सध्या संकटात सापडलेल्या शेतकर्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी उपयोगी पडू शकणारा एक व्यवसाय म्हणजे शेळीपालन. महाराष्ट्रातल्या शेतकर्यांजच्या आत्महत्यांमागच्या कारणाचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या नरेन्द्र जाधव यांच्या एक सदस्यीय अभ्यास गटाने आत्महत्यांवर जोड धंदा हा एक उपाय सुचविला आहे. तसे जोडधंदे अनेक आहेत पण त्यातल्या त्यात सोपा व्यवसाय आहे शेळीपालन. हा धंदा कमीत कमी पैशातही सुरू करता येतो आणि लाखो रुपये गुंतवूनही करता येतो. शिवाय तो फार गुंतागुंतीचा नाही आणि त्याचे मार्केटिंगही सोपे आहे. एका शेती तज्ज्ञाने असे म्हटलेले आठवते की, ज्या शेतकर्याच्या घरात शेळी पाळलेली असेल त्या शेतकर्यावर आत्महत्या करण्याची वेळ कधीही येणार नाही.
महात्मा गांधी शेळीला गरिबांची गाय म्हणत असत. कारण शेळी गायीप्रमाणेच दूध देते पण गाय महाग असते. गोपालन करायला मोठी गुंतवणूक करावी लागते. जर्सी गायी तर हजारो रुपयांना विकल्या जात आहेत आणि म्हशींचे तर विचारूच नका. त्यामुळे अगदी गरीब शेतकर्यांना आणि शेतमजुरांना तेवढाले पैसे गुंतवून गाय किंवा म्हैस खरेदी करणे परवडत नाही. अशा लोकांना करता येणारा सर्वात सोपा आणि कमी भांडवलाचा धंदा म्हणजे शेळी पालन.
हा धंदा किरकोळ भांडवलात करता येतो. काही तरुण हा व्यवसाय करण्याची योजना आखतात पण त्यांच्या मनात धंद्याच्या काही विशिष्ट कल्पना असतात. धंदा करणे म्हणजे बॅँकेत जाणे, लोन काढणे आणि दणक्यात उद्घाटन करून धंदा सुरू करणे अशी त्यांची कल्पना असते. ते त्यासाठी बँकांकडे चकरा मारायला लागतात पण हा धंदा करायचा झाला तर असा दणक्यात सुरू करू नये. आधी एक दोन शेळ्या पाळून हा धंदा आपल्याला मानवतो का हे पहायला हवे. एक दोन शेळ्यांचा एक दोन वर्षांचा अनुभव घेऊन आणि या व्यवसायाचे अर्थशास्त्र जाणून घेऊन मग पुढे पावले टाकली पाहिजेत.
शेळी पालनातली एक अडचण म्हणजे शेळ्यांना होणारे आजार. शेळ्यांना काही आजार झाला की त्या पटापट मरायला लागतात असा प्रवाद आहे. ही काही वस्तुस्थिती नाही. फार कमी वेळा असे प्रकार घडतात. तेही शेळ्यांना योग्य त्या लसी टोचल्या नसतील तर. पण, अशा काही शेळ्या मेल्या की वृत्तपत्रात मोठ्या बातम्या छापून येतात. एखाद्या जिल्ह्यात हजारो शेळ्या असतात पण त्यातल्या पाच पन्नास शेळ्या मेल्या तरी शेळ्या आता संपत चालल्या की काय अशी अतिशयोक्ती करून चर्चा व्हायला लागते. आपण या व्यवसायाचा विचार करायला लागतो तेव्हा या क्षेत्रातला कवडीचाही अनुभव नसलेले काही लोक उगाच आपल्याला अशी भीती घालतात पण त्यात काही तथ्य नसते. या उपरही आपण शेळ्यांना आवश्यक त्या लसी टोचल्या तर काहीच भीती नसते.
