ऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे ? (संपूर्ण माहिती)

सध्या संपूर्ण जगाला ‘कोरोना’ नावाच्या महामारीने सतावून सोडले आहे. जगातील ८०% हून जास्त लोकसंख्या आजच्या घडीला आपआपल्या घरातच राहून स्वतःला या रोगापासून सुरक्षित ठेऊ इच्छित आहे. युट्युब वरच्या नवनवीन रेसिपी पाहून आईचे काम स्वयंपाकघरातून जोमात सुरु आहे, बाबा हॉलमध्ये बसून लॅपटॉपवरूनच ऑफिसच्या कॉन्फरन्सला उपस्थित आहेत, ताई कॉलेजचा अभ्यासक्रम ऑनलाईन पुस्तके वाचून पूर्ण करत आहे आणि छोट्या चिंटूला पण त्याच्या बाई कॉम्पुटर वरूनच बाराखडी शिकवत आहेत असेच चित्र सध्या तुमच्याही घरात किंवा आजूबाजूला सुरु असेल. यावरून तुमच्या काय लक्षात येत आहे ?

जगात आज ऑनलाईनच्या माध्यमातून जी क्रांती घडून आली आहे त्यामुळे घरी बसल्या बसल्या अनेक गोष्टी या सोप्या व सोयीस्कर झाल्या आहेत. म्हणजेच यापुढच्या काळात कोणत्याही ऑनलाईन गोष्टीला मागणी ही राहणारच. मग याच ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला जर पैसे कमवायची संधी उपलब्ध झाली तर ? स्वतःचा व्यवसाय व नोकरी सुरु असताना सुद्धा जर तुम्हाला डिजिटल मार्गाने पैसे कमविण्याचा खात्रीशीर पर्याय उपलब्ध झाला तर ? तर ..सोन्याहून पिवळेच ना… आपले पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा ‘आत्मनिर्भर भारत’ यासाठी संपूर्ण देशाला आवाहन केलेले आहे म्हणजेच जेवढी जास्त लोकसंख्या ही स्वावलंबी होईल तेवढा आपला देश प्रगतशील बनेल. आजच्या या डिजिटल युगात स्वावलंबत्व पत्करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यातीलच एक हमखास उत्पन्न आणि समाधान मिळवून देणारा पर्याय म्हणजे – ऑनलाईन कोर्सेस बनविणे व ते विकणे.

पण तुम्ही म्हणाल ‘डिजिटल हे आपल्या क्षमतेपलीकडील आहे किंवा हे असले किती काळ टिकणार आहे?’ तर मग तुम्ही BYJU हे नाव किंवा यांची जाहिरात पाहिली असेलच. नाही…तर मग गूगल वर एकदा यांच्याबद्दल सर्च करून बघा, तुम्हाला कळेल की ऑनलाईन शिक्षणाचा योग्य वापर केला तर प्रगतीला आणि पैसे कमवायला कोणतीही मर्यादा नाही. विश्वास बसत नसले तर ऑनलाईन लर्निंगला सध्या आणि येणाऱ्या काळात किती मागणी आहे याची खालील आकडेवारी पाहा.

ऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे ? (संपूर्ण माहिती)

(Sample Info graphic – Source – https://mms.businesswire.com/)

केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार ऑनलाईन लर्निंग हा आता नवीन शिक्षण पद्धतीचा अविभाज्य भाग होणार आहे. पारंपरिक शिक्षणाला छेद देत विद्यार्थी आता एकाच वेळेस दोन किंवा त्याहून जास्त अभ्यासक्रम शिकू शकतील म्हणजेच ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून ते एका ठिकाणावरून दोन विविध विद्यापीठातून परीक्षाही देऊ शकतील व डिग्री ही मिळवू शकतील. पण तुम्ही म्हणाल हे तर विद्यार्थ्यांचे झाले पण जे नोकरी किंवा व्यवसायासाठी किंवा आवड म्हणून काही नवीन शिकू इच्छित असतील तर? तर त्यांच्यासाठी हजारो ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत. कोणी हस्ताक्षर सुधारत आहे, कोणी बुद्धिबळ शिकत आहे, कोणी पाककलेत प्राविण्य मिळवीत आहे, कोणी सवांद कौशल्ये व व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण घेत आहे, कोणी नोकरीत बढती मिळावी म्हणून नवीन टेक्निकल बाबी शिकत आहे तर कोणी अगदी आयुष्यात सकारात्मक कसे राहावे हे सुद्धा शिकत आहे आणि हे सगळे शक्य आहे ऑनलाईनच्या जादुई उपलब्धतेमुळे.

हे एवढ सगळ पुराण सांगायच्या मागे उद्देश एकच – आज जर तुमचे प्रभुत्व ऑनलाईन कोर्स रूपात सादर केले तर आयुष्यभर तुमची कमाई ही नक्कीच ‘ऑन ट्रॅक’ राहील.

मग आहात का तयार ह्या नव्या मार्गावर स्वतःला झोकून द्यायला. हो … तर मग आम्ही देत असलेल्या माहितीचा योग्य वापर करा आणि तुमचा ऑनलाईन कोर्स बनवून कमाईचा एक स्रोत निर्माण करा.

(एक लक्षात ठेवा ऑनलाईन कोर्स निश्चितच एका रात्रीत तयार होणार नाही ना की त्याच्या विक्रीने तुम्ही एका दिवसात लखपती व्हाल. ही संपूर्ण प्रक्रिया नीट समजून घ्या आणि मगच तुमचा निर्णय घेऊन त्यानुसार कामास सुरुवात करा – ते म्हणतात ना ‘केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे’.)

Table of Content:

ऑनलाईन कोर्सेस कोण बनवू शकतात ?

ऑनलाईन कोर्स कुठे आणि कसे बनवावेत ?

ऑनलाईन कोर्स बनविण्यासाठी किती खर्च येतो आणि नफा किती होऊ शकतो ?

  • ऑनलाईन कोर्सेस कोण बनवू शकतात ? or ऑनलाईन कोर्सेस कोणी बनवावेत?

ऑनलाईन कोर्स बनविणे कोणासाठी फायद्याचे आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर आम्ही सांगू इच्छितो की कोणीही स्वतःचा ऑनलाईन कोर्स बनवून तो विकू शकतो कारण यासाठी ना कुठल्या मोठ्या भांडवलाची गरज आहे ना की कुठल्या तंत्रज्ञानात प्राविण्य मिळविण्याची गरज आहे. तुम्हाला इतरांपेक्षा काय वेगळे माहिती आहे आणि त्याचे तुम्ही कोर्स स्वरूपात कसे रूपांतर करू शकतात एवढेच इथे महत्वाचे आहे.

आम्ही काय म्हणत आहोत हे समजून घेण्यासाठी हा छोटासा प्रेरणादायी प्रसंग वाचा:

“२००८ साली अनेक लोकांनी जागतिक मंदीची झळ सोसली आणि यामध्ये व्यंकटेशला सुद्धा आपली नोकरी गमवावी लागली. घरी बसल्या बसल्या काय करावे या विचारात असताना त्याने ‘लिंक्डइन’ या प्लॅटफॉर्मचा वापर आपले संपर्कजाळे वाढीस लागावे म्हणून सुरु केला कारण त्याद्वारे का होईना आपल्याला नवीन नोकरी मिळेल असा त्याचा कयास होता. हे करत असताना दिवसागणिक त्याचे लिंक्डइन वरील प्रभुत्व वाढू लागले आणि त्याच्या या कौशल्यासाठी अनेक लोक त्याला संपर्क करू लागले. सुरुवातीला तो लोकांना वैयक्तिक मार्गदर्शन करू लागला पण हळूहळू त्याला काही कंपन्या खास लिंक्डइन वापरून व्यवसाय कसा वाढवावा हे जाणून घेण्यासाठी सुद्धा संपर्क करू लागल्या. आता त्याला कळले होते की आपल्या या कौशल्याला चांगली मागणी आहे आणि म्हणूनच त्याने स्वतःचा लिंक्डइन वर आधारित एक ऑनलाईन कोर्स बनविला आणि त्याचे उत्तम मार्केटिंग केले. याचा परिणाम म्हणजे तो नोकरीमध्ये मिळणाऱ्या पगारापेक्षाही जास्त पैसे महिन्याला कमवायला लागला आणि आता तो पूर्णवेळ विविध ऑनलाईन कोर्सेस बनवून उत्तम अर्थार्जन करत आहे.”

