हायड्रोपोनिक फार्मिंगचे २० फायदे आणि तोटे

तुम्ही व्यवसाय म्हणून किंवा छंद म्हणूनही हायड्रोपोनिक किंवा विना मातीच्या शेतीचा विचार करत असाल तर हे आधुनिक शेती तंत्रज्ञान माझ्यासाठी योग्य आहे काय हा पाहिला प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारायला हवा. याचे मुख्य कारण म्हणजे हायड्रोपोनिक शेतीचे सर्वांगीण स्वरूप पाहताना त्यात काही फायदे आहेत तसेच तोटेही आहेत हे लक्षात घ्यायला हवे. हे फायदे काय आणि तोटे काय आहेत हे अगोदरच समजावून घ्यायला हवेत. हायड्रोपोनिक शेतीचे फायदे आणि तोटे या विषयी माहिती या लेखात वाचायला मिळेल.

हायड्रोपोनिक शेतीचे फायदे काय याची माहिती प्रथम घेऊ

१)मातीची गरज नाही

जेथे उपजाऊ जमीन मर्यादित आहे, किंवा अजिबात जमीन नाहीच किंवा जी आहे ती मोठ्या प्रमाणावर प्रदुषित झाल्याने नापीक झाली आहे तेथेही हायड्रोपोनिक पद्धतीने पिके घेता येतात. १९४० सालीच हायड्रोपोनिक पद्धतीचा यशस्वी वापर करून वेक आयलंड येथे तैनात असलेल्या चमूसाठी ताज्या भाज्या आणि फळे पिकविली गेली होती. पॅन अमेरिकन एअरलाइन्स या विमान कंपनीची विमाने येथे इंधन भरण्यासाठी थांबत असत. प्रशांत महासागरात हा भाग जिरायती जमिनीचा भाग होता.

हायड्रोपोनिक शेतीकडे भविष्यातील शेती म्हणूनही पाहिले जात आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा अंतराळवीरांना अंतराळात जेथे जमीन नाही तेथेही ताज्या भाज्या, फळे, धान्य मिळावे यासाठी या शेतीचा वापर करण्याचे प्रयोग करते आहे.

२)उपलब्ध जागेचा / स्थानाचा चांगला वापर

अगदी छोट्या बंदिस्त वा मोकळ्या जागेत हायड्रोपोनिक शेती मध्ये सर्व वनस्पतींच्या सर्व गरजा पुरवून त्यांची देखभाल करणे शक्य आहे. घरातील एखादी जास्तीची खोली सुद्धा या कामी वापरता येते. जमिनीत लावलेल्या झाडांची मुळे अन्न आणि पाण्याच्या शोधात जमिनीत खोलवर विस्तारात असतात. हायड्रोपोनिक पद्धतीच्या शेतीत हे घडत नाही. कारण झाडांना पोषण द्रव्ये, पाणी आणि ऑक्सिजन साठवण टाकीतील पाण्याच्या मार्फत पुरविला जात असतो. त्यामुळे झाडांना त्यांच्या वाढीसाठी योग्य जीवनसत्वे थेट मिळतात. परिणामी मुळे अधिक विस्तारत नाहीत आणि थोडक्या जागेत जास्त वनस्पती लावणे शक्य होते.

३)हवामान नियंत्रण

ग्रीन हाउस किंवा हरितगृहे सारख्या ठिकाणी हायड्रोपोनिक शेती करणारे हवामानावर पूर्ण नियंत्रण ठेऊ शकतात. हवेचे तापमान, आर्द्रता, प्रकाश या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवता येत असल्याने वर्षभर कोणतीही पिके घेणे शक्य होते. अमुक एक पिक ठराविक सिझन मध्येच घेणे बंधनकारक राहत नाही. याचा उपयोग शेतकरी त्यांचा नफा वाढविण्यासाठी करून घेऊ शकतात. बाजारात ज्यावेळी सिझन प्रमाणे येणारी पिक उत्पादने सिझन नसताना विक्रीसाठी उपलब्ध नसतात त्यावेळी हायड्रोपोनिक पद्धतीच्या शेतीत ही उत्पादने घेऊन अधिक भावाने बाजारात विकता येतात. यामुळे शेतकरी जास्त दराने विक्री करू शकतात.

