असा करू शकता घरी बनविलेल्या साबणाचा व्यवसाय

एकंदरीत आज जीवनमान उंचावल्याने तसेच वाढत्या महागाईमुळे पती पत्नी दोघांनाही कमाई करावी लागते. अर्थात काही महिला अनेक कारणांनी घराबाहेर जाऊन नोकरी व्यवसाय करू शकत नाहीत. मात्र घरबसल्या, घराच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून फावल्या वेळात घरीच काही उद्योग, व्यवसाय करून घरखर्चाला हातभार लावू शकतात. कमी भांडवल आणि कमी जागेत आणि कमी मनुष्यबळ वापरून करता येणारे असे अनेक व्यवसाय आहेत. येथे आम्ही असाच एक व्यवसाय- घराच्या घरी नैसर्गिक साबण कसा बनविता येईल याची माहिती देत आहोत.

साबण ही रोजच्या वापराची वस्तू आहे. आज बाजारात अनेक प्रकारचे, अनेक रंगांचे, अनेक सुगंधाचे आणि अनेक किमतींचे स्नानासाठी वापरले जाणारे साबण उपलब्ध आहेत. घरी बनविलेल्या साबणाच्या तुलनेत त्यांच्या किमती स्वस्त आहेत. पण मुख्य फरक असा आहे की हे साबण पेट्रोलियम पदार्थ आणि अन्य कृत्रिम रसायने वापरून बनविले जातात. त्यामुळे ते अधिक काळ टिकणारे, वापरल्यावर दीर्घ काळ सुगंध देणारे असले तरी हे साबण दीर्घकाळ वापरात राहिले तर त्वचेला नुकसान पोहोचवितात हे आता लक्षात येऊ लागले आहे.

त्यामुळे नैसर्गिक पदार्थांचा वापर करून बनविलेल्या ऑर्गनिक साबणाची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अश्या प्रकारे बनविले गेलेले साबण त्वचेसाठी, हातांसाठी अधिक मुलायम, हानी न पोहोचविणारे ठरतात. हे नैसर्गिक साबण घराच्या घरी कसे बनविता येतील या संबंधी माहिती देण्याचा प्रयत्न येथे करत आहोत.

तुम्ही हौस म्हणून या व्यवसायाची सुरवात छोट्या प्रमाणावर केली तरी कालांतराने त्यात प्राविण्य मिळवून एका चांगला नफा देणारा व्यवसाय म्हणून त्याचे स्वरूप बनवू शकता. घरबसल्या पैसे मिळविण्याचा हा चांगला पर्याय आहेच पण ज्या महिलांकडे थोडी कल्पना शक्ती आहे, कलेची आवड आहे त्या महिला यात चांगलेच बस्तान बसवू शकतात. गृहिणीच्या साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळून हा व्यवसाय उत्तम प्रकारे सांभाळता येतो. महिलाच नव्हे तर कॉलेज मध्ये शिकणाऱ्या मुली, पार्ट टाईम काम करणाऱ्या महिला मुली याही हा व्यवसाय करून चांगली कमाई करू शकतात.

घरगुती साबणाची खासियत 

घरी बनविलेल्या साबणात कोणत्याही प्रकारची प्रिझर्वेटीव्ह नसतात, दीर्घकाळ सुगंध रेंगाळत राहावा म्हणून घातलेली कृत्रिम सुगंधी द्रव्ये नसतात. बाजारात मिळणारया साबणाला आपण खरा साबण म्हणू शकत नाही. व्यावसायिक पातळीवर बनविले जातात ते एक प्रकारचे कृत्रिम डिटर्जंट किंवा syndet म्हणजे साबण नसलेले साबण असतात. अर्थात यात साबण अगदी थोड्या प्रमाणात असतो पण त्यात डिटर्जंट मुख्य स्वरुपात असतात. ते पेट्रोलियम पदार्थापासून बनविले जातात. पेट्रोलियम पदार्थांवर पाण्याचा फारसा परिणाम होत नसल्याने ते दीर्घकाळ टिकतात. कृत्रिम सुगंधी द्रव्यांचा वापर त्यात केला जातो त्यामुळे स्नान केल्यावर या साबणाचा सुगंध बराच वेळ दरवळतो.