या उपरही काही लोकांना शेळी पालनासाठी लोन मिळते. सर्वांनाच असे लोन मिळणे अवघड आहेे. एका तरुणाने एकदा मला अशाच शेळी पालनासाठी कर्ज मिळण्यात येणार्या अडचणी सांगायला सुरूवात केली. तो दोन वर्षांपासून लोन साठी प्रयत्न करीत होता. त्यासाठी त्याने तालुक्याच्या गावी, जिल्हा उद्योग केन्द्रात आणि बँकेच्या हेड ऑफीसमध्ये चकरा मारण्यात किमान दोन तीन हजार रुपये तरी खर्च केला होता. खरे तर त्याने दोन वर्षाखाली तेच दोन हजार रुपये गुंंतवून एक दोन शेळ्या विकत घेतल्या असत्या तर त्यापासून या दोन वर्षात खंडीभर शेळ्यांचे खांड तयार झाले असते. लोन मिळत नसेल तर त्याच्या मागे न लागता अगदी थोडया पैशात हा धंदा सुरू करता येतो. वर्ष दोन वर्षात पिलांची संख्या वाढायला लागते. उगाच लोन लोन करीत बसण्याची गरजच काय ?
या व्यवसायात गुंतवणूक कमी आणि उत्पन्न जास्त आहे. जमा-खर्च, नफा-तोटा याचा फारसा उपद्व्याप या व्यवसायात नाही. त्यामुळे दारात चार-पाच शेळ्या आणि पाच-सहा बोकड असले की, ती एक शेतकर्यांची बचत बँकच होऊन जाते. एरवी शेतकर्याला दैनंदिन अडचणींमध्ये पटकन् पैसा उपलब्ध होऊ शकत नसतो. मात्र घरात काही शेळ्या आणि बोकड असले की, या अडचणीवर मात करता येते. पटकन् एखादी शेळी किंवा एखादा बोकड बाजारात नेऊन विकून टाकला की, छोटी-मोठी गरज भागून जाते. म्हणजे शेळ्या ही एक बचत बँकच होऊन गेलेली आहे. बँकेतल्या बचत खात्यात पैसे ठेवावेत आणि लागेल तसे काढावेत, तसे शेळीच्या विक्रीतून पैसे काढता येतात आणि पैसे काढले तरी पुन्हा हाती असलेल्या शेळ्यांची पैदास वाढवून शेळ्यांची संख्या वाढतच जाते.
सध्या मटणाला भाव आलेला आहे. मटण खाणार्यांची संख्याही वाढत चालली आहे. परंपरेने शाकाहारी असलेले अनेक लोक मांसाहार करायला लागले आहेत आणि परंपरेने मांसाहारी असलेले लोक नेहमीपेक्षा अधिक मांसाहार करायला लागले आहेत. त्यामुळे मटणाचे भाव वाढलेले आहेत. शक्यतो मांसाहार करणार्यांमध्ये बोकडांचे मांस म्हणजे मटण जास्त खाल्ले जाते. सध्या मांसाहारी लोकांच्या थाळीमध्ये कोंबडी, काही प्रमाणात अन्य प्राणी यांचे मांस दिसायला लागले आहे. परंतु कोंबडी आणि शेळी यांच्या मांसाचे सेवन ९० टक्के इतके असते. त्यामुळे शेळीची मागणी वाढत चालली आहे. मटणाच्या मागणीचे प्रमाण केवळ भारतातच नव्हे तर सार्या जगातच वाढत चाललेले आहे.
शेळी हा प्राणी बहुतेक सर्व प्रकारच्या हवामानात पाळला जातो. परंतु जगभरातल्या शेळ्यांच्या जवळपास शंभर जातींपैकी २२ जातींचे पालन करणे भारतात शक्य होते. त्यामुळे मटणाची मागणी करणार्या सार्या देशांचे लक्ष मटणासाठी भारताकडे लागलेले आहे. शेळी किंवा बोकड हा केवळ मांसासाठी पाळण्याचा प्राणी नाही. शेळीचे दूध हाही एक मोठा मार्केटिंगचा विषय आहे. साधारणत: शेळीचे दूध काढून ते विकून पैसा कमावला जात नाही. तसा विचार फार कोणी केलेला नाही. मात्र त्याचा व्यवसायच करायचा झाल्यास ङ्गार मोठा व्यवसाय होऊ शकतो. परंतु शेळीच्या दुधाला उग्र वास असतो, अशी अडचण नेहमी सांगितली जाते. दुभत्या शेळीपासून बोकूड शक्यतो लांब बांधला तर हा वास टाळता येतो आणि शेळीच्या दुधाचे चांगले मार्केटिंग करता येते.
