मधाचा धंदा अनेक प्रकारे हितकर (Honey Processing)

सध्या कृत्रिम आणि बाजारातल्या अन्नाचे परिणाम लोकांना जाणवायला लागले आहेत आणि शक्यतो नैसर्गिक अन्न खाल्ले पाहिजे अशी भावना जागी होत आहे. निसर्गाने दिलेले अन्न पदार्थ तसेच खावेत म्हणजे ते औषधाप्रमाणे गुणकारी ठरतात असाही अनुभव लोकांना येत आहे. त्यातला सर्वाधिक वापरला जाणारा गुणकारी पदार्थ आहे मध. वजन कमी करणे, पचन शक्ती वाढवणे, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे अशा अनेक प्रकारे उपयुक्त असल्याने मधाची मागणी वरचेवर वाढत आहे. त्यामुळे मध गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे हा फारच किफायतशीर व्यवसाय झाला आहे. 


मध काही कारखान्यात तयार होत नाही. तो निसर्गात मधमाशांकडून तयार केला जातो. त्याचा  कच्चा माल आपण आणलाय आणि त्यावर मोठी प्रक्रिया केलीय असा काही प्रकार मधात नाही. निसर्गात आपोआप तयार होणारे हे अन्न आपल्याला केवळ गोळा करायचे आहे आणि साफ सफाई करून विकायचे आहे. तेव्हा मार्जिन ऑफ प्रॉफिटचा काही प्रश्‍न नाही.


पूर्वीच्या काळी झाडांना मधमाशांचे पोळे लटकलेले दिसायचे. गुराखी त्यावर नजर ठेवायचे आणि योग्यवेळी ते झोडपून गावात लोकांना आणून द्यायचे किंवा रानातच सोबतच्या भाकरीला लावून खायचे. ते गावात आणून दिलेले मधाचे पोळे विकायचीही कल्पना त्यांना नसायची. त्याला त्याच्या बदल्यात एखादी भाकरी दिली तरीही तो खुष असायचा. पण आता त्याचा व्यापार सुरू झाला असून एखाद्या छोट्या पोळ्यातून निघेल एवढा मध बाटलीत भरून आणि त्यावर कंपनीचे लेबल लावून तब्बल पाचशे ते सहाशे रुपयांना विकला जायला लागला आहेे.  त्याची निर्मिती आणि त्याला बाजारात येणारी किंमत यांचा विचार केला तर मधमाशा पालन आणि मध प्रक्रिया हा व्यवसाय किती नफा देणारा आहे याची कल्पना आहे. 


आता निसर्गात आपोआप तयार होणार्‍या मधाच्या पोळ्याची निर्मिती मधमाशांच्या पेटीच्या  रुपाने केली जात आहे. मधमाशी पालन हा व्यवसाय दोन पातळ्यांवर केला जातो. मधमाशा पालन करणे आणि प्रक्रिया करणे. शेतकरी त्याच्या पेट्या शेतात ठेवून मध गोळा केला जातो. ठराविक काळात या पेट्या  शेतात ठेवाव्या लागतात आणि काही एका ठराविक कालावधीने त्यात मधमाशा मधाची साठवण करतात. ते काम झाले असल्याचे दिसले की पेटी उघडून तिच्यातला मध गोळा करून तो विकला जातो. 


म्हणजे हा शेतकर्‍यांसाठी जोडधंदा आहे. अनेक शेतकरी तो करीत आहेत. या व्यवसायाचे प्रशिक्षण घेणे मात्र आवश्यक आहे कारण त्यातल्या अनेक गोष्टी तांत्रिक आहेत. बॉक्सेस कोठे ठेवावेत, कधी ठेवावेत आणि किती दिवसांंनी त्यात पुरेसा मध गोळा होतो हे समजून घेणे गरजेचे असते. तो मध कसा काढून घ्यावा याचेही कौशल्य शिकून घ्यावे लागते. 


महाराष्ट्र शासनाने याबाबतीत पुढाकार घेतला असून खादी ग्रामोद्योगाच्या साह्याने शेतकर्‍यांना या व्यवसायाचे मोफत शिक्षण दिले जाते. खादी भांडारात किंवा जिल्हा उद्योग केन्द्रात या बाबत चौकशी करावी. माझ्या माहितीनुसार आता हे प्रशिक्षण जिल्हा पातळीवरही दिले जात असते.  मात्र महाराष्ट्रात महाबळेश्‍वर येेथे या प्रशिक्षणाचे मोठे केन्द्र असून मधमाशांच्या पालनाबाबत आणि मधाच्या प्रक्रियेबाबत तिथे सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. 


मधमाशा पालनाचा धंदा शेतकर्‍यांनी केल्यास त्याचा एक मोठा फायदा या शेतीला होतो. एखादे पीक भरघोस यायचे असेल तर ते फुलोर्‍यावर आल्यानंतर फुलांतील परागकणांचे मिलन व्हावे लागते. पू केसर आणि स्त्री केसर यांचे मिलन जितक्या मोठ्या प्रमाणावर होईल तेवढे पीक छान येते. परागसिंचनाची ही प्रक्रिया वार्‍याने होते. वार्‍याने पू केसर उडतात आणि स्त्री केसरावर जाऊन पडतात. मात्र हीच क्रिया माशांकडूनही केली जाते. आजकाल आपण शेतात एवढी औषधे मारायला लागलो आहोत ही परागसिंचन करणार्‍या माशा जिवंतच रहात नाहीत मात्र मधमाशा पालनाच्या निमित्ताने आपल्या शेतात हजारो मधमाशा पाळल्या जातात आणि त्यांच्या उडण्याने बागडण्याने परागसिंचन वाढून पीक चांगले येते.


