शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन. त्यालाच व्यवहारामध्ये पोल्ट्री फार्म असे म्हणतात.
शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. त्या मोकळ्या सोडल्यामुळे मांजरासारखे प्राणी किंवा घार, गिधाड असे पक्षी यापासून त्यांना धोका असतो. परंतु गावरान कोंबड्यांमध्ये त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे गावरान कोंबड्या मोकाट सोडल्या तरी चालतात.
घरच्या परसामध्ये किंवा अंगणात, घराच्या आसपास अशा दहा-वीस कोंबड्या पाळल्या की, त्या स्वत:चे अन्न स्वत: शोधून खातात. दहा माद्यांमागे एखादा कोंबडा असला की, कोंबडींना पिलेही होतात आणि त्यांची पैदास वाढत राहते. कोंबडी पालनामध्ये व्हाईट लेगहार्न किंवा अन्य काही नवनव्या जातींच्या कोंबड्या मात्र मोकाटपणे पाळता येत नाहीत. त्यांच्यासाठी पिंजरा तयार करावा लागतो. कारण या कोंबड्यांमध्ये स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता नसते. जर्सी गायींप्रमाणेच या सुधारित जातीच्या कोंबड्या प्रकृतीने नाजूक मात्र जास्त अंडी देणार्या असतात. त्यांची काळजी घ्यावी लागते, वेळेवर औषधपाणी करावे लागते. पण एवढी काळजी घेतली की, त्या भरपूर अंडी देतात.
गावरान कोंबडीचे मात्र असे नाही. तिला ना औषध लागते ना पाणी. तिची फारशी निगराणीही करावी लागत नाही. परंतु जसे बाजारात हायब्रिड बियाणांपासून तयार झालेल्या भाज्या आणि धान्यापेक्षा परंपरागत धान्यांना आणि भाज्यांना मागणी असते तशीच अंडी खाणार्यांकडून पिंजर्यातल्या कोंबड्यांपेक्षा गावरान कोंबड्यांच्या अंड्यांना जास्त मागणी असते. त्यांना दरही जास्त मिळतो.
विशेष म्हणजे गावरान कोंबड्या पाळण्यासाठी फारसा खर्च करावा लागत नाही. त्यांचीच पिली तयार होतात आणि त्यांची संख्या वाढत जाते. पिंजर्यातल्या कोंबड्यांच्या बाबतीत मात्र कोंबड्यांची एक पिढी संपली की, नव्याने छोटी छोटी पिली विकत आणावी लागतात. गावरान कोंबड्यांचे पालन किफायतशीर असले तरी जोपर्यंत कोंबड्यांची संख्या दहा-वीस पर्यंत मर्यादित असते तोपर्यंतच मोकाट कोंबडी पालन करता येते. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा झाल्यास मोकाट कोंबडी पालन शक्य होत नाही.
कोंबडी पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर याचा अर्थ काय ? कदाचित आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही. कारण आपल्या देशामध्ये काही शेतकरी हा व्यवसाय १००-२०० कोंबड्या पाळून करत असतात. काही सहकारी संस्था या क्षेत्रात उतरलेल्या आहेत आणि त्या दहा हजार ते वीस हजार कोंबड्या पाळत असतात. परंतु आंध्र प्रदेशामध्ये विशेषत: हैदराबादच्या परिसरात कोंबडी पालनाचा व्यवसाय करणारे कोंबडीपालक लाख लाख कोंबड्या पाळत असतात आणि काही अरबी देशांमध्ये तर दहा-दहा लाख कोंबड्या पाळणारे कोंबडी पालक आहेत. तेव्हा हा व्यवसाय किती मोठा करता येतो याची यावरून कल्पना येईल.
