सेंद्रिय खते म्हणजे काय/ कसा करावा त्यांचा वापर

शेती, बागकाम किंवा उद्यान कलेत जमिनीमधील पिकाऊपणा, तिचा पोत, प्रत यावर जमिनीतून मिळणारे उत्पन्न किती आणि कसे मिळणार हे अवलंबून असते. अशावेळी जमिनीतील पोषकमूल्यांचे प्रमाण योग्य राखून पिकांच्या वाढीसाठी त्याचा वापर करून घेतला जातो. जमीन सुपीक या सदरात मोडणारी नसेल तर त्या जमिनीला खतांचा पुरवठा करून तिची प्रत सुधारता येते हे आपल्याला माहिती असते. वनस्पतींची वाढ सर्व प्रकारची योग्य काळजी घेऊनही योग्य प्रमाणात होत नसेल तर जमिनीतील पोषण द्रव्यांचा तोल बिघडला आहे असे लक्षात येते. अशा वेळी खतांचा वापर उपयुक्त ठरतो आणि त्यामुळे वनस्पतीची वाढ योग्य प्रमाणात होऊ शकते.

 ज्या भागात नैसर्गिक रित्याच जमीन सुपीक आहे, तेथेही पिके वाढत असताना, जमिनीतील पोषण द्रव्ये शोषून घेत असतात आणि ही शोषलेली पोषण द्रव्ये जमिनीला पुन्हा मिळावीत यासाठी सुद्धा खतांचा वापर करावा लागतो. जमिनीत आवश्यक असणारी पोषण द्रव्ये खतांच्या माध्यमातून देता येतात.

फुले येणारी किंवा बहारणाऱ्या वनस्पतींना, झाडांना पोषण द्रव्यांची गरज जास्त प्रमाणात असते. या वनस्पतींना चांगला बहर यावा आणि उन्हाळ्यात सुद्धा तो टिकून राहावा यासाठी सतत पोषण द्रव्यांचा पुरवठा करावा लागतो. उदाहरण द्यायचे तर जमिनीची प्रतवारी चांगली असली तरी जास्वंदी सारखी झाडे उन्हाळाभर फुललेली राहावी यासाठी आठवड्याच्या आठवड्याला असा पोषण द्रव्यांचा पुरवठा जमिनीला करावा लागतो.

खते घातल्याचा आणखी एक फायदा असा होतो की झाडे जोमाने वाढतात आणि निरोगी राहतात. त्यामुळे खत हे झाडांसाठीचे चमत्कार घडविणारे अन्न म्हणता येते. खत दिल्याने झाडांची वाढ जलद होतेच पण काही वेळा मूळ आकाराच्या दुप्पट आकारात झाडे मोठी होतात.

झाडांच्या, वनस्पतींच्या वाढीसाठी तीन मुख्य पोषक द्रव्ये आवश्यक असतात. ती म्हणजे नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणजे पोटॅश. त्यांचे प्रमाण किंवा रेशो त्याच्या आवश्यकतेनुसार म्हणजे एन( नत्र), फॉस्फरस आणि के (पोटॅश) म्हणजे एन- पी- के असा नोंदविला जातो. म्हणजे उदाहरण द्यायचे तर एखाद्या खताचे वर्णन ५ -३- २ असे असेल तर त्याचा अर्थ ५ टक्के नत्र, ३ टक्के फॉस्फरस आणि २ टक्के पोटॅशियम असा असतो.

सेंद्रिय खते म्हणजे काय?

नैसर्गिक रित्या उपलब्ध पदार्थांपासून कोणतीही प्रक्रिया न करता बनलेले, पोषक मूल्ये असणारे खत म्हणजे सेंद्रिय किंवा ऑरगॅनिक खत असे ढोबळमानाने म्हणता येते. अर्थात याचा सेंद्रिय अन्नधान्याशी संबंध नाही. ही खते म्हणजे एखाद्या उत्पादनाचा बाय प्रोडक्ट असू शकतात. उदाहरणार्थ, दुग्धव्यवसाय करताना गाईचे शेण, मूत्र यांचा वापर खत म्हणून होऊ शकतो. यासाठी जनावरांना सेंद्रिय चारा किंवा धान्य देण्याची गरज नाही. तसेच आपल्या परिचयाचे असलेले कंपोस्ट खत म्हणजे सेंद्रिय खत म्हणता येणार नाही.

कंपोस्ट खतामध्ये पालापाचोळा, वाया गेलेले अन्न, अंड्यांची टरफले, भाज्या धुतलेले पाणी, उरलेले अन्न, फळांच्या साली अशा अनेक गोष्टी असू शकतात. शिवाय यात वापरल्या गेलेल्या भाज्या सेंद्रिय पद्धतीने पिकविल्या गेल्या असतील असेही सांगता येत नाही. 