बघा, ही आहे ऑनलाईन कोर्सची ताकद. तुम्ही कोणत्याही कौशल्याचा ऑनलाईन कोर्स बनवून तो लोकांना विकू शकता. कसे ते पहा:  

  • तुम्ही उत्तम वक्ते आहात का ? तुमच्या वक्तृत्व कौशल्याने श्रोते मंत्रमुग्ध होतात का ? हो..तर मग उत्तम वक्ता कसे व्हावे याचे पाठ तुम्ही लोकांना ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून सुद्धा देऊ शकता.
  • तुम्ही एक यशस्वी लेखक आहात का ? पुस्तक कसे लिहावे यापासून ते प्रदर्शित कसे करावे यासाठी लागणारे इत्यंभूत ज्ञान तुम्हाला आहे का ? हो.. तर मग तरुणाईला तुमचे हे ज्ञान मोलाचे ठरू शकेल. तुमचा उत्तम ऑनलाईन कोर्स लोकांना लेखक बनवून त्यांना कमाईचा चांगला मार्ग दाखवू शकतो.
  • तुमच्या क्षेत्रातील दांडग्या अनुभवाधारे तुम्ही एक उत्तम सल्लागार किंवा प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे का ? हो.. तर मग एक सल्लागार किंवा प्रशिक्षक कोण आणि कसे बनू शकतो याचे सुद्धा ऑनलाईन कोर्स चांगल्या मागणीत आहेत.
  • जर तुमचा युट्युब वर चॅनेल असेल आणि त्याद्वारे तुम्ही उत्तम कमाई सुद्धा करत असाल तर आज भारतात असा मोठा वर्ग आहे ज्याला तुमच्या या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे आणि ते निश्चितच तुमच्यासारख्या यशस्वी युट्युबर कडून शिकण्यास उत्सुक आहेत.
  • तुम्ही यशस्वी ब्लॉगर आहात का ? तुमच्या ब्लॉगद्वारे Google Ads तसेच Affiliate Marketing याद्वारे तुम्ही चांगले पैसे कमविले आहेत का ? हो.. तर मग आपला ब्लॉग सुरु करून पैसे कसे कमवावेत याचा तुम्ही उत्तम कोर्स तयार करू शकता कारण ब्लॉगिंग या क्षेत्रात नाव कमविण्यासाठी आवश्यक कोशल्ये शिकण्यासाठी अनेक लोक तुमची वाट बघत आहेत.
  • तुमच्या पोडकास्ट चॅनेल द्वारे तुम्ही प्रायोजक मिळवून चांगले अर्थार्जन केले आहे का ? हो.. तर मग ज्यांना आपला पोडकास्ट चॅनेल सुरु करून त्यात यशस्वी व्हायचे आहे ते तुमच्याकडून मूलभूत’आणि प्रगत कौशल्ये शिकण्यास उत्सुक आहेत.
  • तुमच्या पाककलेतून तुम्ही नातेवाइकांना नेहमीच अगम्य चवीचा आनंद देत आहात का ? मग तुमची ही कला ऑनलाईन कोर्स रूपात सादर करून घरबसल्या तुम्हीही अतिरिक्त कमाई करू शकाल. युट्युब वर तर अश्या पाककलेंचे लाखो चॅनेल आहेत आणि त्याला बघणारे सुद्धा करोडो व्हुअर्स आहेत आणि अश्या प्रकारच्या ऑनलाईन कोर्सलाही फक्त गृहिणीच नव्हे तर तरुण आणि पुरुष वर्गाकडूनसुद्धा उत्तम मागणी आहे.

