असा सुरु करू शकता घरगुती बेकरी उद्योग

बेकरी उत्पादनांना आज चांगली मागणी असून या व्यवसायाची वाढ वेगाने होत आहे. विशेष म्हणजे बेकरी उद्योग घरच्या घरीही सुरु करता येतो. चांगल्या पगाराची नोकरी सोडून घरात बेकिंग सुरु करण्याची कल्पना अनेकांना वेडगळपणाची वाटू शकेल. पण आज प्रत्यक्षात मात्र अनेकांनी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून हा व्यवसाय सुरु केला आहे आणि तो यशस्वी झाला आहे. या मागे अनेक कारणे देता येतील. घरगुती पातळीवर हा व्यवसाय सुरु केलेल्या अनेकांशी बोलल्यावर असे लक्षात आले की वैवाहिक जीवन, मुलाबाळांचे संगोपन आणि आपली आवड किंवा पॅशन जपणे यामुळे त्याना हे सहज शक्य झाले आहे.

प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या मागणीत दिवसेनदिवस होत असलेली वाढ, तसेच मोठ्या प्रमाणावर सुरु झालेल्या नामवंत बेकरी चेन्स किंवा शाखा आणि स्वतंत्रपणे चालविल्या जात असलेल्या बेकरी यापासून प्रेरणा घेऊन अनेक महिला उद्योजकांनी घरच्या घरी बेकरी व्यवसाय सुरु करण्यात आघाडी घेतली आहे. घरच्या घरी हा व्यवसाय सुरु करण्यासाठी फारसे मनुष्यबळ लागत नाही तसेच प्राथमिक गुंतवणूक खुपच कमी लागते. शिकत असलेले विद्यार्थी, गृहिणी या सुद्धा बेकरी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करू लागल्या आहेत.

केक पेस्ट्रीज हे पदार्थ अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत तर कोणतेही सेलेब्रेशन केक शिवाय पूर्ण होत नाही अशी आज परिस्थिती आहे. वाढदिवस, परीक्षेतील यश, छोटी मोठी पार्टी, गेट टुगेदर, लग्नाचे वाढदिवस, कार्पोरेट गॅदरिंग अश्या अनेक कार्यक्रमात केक आवर्जून मागविले जातात. भारतात केक पेस्ट्री बिझिनेस कसा सुरु करायचा याचे थोडे मार्गदर्शन येथे केले आहे.

या लेखात ज्यांना घरी किंवा व्यावसायिक पातळीवर बेकरी व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांना त्यासाठी काय, किती आणि कशी तयारी करावी लागेल याचा आढावा आपण घेणार आहोत. या व्यवसायाचे व्यवस्थापन कसे करावे याचीही माहिती देण्याचा प्रयत्न येथे केला आहे. पूर्वी घरोघरी तव्यावर भाजून रवा अथवा तत्सम पदार्थापासून केक केले जात असत. आता नवीन उपकरणे, विविध चवी आणि युट्यूब, सोशल मीडियावर केक बनविण्याच्या लाखो पाककृती सहज उपलब्ध झाल्यापासून अगदी बाजारासारखे, टेस्टी, हटके, आकर्षक केक, ज्यांना बेकिंगची मनापासून आवड आहे आणि नवीन काही करून पाहण्याची तयारी आहे त्यांना सहज बनविता येत आहेत.

केक, पेस्ट्री मागणी

कुठलाही व्यवसाय सुरु करताना त्याला मागणी किती हा सर्वात महत्वाचा भाग लक्षात घ्यावा लागतो. केक पेस्ट्रीजचा विचार करायचा तर भारतात आज कुठल्याही गावात,शहरात जा किमान एक तरी बेकरी तेथे आहे असे दिसेल. भारतात दीर्घकाळ बेकरी उत्पादने आवडीने खाल्ली जात आहेत. पार्टी असो, एखादी मेजवानी असो, टाईम पास म्हणून, मित्र मंडळींच्या मेळाव्यात केक हवाच अशी भावना वाढती आहे. त्यामुळे अशी सेवा देणारे होम बेकर्स या संधीचा फायदा घेऊन आपला घरगुती केक पेस्ट्री व्यवसाय सुरु करू शकतात. डिजीटल मीडियाचा फायदा घेऊन अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणेही त्यांना शक्य होते.

प्रमुख खर्च 

तुम्हाला जर घरगुती स्वरुपात बेकिंग व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी येणारा खर्च आणि व्यावसायिक पातळीवर बेकिंग करायचे असेल तर त्यासाठी येणारा खर्च किंवा करावी लागणारी गुंतवणूक नक्कीच वेगळी वेगळी असणार. पण तरीही अन्यही काही खर्च करावे लागणारच. असा व्यवसाय सुरु करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा साधारण अंदाज असा घेता येतो,

त्यातील प्रमुख खर्च असे आहेत.