सेंद्रिय खतांच्या विरुध्द म्हणजे केमिकल किंवा रासायनिक खते. याना कृत्रिम खते असेही म्हणतात. ही खते पुनर्वापर करता येणाऱ्या स्रोतांपासून म्हणजे फॉसिल इंधन सारख्या पदार्थांपासून मोठी प्रक्रिया करून तयार होतात.

सेंद्रिय खतांचे प्रकार आणि त्यांचा वापर कसा करावा 

तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल किंवा नुकतीच या प्रकारची शेती, सुरु केली असेल तर ही महिती तुम्हाला उपयुक्त ठरेल. वनस्पती सजीव आहेत. माणसाप्रमाणेच त्यांचीही वाढ होते. त्यांना त्यासाठी अन्न, पाणी, हवा यांची आवश्यकता असते. रासायनिक खतांचा वापर करून कमी वेळात जादा उत्पादन घेता येत असले तर या खतांच्या अति वापराने पर्यावरणाला नुकसान पोहोचते शिवाय जमिनी नापीक होण्याचा धोका निर्माण होतो. सेंद्रिय खतांचा वापर या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी महत्वाचा ठरतो.

यासाठी सेंद्रिय खते कोणती, ती कशी वापरायची, किती प्रमाणात वापरायची आणि त्याच्या वापरामुळे उत्पादनात काय फरक पडतो हे जाणून घ्यावे लागेल. सेंद्रिय खते अनेक प्रकारची आहेत. त्यातील काही महत्वाच्या खतांबाबत आपण माहिती घेऊ.

१)गाईचे शेण– गाईच्या शेणापासून बनलेल्या खतामध्ये नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियमचा रेशो म्हणजे प्रमाण ३-२-१ असा असतो. हे खत आकाराला जास्त दिसले तरी त्यात पोषण द्रव्ये तुलनेने कमी असतात. असे असले तरी हे एक उत्तम सेंद्रिय खत मानले जाते. याचे कारण म्हणजे ते सहज उपलब्ध आहे, स्वस्त पडते. तुम्ही जेथे वनस्पती लागवड करता तेथे स्थानिक पातळीवर सुद्धा ते उपलब्ध होते. हे खत कंपोस्ट खताच्या जोडीला वापरावे असा सल्ला दिला जातो.

कम्पोस्टिंग म्हणजे एक प्रकारे पदार्थ कुजविण्याची प्रक्रिया आहे. पदार्थ कुजताना त्यातून अनेक प्रकारचे वायू बाहेर पडतात. ग्रीन हाऊस किंवा हरित गृहात वायू कमी प्रमाणात तयार व्हावे यासाठी ताज्या खतापेक्षा कंपोस्ट खते वापरली तर पर्यावरणाला कमी धोका निर्माण होतो. दुसरे म्हणजे कम्पोस्टिंग मुळे अमोनिया वायू नष्ट होतो. अमोनिया वायूमुळे वनस्पतींची मुळे जळण्याचा धोका असतो.

गाईचे शेण थेट वापरण्यापेक्षा ते कंपोस्ट करणे अधिक उपयुक्त ठरते. कारण गाईच्या चाऱ्यात तणाच्या बिया असतात आणि त्या गाईच्या पोटात गेल्या तरी पचत नाहीत. त्यामुळे हे शेण तसेच वनस्पतीना दिले गेले तर या बिया रुजतात आणि तण वाढीचा धोका राहतो. या बिया कंपोस्ट मध्ये मात्र रुजू शकत नाहीत. त्यामुळे असे खत दिले गेले तर तण वाढीचा धोका किंवा उपद्रव कमी करता येतो हा मुख्य फायदा.

२)चिकन पोल्ट्री खत– यातील नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियम प्रमाण ४ -२ -१ असे आहे. बाजारात सहज उपलब्ध असणारे हे खत पावडर किंवा सुकविलेल्या गोळ्या स्वरुपात मिळते. अर्थात ते ताज्या स्वरुपात मिळत असेल तर कंपोस्ट मध्ये मिसळून मग द्यावे हे उत्तम. वनस्पतींना पाने फुटण्याच्या काळात नत्र जास्त प्रमाणात लागते ते यात जास्त प्रमाणात आहे पण यात अन्य पोषण द्रव्ये कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे ते अन्य खतांच्या जोडीला पुरवणी म्हणून देता येते. अर्थात या खतातील पोषण द्रव्ये हळू वेगाने मिसळतात. त्यामुळे ती जलद वेगाने मिसळावीत यासाठी तापमान जास्त हवे. आम्ल वनस्पतीसाठी हे खत शक्यतो वापरू नये असा सल्ला दिला जातो.

