हायड्रोपोनिक यंत्रणेत वाढविता येणाऱ्या काही वनस्पती

हायड्रोपोनिक फार्मिंग मध्ये कोणत्या वनस्पती वाढविता येतात या प्रश्नांचे उत्तर खरे तर कोणत्याही प्रकारच्या वनस्पती असे आहे. मात्र पाण्याच्या माध्यमातून ही शेती केली जात असल्याने सर्व वनस्पती चांगल्याच वाढतील असे नाही. त्यामुळे हायड्रोपोनिक फार्मिंग साठी कोणत्या वनस्पतींची निवड करावी याच्या काही टिप्स येथे देत आहोत. निदान सुरवात करताना योग्य वनस्पती निवडाव्यात. एकदा अनुभव आला की मग ही यादी सहज वाढविता येते. कारण हायड्रोपोनिक लागवडीसाठी योग्य अश्या अनेक वनस्पती आहेत.

सुरवात करताना काही भाज्या, फळे आणि मुळे यांची माहिती आपण घेऊ.

१)लेट्युस – ( थंड हवा आणि पीएच लेव्हल ६.० ते ७.० )

सॅलड, सँडविच साठी लेट्युस ही एक आदर्श भाजी मानली जाते. जगभर लेट्युसचा वापर केला जातो आणि हायड्रोपोनिक पद्धतीत वाढविल्या जाणाऱ्या भाज्यात ही मोठ्या प्रमाणावर पसंत केली जाते. वेगाने वाढणारी ही वनस्पती काळजी घेण्याच्या दृष्टीने सोपी आहेच पण एनएफटी, एरोपोनिक्स, एब अँड फ्लो अश्या कोणत्याही हायड्रोपोनिक सिस्टीम मध्ये चांगल्या प्रकारे वाढविता येते. ज्यांना हायड्रोपोनिक फार्मिंगची सुरवात करायची आहे त्याच्यासाठी ही आदर्श वनस्पती म्हणता येईल.

२)टोमॅटो (तापमान उष्ण आणि पीएच लेव्हल ५.५ ते ६.५)

आपल्या रोजच्या वापरात टोमॅटो समाविष्ट असतात. बाजारात अनेक प्रकारचे टोमॅटो उपलब्ध आहेत. नेहमीचे पारंपारिक टोमॅटो, चेरी टोमॅटो, हिरवा कच्चा टोमॅटो असे हे अनेक प्रकार आहेत. हायड्रोपोनिक फार्मिंग छंद म्हणून करणारे तसेच व्यावसायिक ग्रोअर्स सुद्धा मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचे उत्पादन घेतात. वनस्पती शास्त्राच्या दृष्टीने टोमॅटो हे फळ असले तरी बहुतेक ग्राहक, विक्रेते त्याला भाजी वर्गात समाविष्ट करतात. टोमॅटो हायड्रोपोनिक पद्धतीने वाढविताना त्यांना प्रकाश जास्त लागतो त्यामुळे घरात टोमॅटो वाढवीत असाल तर प्रकाशासाठी जास्त दिवे लावावे लागतील हे लक्षात घ्यायला हवे.

३)मुळे (तापमान थंड आणि पीएच ६.० ते ७.०)

कोणत्याही भाजीला चांगला स्वाद आणि रुची देणारा म्हणून वापरला जाणारा कंद जातीचा मुळा हायड्रोपोनिक फार्मिंग साठी एक सोपी वनस्पती म्हणता येईल. जमिनीत वाढणारा मुळा हायड्रोपोनिक फार्मिंग मध्ये सुद्धा चांगला वाढतो. हायड्रोपोनिक साठी त्याची लागवड बियांपासून करावी. तीन ते सात दिवसात रोपे तयार होतात. थंड हवामानात ही रोपे चांगली वाढतात त्यामुळे त्याला प्रकाशाची फारशी गरज नसते.