 • जागा
 • उपकरणे खर्च
 • कच्चा माल खर्च
 • व्यवसाय परवाने खर्च
 • पॅकेजिंग 
 • आणि अन्य किरकोळ खर्च 

या शिवाय तुम्ही एखादा व्यावसायिक अभ्यासक्रम, कार्यशाळा, एखादा क्लास करणार असला तर त्याचा खर्च, योग्य रेसिपी मिळविण्यासाठी करावा लागणारा खर्च, साठा किंवा स्टॉक मॅनेजमेंट, डिलीव्हरी, मेन्यू ठरविणे, तयार मालाच्या किमती निश्चित करणे, ब्रँडिंग, ऑनलाईन क्लासेस चालवून करता येणारी कमाई, होम बेकर्स मध्ये स्वतःचे खास स्थान निर्माण करणे या बाबींचाही विचार आवश्यक ठरतो.

व्यवसायासाठी जागा 

घरातूनच विक्री-

 ज्या महिलांना बेकिंगची आवड आहे, त्यासंदर्भात सतत नवीन काय येते आहे याची माहिती घेण्याची आणि ते स्वतः करून पाहण्याची आवड आहे त्या हा व्यवसाय घरबसल्या करू शकतात. अर्थात नुसती आवड आणि हौस असणे वेगळे आणि व्यवसाय करणे वेगळे. त्यामुळे तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर तो पूर्ण निष्ठेने आणि मनापासून करायला हवा.

एक लक्षात घ्यायला हवे की लोकांना विविध फ्लेवर्स टेस्ट करायला आवडते. त्यासाठी थोडे अधिक पैसे मोजण्याची त्यांची तयारी असते. त्यातून फूड बिझिनेस हा थोडा ट्रिकी व्यवसाय आहे. येथे तुम्हाला ग्राहकांच्या रसनेवर म्हणजे जिभेवर ताबा मिळवायचा आहे. एकदा हे कौशल्य तुम्हाला अवगत झाले की दूरवरून सुद्धा ग्राहक तुमच्याच कडे आवर्जून येणार याची खात्री देता येते.

तुम्ही बेकिंग व्यवसाय घरातल्या स्वयंपाक घरातच सुरु करू शकता किंवा भाडेतत्वावर जागा घेऊन सुरु करू शकता. व्यवसायाची जागा कुठे आहे याला फार महत्व द्यावे लागते. घरीच व्यवसाय करणार असाल तर जागेसाठी खर्च येणार नाही. पण पूर्ण वेळ, पूर्ण क्षमतेने तुम्ही बेकरी सुरु करणार असला तर सतत गर्दी असलेल्या ठिकाणी जागा असणे फायद्याचे. हाय एंड मॉल, शॉपिंग प्लाझा ही अशा व्यवसायासाठी आदर्श ठिकाणे आहेत. तेथे दुमजली हाईटचे दुकान सुरु करणे फायदेशीर होते. त्यामुळे ग्राहकांना बसण्याची सुविधा पुरविता येते. डिस्प्लेसाठी जागा राहते. 

कमर्शियल ठिकाणी अशी ५०० चौरस फुट जागा भाड्याने घेतली तर त्यासाठी ४० ते ५० हजार महिना भाडे आणि सुरक्षा ठेव म्हणून तीन महिन्याचे भाडे भरावे लागेल. ही जागा खूप महाविद्यालये असलेल्या ठिकाणी, कार्यालये, ऑफिसेस जवळ आहेत अशा ठिकाणी असेल तर ग्राहक मोठ्या संखेने मिळतील. शहरात आड बाजूला जागा असेल तर ग्राहक मर्यादित येतील. तुम्ही कोणतीही जागा घेतली तरी ती घेण्यापूर्वी तेथे मोठ्या क्षमतेचे ओवन वापरण्याची परवानगी आहे ना याची खात्री करून घ्या तसेच पाणी पुरवठा आहे ना हेही तपासून पहा.

बेकरी उपकरणे खर्च 

तुम्ही बेक केलेल्या पदार्थाची विक्री सुरु करण्यापूर्वी तुमच्याकडे काही उपकरणे असणे आवश्यक आहे. तुम्ही अगोदरपासूनच आवड म्हणून किंवा पार्ट टाईम उद्योग म्हणून बेकिंग करत असाल तर तुमच्याकडे काही उपकरणे असणारच. तरीही मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी काही उपकरणे खरेदी करावी लागतील. त्यातील महत्वाची उपकरणे खालीलप्रमाणे 

 • चांगल्या दर्जाचा आणि मोठ्या क्षमतेचा फूड मिक्सर
 • नॉनस्टिक केक ट्रे 
 • मेजरिंग स्पून म्हणजे मोजमाप चमचे
 • अचूक वजन होण्यासाठी वजनकाटा 
 • पदार्थ मिक्स करण्यासाठी आवश्यक बाऊल्स किंवा तसराळी
 • लाकडी डाव
 • रबरी स्पॅच्युला, (केक मिश्रण सहजपणे भांड्यात काढण्यासाठी आणि आयसिंग साठी )
 • केक ठेवण्यासाठी काचेची कपाटे किंवा केस 
 • चांगला ओव्हन 

उपकरणात मर्यादित गुंतवणूक करून व्यवसाय सुरु करता येतो. अगदी आवश्यक उपकरणे घ्यायची ठरविली तरी चांगला ओव्हन, तसराळे, रबरी स्पॅच्युला वगैरे साठी १२ ते १५ हजार रुपये लागतील. व्यावसायिक पातळीवर बेकरी उद्योग करायचा असेल तर मोठे ओव्हन, डीप फ्रीज, कामासाठी टेबल, ग्राहकांना बसण्याची व्यवस्था, ५०० चौरस फुट जागा यासाठी किमान ६ लाख रुपये खर्च करावे लागतील.