३)कंपोस्ट खत– हे खत बनविताना तुम्ही कोणत्या पदार्थांचा वापर करता त्यावर त्यातील नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण अवलंबून असते. पण सर्वसाधारणपणे हे  २ -१ -१ असे असते.. यात वनस्पतींना आवश्यक तिन्ही पोषणद्रव्ये आहेत. बागकामासाठी याला अधिक पसंती दिली जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे हे खत घरी बनविता येते. थोड्या कष्टात, थोड्या जागेत ते बनते आणि त्यामुळे घरातील ओला कचरा कमी करता येतो. हे खत सर्व प्रकारच्या वनस्पतीसाठी वापरता येते. जमिनीत मिसळले की जमिनीचा पोत आणि प्रत सुधारते.

जमिनीत लागवड करण्यापूर्वी हे खत मिसळले जाते. त्यावर ओले गवत पसरले की जमीन ताजीतवानी बनते. कंपोस्ट टी म्हणून हे पोषक पाणी वनस्पतींना देता येते, पानांवर फवारता येते. छंद म्हणूनही कुणीही माहिती घेऊन हे खत बनवू शकतो. तुम्हाला रासायनिक खतांचा वापर थांबवून सेंद्रिय खतांकडे वळायचे आहे, पण पैसे कमी खर्च करायचे आहेत तर कंपोस्टिंग हा चांगला पर्याय आहे.

४)ग्रास कटिंग म्हणजे कापलेले गवत– याचा नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियम रेशो १-०-१ असा असतो. एखाद्याचे स्वतःचे घरातले लॉन किंवा हिरवळ असेल तर काही ठराविक कालावधीनंतर ती कापावी लागते. कारण गवत हे सलग न वाढता लहान मोठे वाढते. हे कापलेले गवत खत म्हणून वापरता येते. अगदी स्वतःच्या घरात लॉन नसेल पण आजूबाजूच्या ठिकाणी कुणाच्या घरात ते असेल तरी त्यांच्या कडूनही हे कापलेले आणि त्यामुळे निरुपयोगी बनलेले गवत आणता येते. या खतात नत्र व पोटॅशियमचे प्रमाण कमी आहे त्यामुळे ते खूप पोषक म्हणता येणार नाही. पण वनस्पतींची वाढ होत आहे तोपर्यंत जमिनीची प्रत कायम राखण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दुसरा फायदा म्हणजे समजा आपल्या जमिनीवर दोन इंची गवताचा थर दिला तर तणवाढीला अटकाव होतोच पण जमिनीतील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ग्रास कटिंग खतासाठी फारसा खर्च येत नाही उलट अनेकदा ते मोफतच मिळते.

५)सरकी खाद्य – यात नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण ६-१-१ असे आहे. यालाच कॉटनसिड मील असेही म्हणतात. या सेंद्रिय खतात नत्राचे प्रमाण खूपच चांगले आहे. शिवाय फॉस्फरस आणि पोटॅशियम आहेच. वनस्पतीला पाने फुटण्याच्या काळात हे चांगले खत ठरते. जमिनीवर खत घालून त्यावर ओले गवत घातले तर सरकीतील पोषण द्रव्ये बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. सर्वसाधारणपणे पानझड सुरु झाली की हे खत घालावे म्हणजे नवीन पाने फुटण्याच्या वेळेपर्यंत त्यातून पोषण द्रव्ये बाहेर पडतात आणि ते उपयुक्त ठरते. याचा दोष एकच की ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसते. अर्थात कापूस उत्पादन क्षेत्रात ते सहज मिळू शकते.

६)रक्त खाद्य किंवा ब्लड मील – सेंद्रिय खताचा हा एक चांगला प्रकार असला तरी शाकाहारी लोकांना किंवा वेगन लोकांना तो फारसा पसंत पडण्याची शक्यता कमी वाटते. पण या खतात नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियम चे प्रमाण १२-१-१ असे आहे. यात कत्तलखान्यात मारल्या जाणाऱ्या जनावरांच्या रक्ताचा वापर केलेला असतो. हे रक्त वाळवून त्याची पूड करून ती खत म्हणून किंवा वनस्पतींचे जेवण म्हणून वापरली जाते. अनेकांना हा किळसवाणा प्रकार वाटेल. पण चांगल्या दृष्टीकोनातून पाहायचे तर मृत जनावराच्या शरीराचा कोणताही भाग यामुळे वाया जात नाही.

