घरातल्या घरात, मातीशिवाय आणि हवामानासह संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात ठेवता येणारी हायड्रोपोनिक फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय आणि ती कशी काम करते याची माहिती करून घेतल्यानंतर काही जणांनी हायड्रोपोनिक फार्मिंगची सुरवात केली असेल. काही जणांची कदाचित पहिली ग्रो सिस्टम यशस्वी ही झाली असेल आणि आता त्यांना या सिस्टीमचा विस्तार वाढवायचा आहे त्यांनी हा लेख अवश्य वाचायला हवा. अर्थात हायड्रोपोनिक सिस्टीम उभी करताना संबंधितानी दीर्घ संशोधन, वाचन, रोपवाटिका, स्थानिक बाजार, बागकामासाठी आवश्यक साहित्याची विक्री करणारी दुकाने यांची माहिती मिळवूनच ही सिस्टीम उभारलेली असणार.
हायड्रोपोनिक सिस्टीममध्ये तुम्ही लावलेल्या पहिल्या वनस्पतीची वाढ योग्य तऱ्हेने झाली की हे सारे कष्ट सार्थकी लागले असे नक्कीच म्हणता येईल. हे पाहिले रोप तुम्ही कदाचित रोपवाटिका किंवा तयार रोपे विकणाऱ्या दुकानदारांकडून खरेदी केलेले असेल आणि हायड्रोपोनिकची सुरवात करताना तयार रोप आणणे किंवा अंकुरलेली छोटी रोपे आणणे हा चांगला पर्याय आहे. पण दीर्घकाळ तुम्ही हायड्रोपोनिक फार्मिंग करण्याचा विचार करत असाल तर मात्र तुम्ही स्वतः बियांपासून रोपे तयार करणे अधिक व्यवहार्य आहे.
बियाणी अधिक चांगली का?
हायड्रोपोनिक सिस्टीम ग्रोअरच्या स्वतःच्या पूर्ण नियंत्रणाखाली होणारी शेती पद्धत आहे. आणि शेती म्हटले की बिया किंवा बियाणी हा त्याचा महत्वाचा घटक. कारण त्यावरच तुम्ही वाढविणार असलेल्या वनस्पती आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न ठरणार आहे. त्यामुळे ही महत्वाची आणि अगदी प्राथमिक बाब दुसऱ्याच्या हातात ठेवायची की स्वतः त्याची काळजी घ्यायची याचा विचार करायला हवा. कारण या मुळे तुम्हाला बियाणी निवडीत स्वातंत्र आणि निवडीला वाव मिळू शकतो.
समजा तुम्ही संबंधित विक्रेत्याकडून बी पासून नुकतीच तयार झालेली रोपे घेण्याचा विचार करत असाल तर एक गोष्ट नक्की आहे की, त्याच्याकडे जी रोपे उपलब्ध आहेत त्यातूनच तुम्हाला निवड करावी लागणार. तेथे तुम्हाला ज्या व्हरायटी हव्या आहेत त्या मिळतीलच अशी खात्री देता येत नाही. पण बिया किंवा बियाणी मात्र पुष्कळ प्रमाणात उपलब्ध असतात, सहज मिळतात. काही वनस्पती तर फक्त बी स्वरूपातच मिळतात.
यामुळे घरीच बियांपासून रोपे तयार करण्याचा निर्णय घेणार असाल तर ही रोपे कशी तयार करायची याची माहिती करून घ्यायला हवी. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही पूर्ण योजना तयार केली तर जमिनीशिवाय म्हणजे मातीशिवाय अन्य माध्यमात सुद्धा तुम्ही बिया रुजवू शकता. हायड्रोपोनिक फार्मिंग विषयी जाणून घेताना तुम्हाला हायड्रोपोनिक आणि माती एकत्र जाऊ शकत नाहीत हे समजले आहे. कारण माती किंवा जमिनीत अनेकदा दुषित घटक असू शकतात. त्याच जमिनीत किंवा मातीत बिया रुजवून रोपे तयार केली जात असतील तर हायड्रोपोनिक मध्ये लावण्यापूर्वी ती स्वच्छ करणे आवश्यक ठरते. ही स्वच्छता करताना पुरेशी काळजी घेतली गेली नाही तर रोपांच्या नाजूक मुळांना इजा होऊ शकते. बिया रुजवून रोपे तयार केली तर ह प्रश्न येत नाही आणि गुंतागुंत वाढत नाही.
स्वस्त पडते
तयार रोपे खरेदी करण्यापेक्षा बियाणे नेहमीच स्वस्त पडते. अर्थात बियांपासून रोपे तयार करण्यासाठी वेळ हवा आणि प्रयत्न हवेत. बिया रुजवून रोपे करण्यासाठी जो वेळ आणि प्रयत्न करावे लागतात याची किंमत तुम्ही तयार रोपे खरेदी करता तेव्हा दुकानदार वसूल करणार. त्यामुळे हा मधला खर्च वाचविण्याची संधी तुम्ही स्वतः बियांपासून रोपे तयार करणार असाल तर साधता येते.