शेळीच्या दुधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. कोणत्याही प्राण्याच्या खाद्याचा परिणाम त्याच्या दुधावर प्राधान्याने होत असतो. शेळीला चरायला सोडल्यास आपल्याला असे लक्षात येईल की, ती कोणत्याही एका झाडाचा पाला पोटभर खात नाही. ती चरून येताना कमीत कमी २५-३० वनस्पतींची पाने तिच्या पोटात गेलेली असतात. आपल्या सभोवताली अशा अनेक वनस्पती आहेत की, ज्यांचा औषधी उपयोग आपल्याला ठावूक नाही आणि ठावूक असला तरी तो विशिष्ट झाडपाला आपण आरोग्यासाठी खाऊ शकत नाही. त्यातल्या अनेक वनस्पतींची पाने शेळीने खाल्लेली असतात आणि त्या सर्व वनस्पतींचा औषधी गुणधर्म तिच्या दुधात उतरलेला असतो. त्यामुळे शेळीचे दूध हे अनेक औषधी गुणांनी युक्त असते. शेळीचे दूध गायीपेक्षा पातळ असते आणि त्यामुळे ते पचायलाही हलके असते.शेळीच्या दुधाचा व्यापारी उपयोग फारसा कोणी केलेला नाही. आपण जर त्याचा तसा उपयोग करून घ्यायचा ठरवला तर आपल्याला दुधाचे चांगले मार्केटिंग करता येईल.
भारतामध्ये शेळीच्या एकंदर २२ जाती पाळता येतात. त्यातील जमनापारी, बिटल, सुरती, मारवाडी, सिरोही आणि बारबेरी या जातींच्या शेळ्या चांगले दूध देणार्या असतात. तेव्हा कोणाला प्रयत्न करून शेळीच्या दुधाचे मार्केटिंग करण्याची इच्छाच असेल तर त्यांनी यापैकी एका जातीची शेळी विकत आणून ती पाळावी. परदेशांमध्ये विशेषत: अमेरिकेमध्ये शेळीचे दूध विपूलपणे वापरले जाते. एवढेच नव्हे तर दुधासाठी शेळीची पैदास करणार्या शेळी पालकांच्या संघटना सुद्धा तिथे आहेत आणि या संघटना शेळीच्या दुधावर अनेक प्रकारचे प्रयोग करीत असतात. आपल्या देशामध्ये या संबंधात फारसे काही झालेले नाही. मात्र त्यामुळे शेळी आणि बोकूड हे केवळ मांसासाठी पाळायचे असतात, असा समज रूढ झालेला आहे आणि शेळीचे दूध चांगले पैसे मिळवून देण्याच्या योग्यतेचे असताना सुद्धा त्याची ही क्षमता वाया जात आहे.
शेळी पालनाचे शास्त्र जाणा
शेळ्या आणि बोकड यांचे एक वेगळे अर्थशास्त्र तर आहेच, पण त्याचे जीवशास्त्रही विचारात घेणे आवश्यक आहे. बर्याच शेतकर्यांना आपल्या जवळची शेळी कोणत्या जातीची आहे हे माहीत नसते. चौकशी केली तर, ‘तिला कसली आली आहे जात ती आपली साधी गावरान शेळी आहे.’ असे मोघम उत्तर दिले जाते. शेळींच्या जातींचा आणि प्रजननाचा विचार केल्याशिवाय शेळी पालन कधीही यशस्वी आणि फायदेशीर होणार नाही हे कायम लक्षात ठेवले पाहिजे.