यात नत्राचे प्रमाण फारच चांगले आहेच पण अन्य पोषण द्रव्येही आहेत. जास्त पाने येणाऱ्या वनस्पतींना पाने येण्याच्या काळात हे खत दिले जाते. अन्य खतांच्या तुलनेत ते वेगाने काम करते. ज्या वनस्पती खुरटू लागल्या आहेत आणि ज्यांना खताची तातडीची निकड आहे त्या वनस्पतींना हे खत दिल्यास पोषण द्रव्यांचा तत्काळ पुरवठा होऊ शकतो. मात्र हे खत आम्ल धर्मीय म्हणजे अॅसिडीक आहे त्यामुळे त्याच्या जादा वापराने वनस्पती जळून जाण्याचा धोका असतो हे लक्षात घेतले पाहिजे.

७)सोयाबीन खाद्य किंवा सोयाबीन मील– नावाप्रमाणे हे सेंद्रिय खत सोयाबीन पासून तयार केले जाते. यात नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण ७-२-० असे आहे. या खतात नत्राचे प्रमाण अधिक आहे शिवाय कॅल्शियम आणि फॉस्फरस पुरेश्या प्रमाणात आहेत पण पोटॅशियम नाही. हे खत जेथे वापरायचे ती जमीन कशा प्रकारची आहे यावर या खतातील पोषण द्रव्ये कशी रिलीज होणार म्हणजे मोकळी होणार ते ठरते. पण सर्वसाधारणपणे जमिनीत आपोआप ही पोषण मूल्ये ठराविक वेळेच्या अंतराने मिसळली जातात.

८)पंख खाद्य किंवा फिदर मील – या सेंद्रिय खतात सुद्धा नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण १२ -० -० असे आहे. प्राणी प्रेमी कदाचित या खताला पसंती देणार नाहीत. पण लक्षात घेण्याची मुख्य बाब म्हणजे हे पोल्ट्री व्यवसायाचा बाय प्रोडक्ट आहे. पक्षांची पिसे उच्च तपमानाला तापविली जातात आणि ती वाळली की दळून त्याची पूड केली जाते. या खतात नत्राचे प्रमाण उत्तम असले तरी फॉस्फरस आणि पोटॅशियम नाही. त्यामुळे त्याचा वापर अन्य खतांच्या मिश्रणासह केला जातो. किंवा लागवडीपूर्वी हे खत जमिनीत मिसळले तर जमिनीची गुणवत्ता सुधारते.

९) अस्थी खाद्य किंवा बोन मील – मृत प्राण्यांच्या हाडाची पूड म्हणजे हे खत असे ढोबळमानाने म्हणता येईल. बीफ इंडस्ट्रीचा विचार केला तर त्यांच्यासाठी वेस्ट म्हणजे वाया जाणारा भाग कमी करण्याचा हा चांगला मार्ग ठरतो. या खतात नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण ४ -२० -० असे आहे. म्हणजे यात फॉस्फरस अधिक प्रमाणात आहे. फॉस्फरस फुले उत्पादनासाठी आवश्यक घटक असतो. शिवाय नत्र आहेच. कंद, फुलझाडे किंवा फळे येण्याअगोदर झाडांना येणारा मोहोर या काळात हे खत चांगले काम करते.

१०) मासळी खाद्य म्हणजे फिश मील – हे एक ऑल राउंडर सेंद्रिय खत म्हणता येईल. यात नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण ५ – २- २ असे आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती वाढीसाठी याचा वापर करता येतो. झुडूप वर्गीय वनस्पती, वृक्षवर्गीय वनस्पतीसाठी हे खत वापरता येते. यात माशाचे सर्व भाग वापरले जातात. हाडे, कातडी, खवले हे अन्यथा वाया जाणारे भाग यात वापरले जातात. विशेष म्हणजे हे खत फार पूर्वीपासून वापरले जात आहे. शतकानुशतके हे खत वापरले जात असल्याचे संदर्भ मिळतात. 

असे सांगतात की स्थानिक अमेरिकन फार पूर्वीपासूनच जमिनीत बी पेरणीपूर्वीच एक भोक पाडून त्यात मेलेला मासा ठेवत असत. मासा कुजला कि त्यातील पोषण द्रव्ये मोकळी होऊन बाहेर पडत व त्याचा फायदा वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी होत असे.