या व्यतिरिक्त फिटनेस, योगा, चित्रकला, हस्तकला, शिवणकाम, अभिनय, व्यवसाय, नोकरी, नातेसंबंध इत्यादींशी संबंधित सुद्धा ऑनलाईन कोर्सेस बनविले गेले आहेत आणि तुम्ही सुद्धा बनवू शकता. अगदी गाडी कशी चालवावी ह्याचे सुद्धा ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहेत ते ही उत्तम मागणीसहीत.

आता तुमच्यातील आत्मविश्वास हा नक्कीच द्विगुणित झाला असेल की आपलेही कौशल्य आपण ऑनलाईन कोर्स रूपात सादर करू शकतो. पण कसे आणि कुठे?.. काळजी करू नका. यापुढील भागात याचीही माहिती देत आहोत. चला तर मग पाहू अगदी सोप्या मार्गाने आणि कोणत्याही टेक्निकल ज्ञानाचा वापर न करताही ऑनलाईन कोर्स कसे बनवावेत.

  • ऑनलाईन कोर्स कुठे आणि कसे बनवावेत ? or ऑनलाईन कोर्स बनविण्याची सर्वात सोपी संसाधने:

बरेच ऑनलाईन कोर्स हे म्हणजे क्रमाक्रमाने सादर केलेल्या व्हिडिओचा संच असतो. यामध्ये तुम्ही तुमच्या यूजरला रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून एखादा विषय किंवा कला किंवा कौशल्य हे टप्याटप्यात शिकवीत असतात. यात तुम्ही स्वतः व्हिडिओ मध्ये दिसत असतात किंवा जी काही कृती तुम्ही करत आहात ती दर्शवित असतात. उदाहरणासह सांगायचे झाले तर जेव्हा तुम्ही योगाबद्दल शिकवीत असाल तेव्हा तुम्ही स्वतः ते योगप्रकार करून दाखविले पाहिजे आणि जेव्हा तुम्ही एखादे संगणकाशी निगडित तांत्रिक कौशल्य शिकवीत असाल तेव्हा प्रत्यक्षात संगणकावर ते कसे घडते हे दाखविले पाहिजे.

पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे तर फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंगशी निगडित झाले, पण प्रत्यक्षात कोर्स कसा बनवावा आणि कुठे? तर आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन कोर्स बनविणे हे कोणालाही जमू शकेल म्हणजे अगदी तरुणांपासून ते वयोवृद्ध सुद्धा सहजरीत्या आपला ऑनलाईन कोर्स बनवू शकतात. ऑनलाईन कोर्स बनविणे ही सुद्धा एक प्रक्रिया आहे आणि त्याचेही काही महत्वाचे टप्पे आहेत. खालील टप्पे व त्यातील बारकावे तुम्ही नीट समजून घेतले तर या मार्गावरचा तुमचा प्रवास हा नक्कीच सुखकर असेल. खात्रीशीर यशासाठी हे सात टप्पे म्हणजे तुमचा राजमार्गच असेल:

  • टप्पा पहिला – तुमचा ऑनलाईन कोर्स बनविण्यासाठी विषय निवडा
  • टप्पा दुसरा – तुमच्या ऑनलाईन कोर्सच्या मागणीची पडताळणी करून पहा
  • टप्पा तिसरा – तुमच्या ऑनलाईन कोर्सचा गाभा (Content) तयार करा
  • टप्पा चौथा – तुमचा ऑनलाईन कोर्स होस्ट करा
  • टप्पा पाचवा – तुमच्या ऑनलाईन कोर्सची किंमत निश्चित करा
  • टप्पा सहावा – तुमच्या ऑनलाईन कोर्सचे विक्री (Sales) पेज तयार करा
  • टप्पा सातवा – तुमच्या ऑनलाईन कोर्सचे मार्केटिंग करा

