भारताचा विचार करायचा तर येथे पेट केअर मार्केट जगात सर्वाधिक वेगाने वाढणारे मार्केट असून पेट फूड, औषधे, त्यांचा सांभाळ, खेळणी व अन्य एक्सेसरीज अश्या सर्व श्रेणीत ही वाढ दिसून येत आहे. आज मितीला भारतात किमान २ कोटी पाळीव कुत्री आहेत आणि त्यांच्यासाठी जे तयार अन्न विकत घेतले जाते त्याची बाजारपेठ उलाढाल वर्षाला १२०० कोटींची आहे. पेट फूड व्यवसाय वेगाने वाढत असल्याची माहिती प्रसिध्द पेट फूड कंपनी पेडिग्रीचे कंट्री मॅनेजर जिया उल हक यांनी दिली आहे.
भारतात घरात सांभाळल्या जाणाऱ्या अन्य पाळीव प्राण्यांची संख्या १ कोटी ९० लाखाच्या घरात आहे. तर दरवर्षी सरासरी ६ लाख प्राणी दत्तक घेतले जातात. त्यामुळे पाळीव प्राणी संबंधित व्यवसाय दर वर्षाला १३.९ टक्क्यांनी वाढत चालला असून २०२० मध्ये तो २७८ कोटींवर जाईल असा अंदाज वर्तविला जात आहे. नागरीकरण, विभक्त कुटुंबांची वाढत चाललेली संख्या, आणि पाळीव प्राणी व त्यांच्या मालकांकडे पाहण्याची समाजाची बदललेली दृष्टी ही त्यामागची कारणे मानली जात आहेत.
पेट फोटोग्राफी
पाळीव प्राण्यांचे फोटो काढणे हा एक वेगाने वाढणारा व्यवसाय बनला आहे. ज्यांना फोटोग्राफी चांगली अवगत आहे आणि ज्यांना पाळीव प्राण्यांची आवड आहे त्यांच्यासाठी हा व्यवसाय पैसे देणारा आहेच पण तो आनंद देणाराही ठरू शकतो. ज्यांच्याकडे हे दोन्ही आहे त्यांनी या व्यवसायाचा विचार नक्की करायला हरकत नाही. व्यवसाय फुल टाईम करायचा का फावल्या वेळेत करायचा हा निर्णय तुम्ही घेऊ शकता. या व्यवसायासाठी तुमचे ग्राहक अनेक प्रकारचे आहेत. म्हणजे कुत्री, मांजरे, सरपटणारे प्राणी, पक्षी, मासे, ससे, घोडे असे हे विशाल क्षेत्र आहे.
सुरवात घरातच स्टुडिओ व्यवस्था करून करता येईल. पेट्स शॉप्स किंवा पेट्स संबंधित अन्य व्यवसाय करणाऱ्यांची मदत तुम्हाला प्रसिद्धी साठी करून घेता येईल. तुम्ही काढलेले पेट्सचे फोटो एकदा का त्यांच्या मालकांना पसंत पडले की तोंडी प्रसिद्धी अपोओप होते. पण पेट्स साठी विविध प्रकारचे ड्रेस, थीम पडदे, व्हिडीओ टेपिंगची सुविधा, त्यात संगीत, टायटल्स, स्पेशल इफेक्ट्सचा वापर अश्या कल्पना लढवून तुम्ही ते आकर्षक, मनोरंजक बनवू शकता. तुमच्या व्यवसायाचा नफा वाढविण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा मिळेल.
याशिवाय पेट फोटोग्राफिक इमेजेस म्हणजे काही खास वस्तूंवर पेटचे फोटो छापून देऊन या व्यवसायाचा विस्तार करता येतो. त्यात किल्ल्या, ग्रीटिंग कार्ड्स, कॅलेंडर्स, मग्ज, टोप्या, टी शर्ट, स्पोर्ट्स बॅग, स्टीकर्स अश्या अनेक वस्तू पेटचे फोटो छापून देण्यासाठी वापरता येतील.
पेट्स ड्रेस आणि एक्सेसरीज (Pet Stores)
तुमच्याकडे डिझायनिंगचे थोडे कौशल्य, शिवणकामाची माहिती असेल आणि शिवणयंत्र असेल तर तुम्ही पाळीव प्राण्यांसाठी विविध ड्रेस डिझाईन करणे, शिवणे हा व्यवसाय करू शकता. जोडीला आजकाल खुपच ट्रेंड मध्ये असलेले कुत्री मांजरांचे स्वेटर्स, रेनकोट यांची विक्री करू शकता. या वस्तूंना आज सर्वाधिक मागणी आहे. जगभरातील कुत्रेप्रेमी डिझायनर डॉगी हॅटस, गॉगल्स, शर्ट, बूट, स्कार्फ इतकेच काय पण खास सणांसाठी खास कपडेही मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसत आहेत.