आजकाल मात्र नैसर्गिक पदार्थपासून बनलेले साबण वापरण्याबाबत लोकांची जागृती होऊ लागली असून अशा साबणांकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. परिणामी त्यांना मागणी वाढते आहे. यात प्रामुख्याने नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जात असल्याने त्यात वैविध्य आणता येते. कारखान्यात तयार होणाऱ्या एकसारख्या दिसणाऱ्या, कृत्रिम सुगंधाच्या साबणांपेक्षा लायचा वापर करून बनविलेले उत्तम दर्जाचे साबण बनविण्याची कला साध्य करता आली तर ते पुढे जाऊन एक कौशल्य बनू शकते.

साबण व्यवसायाच्या पायऱ्या 

हा व्यवसाय जरी घरात करता येत असला तरी तो कसा सुरु करायचा, त्यासाठी काही टप्पे पार पडावे लागतात. ते खालीलप्रमाणे 

 • सर्वप्रथम साबण बनविण्याचे तंत्र शिकून घेणे 
 • जागा 
 • साबण बनविण्याची प्रक्रिया 
 • उपकरणांची गरज 
 • कच्चा माल खरेदी
 • बाजारभाव 
 • परवाने
 • जाहिरात
 • विक्री 

हे मुद्दे लक्षात घेतानाच कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याची माहिती घेणेही उपयुक्त आहे.

१)तंत्रज्ञान – साबण घरी बनविण्याची सुरवात करण्यापूर्वी त्या प्रक्रियेची माहिती करून घेण्याची, त्यासाठी काही शिक्षण घेण्याची गरज असल्यास ते घेण्याची तयारी हवी. साबण अनेक प्रकारे बनविले जातात. त्या प्रामुख्याने 

मेल्ट अँड पोअर म्हणजे वितळावा आणि ओता प्रक्रिया 

रिबॅचिंग प्रोसेस

हॉट प्रोसेस मेथड 

कोल्ड प्रोसेस मेथड  यांचा समावेश होतो.

तंत्रज्ञान – साबण व्यवसाय सुरु करण्यापूर्वी तंत्रज्ञान माहिती करून घायला हवे तसेच हा व्यवसाय करताना काय टाळायला हवे आणि काय स्वीकारायला हवे हे समजावून घेणेही उपयुक्त ठरते. प्राथमिक ज्ञान आत्मसात केल्यावर तुम्ही सहजपणे आणि थोडक्या वेळात साबण निर्मिती करू शकता. यासाठी पुस्तके, यु ट्यूब यातून माहिती मिळेल. पण प्राथमिक ज्ञान देण्यासाठी खास कोर्सेस, शाळा, शिक्षण सुविधा पुरेश्या नसल्याने साबण बनविण्याच्या कार्यशाळा असतील तेथे जाणे गरजेचे ठरते. यासाठी साधारण १२०० रुपयापासून ८ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते.

जागा – जागा हा व्यवसाय सुरु करण्यासाठी फार मोठा प्रश्न नाही. तुम्ही साबण बनविण्याची सुरवात स्वयंपाकघरात, डायनिंग भागात, एखाद्या छोट्या वर्कशॉप मध्ये सुद्धा करू शकता. त्यासाठी फार भांडवल गुंतविण्याची गरज नाही. पण साहित्य, भांडी साठी काही गुंतवणूक करावी लागेल.