साहित्य आणि कच्चा माल खर्च 

हा व्यवसाय सुरु करताना तुम्हाला नक्की कोणते केक करायचे आहेत हे ठरवायला हवे. त्यानंतर सुरवात कशापासून करायची हेही ठरवायला हवे. केक, कुकीज, ब्रेड यासाठी लागणारा कच्चा माल साधारण सारखाच असतो. पण याच बरोबर तुम्ही मफिन्स, कप केक, फ्रॉस्टिंग, कुकीज, पाय, टार्ट, ब्लॉंडी, ब्राऊनी, ब्रेड, बन्स असेही प्रकार बनविणार असाल तर काही अन्य साहित्याची गरज भासणार हे लक्षात घ्यायला हवे.

मुख्य म्हणजे चांगल्या दर्जाचा कच्चा माल खरेदी करता यायला हवा आणि तोही योग्य किमतीत. ऑनलाईन स्टोर्सच्या माध्यमातून स्पर्धात्मक दरात अशी खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता. त्याही बेसिक म्हणजे मैदा, साखर, इसेन्स असा माल या पद्धतीने खरेदी करू शकता. पण कोको पावडर, स्प्रिंकल्स, बटर पेपर व अन्य माल बेकिंग सप्लाय करणाऱ्या स्थानिक स्टोर्स मध्ये तुम्हाला स्वस्तात मिळतो. 

दुसरे म्हणजे तुम्ही हेल्दी किंवा आरोग्यपूर्ण बेकरी उत्पादने विकणार असाल तर त्यासाठीचा कच्चा माल ऑर्गेनिक सुपर मार्केट्स मधून घेऊ शकता. येथे तुम्हाला खात्रीचा नैसर्गिक माल मिळू शकतो कारण अशी स्टोर्स थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करत असतात.

कच्च्या मालासाठी साधारण ८ हजारापर्यंत खर्च येऊ शकेल पण व्यवसायिक पातळीवर खरेदी करायची असेल तर हा खर्च जादा होईल. कारण व्यावसायिक दुकानात तुम्हाला काही उत्पादने डिस्प्ले साठीही ठेवावी लागत असतात. त्यामुळे हा खर्च अंदाजे २० ते २२ हजार धरायला हवा.

व्यवसायाची सुरवात करताना प्रथम व्हॅनीला, चॉकलेट कप केक पासून करावी आणि आपल्या केकना मागणी किती, कशी आहे आणि व्यवसाय यशस्वी होत आहे असे दिसू लागले की उत्पादने व्हरायटी वाढवावी. बहुतेक बेकर्स कोणत्याही प्रकारचे केक बनवू शकतात. अनेक जण आपण कल्पना करू शकत नाही असेही केक बनवितात. तर काही जण त्यांची खास स्पेशालिटी म्हणून केवळ घरगुती कप केक बनविताना दिसतात. काही बेकर्स ग्लुटेन फ्री केक ही त्यांची स्पेशालिटी बनवितात तर काही वेडिंग केक मध्ये माहीर असतात. 

आपण नक्की कशा प्रकारचे उत्पादन करायचे याचा निर्णय घेताना आपली क्षमता ओळखून त्याप्रमाणे निर्णय घेतला पाहिजे. अर्थात केक वा तत्सम बेकरी पदार्थात वेगळेपण, जरा हटकेपण असणे ही व्यवसायाच्या यशाची गुरुकिल्ली असते, अन्य बेकर्स मध्ये तुमचे केक उठून दिसतील, ग्राहकांना हटके असे काहीतरी खरेदी केल्याचे समाधान मिळेल अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या उत्पादनाची निवड करायला हवी.

व्यवसाय परवाने 

एकदा बेकरी व्यवसाय सुरु करण्याचा तुमचा निर्णय झाला आणि तो घरगुती स्वरुपात करायचा का व्यावसायिक पातळीवर करायचा याचा निर्णय झाला की त्यासाठी कोणते परवाने, परवानग्या लागणार हे पाहायला हवे. व्यवसाय घरात करायचा असेल तर परवानगी लागत नाही. पण व्यावसायिक पातळीवर करायचा असेल तर या परवानग्या आणि परवाने मिळविण्यासाठी साधारण १० हजारापर्यंत खर्च येतो.

यात एफएसएसएआय (अन्न सुरक्षा विभाग) यांचा परवाना मिळवावा लागतो.