चार-पाच किंवा ङ्गार तर दहा-बारा शेळ्या पाळणार्यांना फायद्याचा-तोट्याचा विचार फारसा करावा लागत नाही. कारण त्यांच्या शेळ्या बिनखर्ची पाळल्या जात असतात. काही शेतमजूर आपल्या सोबत चार-दोन शेळ्या घेऊन कामावर जातात. त्या शेळ्या दिवसभर इकडे तिकडे चरतात. त्यामुळे त्यांच्या चार्यावर वेगळा खर्चच करावा लागत नाही. त्यामुळे जे काही उत्पन्न मिळते तो ङ्गायदाच असतो. अशा लोकांना शेळ्यांची प्रजनन क्षमता, त्यांच्या क्षमतेत होणारी वाढ वगैरे मुद्यांचा विचार करण्याची गरजच पडत नाही आणि हे लोक आपल्या शेळ्यांना किती पिली होत आहेत आणि किती व्हायला पाहिजेत याचा कधी विचारच करत नाहीत. मग हळुहळू त्यांच्या शेळ्यांना होणार्या पाटींना एकेकच पिलू व्हायला लागते. त्याचे वजनही म्हणावे तसे भरत नाही.
हा सगळा त्या शेळीच्या वंशाचा होणारा र्हास असतो. त्याचे कारण काय ? थोडे समजून घेतले पाहिजे. आपल्या शेळ्यांच्या छोट्याशा खांडामध्ये सात-आठ शेळ्या आणि दोन-तीन बोकड असतात. त्या शेळ्यांच्या पोटी बोकड जन्माला आले की, आपण जुनी बोकडे विकून टाकतो आणि पुढे आपल्याकडे असलेले बोकड मोठे झाले की, त्यांचा त्याच खांडातल्या शेळ्या आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या शेळ्या यांच्याशी संबंध येतो. थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते बोकड त्या शेळीचे मूल आहे आणि त्यातल्या काही शेळ्यांचा भाऊ आहे. शरीर संबंधाच्या बाबतीत माणूस जसा विचार करतो तसा शेळ्या करत नाहीत. परंतु आपण त्यांच्या बाबतीत तसा विचार केला पाहिजे आणि आपल्याच खांडातल्या बोकडांचा आपल्याच खांडातल्या शेळ्यांशी म्हणजे एकाच कुटुंबातल्या शेळ्यांशी संबंध येऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे.
तशी दक्षता न घेतल्यामुळे त्या शेळ्यांचा वंश दर्जेदार होत नाही. पुढे पुढे त्यांची क्षमता कमी कमी होते. यावर उपाय काय ? आपल्याच गावामध्ये आपल्यासारखे कोणी शेळीपालक असतील तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना हे शास्त्र पटवून दिले पाहिजे आणि बोकडांची आपापसात अदलाबदल केली पाहिजे. तर शेळी पालन फायदेशीर ठरू शकते.
कुर्बानी साठी बोकड
महाराष्ट्रात सध्या मटणासाठी प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबादी शेळींची पैदास करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे डॉ. वसंतराव मुंडे, उस्मानाबाद हे अभ्यासपूर्ण रितीने पाळल्या पाहिजेत, असा आग्रह धरतात. शेळी पालनाच्या शास्त्राची माहिती असणे हा व्यवसाय फायद्यात चालण्यासाठी आवश्यक असते. कारण शेळी हा सजीव प्राणी आहे. अनमान धपक्याने किंवा अंदाजपंचे हा व्यवसाय केला तर तो कसाबसा चालू शकेल. पण त्यात फारसा फायदा होणार नाही. तो शास्त्रीय पद्धतीने केला तर मात्र तो शेतकर्यांच्या जीवनाचा मोठा आधार बनू शकतो.
काही शेतकरी अक्कलहुशारीने हा व्यवसाय करत असतात. काही लोकांनी या संबंधात माहिती दिलेली आहे. मुस्लीम समाजाच्या बकरी ईद या सणामध्ये प्रत्येक कुटुंबात एक तरी बळी देवाला दिला जात असतो. तो साधारणत: बकर्याचा असतो. त्यामुळे बकरी ईद दिवशी बोकडांची मोठी टंचाई जाणवत असते. अक्षरश: बोकडासाठी तू मी तू मी सुरू असते आणि या चढाओढीमध्ये बकर्याला जास्त पैसे मिळतात. त्याचा फायदा घेऊन काही शेळी पालक शेतकरी वर्षभरात आवश्यक तेव्हाच बोकड विकतात आणि काही बोकड केवळ बकरी ईद साठी राखून ठेवतात. अगदी ग्रामीण भागात सुद्धा या बोकडांना त्या दिवशी मागणी असते. वेळ प्रसंगी चार पैसे जास्त देऊन बोकड खरेदी करण्याची मुस्लीम भाविकांची तयारी असते.