११)शेल म्हणजे शंख शिंपले मील – समुद्री अन्नाचा हा बायप्रोडक्ट. यात नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण ५ – २ – २ असे आहे. यात नत्र आणि पोटॅशियम बरोबर फॉस्फरसचे प्रमाण चांगले आहेच पण कॅल्शियम सारखी अन्य जीवनसत्वे सुद्धा यातून वनस्पतीला पुरविली जातात. त्यामुळे या सेंद्रिय खताला सुद्धा ऑलराउंडर खत म्हणता येते. बहुतेक सर्व प्रकारच्या वनस्पती साठी ते उपयुक्त आहे. या खताच्या वापरामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. शेलफिश मध्ये चीटीन नावाचे एक द्रव्य आढळते त्यामुळे किडीला नैसर्गिकरीत्याचा प्रतिबंध केला जातो.

१२)माक्यातील ग्लुटेन खाद्य (कॉर्न ग्लुटेन मिल)– या खत खाद्याचा विचार करताना एक गोष्ट प्रथम लक्षात घ्यायला हवी की या वनस्पती खाद्यात नत्र, फॉस्फरस आणि पोटेशियम चे प्रमाण ०.५ – ०.५ व १ असे अत्यंत कमी प्रमाणात आहे. पण तरीही जमिनीला दीर्घकाळ स्थैर्य देण्यासाठी त्याचा नियमित वापर करावा लागतो. पानगळीच्या दिवसात ते जमिनीला दिले गेले तर हिवाळयापर्यंत जमिनीचा कस वाढविण्यास पुरेसा वेळ मिळतो आणि वसंत म्हणजे बहराचा ऋतू येत असताना जमीन पूर्णपणे तयार झालेली असते.

असेही सांगितले जाते की हे खत सेंद्रिय तण प्रतिबंधक म्हणूनही उपयुक्त आहे. या खाद्यामुळे गवताच्या म्हणजे तणांच्या बिया रुजण्यास प्रतिबंध होतो. परिणामी लॉन्स किंवा वाफ्यांमध्ये तण निर्माण होत नाही. यामुळे जमिनीप्रमाणे हे खत लॉनवर पसरविण्यासाठी सुद्धा वापरता येते.

१३)सी वीड म्हणजे समुद्री शेवाळ– या प्रकारच्या सेंद्रिय खतात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते तर नत्र व फॉस्फरस फारच थोड्या प्रमाणात असते. हे प्रमाण सर्वसाधारण पणे १ – १ – ५ असे असते. असे असले तरी यात मॅग्नेशियम, आयर्न म्हणजे लोह, तांबे, बोरॉन, झिंक यांचीही उपस्थिती असल्याने हे उत्तम प्रकाराचे खत मानले जाते. जे समुद्र किनारी राहणारे आहेत त्यांना हे खत सहज उपलब्ध होऊ शकते. तसेच हे खत प्रोसेस करून वाळविलेल्या सुक्या स्वरुपात सुद्धा उपलब्ध होते.

हे प्रोसेस केलेले खत द्रव स्वरुपात किंवा दळलेल्या पीठ स्वरुपात सुद्धा मिळते. त्यामुळे ते थेट जमिनीला देता येते. पण तुम्हाला हे खत फ्रेश स्वरुपात वापरायचे असेल तर ते सरळ जमिनीत पुरायचे. वनस्पती वाढीसाठी लागणारी अन्य पोषण मूल्ये म्हणजे मॅग्नेशियम, आयर्न म्हणजे लोह, तांबे, बोरॉन, झिंक तशीही कमी प्रमाणातच आवश्यक असतात. त्यामुळे हे खत अन्य सेंद्रिय अथवा रासायनिक खतांच्या सोबत सुद्धा देता येते. सर्वसाधारणपणे बागकाम किंवा उद्यान विभागांची याला अधिक पसंती दिली जाते. याचे महत्वाचे कारण म्हणजे अन्य सेंद्रिय खतात नसलेली अनेक पोषण द्रव्ये यात आहेत.

१४)वटवाघूळ विष्ठा म्हणजे बॅट गुआनो– नत्र आणि फॉस्फरसने समृध्द असलेले हे खाद्य आहे. यात नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण १० – १० – २ असे आहे. यात अन्य दोन पोषण द्रव्यांच्या प्रमाणात पोटॅशियम कमी आहे. पण पालेभाज्या, फुलझाडे, फळझाडे यांच्यासाठी याचा वापर लाभदायक ठरतो. अर्थात या खाद्यातील पोषण द्रव्ये वटवाघळे काय खातात त्यानुसार बदलते. वटवाघळे बहुतेक किडे खातात. ज्या वटवाघळांच्या खाण्यात किडे अधिक असतात त्या खाद्यात नत्राचे प्रमाण अधिक असते. पण जी वटवाघळे फळे खातात त्या खाद्यात किंवा खतात फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते.

