तेल घाणा व्यवसाय, कोल्ड प्रेस घाणा

केवळ भारतातच नाही तर जगभरातील सर्व देशात आहारात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात, कोणत्या ना कोणत्या तेलाचा वापर केला जातो. आहाराशिवाय अन्य कारणांसाठी सुद्धा तेल वापरले जाते. यंत्रांसाठी वंगण म्हणून, मसाज साठी, औषधे बनविण्यासाठी तसेच साबण, डिटर्जंट उद्योगात सुद्धा तेलाचा वापर केला जातो. वनस्पती पासून मिळणारे आणि प्राण्यांपासून मिळणारी चरबी व त्यापासून काढले जाणारे तेल असे याचे प्रामुख्याने दोन प्रकार मानता येतात. आपण येथे वनस्पतीपासून मिळणाऱ्या तेलाचा विचार करणार आहोत. 

आपण सर्वसाधारणपणे जी खाद्य तेले आहारात वापरतो ती गळीत धान्ये, तेलबिया पासून मिळविली जातात. आजकाल आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणावर जागृती होत असल्याने लोक खाद्य तेलाची निवड करताना अनेक बाबी विचारात घेऊ लागले आहेत. सर्वसाधारण जीवनमान उंचावले असल्याने महाग असले तरी चांगले तेल घेण्याकडे लोकांची प्रवृत्ती वाढते आहे. अशा तेलांसाठी जादा पैसे मोजण्याची मानसिकता वाढली आहे.

यापुढेही चांगल्या प्रकारच्या आणि पोषक तेलाची मागणी वाढती राहणार आहे हे लक्षात घेऊन छोट्या स्वरुपात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना तेल घाण्याचा व्यवसाय विचारात घेण्यास हरकत नाही. तेल घाणीलाच तेल गिरणी असेही म्हणता येईल. योग्य माहिती घेऊन, आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करून आणि कष्टाची तयारी असेल तर हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.

तेल गाळण्यासाठी गळीत पिके, धान्ये व त्यातही प्रामुख्याने तेल बिया आवश्यक आहेत. अर्थात नारळ आणि पाम पासून मिळणारे तेल सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. तेल बियांमध्ये मुख्यतः शेंगदाणा, तीळ, मोहरी, सरकी, सोयाबीन, एरंड, जवस, कारळे, रॅपसिड यांचा समावेश होतो. घाणी मध्ये या बिया दाबून ठराविक तापमानाला त्यातून तेल गाळले जाते. या तेलांचा वापर खाद्यतेले म्हणून तसेच साबण उद्योग, प्लास्टिक उद्योगात सुद्धा केला जातो. आता तर तेल तयार होताना वाया जाणारे घटक डिझेल इंजिन मध्ये इंधन म्हणून वापरले जातात. तसेच या गळीत धान्यांची पेंड गुरांसाठी पोषक आहार म्हणून फार पूर्वीपासून आपल्याकडे वापरात आहे.

व्यवसायाची नव्याने सुरवात करताना छोटया घाणा यंत्रापासून तुम्ही सुरवात करू शकता. त्यात शेंगदाणा, सरकी, सुर्यफूल, मोहरी अशा बियांचा वापर करता येतो. असा घाणा किंवा गिरणी सुरु करताना कमी गुंतवणूक करूनही काम चालू शकते. यासाठी लाकडी घाणा, कोल्ड प्रेस मशिनरी वापरली जाते. त्यातही पूर्णपणे स्वयंचलित, किंवा निम्न स्वयंचलित (अॅटोमॅटीक, सेमी अॅटोमॅटीक)  कोल्ड प्रेस मशीन वापरता येते. अनेक आकारात अश्या गिरण्या किंवा घाणे उपलब्ध आहेत. 

तेल प्रक्रिया उद्योग सुरु करताना मार्गदर्शन म्हणून काही आवश्यक बाबींची माहिती करून घेणे आणि आवश्यक बाबींचा विचार करणे योग्य ठरते.