कोंबडी पालनातील पथ्ये
कोंबडी पालन व्यवसायाला खूप वाव आहे. आपल्या देशामध्ये लोकांचे राहणीमान वाढत चालले आहे. ते जसजसे वाढत जाईल तस तसे त्यांचे खाणे-पिणे सुधारत जाणार आहे आणि त्यांच्या हातात पैसा यायला लागला की, तो पैसा चांगल्या चुंगल्या खाण्या-पिण्यावर खर्च होणार आहे हे नक्की. अगदीच दारिद्य्र रेषेखालील जीवन जगणार्या माणसाला मिळेल ती चटणी-भाकरी खाऊन जगावे लागते. पण त्याच्या हातात चार पैसे आले की तो भाजी, डाळी, दूध यांचा वापर करायला लागतो. त्यांच्याकडून ङ्गळांची आणि मटणाची मागणीही वाढायला लागते. त्यामुळे कोंबडीचे मांस आणि अंडी यांचा वापर आणि मागणी वाढत जाणार आहे.
कोंबड्या पाळल्यास अंडी खपतील की नाही, असा काही प्रश्न उद्भवत नाही. अंडी खपत आहेत आणि कोंबड्याही खपत आहेत. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांवर सुद्धा अंड्याचे आम्लेट आणि चिकन मोठ्या प्रमाणावर विकले जात असते ते तर आपण पहातच आहोत. गेल्या ३० वर्षांपासून कोंबड्यांची अंडी आणि मांसल कोंबड्या यांची मागणी सातत्याने वाढत चालल्यामुळे अंड्याच्या उत्पादनात साडेपाच टक्के तर कोंबड्यांच्या उत्पादनात साडेबारा टक्के वाढ दरसाल झालेली आहे.
कोंबड्या पाळण्याच्या व्यवसायामध्ये सध्या भारतात १५ लाखांपेक्षाही जास्त लोक गुंतलेले आहेत. परंतु शेळी पालन आणि कोंबडी पालन या दोन व्यवसायामध्ये एक छोटासा फरक आहे. शेळी पालनात प्रामुख्याने शेळी किंवा बोकडच विकला जातो आणि हा विक्रीचा व्यवहार अधूनमधून करावा लागतो. कोंबड्यांच्या व्यवसायामध्ये मात्र अंड्यांची विक्री दररोज करावी लागते. म्हणजे विक्री व्यवहार हा रोजचा व्यवहार असतो.
या दोन व्यवसायातला आणखी एक मोठा फरक म्हणजे शेळ्यांचा व्यवसाय फारसा नाजूक नाही. कोंबड्यांचा मात्र थोडासा नाजूक आहे. तेव्हा कोंबड्या पाळताना कोंबड्यांचे रोग, त्यांची औषधे आणि उपचार यावर शेळ्यांपेक्षा थोडे जास्त लक्ष द्यावे लागते. भारतामध्ये अजूनही दरमहा सरासरी दरडोई ६०० ग्रॅम मांस खाल्ले जाते. अमेरिकेत आणि चीनमध्ये हे प्रमाण फारच आहे. पण जागतिक सरासरी सुद्धा भारतापेक्षा किती तरी जास्त आहे. जगामध्ये दरमहा दरडोई साडेदहा किलो मांस खाल्ले जाते. अंड्यांची स्थिती अशीच आहे. भारतात दरवर्षी दरमाणशी ३६ अंडी खाल्ली जातात. पण याबाबतीत जगाची सरासरी १५० अंडी एवढे आहे.
शहरांमध्ये अंडी आणि मांस विकणे सोपे जाते. त्यामुळे जे काही थोडे लोक या व्यवसायात गुंतलेले आहेत ते मांस विक्रीची आणि अंडी विक्रीची सेवा प्रामुख्याने शहरामध्येच पुरवताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण भागातले मांसाचे मार्केट अजून म्हणावे तसे वापरले गेलेले नाही. ग्रामीण भागात मटण किंवा चिकन म्हणाव्या तेवढ्या सहजतेने उपलब्ध होत नाही. तेव्हा कोंबडी पालनाच्या व्यवसायात शिरणार्यांनी अजूनही ग्रामीण भागातल्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले तर त्यांना चांगले मार्केट मिळू शकेल.