साबण बनविण्याची प्रक्रिया – 

या लेखात आपण हा व्यवसाय सुरु करणाऱ्यांना मेल्ट अँड पोअर या पद्धतीची माहिती देणार आहोत. त्यातून तुमची शिक्षण प्रक्रिया सुरु होऊ शकेल. कमी खर्चात सुरवात करण्यासाठी ही प्रक्रिया चांगली आहे. त्यातून काही जण कोल्ड प्रेस कडेही जाऊ शकतात. साबण बनविण्याच्या प्रक्रीयेसाठी तीन प्रकारचे साहित्य गरजेचे आहे.

 1. सोप बेस. साबण बनविण्यासाठी लाय द्रावण करावे लागते. हे द्रावण सोडियम, पोटॅशियम हायड्रोक्साईड तीव्र द्रावण असते. पण बाजारात खडे किंवा क्रिस्टल स्वरुपात ते तयार मिळते. तेच विकत आणावे. कारण हायड्रॉक्साईडचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा लागतो. अन्य साहित्यात उत्तम दर्जाचे नारळ दुध, मध, शे बटर, बकरी किंवा शेळीचे दुध, सुगंधासाठीचे बेस म्हणून कोरफड, मध, गुलाब, लिंबू, पपई वगैरे वस्तूंचा समावेश होतो.

ब) आवश्यक तेले –साबणाला चांगला सुगंध हवा तसेच तो त्वचेसाठी फायदे देणारा आणि मनोवृत्ती उल्हासित करणारा हवा. त्यासाठी शुध्द नैसर्गिक तेलांचा वापर करायला हवा. त्यात लव्हेंडर, मोसंबी, लिंबू, गुलाब, चंदन, लवंग असे अनेक पदार्थ वापरता येतील.

क)नैसर्गिक पदार्थ – साबण अधिक गुणवत्तापूर्ण व्हावा यासाठी वाळविलेल्या लिंबू चकत्या, संत्र्यांच्या साली, दळलेली कॉफी, मसाले असे अनेक पदार्थ वापरता येतात.

असा तयार करायचा साबण 

प्रथम ५०० ग्राम सोप बेस कापून छोट्या छोट्या साच्यात घालायचा. मग डबल बॉयलर वापरून तो वितळावा. पूर्ण वितळेपर्यंत सतत ढवळत राहा. नंतर आचेवरून अत्रवून त्यात ४-५ थेंब तेल घालून चांगले मिक्स करा. वासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी त्यात मसाले, वाळलेली फुले, मिक्स करून सिलिकॉन मोल्ड मध्ये ७ ते ८ तास सेट करायला थंड जागी ठेवा. 

विशेष सूचना– मोल्ड साचे ५० ग्राम सोप बेस बसेल असे असतील तर १ किलो मध्ये १८ ते २० साबण वड्या तयार होतील. काही भाग वाया जाईल. आपले मोल्ड नक्की काय साईजचे आहेत हे माहिती नसेल तर एका मोल्ड मध्ये पाणी ओतून ते पाणी मोजून घ्या. १ मिली म्हणजे अंदाजे १ ग्राम असा हिशोब करू शकता.

आवश्यक उपकरणे 

व्यवसायासाठी छोटी जागा चालेल पण स्वतंत्र जागा असेल तर उत्तम. अनेक जण किचन मध्ये साबण बनवितात. मात्र एकदा का मागणी वाढली की स्वयंपाकघर अथवा छोट्या जागेत व्यवसाय व्यवस्थापन करणे अवघड होऊ शकते. घरातच व्यवसाय सुरु करणार असला तर खालील प्रमाणे उपकरणे हवीत.

 • मायक्रोवेव्ह किंवा डबल बॉयलर 
 • साबण साचे
 • कंटेनर
 • ग्लोव्ज 
 • डोळे संरक्षणासाठी चष्मे 
 • लेबल मेकर, प्रिंटर, सॉफ्टवेअर
 • प्लास्टिक रॅप किंवा रॅपिंग शीट
 • बेसिक मोल्ड साठी साधारण २०० ते १५०० रुपये लागतात. फॅन्सी, आकर्षक डिझाईनचे मोल्ड भाड्यानेही मिळतात. तुमच्या कडे चांगली कल्पना शक्ती असेल तर अनेक प्रकारचे मोल्ड वापरू शकता. वरील गोष्टींसाठी ५० ते ६० हजार खर्च येऊ शकतो.