यात सर्व प्रथम विचार करायचा तो खर्चाचा. म्हणजे व्यवसाय सुरु करताना कमीत कमी किती खर्च करावा लागेल 

दुसरी पायरी आहे ती व्यवसाय आखणी आराखडा किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट.

तिसरा मुद्दा म्हणजे व्यवसाय नोंदणी प्रक्रिया आणि परवाना

चौथा मुद्दा या व्यवसायाला जागा किती लागणार 

पाचवा मुद्दा म्हणजे कच्चा माल कोणता वापरणार

सहावा मुद्दा त्यासाठी लागणारी यंत्रे किंवा मशिनरी 

सातवा मुद्दा लेबर किंवा कामगार 

आठवा मुद्दा उत्पादनाची प्रक्रिया 

नववा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तयार उत्पादनाची विक्री कशी आणि कुठे करता येणार 

आणि आजच्या जमान्यात महत्वाचा ठरत असलेला मुद्दा डिजिटल मार्केटिंग 

हे महत्वाचे मुद्ये समजून घेतल्यावर या शिवाय आपल्या उत्पादनाचे ब्रँडिंग, व्यवसायासाठी कर्ज सुविधा, या साठी काही सरकारी योजना असल्यास त्याची माहिती आणि आपल्या देशात या व्यवसायासमोर असेलेली आव्हाने याचाही विचार करून योग्य माहिती मिळविणे आवश्यक ठरते.

सर्व प्रथम शोधा व्यवसाय संधी आणि बाजार उपलव्धता 

कोणताही व्यवसाय सुरु करताना अन्य बाबींवर विचार करण्याअगोदर त्या व्यवसायातील संधी आणि बाजार उपलब्धता यांची माहिती करून घेणे शहाणपणाचे ठरते.

खोबरेल, शेंगदाणा, मोहरी, सुर्यफूल वगैरे खाद्य तेले भारतभर लोकप्रिय आहेत, पण त्यातही भारताच्या दक्षिण राज्यात त्यांना अधिक पसंती मिळते. रिफाईंड खोबरेल तेलाला केरळ, महाराष्ट्र व अन्य दक्षिण भारतीय राज्यात प्रचंड मागणी आहे. शेंगदाणे गुजराथ मध्ये मोठ्या प्रमाणावर पिकविले जातात आणि शेंगदाणे तेल गुजराथ, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहारात वापरले जाते. खोबरेल तेलाचा वापर यंत्रात वंगण म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतो.

तुम्हाला तेल घाणा व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्याची सुरवात छोट्या प्रमाणावर करणे योग्य ठरते. त्यातही मशीन बसविणे, घाणा तयारी झाल्यावर तो पूर्ण सुरु होणे, ज्याला कमिशनिंग करणे असे म्हटले जाते अश्या पायऱ्या येतात. व्यवसाय लघु किंवा लहान स्वरुपात असेल तर त्याला कमी गुंतवणूक करावी लागते तसेच लहान जागा आणि कमी कामगार घेऊनही व्यवसाय सुरु होऊ शकतो. यात व्यवसाय लहान स्वरूपावर असला तरी उत्पादन पूर्ण क्षमतेने घेणे शक्य होते.

व्यवसाय सुरु करण्यासाठी काही मार्गदर्शन 

कोणताही व्यवसाय मग तो मोठ्या प्रमाणावर असो अथवा लघु स्वरुपात असतो, त्यासाठी येणारा खर्च हा महत्वाचा मुद्दा असतो.

याचबरोबर तुम्ही लघु स्वरुपात व्यवसाय करणार असला तर तेल विक्रीतून तुम्हाला किती कमाई होऊ शकणार हेही महत्वाचे आहे. विक्री चांगली होण्यासाठी व्यवसायाची जागा शक्यतो भाजीबाजार, सुपरमार्केट, अशा ठिकाणांच्या जवळ असेल तर ते फायद्याचे ठरते. येथे ग्राहक ताजे, घाण्याचे तेल कसे बनविले जाते याची प्रक्रिया पाहू शकतो व त्यामुळे तेलाच्या गुणवत्तेबाबत त्याची खात्री पटू शकते. या घाणी मध्ये शेंगदाणा, तीळ, मोहरी, बदाम, सोयाबीन आणि अन्य तेलबियांपासून उत्पादन घेता येते.