४)काळे (तापमान थंड उबदार, पीएच लेव्हल ५.५ ते ६.५)

अतिशय पौष्टिक आणि चवीला उत्तम अशी ही पालेभाजी वर्गीय भाजी. घरात तसेच रेस्टॉरंट मध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. आरोग्याला अनेक फायदे देणारी ही भाजी हायड्रोपोनिक पद्धतीत गेली अनेक वर्षे वाढविली जात आहे. सोपी, चटकन वाढणारी कोथिंबीर वर्गातील ही भाजी आहे.

५)काकडी (तापमान उष्ण आणि पीएच लेव्हल ५.५ ते ६.०)

लवकर वाढणारी आणि ग्रीन हाउस मध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतली जात असलेली वेलवर्गीय काकडी हायड्रोपोनिक साठी एक चांगली वनस्पती आहे. काकड्या अनेक प्रकारच्या असतात. अनेक आकाराच्या या काकड्या भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पादित केल्या जातात. मावळी, खिरे, गावरान असे भारतीय प्रकार आहेत तर जाड सालीची अमेरिकन स्लायसर्, सीडलेस लांबुडकी व पातळ सालीची युरोपियन, मऊ सालीची लेबनीज असेही प्रकार आहेत.

हायड्रोपोनिक साठी या सर्व जाती चांगल्या आहेत. मात्र उष्ण हवामानात त्या चांगल्या वाढत असल्याने पुरेसा प्रकाश व उबदार तपमान मिळेल याची काळजी घ्यावी.

६)पालक (थंड ते उबदार तापमान, पीएच लेव्हल ६.० ते ७.०)

कच्चा किंवा शिजवून अश्या दोन्ही प्रकारांनी खाल्ली जाणारी पालक ही पालेभाजी लोकप्रिय भाजी म्हणता येईल. हायड्रोपोनिक फार्मिंगच्या पाणी बेस्ड यंत्रणेत पालक चांगला वाढतो. थंड तापमानात वाढत असल्याने खूप प्रकाश देण्याची गरज नसते. पालकाचे उत्पादन एकच वेळी किंवा वेळोवेळी नुसती पाने खुडून पुन्हा पुन्हा घेता येते. किमान १२ आठवडे सतत पाने मिळत राहतात.

७)घेवडा (उबदार तापमान आणि पीएच लेव्हल ६.०)

हायड्रोपोनिक पद्धतीत सहज वाढविता येणारा घेवडा, जास्त उत्पादन आणि कमी देखभाल करावी लागणारी वेलवर्गीय भाजी आहे. घेवडा अनेक प्रकारचा असतो. हिरवा, पोल बिन्स, पिंटो बिन्स, लिमा असे त्याचे अनेक प्रकार आहेत. घेवड्याच्या वेली स्थिर राहाव्यात म्हणून त्यांना ट्रेलीज किंवा वायरने आधार द्यावा लागतो. विशेषतः पोल बिन्स साठी ही काळजी अधिक घ्यावी लागते. घेवड्याची बी ३ ते ८ दिवसात रुजते आणि ६ ते ८ आठवड्यात शेंगा तोडणीला येतात. ३ ते चार महिने सतत तोड करता येते.

काही औषधी वनस्पती

चिव (chives- उबदार तापमान आणि पीएच लेव्हल ६.०)

हायड्रोपोनिक यंत्रणेत सहज वाढविता येणारे लसूण किंवा कांदा पात जातीचे हे गवत. स्थानिक रोपवाटीकेत याची रोपे सहज उपलब्ध असतात. योग्य नियंत्रित वातावरणात त्याच्या पूर्ण वाढीसाठी ६ ते ८ आठवडे लागतात. त्यापुढे ३ ते ४ आठवडे उत्पादन मिळत राहते. त्याला प्रकाश जास्त प्रमाणात लागतो त्यामुळे दिवसातून किमान १२ ते १४ तास प्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी लागते.