कच्चा माल कुठून आणि कसा आणावा 

साबण तयार करण्यासाठी तेल आणि लाई हे मुख्य साहित्य आहे. पण तुमच्या उत्पादनाचा वेगळेपणा टिकविण्यासाठी खोबरेल तेल, ऑलीव्ह तेल, बदाम तेल, अन्य नैसर्गिक सुगंधी तेले वापरू शकता. साबणाचे रूप,स्पर्श चांगला येण्यासाठी आणि पुरेसा फेस होण्यासाठी विविध प्रकारची सुगंधी द्रव्ये, नैसर्गिक पदार्थ वापरता येतात. सुरवात करताना प्रथम एक दोन व्हरायटी पासून करावी मात्र नैसर्गिक सुगंधाला प्राधान्य द्यावे. हर्बलचा वापर करू शकता.

साबण उत्पादन तुम्ही सातत्याने करणार असाल तर तेल, सेंट्स, रंग, रॅपर्स, यांचा सतत पुरवठा हवा. तुम्ही या गोष्टी स्वतः बाजारात जाऊन खरेदी करू शकता. पण खरेदी साठी जाणारा वेळ वाचविण्यासाठी आणि पैसा वाचविण्यासाठी तुम्ही या वस्तू पुरविणाऱ्या सप्लायर कडून त्या थेट घरपोच मागवू शकता. ऑनलाईनवरुन सुद्धा मागवू शकता.  याचाच अर्थ कच्चा माल म्हणून तुम्हाला आवश्यक तेले, मोल्ड म्हणजे साचे, रंग, उपकरणे, सुगंध द्रव्ये लागणार आहेत.

साबण बनविताना हे टाळले पाहिजे 

तुम्ही ऑर्गनिक साबण बनविणार आहात. त्यात अनेक वनस्पती वापराव्या लागतील. सर्वात महत्वाचे म्हणजे अशा वनस्पती, फुले, फळे यांचा वापर करताना त्या पूर्णपणे सुकलेल्या आणि पावडर स्वरुपात असतील याची काळजी घ्यायला हवी. फ्रेश लायमध्ये हे पदार्थ विरघळतात पण अनेकदा ते पूर्ण विरघळले नाहीत तर न विरघळलेला भाग कुजू शकतो. अनेकदा ताज्या वनस्पती, फुले वापरली तर त्यातील आर्द्रतेमुळे साबण व्यवस्थित सेट होत नाहीत. तुम्ही वापरत असलेली फळे, फुले, मसाले व अन्य हर्बल वनस्पतींचे गुणधर्म साबणात यायला हवे असतील तर हे पदार्थ पूर्णपणे वाळविलेल्या आणि पावडर किंवा पूड स्वरुपात वापरावे.

जुनी लाय नको– साबणाचा बेस पदार्थ लाय जुना नको. तुम्ही क्रिस्टल स्वरुपात किंवा खडे स्वरूपातील लाय वापरणार आहात. ती फार जुनी असेल तर हे खडे मोठ्या आकाराचे असतील तर वितळवताना ते पूर्ण पणे वितळत नाहीत. लाय फार महाग नसते आणि सहज उपलब्ध असते त्यामुळे दरवेळी फ्रेश लाय घेण्याची काळजी घ्या.

सर्वात महत्वाचे म्हणजे पोटॅशियम हायड्रोक्साईड आणि सोडियम हायड्रोक्साईड यात गोंधळ करू नका. पोटॅशियम हायड्रोक्साईड लिक्विड सोप साठी वापरले जाते तर सोडियम हायड्रोक्साईड वडी स्वरूपातील साबण बनविण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे एकाऐवजी दुसरे असा वापर नको.