वरील सर्व टप्यांचा योग्य वापर करून ऑनलाईन कोर्स बनविण्याचे दोन मार्ग आहेत – पहिला, व्हिडिओ रेकॉर्डिंग पासून ते कोर्स बनविण्यापासून ते त्याचे मार्केटिंग व विक्री हे सर्व तुम्ही स्वतः करू शकता पण यामध्ये अधिक खर्च व तांत्रिक बाबी यांचा प्रामुख्याने समावेश होतो. दुसरा पर्याय म्हणजे ऑनलाईन कोर्स बनविण्यासाठी उपलब्ध असलेले प्लॅटफॉर्म्स किंवा मार्केटप्लेस. हा पर्याय सर्वात सोपा व परवडण्यासारखा सुद्धा आहे आणि तुमच्यासारख्या प्रथमच ऑनलाईन कोर्स बनविणाऱ्यांना तर तो अगदी सोयीस्कर आहे. यातील काही प्रसिद्ध आणि सर्व बाबींनी परिपूर्ण प्लॅटफॉर्म्स आम्ही तुम्हाला सुचवीत आहोत व त्यांची संक्षिप्त माहिती येथे देत आहोत.

  • Teachable:
ऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे ? (संपूर्ण माहिती)

Teachable याचा शब्दशः अर्थ हा ‘जो शिकवू शकतो त्यासाठी’ असा होऊ शकतो. Teachable हा ऑनलाईन कोर्स बनवून ते विकण्यासाठीचा सर्वात स्वस्त आणि सर्वात उपयुक्त असा प्लॅटफॉर्म आहे. आजपर्यंत १ लाखाहून जास्त लोकांनी स्वतःचे ऑनलाईन कोर्स हे Teachable च्या माध्यमातून बनवून जगभर आपल्या अनोख्या ज्ञानाचे प्रदर्शन केले आहे आणि याद्वारे ते उत्तम कमाई सुद्धा करत आहेत. या प्लॅटफॉर्मला ऑल-इन-वन असे म्हणतात कारण इथे तुम्हाला कोर्स बनविण्यापासून ते कोर्स अपलोड करण्यापर्यंत ज्या गोष्टींची गरज लागते त्या सर्व इथे उपलब्ध आहेत. तुमच्या कोर्सचे मार्केटिंग, त्याची झालेली विक्री, तुमची कमाई ह्या सगळ्या बाबींची हा प्लॅटफॉर्म योग्यरीत्या काळजी घेतो. कोणत्याही तांत्रिक बाबींमुळे तुम्हाला ऑनलाईन कोर्स बनविण्यात काहीही अडथळा येत असेल तर त्यांचे मदतनीस हे तुमच्या मदतीसाठी तत्पर असतात. हा प्लॅटफॉर्म वापरून तुमचा ऑनलाईन कोर्स बनवायला तुम्ही तुमच्या गरजेनुसार खालीलपैकी कोणताही एक प्लॅन घेऊन तुमच्या कामास सुरुवात करू शकता. थोडक्यात सांगायचे झाले तर फक्त २ ते २.५ हजार रुपये खर्च करून एकदा का तुमचा ऑनलाईन कोर्स तयार केलात की त्याची अनेक लोकांना विक्री करून तुम्ही उत्तम नफा कमावू शकता.

ऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे ? (संपूर्ण माहिती)

(Source – https://teachable.com/pricing)

हा प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी जरी वार्षिक शुल्क आकारले जात असले तरी यातून मिळणारा नफा हा पूर्णतः तुमचा असेल. Teachable चा यात कोणताही हिस्सा नसेल. इतर प्लॅटफॉर्म्स जे की तुम्ही मोफत वापरू शकता त्यांना तुमच्या कमाईचा एक ठराविक हिस्सा हा द्यावाच लागतो आणि याचमुळे Teachable हे ऑनलाईन कोर्स बनवून विकणाऱ्यांची पहिली पसंती आहे.

  • Udemy:
ऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे ? (संपूर्ण माहिती)

योग्यप्रकारे तुमचे ज्ञान किंवा कौशल्य हे उत्तम व्हिडिओ बनवून जर तुम्ही सादर करत असाल किंवा करणार असाल आणि याच व्हिडिओजला योग्य प्रकारे क्रमाक्रमाने मांडून त्यांचा ऑनलाईन कोर्स बनवायचा असेल तर Udemy हा यासाठी सर्वात योग्य प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अगदी सुरुवातीपासून म्हणजेच तुमचा ऑनलाईन कोर्स कसा प्लॅन करावा, त्याची योग्य मांडणी कशी करावी, दर्जेदार व्हिडिओज कसे बनवावेत या सर्व गोष्टींसाठी उत्तम मार्गदर्शन मिळेल. आज जगभरात Udemy चे ५ करोडहून जास्त विद्यार्थी असून ५००० हून जास्त लोक येथे यशस्वी मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.

Udemy वर तुमचा ऑनलाईन कोर्स सादर करण्यासाठी कोणतीही फी नाही. जे काही कोर्स तुम्ही येथे सादर कराल आणि त्याच्या विक्रीद्वारे तुमची जी काही कमाई होईल ती Udemy च्या Instructor Revenue Share मॉडेल नुसार मोजून तुमचा नफा तुम्हाला दिला जातो. म्हणजे तुम्ही अगदी फुकटात Instructor म्हणून Udemy वर नाव प्रस्थापित करू शकता (अट फक्त एकच तुमचा कोर्स हा कमीत कमी ५ व्हिडिओज आणि कमीत कमी ३० मिनिटांचा असावा) आणि जशी जशी तुमच्या कोर्सची मागणी वाढेल तसे तुम्ही उत्तम कमाई आणि प्रसिद्धीही मिळवायला सुरुवात कराल.

  • Skillshare:
ऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे ? (संपूर्ण माहिती)

टेकनिक्ल व नॉन-टेकनिक्ल कौशल्यांव्यतिरिक्त सुद्धा इतर कोणत्याही गोष्टीचे तुम्हाला इतरांपेक्षा थोडे जास्त ज्ञान असेल आणि तुमच्यात उत्तम प्रकारची सर्जनशीलता (Creativity) असेल तर Skillshare सारखा जबरदस्त प्लॅटफॉर्म तुमची वाट बघत आहे. Skillshare हे काम करणाऱ्या व्यक्ती, तज्ञ आणि एखाद्या विषयावर प्रभुत्व असणारे यांच्यासाठी प्रामुख्याने उपयोगी येत आहे. फक्त Lifestyle या विषयावर येथे ५००० हून अधिक कोर्सेस उपलब्ध आहेत यावरूनच तुम्हाला अंदाज येईल की तुमच्यातील कोणत्याही कलागुणांना ऑनलाईन स्वरूपात सादर केले तर Skillshare वर तुम्हाला हमखास विद्यार्थीवर्ग मिळणार. Udemy प्रमाणेच Skillshare वर सुद्धा तुमचा ऑनलाईन कोर्स बनविण्यासाठी कोणतेही दर आकारले जात नाही परंतु यातून मिळणारा नफा हा प्रामुख्याने तुमच्या विद्यार्थ्यांनी किती वेळ तुमचा कोर्स पाहिला आहे याचबरोबर तुमच्यामार्फत किती विदयार्थ्यांनी Skillshare ची Premium Membership घेतली आहे यानुसार ठरवला जातो.