हा व्यवसाय हा शेळी पालनापेक्षा थोडा नाजूक आहे हे खरे. परंतु त्यामुळे तो करणे फार अवघड आहे असे काही नाही. योग्य ती दक्षता घेतली की, हे नाजूक काम सुद्धा पार पडते. शेतकर्यांच्या तरुण मुलांसाठी हा व्यवसाय फार उत्तम आहे. शिवाय घरच्या घरी या व्यवसायाचे महिलांकडून सुद्धा व्यवस्थापन होऊ शकते. ज्यांना या व्यवसायात पडण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या जवळपासच्या तालुक्याच्या ठिकाणी कुक्कुट पालनाचे अभ्यासक्रम होत असतात, त्या अभ्यासक्रमांना जरूर प्रवेश घ्यावा. अभ्यासक्रम कोठे आणि कसे भरवले जातात याची माहिती अनेकदा वृत्तपत्रात सुद्धा छापून येत असते. तिच्यावर लक्ष ठेवावे आणि या उपरही अधिक माहिती हवी असल्यास पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या पशु संवर्धन अधिकार्यांशी संपर्क साधावा.
काही शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करण्याची इच्छा आहे. अशा शेतकर्यांना कोंबडी पालनाची अगदी प्राथमिक सुद्धा माहिती नसेल तर त्यांनी एकदम मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय न केलेला बरा. छोट्या प्रमाणावर आधी सुरुवात करून या धंद्याचे स्वरुप, त्यातल्या कामांचे वेळापत्रक आणि तो करताना येणार्या व्यावहारिक अडचणी या सगळ्यांची माहिती छोट्या प्रमाणावरच्या व्यवसायातून करून घ्यावी. त्या अडचणींवर कशी मात करावी, याची प्रत्यक्षात माहिती आणि अनुभव घ्यावा आणि नंतरच मोठ्या प्रमाणावरच्या व्यवसायाला हात घालावा. अन्यथा काहीच माहीत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावरच्या व्यवसायात मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.
पूर्वीच्या काळी कोंबडी पालन व्यवसाय म्हटल्याबरोबर लोक सबुरीचा सल्ला देत असत. कारण पिंजर्यात पाळलेल्या कोंबड्यांना एखादा साथीचा रोग झाला की, पटापट सगळ्याच कोंबड्या मरून जातात, असा प्रवाद होता. परंतु आता बर्ड फ्लू असा एक विकार वगळता अन्य कसल्याची आजाराची भीती राहिलेली नाही आणि अशा साथीच्या आजारात पटापट सगळ्याच कोंबड्या एकदम मरून गेलेल्या आहेत असे कोठे ऐकिवात आलेले नाही. औषधोपचारामुळे हे शक्य झालेले आहे.
कोंबडीच्या व्यवसायापासून सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने एक फायदा चांगला होतो. तो म्हणजे कोंबडीचा खत. कोंबड्या पाळलेल्या पिंजर्यामध्ये जमिनीवर शेंगांचा भुसा अंथरलेला असतो आणि कोंबड्यांचे मलमूत्र त्या भुश्यातच मिसळून भुश्याचा पूर्ण भुगा होऊन जातो. हा मलमूत्रयुक्त भुगा सेंद्रिय खत म्हणून अतिशय उपयुक्त असतो. १५-२० वर्षांसाठी याविषयी लोकांना फार माहिती सुद्धा नव्हती. परंतु आता मात्र या खताचे महत्व कळलेले आहे आणि चढाओढीने हा खत विकत घेतला जात आहे. कोंबडी पालन व्यवसाय करणार्यांना हा खत आपल्या शेतात वापरता येईल. पण शेत नसेल तर हे खत हा सुद्धा एक उत्पन्नाचा मार्ग होईल.
