फ्लोरीस्ट व्यवसाय कसा कराल

शतकानुशतके भावना व्यक्त करण्यासाठी फुलांचा वापर जगभर केला जात आहे. त्यामुळे फुले ही कालातीत म्हणजे वेळकाळाचे बंधन नसणारी मानली जातात. लग्नसमारंभ असो. डोहाळजेवण असो, बारसे असो, एखादी घरगुती पार्टी असो, वाढदिवस असो, अॅनिव्हार्सरी असो, व्हेलेंटाईन डे सारखे कोणतेही डे असोत, परीक्षेच्या यशाचा आनंद असो किंवा एखाद्या घरात मृत्यू घडला असेल तर त्या लोकांचे सांत्वन करणे असो, फुले हे काम न बोलता उत्तम पद्धतीने करतात. शिवाय ज्यांना फुले दिली जातात त्यांच्या मनाला आनंद सुद्धा देतात.

या मुळेच जगभर फ्लोरल इंडस्ट्री सातत्याने व्यवसाय वाढ नोंदविताना दिसते आहे. या उद्योगात प्रचंड स्पर्धा आहे पण तेवढ्याच संधी सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही घरबसल्या एखादा व्यवसाय करायचा विचार करत असाल तर फ्लोरीस्ट व्यवसाय सुरु करण्याचा विचार नक्की करू शकता.

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी विशेष पदवी किंवा प्रशिक्षणाची गरज नाही हे खरे असले तरी तुम्हाला फुलांची मनापासून आवड हवी आणि त्याच्या विविध रचना करता येण्याचे कौशल्य हवे. कोणत्याही व्यवसायाप्रमाणे येथेही भरपूर कष्ट करावे लागतात पण त्याला आवडीची जोड असेल तर या कष्टांचा ताण येत नाही. सर्वात पहिले म्हणजे फ्लोरीस्ट म्हणून व्यवसाय करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की येथे कामाची सुरवात भल्या पहाटे करावी लागते आणि रात्री उशिरा पर्यंत हे काम चालू राहू शकते. शिवाय फुले हा नाशवंत माल असल्याने अतिशय हुशारीने त्याचे नियोजन करावे लागते. तुम्ही हा व्यवसाय करायचा काही विचार करत असाल तर त्यासंदर्भात येथे थोडे मार्गदर्शन करण्याचा या लेखातून प्रयत्न केला आहे.

या व्यवसायाच्या गरजा-

फुलांचा व्यवसाय हा रोजच्या रोज बरेच तास काम करायची तयारी असेल तरच त्याचा विचार करावा असा व्यवसाय आहे. सर्वसाधारण पणे फुलाचे बाजार पहाटे सुरु होतात तेथे लवकर पोहोचून आपल्या गरजेप्रमाणे ताजी फुले खरेदी करण्यापासून याची सुरवात होते. तुम्ही फ्लोरीस्ट शॉप सुरु करणार असाल तर ही शॉप्स रात्री उशिरापर्यंत उघडी ठेवावी लागतात. व्यवसाय म्हणजे नोकरी नाही. त्यामुळे सुटी नाही. उलट जेव्हा नोकरदार सुटीचा आनंद घेत असतात तेव्हा व्यावसायिकांचे कमाईचे दिवस असतात हे लक्षात घेतले पाहिजे.

आज बाजारात अक्षरशः शेकडो प्रकारची फुले उपलब्ध आहेत त्यात अगदी स्वस्त झेंडू पासून महागड्या ऑर्किड अश्या विविध श्रेणी आहेत. लोकांची फुलांवर खर्च करण्याची जशी तयारी आहे त्यानुसार फुलांची निवड करणे, त्यातून अत्यंत आकर्षक रचना बनविणे किंवा सजावट करणे हे कौशल्याचे काम आहे. आजकाल प्रत्येक समारंभासाठी खास प्रकारची फुले अधिक मागणीत असतात त्याचा अंदाज घेता यायला हवा.

आज फ्लोरीस्ट दुकाने प्रत्येक गावी, शहरात मोठ्या संखेने आहेत तरीही फुलांची मागणी प्रचंड असल्याने तुम्ही या व्यवसायात स्वतःचे स्थान नक्कीच निर्माण करू शकता. इंटरनेट आणि डिजिटलायझेशन यामुळे आज जग तुमच्या जवळ आले आहे तेव्हा ऑनलाईन फ्लोरीस्ट शॉप सुद्धा तुम्ही सुरु करू शकता. अन्यथा दुकानाची जागा भाड्याने घेऊन अथवा घराच्या घरात सुद्धा हा व्यवसाय यशस्वी पणे चालविता येतो.

