लेखन कौशल्यातून करा घरबसल्या कमाई

अनेकांच्या मनात प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी रोज, ठराविक वेळेत जाऊन नोकरी किंवा अन्य काही काम करण्यापेक्षा घरबसल्या कमाई करावी असे विचार असतात. त्यात घराची जबाबदारी सांभाळत असलेल्या गृहिणी आहेत, अपंग व्यक्ती, तसेच घरात पार्ट टाईम काम करून पैसे मिळवावेत अशी इच्छा असणारे विद्यार्थी आहेत, नोकरी व्यवसायातून निवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक आहेत आणि शिक्षण होऊनही नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर न पडू शकणारे लोक आहेत. आज डिजिटल क्रांतीमुळे जग आपल्या शेजारी आहे. त्याचा फायदा घेऊन घरबसल्या पूर्ण वेळ किंवा थोडा वेळ अनेक व्यवसाय करता येतात आणि त्यातून कमाई करणे शक्य होते. या प्रकारे अनेक व्यवसाय करता येत असले तरी आपण या लेखात लेखन कौश्यल्यातून घरबसल्या कमाई कशी करता येते याची माहिती घेणार आहोत.

लेखन कौशल्याचा वापर करायचा असल्याने येथे ज्यांना लेखनाची आवड आहे, भाषेवर चांगली हुकमत आहे त्यांना हा मार्ग अधिक सोयीचा असणार हे नक्कीच. कोणत्या विविध प्रकारे या कौशल्याचा वापर अशा व्यक्ती करू शकतात हे पाहण्या अगोदर त्याचे फायदे काय आणि तुमच्या जबाबदाऱ्या कोणत्या याची माहिती सर्वप्रथम हवी.

वेळेचे बंधन नाही- घरबसल्या हा व्यवसाय करताना निश्चित वेळेत काम झाले पाहिजे असे बंधन नाही हे खरे असले तरी घेतलेले काम वेळेत पूर्ण करून देणे महत्वाचे आहे. त्यामुळे घरातील अन्य जबाबदाऱ्या सांभाळताना आपल्या कामाचा प्राधान्य क्रम ठरविता येणे आवश्यक. तसेच संगणक हाताळणी, अन्य उपकरणे देखभाल दुरुस्ती याबाबत दक्षता घ्यायला हवी. याचाच अर्थ हा व्यवसाय घरबसल्या करताना स्वयंशिस्त हवी.

वेळ, खर्च बचत– हा व्यवसाय घरबसल्या करता येत असल्याने तुमचा कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी घरी परत येण्यासाठी लागणारा वेळ वाचतो शिवाय प्रवास खर्च करावा लागत नाही, दगदग होत नाही हा यातील मोठा फायदा आहे. शिवाय ऑनलाईन पद्धतीने काम करता येत असल्याने तुम्ही केवळ राज्य आणि देशात नाही तर परदेशात सुद्धा तुमची सेवा देऊ शकता. मात्र आपला ग्राहक टिकविण्यासाठी कामाचा दर्जा सांभाळणे आणि वेळेत काम पूर्ण करून देणे याविषयी अगदी काटेखोर राहणे आवश्यक आहे.

लेखन कौशल्य असणऱ्या व्यक्ती अनेक प्रकारांनी हा व्यवसाय करू शकतात. त्यातील काही प्रकार असे, प्रोडक्ट रिव्यू लिहिणे, कंटेंट रायटिंग, ई बुक लिहिणे, कॉपी रायटिंग, ब्लॉग रायटिंग, ऑनलाईन ट्यूटोरिअल, फ्री लान्सर वगैरे.

१)कंटेंट रायटिंग – कंटेंट रायटिंग याचा अर्थ एकदा व्यवसाय, वेबसाईट साठी लेख लिहून देणे. आज दररोज शेकड्यांच्या संखेने नवीन वेबसाईट सुरु होताना दिसतात. त्यांना चांगल्या लेखकांची गरज असते, स्टार्ट अप कंपन्यांना सुद्धा कंटेंट रायटर्स लागतात. कोणतीही वेबसाईट बनवायची तर त्यासाठी मजकूर लागतो. एखाद्याच्या डोक्यातील कल्पना शब्दात मांडण्याचे कौशल्य त्यासाठी गरजेचे असते. त्यामुळे असा मजकूर लिहून देऊ शकणाऱ्या लोकांना मोठी मागणी आहे. त्यात प्रत्येक आर्टिकल साठी वेगळे पैसे आकारणे शक्य असते. अर्थात कमीत कमी शब्दात योग्य तो संदेश वाचकांना देता येणे हे खरोखर कौशल्याचे काम आहे.