साबण बनविण्यासाठी १०० टक्के सोडियम हायड्रोक्साईड म्हणजेच लाय हवी. काही वेळा ड्रेन क्लीनर्स मध्ये अॅडीटीव्ह्ज असतात आणि त्यात काही वेळा अल्युमिनीयम असते. त्यामुळे लाय आवश्यकतेपेक्षा जास्त गरम होऊ शकते याची काळजी घ्यावी. लिक्विड लायचा वापर करू नये करण त्याची तीव्रता आपल्याला माहिती नसते. तसेच त्यात काही मिसळले गेले असेल तर त्याचीही माहिती मिळत नाही.

पाणी कोणते वापरावे 

साबण बनविताना वापरले जाणारे पाणी फिल्टर्ड हवे. विहिरीतील पाणी थेट वापरले तर त्यात जीवजंतू, क्षार, धातू असू शकतात. तसेच नळाच्या पाण्यात क्षार, क्लोरीन, परजीवी जंतू असू शकतात.

रंग कोणते वापरावे

साबण बनविण्यासाठी खास रंग असतात तेच वापरले पाहिजेत. अनेकजण खाद्य पदार्थात वापरायचे रंग वापरतात ते चुकीचे आहे. खाद्य रंग वॉटर बेस्ड असतात. साबण ऑईल बेस्ड आहे त्यामुळे हे रंग त्यात मिसळत नाहीत तर थेंब स्वरुपात राहतात. त्यामुळे त्वचेवर, कपड्यांवर डाग पडू शकतात.

दुसरे म्हणजे साबण बनविताना सुगंधी तेले उत्तमच ठरतात पण अर्क वापरू नयेत. अर्कामध्ये अल्कोहोल असते. हे अल्कोहोल साबणात मिक्स झाले तर तो घट्ट म्हणजे दगडासारखा बनतो. 

अनेकदा कुठून तरी माहिती मिळविली जाते आणि लसूण, बेबी पावडर, बेकिंग सोडा, ड्रिंक मिक्स पावडर असले विचित्र प्रकार साबण बनविताना वापरले जातात. ते मात्र कटाक्षाने टाळायला हवे. असले पदार्थ चुकूनही वापरू नयेत.

परवाने 

मोठ्या प्रमाणावर तुम्हाला हा व्यवसाय करायचा नसेल तर साबण बनविण्यासाठी काही खास कोर्सेस किंवा परवाने नाहीत. तुम्ही तुमच्यासाठी, मित्रमंडळ किंवा नातेवाईक यांच्यासाठी घरी साबण बनवू शकता. पण तुम्हाला व्यवसाय वाढवून व्यावसायिक पातळीवर उत्पादन करायचे असेल तर मात्र परवान्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यासाठी अगोदर 

 • एफडीए कडून संमती
 • सरकारी क्लिअरंसेस
 • औषध नियंत्रण मंडळ (ड्रग कंट्रोल बोर्ड)
 • वजन मापे मंडळ
 • प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र
 • लघु उद्योग नोंदणी
 • ऑर्गनिक प्रमाणपत्र अशी कागदपत्रे मिळवावी लागतील.

अर्थात यासाठी सुद्धा खर्च येतो. त्यात व्यवसाय नोंदणी शुल्क, विमा, परवाने व अन्य नोंदण्या, ना हरकत प्रमाणपत्रासाठी खर्च, भाड्याची जागा असेल तर त्याचे भाडे, उपकरणे पुरवठा यासाठी साधारण ५० ते ६० हजार तसेच वेबसाईट (यात डोमेन होस्टिंग, ई कॉमर्स साईट डेव्हलपमेंट,) यासाठी साधारण ४० हजार असा खर्च येईल. शिवाय बिझिनेस कार्ड, जाहिराती यासाठी वेगळा खर्च करावा लागेल.

