घरगुती चॉकलेटस बनवून करा भरपूर कमाई

आजकाल कोणताही आनंदाचा प्रसंग, उत्सव चॉकलेट शिवाय साजरा होत नाही असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. वाढदिवस, व्हेलेंटाईन डे सारखे विविध डेज, लग्नाचे वाढदिवस, कार्पोरेट कार्यक्रम, सणाउत्सवानिमित् दिल्या जाणाऱ्या गिफ्ट, परीक्षेतील यश, दिवाळी, राखी सारखे सण, शाळेतल्या पार्टी असा कोणताही कार्यक्रम चॉकलेटच्या आस्वादाने साजरा करण्याची जणू प्रथा पडते आहे. ज्यांना थोडे भांडवल गुंतवून काही व्यवसाय उद्योग करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी घरी बनविलेली चॉकलेट्स हा चांगला फायदेशीर पर्याय ठरू शकतो.

आज बाजारात सहज चक्कर टाकली तर अक्षरशः शेकडो प्रकारची चॉकलेट दिसतात. अगोड, कडू चवीची, मध्यम गोड, डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, कोका पावडर- शुगर फ्री चॉकलेट असे अनेक प्रकार जगभर लोकप्रिय ठरले आहेत त्यामुळे त्यांना सततची मागणी आहे. आता त्यात हेल्थ कॉन्शस म्हणजे आरोग्याबत जागरूक प्रजेची भर पडते आहे. आरोग्यपूर्ण जीवनासाठी विविध प्रकारची डाएटस, ऑर्गेनिक फूडचा वापर करणारे या विविध प्रकारच्या डाएटला अनुरूप अशा चॉकलेटला पसंती देताना दिसतात. त्यात केटो, वेगन, शुगर फ्री, ऑर्गनिक चॉकलेट आपला जम बसवू पाहत आहेत.

डार्क चॉकलेटचे आरोग्याला खूप फायदे आहेत. अँटीऑक्सिडंट, मरगळ झटकणारी खास चव असलेली, स्ट्रेस रीलीजर म्हणजे ताण तणाव कमी करणारी अशा या चॉकलेटना बाजारात प्रचंड मागणी आहे. आणि हाच या व्यवसायातील फायद्याचा महत्वाचा मुद्दा आहे.

घरगुती चॉकलेट व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी अगोदर काही तयारी करावी लागेल. ही तयारी कशी करायची याची माहिती घेऊ.

बाजार संशोधन किंवा बाजार आढावा

चॉकलेट हा कॉमन पदार्थ बनला आहे आणि जगातील बहुतेक सर्व लोक चॉकलेट खातात हे जितके खरे तितकेच चॉकलेट हा ‘कॉमन गिफ्ट आयटम’ बनले आहे हेही खरे. त्यामुळे सर्वात प्रथम व्यवसाय सुरु करण्यापूर्वी स्थानिक बाजारात आपले प्रतिस्पर्धी, स्पर्धक कोण याचा शोध घ्यायला हवा. तुमचे स्पर्धक काय काय देतात याचा अंदाज घ्या.

आजकाल केटो, वेगन, शुगरफ्री असे आरोग्याबाबत अति जागरूक जनतेसाठी चॉकलेटचे प्रकार आले आहेत. तेही ध्यानात घ्या आणि बाजाराचे स्वतःच विश्लेषण करून सर्व प्रकारची कॉमन चॉकलेट बनविण्याबरोबर आपण काय हटके देऊ शकू याचा विचार करा. अपारंपारिक किंवा हटके क्रिएशन टेस्ट करण्यास ग्राहक नेहमीच उत्सुक असतात हे लक्षात घ्या.

जागा किती आणि कशी असावी

चॉकलेट हा खाद्यपदार्थ श्रेणीत मोडणारा घटक आहे. त्यामुळे जेथे चॉकलेट बनविले जाणार तेथील स्वच्छता आणि हायजीन अतिशय चांगले हवे. त्यामुळे या व्यवसायासाठी जागा निवडताना चोखंदळ रहा. जागेची निवड करताना स्थानिक आरोग्य विभागाचे सर्व नियम, सूचना काळजीपूर्वक माहिती करून घ्या. अगदी तुम्ही घरच्या घरी चॉकलेट बनविणार असलात तरी त्यासाठी सुद्धा काही काटेखोर नियम पाळावे लागतात. घरात जेथे चॉकलेट बनविले जाणार असेल तेथे अन्य खाद्यपदार्थ बनविता येणार नाहीत हे लक्षात घ्या. तसेच पाळीव प्राण्यांना त्या जागेत प्रवेश देता येणार नाही हेही लक्षात घ्या.