४)पाणी बचत

जमिनीवर शेती करताना वनस्पती जितके पाणी वापरतात त्याच्या १० टक्के पाण्यात हायड्रोपोनिक शेती करता येते. पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीत पिके किंवा वनस्पती ८० टक्के पाणी मग ते भूजल  किंवा जमिनीवर पडणारे पाणी वापरतात असे अमेरिकेतील एफएआरच्या अहवालात नमूद केले गेले आहे. भविष्यात पाणी प्रश्न गंभीर बनण्याची भीती यामुळेच आहे. कारण वाढत्या लोकसंख्येला अन्न धान्य पुरेश्या प्रमाणात उत्पादित करायचे तर किमान ७० टक्के उत्पादन वाढवावे लागणार आहे. याचा अर्थ पाण्याची गरज सुद्धा वाढणार आहे. यामुळे हायड्रोपोनिक पद्धतीची शेती त्यावर पर्याय होऊ शकते.

पारंपारिक पद्धतीच्या शेतीत शेताला दिलेले जास्तीचे पाणी बरेच वेळा वाहून जाते. अनेकदा झाडांना दिलेली खते सुद्धा पाण्याच्या प्रवाहांबरोबर वाहून जातात आणि पिकांना पुरेसे पोषण मिळत नाही. हायड्रोपोनिक पद्धतीत पाण्याचा सतत प्रवाह असतो आणि या पाण्यात असलेली पोषक द्रव्ये वनस्पती शोषून घेतात. जास्तीचे पाणी पुन्हा साठवण टाकीत जमा होते आणि त्याचा पुनर्वापर करता येतो. यामुळे पाणी वाया जाण्याचा धोका राहत नाही. आता तुम्ही उघड्यावर हायड्रोपोनिक शेती करत असाल तर बाष्पीभवन होऊन पाणी कमी होण्याचा धोका असतो किंवा साठवण टाकी आणि पाईप मध्ये कुठे गळती असेल तर पाणी वाया जाण्याचा धोका असतो. पण शक्यतो असे घडत नाही.

५)अधिक उत्पादनासाठी पोषण द्रव्यांचा प्रभावी वापर

हायड्रोपोनिक शेतीमध्ये वनस्पतींना देण्याच्या पोषण द्रव्यांवर तुमचे १०० टक्के नियंत्रण असते. वनस्पती लावण्यापूर्वीच कोणत्या वनस्पतींना कोणती पोषण द्रव्ये किती प्रमाणात लागतात, वाढीच्या ठराविक टप्प्यावर त्याचे प्रमाण काय हवे हे अगोदरच माहिती असल्याने त्या त्या प्रमाणात पाण्यात विरघळवून ही पोषक द्रव्ये वनस्पतींना पुरविली जातात. जास्तीची पोषण द्रव्ये पाण्याबरोबर पुन्हा साठवण टाकीत जमा होत असल्याने ती वाया जात नाहीत. किंवा जमिनीप्रमाणे वाहून जात नाहीत.

६)द्रावणाचा पीएच कंट्रोल

वनस्पतींसाठी उपयुक्त असणारे सर्व प्रकारचे क्षार, जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी असतात. हायड्रोपोनिक शेती मध्ये या मुळे क्षार विरघळलेल्या पाण्याची पीएच लेव्हल नियंत्रित ठेवणे शक्य असते. जमिनीतील शेतीत हे शक्य होत नाही. पीएच लेव्हल नियंत्रित करता येत असल्याने वनस्पतींना पोषण द्रव्ये योग्य प्रमाणात देणे शक्य होते.