सर्व सेंद्रिय खतांमध्ये हे अधिक जलद काम करणारे खत आहे. या खताचे अन्य फायदेही आहेत. फळे, भाजीपाला लावलेल्या जमिनीला हे खत दिले गेले तर पिकावर रोग पडत नाहीत. शिवाय फळे, भाज्या अधिक सकस, अधिक स्वादिष्ट असतात. या खतातील पोषण द्रव्ये पाण्यात सहज विरघळणारी असल्याने हे खत थेट जमिनीत घालता येते किंवा त्याचे द्रावण करून पानांवर फवारणी करता येते. या फवारणी मुळे पानांना पोषण द्रव्ये थेट पोहोचतात.

१५) समुद्रपक्षी विष्ठा म्हणजेच सीबर्ड गुआनो – वटवाघूळ विष्ठा खाद्याप्रमाणेच यातही नत्र, फॉस्फरस, पोटॅशियमचे प्रमाण १० – १० – २ असे आहे. याशिवाय या खाद्यात जमिनीला कमी प्रमाणात लागणारी अन्य पोषण द्रव्ये आणि जीवनसत्वे सुद्धा असतात. त्यामुळे एक उत्तम सेंद्रिय खत म्हणून याला जगभर मान्यता आहे.

हे खाद्य कितीही गुणकारी आणि उत्तम असले तरी दुर्दैवाने ते मिळविणे सहज सोपे नाही. त्यासाठी समुद्री पक्षांच्या वस्त्या शोधाव्या लागतात. पेरू देशाच्या किनाऱ्यावरील बेटांवर अशा प्रकारच्या समुद्री पक्षी वसाहती आहेत. या बेटांवर असलेल्या पक्षी वसाहतीतील विष्ठेमध्ये पोषण मूल्ये अधिक प्रमाणात तयार होण्यासाठी हवामानही पोषक आहे. मात्र येथील नियम अतिशय कडक आहेत. ही विष्ठा गोळा करताना कोणत्याही प्रकारे पक्षांना उपद्रव किंवा त्रास होणार नाही याची काटेखोर काळजी घ्यावी लागते. त्यामुळे हे खत किंवा खाद्य एखाद्या खजिन्याप्रमाणे मानले जाते आणि ते महागही आहे.

१६) गांडूळ खत – सेंद्रिय खतांच्या यादीत हे सर्वाधिक लोकप्रिय खत म्हणता येईल. यात नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण १ – ० – ० असे आहे. म्हणजे लौकिक अर्थाने यात पोषण मूल्ये कमी आहेत असे म्हणता येते. पण जमीन भुसभुशीत राखणारे, परिणामी जमिनीला, झाडांच्या मुळांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी उपयोगी असे हे खत आहे. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो शिवाय वनस्पतींना चांगले पोषण मिळते. जमिनीबरोबरच कुंड्यातून वाढविली जाणारी, कंटेनर मध्ये वाढविली जाणारी झाडे, घरात वाढविली जाणारी झाडे तसेच कंपोस्ट खड्यात याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

सेंद्रिय खतांचे फायदे आणि तोटे कोणते?

पिके, वनस्पती, झाडे यांची वाढ आरोग्यदायी व्हावी आणि त्यापासून मिळणारी फळे, फुले वा अन्य उत्पादन चांगल्या प्रतीचे यावे यासाठी खते उपयोगात आणली जातात. पण खताची निवड करताना ते रासायनिक घ्यावे की सेंद्रिय वापरावे असा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. अनेकदा या बाबतीत संभ्रम असतो. कित्येक वेळा बागकाम करणारे किंवा शेतकरी काही ठराविक खताला प्राधान्य देतात. पण खताची निवड करताना अगोदर संपूर्ण माहिती करून घेणे शहाणपणाचे ठरते.

खताची निवड करताना त्याचे फायदे तोटे समजावून घेणे आवश्यक आहे. मग ते खत रासायनिक म्हणजे कृत्रिम खत असो वा सेंद्रिय खत असो. आपण जी झाडे वाढविणार त्यांना या खतातील फरक कळणार नसेल तरी आपण जे खत वापरणार त्यामुळे जमिनीचे नुकसान होत नाही ना हेही लक्षात घेतले पाहिजे. रासायनिक आणि सेंद्रिय या दोन्ही खतातील फरक समजावून घेतला तर खताची निवड करणे सोपे होते. आपण या ठिकाणी सेंद्रिय खतांचे फायदे कोणते आणि तोटे कोणते हे जाणून घेणार आहोत.