या व्यवसायासाठी मोठी गुंतवणूक करावी लागत नाही आणि महिला पुरुष कुणीही हा व्यवसाय करू शकतात. यासाठी या संदर्भातले तंत्रशिक्षण आवश्यक असले पाहिजे असे बंधन नाही. पण प्रत्येक व्यावसायिकाला जशी व्यवसायात यशस्वी होण्याची प्रबळ इच्छा आणि व्यवसायाची मानसिकता गरजेची असते तशीच या व्यवसायासाठी आवश्यक आहे. त्यातून फ्लोरीस्ट व्यवसायासाठी मुख्य गरज म्हणजे विविध प्रकारची फुले. ती तर बहूतेक सगळीकडेच उपलब्ध होतात.

एक लक्षात घ्यायला हवे की हा व्यवसाय करण्यासाठी अन्य व्यवसायाप्रमाणे परवाना लागतो. तसेच ताजी फुले मिळू शकतील असे फार्म, शेती, बाजार जवळ असतील तर चांगले. तसेच फुले विकणारे ठोक दुकानदार यांच्या बरोबर करार करून सुद्धा हे अडचण सोडविता येते.

विविध फुलांना मागणी खूप-

आजकाल कोणताही समारंभ असो छोटी मोठी का होईना फुलांची सजावट केली जाते. अनेक कारणांनी फुलाचे बुके देण्याची प्रथाही चांगलीच रुळली आहे. कार्पोरेट बैठका, एम्प्लॉई गॅदरिंग अश्या वेगळ्या कार्यक्रमात सुद्धा फुलांना मागणी आहे तसेच अगदी घरसजावटी साठी सुद्धा अनेक जण आवर्जून फुले खरेदी करतात. आजकाल फुले हा अनेकांच्या आयुष्याचा एक भाग बनली आहेत आणि मुख्य म्हणजे या व्यवसायात नफ्याचे मार्जिन खूप चांगले आहे.

व्यवसाय सुरु करण्याअगोदर पूर्ण योजना हवी

समजा तुम्हाला या व्यवसायातील काहीही माहिती नाही आणि तरीही तुम्हाला या व्यवसायात उतरायचे आहे, तरीही ते शक्य आहे. यासाठी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे व्यवसायाची परिपूर्ण योजना तुम्ही तयार करायला हवी. म्हणजे या व्यवसायाच्या गरजा काय, आवश्यक साहित्य कोणते, गुंतवणूक किती, स्पर्धा किती, व्यवसायात संधी कोणत्या, फुले कुठून मिळवायची, वाहतूक, डिलीव्हरी, कामगार किती लागणार अशी सर्व माहिती अगोदर मिळवायला हवी. अर्थात अशी माहिती आणि व्यवसाय सल्ला देणाऱ्या अनेक संस्था आहेत तेथून ही माहिती मिळविता येते. अनेक ठिकाणी असा सल्ला मोफत मिळतो तर काही कंपन्या पैसे आकारून बिझिनेस प्लॅन तयार करून देतात.

कौशल्ये आणि प्रशिक्षण –

बेकिंग, ब्लॉगिंग या अन्य व्यवसायाप्रमाणे या व्यवसायासाठी अधिकृत प्रशिक्षणाची गरज नाही किंवा पुर्वानुभावाची सुद्धा गरज नाही. पण फुलांच्या विविध रचना करण्याची आवड असणे मात्र गरजेचे आहे. फुलांची आवड असणे आणि तो व्यवसाय म्हणून करणे या दोन वेगळ्या बाबी आहेत याचा विसर पडू देता कामा नये. मोठा अनुभव किंवा प्रशिक्षण घेतलेले नसले तरी बेसिक ज्ञान हवे. त्यासाठी मार्गदर्शन करणारे अनेक कोर्स आहेत. तुमच्यात व्यावसायिक मानसिकता, व्यवसायाचे कौशल्य, क्रिएटीव्हिटी, दररोज नवीन काही शिकण्याची तयारी, या व्यवसायातील रोजच्या नव्या घडामोडी समजून घेण्याची, नवीन ट्रेंड बद्दल जागरुकता असणे गरजेचे आहे. या व्यवसायात स्पर्धा आहे तेवढीच संधी सुद्धा आहे.

