कोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय

स्वतंत्रपणे काही उद्योग व्यवसाय करायची इच्छा आहे आणि कमी गुंतवणुकीत चांगला फायदा हवा आहे, लहान जागेत उत्पादन पूर्ण क्षमतेने घेता यायला हवे अशीही इच्छा आहे, त्या नवउद्योजकांनी कोल्ड प्रेस तेल घाणा या व्यवसायाचा विचार जरूर केला पाहिजे. या व्यवसायाचे आपल्या मराठी भाषेतील आखूड शिंगी, बहुगुणी म्हैस असेही वर्णन करता येईल.

आजकाल आहार आणि आरोग्य या बाबत जनता खुपच जागरूक झाली आहे. आहारात घेतले जाणारे तेल, तूप हे तर फारच जिव्हाळ्याचे विषय बनले आहेत. कोणती तेलं रोजच्या आहारात असावीत, ती रिफाईंड हवीत की डबल फिल्टर्ड याचाही विचार केला जात आहे. आहाराशिवाय मसाज, औषधे, वंगण, डिटर्जंट बनविण्यासाठी सुद्धा तेलांचा वापर होतो. आपल्याकडे वनस्पतीजन्य तेलांचा वापर प्रामुख्याने आहारात केला जातो.

नवीन संशोधनातून जास्त प्रक्रिया न झालेली तेलं आहारात घेणे आरोग्यासाठी हितकर आहे असे सिद्ध होऊ लागल्याने कोल्ड प्रेस घाणी मध्ये तयार झालेले तेल वापरण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. ही तेलं थोडी महाग असली तरी जास्तीचे पैसे देण्यास लोक तयार आहेत, असेही दिसून आले आहे. आणि भविष्यात अशा तेलांची मागणी वाढती राहणार हे सुद्धा स्पष्ट आहे.

यातूनच एक उत्तम व्यवसाय संधी नवउद्योजकांना उपलब्ध होत आहे. तुम्हाला कोल्ड प्रेस तेल घाण्याचा व्यवसाय सुरु करता येईल. लघु किंवा मध्यम स्वरुपात हा उद्योग कमी भांडवल, थोडी जागा, कमी कर्मचारी घेऊन सुद्धा यशस्वीपणे चालविता येतो. कोल्ड प्रेस घाण्यामध्ये शेंगदाणा, तीळ, करडई, मोहरी, सोयाबीन अशी मागणी असलेली खाद्यतेले तसेच बदाम, जवस, रॅपसीड, पीचच्या बियांपासून बनविलेली तेलं, एरंडासारखी औषधी आणि सौंदर्यप्रसाधनात वापरली जाणारी तेलं उत्पादित करता येतात.

सेमी ऑटोमेटिक किंवा संपूर्ण ऑटोमॅटिक तेलघाणे बाजारात मिळतात. या उद्योगासाठी नोंदणी, काही परवाने घ्यावे लागतात. तसेच मोक्याची जागा असेल तर विक्री चांगली होऊ शकते. इतकेच नव्हे तर निर्यातदार कोड घेऊन निर्यातसुद्धा करता येते. यात तुमच्या ग्राहकांमध्ये सर्वसाधारण जनता असतेच पण ठोक विक्रेत्यांना तुम्ही माल देऊ शकता.

आजकाल व्यवसायप्रसिद्धीसाठी सोशल मिडियाचा वापर कमी खर्चात करून घेता येतो. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या तेलांची ऑनलाईन विक्री सुद्धा करू शकता. या क्षेत्रात स्पर्धा आहेच पण आपल्या तेलांची गुणवत्ता, दर्जा आणि मागणीनुसार वेळेवर पुरवठा, यात सातत्य ठेवले तर हा व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा

शेअर करा

Leave a Comment