घरी बनविता येणारी नैसर्गिक कीडनाशके

पिकांचे धोकादायक किडी आणि कीटकांपासून संरक्षण व्हावे पण त्याचबरोबर जमिनीचे नुकसान होऊ नये आणि हे खाद्यान्न सेवन करणाऱ्या लोकांच्या पोटात कोणतेही विषारी किंवा शरीरावर दुष्परिणाम करणारे घटक जाऊ नयेत या साठी आजकाल नैसर्गिक कीड आणि कीटक नाशकांचा वापर करण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येत आहे. अशी नैसर्गिक कीडनाशके घराच्या घरी बनविता येतात. आणि त्याचा प्रयोग करण्यासाठी घरातलीच बाग सर्वात उत्तम असे म्हणता येईल. त्यातून जे उत्साही शेतकरी घरच्या घरी स्वतःपुरते धान्य किंवा शेत उत्पादन घेतात त्याच्यासाठी तर हे वरदान म्हणता येईल. घरातल्या बागेत किंवा परसात पिकविलेल्या धान्यापासून बनविलेल्या पदार्थांची रुची घेण्यात नक्कीच एक प्रकारचे सुख आणि समाधान मिळते. शिवाय एक वेगळा अनुभव गाठीशी बांधता येतो ते वेगळेच.

यातही आणखी जे सेंद्रीय शेती करत आहेत त्यांना सेंद्रिय शेतीच्या प्रोटोकॉल किंवा नियम आणि उद्दिष्टांना सांभाळून असे उत्पादन मिळवणे नैसर्गिक कीडनाशकांचा वापर करून शक्य होते. जलद उत्पादन मिळविण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर म्हणजे तणनाशके, कीडनाशके आणि रासायनिक किंवा कृत्रिम खते वापरण्यापेक्षा घरच्या घरी बनविता येणारी नैसर्गिक कीडनाशके कशी बनवायची आणि तुमची बाग निरोगी आणि हिरवीगार कशी ठेवायची याची माहिती करून घेणे फायदेशीर ठरते.

आपले शेतपीक आरोग्यपूर्ण, तरारून आलेले असावे असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटते. पिके अशी यावीत यासाठी त्यांचा पिकांवर पडणाऱ्या किडी आणि पिक खाणारे कीटक यांच्यापासून बचाव करावा लागतो आणि त्यासाठी अनेक पर्याय आहेत. घरच्या घरी केल्या जाणाऱ्या बागेत या किडी किंवा कीटक हाताने काढून टाकण्याचा पर्याय सुद्धा स्वीकारता येतो. काही काळापूर्वी हीच पद्धत पूर्ण खात्रीची मानली जात होती. पण हे काम मुळातच आव्हानात्मक होते. बरेच वेळा त्यात पूर्ण यश मिळत नसे.

दुसरी पद्धत म्हणजे किड्यांची पैदास कमी होईल अशी कीडनाशके घरच्याघरी बनविणे. यात कीटकांच्या संख्येवर नियंत्रण आणणे किंवा त्याचा पूर्ण नायनाट करणे असे दोन्ही उद्देश असतात. पण सरसकट सर्व कीटक उपद्रवी नसतात त्यामुळे सर्व कीटकांचा नायनाट करणारी कीडनाशके किंवा त्यातही तीव्र स्वरूपाच्या पेस्टीसाईडचा वापर योग्य ठरत नाही. त्यामुळे पिकांना फायदेशीर, कीड नष्ट करणारी पण आपल्या शेताच्या किंवा बागेच्या पर्यावरणाला धोकादायक नसलेली नैसर्गिक कीडनाशके वापरणे हा चांगला मार्ग ठरू शकतो.

