मत्स्यशेती

मत्स्यशेतीचा प्रारंभ

मत्स्यशेती ही फायदेशीर तरीही काहीशी किचकट प्रक्रिया आहे. पुरेशा प्रमाणात आर्थिक गुंतवणुकीसह पाण्याची उपलब्धता ही या व्यवसायाची प्राथमिक गरज आहे. हा व्यवसाय सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणावर उभा करण्यापेक्षा मर्यादित स्वरूपात सुरु करणे अधिक फायदेशीर ठरते. प्रतिसाद आणि क्षमता वाढवत व्यवसायाचे स्वरूप वाढविणे अधिक योग्य ठरते.

भारतातच नवे तर जगभरात मासे हे प्रमुख खाद्य आहे. माणसाच्या शरीराला असलेली प्रथिनांची (प्रोटीन) गरज माशांच्या सेवनाने पूर्ण होऊ शकते. आज घरच्या घरी मत्स्यशेतीचा व्यवसाय सुरू केल्याने अनेक संधी निर्माण होत आहेत. या माशांसाठी जवळील हॉटेल्स अथवा जवळपासचे नागरीक हे अपेक्षित ग्राहक ठरू शकतात.

मत्स्यशेती व्यवसाय योजना

मस्त्यशेतीची व्यवसाय म्हणून निवड करताना हा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू करायचा की मोठ्या स्तरावर, हा निर्णय घेणे आवश्यक आहे.  मत्स्यशेतीसाठी सातत्यपूर्ण पाणीपुरवठा आवश्यक आहे. महापालिका अथवा अन्य कायमस्वरूपी स्रोतांसह पर्यायी व्यवस्था करून ठेवणेही आवश्यक आहे.  .
मस्त्यशेती करताना किफायतशीर आणि बाजारपेठेत मागणी असणाऱ्या प्रजातींची माहिती करून घेतली पाहिजे.

व्यवसायाचा प्रकल्प अहवाल

उद्योगासाठी आराखडा अथवा प्रकल्प अहवाल तयार करणे आवश्यक आहे. या अहवालात व्यवसायाबाबतच्या सर्वांगीण माहितीचा समावेश असतो. अचूक प्रकल्प अहवालाच्या आधारे गुंतवणूकदार किंवा बँकांकडून निधी मिळणे सुलभ होते. गुंतवणुकीच्या आकडेवारीसह विपणनाची योग्य योजना, व्यवसायाच्या प्रसिद्धीचे मार्ग, विक्री व्यवस्था आणि नफ्याबाबतचे आडाखे याचा स्पष्ट उल्लेख प्रकल्प अहवालात आवश्यक आहे.

माशांच्या प्रजातीची निवड

मत्स्यशेतीसाठी माशांच्या प्रजातींची निवड करणे फार आवश्यक आहे. माशांच्या प्रजातींची निवड अनेक घटकांवर अवलंबून असते. उपलब्धता, बाजारपेठेतील मागणी, किंमत, स्थानिक सुविधा, देखभाल हे त्यातील महत्वाचे घटक आहेत.

भारतात उपलब्ध असलेल्या प्रजातींपैकी रोहू, कटला, मुर्रेल, पुलासा, कॅटफिश (शिंगाडा), कोई फिश, ट्युना, सिल्वर कार्प, ग्रास कार्प, म्रिगल, रिव्हरईल (वाम), सॅलोमन (रावस), हिल्सा माशांना विशेष  विविध प्रजाती आहेत. कोणत्याही हवामानात या माशांची वाढ होते. एकाच तळ्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक प्रकारचे मासे वाढविता येतात. आपल्या जवळच्या शासकीय अथवा खाजगी मत्स्य विभागातून हे सर्व मासे आणि त्यांची पिल्ले उपलब्ध होऊ शकतात.