आजकाल ताज्या घाण्याच्या तेलाला प्रचंड मागणी आहे. पण त्यासाठी ग्राहक तुमच्या व्यवसाय ठिकाणी आकर्षित झाले पाहिजेत. तेल घाण्याची निवड ही कळीचा मुद्दा आहेच. आजकाल सरकी, पाम फळे, नारळ, शेंगदाणे, बदाम, पेअर फळाच्या बिया, सुर्यफूल, मोहरी, रॅपसिड, जवस व अन्य गळीत धान्यापासून तेल काढण्यासाठी योग्य डिझाईन असलेल्या घाण्या किंवा गिरण्या उपलब्ध आहेत.

व्यवसाय सुरु करण्यासाठी बेसिक गुंतवणूक ३ ते ६ लाख रुपये

यात मशीन किंवा घाणीसाठी ६० हजार ते ४ लाख रुपये

जागा किमान ५०० चौरस फुट

अन्य खर्चात यंत्राची देखभाल, कर्मचारी पगार व जाहिरात आणि विपणन खर्च धरावा लागतो.

यात फायद्याचे प्रमाण साधारण असे असते- दररोज तुम्ही सरासरी १०० किलो तेल विक्री करू शकत असाल तर महिन्याला ५० हजार पासून दीड लाखापर्यंत कमाई करू शकता.

नोंदणी आणि परवाना 

कोणताही व्यवसाय सुरु करायचा असेल तर काही आवश्यक कागदपंत्रांची पूर्तता करावी लागते. ही कागदपत्रे कोणती याची माहिती घेऊ

१)व्यवसाय नोंदणी- तुम्ही छोट्या, मध्यम स्वरूपाचे तेल उत्पादन युनिट सुरु करणार असाल तर एकल मालक यालाच प्रोप्रायटर म्हणतात तशी किंवा भागीदारीत व्यवसाय करणार असला तर भागीदार म्हणजे पार्टनरशिप म्हणून नोंदणी करावी लागेल. भागीदारी व्यवसाय सुरु करायचा असेल तर लिमिटेड लायबीलिटी म्हणजे मर्यादित जबाबदरी पार्टनरशिप(एलएलपी)  किंवा प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे खासगी मर्यादित कंपनी (पीव्हीटी ली.)अशी नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी) म्हणजे कंपनी निबंधक यांच्याकडे करावी लागते.

२)जीएसटी म्हणजे गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स- वस्तू आणि सेवा कर नोंदणी- व्यवसाय सुरु करताना तुम्हाला जीएसटी नंबर घ्यावा लागतो कारण कोणताही व्यवसाय करताना जीएसटी नंबर घेणे बंधनकारक आहे.

३)ट्रेड लायसन्स म्हणजे व्यवसाय परवाना- व्यवसायासाठी परवाना घेताना स्थानिक पातळीवर त्याचा अर्ज भरता येतो. सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय सुरु करण्यासाठी हा परवाना घेणे बंधनकारक आहे.

४)एमएसएमई/ एसएसई नोंदणी – एमएसएमई म्हणजे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग आणि एसएसआय म्हणजे लघु उद्योग. यातील कोणत्याही प्रकारचा उद्योग सुरु करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. या मुळे तुम्हाला संबंधित उद्योगांसाठी असलेल्या सरकारी सुविधा मिळू शकतात.

५)बीआयएस सर्टिफिकेशन याचाच अर्थ भारतीय मानक ब्युरो प्रमाणपत्र. असे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो. उदाहरण द्यायचे तर समजा तुम्हाला खोबरेल तेलाचा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी विविध अर्ज करावे लागतील. कारण यातील प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता प्रमाण सांभाळावे लागते. आयएस ११४७० (१९८५) हे याचे उदाहरण म्हणून देता येईल.