विशेष सूचना- तुम्ही नैसर्गिक वा घरच्या घरी तयार केलेली कीटकनाशके वापरता आहात म्हणजे तुमची जमीन, बाग किंवा तुम्हाला त्यापासून काही नुकसान होणारच नाही असा अर्थ काढणे बरोबर ठरणार नाही. कारक कीटकनाशक याचा अर्थच मुळी कीटकांना मारणारे पदार्थ असा आहे. त्यामुळे आपले पर्यावरण किंवा इको सिस्टीम पूर्ण बदलण्याची क्षमता त्यात असू शकते याचा विसर पडू देता कामा नये. ही नैसर्गिक कीड किंवा कीटक नाशके मनुष्य, प्राणी यांच्यासाठी विषारी ठरू शकतात. त्यामुळे घरी बनविलेले अथवा नैसर्गिक म्हणून विकत आणलेले कुठलेही कीड/ कीटक नाशक वापरण्यापूर्वी ते प्रभावी पण कमी हानिकारक आहे याची खात्री करून घ्यायला हवी. त्यासाठी थोडा अभ्यास करायला हवा.

घरी बनविता येणारी नैसर्गिक कीड/कीटक नाशके

१)ऑइल स्प्रे कीटकनाशक– हे कीटकनाशक वनस्पती तेल आणि अगदी सौम्य तीव्रतेचा साबण द्राव एकत्र करून बनविले जाते. हे कीड/कीटक नाशक प्रभावी असले तरी मनुष्य किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक नाही. पाने खाणाऱ्या अळ्या, किडी, फुलकिडे यांच्यावर ही चांगलेच प्रभावी आहे.

हयाचा बेसिक स्प्रे किंवा फवारा तयार करण्यासाठी १ कप वनस्पती तेल, १ टेबलस्पून किंवा मोठा चमचा साबण द्रव एकत्र करून चांगले हलवायचे. आता तुमचे हे नैसर्गिक कीड/कीटकनाशक तयार झाले. जेव्हा ते वापरायचे तेव्हा दोन चमचे मिश्रण १ लिटर पाण्यात मिसळून व्यवस्थित ढवळायचे आणि वनस्पतीच्या पृष्ठभागावर थेट फवारणी करायची. जेथे कीड पडली असेल तेथे निट फवारणी करायची आहे. यामुळे तेथील कीड, किटकाचे शरीर यातील तेलाने व्यापले जाते व परिणामी कीटक श्वसन करू शकत नाहीत. कारण तेल व साबणामुळे किटकाची श्वास घेण्यासाठी शरीरावर असलेली छिद्रे बंद होऊन कीड मरते.

२)साबण द्रावण स्प्रे –हेही घरी बनविता येते. ऑइल स्प्रे प्रमाणाचे ते बनवायचे आहे. पांढरी माशी, बीटल, मावा, विविध प्रकारचे पाने खाणारे, वनस्पतीचा रस शोषून घेणारे कीटक यांचा प्रतिबंध या स्प्रे मुळे करता येतो.

बेसिक स्प्रे बनविताना चहाचा दीड चमचा सौम्य लिक्विड सोप व १ लिटर पाणी एकत्र करून मिश्रण तयार करावे व थेट जेथे कीड आहे तेथे फवारावे. हे सुद्धा ऑइल स्प्रे प्रमाणेच काम करते. या स्प्रेचा वापर नेहमीसाठी करता येतो. पण शक्यतो उन्हाच्या वेळी हा फवारा वापरू नये तर सायंकाळी उन कमी झाल्यावर किंवा सकाळी लवकर वापरावा.

३)नीम ऑइल कीटकनाशक – कडूनिंबाच्या झाडाला लागणाऱ्या निंबोण्याच्या बियांपासून काढलेले तेल हे प्रभावी नैसर्गिक कीड/ कीटकनाशक आहे. विशेष म्हणजे किटकाच्या अंडी, अळी, कोश व पाखरू अश्या सर्व अवस्थांवर ते परिणामकारक ठरते. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने बागकाम करणारे माळी किंवा शेतकरी या कीटकनाशकाला प्रथम पसंती देतात.

नीम तेल हार्मोन डीसरप्टर (संप्रेरके विस्कळीत करणारे) म्हणून काम करतेच पण पाने खाणाऱ्या किंवा वनस्पतीचे अन्य भाग कुरतडणाऱ्या कीटकांच्या खाद्यावरच आघात करते. हे विषारी नाही. त्यामुळे पाळीव प्राणी, पक्षी, मासे व अन्य वन्यजीवांना त्याच्यापासून धोका नाही. ते कीटकांचा नाश करतेच पण बागेत आढळणाऱ्या अनेक प्रकारच्या बुरशी, किडी यांच्या संसर्गाशी प्रभावीपणे लढू शकते.