फसवणुकीची भावना राहत नाही
हायड्रोपोनिक सिस्टीम साठी स्वतःच बिया रुजवून त्यापासून रोपे तयार करणे ही पहिली पायरी म्हणता येईल. तुम्ही तयार रोपे खरेदी करता तेव्हा हायड्रोपोनिक फार्मिंगच्या उद्देशांना टाळून आपण काहीतरी चीटींग केल्याची भावना होऊ शकते. या उलट बिया आणणे, त्या रुजविणे, त्याला अंकुर, मोड येऊन त्याचे छोट्या रोपात रूपांतर होताना पाहणे यातील समाधान नक्कीच जास्त आहे. एकदम रोप आणून लावण्यात हा आनंद घेता येत नाही.
बियांपासून सुरवात करताना याची गरज
हायड्रोपोनिक सिस्टीम मध्ये वनस्पती वाढीच्या ज्या गरजा आहेत त्या सर्व छोट्या प्रमाणात बियांच्या सुद्धा आहेत. बियांना सुद्धा पाणी, पोषक द्रव्ये, प्रकाश, उष्णता देण्याची व्यवस्था करावी लागते.
माध्यम- मोठ्या वनस्पतींना तसेच बियांना वाढण्यासाठी माध्यम हवे कारण त्यामुळे तेथे बियांची मुळे घट्ट राहतील आणि बियांची रोपे तयार होण्यास मदत मिळेल. त्यासाठी सर्वात लोकप्रिय पर्याय आहे क्यूब किंवा एकप्रकारचे ठोकळे खरेदी. त्यांना स्टार्टर प्लग असेही म्हटले जाते. रॉक वुल किंवा नारळाच्या काथ्याचे माध्यम म्हणून यात वापर करता येतो. हे छोटे क्यूब किंवा ठोकळे स्पाँजी किंवा स्पंज प्रमाणे असतात आणि त्यामुळे पाणी किंवा हवा धारण करू शकतात. प्रत्येक ठोकळ्यात एक छिद्र असते त्यात एकच बी पेरता येते. अर्थात बिया अगदी लहान आकाराच्या असतील तर जास्त बिया सुद्धा पेरता येतात. तुम्ही कोणती वनस्पती वाढविणार आणि तिचा आकार केवढा असेल या वर हे प्रमाण ठरते.
क्यूब वापरण्याचा दुसरा फायदा म्हणजे बी रुजले की हे रोप काढून दुसरीकडे लावण्याची गरज नसते तर पूर्ण क्युबच आपण रॉक वुल किंवा नारळ काथ्याच्या मोठ्या कंटेनर मध्ये ठेऊ शकतो.
स्टार्टर प्लग किंवा क्यूबला दुसरा पर्याय म्हणजे रॅपिड रूटर. हा ओलसर ठोकळा एक प्रकारचा सेंद्रीय पदार्थ असतो. झाडाची कुजलेली खोडे, कुजलेल्या वनस्पती किंवा तत्सम बाबी यात समाविष्ट असतात. यात वनस्पतीच्या वाढीसाठी फायदेशीर ठरणारे सुक्ष्म जीवाणू असू शकतात. ते बियांना मुळे आली की त्याची वाढ व पोषण होण्यासाठी आवश्यक पोषण द्रव्यांचे शोषण करून घेण्यास मदत करतात.
तिसरा पर्याय म्हणजे स्टार्टर प्लगचा वापर पूर्ण रद्द करून परलाईट किंवा व्हर्मिकल्चर प्रमाणे माती रहित माध्यमाचा वापर. एखाद्या ट्रे मध्ये हे माध्यम भरून त्यात बिया पेरता येतात. जमिनीत जश्या बिया पेरतो याच पद्धतीने या बिया पेरता येतात.
नेट कप – रॉकवुल क्यूब, रॅपिड रूटर प्लग प्रमाणेच तुम्हाला नेट कपचीही गरज लागणार आहे. नेटकप ठेवण्यासाठी खास प्रकारचे ट्रे मिळतात. त्यात क्यूब, प्लग साठी विविध कप्पे असतात. या कप्प्यात तुम्ही बिया पेरलेले क्यूब ठेऊ शकता. नेट कप खरेदी करताना दोन इंच आकाराचे घेणे सोयीचे ठरते. त्यामुळे एका छोट्या ट्रे मध्ये जास्त संखेने नेट कप मावू शकतात.