६)एफएसएसएआय म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथॉरिटी ऑफ इंडिया यालाच मराठीत भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरण असे म्हणतात. ही संस्था केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करते. खोबरेल तेल खाद्य प्रकार असल्याने आणि त्याच्याशी संबधित व्यवसाय तुम्ही करणार असल्याने ही नोंदणी करावी लागते.

७)आयईसी कोड म्हणजे इम्पोर्टर एक्स्पोर्टर किंवा आयात निर्यातदार कोड – तुम्ही तुमची उत्पादन निर्यात करणार असला तर आयईसी कोड साठी अर्ज करावा लागतो.

८)ट्रेड मार्क म्हणजे तुमचे व्यापार चिन्ह किंवा मालावर अंकित केलेली व्यापार मुद्रा. उत्पादकाचा संबंधित उत्पादनावरचा हक्क ही मुद्रा दर्शविते. त्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागते.

४ )व्यवसायासाठी लागणारी जागा 

कोणताही व्यवसाय सुरु करताना जागेची निवड करणे हा महत्वाचा आणि अवघड मुद्दा असतो. समजा तुम्ही खोबरेल तेल घाणा सुरु करणार आहात तर तुम्हाला किमान ५०० ते १ हजार चौरस फुट जागा हवी.

जागेचे लोकेशन किंवा स्थान निवडताना तेथे पाणीपुरवठा, वीज पुरवठा, सांडपाणी व्यवस्था योग्य आहे ना हे पाहणे आवश्यक आहे. जागा सहज पोहोचता येईल अशी असावी. यामुळे कच्चा माल आणणे, तयार माल बाहेर नेणे हे सोयीचे होतेच पण जागा बाजाराजवळ असेल तर कच्चा माल जवळपास मिळू शकतो. जागेसंबंधी सर्व पेपरवर्क पूर्ण केल्यावर स्थानिक प्रशासनाचे जागा निवडीचे नियम तपासून आपण निवडलेली जागा त्यानुसार आहे याची खात्री करून घ्यावी.

५)कच्चा माल – तेल घाणा सुरु करताना कच्चा माल मिळविण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक तर तुम्ही तेलबिया पुरवठादाराकडून हा माल खरेदी करू शकता किंवा तुमचे शेत असेल तर या मालाचे उत्पादन शेतातच घेऊ शकता. शेंगदाणे, सोयाबीन, मोहरी, नारळ, एरंड, तीळ, अक्रोड ही याची उदाहरणे म्हणून देता येतील.

दुसरे म्हणजे बहुतेक सर्व तेल बिया कोल्ड प्रेसिंग साठी योग्य असतात. पण तुम्ही मात्र तेल काढताना कोल्ड प्रेसचा वापर करणार का हॉट प्रेसचा याची निवड अगोदर करायला हवी. ही निवड करताना अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात. त्यात यंत्राची क्षमता, तुमचे बजेट, निघालेल्या तेलाचे उपयोग वगैरे. अर्थात आजकाल कोल्ड प्रेसिंग जास्त लोकप्रिय पद्धत ठरली आहे. काही तेलवनस्पती आणि तेलबिया म्हणून खोबरे, हेम्प सीड, ओलीव्ह, जवस, बाओबाब सीड म्हणजे गोरखचिंच, मोहरी, जोजोबा, शेंगदाणे, सोयाबीन, एरंड यांचे उदाहरण देता येईल.

या व्यवसायासाठी लागणारे आणखी एक मटेरियल म्हणजे पॅकिंग मटेरियल. तेल पॅक करण्यासाठी बहुतेक वेळा पॉली पाउच किंवा प्लास्टिक बाटलीचा उपयोग केला जातो. अर्थात हे पाउच किंवा बाटल्या विविध मापाच्या असणे गरजेचे आहे. म्हणजे १००, २००, २५०, ५०० मिलीलीटर,, १ आणि दोन लिटर, ५ लिटर अशा विविध मापाच्या बाटल्या किंवा पाउच वापरावे लागतात.