७)वनस्पती वेगाने वाढतात

हायड्रोपोनिक पद्धतीत वनस्पती अधिक वेगाने वाढतात काय या प्रश्नांचे उत्तर होय असे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी योग्य तपमान, प्रकाश, आर्द्रता व पोषण द्रव्ये तसेच पाणी या संदर्भात सर्व आदेश तुम्ही देत असता. वनस्पती आदर्श जागी, आदर्श वातावरणात वाढत असतात आणि त्यांना आवश्यक पोषण द्रव्ये योग्य प्रमाणात पुरविली जात असतात. तीही थेट झाडांच्या मुळापर्यंत. त्यामुळे झाडे किंवा वनस्पतींच्या मुळांना जमिनीत खोलवर जाऊन पाणी, पोषण द्रव्ये शोधण्याचे जे कष्ट घ्यावे लागतात ते या शेतीत घ्यावे लागत नाहीत. परिणामी ही वाचलेली उर्जा वनस्पती थेट वाढीसाठी वापरू शकतात. त्यामुळे फुले, फळे, भाज्या अधिक वेगाने वाढतात.

८)तण विरहीत शेती

जमिनीत जेव्हा वनस्पती, झाडे, पिके लावली जातात तेव्हा अनेक प्रकारचे तण पिकांसोबत जमिनीत वाढतात. लागवड करण्यापूर्वी, मशागत करताना आणि पिके तयार होताना हे तण उपटून काढण्याचे मोठे कष्टदायक आणि वेळखाऊ काम शेतकऱ्यांना करावे लागते. हायड्रोपोनिक शेती मध्ये जमिनीचा वापरच नसल्याने तण उगविण्याची समस्या नसते.

९)किडी आणि रोगांचे प्रमाण कमी

जमिनीतील शेतीमध्ये जमिनीतून, वातावरणातून अनेक प्रकारच्या किडी किंवा रोग पिकांवर येण्याचा धोका असतो. पक्षी, टोळ, नाकतोडे यासारखे किडे पिकांचा फडशा पाडतात तर विविध प्रकारच्या बुरशी, मावा अश्या किडी पिकांचे नुकसान करतात. हायड्रोपोनिक शेती मध्ये जमिनीचा वापर नाही शिवाय ही पिके नियंत्रित वातावरणात वाढविली जात असल्याने अन्य किडींचा प्रादुर्भाव होण्याचा धोका फार कमी प्रमाणात असतो. त्यामुळे बाहेरच्या परिस्थितीत बदल झाला तरी उत्पादनात फारसा फरक पडत नाही.

१०)कीटकनाशक, तणनाशकांचा वापर मर्यादित

हायड्रोपोनिक शेती ही माती विरहीत शेती असल्याने तण, किडी वा वनस्पतींवर पडणारे अन्य रोग कमीच असतात. तरीही काही तणविरहीत रसायने आणि कीडनाशके वापरावी लागतात. यामुळे येणारे उत्पादन स्वच्छ आणि अधिक आरोग्यपूर्ण असते. आधुनिक जीवनशैली मध्ये अन्न सुरक्षा मुद्दा महत्वाचा बनला आहे. यामुळे अत्यंत कमी प्रमाणात कीडनाशके आणि तणनाशके याचा वापर या शेतीत होत असल्याने अन्न सुरक्षेबाबत या पिकांचा नंबर बराच वर लागतो.

११)मजूर आणि वेळ बचत

जमिनीवरील शेती करत असताना जमीन लागवडीसाठी प्रथम नांगरणे, मशागत करणे. पेरणी, तण काढणे, पिकांना पाणी देणे, कीटकनाशक फवारण्या, पिके कापणे अश्या अनेक कामांसाठी मजूर किंवा गडी लागतात. पिके तयार होत आली की पक्षांपासून त्यांची राखण करावी लागते. यात वेळ जातो आणि मजुरांची मजुरी देण्याचा खर्च वाढतो. हायड्रोपोनिक शेती मध्ये ही सर्व कामे करण्याची गरज नसते त्यामुळे शेतमजुरांची गरज राहत नाही. शिवाय वेळ वाचतो आणि मजुरीचा खर्चही वाचतो.