हे कीडनाशक बाजारात सहज उपलब्ध आहे. बागकामाशी संबंधित साहित्य विकणारी दुकाने, नैसर्गिक खाद्यान्य विकणारी दुकाने येथेही ते मिळते. पण इंसेक्टीसाईड म्हणजे कीटकनाशक म्हणून त्याचा वापर करताना ते बाजारातून आणलेले असेल तर त्या बाटलीवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

घरी तयार करताना दोन चमचे ऑइल, एक चमचा सौम्य साबण द्रव हलवून १ लिटर पाण्यात मिसळावा आणि कीड पडलेल्या ठिकाणी त्याची फवारणी करावी. कीड पडू नये यासाठी अगोदरही या स्प्रेची फवारणी कीड प्रतिबंधक म्हणूनही करता येते.

४)डायटमी माती – ही एकप्रकारची माती आहे. ज्या खडकात जीवाश्म आहेत त्या खडकांची पूड किंवा माती म्हणजे डायटमी माती. ज्या खडकात जीवाश्म होते ते खडक जगभर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. असे सांगितले जाते की पृथ्वीच्या कवचाच्या वजनाचा २६ टक्के भार अश्या खडकांचा आहे. ही माती घरात, बाहेर अनेक प्रकारे वापरली जाते. त्यातील कीडनाशक हा तिचा एक उपयोग म्हणता येतील.

विशेष म्हणजे कीड किंवा कीटकांसाठी ती विषारी नाही. पण तिच्यात कीटकांच्या शरीरातील लीपिडस म्हणजे रस शोषून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे किडी किंवा कीटकांचे डीहायड्रेशन होऊन ते मरतात. बागकामाचे साहित्य विकणाऱ्या दुकानातून ती सहज मिळते.

ही वापरण्याची पद्धत म्हणजे ही माती वनस्पती असलेल्या जागेवर शिंपडायची. त्यामुळे वनस्पतींच्या पानांवर येणाऱ्या गोगलगाई व रेंगणारे अन्य कीटक यांना प्रतिबंध होतो. हे एक परिणामकारक कीडनाशक मानले जाते. मात्र प्रत्येकवेळी पाउस पडून गेल्यावर त्याचा पुन्हा वापर करावा लागतो.

५)लसूण स्प्रे– लसणाचा तीव्र आणि झणझणीत वासच त्याला कीडनाशक बनविण्यास कारणीभूत आहे. आता लसणाचा फवारा किंवा स्प्रे कीडनाशक की कीटकांना दूर पळवून लावण्यास उपयोगी हे पुरेसे स्पष्ट झालेले नाही. मात्र दोन्हीपैकी काहीही असले तरी घरात सहज उपलब्ध असणारा लसूण कीड, कीटक नाशक म्हणून किंवा त्यांना पळवून लावणारा म्हणून नक्कीच वापरात आणता येतो.

बेसिक लसूण फवारा किंवा स्प्रे बनविण्यासाठी दोन लसणाचे गड्डे पाकळ्या बारीक वाटून घ्या आणि ते  वाटण १ लिटर पाण्यात मिसळा. रात्रभर तसेच ठेऊन सकाळी गाळून घ्यावे व मग त्यात हवे असल्यास अर्धा कप वनस्पती तेल, १ टी स्पून सौम्य साबण द्रव एकत्र करावा. हे एक कप मिश्रण १ लिटर पाण्यात मिसळून कीड पडलेल्या ठिकाणी फवारावे.

६)मिरची स्प्रे- लसणाप्रमाणेच मिरचीचा वापर विविध प्रकारच्या किडी नाहीश्या करण्यासाठी अथवा कीटकांना पळवून लावता येण्यासाठी करता येतो. लाल मिरचीची पूड १ चमचा घेऊन १ लिटर पाण्यात मिसळावी. त्यात साबणाच्या सौम्य द्रावणाचे काही थेंब टाकून त्याची थेट फवारणी करावी.