हा खर्च केला तरी तुमचा साबण तुम्ही असा बनवायला हवा की गुणवत्तेत तो उच्च दर्जाचा असेल. ग्राहकाने तो वापरल्यावर समाधान व्हायला हवे. यामुळे तुम्हाला ग्राहकांकडून परतपरत मागणी येते आणि गुंतवणुकीचा खर्च त्यातून निघू शकतो. साबण व्यवसाय सुरु करताना आपल्याला डझनावारी वड्या विकायच्या आहेत हे लक्षात घेऊन त्याचा दर्जा सांभाळला जायला हवा.

किंमत कशी ठरवाल

तुमचा साबण ऑर्गनिक आहे आणि नैसर्गिक पदार्थांपासून बनविला गेला आहे हे तुम्हीच प्रथम लक्षात ठेवायला हवे. बाजारात रासायनिक पदार्थांपासून बनलेले साबण २० रुपयांपासून मिळतात तर लग्झरी श्रेणीतील काही हँडमेड सोप खुपच महाग असतात. सर्वसामान्य हँडमेड साबणे सुद्धा फार स्वस्तात विकणे परवडत नाही. लग्झरी हँडमेड सोप २०० ते ३०० रुपयांपर्यत मिळतात. तुम्ही तुमच्या कच्च्या मालाचा खर्च, पॅकेजिंग व अन्य खर्च यांचा हिशोब करून त्यानुसार किंमत ठरविली पाहिजे. पण सर्वसाधारण पणे असे साबण ८० ते १०० रुपये प्रती वडी या दराने विकले जाऊ शकतात.

विपणन खर्च (मार्केटिंग कॉस्ट)

फक्त बाजाराचा अभ्यास करून मालाची विक्री करण्यात यश येत नाही. तर बाजाराचा ट्रेंड जाणून घेऊन आपल्या उत्पादनाची उपलब्धता सतत राहील याची काळजी घ्यावी लागते. तोंडी जाहिरात सर्वात उत्तम. पण सोशल मिडिया, बिझिनेस कार्ड्स, आकर्षक डिस्प्ले, ऑनलाईन जाहिराती, परंपरागत म्हणजे टीव्ही, रेडियोवर जाहिराती यांचाही आधार घेणे उपयुक्त ठरते. समजा व्यवसाय छोट्या स्वरुपात असेल तर स्थानिक बाजारात जाहिरात फलक, प्रिंटेड जाहिराती, स्थानिक वर्तमानपत्रात जाहिराती, स्थानिक व्यवसाय एजंट बरोबर नेटवर्क स्थापन करणे, ग्राहकांशी संपर्क वाढविणे यांचाही उपयोग करून घेता येतो.

साबण उत्पादकांच्या बरोबर चर्चा  करता आल्या तर त्यातून अधिक माहिती मिळविता येते. ओळखी वाढतात. उत्पादन सादर करताना स्थानिक दुकाने, ब्युटीपार्लर, स्टोर्स, गिफ्ट शॉप अश्या ठिकाणी डिस्काऊंट देऊन तुम्ही विक्रीची सुरवात करू शकता. शक्य असेल तर फ्री सँपल्स द्या.

स्थानिक जत्रा, प्रदर्शने, तंबू मार्केट येथे व्यवसायाची सुरवात करून विक्री कौशल्य मिळविण्याचा अनुभव घेता येतो. किस्कोज मध्ये सुद्धा चांगली विक्री होऊ शकते.

तुम्हाला एखाद्या मार्केटिंग एजन्सीकडून तुमची जाहिरात करायची असेल तर त्यासाठी १२ ते १५ हजार खर्च येऊ शकतो. 

ऑनलाईन किंवा डिजिटल मार्केटिंग

कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल माध्यमांचा प्रभावी वापर करून लोकांपर्यंत अगदी सहजरीत्या आपले प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस पोहचवू शकतात आणि यालाच सोप्या भाषेत डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात.

