टिफिन बॉक्स व्यवसाय

भारतीय संस्कृती मध्ये महिलेला अन्नपूर्णादेवी मानले जाते. अन्नपूर्णा म्हणजे रुचकर अन्न रांधून सर्वांची भूक भागवून आत्मारामाची तृप्ती करणारी. कडाडून भूक लागली असताना स्वादिष्ट, रुचकर आणि आरोग्यदायी अन्न मिळणे ही खरोखरी भाग्याची गोष्ट. फक्त घरात रोजच असे अन्न सहजी मिळत असल्याने त्याचे महत्व कळत नाही. पण शिक्षण, नोकरी व्यवसाय निमित्ताने घराबाहेर राहावे लागणारे अश्या घरगुती अन्नासाठी आसुसलेले असतात. येथेच ज्या महिला किंवा पुरुष उत्तम अन्न रांधू शकतात त्यांना अश्या भुकेल्याची भूक भागविण्याचे पुण्य कमावता येते शिवाय पैशाची भरपूर कमाई होते ते वेगळे.

घरच्या घरी छोट्या प्रमाणावर काही व्यवसाय करण्याची इच्छा असलेले आणि स्वयंपाकात कुशल असलेल्या महिला टिफिन बॉक्सचा फायदेशीर व्यवसाय करण्याबाबत नक्की विचार करू शकतात. भारतीय संस्कृतीत स्वयंपाकघराला महत्वाचे स्थान आहे. अगदी छोट्या जागेत सुद्धा २५ -३० माणसांचा स्वयंपाक सहज होऊ शकतो. शिवाय भारतीय भोजनात पदार्थांचे वैविध्य भरपूर आहे. बाहेरच्या खाण्याची कितीही आवड असली तर रोज बाहेर जेवणारे लवकरच त्या अन्नाला कंटाळतात आणि मग शोध सुरु होतो घरगुती जेवण कुठे मिळू शकते याचा.

तुम्हाला स्वयंपाकाची मनापासून आवड आणि रोजचेच पदार्थ अधिक रुचकर बनविण्याची हातोटी असेल तर घरगुती जेवणाचे डबे पुरविण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी योग्य आहे. अर्थात असा व्यवसाय सुरु करायचा विचार करत असाल तर त्यासाठी थोडी पूर्वतयारी करावी लागते. ती कशी करायची आणि व्यवसाय कसा सुरु करायचा याची माहिती येथे घेऊ.

गुंतवणूक-

जेवणाचा डबा म्हटले की सर्वसाधारणपणे पोळी, भात, भाजी, कोशिंबीर, आमटी असाच मेनू असतो. व्यवसायाची सुरवात करताना ग्राहक कमी असणार हे नक्कीच. त्यामुळे घरातील भांडी वापरून सुद्धा व्यवसायाची सुरवात करता येते. फक्त डबे, बाटल्या अशा वस्तू खरेदी कराव्या लागतात आणि किराणा मालाची खरेदी गरजेनुसार करावी लागते. यासाठी खूप गुंतवणूक लागत नसली तरी गॅस, ग्राहक जास्त असल्यास मदतनीस ठेवावे लागतात त्याचे पगार द्यावे लागतात.

घरातील जागा पुरेशी नसेल तर भाड्याने जागा घ्यावी लागते त्याचे भाडे, लाईट बिल, व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी येणारा खर्च गृहीत धरावा लागतो.

बाजार आढावा-

आपण हा व्यवसाय सुरु करणार तसाच व्यवसाय आणखी किती जण करत आहेत, कुठे करत आहे, त्याच्या डब्यांचे दर काय, कोणते पदार्थ या दरात दिले जातात, आपण जेथे व्यवसाय सुरु करतोय तेथे ग्राहक किती मिळू शकतील, शाळा, हॉस्पिटल्स, छोट्या कंपन्या येथे कंत्राटे मिळू शकतील का, त्याची शक्यता किती याचा सविस्तर आढावा घेणे हे फार महत्वाचे आहे.

परवाने कोणते?

येथे तुम्ही जेवण पुरविणार आहात त्यामुळे अनेक परवाने आवश्यक ठरतात. अर्थात मोजके डबे देणारे अनेकजण परवाना न घेताही व्यवसाय सुरु करतात. तुमच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल किती आहे त्यानुसारही काही परवाने घ्यावे लागतात. व्यवसायाची उलाढाल वर्षाला १२ लाखापेक्षा अधिक असेल तर तर अन्य काही परवाने लागतात. आपण व्यवसाय सुरु करताना काही परवाने अगोदरच घेतले तर पुढची कटकट मिटू शकते आणि निर्धास्तपणे व्यवसाय करता येतो.