शिवाय महापालिका परवाना

अग्नी सुरक्षा प्रमाणपत्र

वस्तू सेवा कर परवाना (जीएसटी)

आरोग्य परवाना

पोलीस विभागाकडून इटिंग हाउस परवाना 

असे परवाने लागतील. येथे एक सल्ला असा द्यावासा वाटतो की हे सारे परवाने आणि परवानग्या व्यवसाय सुरु करण्यापूर्वी मिळविलेले केव्हाही चांगले. कारण व्यवसाय सुरु केल्यावर मग त्यासाठी अर्ज केले तर ते मिळविण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. विशेषतः विविध सरकारी खात्यांकडून अडवणूक होऊ शकते आणि त्यामुळे परवाने मिळेपर्यंत सतत काळजी, टेन्शन येत राहते.

पॅकेजिंगसाठी येणारा खर्च 

कोणत्याही वस्तूची विक्री करायची असेल तर त्यासाठी आकर्षक पॅकिंगची नक्कीच गरज असते. त्यातही या वस्तू म्हणजे खाद्यपदार्थ व त्यातही केक सारखे विशेष पदार्थ असतील तर पॅकेजिंग बाबत अधिक जागरुकता दाखवावी लागते. ग्राहक तुमच्या केकची चव घेण्याअगोदर त्याला पॅकिंग प्रथम दृष्टीस पडणार हे लक्षात घेऊन पॅकेजिंग कसे असले पाहिजे हे ठरवावे लागते. 

केक व तत्सम पदार्थांसाठी मफिन्स लायनर्स, केक बॉक्स मिळतात. हा खर्च पॅकेजिंग मध्येच धरला जातो. हा खर्च नक्की किती असेल हे सुरवातीला सांगणे अवघड असते कारण तुम्ही किती क्वांटीटी खरेदी करता त्यावर तो ठरतो. साधारण हा खर्च ५ हजार धरावा पण व्यावसायिक पातळीवर तुम्ही उत्पादन करणार असला तर हाच खर्च १० हजार धरावा.

मार्केटिंगसाठी येणारा खर्च 

तुम्ही केक, कुकीज, बिस्किटे जे काही तयार करणार आहात ते कसे सादर करता याला जसे महत्व आहे तितकेच महत्व तुमच्या उत्पादांची चव कशी आहे यालाही आहे. तुमचे केक खाल्ल्यानंतर ग्राहक समाधानी किंवा संतुष्ट असेल तर त्याचे खूप फायदे तुमच्या व्यवसायाची प्रगती होण्यासाठी होत असतात. याचे मुख्य कारण हा व्यवसाय प्रामुख्याने माउथ पब्लिसिटीवर वाढतो. अर्थात इंटरनेट हा तुमच्यासाठी मार्केटिंगचा एक चांगला स्त्रोत आहेच. त्यातही फेसबुक सर्वाधिक लोकप्रिय समाज माध्यम आहे. होम बेकर्स इन्स्टाग्राम, ट्विटर या समाज माध्यमांना सुद्धा पसंती देताना दिसतात.

या माध्यमांवर तुम्ही तुमचे केक, कुकीज, बिस्किटे याचे आकर्षक फोटो पोस्ट करू शकता. ज्यांना फोटोग्राफी अवगत आहे असे बेकर्स स्वतः त्यांच्या उत्पादनाचे फोटो काढून ते पोस्ट करतात. पण तुम्हाला जरी फोटोग्राफी अवगत नसेल तरी हे काम तुम्ही परिवारातील सदस्य, मित्र यांच्याकडून सुद्धा करून घेऊ शकता.

अर्थात मार्केटिंग मध्ये होम बेकर्स स्वतः फार अडकून पडत नाहीत असे दिसते. काही बेकर्स वर्षानुवर्षे येणाऱ्या ग्राहकांना मेल पाठवून त्याच्या संपर्कात राहतात तर अनेक बेकर्स शाळा, सोसायट्या, अपार्टमेंट, फ्ली मार्केट, प्रदर्शने, स्टॉल्स त्यांच्या व्यवसायाच्या प्रमोशन साठी निवडतात.

या व्यवसायात स्थिरावलेले काही होम बेकर्स पुढच्या पातळीवर जाऊन स्वतःची वेबसाईट तयार करतात. तुम्हाला माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची पार्श्वभूमी असेल तर हे काम तुम्ही स्वतः करू शकता. अथवा परिवारातील या क्षेत्रात काम करणारे कुणी असेल तर तेही तुमची वेबसाईट मॅनेज करून देऊ शकतात.

अन्य खर्च 

या व्यवसायासाठी करावा लागणारा अन्य खर्च याचा विचार करण्यापूर्वी अगोदर काही टिप्स देणे योग्य ठरेल. त्या अशा