हा घरगुती ऑर्गनिक साबण व्यवसाय चांगला चालविण्यासाठी तुमच्या उत्पादनाची माहिती देईल असे तुमचे सोशल मिडिया पेज असणे फायद्याचे ठरते. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअपवर ग्राहक तुमचे काम पाहू शकतात. विशेष म्हणजे त्यामुळे तुमचे उत्पादन समाजाच्या सर्व थरात पोहचू शकते . 

व्यावसायिक वेबसाईटवर तुमच्या उत्पादनाचे आकर्षक फोटो फार महत्वाचे ठरतात. तुमचे वेब ग्राहक साबणाचा स्पर्श किंवा सुगंध अनुभवू शकत नाहीत. त्यामुळे ऑनलाईन साईट वर तुमचा साबण कसा दिसतो यावरून तुमचे उत्पादन चांगल्या दर्जाचे आणि गुणवत्तेचे आहे हे त्यांना पटले पाहिजे. यासाठी आकर्षक फोटो हवेत. 

या कामी ग्राफिक डिझायनर व वेब डेव्हलपर यांची मदत घेऊ शकता. ते हे काम चांगले करू शकतात. तुमचा लोगो आणि डिजिटल उपस्थिती यासाठी ते मदत करू शकतात. ग्राफिकवरील पॅकेजिंग. लेबल प्रतिमांवरून तुमचे तुमच्या व्यवसायाबद्दलचे पॅशन किंवा ओढ आणि तुमची उत्पादने उत्तम दर्जाची असणार यासाठीची तुमची बांधिलकी दर्शविता येते.

ऑनलाईन किंवा डिजिटल मार्केटिंग चे अजून बरेच पैलू आहेत जे आपण्यास जाणून घ्यावे लागतील डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

विक्री कुठे कराल 

तुमच्या साबणाच्या विक्रीची सुरवात प्रथम स्थानिक पातळीवर करणे केव्हाही चांगले. त्यानंतर तुम्ही विक्री क्षेत्राचा विस्तार करू शकता. तुमचा स्वभाव मिळून मिसळून राहण्याचा असेल तर सुरवातीला तुम्ही मित्रमंडळी, परिचित, नातेवाईक यांच्यापासून विक्रीची सुरवात करू शकता. त्यांना सुरवातीला नमुना द्या, वापरायला सांगा आणि मग साबण कसा आहे याची विचारणा करा. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादावरून तुम्हाला उत्पादनात काही सुधारणा आवश्यक असतील तर त्या करण्याची संधी मिळेल.

हाताने घरगुती स्वरुपात बनविलेले साबण त्यातही हर्बल, ऑर्गनिक साबण महाग पडतात. तुम्हाला तुमचे साबण बाजारातील साबणापेक्षा अधिक महाग का आहेत हे ग्राहकांना पटवून देता यायला हवे. भारतीय बाजाराचा विचार केला तर हळू का होईना पण ग्राहक ऑर्गनिक उत्पादनांकडे वळतो आहे असे दिसते. काही वर्षांपूर्वी ही उत्पादने चैनीची म्हणून त्याकडे पाहिले जात होते पण आता तशी परिस्थिती नाही.

रिटेल जागा-

अनेक उत्पादक मॉल्स मध्ये असलेल्या किस्कोचा वापर वीकएंड सेल साठी करताना दिसतात. म्हणजे आठवडाभर उत्पादन करायचे आणि शनिवार रविवारी ते अशा किस्कोज मधून विकायचे. वेस्टएंड, रिलायंस व अन्य अनेक ठिकाणी अश्या चांगल्या उत्पादनांची त्यांच्या स्टोर्स मध्ये डिस्प्ले करण्यासाठी मागणी असते.

रिलायंस, बिग बझार सारख्या कंपन्यांशी तुम्ही संपर्क करू शकता. या कंपन्या ग्राहकांना सतत नवे, काहीतरी फ्रेश देण्यासाठी छोट्या उद्योजकांकडून नवीन फ्रेश उत्पादनांना प्राधान्य देत असतात.