मत्स्यशेतीसाठी प्रारंभिक खर्च

तळ्याची उभारणी, पाणीपुरवठा, ट्यूबवेल यासाठी सुमारे खर्च १ लाख २० हजार रुपये अपेक्षित आहे. वीज आणि पाणी बिल सुमारे १७ हजार ५०० रुपये, २५० किलो चुन्याची किंमत १ हजार २०० रुपये,  २० हजार माशांचे बियाणे १ हजार ५०० रुपये, सेंद्रीय खत १० हजार रुपये, रासायनिक खत ५ हजार रुपये, औषधे, मासेमारी, वॉच आणि वॉर्डसाठी १० हजार रुपये, पूरक खाद्यासाठी जवळपास ३० हजार रुपये असा खर्चाचा सर्वसाधारण तपशील आहे. थोडक्यात, प्राथमिक गुंतवणूक सुमारे २ ते ३ लाख अपेक्षित आहे. काहीवेळा स्थानिक बाजारातील किंमतीनुसार हा आकडा ३ ते साडेचार लाखांपर्यंत जाऊ शकतो.

शेततळ्याची उभारणी

तुम्ही मत्स्यशेती सुरू करण्यासाठी प्रथम तळ्याची उभारणी गरजेची आहे. शेततळ्याची उभारणी ही थोडी किचकट प्रक्रिया आहे. यात काहीसा धोका असून  शारीरिक श्रमांची आवश्यकता आहे. तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्रीचा वापर करून सुलभतेने तळ्याची उभारणी करता येते. तळे हंगामी आणि कायमस्वरूपी अशा दोन स्वरूपाची असतात. हंगामी तळ्यात माशांच्या संवर्धनासाठी वारंवार पाणी बदलावे लागते. कायमस्वरूपी तळ्यासाठी तुम्ही जवळील छोटेसे सरोवर निवडू शकता अथवा छोटेसे तळे तयार करू शकता. तुम्हाला यासाठी पाणी बदलण्याची काहीही गरज नाही, हे तळे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.

मजूर कामाला लावून मानवी श्रमातून तलावाची खोदाई करणे यासाठी अधिक वेळ आणि कष्ट आवश्यक आहेत. जेसीबी अथवा खोदकाम करणाऱ्या मशीनद्वारे तळे खोदल्यास भरपूर वेळ वाचू शकतो. तळे मोठ्या उतारावर खोदू नये. खोदताना एकावेळी बाजूने १६ इंच खोदून माती तळ्याच्या मागील बाजूला टाकावी. मध्यभागी खोदताना अधिक खोलवर खड्डा घ्यावा जेणेकरून तळ्यात समान उतार तयार होईल. यामुळे खोदताना मशीनला देखील तळ्यात हालचाल करण्यास मदत होईल. तळ्याचे आवश्यक तेवढे खोदकाम झाले आहे का हे पाहण्यासाठी वारंवार मोजणी करावी.

तळ्याला लायनिंग: तळ्याचे खोदकाम केल्यानंतर त्याचे रबर लाइनर किंवा ताडपत्रीद्वारे लायनिंग करणे आवश्यक आहे. या ताडपत्री अथवा रबर लाइनरचा माशांना धोका पोहचणार नाही याची काळजी घ्यावी. ताडपत्री टाकण्याआधी सर्वात प्रथम पृष्ठभागावर मातीचा पातळ थर टाका. लाइनर आणि ताडपत्रींना नुकसान पोहचू नये यासाठी जिओटेक्स्टाईल फॅब्रिकचा देखील उपयोग करता येतो. आजुबाजूच्या भागात पाणी जाऊ नये यासाठी खासकरून ताडपत्रीचा वापर करावा. ताडपत्रीचा वापर न केल्यास तळ्यातील पाण्याचा स्तर कायम राहण्यासाठी वारंवार पाणीपुरवठा करावा लागेल.

लाइनरने सीलबंद केलेले तळे. तळ्याला रबर लाइनर किंवा ताडपत्रीशिवाय सीलबंद केले जाऊ शकते. यापेक्षा अधिक स्वस्त व चांगले पर्याय देखील आहेत. मात्र ही प्रक्रिया मातीचा प्रकार आणि मातीतील घटकांवर अवलंबून असते. सोडियम बेंटोनाईटचा देखील तळे सीलबंद करण्यासाठी वापर करता येतो. अनेक पारंपारिक तळी लायनिंग केलेली आहेत. इथेनॉल आधारित प्लास्टिकसह पॉलिथिलीनचा देखील वापर केला जातो. ते जीवाश्म-इंधन आधारित प्लास्टिक लाइनर्सपेक्षा चांगले आहे. रबर लाइनर्स अथवा ताडपत्रीचा वापर करताना तळ्याच्या मध्यभागापासून याची सुरूवात करणे चांगले आहे. ताडपत्री आणि रबर लाइनर्सचा आकार हा तळ्याच्या आकारावर अवलंबून आहे. संपूर्ण तळे झाकले जाईल एवढे रबर लाइनर्स वापरावे.