 1. तुमच्या परिचयाचे कुणी कार्यक्रम आयोजक, वेडिंग प्लॅनर असतील तर त्यांच्याबरोबर तुम्ही भागीदारी करार करू शकता. त्यामुळे त्यांचे जेव्हा केव्हा कार्यक्रम असतील त्याच्या ऑर्डर तुम्हाला मिळत राहतील. मग तो १०० पाहुणे असलेला वाढदिवस असो अथवा १ हजार आमंत्रित असलेले विवाह समारंभ असोत. 
 2. दुसरा मार्ग म्हणजे तुमच्या स्थानिक भागातील सुपरमार्केट्स, किराणा दुकाने किंवा जेथे स्वतःचे उत्पादन नाही पण बेकरी माल विकला जातो अशा बेकरी यांच्याशी संपर्क साधायचा आणि तुमचा एखादाच खास पदार्थ दररोज किंवा आठवड्याच्या बोलीवर तेथे विक्रीसाठी ठेवायचा. त्यामुळे नियमित कमाई होऊ शकते. अर्थात यात ग्राहकाची मागणी कशाला, जास्त खपाचे पदार्थ कोणते हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
 3. ग्राहकांकडून थेट ऑर्डर घेणे हा सर्वात चांगला मार्ग आहे. पण त्यासाठी तुमचे पदार्थ ‘द बेस्ट’ असायला हवेत. यासाठी तुम्ही प्रथम नातेवाईक, परिचित, मित्रमंडळात तुम्ही केक ऑर्डर घेत आहात याची माहिती द्यावी. तसेच नवीन ग्राहक मिळण्यासाठी तुमच्या फेसबुक पेज, इन्स्टाग्राम यांचाही वापर करवा. कारण तेथे तुमचे पूर्वीचे काम हे नवे ग्राहक पाहू शकतात.
 4. अन्य खर्चाचा विचार करताना प्रत्येक होम बेकर साठी हा खर्च वेगळा असू शकतो. उदहारण द्यायचे तर वाहतूक खर्च विचारात घेऊ. माल आणणे, उपकरण खरेदी, डिलीव्हरी चार्जेस यासाठी सर्वाना सारखाच खर्च येईल असे नाही. एकाद्याच्या घरापासून ठोक बाजार जवळ असेल तर हा खर्च कमी होईल. 

तसेच विविध ठिकाणांचा पॅकेजिंग, मार्केटिंग खर्च वेगळा असू शकतो. तो कुठे जास्त असेल तर कुठे कमी असेल. अशा खर्चासाठी साधारण १० हजार रुपये बाजूला असले पाहिजेत.

व्यावसायिक प्रशिक्षण, कार्यशाळा, क्लासेस 

बरेच होम बेकर्स युट्यूब अथवा तत्सम चॅनल्सवरील व्हिडीओ पाहून बेकिंग करतात. यात बरेचवेळा प्रयोग करावे लागतात आणि ट्रायल अँड एरर पद्धतीने ते करावे लागतात. म्हणजे एकदा चुकले तर पुन्हा थोडा बदल करून नव्याने बनवायचे असे प्रयोग करावे लागतात. व्यावसायिक पातळीवर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण, कार्यशाळा अथवा क्लासेस लावणे चांगले. अनेक नामवंत संस्था बेकिंग क्लासेस घेतात. तसेच अनेक नामवंत बेकर्स, केक आर्टिस्ट यांच्याकडून तुम्ही हे शिक्षण घेऊन त्यात कौशल्य प्राप्त करू शकता.

कोणत्याही परिस्थितीत ग्राहक तुमच्या उत्पादनाबाबत असमाधानी होणार नाही याची काळजी घेणे फार आवश्यक असते कारण ग्राहकाचे समाधान ही तुमच्या व्यवसाय वाढीची महत्वाची पायरी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

या व्यवसायात एकदा ज्ञान मिळवीले म्हणजे पुरे ठरत नाही. याचे शिक्षण ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे. या व्यवसायात सतत नवे काहीतरी येत असते त्यामुळे तुम्ही त्याबाबत अप टू डेट असणे आवश्यक आहे. ग्राहक सतत नवीन काहीतरी च्या शोधात असतात. त्यामुळे ते जी मागणी करतील त्याविषयी तुम्हाला माहिती असणे हे व्यवसायाच्या यशाचे एक गमक म्हणता येईल. त्यामुळे या विषयातील नवे नवे व्हिडीओ सतत पाहणे, बाजारात नवीन काय आलेय आणि त्यात आपण काय वेगळेपण आणू शकतो याचा विचार करणे. त्यानुसार प्रयोग करून पाहणे यालाही महत्व आहे.

योग्य रेसिपी मिळविणे 

आजकाल अनेक समारंभात केक हे मुख्य आकर्षण असते. म्हणजे केक ‘ स्टार ऑफ द शो ‘ असतात असे दुसऱ्या भाषेत म्हणता येईल. आलेल्या पाहुण्यांना काही तरी हटके देण्यासाठी ग्राहक त्यामुळे होम बेकर्स ना अधिक प्राधान्य देताना दिसतात. होम बेकर्स कडून त्यांना हवा तश्या प्रकारचा म्हणजे कस्टमाईज केक बनवून  मिळू शकतो. यात महत्वाचे ठरते ते तुम्ही केकची योग्य रेसिपी कशी निवडता हे. ही निवड अगदी योग्य असेल तर तुमच्या घरगुती बेकिंग व्यवसायासाठी ती जीवनदायिनी ठरू शकते.