कुक्कुट पालन कशासाठी ?
कुक्कुट पालन हा व्यवसाय करण्याआधी आपण तो कशासाठी करणार आहोत हे ठरवले पाहिजे. तो दोन प्रकारांनी केला जातो. पहिला प्रकार म्हणजे अंड्यांसाठी आणि दुसरा प्रकार मांसासाठी. आपल्या ज्या कारणासाठी हा व्यवसाय करायचा असेल त्या प्रकारासाठी कोणत्या जातींच्या कोंबड्या पाळाव्यात हे ठरत असते.गावठी कोंबड्या अंड्यांसाठी पाळल्या जातात आणि त्याच मांसासाठीही विकल्या जातात. त्यांच्या अंड्यांना आणि कोेबड्यांनाही चांगली किंमत मिळते पण अशा कोंबड्या फार मोठ्या प्रमाणावर पाळता येत नाहीत आणि त्यांना काही मर्यादा आहेत.
अंड्यांसाठी व्यवसाय करणे असल्यास त्यासाठी आर आय आर (र्होड आइलँड रेड) या जातीची शिफारस केली जाते. कारण ही कोंबडी एका चक्रात २२० ते २५० अंडी देते. तसेेच खालील जाती वापरण्याचा सल्ला दिला जातो. ब्लॅक ऍस्ट्रोलॉर्प ( तिची वाढ तीन महिन्यांत २ किलो पर्यंत होते. ती त्या मानाने अंडी कमी देते. त्या शिवाय देहलम रेड ही कोंबडी वर्षाला २०० ते २२० अंडी देते. ग्रामप्रिया, गिरीराज, वनराज याही काही गावरान कोंबड्यांच्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत. कडकनाथ ही एक कोंबडी सध्या औषधी म्हणून नावाजली आहे. तिची वाढ फार कमी आहे पण अंडी औषधी असल्याने फारच महाग विकली जातात.
हा व्यवसाय मोकाटपणे करायचा असेल तर घरट्याचा काही प्रश्न नाही आणि खाद्याचाही काही सवाल नाही पण या कोंबड्यांना रात्री निवारा लागतो. तो साधा असला तरी चालतो. एका मोठ्या टोपल्याखाली त्यांना रात्रभर डांबून ठेवले तरी चालते
पण आपण मांसासाठी आणि अंड्यांसाठी सुधारित जातींच्या कोंबड्या मोठ्या प्रमाणावर सांभाळणार असू तर त्यासाठी मोठे खुराडे लागते. चांगले बांधकाम केलेले खुराडेही चालेल किंवा फार गुंतवणूक करायची नसेल तर एका पक्ष्याला एक ते दीड चौ. फूट या मापाने खुराड्याचा आकार ठरवावा. म्हणजे शंभर पिले पाळणार असू तर साधारणत: १५ फूट लांब आणि १० फूट रुंद एवढ्या जमिनीवर खुराडे उभे करावे. उतरत्या छताचे खुराडे असावे. त्याची भिंतीकडील उंची ८ ते १० फूट आणि मध्यभागातली उंची १२ फुटापर्यंत असावी. वर पत्रेे असले तरी चालतील पण चारही बाजूंच्या भिंतीची उंची २ ते ३ फूट असावी. तिच्यावर विेशिष्ट प्रकारची जाळी लावलेली असावी. या बंदिस्त शेड जवळच एका मोकळ्या जागेत केवळ जाळी मारलेली असावी म्हणजे पक्ष्यांना काही काळ मोकळे फिरता येईल. जमीन कोबा केलेली असावी किंवा फरशी असावी. फरशीवर भाताचा किंवा शेंगांचा भुसा अंथरून त्यावर पक्षी सोडावेत.