९)तुळस (तापमान उबदार आणि पीएच लेवल ५.५ ते ६.५)

हायड्रोपोनिक पद्धतीसाठी तुळस ही आदर्श औषधी वनस्पती आहे. आज घडीला तुळस ही हायड्रोपोनिक पद्धतीत सर्वाधिक वाढविली जाणारी वनस्पती असून एनएफटी किंवा ड्रीप सिस्टीम मध्ये ती जास्त प्रमाणात वाढविली जाते. एकदा पूर्ण पक्व स्थितीला आली की आठवड्याला थोडी कापणी व पाने तोडणी करता येते. तुळशीला प्रकाश जास्त लागतो त्यामुळे दिवसाला किमान ११ तास प्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी लागते अन्यथा तिची वाढ खुरटते.

१०)पुदिना (तापमान उबदार आणि पीएच लेव्हल ५.५ ते ६.५)

जमिनीत आणि हायड्रोपोनिक यंत्रणेत पुदिनाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पेपर मिंट आणि स्पिअरमिंट असे त्याचे दोन प्रकार आहेत. ताजेपणाची अनुभूती देणारा सुवास, उल्हासित करणारा तीक्ष्ण गंध असणारा पुदिना पदार्थ बनविताना विविध प्रकारे वापरला जातो तसेच कच्चा ही वापरला जातो. पदार्थात त्याचा वापर प्रामुख्याने फ्लेवर साठी केला जातो. पुदिन्याची मुळे वेगाने पसरतात त्यामुळे हायड्रो पोनिक साठी ही आदर्श वनस्पती आहे.

११)स्ट्रॉबेरीज ( तापमान उबदार आणि पीएच लेव्हल ६.०)

हायड्रोपोनिक सिस्टीम मध्ये अतिशय योग्य असे हे फळ व्यावसायिक पातळीवर केल्या जाणाऱ्या हायड्रोपोनिक मध्ये मोठ्या प्रमाणावर पिकविले जाते. हायड्रोपोनिक साठी हे लोकप्रिय फळ आहे. एनएफटी सिस्टीम मध्ये ते अधिक प्रमाणात पिकविले जात असून गेली काही दशके मोठे शेतकरी ताज्या स्ट्रॉबेरिज वर्षभर मिळवित आहेत. घरच्या घरी अगदी आपल्या परिवारापुरत्या स्ट्रॉबेरिज आपण हायड्रोपोनिक सिस्टीम मध्ये वर्षभर पिकवू शकतो.

१२)ब्ल्यूबेरीज (तापमान उबदार, पीएच लेव्हल ४.५ ते ६.०)

जीवनसत्वांचा खजिना मानले जाणारे हे फळ हायड्रोपोनिक फार्मिंग साठी एक आदर्श निवड आहे. अर्थात स्ट्रॉबेरिजच्या तुलनेत ब्ल्यूबेरीजला हायड्रोपोनिक फार्मिंग मध्ये फळे धरण्यासाठी जास्त वेळ लागतो. हा वेळ दोन वर्षांपर्यंतचा ही असू शकतो. ब्ल्यूबेरीज बहुतेक वेळा एनएफटी तंत्राने पिकविल्या जातात. बियांपासून लागवड कष्टाची आहे. पण तयार रोपे आणून लागवड केल्यास सोयीचे ठरते.

१३)पेपर- रंगीत सिमला मिरची (तापमान उबदार, पीएच लेव्हल ५.५ ते ६

या पिकासाठी सुद्धा टोमॅटो प्रमाणेच वातावरण लागते. उबदार तापमान आणि त्यामुळे साहजिकच खूप प्रकाशाची गरज असते. बियांपासून किंवा रोपे लावून लागवड करता येते. दोन ते तीन महिन्यात मिरची तोडणीला येते. याचे अनेक प्रकार आहेत. जालापेनो, हबनेरो, माझुरका, कुबिको, नैरोबी, फेलिनी. यातील काही जाती गोड आहेत तर काही उष्ण म्हणून गरम गुणधर्माच्या आहेत.