६)मशिनरी किंवा यंत्रसामुग्री –तुम्ही नक्की कशाचा व्यवसाय करणार त्यानुसार तुम्ही कोणती यंत्रे किंवा मशीन खरेदी केली पाहिजेत हे ठरते. ही यंत्रे विविध प्रकार, आकार आणि तेल गाळप करण्याची क्षमता यानुसार मिळतात.

तुम्हाला तेल घाणी व्यवसाय छोट्या प्रमाणावर करायचा असेल तर तुम्ही भाडे तत्वावर कोल्डप्रेस मशीन घेऊ शकता. किंवा मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करायचा असेल तर स्वतःची मशिनरी खरेदी करू शकता. निर्यात करायची असेल तर आणखी मोठी यंत्रे घेऊन कारखाना काढावा लागतो. तेल काढण्यासाठी पूर्ण स्वयंचलित म्हणजे फुल अॅटोमॅटिक, निम्न स्वयंचलित म्हणजे सेमी अॅटोमॅटिक कोल्ड प्रेस तेल मशीन, लाकडी घाणी कोल्ड प्रेस मशीन बाजारात उपलब्ध आहेत.

तेल काढण्याशिवाय अन्य काही प्रकारची यंत्रेही आवश्यक असतात ती खालीलप्रमाणे 

लाकडी घाणी किंवा कोल्ड प्रेस मशीन

तेल बिया स्वच्छ करणारे मशीन म्हणजे सिड क्लीनर 

बिया हाताळणीसाठी लागणारे ट्रे

घन व द्रव वेगळे करण्यासाठी फिल्टर प्रेस

तेल साठवणीसाठी स्टीलची पिंपे 

बाटल्या भरण्यासाठी निम्न स्वयंचलित फिलिंग मशीन 

बाटल्या सील करण्यासाठी बुच बसवून सील करणारे कॅपिंग कम सिलिंग मशीन 

७)तेलघाणी उद्योगासाठी लागणारा कर्मचारीवर्ग

या व्यवसायासाठी कर्मचारी वर्गाची गरज अधिक प्रमाणात असते. प्रत्यक्ष मशीन हाताळणारे, कार्यालयीन कामासाठी लागणारे, वितरणासाठी लागणारे अशी ही गरज असते. तुम्ही व्यवसायाचे कोणते मॉडेल निवडणार म्हणजे व्यवसाय लघु का मध्यम स्वरुपात सुरु करणार त्यावर कर्मचारी संख्या ठरते. मात्र प्राथमिक गरज आहे ती मध्यम कुशल प्रकल्प कामगार, हिशोबनीस म्हणजे अकाउंटंट, मशीन चालविणारे ऑपरेटर, स्टोअर किपर यांची.

तुम्ही व्यवसाय अगदी छोट्या स्वरुपात करणार असला तर किमान दोन कर्मचारी लागतील. स्वयंचलित मशिनरी नसेल तर जास्त कर्मचारी लागतील. उदहरणार्थ खोबरेल तेल घाणा काढायचा असेल तर नारळ हाताळणीपासून तेल काढणे, पॅकेजिंग, व वितरण यासाठी कर्मचारी हवेत.

८)प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया

यात सर्वप्रथम आपण कोल्ड प्रेसिंग म्हणजे काय हे जाणून घेतले पाहिजे. कोल्ड प्रेसिंग नावावरून बोध होतो तो असा की थोडीशी उष्णता देऊन तेल पिळून काढणे. यात कच्चा माल स्वच्छ करून थेट तेल काढणाऱ्या यंत्रात टाकला जातो. कोल्ड प्रेसिंग मध्ये एकाच वेळी तेल बियामधील सर्व तेल निघत नाही. त्यामुळे पेंडी मध्ये तेलाचा जास्त अंश राहतो.