व्यवसाय सुरु करण्यापूर्वी तुम्ही एखाद्या फ्लोरीस्ट कडे कामाचा अनुभव घेऊ शकता. तेथे हा व्यवसाय कसा चालविला जातो, कामाची आव्हाने कुठली याचे प्राथमिक ज्ञान मिळविता येते. तसेच ग्राहक सेवा कौशल्य आत्मसात करता येते. कारण फ्लोरीस्ट म्हणून काम करत असताना तुम्ही ग्राहकाशी एक प्रकारचे नाते जोडत असता. यामुळे तुमचा ग्राहक तुमच्याकडे वारंवार येणार असतो.

जागा निवड कशी कराल –

तुम्ही घरात हा व्यवसाय करणार आहात का दुकान चालविणार आहात याचा निर्णय घेतला की जागेची निवड करताना काय पाहायला हवे हे लक्षात घ्या. घरातून किंवा ऑनलाईन व्यवसाय करणार असाल तर जागेसाठी विशेष गुंतवणूक करावी लागणार नाही. पण तुम्ही दुकान चालविणार असला तर जागा भाड्याने घ्यायची की स्वतःची यावर त्यासाठी करावा लागणारा खर्च ठरणार. येथे जागा हाच मुख्य खर्च असेल. कोणत्या ठिकाणी तुम्ही हे दुकान सुरु करणार त्यावरही खर्चाचा आकडा कमी अधिक होऊ शकतो.

साहित्य उपकरणे-

या व्यवसायासाठी खूप साहित्य किंवा उपकरणाची गरज नसली तरी फुले नाशवंत असल्याने आणि लवकर खराब होतात त्यामुळे ती दीर्घकाळ तजेलदार रहावीत यासाठी रेफ्रिजरेशन हवे. अन्य साहित्यात विविध प्रकारच्या फ्लॉवर बास्केट, विविध रचना करण्यासाठी लागणारे सामान, डिस्प्ले आयटम, डिलीव्हरी देण्यासाठी आणि फुले आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था यांचा विचार करावा लागतो. आपल्याला केवढ्या प्रमाणावर आणि कशा प्रकारचे बुके, डेकोरेशन करायचे त्यानुसार योजना तयार ठेवावी लागते. विविध कार्यक्रमांसाठी विविध प्रकारचे डेकोरेशन करावे लागते. तुमचे दुकान असेल तर अश्या ऑर्डर मिळविण्यासाठी दुकान मोक्याच्या जागेवर असणे फायद्याचे ठरते. विवाह कार्यालये, अन्य कार्यक्रम होणारी सभागृहे, मोठी मंदिरे अशा ठिकाणी दुकान असणे फायद्याचे ठरते.

आपण हा व्यवसाय पारंपरिक तसेच ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. 

 ग्राहक मिळविणे –

या व्यवसायात सेट होण्यासाठी मोठी ग्राहक संख्या ही पहिली गरज आहे आणि सुरवातीला ग्राहक मिळविणे हे थोडे अवघड टास्क आहे. पण त्यासाठी सोशल मिडिया, फेसबुक, ट्विटर सारखी लोकप्रिय माध्यमे, इन्स्टाग्राम, पिंटरेस्ट तुमची मदत करू शकतात. इन्स्टाग्राम, पिंटरेस्ट वर तुमचे काम डिस्प्ले करण्याची. तुमची कलात्मकता दाखविण्याची आणि तुमचे हटकेपण प्रेक्षकांच्या नजरेसमोर आणण्याची संधी मिळते. तोंडी प्रसिद्धी होण्यासाठी आपल्या नित्याच्या ग्राहकांना काही सवलती, विशेष भेटी दिल्या तर ते त्यांचे परिचित, मित्र, शेजारी याच्याकडे तुमची शिफारस करू शकतात.

सुरवातीला आपल्या कलाकृती किंवा डेकोरेशनचे दर कमी ठेवणे हाही ग्राहक वाढविण्याचा एक मार्ग आहे. थोडी खर्चाची तयारी असले तर स्वतःची वेबसाईट बनवून व्यवसाय प्रसिद्धी करता येते.