१२)ताणतणाव कमी करण्याचा छंद

दीर्घकाळ कामं केल्याने येणारा थकवा, कामाचे टेन्शन यामुळे मनावर शरीरावर येणारा ताण आणि त्यातून निर्माण होणारे तणाव यावर हायड्रोपोनिक शेतीचा छंद म्हणूनही वापर करता येतो. दिवसभर दमून घरी आल्यावर घरातील एका कोपऱ्यात आराम करताना हायड्रोपोनिक बागेत रमणे, आपण वाढवीत असलेल्या वनस्पतींची वाढ निरखणे, त्यांचा ताजेपणा अनुभवणे हा ताणरहित होण्याचा एक खास अनुभव आहे. तुमच्या स्वतःच्या प्रयत्नातून वाढलेल्या ताज्या भाज्या, चविष्ट फळे आणि हर्ब्स यांचा सुगंध तुमचा दिवसभराचा थकवा आणि ताणतणाव सैल करण्यास उपयुक्त ठरतात.

हायड्रोपोनिक फार्मिंगचे फायदे आपण आत्तापर्यंत समजून घेतले. आता त्याचे तोटे समजून घेऊया.

१३)वेळ आणि प्रतिबद्धता गरजेची

आयुष्यात खूप काम करून आणि साऱ्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्या असतील तर त्याचे फायदे किंवा परिणाम नक्कीच उत्साहवर्धक असतात. पण आपल्या सहचरी म्हणजे जमिनीत वाढणारी पिके किंवा झाडे, वनस्पती याना मात्र दिवसेंदिवस, आठवडेच्या आठवडे वाढ होण्यासाठी जमीन, निसर्ग मदत करत असतात. हायड्रोपोनिक शेती मध्ये हा फायदा मिळत नाही. कारण येथे जमीन नसतेच आणि निसर्ग तुमच्या हातात नियंत्रित असतो. यामुळे आपण लावलेल्या वनस्पती त्यांच्या वाढीसाठी फक्त आपल्यावर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांची व्यवस्थित काळजी घेणे, त्या फुलण्यासाठी फळण्यासाठी काय करायला हवे याचे पुरेसे ज्ञान असणे जसे आवश्यक आहे तसेच त्यांच्यासाठी आपला वेळ देणे आवश्यक आहे. ही जाणीव कायम ठेवली पाहिजे. अन्यथा त्या मरून जाण्याचा धोका असतो.

अर्थात तुम्ही सुरवातीचा तुमचा वेळ या कामासाठी दिला की नंतर ही सिस्टीम स्वयंचलित करता येते. अर्थात तरीही तुम्ही ही स्वयंचलित सिस्टीम योग्य प्रकारे काम करते आहे ना यावर लक्ष ठेवणे आवश्यक असतेच.

१४)तांत्रिक ज्ञान आणि अनुभव

हायड्रोपोनिक पद्धतीच्या शेतीत तुम्ही अनेक उपकरणे असलेली सिस्टीम वापरत असता. त्यासाठी काही अनुभव हवाच. ही उपकरणे कशी वापरायची, हायड्रोपोनिक शेती साठी कोणत्या वनस्पतींची निवड करायची आणि जमिनीशिवाय त्या कशा जगवायच्या याचे ज्ञान मिळविणे गरजेचे असते. सिस्टीम मध्ये काही चुका राहून गेल्यास ते फार महागाचे पडू शकते. कारण काही चुकांमुळे सर्व प्रक्रियाच नष्ट होऊ शकते.

१५) काही वादाचे मुद्दे

आजकालच्या जीवनप्रणालीत निसर्गाच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न माणूस करत आहे. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या उत्पादनांना मागणी वाढती आहे. हायड्रोपोनिक शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनांना सेंद्रिय उत्पादने म्हणता येईल का यावर जगभरात वाद आहे. जमिनीत वाढणाऱ्या वनस्पती, पिकांना, जमिनीतील काही अतिसुक्ष्म जीवाणू उपयुक्त ठरत असतात. हायड्रोपोनिक शेती मध्ये हे साध्य होत नाही.

असे असले तरी जगभरात गेली १० वर्षे या प्रकारची शेती केली जात आहे. विशेषतः ऑस्ट्रेलिया, टोक्यो, नेदरलँड्स, युएस मध्ये या पद्धतीने उत्पादित केलेल्या लेट्युस, टोमॅटो, स्ट्रॉबेरीना चांगली मागणी आहे. तसेच या पद्धतीच्या शेतीतून लाखो लोकांना अन्न पुरवठा केला गेला आहे. कोणत्याही कामात सर्व काही अगदी परफेक्ट असावे अशी अपेक्षा चुकीची म्हणता येईल.