म्हणजे सर्वसाधारणपणे कोल्ड प्रेसिंग प्रक्रिया तेलबियांची निवड – स्वच्छता – प्रेसिंग म्हणजे तेल गाळणे अशी असते. प्रत्यक्ष कोल्ड प्रेसिंग प्रक्रिया या सर्व बाबींवर अवलंबून आहेच पण त्यात कच्चा माल गुणवत्ता, तेलाची गरज, आणि आपली प्रत्यक्ष उत्पादन परिस्थिती याचाही विचार करावा लागतो.

आता या संपूर्ण प्रक्रियेचे टप्पे जाणून घेऊ

क्लिनिंग म्हणजे या टप्प्यावर तेलबिया स्वच्छ करून घेतल्या जातात. याचाच अर्थ त्यात मिसळलेले अन्य पदार्थ किंवा अशुद्ध पदार्थ बाजूला केले जातात. यासाठी हवेचे झोत येणाऱ्या भागातून तेलबिया पुढे ढकलल्या जातात याला एअर प्रोपल्शन सिस्टीम असे नाव आहे.

मिलिंग किंवा दळणेयात स्वच्छ केलेल्या तेल बिया बारीक दळून त्याची पावडर केली जाते. यासाठी लाकडी रोटर किंवा कोल्ड प्रेस मशीनचा वापर केला जातो.

प्रेसिंग किंवा दाब देणे ही प्रक्रिया सर्वात महत्वाची पायरी आहे. कारण यात प्रत्यक्ष तेल काढण्याची कृती केली जाते. प्रथम दळून पीठ केलेल्या तेलबिया हळूहळू एका विशिष्ट वेगाने फिरविल्या जातात. त्यामुळे त्यातून तेल सुटण्याची प्रक्रिया सुरु होते. मग तेल सुटायला लागले की कोल्ड प्रेस किंवा लाकडी घाणा वापरून हे तेल बाहेर काढले जाते. यावेळी सर्वाधिक काळजी घ्यावी लागते ती तेलाचे तापमान खोलीच्या तापमानापेक्षा अधिक वाढणार नाही याची.

फिल्टरेशन किंवा गाळणयात तेलबियातून दाब प्रक्रियेने बाहेर काढलेले तेल फिल्टर म्हणजे गाळणीतून पाठवून त्या तेलात काही घन पदार्थ राहिले असतील तर ते वेगळे केले जातात. अंतिम टप्प्यात हे तेल कापडातून गाळून घेतले जाते त्यामुळे त्यातील सर्व अशुद्ध द्रव्ये वेगळी होतात.

डीकँटेशन किंवा निचरण या प्रक्रियेत तेल निवळण्यासाठी ठेवले जाते. म्हणजे तेलबियातून काढलेले तेल शुध्द करून न हलवता ठेवले जाते. या प्रक्रियेत तेलात असलेला गाळ गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने खाली बसतो.

या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या की तुमचे तेल पॅकिंग साठी तयार झाले असे म्हणता येते. आता यापुढचे काम म्हणजे या तेलासाठी चांगले ब्रांड नेम किंवा व्यापारी मुद्रा शोधणे आणि तेल बाहेर येणार नाही असे लिक प्रूफ पॅकेज वापरून तेल विक्रीसाठी उपलब्ध करणे. यासाठी डबल सील असलेले प्लास्टिक पाउच, बाटल्या, प्लास्टिक कंटेनर याचा विचार करता येतो. विविध आकारमानासाठी विविध मापाच्या बाटल्या निवडता येतात. पॅकेजिंग करताना तेलाचा स्वाद, त्याचा वास आणि ताजेपणा कायम राहील याची खबरदारी घ्यायला हवी.

या खाद्य तेलाची विक्री कुठे करता येते?

आपण उत्पादित केलेले खाद्य तेल विक्रीसाठी अनेक मार्ग आहेत. स्थानिक बाजारातील किरकोळ विक्रेते दुकानदार, किराणा मालाची दुकाने, हे तेल औषधी वापरात असेल तर मेडिकल दुकाने अशा ठिकाणी विक्रीसाठी देता येते. तसेच आपले उत्पादन मोठ्या प्रमाणावर असेल तर शहरातील ठोक किंवा होलसेल बाजारात ज्याला मार्केट यार्ड म्हटले जाते तेथेही विकता येते.