२)मासिके, वृत्तपत्रातून लेखन – मासिके, वर्तमानपत्रे मग ती छापील असोत वा ऑनलाईन असोत त्यांना सतत नवा नवा मजकूर हवा असतो. वर्तमानपत्रांना बातमी शिवाय अन्य प्रकारच्या मजकुराची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते मग ते मनोरंजन पूर्ण लेखन असेल, ज्ञानवर्धक असेल, सामाजिक लेखन असेल, विज्ञान विषयी माहिती देणारे लेखन असेल, तंत्रज्ञान विषयी असेल किंवा अगदी आधुनिक आणि विविध प्रकारच्या गॅजेट विषयी माहिती देणारे, फॅशन, फूड, प्रवास संबंधी असेल. तुम्हाला ज्या प्रकारचे लेखन करण्यात रस असेल आणि त्या विषयाची चांगली माहिती असेल तर असे लेखन सुद्धा तुम्ही करू शकता. यामुळे तुम्हाला विना जाहिरात प्रसिद्धी मिळविण्याची संधी मिळते.

३)ब्लॉग लिहिणे – इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे आणि त्याचा फायदा तुम्ही तुमचे लेखन कौशल्य वापरून त्यातून पैसे मिळविण्यासाठी करू शकता त्यातील एक मार्ग म्हणजे ब्लॉग लिहिणे. अनेक वेबसाईटवर तुम्ही कोणताही खर्च न करता ब्लॉग लिहू शकता किंवा स्वतःची ब्लॉगिंग वेबसाईट बनवू शकता. येथे तुम्ही तुमचे विचार, एखाद्या घटनेविषयी तुमचे मत मुक्तपणे मांडू शकता. हे लेखन तुमचे स्वतःचे हवे. ब्लॉग वर वाचक वर्ग सतत बदलता असतो त्यामुळे वाचकांना खिळवून ठेवेल असे लेखन करता येणे येथे फायद्याचे ठरते. लेखन रोचक हवे आणि वाचकांना आकर्षून घेणारे हवे. एकदा का तुमचा वाचक वर्ग वाढतोय असे दिसले की ब्लॉग सोबत एखादी प्रोडक्ट लिंक जोडून त्यातून कमिशन बेस कमाई करता येते.

 अर्थात ब्लॉग लिहिला आणि लगेच त्याला मोठ्या संख्येने वाचक मिळाले असे होत नाही. त्यामुळे येथे पेशन्स आणि प्रतीक्षा करण्याची तयारी हवी. तुम्ही सौंदर्यप्रसाधने, आरोग्य, पाककला, गुंतवणूक, पर्यटन, तंत्रज्ञान अश्या कोणत्याही विषयात चांगले लेखन करू शकलात तर संबधित क्षेत्रातील कंपन्या तुम्हाला जाहिराती देऊ शकतात आणि त्यातूनही पैसे मिळू शकतात. किंवा तुम्ही प्रोडक्ट लिंक देऊन अफिलीएट मार्केटिंग करून त्यातूनही कमाई करू शकता. यात संबधित कंपनीच्या उत्पादनांची माहिती तुम्ही द्यायची आणि ती उत्पादने विकली गेली तर त्यावर कंपनी तुम्हाला कमिशन देते.

४)फेसबुक,इन्स्टाग्राम वर प्रोडक्ट रिव्यू लिहिणे– यासाठी तुमच्याकडे लेखन कौशल्याबरोबर संबंधित प्रोडक्ट किंवा उत्पादनाची माहिती असणे गरजेचे आहे. यामध्ये शॉपिंग साईट कडून त्याबदली तुम्हाला कमिशन मिळू शकते. अर्थात त्यासाठी तुम्हाला तुमचा वाचक वर्ग कोणत्या प्रकारचा आहे, तुमच्या ब्लॉगची थीम याचा विचार करून प्रोडक्टची निवड करावी लागेल. तुमच्या वाचक वर्गाच्या खरेदीच्या सवयी आणि त्यांचा तुमच्यावर बसलेला विश्वास याचा वापर करून तुम्ही त्यांना उपयोगी ठरतील अशी उत्पादने, विविध प्रकारच्या सेवा, एखाद्या पर्यटन स्थळाबद्दल तुमचा अनुभव असे विविध प्रकारे लेखन करू शकता. यातून सुरवातीला पैसे मिळतील असे नाही. कधी तुम्हाला संबंधित प्रोडक्ट मोफत दिले जातील.

५)ई बुक लिहिणे– आज इंटरनेट वर अनेक जण त्यांच्या लेखनाचा छंद ई बुक लिहून पूर्ण करत आहेत आणि त्याचबरोबर चांगले पैसे कमावत आहेत. अर्थात तुमची लेखन शैली, विषयांची निवड, तुमचा वाचक वर्ग यावर या लेखनातून किती पैसे मिळणार हे अवलंबून असते. यात यश मिळण्यासाठी मार्केटिंग कडे ही लक्ष द्यावे लागते. अमेझॉन, किंडल सारख्या प्लॅटफॉर्मवर ई बुक विक्रीसाठी असतात. त्यामुळे तुमच्या ई बुकला चांगला वाचक मिळाला तर त्याची विक्री होऊ शकते आणि त्यातून कमाई करता येते.