ही योग्य रेसिपी कशी मिळवायची याची एक पद्धत आहे. त्यात तुम्ही जे केक बनविता ते तुमचे नातेवाईक, मित्र, परिचित याना टेस्ट करायला द्यायचे आणि त्यांना खरी खरी प्रतिक्रिया देण्याची विनंती करायची. ज्या सुधारणा त्यांच्याकडून सुचविल्या जातील त्यानुसार पुन्हा नव्याने केक करून पुन्हा टेस्ट साठी द्यायचे. तुम्ही तुमच्या केकची जाहिरात करण्यापूर्वी ते चवीला, स्वादाला परिपूर्ण हवेत याची खबरदारी घेतली की पुन्हा पुन्हा केलेल्या प्रयोगातून तुम्हाला परफेक्ट रेसिपी मिळू शकते.

बेसिक केक रेसिपी निवडताना सुरवात साधी, हमखास चांगल्या चवीचे केक बनतील यापासून करावी. सुरवात करताना 

साधे कप केक (Cup cake) विविध आयसिंग वापरून बनविणे

फ्लेवर्ड केक म्हणजे विविध स्वादाचे केक बनविणे

विवाह, किंवा अन्य सेलेब्रेशन केक बनविणे

ट्रे बेक्ड बार्स बनविणे , या पासून करता येईल.

स्टॉक व्यवस्थापन 

तुम्ही घरगुती पातळीवर हा व्यवसाय करत असाल तर कच्च्या मालाचा मोठा साठा करण्याची गरज नसते त्यामुळे स्टॉक व्यवस्थापन हा फार अवघड प्रश्न नसतो. पण तरीही घरातील कच्चा माल किंवा अन्य साहित्य संपले अशी वेळ येऊ नये याची काळजी घ्यावी लागते. किंवा काही वेळा ज्या मालासाठी एक्सपायरी डेट आहे ती उलटून गेलेली नाही ना याची खात्री करून घ्यावी लागते. त्यासाठी आपण साठवत असलेल्या मालाचे रेकॉर्ड करणे चांगले. घरच्या घरी व्यवसाय असेल तर एखाद्या वहीत सुद्धा या नोंदण्या करता येतील. पण व्यावसायिक पातळीवर व्याप मोठा असतो त्यामुळे त्यासाठी स्टॉक मॅनेजमेंट सिस्टीम बनविणे योग्य ठरते.

मेन्यू कसा ठरवाल 

ग्राहक जेव्हा तुमच्याकडे ऑर्डर द्यायला येईल तेव्हा ग्राहकासाठी तुमच्याकडे उत्तम प्रकारे डिझाईन केलेला मेन्यू हवा. त्यामुळे तुम्ही काय काय देऊ शकता याचा व्यवस्थित अंदाज ग्राहकाला येतो आणि ऑर्डर देणे सोपे जाते. शिवाय तुम्ही ग्राहकाला मेन्यू निवडताना काही टिप्स देऊ शकता. मेन्यू ठरविताना ग्राहकांच्या अपेक्षा, गरज लक्षात घेतली जावी हे ठीक असले तरी मेन्यू मध्ये त्यांना काही पर्याय नक्की असावेत. अर्थात मेन्यू मध्ये खूप प्रमाणावर व्हरायटी नको. त्यामुळे ग्राहकाचा गोंधळ उडण्याची शक्यता असतेच पण गोंधळल्याने ग्राहक दुसरीकडे जाण्याची भीतीही असते.

मेन्यू ठरविताना ग्राहक अमुक एखादा पदार्थ मागेल अशा अंदाजावरून मेन्यू ठरवू नये तर तुमची खासियत, तुम्हाला मनापासून जे बनवायला आवडते, ज्यात तुमची मास्टरी आहे असे पदार्थ सुरवातीचे काही महिने तरी मेन्यूत मध्ये सामील करावे. यामुळे मेन्यू बदलण्याचा पर्याय खुला राहतो, मेन्यू मध्ये नवे पदार्थ घालणे शक्य होते आणि मुख्य म्हणजे ग्राहकांकडून कशाला जास्त मागणी आहे याचा अंदाज येतो.

दर कसे ठरवावे 

आपल्या पदार्थांचे दर ठरविणे हे कौशल्याचे काम आहे. बाजारात स्पर्धा खूप आहे. त्यामुळे तुम्ही जे पदार्थ करता त्याच पदार्थांचे बाहेरचे दर विविध असणार. म्हणजे कुठे ते जास्त असतील कुठे कमी असतील. दुसऱ्याने काय किंमत लावली यावर आपले दर ठरवू नयेत. याचे मुख्य कारण म्हणजे तुमचा उत्पादन खर्च त्यांच्यापेक्षा कमी किंवा जास्त सुद्धा असू शकतो. त्यामुळे विक्रीची किंमत वेगळी असणारच.

झालेल्या खर्चापेक्षा कमी किमतीत पदार्थ विकणे योग्य नाही. युएसपी म्हणजे युनिक सेलिंग प्रपोर्शन (अद्वितीय विक्री प्रस्ताव) येथे कामाचा ठरत नाही. कारण यात तडजोडी करून ग्राहक आकर्षित होतील असे प्रस्ताव असतात पण हे लक्षात घ्यायला हवे की असाच प्रस्ताव तुमच्या स्पर्धकाने दिला तर ग्राहक तिकडे जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या मालाची गुणवत्ता राखून नफा होईल या प्रकारे किमती ठरवाव्या लागतात. तुमच्या मालाची गुणवत्ता, चव उत्तम असेल तर जादा पैसे मोजायची ग्राहकाची तयारी असते.