कंटेनर ट्रे – समजा तुम्ही डझनावारी बिया पेरणार असाल तर नेट कप ठेवता येतील असे ट्रे किंवा बॉक्स हवेत. कंटेनर ट्रे खरेदी करताना ते ४ ते ६ इंच खोल असतील तर अधिक चांगले.
बिया रुजविण्यासाठी आणखीही काही पर्याय आहेत. त्यात हायड्रोपोनिक सिस्टीमचे लघुरूप म्हणता येईल अशी हायड्रोक्लोनर सिस्टीम बियांसाठी तयार करणे हा एक पर्याय आहे. त्यात एअर पंप पासून सर्व यंत्रणा तयार केली जाते. पण प्रथमच सुरवात करणाऱ्यांना पाहिले प्रयत्न करण्यासाठी ट्रे अधिक योग्य म्हणता येईल.
हिटिंग मॅट – बिया रुजत असताना कोंब येण्याच्या वेळी सातत्याने ७० ते ९० फॅरनहाईट तापमान असणे गरजेचे असते. आता आपण हे तापमान नेहमी राखू शकू याची खात्री देता येत नाही. त्यातही तुम्ही थंड प्रदेशात असाल तर मग ही बाब अधिकच अवघड बनते. अश्यावेळी हिटिंग मॅटची खरेदी आवश्यक ठरते. या मॅट ग्रोईंग ट्रेच्या खाली ठेवता येतात. त्यामुळे योग्य प्रमाणात उबदार वातावरण तयार होते. उबदार वातावरण असल्याशिवाय बिया रुजून त्यांना कोंब येऊ शकत नाहीत.
वाढीसाठी प्रकाश – हाही एक ऐच्छिक घटक म्हणता येईल. उन्हाळा असेल किंवा तुम्ही उष्ण हवामानात राहत असाल तर तुमच्याकडच्या ग्रोईंग ट्रे ना भरपूर सूर्यप्रकाश मिळू शकेल अशी जागा असू शकते. यामुळे कृत्रिम दिवे लावून उष्णता वाढविण्याची गरज राहत नाही. खिडकीच्या चौकटी खालचा भाग सुद्धा यासाठी आदर्श ठिकाण ठरतो. मात्र तुमच्याकडे पुरेसा सूर्यप्रकाश येत नसेल तर योग्य आकाराचे दिवे हवेत. ग्रोइंग ट्रेच्या सर्व पृष्ठभागावर व्यवस्थित प्रकाश पडेल असे हे दिवे हवेत.
पोषण द्रव्ये – तुम्ही हायड्रोपोनिक फार्मिंगची सुरवात बिया रुजविण्यापासून करणार असला तर पोषण द्रव्यासाठीही अनेक पर्याय आहेत.
आपण नेहमी हायड्रोपोनिक सिस्टीम मध्ये वाढणाऱ्या वनस्पतींना जी पोषण द्रावणे देतो तीच सौम्य म्हणजे त्याची तीव्रता कमी केलेल्या स्वरुपात (डायल्यूट) निम्म्या प्रमाणात देऊ शकतो. बियांना सुरवातीला देण्यसाठी स्टार्टर म्हणून खास पोषक द्रव्येही उपलब्ध आहेत. त्यासाठी अनेक ब्रांड आहेत. त्यात मुळांच्या वाढीस चालना देणारी, बिया रुजण्यास सहाय्य करणारी अशी अनेक पोषकद्रव्ये उपलब्ध आहेत.
झिपलॉग बॅग – बिया रुजविण्यासाठी हाही एक पर्याय आहे. त्याचे फायदे किती होतात हे तपासून पहा.
- ग्रोइंग मटेरियल तयार करणे
रॉकवुल किंवा नारळाचा काथ्या किंवा रॅपिड रूटर क्यूब यापैकी तुम्ही कशाचा वापर करणार हे प्रथम ठरले की पुढची तयारी म्हणजे ते पाण्यात भिजवून तयार करणे. रॉकवुलचा पीएच अधिक असतो त्यामुळे ती व्हिनेगर व पाण्याच्या मिश्रणात धुवून घ्यावी लागते. म्हणजे ती बिया रुजविण्यासाठी योग्य होते.
क्यूब सतत ओलसर राहतील याची खबरदारी घ्यावी लागते. रॉकवुल किंवा काथ्या स्वच्छ पाण्यात १ तास अगोदर भिजवून ठेवायचे तर रॅपिड रूटर क्यूब स्वच्छ पाणी आणि अगदी सौम्य स्वरूपाचे पोषण द्रावण एकत्र केलेल्या मिश्रणात थोड्या मिनिटांसाठी ठेवून ते ओले करून घ्यावे लागतात.