धार्मिक भावना तीव्र असल्यामुळे असे भाविक लोक पैसे देण्यासाठी बिलकूल मागे-पुढे पहात नाहीत. ती शेतकर्यांसाठी पर्वणीच असते. याचा विचार करून काही हुशार शेतकरी केवळ बकरी ईद साठी म्हणून खास बोकड सांभाळतात. विशेष करून मुंबईमध्ये त्या दिवशी बोकडांना फारच पैसे मिळतात. कित्येक शेतकर्यांच्या बोकडांना मुंबईत वीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत किंमत आलेली आहे.
शेळी पालनाचे तीन प्रकार
शेळी पालन करण्याचे तीन प्रकार आहेत. परंपरागत पद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि बंदिस्त पद्धत. परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडले जाते. त्यांच्यामागे एखादा गुराखी असतो आणि तो दिवसभर त्यांना लोकांच्या बांधांना, कुपाट्यांना आणि कुरणांमध्ये चारून संध्याकाळी घरी आणतो. मग दुसर्या दिवशी सकाळी चरायला सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घालण्याची गरज पडत नाही.
अशाच पद्धतीने आपल्या राज्यात शेळ्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जात आहेत. परंतु या पद्धतीत काही फायदे आहेत आणि काही दोषही आहेत. फायद्याचा असा की, या पद्धतीत चारा-पाण्यावर काही खर्च होत नाही. त्यामुळे नफ्या-तोट्याचा काही प्रश्नच नसतो. मात्र या पद्धतीने फार मोठ्या प्रमाणावर शेळ्या पाळता येत नाहीत. एखाद्या सुशिक्षित शेतकर्याला शेळी पालनाचा उद्योग ङ्गार मोठ्या प्रमाणावर करून तीन-चारशे शेळ्या पाळायच्या असतील तर त्याला ही मोकाट पद्धत काही उपयोगाची नाही. त्यामुळे बंदिस्त शेळीपालन ही पद्धत आता पुढे आली आहे. जसे आपण कोंबड्या पाळतो आणि त्यांना एका पिंजर्यामध्ये कायम कोंडून ठेवून तिथे त्यांना चारा-पाणी देतो. तशाच पद्धतीने काही विशिष्ट प्रकारचा गोठा तयार करून त्यात शेळ्या कायमच्या ठाणबंद ठेवल्या जातात. त्याला बंदिस्त किंवा बंदगोठा शेळीपालन असे म्हटले जाते.
त्याशिवाय ज्या शेतकर्यांना पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन शक्य नाही आणि पूर्णपणे मोकाट शेळीपालनही शक्य नाही अशा शेतकर्यांना अर्धबंदिस्त शेळीपालन उपयुक्त ठरते. त्यामध्ये थोडा वेळ शेळ्या ठाणबंद केल्या जातात आणि थोडा वेळ चरायला सोडल्या जातात. या पद्धतीला अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणतात. मोकाट किंवा अर्धबंदिस्त शेळी पालनासाठी कुरणांची गरज असते. परंतु सध्या कुरणे कमी होत चालली आहेत. त्यामुळे पुढच्या काळात बंदगोठा शेळीपालन हा प्रकारच अधिक व्यवहार्य ठरणार आहे.
मोकाट शेळी पालनामध्ये आंतरप्रजनन होत असते. त्यामुळे शेळीचा दर्जा घसरतो. पण बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण प्रजननावर नियंत्रण ठेवू शकतो. बंदिस्त पालनात शेळ्यांच्या चार्यावर आणि आहारावर खर्च होतो ही गोष्ट खरी आहे. परंतु आपण व्यवस्थित चारा आणि आहार देत असल्यामुळे या पद्धतीतील शेळ्यांचे वजन भराभर वाढत जाते. जी गोष्ट मोकाट शेळी पालनात शक्य नाही.