सेंद्रिय खताचे फायदे

१) सेंद्रिय खताचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात रासायनिक किंवा कृत्रिम खतांच्या तुलनेत क्षार किंवा मिठाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी असते. खतात क्षार प्रमाण अधिक असेल तर त्यामुळे जमिनीतील आम्ल वाढते आणि अश्यावेळी गांडूळ खताचा वापर करणे अवघड बनते. अधिक क्षार असतील तर गांडुळे तेथे राहू शकत नाहीत आणि ती अन्यत्र जागा शोधतात. म्हणजे जेथे वनस्पतीची लागवड केली आहे तेथील जमीन भुसभुशीत राखणे हे महत्वाचे काम गांडुळे करत असतात ते थांबते.

२)जमिनीचा कस सुधारण्याचे तसेच जमिनीचा पोत बदलण्याचे मोठे काम सेंद्रिय खते करतात. ज्या बागांमध्ये, शेतांमध्ये फक्त सेंद्रिय खतांचा वापर होतो, तेथील वनस्पती अधिक आरोग्यपूर्ण असतातच पण जमीनही अधिक कसदार, सुपीक बनते. जमिनीची पाणी धारण करण्याची शक्ती या खताच्या वापरामुळे वाढते. या उलट रासायनिक खतांचा फायदा जमिनीची गुणवत्ता वाढण्यासाठी होत नाहीच पण उलट जमिनीचा कस त्यामुळे कमी होऊ शकतो.

३) सेंद्रिय खते पर्यावरण स्नेही असतात. ही खते बनविताना फारच कमी प्रमाणात अथवा अजिबातच कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. मुळात ती नैसर्गिक पदार्थांपासून बनतात. ती सहज विघटन होणारी आणि दीर्घकाळ जमिनीला तसेच पिकांना फायदे देणारी असतात. ही खते बहुतेक वेळा नैसर्गिक पदार्थांचे बाय प्रोडक्ट असतात. हे बाय प्रोडक्ट अन्यथा वाया जातात. तुलनेने रासायनिक खते बनविण्यासाठी दीर्घ प्रक्रिया केली जाते आणि ती बहुतेक वेळा रिन्युएबल, न करता येणाऱ्या पदार्थांपासून बनविली जातात.

४) सेंद्रिय खते रासायनिक खतांच्या तुलनेत वजनाला हलकी असतात. त्याच्या वापरामुळे जमीन भुसभुशीत राहण्यास मदत मिळते. त्यामुळे जमिनीला तसेच वनस्पतींच्या मुळांना पुरेशी हवा मिळते.

५) सेंद्रिय खते दिल्यानंतर त्यांचे विघटन होण्याचा वेग कमी असतो. त्यामुळे त्यातून मोकळी होऊन बाहेर पडणारी पोषण मूल्ये वनस्पती संपूर्णपणे शोषून घेऊ शकतात. या उलट रासायनिक खते पिकांना पाणी दिले की वाहून जाऊ शकतात किंवा जोरदार पाऊस पडला तरी वाहून जाऊ शकतात. यामुळे वनस्पतींना जी पोषण मूल्ये देण्यासाठी आपण खताचा वापर केला ती पोषण मूल्ये पाण्याबरोबर वाहून जातात आणि दुसरीकडेच कुठेतरी साठून राहू शकतात.

६) सेंद्रिय खतांमध्ये रासायनिक खतांच्या तुलनेत पोषण द्रव्ये कमी प्रमाणात असतात पण त्याचा एक महत्वाचा फायदा असाही होतो की त्याच्या वापरामुळे वनस्पती जळून जाण्याचा धोका कमी होतो. रासायनिक खते वापरल्याने अशी पिके जळून जाण्याचा धोका अधिक असतो. सेंद्रिय खत वापरातून वनस्पतींना खताचा ओव्हरडोस होण्याचा धोका टाळता येतो किंवा कमी करता येतो.

७) सेंद्रिय खतांमध्ये रसायने नसतात. त्यामुळे जमिनीत रसायने साठून राहण्याचा धोका निर्माण होत नाही. रसायनांचे साठे जमिनीत होणे हानिकारक किंवा कधी कधी फारच धोकादायक ठरते. विशेषतः नाजूक किंवा अतिसंवेदनशील वनस्पतींसाठी ते नुकसानदायक ठरते.

