घराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण

आपल्या रोजच्या आयुष्यात लागणारया ज्या वस्तू आहेत त्यात स्वच्छतेसाठी साबण ही एक महत्वाची गरज आहे. काही कारणाने नोकरीसाठी घराबाहेर पडू न शकणाऱ्या महिलांना घरबसल्या कमाई कशी करावी अशी चिंता सतावत असते. याचे कारण म्हणजे दररोज वाढती महागाई आणि घर चालविण्याचा वाढलेला खर्च यांचा मेळ एकट्याच्या जीवावर होण्याऱ्या कमाईबरोबर घालणे अवघड होते. यामुळे अनेक महिलांना आपणही या घरखर्चाचा काही भाग उचलावा अशी इच्छा असते.

घरातून व्यवसाय सुरु करायचा तर जो व्यवसाय कमी जागेत, फावल्या वेळात आणि कमी गुंतवणुकीत करता येईल त्यालाच प्रथम प्राधान्य दिले जाणार हे तर उघडच आहे. असाच एक फायदेशीर ठरणारा व्यवसाय आहे नैसर्गिक साबण तयार करणे. ज्यांना कलेची आवड आहे आणि कल्पनाशक्ती चांगली आहे अश्यांसाठी हा व्यवसाय कमाई बरोबरच त्यांच्या कलेची आवड पूर्ण करून देणारा ठरू शकतो. घरातील गृहिणी, शिक्षण घेत असलेल्या मुली किंवा पार्टटाईम नोकरी करणाऱ्या महिला, मुली सुद्धा हा व्यवसाय करू शकतात.

आज बाजारात शेकडो प्रकारचे, विविध सुगंधाचे, रंगांचे आणि आकाराचे आणि आकर्षक पॅकिंग मधील साबण उपलब्ध आहेत, आणि ते खरेदी करण्यासठी फार पैसे मोजावे लागत नाहीत. त्या तुलनेने नैसर्गिक पद्धतीने बनविलेले साबण महाग आहेत तरीही बाजारात अश्या नैसर्गिक साबणांना चांगली मागणी आहे. आरोग्य जागृतीमुळे ही मागणी वाढत चालली आहे. हे साबण त्वचेसाठी सुरक्षित असतात. त्यात आजकाल ‘ऑर्गनिक’ शब्द जादुई बनला असल्याने असे ऑर्गनिक साबण आवर्जून खरेदी करण्याकडे कल वाढता आहे.

विशेष म्हणजे छोट्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर आपल्या स्वयंपाकघरात सुद्धा साबण बनविता येतात. त्यासाठी लागणारा कच्चा माल बाजारात उपलब्ध आहे. उत्तम दर्जाची लाय, नैसर्गिक सुगंधासाठी विविध नैसर्गिक पदार्थांचा, सुगंधी तेलांचा वापर आणि नैसर्गिक रंग वापरले तर उत्तम दर्जाचे साबण तयार होऊ शकतात. अर्थात या व्यवसायासाठी अगदी घरी करायचा असला तरी, थोडे प्रशिक्षण घेणे फायद्याचे ठरते तसेच व्यवसायाचा व्याप वाढला तर काही परवाने घ्यावे लागतात. ऑर्गनिक प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते.

उत्पादन विकायचे तर जाहिरात हवी. त्यासाठी थोडा खर्च करावा लागतो पण सोशल मीडियाचा हुशारीने वापर या कामासाठी करून घेता येतो. विशेष म्हणजे या व्यवसायातून तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि त्यामुळे तुमच्या उत्पादनाचे वेगळेपण ग्राहकांच्या मनावर ठसवून ग्राहक कायम राखता येतात. स्पा, ब्युटी पार्लर्स हेही तुमचे ग्राहक बनू शकतात त्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतात.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा

शेअर करा

Leave a Comment