सुरवातीला लोकल रेस्टॉरंट, हॉटेल्स येथे तुमच्या फुल रचना ठेवण्यासाठी संपर्क करता येतो. या ठिकाणी अँबीयंसला विशेष प्राधान्य असते आणि सुंदर आकर्षक फुले त्यात महत्वाची कामगिरी बजावतात. आजकाल कंपनी ऑफिस, हॉस्पिटल्स अश्या ठिकाणी सुद्धा फुलांच्या विविध रचना केल्या जातात. तेथेही तुम्ही संपर्क साधू शकता.

तुम्ही स्वतः ब्रांड पहिल्या दिवसापासूनच सुरु केला असेल तर वरील ठिकाणी तुमच्या रचना देताना तुम्ही ब्रांड सह देऊ शकता. त्यासाठी संबंधित ग्राहकाला काही सवलत देऊन ब्रांड प्रमोशनची संधी मिळू शकते.

स्थानिक बाजारपेठा. स्टॉल्स, फ्लॉवर शो अश्या ठिकाणी सहभागी होणे हाही ग्राहक मिळविण्याचा एक चांगला मार्ग आहे. यामुळे तुम्ही अधिक प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचू शकता.

ऑनलाईन फ्लोरीस्ट व्यवसाय

सध्याचे युग हे स्टार्टअप आणि आंत्रेप्रेन्यूअरशिपचे ( Enterpreneurship) युग आहे. अनेकांना या अतिवेगवान गाडीमध्ये उडी घेण्याची इच्छा आहे. काहीतरी नवीन, क्रांतिकारी करावे आणि त्यातून पैसे मिळवावे अशी अनेकांची इच्छा आहे आणि इंटरनेट तसेच डिजिटलायझेशन (Digitalisation) यामुळे आज अनेक नवउद्योजकाना त्याचे विविध प्रकारचे व्यवसाय सुरु करण्यास मदत होते आहे.

ऑनलाईन मुळे जगाच्या पाठीवर कुठेही काहीही विकणे आणि खरेदी करणे हा बोटावरचा खेळ बनला आहे. घरातून, ऑफिसमधून ठराविक वेळेचे बंधन न पाळता तसेच ग्राहकाचा वेळ न घालविता खरेदी विक्री करणे, सेवा पुरविणे शक्य होते आहे. ज्यांना घरबसल्या असा एखादा व्यवसाय करायची इच्छा आहे ते ऑनलाईन फ्लोरीस्टचा व्यवसाय विचारात घेऊ शकतात.

ऑनलाईन फ्लोरीस्ट संधी किती

फुलांचा व्यवसाय ऑनलाईनवर कसा करता येईल अशी शंका अनेकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. कारण फुले खरेदी करणारा ग्राहक प्रत्यक्ष पाहून, फुलांचा स्पर्श अनुभवून, वास पाहून आणि ताजेपण पाहून ती खरेदी करायची का नाही याचा निर्णय घेतो. हे खरे असले तरी आजकालच्या आधुनिक जीवनशैलीत ग्राहकाला प्रत्यक्ष खरेदी करण्यात वेळ घालविणे शक्य होत नाही. त्यातही बुके सारख्या वस्तूंची खरेदी शेवटच्या मिनिटाला करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे घरबसल्या ही गरज पूर्ण करण्यासाठी ग्राहक ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात.

ऑनलाईन किंवा डिजिटल मार्केटिंग

जर तुम्ही व्यावसायिक बनून ऑनलाईन माध्यमातून पैसे कमवायचा विचार करत असाल तर डिजिटल मार्केटिंगशिवाय हे कदापि शक्य होणार नाही. तुम्ही व्यवसाय ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा – डिजिटल मार्केटिंग ही काळजी गरज आहे याची पक्की खूणगाठ तुम्हाला बांधून ठेवावी लागेल आणि त्यासाठीच डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल.

पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. 

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

प्रोफेशनल फ्लोरीस्ट आणि ग्राहक यांच्या मध्ये फक्त स्क्रीनचे अंतर असते. येत्या काही वर्षात या व्यवसायात प्रचंड वाढ झाली तरी त्याचे नवल वाटण्याचे कारण नाही.