तळे पाण्याने भरणे: तळ्यात लाइनर अथवा ताडपत्री टाकल्यानंतर सर्वात प्रथम तळ्याच्या मध्यभागी मोठा दगड ठेवावा. त्यामुळे पाण्याचा स्तर कमी झाल्यावर ताडपत्री अथवा लाइनर उडणार अथवा तरंगणार नाही. तळ्याच्या आकारावर पाणी किती असावे हे ठरते. पाणी तळ्याच्या कोपऱ्यावरून भरावे, जेणेकरून ताडपत्रीला पाण्याच्या वजनासह जुळवून घेता येते. याशिवाय लाइनर्सच्या काठांवर देखील दगड ठेवा. जेणेकरून तळ्यातील पाणी वाढल्यास लाइनर्स अथवा ताडपत्री घसरणार नाही. पम्पिंग सिस्टम वापरणार नसल्यास तळे माशांनी भरा. माशांना जिंवत व निरोगी राहण्यासाठी ऑक्सिजनयुक्त पाण्याची गरज असते. पाण्यात ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी वाहत्या नळीला पाण्यात ठेवा, आठवड्यातून २ ते ३ वेळा पाणी ऑक्सिजनयुक्त केले पाहिजे व हा कालावधी १५ ते ३० मिनिटे असावा.

माशांची तळ्याशी ओळख कशी करून द्यावी :

तळे हा माशांचा अधिवास असल्याने त्यांची तळ्याशी ओळख होणे गरजेचे आहे. माशांची पाण्याशी ओळख करून देताना पाण्याला पूर्णपणे स्थिर होऊन देतात. त्यामुळे पाण्यातील घाण स्थिर होईल. मासे तळ्यात सोडण्याआधी माशांना बादलीच्या पाण्यात १० ते १५ मिनिटे ठेवावे त्यामुळे नवीन पाण्याच्या पीएच लेव्हलशी मासे जुळवून घेऊ शकतील. त्या नंतर हळहूळ माशांना तळ्यात सोडावे. माशांचा ताण कमी केल्यास त्यांच्या जगण्याचा दर वाढतो आणि नवीन वातावरणात स्वतःला सावरण्यास मदत मिळते. एकाच वेळी सर्व मासे तळ्यात टाकण्याची चूक करू नये. थोड्या थोड्या प्रमाणात मासे तळ्यात सोडावे व २ ते ३ आठवडे वाट पहावी. जर अधिकांश प्रमाणात मासे जिंवत राहिले तर इतर मासे देखील तळ्यात सोडावे. अधिकांश माशांचा मृत्यू झाल्यास त्याचे कारण शोधावे. मातीतील पीएच लेव्हल माशांच्या मृत्यूचे कारण ठरू शकते. काही माशांना ठराविक पीएच लेव्हल जगण्यासाठी गरजेची असते. जर पीएच लेव्हल योग्य असल्यास, असे का होत आहे याचे कारण जाणून घेण्यासाठी तज्ञांची मदत घ्यावी.

 माशांची देखभाल

तळ्यातील माशांची काळजी घेणे ही सर्वात अवघड प्रक्रिया आहे. यासाठी कामगारांची मदत लागते. आठवड्यातून एकदा अथवा महिन्यातून दोनदा तळ्याची सफाई करण्याची गरज आहे. माशांची वाढ होताना व त्यांना खाद्य टाकताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तळ्यातील पाण्याची पीएच व्हॅल्यू ही ७ ते ८  असणे गरजेचे आहे. भक्षकांपासून तळ्याची रक्षा करणे गरजेचे आहे.  एखाद्या माशाला काही आजार असल्यास इतर माशांना देखील त्याचा संसर्ग होऊ शकतो. मीठ, पॉटेशियम परमॅग्नेट पाण्यात मिसळून रोगापासून रक्षण करता येते.