गोठा कसा असावा
बंदिस्त शेळी पालनाचा आणखी एक ङ्गायदा म्हणजे आपण या पद्धतीत शेळ्यांच्या रोगराईवर नियंत्रण आणि लक्ष ठेवू शकतो. बंदिस्त शेळीपालन करणार्यांनी आपल्या पारंपरिक पद्धतीनेच गोठा तयार करावा. या गोठ्यामध्ये दोन भाग करावेत. निम्म्या भागावर छप्पर असावे तर निम्मा भाग छपराविना परंतु आजूबाजूने कुंपण असलेले असावे. म्हणजे काही काळ शेळ्या छपराच्या गोठ्यात राहतील आणि काही काळ मोकळ्या हवेला छप्पर नसलेल्या गोठ्यात येतील.
कोंबड्याप्रमाणे त्यांना चोवीस तासात छपराच्या गोठ्यात बांधण्याची गरज नाही. गोठा थोडा उंचावर बांधावा. त्यात हवा खेळावी यासाठी आजूबाजूला जाळी असावी. तसेच पावसाचे पाणी गोठ्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. सिमेंट पाईपचे दोन अर्ध गोलाकार तुकडे करून त्यांच्या गव्हाणी बनवाव्यात. त्या गव्हाणीमध्ये चारा आणि खुराक टाकता यावा.
अशाच पाईपाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठीही करता येईल. हा गोठा बांधताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, गोठा बांधण्यासाठी फार खर्च करू नये. क्रॉंक्रिटच्या भिंती, सिमेंटचे पत्रे यांची काहीही आवश्यकता नाही. मात्र कोणाला हौस म्हणून पॉश गोठा बांधायचा असेल तर त्यांना कोण अडवणार ? परंतु अशा गोठ्यावर होणारा खर्च हा अनुत्पादक खर्च असतो आणि तो शेळ्यांच्या व्यवसायातून वसूल होणे अवघड जाते. मग नफ्या-तोट्याचे गणित बिघडते.
शेळ्यांचे आरोग्य
शेळी पालन उद्योगामध्ये शेळीचे आरोग्य हा विषय सर्वात महत्वाचा असतो. त्यामुळे शेळीचा गोठा तयार करताना आरोग्याचा विचार करावा लागतो. विशेषत: शेळ्यांचे मलमूत्र त्या गोठ्यात साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी लागते.
शेळ्यांच्या विविध रोगांसाठी द्यावयाच्या लसी वेळेवर दिल्या तसेच अधूनमधून आवश्यक असलेले औषध त्यांना देत गेलो तर शेळ्या रोगराई होऊन मरण्याची शक्यता नसते. शेळ्यांच्या अंगावर गोचीड, पिसवा, उवा, लिखा यांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्यांना अधूनमधून गोचीडनाशक पाण्याची आंघोळ घालावी.
शेळ्यांना जंतनाशक औषध सुद्धा पाजावे लागते. ते वर्षातून दोनदा पाजले जाते. अशा औषधांची माहिती आणि उपचार यासंबंधी आपल्या नजिकच्या जनावरांच्या दवाखान्यात जाऊन चौकशी करावी. त्यातल्या काही लसी या दवाखान्यात मिळत असतात. त्यांचा वापर करावा. शेळ्यांवर असा इलाज करूनही शेळी काही अनामिक कारणाने मरू शकते. तिच्या अशा मृत्यूनंतर तिची भरपाई मिळण्यासाठी शेळीचा विमा उतरवावा. मध्येच शेळी अचानक मेली तर विमा कंपनीकडून भरपाई मिळू शकते.