या दृष्टीने व्यावसायिक किचनची निवड योग्य ठरते. त्याची ऑनलाईन नोंदणी करता येते. शिवाय जेव्हा चॉकलेट बनविले जात नसेल तेव्हा त्या जागेचा वापर फूड रेस्टॉरंट म्हणून करता येऊ शकतो. तुम्ही जागा निश्चित करण्यापूर्वी स्थानिक आरोग्य विभाग अधिकारी यांच्याकडून ती जागा चॉकलेट बनविण्यासाठीच्या सर्व अटीची पूर्तता करणारी आहे याची खात्री करून घ्या.

नोंदणी आणि परवाने

व्यवसाय सुरु करण्यापूर्वी काही महत्वाची कामे पूर्ण करायला हवीत. कारण याची पूर्तता केल्याखेरीज व्यवसाय सुरु करता येणार नाही. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून काही परवानग्या आणि परवाने घ्यावे लागतात. ते कुठले ते पाहू

  • अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) परवाना

खाद्य पदार्थ बनविण्याचा उद्योग करताना हा परवाना महत्वाचा आणि आवश्यक आहे.

  • व्यवसाय परवाना आणि ट्रेड मार्क नोंदणी

कोणताही व्यवसाय सुरु करताना व्यवसाय परवाना घ्यावा लागतो. चॉकलेट मेकिंग मध्ये तुम्ही अन्य रिटेल स्टोर्सना माल पुरविणार असलात तर त्यासाठी ट्रेडमार्क म्हणजे व्यापारी मुद्रा नोंदणी करणे फार महत्वाचे आहे. यामुळे अन्य कुणी तुमचा लोगो वापरून त्यांचा माल विकू शकणार नाही आणि तुमच्या ट्रेड मार्क मुळे ग्राहकांचा तुमच्यावरील विश्वास कायम राहायला मदत होईल.

  • जीएसटी म्हणजे वस्तू सेवा कर-

   दुकान सुरु करण्यापूर्वीच तुम्हाला व्यवसाय नोंदणी जीएसटी खाली करावी लागेल. अगदी व्यवसायाचे बँकेत चालू खाते उघडताना सुद्धा अन्य कागदपत्रांबरोबर जीएसटी नंबर देणे बंधनकारक आहे.

चॉकलेट बनविण्याच्या पद्धती आणि उपकरणे

घरगुती पद्धतीचे चॉकलेट दोन पद्धतीनी बनविता येते. त्यातली पहिली आहे कंपौंड चॉकलेट स्लॅबचा वापर करून बनविलेली चॉकलेट आणि दुसरी आहे कोको बियांचा वापर करून बनविलेली चॉकलेट. या लेखात आपण पहिल्या पद्धतीची माहिती घेणार आहोत.

घरी चॉकलेट बनविण्यासाठी काही उपकरणे आवश्यक आहेत. अगदी छोट्या स्वरुपात चॉकलेट व्यवसाय सुरु करायचा असला तरी उच्च दर्जाची, स्वादाला उत्तम आणि सर्वांच्या पसंतीस उतरतील अशी चॉकलेट बनविण्यासाठी काही उपकरणे आवश्यक आहेत ती अशी

मेल्टिंग मशीन. यासाठी साधारण १० हजार रुपये खर्च येतो. घरातील भांडी या कामासाठी तुम्ही वापरणार असला तर हा खर्च येणार नाही. विविध प्रकारचे मोल्ड किंवा साचे लागतील त्यासाठी आकार आणि ब्रांड नुसार २०० ते १ हजार रुपये खर्च करावे लागतील.

कच्चा माल म्हणजे चॉकलेट कंपौंड, ट्रान्स्फर शीट, सुका मेवा, इसेन्स, चोको चिप्स या कच्च्या मालासाठी ४ ते ५ हजार रुपये खर्च येईल.