ब्रँडिंग 

लेटरहेड, बिझिनेस कार्ड्स, लोगो, पॅकेजिंग डिझाईन असे अनेक खर्च मार्केटिंग खर्चात अंतर्भूत आहेत. व्यवसाय सुरु केल्यावर त्याची प्रसिद्धी करण्यासाठी किमान येवढा खर्च करावा लागतोच. तुमचा व्यवसाय वाढेल तशी या खर्चात वाढ करता येते. पण सुरवातीला साधारण हा खर्च ५ हजार रुपये पकडायला हवा. व्यावसायिक जागेत तुमचा व्यवसाय असेल तर यापेक्षा खुपच अधिक खर्च करावा लागतो. कारण यात आकर्षक, चटकन लक्ष वेधून घेईल असा डिस्प्ले बोर्ड हवा तसेच वर्तमानपत्रासोबत वितरीत करण्यासाठी पत्रके, काही आमंत्रण पत्रिका यांचाही खर्च येतो. हा खर्च साधारण १ लाखाच्या घरात जाऊ शकतो.

ब्रँड लोगो हा तुमच्या व्यवसायाचा दिसणारा चेहरा असतो. त्यांच्यामुळे तुमची ओळख निर्माण होत असते. तुमच्या व्यवसायाच्या नावावरून ग्राहक तुम्हाला ओळखत असतो. त्यामुळे नाव ठरविताना ते साधे, सोपे, सहज लक्षात राहील असे आणि ज्यातून तुमच्या व्यवसायाचे प्रतिबिंब उमटेल असे असावे.

ऑर्डर पुरी करताना बिझिनेस कार्ड सोबत देणे, बॉक्सेस, किंवा अन्य पॅकेजिंग युनिक पद्धतीचे असावे ज्यावर तुमचा लोगो आणि ब्रँडनेम ठळकपणे दिसेल. ग्राहकांवर तुमचा लोगो आणि ब्रँडनेम चा ठसा उमटायला हवा. यामुळे ग्राहकाला तुमचे ब्रँडनेम लक्षात राहील आणि ते दुसऱ्या ग्राहकांना तुमची शिफारस करतील.

तुम्ही ‘ईट आउट प्लेस’ प्रकारे व्यवसाय करणार असाल तर तुमच्या दुकानाच्या जागेसाठी काही थीम डिझाईन करणे उपयुक्त ठरते. या थीम मधून तुमची खासियत ग्राहकाला समजेल. तसेच ग्राहकाच्या सहज नजरेत भरतील अश्या जागी तुमचे उत्पादन डिस्प्ले करणे फायद्याचे ठरते.

ऑनलाईन किंवा डिजिटल मार्केटिंग

आपली जगण्यासाठीची एक सर्वाधिक महत्वाची गरज म्हणजे हवा. ही हवा जशी सर्व पृथ्वी व्यापून राहिली आहे त्याचप्रमाणे आज इंटरनेट सर्वव्यापी बनले आहे. इंटरनेट युजर्सची संख्या ज्या वेगाने वाढते आहे ते पाहिले तर काही काळात बहुसंख्य जनता त्यांच्या खरेदीच्या गरजा पूर्ण होण्यसाठी इंटरनेटचाच वापर करेल असे म्हटले तरी ते गैर नाही.यामुळेच डिजिटल मार्केटिंग हे काळाची गरज बनले आहे 

कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल माध्यमांचा प्रभावी वापर करून लोकांपर्यंत अगदी सहजरीत्या आपले प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस पोहचवू शकतात आणि यालाच सोप्या भाषेत डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

डिलीव्हरी 

तयार मालाची डिलीव्हरी देणे हा होम मेकर्स साठी थोडा अडचणींचा भाग असू शकतो. अनेक होम बेकर्स स्वतःच ऑर्डर असलेल्या ठिकाणी माल पोहोचवितात तर काही बेकर्स ग्राहकांना त्यांची ऑर्डर घेऊन जाण्यास सांगतात. काही जण डिलीव्हरी साठी रेडिओ टॅक्सीचा वापर करतात तर काही जण अन्य काही मार्ग शोधतात. त्यामुळे आपल्याला काय सोयीचे याचा प्रत्येकाने विचार करून त्याप्रमाणे डिलीव्हरी सिस्टीम तयार करणे आवश्यक ठरते.

ऑनलाईन स्टोर्स चालविताना महत्वाचा अन्य एक मुद्दा म्हणजे मालाची डिलीव्हरी. येथे तुम्ही केक पेस्ट्रीज विकणार आहात त्यामुळे डिलीव्हरी देताना विशेष काळजी घ्यावी लागते. योग्य ठिकाणी, सांगितलेल्या वेळेत आणि कोणतेही डॅमेज न होता ग्राहकाच्या हातात त्याची ऑर्डर दिली गेली पाहिजे याला येथे महत्व आहे.