ऑनलाईन मार्केट म्हणजे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ऑनलाईन साईट किंवा स्वतःची साईट तयार करून तेथे विक्री करता येते.

आपल्या मालाचे विपणन, प्रमोशन किंवा प्रसिद्धी कशी करावी?

तुम्ही तुमच्या भागात असणारे शेतकरी बाजार किंवा जवळपास भरणारे शेतकरी बाजार शोधून तेथे आपले उत्पादन कुठे विकता येणे शक्य आहे याची माहिती मिळवू शकता. 

दुसरा प्रकार म्हणजे ऑनलाईन मार्केट:- तेलाचे ऑनलाईन मार्केट असलेल्या वेबसाईट शोधून त्यातील काहींची निवड करता येते. येथे तुम्ही ग्राहकांना विविध स्वादाचे, खात्रीशीर खाद्य तेल पुरवू शकता याची माहिती देणे आणि ग्राहकांना तेथेच तेल खरेदी सुविधा देणे याचा समावेश होतो. 

बी टू बी म्हणजे बिझिनेस टू बिझिनेस वेबसाईट:-यासाठी आपल्या व्यवसायाची बी टू बी वेबसाईट नोंदणी करता येते. त्यात अलीबाबा, इंडिया मार्ट, ट्रेड इंडिया, एक्स्पोर्ट्स इंडिया अश्या साईटचा उपयोग होऊ शकतो.

बी टू सी म्हणजे बिझिनेस टू कस्टमर:- या साईटवर तुमच्या व्यवसायाची नोंदणी करता येते. त्यात अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, बिग बास्केट अशा साईटचा वापर करता येतो. येथून तुम्ही तुमचे उत्पादन थेट ग्राहकाला विकू शकता.

एक्स्पोर्ट मार्केट– भारतीय खाद्य तेलाना परदेशात प्रचंड मागणी आहे. तुम्ही तुमचे तेल निर्यात करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आयईसी कोड घ्यावा लागतो. याची माहिती सुरवातीला दिली आहे.

ब्रांड आणि युनिकनेस 

तुम्ही तुमच्या तेलाची माहिती आणि प्रमोशन साठी पाककला मासिके, पुस्तके याचा वापर करून घेऊ शकता. एकदा व्यवसाय वाढला की मग त्याची व्याप्ती वर्तमानपत्रातून जाहिराती, स्थानिक जाहिराती, प्रसिद्धी पत्रके म्हणजे पॅप्लेट स्वरुपात देऊ शकता.

डिजिटल मार्केटिंग 

आजच्या जमान्यात फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन सारख्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून तेल उत्पादांच्या जाहिरातीसाठी ही माध्यमे विशेष लोकप्रिय ठरत आहेत. तेल उद्योगातील अनेक ब्रांड डिजीटल मार्केटिंगचा फायदा घेताना दिसत आहेत. आपल्या देशात वर्षभर सतत कोणते ना कोणते उत्सव, कार्यक्रम, सण साजरे होत असतात. या सर्व ठिकाणी लोकांच्या किंवा आपल्या ग्राहकांच्या सतत नजरेसमोर राहण्यासाठी ब्रांडनेम किंवा आपली व्यापार मुद्रा असणे फार उपयोगी ठरते.

तुमच्या व्यापार मुद्रेचा ठसा ग्राहकांच्या आठवणीवर उठलेला असेल तर तुमच्या उत्पादनाकडून ग्राहक कोणत्या अपेक्षा बाळगतात याचा अंदाज येत असतो. याचा फायदा तुमच्या स्पर्धकांच्या उत्पादनापेक्षा तुमचे वेगळेपण ग्राहकांच्या नजरेसमोर आणण्यासाठी करून घेता येतो. तुमच्या उत्पादनाची निवडच कशी योग्य ठरेल किंवा तुमचे उत्पादनच कसे चांगला पर्याय आहे हे त्यामुळे ग्राहकांच्या मनावर ठसविणे सुलभ होते.