शेतकरी मध गोळा करतात आणि स्वत:च ग्राहकांना विकतात. त्यात त्यांना चार पैसे जादा मिळतात पण जे शेतकरी विक्री करू शकत नाहीत त्यांना मात्र जमा केलेला मध एकदम व्यापार्‍याला विकून (अर्थात स्वस्तात) टाकावा लागतो. 


मधमाशा पालन करण्याच्या तांत्रिक गोष्टी

मध गोळा करण्याचे काम डब्यात केले जाते. एका डब्यात तीन प्रकारच्या माशा असतात. नर मधमाशी, राणी मधमाशी आणि कामकर मधमाशी. एका डब्यात किमान ३० हजार तर कामकरी  मधमाशा, १०० नर मधमाशा आणि एकच राणी मधमाशी असते. यातल्या राणी मधमाशीचे आयुष्यमान एक वर्षाचे असते. नर मधमाशी सहा महिने जगते तर श्रमिक मधमाशी साधारण दीड महिना जगते. या श्रमिक मधमाशा सर्वत्र भटकून मध गोळा करून आणतात. 


व्यवसायाची पध्दती 

केवळ शेतीला जोडधंदा म्हणून मधमाशा पालन करायचे असेल तर आपल्या शेतात डबे आणून ठेवावेत आणि दर काही दिवसांच्या अंतराने त्यात मध जमा होताच तो काढून प्रोसेस करणार्‍या उद्योगाला विकून टाकावा किंवा आपल्याला अधिक गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर आपला प्रोसेसींग प्लँट टाकावा. 


१. आपल्याला व्यापार सुरू करायचा असेल तर प्रशिक्षित कर्मचारी नोकरीस ठेवावे लागतील. 

२. डबे ठेवण्यासाठी कमी आर्द्रता असलेल्या कोरड्या जागेची निवड करावी लागेल.

३. त्या परिसरात स्वच्छ पाण्याची सोय असावी आणि झाडेझुडपे भरपूर असावी.

४. डबे ठेवण्यासाठी जागा भरपूर असावी.

५. एका डब्यात दहा फ्रेम ठेवल्या जातात. 

प्रोसेसिंग युनिट 

मधावर प्रक्रिया करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर केल्यास साधारण २० लाख रुपयांची गुंतवणूक लागते. ज्यातून शेतकर्‍यांचा मध खरेदी करून त्याच्यावर प्रक्रिया करून आपण तो चांगले पॅकिंग करून विकू शकू. २० लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून दररोज १०० किलो स्वच्छ शुध्द मध प्रक्रिया आणि पॅकिंग करून आपण विकू शकतो. 


मधाचे विक्रीचे दर निरनिराळे असतात. मात्र सध्या २०० रुपये प्रतिकिलो असा दर चालू आहे. म्हणजे २० लाखांची गुंतवणूक केल्या दररोज २० हजार रुपयांचा मध विकता येतो. सर्व खर्च वजा जाता महिन्याला किमान दोन ते अडीच लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. 


प्रक्रिया कशी करावी?

१. मधमाशाचे पोळे मधमाशापासून वेगळे केले जाते. म्हणजे मधमाशा झटकल्या जातात.

 २. ते पोळे प्रक्रिया करणार्‍या यंत्रात टाकले जाते. जिथे पोळ्यातला मध पिळून काढला जातो आणि मेण वेगळे केले जाते.

 ३. त्यानंतर मधाला ४९ डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत तापवले जाते आणि याच तापमानात २४ तास ठेवले जाते. 

४. नंतर त्याचे तापमान कमी करून पॅकिंग केले जाते. 


मार्केटिंग
ज्या शेतकर्‍यांना केवळ मध गोळा करण्याचा धंदा शेतीला जोड धंदा म्हणून करायचा असेल त्यांना मार्केटिंगची फार प्रश्‍न येत नाही कारण त्यांना आपल्याकडे जमा झालेला मध प्रोसंसिग करणार्‍या कारखान्याला विकायचा असतो. पण अशी विक्री करताना दोन तीन ठिकाणी भावाची चौकशी करून   चांगला भाव देईल त्यालाच मध द्यावा.


प्रोसेसिंग युनिट टाकणारांना मार्केटिंग दोन पातळ्यांवर करावी लागते. पहिली पातळी म्हणजे आपल्या मधाचा ट्रेड मार्क लोकांच्या मनावर ठसावा यासाठी व्यापक प्रमाणावर जाहीरात करावी लागतेे. त्यासाठी    वृत्तपत्रे, रेडिओ आणि टीव्ही ही तीन माध्यमे वापरावी लागतात. खरे तर कंपनीनुसार मधात काही फरक पडत नाही पण मधाचा उपयोग औषधासारखा होत असल्यामुळे लोकांची श्रद्धा फार महत्त्वाची  ठरते. त्यामुळे लोकांच्या मनावर ठसवणे हे मोठे काम ठरते. 

दुसर्‍या पातळीवर गावागावातल्या औषधी दुकानात माल विक्रीला ठेवावा लागेल आणि त्यासाठी त्या दुकानापर्यंत माल नेऊन पोचवणारी यंत्रणा उभी करावी लागेल. 

मधाबरोबर तयार होणारे अन्य पदार्थांच्या अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

https://miatmanirbhar.com/honey-products/
शेअर करा

Leave a Comment