चॉकलेट बनविण्याची कृती

मेल्टिंग मशीन किंवा डबल बॉयलर मेथड वापरून प्रथम चॉकलेट स्लॅब वितळवावे लागते. सॉस पॅन मध्ये पाणी उकळवून त्यावर झाकण ठेवावे आणि त्यावर चॉकलेट कंपौंड असलेला बाउल ठेवला की चॉकलेट वितळणे सुरु होते. यात चॉकलेट कंपौंडला थेट उष्णता द्यायची नाही म्हणून या पद्धतीने ते वितळवयाचे. चॉकलेट वितळू लागले की आच बंद करून ते अगदी मउ मुलायम होईपर्यंत ढवळत राहावे लागते. पाण्याचा एकाही थेंब त्यात मिसळणार नाही याची काळजी घ्यावी लागते. कारण पाणी आणि चॉकलेट एकत्र नांदू शकत नाहीत.

सिलिकॉन किंवा प्लास्टिक मोल्डचा वापर करून हव्या तश्या आकाराची चॉकलेट बनविता येतात. सुरवातीला चॉकलेट कंपौंड वितळून मुलायम झाले की त्यात मोल्ड मध्ये घालण्यापूर्वी तुम्हाला हवे ते इसेन्स तसेच काजू, बदाम असा सुका मेवा घालून मग मोल्ड मध्ये घालावे आणि काही वेळ खोलीच्या तापमानात ठेऊन मग फ्रीज मध्ये ठेवावे.

काही वेळात तुमचे चॉकलेट सेट होते मग त्याचे पॅकिंग केले की ते विक्रीसाठी तयार झाले.

गिफ्ट बॉक्सेस

आपण चॉकलेट व्यवसाय सुरु केल्यावर त्याची विक्री होत असताना कमाई अधिक कशी करायची याच्याही योजना तयार हव्यात. हँडमेड चॉकलेट आकर्षक पँकिंग मध्ये दिली तर त्यांची विक्री नक्कीच जास्त होणार. यासाठी ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन फॅन्सी चॉकलेट बुके, चॉकलेट बास्केट तुम्ही तयार करू शकता. वाढदिवस, व्हेलेंटाईन डे, विविध प्रकारचे कॉलेज डे, कार्पोरेट फंक्शन्स अश्या विविध कारणांनी गिफ्ट देण्यासाठी ग्राहक याला पसंती देतील.

यातही अनुभव असा की चॉकलेट बास्केट गिफ्ट म्हणून देण्यात मध्यमवर्गीय अथवा उच्च वर्गीय समाज आहे. त्यामुळे तुम्ही बास्केट बनवत असाल तर त्या कुठे विकल्या जातील यासाठी काही योजना हवी. विशेषतः तुम्हाला दुकान उघडायचे असेल तर त्यातही हा विचार करायला हवा. कारण उद्योजक, व्यावसायिक, कार्पोरेट ग्राहक तुमच्या चॉकलेट विक्रीचा मोठा भाग बनू शकतात.

कारखाने, अन्य उद्योगव्यावसायिक बरेचदा त्यांच्या ग्राहकांना अथवा कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून चॉकलेट बास्केट देतात. कंपनी डे, एखाद्या कर्मचाऱ्याचे विशेष यश या निमित्ताने सुद्धा अशी खरेदी होत असते.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा

अतिशय उत्तम दर्जाचे चॉकलेट पहिल्याच प्रयत्नात बनेल असे नाही. हे कौशल्य प्रयोग आणि अनुभवातूनच आत्मसात करता येते. परफेक्ट चॉकलेट बनणे ही यशाची गुरुकिल्ली म्हणता येईल. चांगल्या दर्जाचा कच्चा माल आणि काळजीपूर्वक, अनेक अनुभवातून गेल्यावरच उत्तम दर्जाचे चॉकलेट बनू शकते. अशा चोकलेट साठी ग्राहक जास्त किंमत आनंदाने मोजतो.

सर्वसामान्य पद्धतीच्या चॉकलेट मधून जास्त पैसा मिळतो कारण ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात, छोट्या पॅकेट मधून विकली जातात. त्यामुळे त्यांना ग्राहक जास्त असतो. पण आपण अशी सर्वसामान्य चॉकलेट बनविणार का उच्च दर्जाची चॉकलेट बनविणार याचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे आपल्या उत्पादनाची किंमत ठरवावी लागते.