क्रिएटीव्हीटी म्हणजे सर्जनशीलता हवी

फुलांचा व्यवसाय हा रंगीबेरंगी व्यवसाय म्हणता येईल. विविध रंगांची, विविध जातींची, बारमाही मिळणारी, सिझनल मिळणारी, काही सहज उपलब्ध होणारी तर काही दुर्मिळ अशी खूप व्हरायटी यात आहे. तसेच फ्लोरीस्ट म्हणजे फक्त बुके पुरते मर्यादित नाही तर फुलांची विविध सजावट म्हणजे डेकोरेशन सुद्धा त्यात समाविष्ट आहे. शेकडो प्रकारच्या फुलांमधून ग्राहकाच्या मागणी नुसार निवड करून त्याची आकर्षक रचना करणे हे कौशल्याचे काम आहे आणि त्यासाठी सर्जनशीलताच हवी.

हा व्यवसाय स्वीकारताना त्यासाठी आपण किती वेळ देऊ शकतो आणि किती पैसे गुंतवू शकतो हे स्पष्ट हवे. फुले नाशवंत आहेत आणि ठराविक काळच त्याचा ताजेपणा टिकतो. त्यामुळे फुलांचा बाजार आणि ग्राहकाची गरज याची चांगली जाण हवी. कारण फुले अन्य व्यवसाय साहित्याप्रमाणे साठवून ठेवता येणारी नसतात. काही फुले ठराविक काळात आणि ठराविक हवामानात येतात त्यानुसार त्याची वर्गवारी करून आपण ग्राहकांना निर्णय घेण्यात मदत करायची तयारी ठेवावी. ग्राहकाने खर्च केलेल्या पैशांची पुरेपूर भरपाई झाली अशी भावना त्यांच्यात निर्माण होणे हे तुमच्या व्यवसायाचे यश आहे. अर्थात हे अनुभवातून साध्य करता येते.

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले ई-स्टोअर बनवा

ऑनलाईन व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला गरज आहे एका व्हर्चुअल (आभासी) दुकानाची आणि यासाठी तुम्ही एकतर स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट सुरु करू शकता किंवा Shopify सारख्या खास ई-स्टोअर सुरु करण्यासाठी आवश्यक सर्व बाबी पुरविणाऱ्या जबरदस्त प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. एक यशस्वी नवउद्योजक होण्याचे तुमचे स्वप्न साकार करायचे असेल तर उत्तम आणि किफायतशीर सुरुवात नक्कीच फायद्याची ठरू शकते.

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले ई-स्टोअर प्रस्थापित करायचे आहे.तर अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करून वाचा

किंमत कशी ठरवावी

तुम्ही बुके विकणार आहात किंवा एखादे डेकोरेशन करणार आहात किंवा डोहाळजेवण, बारसे या साठी खास फुलांचे अलंकार तयार करणार आहात असे समजू. या साठी किती किंमत ठेवायची हा कळीचा प्रश्न असतो. पण त्यासाठी तुम्ही तयार करणार असलेला आयटम तुम्ही दुसरीकडे खरेदी करायला गेलात तर त्यासाठी किती किंमत द्यायची तुमची तयारी असेल याचा विचार करावा. अशी किंमत तुम्ही ठरवू शकलात तर तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात असे समजा.

डिलीव्हरी-

ग्राहकाने ऑर्डर दिली की त्याला त्याने सांगितलेल्या ठिकाणी, वेळेत डिलीव्हरी देणे हेही अत्यंत महत्वाचे असते. हे काम व्यवसाय छोट्या प्रमाणावर असेल तर तुम्ही स्वतः करू शकता पण व्यवसायाचा व्याप अधिक असेल तर त्यासाठी डिलीव्हरी बॉय नेमणे किंवा स्वतःची डिलीव्हरी व्हॅन हवी. व्यवसायाचा परीघ म्हणजे किती अंतरापर्यंत डिलीव्हरी द्यायची हे अगोदरच ठरविलेल असेल तर हे पर्याय निवडता येतात. पण दूर अंतरापर्यंत तुम्ही डिलीव्हरी देणार असाल तर लॉजिस्टिक म्हणजे वाहतूक करणाऱ्या कंपनीशी करार करता येतात.

ऑनलाईन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यासाठी आकर्षक थीम हवी. तुमचे पोर्टल सहज सोपे हवे आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियानुसार त्यात आवश्यक ते बदल सहज करता यायला हवेत. त्याचबरोबर नवीन स्टॉकचे अपडेशन सहज करता यायला पाहिजे. त्यासाठी अगोदरच अन्य फ्लोरीस्टची ऑनलाईन पोर्टल पाहणे. त्याच्या कल्पना विचारात घेणे आणि मग आपले पोर्टल तयार करणे शहाणपणाचे ठरते.