६)ऑनलाइन ट्यूटोरीअल-तुम्ही एखाद्या विषयाचे तज्ञ असाल तर घरबसल्या ऑनलाईन ट्यूटोरीयल देऊ शकता. यात शालेय अभ्यासक्रमातील विषय, ब्युटी ट्यूटोरियल, फिटनेस, डाएट, असे अनेक विषय आहेत. तुम्ही जो विषय देणार तो अन्य लोकांना आवडणारा, रोचक, मनोरंजक, ज्ञान देणारा असेल तर यातून पैसे मिळविता येतात.

ऑनलाईन कोर्स बनविणे कोणासाठी फायद्याचे आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर आम्ही सांगू इच्छितो की कोणीही स्वतःचा ऑनलाईन कोर्स बनवून तो विकू शकतो कारण यासाठी ना कुठल्या मोठ्या भांडवलाची गरज आहे ना की कुठल्या तंत्रज्ञानात प्राविण्य मिळविण्याची गरज आहे. तुम्हाला इतरांपेक्षा काय वेगळे माहिती आहे आणि त्याचे तुम्ही कोर्स स्वरूपात कसे रूपांतर करू शकतात एवढेच इथे महत्वाचे आहे.

ऑनलाईन क्लासेस कसे घ्यावे यावरील माहिती साठी खालील लेख वाचू शकता

ऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे ? (संपूर्ण माहिती)

७)फ्री लान्सर– एखाद्या ठराविक कंपनी किंवा उत्पादनाविषयी लिहिण्याऐवजी तुम्ही फ्री लान्सर म्हणून रिव्यू लिहिण्यासाठी पैसे मिळवू शकता. याला कोणतेही बंधन नाही. ब्युटी प्रोडक्ट, मोबाईलस, फॅशन, फॅशन अॅक्सेसरीज, हॉटेल्स, खाद्य पदार्थ, भटकंतीची ठिकाणे अशा विविध विषयांवर तुम्ही लेखन करू शकता.

८)कॉपी रायटिंग – याचा अर्थ एकाद्या उत्पादन, सेवा, कंपनी व तत्सम विषयाविषयी आकर्षक, नेटका मजकूर लिहून देणे. यासाठी विशेष प्रशिक्षण आवश्यक नसले तरी कौशल्य हवे. अचूक शब्दांची निवड करण्याबरोबर ग्राहक, वाचक या मजकुराकडे आकर्षित होणे ही यातील यशाची पायरी ठरत असते. एखादी कंपनी, जाहिराती, वेबसाईट, ई मेल, ब्लॉग पोस्ट, माहितीपत्रके, प्रेझेन्टेशन म्हणजे सादरीकरण, व्हिडीओ स्क्रिप्ट, हेडिंगज, उत्पादनाचे वर्णन कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त परिणामकारक पणे लिहिणे यात अपेक्षित असते. यातूनही अनेक जण चांगली कमाई करतात.

या शिवाय मराठीतून इंग्लिश भाषांतर करणे, पुस्तकांची भाषांतरे, स्कॅन पुस्तकातील उतारे टाईप करून देणे या प्रकारची कामे सुद्धा वरील व्यवसायांच्या जोडीला घरी बसून करता येतात.

आता प्रश्न असा येतो की लेखन कौशल्य वापरून आपण घरबसल्या काम कसे मिळवू शकणार. तर त्यासाठी तुमच्या मदतीला अनेक वेबसाईट असल्याचे दिसून येईल. पण यात अशी काळजी घ्यायची की आपण मदतीसाठी ज्या वेबसाईट निवडणार त्या विश्वासार्ह हव्यात. म्हणजे फसवणूक टळते.

तुमच्या मदतीसाठी विश्वासार्ह काही वेबसाईट अश्या-

Upwork.com

Elane.com

Freelancer.com

Guru.com

Peopleperhour.com

या मध्ये आणखी एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आपल्या कामाची किंमत कशी ठरवायची हा. म्हणजे कोणत्या कामासाठी किती पैसे आकारायचे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही जे लिहाल त्याला सुरवातीपासून मोठा वाचक वर्ग मिळेल असे नाही. दुसऱ्यांसाठी काम करताना अनेकदा तुम्ही लिहिलेली आर्टिकल्स त्यांना पसंत पडतील असे नाही, अनेकदा ती नाकारली जातात. त्यामुळे या अपयशामुळे उमेद हरवून बसणे टाळले पाहिजे. मुळात या व्यवसायात फार मोठी गुंतवणूक करावी लागत नसल्याने त्यातील धोके कमी असतात. पण आपण आपल्या कामाची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न सातत्याने करत राहीले पाहिजे. एकदा का ती नस सापडली की मग यश मिळतेच.

शेअर करा