महाराष्ट्रामध्ये शेळी पालनाच्या व्यवसायाला चांगला वाव आहे आणि शेतकर्यांची या व्यवसायामुळे आर्थिक अरिष्टातून सुटका होऊ शकते हेही लक्षात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन सुद्धा या व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अशा उद्योगांचे प्रशिक्षण देणार्या संस्था शेळी पालनाचे प्रशिक्षण देणारे वर्ग आयोजित करीत आहेत. ज्या शेतकर्यांना बंदगोठा शेळी पालन करण्यामध्ये रूची असेल आणि या व्यवसायात काही करण्याची इच्छा असेल त्या शेतकर्यांनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा. या दोन संस्थांच्या मार्फत काही माफक फी घेऊन भरवल्या जाणार्या १२ दिवसांच्या शेळीपालन वर्गात सहभागी व्हावे. त्यातून शेळी पालनाविषयीच्या सर्व अंगोपांगांची माहिती त्रोटक स्वरुपात का होईना पण मिळू शकते.
सांघिक शेळी पालन
शेळी हा असा एक प्राणी आहे की, ज्या प्राण्याचे पूर्ण शरीरच उपयोगाचे असते. आपण फक्त मटणाचा विचार करतो. पण शेळीची कातडी, शिंग, खूर, हाडे आणि केस यांचे किती उपयोग होतात याचा आपण कधी विचारच करत नाही. हा प्रत्येक अवयव उपयोगाचा असतो. शेळीच्या कातडीचा उपयोग तर कसा होतो असतो हे आपल्याला माहीतच आहे. पर्स, बॅगा तयार करण्यासाठी ही कातडी वापरली जाते.
त्यानंतर हाडे. बर्याच जणांना हाडांचा एक उपयोग माहीत आहे, तो म्हणजे खत म्हणून. कोणत्याही जनावरांच्या हाडांची भुकटी शेतामध्ये खत म्हणून उपयुक्त असते. परंतु शेळीच्या हाडांची पावडर टूथ पेस्टमध्ये मिसळली जाते. म्हणजे आपण ज्या टूथपेस्टने दात घासतो तिच्यात शेळीच्या हाडांची पावडर मिसळलेली असते. हाडांमध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे टूथपेस्टमध्ये ती मिसळली की, त्या टूथपेस्टमुळे दात मजबूत होतात, हा त्यामागचा विचार असतो.
शेळीच्या शिंगापासून हस्तकलेद्वारा काही आकर्षक शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. अशा वस्तू परदेशात पाठविल्या तर त्यांना चांगली किंमत येते. आपण एखादी शेळी किंवा बोकड दोन किंवा तीन हजाराला विकून टाकतो, परंतु शिंगांचा योग्य वापर करणारा मासूण नुसत्या शिंगापासून दोन हजार रुपये कमवू शकतो. तशीच अवस्था खुरांची सुद्धा असते. शेळीच्या आणि बोकडांच्या खुरापासून शर्टाच्या गुंड्या (बटन) बनवल्या जातात.
मेंढ्यांच्या केसापासून लोकर तयार होते हे तर सर्वांना माहीतच आहे. परंतु शेळीचे केस सुद्धा उपयुक्त असतात. या केसापासून पश्मिना नावाचा कपडा तयार होतो. हा कपडा फार महाग असतो. विशेषत: कोटांच्या आतल्या बाजूला अस्तर म्हणून पश्मिना कापड वापरले जाते. पश्मिना कापडाच्या शाली आणि गरम कपडे ङ्गार महाग असतात. पश्मिनाचे एखादे स्वेटर साधारणत: हजार रुपयांना विकले जाते. शेळीच्या केसापासून हा कपडा तयार करण्याचे कसब काश्मीर आणि तिबेटमधल्या काही विशिष्ट कलाकारांनाच अवगत आहे.
महाराष्ट्रातल्या शेतकर्यांनी आपल्या शेळ्या निव्वळ विकून न टाकता सामूहिकरित्या कत्तलखाने उभे केले तर शेळीचे केस, खूर, शिंग, हाडे आणि चामडी या सर्वांचे पैसे शेतकर्यांच्याच पदरात पडू शकतील. म्हणून शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन आपले स्वत:चेच कत्तलखाने उभे करणे फायद्याचे ठरणार आहे.