काय वाटतंय तुम्हाला ? येईल का बनविता आपल्यालापण एखादा ऑनलाईन कोर्स ? अहो नक्कीच येईल. या ऑनलाईनच्या दुनियेत जे कधी स्वतः शाळेत गेले नाहीत पण त्यांच्यात अनेक कलागुण आहेत असे लोक सुद्धा आज आपली कला सादर करून चांगली कमाई करत आहेत. तुमचे काम एकच – प्रयत्न करणे. वर दिलेल्या प्लॅटफॉर्म्सचाच वापर करा असे काही नाही, यासारखेच सुद्धा इतर अनेक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत जसे की Thinkific, Click4Course, Podia, DigitalChalk, Canva, Camtasia, Vimeo ईत्यादी. निर्णय तुमचा असेल – जो प्लॅटफॉर्म तुम्हाला योग्य वाटतो, ज्याचा वापर तुम्हाला सोपा वाटतो आणि ज्याचे रेव्हेनू मॉडेल तुम्हाला पटते तो तुम्ही निवडा.

इथेपर्यंत तर झाले कोर्स का आणि कसा बनवायचा, आता पाहू याचा खर्च वगळता तुम्ही किती कमाई करू शकता कारण शेवटी आर्थिक समाधान हे सुद्धा महत्वाचे आहे.

  • ऑनलाईन कोर्स बनविण्यासाठी किती खर्च येतो आणि नफा किती होऊ शकतो ? or ऑनलाईन कोर्स बनविण्यासाठी होणारा खर्च आणि मिळणारा नफा:

आता तुमच्या लक्षात आले असेलच की ऑनलाईन कोर्स बनिवणे हे काही अवघड काम नाही. प्रत्येक प्लॅटफॉर्म ज्याप्रमाणे ऑनलाईन कोर्स बनविण्यासाठी विविध वैशिष्ट्ये देऊ करतो त्याप्रमाणे प्रत्येकाचे खर्च आणि नफा ह्याचे सूत्र वेगळे आहे. वर आपण पाहिलेच आहे की ऑनलाईन कोर्स बनवायला सुरुवातीला फक्त तुमचा संगणक, कॅमेरा आणि तुमचे ज्ञान ही झाली तुमची गुंतवणूक. काही जणांना जर असे वाटत असेल की आमच्याकडे संगणक आणि कॅमेरा या दोन्हीही गोष्टी नाहीत तर आम्ही काय करावे ? तर मित्रांनो, आज बाजारात ऑनलाईन कोर्सला मागणी पाहता अनेक रेकॉर्डिंग स्टुडिओ तुम्हाला या दोन्ही सुविधा माफक दरात उपलब्ध करून देत आहेत (आणि तेही नसेल तर मोबाईलच्या कॅमेराद्वारे सुद्धा तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुमचा ऑनलाईन कोर्स बनवू शकता पण त्याने व्हिडिओच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित होऊन तुम्ही स्पर्धेत मागे पडाल). शेवटी म्हणतात ना जे पेरले ते उगवेल म्हणजेच उत्तम ज्ञान आणि त्याचे दर्जेदार व्हिडिओ द्वारे केलेले प्रदर्शन तुम्हाला कमाईच्या अनेक संधी उपलब्ध करून देईल. उदाहरणासाठी खालील ताळेबंदी समजून घ्या.

  • समजा संपूर्ण ३० मिनिटांचा ऑनलाईन कोर्स तुम्ही ५ व्हिडिओज मध्ये विभाजित केला आणि यासाठी तुम्हाला अंदाजे ३००० रुपये वार्षिक खर्च आला.
  • वरील कोणत्याही प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही हा कोर्स गरजवंतांसाठी उपलब्ध केला आणि त्याची किंमत मात्र ५०० रुपये ठेवली.
  • समजा पहिल्या वर्षी फक्त १५  विद्यार्थ्यांनी जरी तुमचा कोर्स विकत घेतला तरी पहिल्या वर्षाची तुमची कमाई असेल,

१५ x ५०० = ७५०० – ३००० (तुमचा खर्च) = ४५०० (निव्वळ नफा). 