तुमचे उत्पादन म्हणजे येथे साबण विक्री वाढावी यासाठी सौंदर्य स्पर्धा, फॅशन शो, स्थानिक मेळावे येथे तुम्ही प्रायोजक होऊ शकता. अशा कार्यक्रमांचे आयोजक नेहमीच प्रयोजाकाच्या शोधात असतात. तेथे तुम्ही रोख स्वरुपात अथवा तुमची उत्पादने बक्षीस स्वरुपात ठेऊन ग्राहकांच्या नजरेत भरण्याचे, तुमची उत्पादने लोकांच्या लक्षात आणून देण्याचे काम करू शकता.

आदरातिथ्य म्हणजे हॉस्पिटॅलिटी चेन, ब्युटी पार्लर, स्पा, होम स्टे, ब्रेड अँड ब्रेकफास्ट ठिकाणे त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच चांगल्या आणि वेगळ्या उत्पादनाच्या शोधात असतात. अनेक हॉटेल्स ग्राहकांना वेल कम गिफ्ट देतात. तेथे थोड्या कमी किमतीत तुम्ही तुमच्या उत्पादनासाठी ऑर्डर मिळवू शकता. किंवा कमिशन वर त्यांना साबण विक्रीसाठी ठेवण्याची विनंती करू शकता.

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले ई-स्टोअर बनवा

साबण विक्रीसाठी ऑनलाईन स्टोर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. या माध्यमातून आपण देशा भरात कोणाला साबण विकू शकतात थोडा अभ्यास केलात तर असे दिसेल की अनेक उत्पादकांनी त्याच्या उत्पादनांची विक्री थेट इन्स्टाग्राम, फेसबुक वर केली आहे.

ऑनलाईन ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला गरज आहे एका व्हर्चुअल (आभासी) दुकानाची आणि यासाठी तुम्ही एकतर स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट सुरु करू शकता किंवा Shopify सारख्या खास ई-स्टोअर सुरु करण्यासाठी आवश्यक सर्व बाबी पुरविणाऱ्या जबरदस्त प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. सर्वात स्वस्त आणि सोप्या पध्दतीने ऑनलाईन स्टोर कसे सुरु करावे हे जाणण्यासाठी काहिली माहिती वाचा. 

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

हे लक्षात ठेवले पाहिजे 

मनोधारणा- कोणताही व्यवसाय सुरु करायचा आणि उत्पादनाची विक्री करायची तर तुमचा स्वभाव भिडस्त असून उपयोग नाही. तुम्हाला व्यवसाय, छंद म्हणून नाही तर व्यावसायिक म्हणून करायचा आहे म्हणजे त्यातून कमाई करायची आहे हे प्रथम तुम्ही स्वतःशी पक्के केले पाहिजे. स्वभाव तसा नसेल तर मनोधारणा बदलाव्यात यासाठी काही कोर्सेस आहेत त्याचा उपयोग करून घ्यावा. 

स्वतःला सतत उत्तेजन देणे, मार्केटिंग ची कौशल्ये आत्मसात करणे, विक्री कौशल्ये वाढविणे, हिशोब कसे ठेवायचे याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. अनेकांना ओळखीच्या लोकांकडून आपल्या मालाचे पैसे मागणे जमत नाही किंवा अवघड जाते. पण आपल्या व्यवसायातून आपण नफा मिळवायचा आहे याचा विसर पडू न देता हे कौशल्य साध्य करायला हवे. अनेकदा आपल्या साबणांच्या किमती ठरविताना गोंधळ होऊ शकतो. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन, संबंधित पुस्तकांचे वाचन करायला हवे. त्यातून तुमच्या मनोधारणेत बदल होऊ शकतो, आत्मविश्वास मिळतो आणि आपण आपला व्यवसाय व्यवस्थित पुढे नेऊ शकू याची खात्री पटते.

शेअर करा