साधारणत: एक दिवसांची पिली आणून व्यवसाय सुरू केला जातो. ही पिली यांत्रिक पद्धतीने उबवलेली असल्याने त्यांना हवी असलेली आईच्या शरीराची नैसर्गिक ऊब मिळत नाही. म्हणून त्यांना पहिले तीन आठवडे ऊब देण्यासाठी बू्रडरमध्ये ठेवले जाते. तीन आठवड्यांनी त्यांना पंख फुटतात आणि त्यांच्या शरीरात ऊब निर्माण व्हायला लागते. तेव्हा त्याला मोकळ्यावर सोडावे. २४ आठवड्यांनी ती अंडी द्यायला लागतात आणि ७२ व्या आठवड्यापर्यंत अंडी देत राहतात. मात्र खुराड्याचे वातावरण गरम राहिले पाहिजे यावर लक्ष ठेवण्याची गरज असते.
कोंबड्यांत रोगराई असते. तिला सांभाळले पाहिजे. या बाबत दोन गोष्टी कराव्यात. पहिली म्हणजे पूर्व काळजी आणि दुसरी म्हणजे औषधोपचार. कोंबड्यांना कसलाही प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काही पथ्ये पाळावी लागतात. मुळात आपण जे पिलू विकत घेणार आहोत ते निरोगी असले पाहिजे. ते तसे नसेल तर त्याला त्या अवस्थेत मरेक्स ही लस दिली जाते. शिवाय इलेक्ट्रोल पावडर युक्त पाणी पाजावे लागते. त्यांना वाढीच्या कोणत्या काळात कोणत्या प्रकारचे खाद्य द्यावे याचे वेळापत्रक जनावरांच्या डॉक्टरांकडून समजून घ्यावे. अशा गोष्टी प्रशिक्षणात शिकवल्या जात असतात.
कोंंबड्यांच्या काही लसी आवश्यक आहेत. त्यात लासोटा, फौलपॉक्स बूस्टर, गंभोरो, ही औषधे तसेव जीवनसत्त्व युक्त मिश्रणेही वेळोवेळा दिली जात असतात. पिली मोठी व्हायला लागली की ती भांडतात आणि एकमेकांना चोचीने टोचून जखमी करायला लागतात. तेव्हा त्यांच्या चोचींचा अणकुचीदार कमी करण्याइतपत कटिंग करावी लागते.
आपल्या मालकीच्या खुराड्यात शक्यतो बाहेरच्या लोकांना प्रवेश देऊ नये. त्याच्या पायांनी काही रोगजंतू येत असतात. एखाद्याला आत सोडणे आवश्यकच असल्यास त्याची पादत्राणे बाहेर सोडायला लावावे.
कोंबड्याच्या खाद्याची आणि पाण्याची भांडी नेहमी साफ करावीत. त्यात त्यांना आपली विष्ठा टाकता येऊ नये असे त्यांची रचना असावी पण तरीही ती भांडी वेळोवेळी साफ करावीत.
एखादा पक्षी आजारी पडला आहे असे दिसले तर त्याला ताबडतोब बाहेक काढावे. पूर्ण खुराडे निर्जंतुक करून घ्यावे. पक्ष्यांची एक बॅच संपून दुसरी बॅच टाकायची असल्यास खाली अंथरलेला भुसा पूर्ण बदलून घ्यावा. खुराडे स्वच्छ धुऊन घ्यावे आणि निर्जंतुक करून घ्यावे.
साप, मुंगूस, मांजर, कुत्रा हे कोंबड्यांचे शत्रू असतात. त्यांना आत शिरता येणार नाही अशीच खुराड्याची रचना असावी.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खाद्य. कुक्कुट पालनाच्या व्यवसायाचे अर्थशास्त्र त्यांच्या खाद्यावर अवलंबून असते. तेव्हा खाद्याचा बारकाईने विचार केला पाहिजे. योग्य ते खाद्या वाढीच्या योग्य त्या अवस्थेत त्यांना मिळालेच पाहिजे. शिवाय ते चांगले, सकस पण किफायतशीर भावात कसे मिळवता येईल यावर लक्ष ठेवावे.