तुमच्या कडे वरील कौशल्ये असतील तर तुम्ही तुमची डिझाइन्स धाडस करून पेट शॉप रिटेलर्स पर्यंत पोहोचवू शकता. हाच व्यवसाय वाढवायचा असेल तर होलसेल चेन्स, स्वतंत्र पेट शॉप्स, रिटेलर्स यांच्यापर्यंत पोहोचणे हा मार्ग आहे. अन्यथा कुत्री मालकांशी संपर्क करून त्यांना विकू शकता. मालकांपर्यंत पोहोचण्यासाठी पेट जत्रा, ऑनलाईन सेल, पेट संदर्भातील मासिकातून जाहिराती, पेट संबंधातल्या वेबसाईट वर जाहिराती, कॅटलॉग, घरातच किंवा जागा घेऊन बुटिक सुरु करणे असे मार्ग आहेत. एकदा का तुमची उत्पादने पेट मालकांच्या पसंतीस उतरली की माउथ पब्लिसिटी आपोआप होते.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
पाळीव प्राणी सांभाळणे
तुम्हाला कदाचित खरे वाटणार नाही पण पाळीव प्राण्यांचा सांभाळ करणे हा सुद्धा एक फायदेशीर व्यवसाय आहे. काही कारणाने ज्यांच्या घरात पाळीव प्राणी आहेत त्यांना अचानक बाहेर जाण्याची वेळ येते, कधी काही कार्यक्रम असतो, कधी अडचणीची परिस्थिती असते, कधी गावाला जावे लागते, अशा वेळी प्राणी, मित्र किंवा अन्य परीवारांकडे सोडणे अवघड बनते. सांभाळायला अति नाजूक (उदहारण द्यायचे तर पक्षी), किंवा आजारी असतील तर त्यांची काळजी घेणे हे आणखी अवघड असते.
अशा परिस्थितीत प्राणी मालकांना त्याचे आवडते पेट घरातच ठेवावे अशी इच्छा असते. त्यामुळे संबंधितांच्या घरी जाऊन त्या प्राण्यांची काळजी घेणे हा व्यवसाय लोकप्रिय पर्याय ठरतो आहे. बेबी सिटींग प्रमाणे हा व्यवसाय करता येतो. छोट्या प्रमाणावर हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही स्वतः पेट सिटर म्हणून हा व्यवसाय पूर्ण वेळेचा व्यवसाय म्हणून करू शकता. व्यवसाय वाढवायचा असले तर तुम्हाला आणखी काही व्यक्तींची गरज लागेल जे असे काम करू शकतात. त्यांना तुम्ही कामावर ठेऊ शकता किंवा त्यांच्याशी काही मुदतीचे करार करू शकता.
यासाठी तुम्ही ज्या उमेदवारांची निवड कराल ते प्राणी प्रेमी असावेत हे पाहिले पाहायला हवे, निवृत्त झालेले लोक, विद्यार्थी हे काम नक्की करू शकतात. या सेवेची माहिती प्राणी मालकांना कळावी यासाठी पाळीव प्राणी संबंधित व्यावसायांची मदत जाहिरात करण्यासाठी घेता येते. तसेच पशु डॉक्टर, पाळीव प्राणी विक्री दुकानदार, कुत्री प्रशिक्षक, कुत्री फिरविणारे, प्राणी ब्युटी पार्लर यांचीही मदत होऊ शकते. ही सेवा देताना थोड्या काळासाठी, तासांवर, वीक एंड साठी, रात्रीपुरते यावर आधारित दर किंवा शुल्क ठरविता येते.
डॉग डे केअर
लहान मुलांसाठी जशी पाळणाघरे तशी पाळीव प्राण्यासाठी डे केअर ही संकल्पना खुपच लोकप्रिय ठरली आहे. विशेषतः ज्यांच्या घरी कुत्रा पाळला जातो ते, कामावर जातात आणि घरात कुणी नसते तेव्हा कुत्र्याला एकटे घरात ठेवण्यापेक्षा डे केअरचा मार्ग निवडतात. कुत्रा हा प्राणी माणसाप्रमाणे सोशल आहे. म्हणजे त्याला माणसात किंवा अन्य कुत्र्यांच्या सहवासात राहणे आवडते. यामुळे कुत्र्याला चांगल्या सवयी लागतात. डे केअर आणि केनल यात गफलत करू नये. केनल मध्ये होस्टेल प्रमाणे काही दिवसांसाठी कुत्री राहायला पाठविली जातात. पण डे केअर म्हणजे सकाळी सोडणे आणि सायंकाळी किंवा काही तासानंतर त्याला परत घरी घेऊन जाणे.