मत्स्य खाद्य आणि मत्स्य खाद्याचे प्रकार

खाद्य हा मत्स्यपालन व्यवसायातील महत्त्वाचा भाग आहे. माशांच्या वाढीसाठी आणि जगण्यासाठी त्यांना चांगला व पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे. खाद्य व्यवस्थापन हे मत्स्यपालन व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावते. खाद्य हे समतोल, प्रोटीन, कार्बोहायड्रेड, फॅट्स, व्हिटॅमिन्स, खनिजे आणि पाण्याचा समावेश असलेले असावे. तळ्यातील शेवाळ आणि जलीय किडे हे नैसर्गिक खाद्य समजले जाते. मात्र हे सर्वच माशांसाठी पूरक नसते. सुरुवातीच्या टप्प्यात मासे या नैसर्गिक खाद्याचा वापर करतात. काही खते देखील मिळतात जी तळ्यात नैसर्गिक खाद्य तयार करतात. मात्र याचा वापर करू नये. नैसर्गिक खाद्यासोबतच पूरक खाद्य देखील माशांच्या वाढीस मदत करतात. त्यामुळे कमी कालावधीत माशांची संख्या झपाट्याने वाढेल.

मत्स्य खाद्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मत्स्य खाद्याचे दोन प्रकार आहेत. एक नैसर्गिक खाद्य आणि दुसरे पूरक खाद्य.

नैसर्गिक मत्स्यखाद्य: तळ्यातच उगवणाऱ्या खाद्याला नैसर्गिक मत्स्यखाद्य म्हटले जाते. यामुळे पाण्याची व मातीची सुपीकता देखील वाढते व खतांचा वापर करून पाण्यात याची निर्मिती करता येते. सुरुवातीच्या टप्प्यात माशांना जगण्यासाठी नैसर्गिक खाद्य महत्त्वाचे आहे. प्लँकटोन (पाण्यात तंरगणारे सूक्ष्म जीवाणू)’ वोल्फिया, इखॉर्निया, पिस्टिया, लिम्ना, पाण्यातील छोटे किडे, प्राणी आणि झाडांचे कुजलेले भाग, तळाशी असणारा सेंद्रीय घटक, गवताचे विविध प्रकार हे तळ्यात निसर्गतः उपलब्ध होऊ शकतात.

पूरक मत्स्यखाद्य: नैसर्गिक खाद्यासोबतच निरोगी वाढीसाठी माशांना पूरक खाद्य द्यावे. माशांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांना नैसर्गिक खाद्य पुरेसे ठरत नाही. पूरक मत्स्यखाद्य बाजारात उपलब्ध असते व आपणही ते बनवू शकतो. तांदळाचा कोंडा, डाळ, गहू, मोहरी, तीळ, फिश पावडर, धान्य, रेशीम, प्राणी अथवा पक्ष्यांचे रक्त आणि मल-मूत्र, विविध भाज्यांची हिरवी पाने, खनिजे आणि जीवनसत्त्वे, स्वयंपाकात उरलेले खाद्य, मक्याचे पीठ आणि भुसा, वाळलेला गुळ

मत्स्य खाद्याचा साठा  

कमी आर्द्रता असलेले मत्स्य खाद्य आणि कोरड्या गोळ्या केवळ दोन ते तीन महिन्यांपर्यंतच साठवता येतात. त्यांना एका कमी प्रकाशात, थंड आणि कोरड्या जागी ठेवले पाहिजे. अधिक आर्द्रता असणारे खाद्य आणि ओल्या गोळ्या एक आठवडा साठवता येतात. हे खाद्य फ्रीजरमध्ये ठेवावे. पूड किंवा पावडर स्वरूपातील खाद्याचा उपयोग केल्यास त्यामुळे पाणी खराब होऊ शकते. त्यामुळे वारंवार सफाई करावी. अनेक जण कोंबड्या आणि बदकांचे उत्सर्जित पदार्थ निवडतात. नजीकच्या पॉल्ट्रीमधून ते उपलब्ध होऊ शकते. माशांसाठी आवश्यक प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, सल्फर, क्लोरीन, लोह, तांबे, मांगेनीस इत्यादी पौष्टिक आणि खनिज पदार्थ त्यांच्या अन्नात उपलब्ध असतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. या प्रकारचे पौष्टिक आणि खनिजयुक्त खाद्य माशांच्या वाढीसाठी व निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे.