फुले अत्यंत नाजूक असतात त्यामुळे डिलीव्हरी देताना अतिशय सांभाळून, काळजीपूर्वक द्यावी लागते. एखाद्यावेळी डेकोरेशन डिलीव्हरी देताना खराब झाले तर ग्राहक तक्रार करतो किंवा पैसे कमी देण्याची किंवा अजिबात न देण्याची शक्यता असते. अश्यावेळी ग्राहक टिकविणे हे अधिक महत्वाचे असल्याने समजुतीने मार्ग काढावा लागतो. तुम्ही थोडी माघार घेऊन दिलगिरी व्यक्त केली किंवा पैसे कमी घेण्याची तयारी दाखविली तर असे प्रश्न सोडविता येतातच पण ग्राहक टिकून राहण्यासाठी सुद्धा मदत होते.

रीव्हूज

डिजिटलायझेशनच्या युगात ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यवसाय असला तरी रिव्ह्यूज याला अनन्यसाधारण महत्व आहे. रीव्युज म्हणजे तुमच्या कामाचे ग्राहकाने केलेले एक प्रकारचे मूल्यमापन होय. वाईट रीव्युज फार वेगाने पसरतात आणि त्यामुळे तुमच्या वर्षानुवर्षाच्या मेहनतीवर पाणी पडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे शक्य आहे तेव्हा ग्राहकाची प्रतिक्रिया खिलाडूवृत्तीने स्वीकारणे आणि त्यानुसार आपल्या कामात परिणामकारक बदल घडविणे, ग्राहकाच्या प्रतिक्रिया गंभीरपणे घेणे, आपल्या कडून खरोखरच काही चूक घडली असेल तर विना संकोच त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणे महत्वाचे आहे. यामुळे ग्राहकाचा तुमच्यावरील विश्वास अधिक दृढ होतो. ग्राहकाचा विश्वास हा तुमच्या व्यवसाय भरभराटीचा पाया आहे म्हणून हे अधिक महत्वाचे आहे.

वेबसाईट कशी असावी

ऑनलाईन फ्लोरीस्ट व्यवसाय करताना स्वतःची वेबसाईट असणे केव्हाही चांगले. पण वेबसाईट बनविताना काही काळजी अवश्य घ्यावी. मुख्य म्हणजे आपली वेबसाईट सिम्पल हवी. कस्टम वेबसाईट हा त्यासाठी चांगला मार्ग आहे. आज ऑनलाईन व्यवसाय करणारी दुकाने खूप मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे तेथे नव्याने या व्यवसायात उतरणाऱ्यांना जागा नाही, या स्पर्धेत टिकून राहणे जमणार नाही असे वाटणे साहजिक आहे. पण छोट्या व्यवसायाचे काही फायदे नक्कीच होतात. उदाहरण द्यायचे तर तुम्ही या व्यवसायातील काही ठराविक क्षेत्र टार्गेट करू शकता.

आकडेवारी सांगते की आज १८ टक्के इंटरनेट युजर्स जगभरात फुले आणि गिफ्टची ऑनलाईन खरेदी करतात. म्हणजे ही संख्या कमी नाही. त्यात तुम्हाला तुमचा वाटा निश्चित करायचा आहे. त्यासाठी अस्तिवात असलेल्या अश्या काही वेबसाईट पाहाव्या. ग्राहकांची मागणी सर्वाधिक कशाला आहे याचा अंदाज त्यावरून घेता येतो आणि त्यानुसार आपले कार्यक्षेत्र ठरविता येते आणि त्याला अनुरूप वेबसाईट तयार करता येते.

या व्यवसायाच्या जमेच्या आणि तोट्याच्या बाजू –

कोणताही व्यवसाय म्हटला की त्यात काही अनुकूल आणि काही प्रतिकूल किंवा फायदे आणि तोटे असणारच. हा व्यवसाय त्याला अपवाद नाही.