पॅकेजिंग सप्लाईज

तुमच्या चॉकलेट साठी पॅकेज मटेरियलची खरेदी चोखंदळपणे करायला हवी. कॅन्डी बॉक्सेस, बास्केट असे विविध प्रकार निवडताना कुठे काय, किती स्वस्त मिळते याची माहिती करून घ्यायला हवी तसेच कुठे काय सवलती आहेत यावरही लक्ष ठेवायला हवे. तुम्ही तुमचे उत्पादन कुठे सादर करणार त्यानुसार  नॉन पेरीशेबल पॅकिंग तुमच्या चॉकलेट प्रकारात असुदे. चॉकलेट बुके, बास्केट साठी आकर्षक रॅपिंग पेपर, स्टिक्स, ग्ल्यू, विविध प्रकारच्या रिबन्स, थर्मोकोल स्टीकर्स, फ्लोरल फोम यांचीही आवश्यकता आहे. हा खर्च साधारण ५ ते ८ हजाराचा घरात होतो.

गुंतवणूक आणि नफा

कंपौंड पद्धतीने घरीच चॉकलेट तयार करण्यासाठी फारशी गुंतवणूक आवश्यक नसली तरी ती ५० ते ७० हजाराच्या घरात जाते. व्यवसायाची सुरवात करताना थोडे भांडवल आणि प्राथमिक साहित्य यावर सुरवात करून नफा होऊ लागल्यावर नंतर व्यवसाय वाढविता येतो.

चॉकलेट थर्मामीटर, विविध आकाराचे साचे, भांडी, हिटिंग शीट्स, पॉटस, कंटेनर, बाऊल्स असा अन्य मिठाई बनविताना लागणारा संच येथे लागेलच. पण त्याचबरोबर आकर्षक पॅकेजिंग साठी साहित्य, ट्रीट रॅपर्स, फोर्ट बॉक्सेस, वॅक्स पेपर, कॅन्डी स्टिक, क्रश बॉटल हेही साहित्य तुम्ही चॉकलेट उत्पादनाची काय योजना आखली आहेत त्यानुसार लागेल.

फायदा किती

मोठ्या प्रमाणावर चॉकलेट बनविणाऱ्या कंपन्यांचे नफ्याचे मार्जिन साधारण ८ ते १० टक्के असते. पण बुटिक चॉकलेटीअर्स खूप नफा कमावतात.

२० किलो चॉकलेट बनविण्यासाठी येणारा अंदाजे खर्च खालीलप्रमाणे

चॉकलेट कंपौंड साठी साधारण ४ हजार रुपये

ड्राय फ्रुट साठी १ हजार रुपये.

पॅकेजिंग साठी साधारण ५०० रुपये

वीज आणि लेबर अंदाजे १ हजार रुपये

म्हणजे एकूण खर्च ६५०० रुपये. याचाच अर्थ प्रती किलो खर्च ३२५ रुपये.

ही चॉकलेट तुम्ही ठोक विक्रेते किंवा ई कॉमर्स स्टोर्स मधून किलोला ६५० ते १ हजार या दराने विकू शकता. तुम्ही जर दररोज ८ किलो चॉकलेट विकत असाल तर त्यातून तुम्ही महिन्याला १ ते दीड लाख रुपयांची कमाई करू शकता.

ई कॉमर्स स्टोर्स

ई कॉमर्स स्टोर्स मधून जास्त नफा मिळू शकतो.कारण या मध्ये तुम्ही ग्राहकांना कोणत्याही मध्यस्थी शिवाय विक्री करू शकतात  ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला गरज आहे एका व्हर्चुअल (आभासी) दुकानाची आणि यासाठी तुम्ही एकतर स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट सुरु करू शकता किंवा Shopify सारख्या खास ई-स्टोअर सुरु करण्यासाठी आवश्यक सर्व बाबी पुरविणाऱ्या जबरदस्त प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. जर तुम्ही एखादा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असाल तर आम्ही तुम्हाला Shopify चा वापर करा हे प्राधान्याने सुचवू. का ?

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा

शेअर करा
error: Alert: Content is protected !!