साधारणपणे ६ ते ८ महिने अथवा १ वर्ष योग्य संगोपन केल्यानंतर मासे विक्री योग्य होतात.

मासे कसे पकडावे ?

माशांच्या प्रजातीवर त्यांना पकडण्याची पद्धत अवलंबून असते. मत्स्य तळ्यातून मासे पकडण्यासाठी दोन पद्धती वापरल्या जातात.

बहुतेकदा जाळीचा वापर करून तळ्यातील मासे पकडतात. याशिवाय तळ्यातील सर्व पाणी काढून मासे पकडता येतात. सर्वसाधारणपणे सकाळी अथवा सांयकाळी तळ्यातील मासे पकडले जातात.

मत्स्यपालनासाठी आवश्यक उपकरणे

व्यवसायिक मत्स्यपालनासाठी मत्स्यालय किंवा फिश टँक, पम्पस, एरॅशन डिव्हाईस, जाळी, हँडलिंग आणि ग्रेडींग उपकरणे, पाण्याची चाचणी करणारे उपकरण ही साधनसामुग्री आवश्यक आहे. मोठ्या स्तरावरील मत्स्यपालन व्यवसायासाठी अधिक उपकरणांची आवश्यकता भासू शकते.

जागेची आवश्यकता

उथळ तळ्यात उत्पादन क्षमता अधिक असते. मात्र ते फार उथळ देखील नसावे. त्याची खोली किमान ५० सेमी आवश्यक आहे.

मत्स्यपालनातील उत्पन्न

एक एकरातील मत्स्यशेतीतून भांडवली गुंतवणुकीपेक्षा निश्चितपणे अधिक नफा मिळतो. सरासरी ५० रुपये प्रतिकिलो दराने ६ हजार किलो माशांची विक्री केल्यास त्यातून ३ लाख रुपये मिळतील. बाजारात माशांची अधिक मागणी असल्यास ८० रुपये प्रतिकिलोने विक्री करून ४ लाख ८० हजार मिळू शकतात.

मत्स्यपालनासाठी कर्ज आणि अनुदान

बँक कर्ज आणि नाबार्ड योजनेशिवाय मत्स्यपालन व्यवसाय सुरू करणे सोपे नाही. भारतात एसबीआय फिशरी कर्ज आणि काही अनुदान देखील मिळते. सरकारतर्फे देखील मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही योजना राबविल्या जातात.

भारतात मत्स्यपालनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी नवीन तळ्यांची निर्मिती करता यावी म्हणून सरकारने १९९१-९२ योजना आणली होती. या योजनेच्या एका यूनिटची किंमत प्रति हेक्टर ४ लाख रुपये आहे. यात पाणीपुरवठा हा ट्युबवेल अथवा ग्रॅव्हिटी प्रवाहाद्वारे केला जातो. शेतकऱ्यांसाठी याची अनुदानित रक्कम २० टक्के दराने प्रति हेक्टर ८० हजार रुपये आहे. अनुसूचित जाती, जमातींसाठी ही रक्कम प्रति हेक्टर १ लाख रुपये आहे.

एकीकृत मत्स्यपालन

लोकसंख्येचा उद्रेक आणि मर्यादित स्त्रोतांमुळे विविध कार्याचे एकीकृतकरण करणे आवश्यक आहे. याशिवाय कमी इनपूटद्वारे जास्तीत जास्त रोजगारात वाढ आणि उत्पादन क्षमता वाढवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आखलेल्या योजनेत काही खास माशांच्या अंड्यांसाठी विशेष यूनिटची निर्मिती करण्यास मदत केली जाते. या यूनिटची किंमत १५ लाख रुपये असून यात सुमारे ५० लाख ते १ कोटी अंडी उबवण्याची जागा असते.