अनेक होम मेकर्स ऑनलाईन ऑर्डर घेऊन स्वतः डिलीव्हरी देतात तर काही जण ग्राहकांना ऑर्डर पिक अप करण्यास सांगतात. दरवेळी ग्राहकाला हे शक्य असेलच असे नाही. तुमच्याकडे बऱ्याच ऑर्डर येत असतील तर अश्यावेळी लॉजिस्टिक कंपनीची मदत घेणे योग्य ठरते. काही होम मेकर्स प्रायव्हेट किंवा रेडिओ टॅक्सी अश्या सेवांचा उपयोग सुद्धा करतात.

तसेच आपण झोमॅटो,स्वीगी डॅन्झो या अँप्स वर सुद्धा आपल्या वस्तू विकू शकतात 

ऑनलाईन बेकिंग क्लासेस 

होम बेकर्स स्वतःची उत्पादने बनविण्याबरोबरच बेकिंग क्लासेस सुद्धा घेऊन त्यातून कमाई करू शकतात. यासाठी युट्यूब(Youtube), व्हिडीओ (Video), आर्टिकल्स(Articles), ब्लॉगिंग (Blogging) यांची मदत घेता येते तसेच घरातही कुकिंग क्लास घेता येतात. ऑनलाईन क्लासेस साठी तुमची कौशल्ये विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर योग्य प्रकारे शेअर करता येणे महत्वाचे आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम सारखे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आजच्या काळात अतिशय परिणामकारक आणि प्रभावी असल्याने त्यांचा वापर लोकप्रियता मिळविण्यासाठी करून घेता येतो आणि त्यातून कमाई करता येते.

ज्यांना बेकिंग शिकायचे आहे त्यांच्यासाठी होम बेकर्स घरच्या घरी वर्ग घेऊ शकतात. जवळच्या भागातून, सोसायटीतून विद्यार्थी मिळू शकतात. प्रत्येक सेशनला १०० ते ५०० रुपये प्रमाणे शुक्ल आकारणी आणि एकावेळी ५ ते १० विद्यार्थी या प्रकारे हे क्लासेस घेता येतात.

व्हिडीओ कोर्स साठी स्कीलशेअर (Skill share), उदेमी (Udemy), टीचेबल (Teachable) या बेकिंग एक्स्पर्टसाठी त्यांचे ज्ञान, पैसे घेऊन शेअर करण्याच्या चांगल्या जागा आहेत. 

ऑनलाईन कोर्स बनविणे कोणासाठी फायद्याचे आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर आम्ही सांगू इच्छितो की कोणीही स्वतःचा ऑनलाईन कोर्स बनवून तो विकू शकतो कारण यासाठी ना कुठल्या मोठ्या भांडवलाची गरज आहे ना की कुठल्या तंत्रज्ञानात प्राविण्य मिळविण्याची गरज आहे. तुम्हाला इतरांपेक्षा काय वेगळे माहिती आहे आणि त्याचे तुम्ही कोर्स स्वरूपात कसे रूपांतर करू शकतात एवढेच इथे महत्वाचे आहे.

ऑनलाईन क्लासेस कसे घ्यावे यावरील माहिती साठी खालील लेख वाचू शकता 

होम बेकर्स मध्ये तुमचे स्थान निर्माण करणे 

तुम्ही जेव्हा तुमचा बेकिंग व्यवसाय सुरु करता तेव्हा तुम्हाला ग्राहक हवेतच. ग्राहकांचे फोन सतत घणघणले पाहिजेत अशी तुमची अपेक्षा गैर नाही. तुम्ही ग्राहकाच्या प्रतीक्षेत असणार यातही काही गैर नाही. ग्राहक आले तरच तुम्ही या व्यवसायातून पैसे मिळवू शकणार आहात हे लक्षात घेतले तर होम बेकर्स मध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे खास स्थान निर्माण करणे कसे गरजेचे आहे हे तुम्हाला समजेल. अर्थात हे अगदी सोपे काम नाही. यासाठी प्रामुख्याने पेशन्स आणि डेडिकेशन हे दोन गुण तुमच्या मध्ये हवेत.

यासाठी तुम्ही थोडा वेळ द्यायला हवा. या वेळात तुम्ही सोशल मिडियावर तुम्ही काय करता, का करता आणि ग्राहकांसाठी तुमच्याकडे काय काय आहे याविषयी सतत काही ना काही सांगत राहिले पाहिजे. यामुळे तुमची ओळख निर्माण होणे आणि तुमचा ब्रांड ग्राहकांना माहिती होणे किंवा त्यांच्या नजरेत भरणे शक्य होऊ शकते. ग्राहकांना तुम्ही युएसपी (USP) म्हणजे (युनिक सेलिंग प्रपोर्शन)चा वापर करून काही आकर्षक सवलती देऊ शकता काही खास ऑफर्स देऊ शकता.

होम बेकर्स मध्ये तुम्ही तुमचे स्थान निर्माण करू शकला नाहीत तर योग्य ग्राहक तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही कोण, तुमचे खास पदार्थ आणि अन्य बेकर्स मधून तुमची निवड ग्राहकांनी का करायची याची माहितीच ग्राहकांना नसेल. तेव्हा या बाबीचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. त्यातूनच तुमचा बेकिंग व्यवसाय यशस्वी होण्यास हातभार लागणार आहे.

शेअर करा