ताज्या मिरच्या असतील तर अर्धा कप मिरच्या १ कप पाण्यात मिसळून बारीक वाटण करावे. मग १ लिटर पाण्यात हे मिश्रण घालून उकळावे. थंड झाल्यावर गाळून त्यात लिक्विड सोपचे काही थेंब टाकून हलवावे आणि फवारणी करावी. मिरची ही माणसाला सुद्धा त्रासदायक ठरू शकते हे लक्षात घेऊन हा स्प्रे तयार करताना किंवा फवारताना हातात ग्लोव्ह घालावे आणि डोळे, नाक आणि तोंडापासून दूर धरावा.

७)ऑल इन वन स्प्रे- याच्या नावावरूनच हे अनेक स्प्रेचे मिश्रण असणार याची कल्पना येते. हा बनविण्यासाठी एक लसूण गड्डा, एक लहान कांदा, १ टी स्पून मिरचीची पूड एक तास एकत्र करून ठेवावी.. नंतर त्यात १ टेबल स्पून लिक्विड सोप घालून एकत्र करावे. पाण्यात मिसळून हा फवारा पानांच्या वरच्या बाजूला तसेच खालच्या बाजूला फवारावा. उरलेले मिश्रण फ्रीज मध्ये ठेऊन आठवड्यानंतर पुन्हा आवश्यकता वाटली तर फवारावे.

८)टोमॅटो स्प्रे – टोमॅटो झुडपे नैसर्गिक कीडनाशक मानली जातात. ही नाईटशेडी कुळातील वनस्पती आहे त्यामुळे ती अल्कोलाईड असतात. त्यात टोमॅटाइन नावाचे अल्कोलाईड आहे. ते बारीक अळ्या, किडे यांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.

हा स्प्रे तयार करताना टोमॅटोची दोन कप ताजी पाने कापून १ लिटर पाण्यात घालून रात्रभर ठेवावे. पाने घेताना शक्यतो झाडाच्या खालच्या भागातील घ्यावी. रात्रभर ठेवलेले हे पाणी सकाळी गाळून घ्यावे आणि त्याची थेट फवारणी करावी.

वापरा, परिणाम पहा आणि सुधारणा करा

या प्रकारे नैसर्गिक कीड/ कीटकनाशके बनविता येतात. त्याचे अनेक प्रकार आहेत. बीटी, मिल्कीस्पोर, निकोटीन, आयर्न फोस्फेट असे हही अनेक प्रकार आहेत. पण वरील पद्धतीने तयार केलेली नैसर्गिक कीड/कीटक नाशके सुरवातीला उत्तम म्हणता येतील. तुम्ही स्वतः तयार केलेली ही कीडनाशके सेंद्रिय शेती किंवा बागेत प्रथम वापरून त्याचे काय परिणाम होतात हे लक्षपूर्वक अभ्यासले पाहिजे.

सेंद्रिय शेती करणारे अनेक शेतकरी किंवा बागवान स्वतःचे खास स्प्रे बनवितात. म्हणजे स्प्रे तयार करताना त्यात वापरण्याच्या पदार्थाचे प्रमाण त्याच्या पद्धतीनुसार घेतात. याच प्रमाणे तुम्ही सुद्धा विविध प्रमाण वापरून स्प्रे बनवू शकता. आणि त्यात आवश्यक वाटतील त्याप्रमाणे सुधारणा करू शकता.

सरसकट सर्व किडी किंवा कीटक यांचा नाश करणे योग्य ठरत नाही. कारण काही कीटक पर्यावरण राखण्यास मदत करत असतात आणि इको सिस्टीम साठी त्याचे अस्तित्व आवश्यक आहे. जमिनीतील काही सूक्ष्म जीवाणू, बुरशी, वनस्पतीवर येणारी काही प्रकारची बुरशी जमिनीची सुपिकता राखते आणि कीड व्यवस्थापन प्रभावीपणे करते हेही लक्षात घेतले पाहिजे.

शेअर करा
error: Alert: Content is protected !!