कोळंबी आणि इतर माशांसाठी अंडी उबवण्याच्या जागेची निर्मिती

मत्स्यपालनातील मत्स्यबीज हा प्रमुख घटक आहे. राज्य मत्स्य विभाग जवळपास २ कोटी मस्त्यबीजाची निर्मिती करते. हा मस्त्यबीज साठा वर्षाला मत्स्यालयांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरेसा नाही. अशा स्थितीमध्ये खाजगी उद्योजकांना मत्स्यबीज उत्पादनात मोठा वाव आहे.  ही योजना समतल  भाग असलेल्या जागेत १ कोटी क्षमता असलेल्या मत्स्यबीज प्रकल्पासाठी १२ लाख रुपये आणि समान क्षमता असलेल्या डोंगराळ राज्य/जिल्ह्यात १६ लाख रुपये दिले जाते. याद्वारे केवळ उद्योजकांना समतल भागात जवळपास १० टक्के अनुदानासह १ लाख २० हजार रुपये आणि डोंगराळ भागात १ लाख ६० हजार रुपये मिळतात.

मत्स्यखाद्य यूनिटची स्थापना

लाभार्थ्यांना आवश्यक असलेल्या बीजाची गरज भागल्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मोठ्या प्रमाणात मत्स्य खाद्याची उपलब्धता असणे. मत्स्यखाद्य यूनिटची स्थापना करण्यासाठी सरकार इमारत, यंत्रसामुग्री आणि उपकरणांसाठी ७ लाख ५० हजार रुपये मंजूर करते. याशिवाय प्रत्येक उद्योजकाला २० टक्क्यांसह कमाल १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते.

मत्स्यपालनाच्या पहिल्या वर्षासाठी अनुदान  

तळ्याच्या नूतनीकरण आणि बांधकामासाठी अनुदानाचा लाभ घेणार्‍या शेतकऱ्यांना प्रथम वर्षासाठी माशांचे बीज, खाद्य व खत इ. अनुदान दिले जाते.  लाभार्थ्यांना प्रति हेक्टर २० टक्क्यांसह कमाल १०  हजार रुपये आणि अनुसूचित जाती, जमातींसाठी लाभार्थ्यांना १२ हजार ५०० रुपये मिळतात. प्रति हेक्टरसाठी खर्च ३० हजारांपर्यंत निश्चित करण्यात आलेला आहे.

तळे आणि टँकच्या नूतनीकरणासाठी मत्स्यपालन अनुदान

तळे अथवा टँकच्या नूतनीकरण आणि पुर्ननिर्मितीसाठी देखील अनुदान दिले जाते. जुने तळे अथवा टँकचे नूतनीकरण व्हावे हा याचा हेतू आहे.  प्रति हेक्टर तळ्याच्या  नूतनीकरणासाठी अंदाजे खर्च ७५ हजार रुपये असल्यास अनुदान म्हणून २० टक्क्याने १५ हजार रुपये मिळतात. तर अनुसूचित जाती जमातींसाठी शेतकऱ्यांना १८ हजार ७५० रुपये मिळतात.

मत्स्यपालन व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या परवान्यांची यादी –

कंपनी नोंदणी: छोट्या अथवा मध्यम स्तरावर स्वतःच्या मालकीची अथवा भागीदारी कंपनी सुरू करता येते. खाजगी मालकी असेल तर प्रॉपराईटरशिप अंतर्गत कंपनीची नोंदणी करावी लागेल. जर भागीदारी अंतर्गत कंपनी स्थापन करणार असल्यास लिमिटेड लाइबिलिटी पार्टनर्शिप (एलएलपी) किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अंतर्गत नोंदणी करावी.  

जीएसटी नोंदणी (GST)– कंपनीचा जीएसटी नंबर, कर ओळख क्रमांक आणि विमा प्रमाणपत्र मिळवावे. ट्रेड परवाना – स्थानिक प्रशासनाकडून ट्रेड परवाना घ्यावा.
प्रदूषण प्रमाणपत्र –  या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आणि दुर्गंधी निर्माण होत असल्याने प्रदूषण प्रमाणपत्र प्राप्त करावे. 

शेअर करा

Leave a Comment