 • तुम्हाला फुलांची आवड आहे, त्यातील ज्ञान आहे आणि तुमच्या अंगी कलात्मकता, सर्जनशीलता आहे तर हा व्यवसाय तुमच्यासाठी योग्य आहेच पण येथे तुम्हीच तुमचे बॉस असणार हा चांगला फायदा म्हणता येईल.
 • या व्यवसायाला वेळेचे बंधन नाही. तशीच ठराविक वेळ नाही. विविध समारंभासाठी फुले नेहमीच लागतात त्यामुळे नित्य मागणी असलेला असा हा आयटम आहे.
 • अगदी छोट्या प्रमाणावर सुरु करून हा व्यवसाय तुम्ही कितीही विस्तारू शकता. फ्लॉवर डेकोरेशनचे क्लासेस घेऊन जोड कमाई करू शकता.
 • यात नफ्याचे मार्जिन चांगले आहे.
 • तुमच्या व्यवसायाची तुमचे ग्राहक तोंडी प्रसिद्धी करू शकतात. त्यासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही. फक्त ग्राहकाना समाधानी ठेवणे जमायला हवे.
 • फ्लॉवर डेकोरेशन संदर्भात नित्य नवीन कल्पना सतत येत असतात त्याची माहिती इंटरनेट वरून मिळू शकते आणि तुम्ही तुमची डेकोरेशन व्हरायटी वाढविण्यासाठी त्याचा वापर करू शकता.

काही तोटे असे

 • कामाची सुरवात भल्या पहाटेपासून करावी लागते. आणि दिवसातील अनेक तास काम करावे लागते.
 • यात सुरवातीला शारीरिक कष्ट आहेत आणि हे काम आव्हानात्मक आहे.
 • स्पर्धा खूप आहे त्यामुळे सातत्याने काळाबरोबर किंवा काळाचा पुढे दोन पावले राहावे लागते.
 • तुमचे वेगळेपण राखणे आवश्यक असते यामुळे सतत नवीन आकर्षक रचना तयार ठेवाव्या लागतात.
 • फुले नाशवंत आहेत त्यामुळे वाया जाण्याची शक्यता मोठी असते.
 • प्रत्यक्षात अपेक्षित असलेला नफा किंवा कमाई होण्यसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.

अजून काही वेगळे मुद्दे

सर्व प्रकारच्या ई कॉमर्स व्यवसायाचे फायदे तोटे आहेत. फ्लोरीस्ट व्यवसाय त्याला अपवाद नाही. त्यातील काही मुद्दे येथे समजून घेऊ.

 • शिफारस– ग्राहक विशेष काही प्रसंगीच फुले खरेदी करतो, वारंवार नाही. त्यामुळे काहीजणांना योग्य निवड करण्यात अडचण येते. अनेकांना अशा खरेदीचा अनुभव नसतो. अश्यावेळ फ्लोरीस्ट ने त्याच्या अनुभवाचा फायदा ग्राहकाला दिला पाहिजे म्हणजे योग्य निवडीसाठी त्याला मदत केली पाहिजे.
 • डिलीव्हरी– फुले हा नाजूक आयटम आहे त्यामुळे डिलीव्हरी देताना काळजीपूर्वक आणि चांगल्या स्थितीत फुले मिळतील याची हमी ग्राहकाला देता यायला हवी. शिवाय सांगितलेल्या वेळेत आणि सांगितलेल्या ठिकाणी डिलीव्हरी होईल याविषयी जागरूक राहायला हवे.
 • गुणवत्ता– ऑनलाईन खरेदीत अनेक ग्राहक माल कसा असेल याविषयी साशंक असतात. फुलांबाबत ही साशंकता अधिक असू शकते. कारण फुलांची क्वालिटी चेक करणे येथे ग्राहकाला शक्य नसते.
 • पैशांचा योग्य मोबदला– ही अपेक्षा कोणत्याही खरेदीसाठी लागू होते. ग्राहक जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत देतो तेव्हा त्याला त्यानुसार मालाचा दर्जा हवा असतो.
 • सोय– अनेक ग्राहकांना भेटवस्तू किंवा भेट देण्याचे बुके शेवटच्या क्षणी खरेदी करायची सवय असते. याला तुमचे ग्राहक अपवाद असतील असे नाही. त्यामुळे ग्राहकाला तुमच्याकडे खरेदी करताना प्रत्येक क्षणी चांगला अनुभव येईल याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे तुमच्या बद्दल त्याच्या मनात विश्वासाची भावना निर्माण होते आणि ग्राहक परत परत तुमच्याकडे येतोच पण अन्य परिचितांना तुमची शिफारस करतो.
शेअर करा

Leave a Comment