- बी पेरणी
आपण ज्या बिया पेरणार त्या सर्वच्या सर्व रुजतील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे बी पेरणी करताना स्टार्टर क्यूब मध्ये किमान दोन बिया पेराव्या. हे ओलसर क्यूब झिपलॉग बॅग मध्ये ठेवू शकता. त्यासाठी झिप लॉग बॅग सील करून अंधाऱ्या जागी दोन ते पाच दिवस ठेवायची. या काळात बिया रुजतील. बिया रुजल्या की हे क्यूब ग्रोईंग ट्रे मध्ये ठेवता येतात. झिपलॉग बॅग पद्धत नको असेल तर क्यूब थेट ग्रोईंग ट्रे मध्ये ठेवता येतात. त्यासाठी क्यूब मध्ये बी पेरून ते स्वतंत्र नेट कप मध्ये ठेवावे लागतील.
- पाणी, पोषण द्रव्ये
ग्रोईंग ट्रेचा तळ स्वच्छ पाणी आणि कमी तीव्रतेची हायड्रोपोनिक न्युट्रीयंट म्हणजे पोषण द्रव्ये यांच्या मिश्रणाने भरा. स्टार्टर क्यूब अर्धे बुडतील इतकीच या मिश्रणाची पातळी हवी. पातळी खाली जाऊ लागली की ट्रेच्या तळाशी आणखी मिश्रण घालायला हवे हे लक्षात ठेवा.
- पुरेसा प्रकाश
ग्रोईंग ट्रेमध्ये बिया रुजविण्याचा एक फायदा असा की हे ट्रे एकीकडून दुसरीकडे सहज हलविता येतात. किंवा घरात जेथे सूर्यप्रकाश येत असेल तेथेही ठेवता येतात. तशी सोय नसेल तर घरातच हे ट्रे ठेऊन प्रकाश पुरविण्यासाठी व्यवस्था करावी लागते. ती लाईट लावून करता येते. बियांना कोंब येण्याच्या स्थितीत प्रकाशाची तीव्रता वाढवावी लागते. त्यासाठी हे लाईट ट्रेच्या जवळ लावता येतात. मात्र तरीही किमान ६ इंच अंतर राहील अश्या प्रकारे हे लाईट ठेवावे.
रोपांची पुनर्लागवड
बिया रुजून अंकुरलेली रोपे दुसरीकडे लागवड करण्यास योग्य होणे म्हणजे क्यूबच्या बाहेर ग्रोईंग मिडीयम मध्ये मुळे जाण्यास दोन किंवा चार आठवड्याचा कालावधी लागतो. तुम्ही कोणत्या वनस्पतींच्या बिया लावल्या आहेत त्यानुसार हा कालावधी ठरतो. या स्थितीत बियांना पाणी देणे सुरूच ठेवावे लागते.
एकाच क्यूब मध्ये अनेक बिया रुजल्या असतील तर त्यातील सगळ्यात चांगली वाढ झालेले रोप ठेऊन बाकीची काढून टाकावीत. नंतर ग्रोईंग ट्रे मधून हा क्यूब काळजीपूर्वक काढायचा आहे. या वेळेपर्यंत तुमची हायड्रोपोनिक सिस्टीम पूर्ण तयार हवी. संपूर्ण क्यूब या हायड्रोपोनिक सिस्टीम मध्ये रोपासह अलगद काढून ठेवायचा आणि तो जास्तीचे ग्रोईंग मिडीयम टाकून अलगद झाकायचा आहे.
यात सुरवातीला वरून पोषण द्रव्ये असलेले पाणी काही दिवस द्यावे लागते. त्यामुळे कोवळी मुळे ग्रोईंग मिडीयमच्या लेअर मध्ये पोषण द्रव्ये शोषून घेण्यासाठी अधिक खोलवर जाण्यास प्रवृत्त होतात. असे झाले म्हणजे तुमची रोपे मोठ्या आरोग्यपूर्ण वनस्पती मध्ये रुपांतरीत होण्यासाठी, हायड्रोपोनिक सिस्टीम मध्ये वाढण्यासाठी तयार आहेत असे मानता येईल.
निष्कर्ष
या लेखातील माहितीवरून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की स्वतःच बिया रुजविण्याची पद्धत खूप गुंतागुंतीची नाही. संपूर्ण हायड्रोसिस्टीम तयार करण्यास तुम्ही शिकला असला तर बिया रुजविणे हे फारच सोपे काम आहे. अर्थात त्यासाठी थोडी काळजी आणि देखभाल पुरेशी ठरते.
बियांपासून सुरवात करणे नक्कीच स्वस्त पडते शिवाय आपल्या आवडीच्या मनपसंत वनस्पती वाढविल्याचे समाधान मिळते ते वेगळे. त्यासाठी थोडा खर्च आणि प्रयत्न करावे लागतील पण त्यामानाने आनंदाचा मिळणारा रिटर्न कशातच मोजता येणार नाही.