काही हरकत नाही, ही सुद्धा एक उत्तम सुरुवात आहे कारण या माध्यमातून पहिल्याच वर्षी काहीही कमाई न जमल्याने अनेक जण आपला गाशा गुंडाळून झटपट कमाईचे इतर मार्ग शोधत बसतात.

  • आता पुढच्या वर्षी तुम्ही गरजेनुसार नवीन कल्पनांची भर घालून तुमचा कोर्स अजून अद्ययावत व आकर्षक बनवा. अगोदरच्या विद्यार्थ्यांना जर तुमचा कोर्स हा फायदेशीर वाटत असले तर ते इतर मित्रांना सुद्धा सांगून या कोर्सची शिफारस करतील म्हणजेच तुम्ही दुसऱ्या वर्षी नक्कीच ३० पेक्षा जास्त विद्यार्थी जोडाल.
  • अश्याप्रकारे तुमच्या कोर्सचे योग्य मार्केटिंग करून दरवर्षी तुम्ही ५०, १००, २०० विदयार्थी जोडत गेलात तरी ५ वर्षात तुमचा कोर्स किमान ५०० विद्यार्थ्यांनी विकत घेतला असेल आणि यातून जमा झालेला नफा हा नक्कीच समाधानकारक असेल.

मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सुरुवातीला हा मार्ग तुम्ही कमाईचे अतिरिक्त साधन म्हणून उपयोगात आणू शकता आणि जसजसे तुमची कमाई ही वाढत जाईल तसे तुम्ही या मार्गाला पूर्णवेळ देऊन एक उद्योजक म्हणून स्वतःचा दबदबा निर्माण करू शकाल.

डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

शेवटी काय तर…

‘दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई’, म्हणजेच जो नशिबावर अवलंबून राहिला तो उपाशी राहील आणि ज्याने उद्योगधंद्यात स्वतःला झोकून दिले तो पोटभर खाईल.

एकदा का तुम्हाला कळले की ऑनलाईन कोर्स कसा बनवितात आणि त्याची विक्री कशी केली जाऊ शकते, की मग तुम्ही स्वतःचे ऑनलाईन कोर्स बनवून विकू शकता आणि याच जोडीला तुम्ही एखाद्या कंपनीला ग्राहक संपादन करून देण्यासाठी किंवा त्यांच्या ग्राहकांना कंपंनीचे प्रॉडक्ट कसे वापरावे यासाठीही सुद्धा कोर्स बनवून देऊ शकता. अगदी सुरुवातीच्या काळात फक्त तुमचा संगणक आणि कॅमेरा यांचा वापर करून तुम्ही तुमचा ऑनलाईन कोर्स विकसित करू शकता आणि यात जसजसे तुम्ही प्रगती कराल तसतसे तुम्हाला आधुनिक साधने वापरून तुमच्या कोर्सला अद्ययावत करता येईल. आम्ही यासाठी Screenflow, Audio Technica ATR 2100, Logitech HD Pro Webcam C920, Canon EOS Rebel T5 DSLR Camera, AmazonBasics Lightweight Tripod, LimeStudio Photo Video Studio ही काही सॉफ्टवेअर व साधने यांची तुम्हाला शिफारस करू.

लक्षात ठेवा ऑनलाईन कोर्स विकून रातोरात झटपट श्रीमंत होता येईल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. या पर्यायाद्वारे तुम्ही नक्कीच चांगली कमाई करू शकाल जेव्हा तुम्ही कठोर मेहनत, चिकाटी, जिद्द व सर्जनशीलता या चतुःसूत्रीचा अंगीकार कराल.

शेअर करा

Leave a Comment