आपण हायड्रोपोनिक प्रकारासाठी सोपी उत्पादने कोणती याची माहिती घेतली. आता काही अवघड उत्पादने यांच्यासंबंधी माहिती घेऊ.

वरील उत्पादने हायड्रोपोनिक साठी आदर्श आहेत याचा अर्थ तुम्ही अन्य कोणती उत्पादने घेऊच शकत नाही असा काढणे बरोबर ठरणार नाही. या प्रकारच्या शेतीत तुम्ही कोणतीही पिके घेऊ शकता मात्र त्यासाठी थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतात. अनुभवी ग्रोअर्स नी या पद्धतीने अनेक वर्षे विविध प्रकारची पिके यशस्वीरित्या घेतली आहेत. या वनस्पती कोणत्या याची माहिती घेऊ

अधिक जागा लागणाऱ्या वनस्पती

तुमच्याकडे हायड्रोपोनिक साठी जागा मर्यादित असेल तर कलिंगडे, भोपळे, खरबुजे, मका वा अन्य मोठ्या वनस्पती लावणे अवघड ठरते. कमी जागेत त्याची यथायोग्य देखभाल करता येत नाही त्यामुळे फळे वाढण्यास जागा कमी मिळते व त्यामुळे उत्पादन कमी येते. मोठ्या जागेत ही पिके घेता येतात.

खोल मुळे असलेली पिके

बटाटे, गाजरे, बीट, रताळी या प्रकारची पिके जमिनीखाली वाढतात. त्यामुळे हायड्रोपोनिकची सुरवात करताना या पिकांचा विचार करू नये. ही कंदमुळे जातीची पिके जमिनीत अधिक चांगली वाढतात. हायड्रोपोनिक तंत्राने ही पिके घेताना पुरेशी लांब आणि खोल जागा आवश्यक असते आणि तेथे या कंदमुळांन आधार द्यावा लागतो. ग्रीन हाउस मध्ये मात्र हे शक्य होते. त्यात आधुनिक यंत्रणा बसवून या कंद जातीच्या पिकांची चांगली वाढ होऊ शकते.

सिझनल कंद व अन्य भाज्या या पिकांनी हायड्रोपोनिक फार्मिंगची सुरवात करण्यापेक्षा सोप्या आणि जलद वाढणाऱ्या पिकांपासून सुरवात करणे उचित ठरते. त्या भाज्या, फळे कोणती याची माहिती वर दिली आहेच. तुमचा या शेतीचा अनुभव जसा वाढत जाईल तसे अन्य भाज्या तुम्ही ट्राय करू शकता.

हायड्रोपोनिक तंत्राचा ज्यांना चांगला अनुभव आहे ते ग्रोअर्स तंबाखू, मोठी कलिंगडे, भोपळे, सनफ्लॉवर, यांचेही उत्पादन घेतात. हायड्रोपोनिक फार्मिंग मध्ये कुठली पिके घ्यायची याला काही लिमिट नाही. पण अश्या पिकांची निवड करताना त्यामागे केवळ महत्वाकांक्षा असू नये तर पूर्ण लक्ष आणि पुरेसा वेळ देऊन पिके घेण्याची मानासिकता असावी. योग्य वनस्पतींची निवड हे हायड्रोपोनिक फार्मिंग मधले तुमचे पाहिले पाउल आहे हे नेहमी लक्षात ठेवावे. सिस्टीम सेट करण्याचे पूर्ण ज्ञान अवगत करून घ्यावे. या सिस्टीम मध्ये वाढविल्या जाणाऱ्या वनस्पती पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहेत याचा विसर कधीच पडू देऊ नये आणि त्याची देखभाल आणि काळजी घ्यावी असे शेवटी सांगावेसे वाटते.

शेअर करा
error: Alert: Content is protected !!