८) सेंद्रिय खतांचा सर्वात मोठा फायदा हा की ती घरच्या घरी बनविता येतात. अर्थात ज्यांना ही सुविधा नाही त्यांना अशी खते दुकानातून तयार घ्यावी लागतात आणि अनेकदा ती रासायनिक खतांपेक्षा महाग असतात. त्यामुळे अनेक बागकामप्रेमी, शेतकरी अथवा अन्य, रासायनिक खत खरेदीला प्राधान्य देतात. पण यावर तुम्ही सेंद्रिय खते घरी बनवून मार्ग काढू शकता. तोही अगदी मोफत. स्वयंपाकघरातून वाया जाणारा ओला कचरा म्हणजे भाज्यांची देठे, उरलेले अन्न, फळांच्या साली यांच्यापासून कंपोस्ट खत बनू शकते. ज्यांच्या घरी बाग आहे त्यांना बागेतील ओले गवत, झाडांचा पालापाचोळा, गुरे असतील तर त्यांचे मलमुत्र वापरून सेंद्रिय खत बनविता येते.

९) सेंद्रिय खताचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे त्यामुळे पर्यावरणाला कोणतेही नुकसान होत नाही. बागेत, शेतात अनेक प्रकारचे, पिकांना फायदेशीर ठरणारे जीवजंतू, जीवाणू असतात. सेंद्रिय खतांमुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत नाही. याउलट रासायनिक खते पाण्यामुळे अथवा पावसामुळे जमिनीसह वाहून जातात तेव्हा ती नदी, नाले, ओढे, समुद्रात पोहोचतात आणि त्यामुळे वन्यजीवांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच शेतातील किंवा बागेतील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंना सुद्धा ही खते मारक ठरतात.

सेंद्रिय खतांचे तोटे

सेंद्रिय खते वापरण्याचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे आहेत. मात्र फायद्याच्या तुलनेत हे तोटे अगदीच किरकोळ म्हणावे लागतील. हे तोटे कोणते याची माहिती घेऊ.

सेंद्रिय खते वापरताना विशेषतः आपणच बनविलेली सेंद्रिय खते वापरताना त्यातील पोषण मूल्यांचे नक्की प्रमाण सांगता येत नाही. त्यामुळे अंदाजावर काम चालवावे लागते. सेंद्रिय खत बनविताना तुम्ही नक्की कोणते पदार्थ वापरले त्यावर त्यातील पोषण मूल्यांचा रेशो ठरतो. त्यामुळे या खतात इतक्या प्रमाणात नत्र, फॉस्फरस किंवा पोटॅशियम आहे असे ठामपणे सांगता येत नाही. रासायनिक खते बनविताना मात्र त्यात या पोषणमूल्यांचे प्रमाण अगोदरच निश्चित करून ती बनविली जातात.

असे असले तरी सेंद्रिय खतात रासायनिक खतांच्या तुलनेत मुळातच पोषण मूल्यांचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्यामुळे वनस्पतींना नुकसान पोहोचत नाही. मग त्यातील पोषण मूल्यांचा रेशो काहीही असला तरी फारसा फरक पडत नाही.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सेंद्रिय खते विकत घ्यावी लागत असतील तर रासायनिक खतांच्या तुलनेत त्यासाठी अधिक खर्च येतो कारण ती महाग असतात. त्यामुळे अधिक पैसे खर्च करणे शक्य नसेल तर ती आपणच बनवावी लागतात किंवा स्थानिक पातळीवर गवत, शेण मिळविणे आवश्यक बनते.

तिसरा मुद्दा म्हणजे सेंद्रिय खतातून पोषण मूल्ये बाहेर पडण्यासाठी लागणारा वेळ अधिक आहे. त्यामुळे या पोषण मूल्यांचा पुरवठा हळूहळू होतो. आपल्या वनस्पती सुकलेल्या किंवा जगण्यासाठी झगडत असतील तर त्यांना या खताचा तत्काळ फायदा होऊ शकत नाही. ही खते त्यांना तत्काळ शक्ती देऊ शकत नाहीत. मात्र रासायनिक खते अशी तत्काळ ताकद देऊ शकतात.

सेंद्रिय खतांतील पोषण मूल्यांचे किंवा खत बनविण्यासाठी वापरलेल्या पदार्थांचे विघटन होण्यासाठी जमिनीतील अतिसूक्ष्म जीवाणू उपयुक्त असतात. मात्र या जिवाणूंना काम करण्यासाठी ऊब तसेच आर्द्रता पुरेशी असेल तर ते अधिक क्षमतेने काम करतात. यामुळे हवेत गर्मी असेल त्यावेळी या खतांचा वापर अधिक फायदेशीर ठरतो.

——————-

शेअर करा