जमिनीत वाढणाऱ्या पिकांबाबत सुद्धा धोके आहेत. जमिनीत वाढणाऱ्या वनस्पती, पिकांवर हायड्रोपोनिकच्या तुलनेत अधिक कीडनाशके, तणनाशके वापरली जातात. हायड्रोपोनिक शेतीत जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंचा फायदा पिकांना होत नाही हा दोष दूर करण्यासाठी काही सेंद्रिय पद्धती सुचविल्या गेल्या आहेत. उदाहरण द्यायचे तर नारळाचे कॉयर सूक्ष्म जीवाणूसह वनस्पतीच्या वाढीचे माध्यम म्हणून वापरणे, सूक्ष्म जीवाणू असलेला नारळाचा चोथा वापरणे, मासे, हाडे, सरकी, कडूनिंब यांचा वापर नैसर्गिक पोषण देण्यासाठी करणे असे हे प्रकार आहेत.

हायड्रोपोनिक फार्मिंगला सेंद्रिय म्हणता येईल का यावर मोठे संशोधन सुरु असून त्याचे उत्तर नजीकच्या काळात मिळण्याची अपेक्षा आहे.

१६)पाणी, वीज धोका

हायड्रोपोनिक शेतीमध्ये पाणी आणि वीज याचाच प्रामुख्याने वापर केला जात असतो. वीज आणि पाणी एकमेकांच्या संपर्कात येणे बरेचदा अपघातांना आमंत्रण देणारे ठरते. त्यामुळे हायड्रोपोनिक फार्मिंग मध्ये विजेची उपकरणे आणि पाण्याची सिस्टीम एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक असते. घरात केल्या जाणाऱ्या हायड्रोपोनिक शेतीपेक्षा हरित गृहात मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या हायड्रोपोनिक शेतीत या बाबत अधिक जागरुकता पाळावी लागते.

१७)सिस्टीम बंद पडण्याचा धोका

हायड्रोपोनिक फार्मिंग मध्ये सर्व यंत्रणा कार्यरत ठेवण्यासाठी विजेचा वापर केला जात असतो. अश्यावेळी वीज जाणे धोकादायक ठरू शकते. वीज गेली तर पर्यायी व्यवस्था अगोदरच केलेली हवी. ही व्यवस्था नसेल तर सिस्टीमचे काम ठप्प होईल आणि वनस्पती वाळून जाण्याचा अथवा मरून जाण्याचा धोका निर्माण होऊ शकेल. यासाठी बॅकअप पॉवर यंत्रणा हवीच. मोठ्या प्रमाणावर या पद्धतीची शेती करत असाल तर बॅकअप पॉवर यंत्रणा आवश्यकच आहे.

१८)प्राथमिक खर्च जास्त

हायड्रोपोनिक शेतीमध्ये तुम्हाला तुमची बाग किती मोठी बनवायची आहे त्यावर त्याचा प्राथमिक खर्च ठरत असतो. बागेच्या आकाराच्या प्रमाणात उपकरणे खरेदी करावी लागतात व त्याचाच खर्च काही हजार रुपये असू शकतो. हायड्रोपोनिक शेतीच्या ज्या पद्धती आहेत त्यातील कुठल्याची सिस्टीमची निवड तुम्ही केली तरी कंटेनर हवेतच. त्या शिवाय दिवे, पंप, टायमर, वनस्पती वाढविण्याचे माध्यम, पोषण द्रव्ये हा खर्च आहे. पण एकदा तुमची यंत्रणा पूर्ण झाली की मग खर्च पोषण द्रव्ये आणि वीज बिल यांचाच येतो.

१९)गुंतवणुकीचा परतावा

हायड्रोपोनिक फार्मिंग मध्ये गुंतवणूक करताना त्याचा प्राथमिक खर्च आणि त्यातून दीर्घकालीन मिळणारा परतावा याची कोणतीही खात्री देता येत नाही. या शेतीतून तुम्ही किती नफा किती दिवसात मिळवू शकणार हे स्पष्ट सांगणे सोपे नाही. शिवाय गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देणाऱ्या अनेक योजना आज उपलब्ध आहेत. मग तरीही हायड्रोपोनिक फार्मिंग मध्ये गुंतवणूक करावी का असा प्रश्न कोणालाही पडेल.