नैसर्गिक पद्धतीने बनविलेल्या तेलाची स्वतःची एक कथा किंवा महत्व असतेच. पण तुम्ही तुमची उत्पादने अधिक गुणवत्तापूर्ण, चांगल्या दर्जाची कशी बनविली हे ग्राहकांना सांगता येते. उदाहरण द्यायचे तर तुमचे तेल होम मेड, प्रिझरव्हेटीव्ह म्हणजे पदार्थ टिकविण्यासाठी वापरण्यात येणारी कृत्रिम द्रव्ये न वापरता केलेले, खास चव, स्वाद आणि गंध असलेले आहे असे सांगता येते. ब्रांड किंवा व्यापारी मुद्रेमुळे परिणामकारकरित्या ग्राहकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यास मदत होते.

अशा वेळी सोशल मिडिया किंवा सामाजिक माध्यमे ग्राहकांशी संपर्कात राहण्याचे चांगले मध्यम ठरते. या माध्यमातून तुम्ही ग्राहकांनी तुमचेच उत्पादन घेण्यास प्राधान्य द्यावे यासाठी प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवू शकता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एक खरेदी करा एक मोफत मिळावा यासारख्या सवलती. तुमची स्वतःची वेबसाईट असेल तर तुम्ही त्यावर तुमच्या उत्पादनांशी संबंधित लेख, नैसर्गिक तेलाचे फायदे, व्हर्जिन ऑइल, नैसर्गिक तेल यातील फरक, विविध तेलांची वैशिष्ठे अशी माहिती देऊ शकता.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

भारतात या व्यवसाया समोर असलेली आव्हाने 

व्यवसाय कोणताही असला तरी काही आव्हानांचा सामना उद्योजकाला करावाच लागतो. तेल व्यवसाय सुद्धा त्याला अपवाद नाही. ही आव्हाने कोणती याची थोडी माहिती घेणे उपयुक्त ठरेल.

बाजार पत म्हणजे मार्केट क्रेडीट – तुमच्या व्यवसायात वितरक किंवा मध्यस्त, दलाल असेल तर ही जोखीम नेहमीच जास्त असते आणि या उद्योगासमोरचे हे मोठे आव्हान आहे.

पॅकेजिंग – भारतात अनेकदा असे दिसते की, अनेक लघु उद्योग मालाचे पॅकिंग हाताने करण्यास प्राधान्य देतात. याचे मुख्य कारण खर्चाची बचत किंवा पैसा पुरेसा उपलब्ध नसल्याने पॅकिंग मशिनरीचा खर्च परवडणारा नसतो. पण यामुळे अनेकदा पॅकिंग लिक होतात. 

व्यवसायाचे आधुनिकीकरण– कोणत्याची क्षेत्राचा विचार केला तर दररोज त्यात काही ना काही नवीन शोध समोर येतात. अशा वेळी आपण जगाबरोबर राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञान काय आहे याची माहिती घेणे आणि शक्य असले तर त्याचा वापर करणे यासाठी दक्ष असावे लागते. बरेचदा नवीन तंत्रज्ञानामुळे आपल्या व्यापार मुद्रेसमोर आव्हान निर्माण होऊ शकते.

स्पर्धा तेल व्यवसायात तीव्र स्पर्धा आहे. त्यातही प्रादेशिक पातळीवर ही स्पर्धा अधिक आहे. कारण तेथे अगोदरच अनेक स्थानिक छोट्या कंपन्या काही ठराविक क्षेत्रात त्यांचा व्यवसाय करत असतात. त्यामुळे त्यांच्या तुलनेत तुम्ही उत्पादने अधिक चांगली कशी हे ग्राहकांच्या मनावर ठसविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. त्यात नैसर्गिक तेलाना प्रचंड मागणी असली तरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करताना त्याची गुणवत्ता कायम राखणे हे मोठे आव्हान पेलावे लागते.

शेअर करा
error: Alert: Content is protected !!