तुमच्याकडे पुरेशी जागा असेल आणि कुत्रांच्या भूंकण्यावरून कटकट करणारे शेजारी नसतील तर हा व्यवसाय तुम्ही घरच्या घरी करू शकता. भाड्याने मोठी मोकळी जागा घेणे हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे कुत्राना स्पा, पाणी, कुंपण घातलेली मोकळी जागा, त्यांच्या घराप्रमाणे आरामाच्या सुविधा देता येतात. थोडा अधिक खर्च करायची तयारी असेल तर या जागी वेबकॅमेरे बसवून कुत्री मालकांना त्याच्या कामाच्या ठिकाणावरून त्यांची कुत्री कशी आहेत हे वेबसाईट लॉग करून पाहण्याची सुविधा देऊ शकता.
डे केअरचे सध्याचे दर तासाला २०० ते ५०० रुपये असे आहेत. २४ तासासाठी साधारण ७५० ते हजार रुपये आकारले जातात. तुम्ही तुमच्या डे केअर ग्राहकांना आठवडाभरासाठी, महिन्यासाठी या प्रकारे शुल्कात थोडी सवलत देऊ शकता.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
कुत्री फिरविणे (Dog walking)
तुमच्याकडे मोकळा वेळ आहे, पेशन्स आहे आणि कुत्र्यांची आवड आहे तर हा व्यवसाय तुम्ही विचारात घेऊ शकता. त्यासाठी अगदी कमी म्हणजे ३ ते ४ हजार रुपये गुंतवावे लागतील. घरात सांभाळल्या जाणाऱ्या कुत्र्यांना दररोज घराबाहेर फिरायला नेणे आवश्यक असते. हा व्यवसाय करायची इच्छा असणारे एकावेळी तीन ते चार कुत्र्यांना एकदम फिरायला नेऊ शकतात. त्यासाठी वॉकिंग डॉग कॉलर्स, अनेक प्रकारच्या लीशेस म्हणजे दोऱ्या, मिळतात. यामुळे गुंता न होता एकावेळी तीन ते चार कुत्री फिरायला नेता येतात. भारतात कुत्री फिरायला नेण्याचा ताशी दर १०० ते २०० रुपये आहे.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
कुत्रांसाठी मेजवानी तसेच हेल्दी फूड व्यवसाय
आपल्या पाळीव प्राण्यांसाठी उत्तम चवीचे, दर्जेदार आणि आरोग्यपूर्ण अन्नपदार्थ खरेदी करण्याकडे प्राणी मालकांचा कल वाढत चालला आहे. कुत्रांच्या मेजवान्यांवर खूप पैसा खर्च केला जात आहे. त्यामुळे असे तयार अन्न खरेदी करण्याचे प्रमाण वाढते आहे. या व्यवसायात नफ्याचे प्रमाण मोठे आहे.
आजकाल लोक जसे स्वतःच्या खाण्यापिण्याबाबत जागरूक आणि हेल्थ कॉन्शस आहेत तशीच काळजी ते त्याच्या लाडक्या प्राण्यांसाठी घेऊ लागले आहेत. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने बनविले गेलेले खाद्य, बिस्किटे याना प्राधान्य दिले जात आहे. असे खाद्य किंवा बिस्किटे बाजारात सर्रास मिळणाऱ्या पेट फूड पेक्षा तिपटीने महाग आहेत.
कुत्रांसाठी मिळणारी बिस्किटे घरात बनविणे सहज शक्य आहे. ही बिस्किटे बनविण्याची कृती नीट समजावून घेतली की अशी बिस्किटे बनविता येतात. अर्थात त्यासाठी बिस्किटांचे विविध आकाराचे साचे किंवा मोल्ड (हाडाचे आणि मांजराचे आकार आजकाल ट्रेंड मध्ये आहेत) लागतील. त्याचबरोबर या उत्पादनासाठी आकर्षक नाव, पॅकिंग साहित्य हवे.
ही बिस्किटे विक्रीसाठी खुप पर्याय आहेत. तुम्ही स्वतंत्रपणे ही विक्री करू शकता तसेच ऑनलाईन चेन, पेट रिटेलर्सना होलसेल प्रमाणावर विकू शकता. पेट प्रोडक्ट बाजार, पेट जत्रा अशी अन्य ठिकाणे ट्राय करू शकता. तुमची बिस्किटे एकदा का कुत्र्यांच्या पसंतीस उतरली की तुमच्या बिस्किटांची तोंडी जाहिरात कुत्र्यांचे मालकच करू लागतात असाही अनुभव येतो.