कृषी संदर्भातील काही मासिकातून आता इनडोअर हायड्रोपोनिक व्यवसाय नुकतेच सुरु झाल्याने कृषी क्षेत्र व हायड्रोपोनिक विकास यासाठी हे उपयुक्त ठरेल अशी माहिती येऊ लागली आहे. पण व्यावसायिक ग्रोअर्सना आजही काही मोठी आव्हाने पेलावी लागत आहेत याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

२०)रोग आणि किडी प्रादुर्भाव वेगाने होतो

या शेतीत आणखी एक धोका निर्माण होऊ शकतो तो रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव वेगाने होऊ शकतो. याचे कारण म्हणजे आपण बंदिस्त जागेत यंत्रणेत पाण्याचा वापर करून वनस्पती वाढवीत असतो. या पाण्याच्या पोषण द्रव्य साठवणीत समजा एखादी कीड किंवा रोग गेला तर तो वनस्पतींच्या मुळापर्यंत जलद पोचू शकतो. घरातल्या घरात छोट्या प्रमाणावर हा धोका नगण्य म्हणता येईल. कारण पाणी बदलून, कंटेनर व बाकी सिस्टीमचे स्टरलायझेशन करून हा धोका घालविता येतो.

पण जेव्हा ग्रीन हाउस म्हणजे हरित गृहात केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणावरच्या शेतीत हा धोका निर्माण होतो तेव्हा असा धोका निर्माण होऊ शकेल हे लक्षात घेऊन रोग व्यवस्थापन व्यवस्था अगोदरच हाताशी हवी. उदाहरणार्थ जेथून वनस्पतींना पाणी दिले जात आहे, ते त्वरीत स्वच्छ करणे, ग्रोईंग मटेरियलची वेळोवेळी तपासणी करणे अशी उपाययोजना करता येते. तरीही रोगाचा अथवा किडीचा प्रादुर्भाव झालाच तर सर्व यंत्रणा त्वरित स्टरलाइज करावी लागते.

आपण हायड्रोपोनिक फार्मिंगचे फायदे आणि तोटे यांची माहिती घेतली. हे जाणून घेतल्यावर एखाद्याने हायड्रोपोनिक फार्मिंगची निवड करावी असे सुचविणे योग्य आहे का याचा विचार करायला हवा. कोणताही उद्योग, व्यवसाय अथवा नोकरी काही फायदे तोटे याच्यासह स्वीकारावी लागत असते. हायड्रोपोनिक फार्मिंग मध्ये तोटे आहेत पण त्या प्रमाणात फायदे अधिक आहेत.

शिवाय येत्या काही वर्षात हा बाजार नाट्यमय वेगाने वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. २०१८ मध्ये या व्यवसायाची उलाढाल २३.९४ अब्ज डॉलर्स इतकी होती आणि २०१९ -२४ या काळात ती किमान ७ टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत.

सर्व माहिती घेतल्यावर जरी तुम्हाला हायड्रोपोनिकचा पर्याय स्वीकारावा असे वाटले नसले तरी किमान हायड्रोपोनिक संबंधी चांगली माहिती तुमच्या संग्रही जमा झाली आहे हे तुम्हाला मान्य करावे लागेल. शिवाय हायड्रोपोनिक फार्मिंग नेहमीच आधुनिक शेतीचा एक भाग राहणार हे सत्य आहे. कमी जागेत, पोषण द्रव्यांचा प्रभावी वापर, पाणी बचत, तणविरहीत, कीड आणि रोगांचा कमी धोका, सातत्याने चांगले उत्पादन, शेतीच्या सर्व यंत्रणेवर माणसाचे नियंत्रण, खते आणि कीडनाशकांचा अगदी अल्प वापर आणि वर्षभर पिके घेण्याची सुविधा अशी या हायड्रोपोनिकची काही वैशिष्ठे आहेत.

———————–

शेअर करा