मुख्य परवाने म्हणजे अन्न सुरक्षा परवाना, महापालिकेचा आरोग्य विभाग परवाना, पोलीस विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र,, सोसायटी असेल तर सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र, अग्निशमन विभाग परवानगी अश्या प्राथमिक परवानग्या घेतलेल्या चांगले.

मार्केटिंग-

व्यवसाय सुरु करायचा म्हणजे त्याला ग्राहक हवेत. डबे देण्याच्या व्यवसायात जाहिरातीवर खूप खर्च करण्यापेक्षा ग्राहकांच्या प्रतिक्रिया अधिक उपयुक्त ठरतात. तरीही सुरवातीला जाहिरातीवर थोडा खर्च करणे योग्य ठरते. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म, व्हॉटस अप ग्रुप वर आपण देत असलेली सेवा, पदार्थांचे फोटो याची माहिती देता येते. परिचित, मित्र मैत्रिणी यांचीही मदत घेता येते.

आजकाल शहरात कोणतीही सेवा हवी असेल तर सर्वसामान्य नागरिक सुद्धा सर्वप्रथम गुगलवर त्याचा शोध घेतात असे दिसते. त्यामुळे तुम्ही सुद्धा व्यवसायाच्या सुरवातीला थोडा अधिक खर्च करण्यास तयार असाल तर इंटरनेट वर सुद्धा जाहिरात करू शकता.

आज भारताची अर्ध्याहून जास्त लोकसंख्या ही विविध डिजिटल माध्यमांवर सक्रिय आहे.कमी किंमतीत उपलब्ध असलेले स्मार्टफोन आणि त्याच्या जोडीला मिळणारी जलद इंटरनेट सुविधा यामुळे डिजिटल माध्यमे वापरणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे.यामुळेच इंटरनेट मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग खूप महत्वाचे झाले आहे

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

खर्चाचा एकूण आढावा असा घ्यावा

तुम्ही रोज दोन्ही वेळचे मिळून साधारण १०० डबे देणार असे मानले तर त्यासाठी येणारा खर्च लक्षात घेणे आवश्यक आहे. पोळी, भात, भाजी, आमटी, कोशिंबीर इतका मेनू असेल तर त्यासाठी लागणारे सामान, वापरावा लागणारा गॅस, दोन मदतनीस धरले तरी त्याचे पगार( साधारण महिना ६ ते ८ हजार), स्वच्छता खर्च, घरपोच डबे देणार असला तर त्यासाठी डिलीव्हरी बॉय लागतील त्यांचे पगार, सुरवातीचा जाहिरात खर्च, असे खर्च येतील. एका डब्यासाठी तुम्ही साधारण ७० ते ९० रुपये दर आकारणार असाल तर वरील सर्व खर्च वजा जाता तुम्हाला महिन्याला ५० ते ८० हजार इतकी कमाई होऊ शकते.

गुगलवर जाहिरात देण्यासाठी सुरवातीला खर्च येतो पण एकदा का चांगले रीव्हुज मिळाले की नंतर पुन्हा खर्च करण्याची गरज राहत नाही. अर्थात डब्याचे दर ठरविताना तुम्ही नक्की काय व्हरायटी देणार, मेनू मध्ये नाविन्य किती यानुसार जास्त दर लावू शकता. पण सुरवातीला तरी स्पर्धात्मक दर ठेवावे लागतात. एकदा ग्राहकाला तुमच्या जेवणाची चव आणि गुणवत्ता पटली की दर वाढला तरी ग्राहक तुटत नाही.

कुठे सेवा देणार याचाही विचार हवा-

डबे देण्याचा व्यवसाय करायचा हे ठरले तरी आपण कुणासाठी डबे बनविणार याचाही निर्णय घ्यायला हवा. विद्यार्थी, नोकरदार याना डबे द्यायचे, हॉस्पिटल साठी डबे द्यायचे, आजकाल बहुतेक शाळा मधून विद्यार्थ्यांना जेवण दिले जाते, तेथील कंत्राट मिळवायचे, छोट्या ऑफिसेस साठी डबे द्यायचे की घरात काम करू न शकणारा ज्येष्ठ नागरिक आज शहरात मोठ्या प्रमाणावर आहे आणि बरेच ठिकाणी जेवणाचे डबे मागविले जातात त्या वर्गाला डबे द्यायचे याचा विचार केला पाहिजे. कारण त्यानुसार तुमचे पदार्थ बदलावे लागतात. सुरवात करताना यातील एक दोन कॅटेगरी निवडून सुरवात करावी आणि चांगला जम बसला की मग सर्व कॅटेगरी साठी सुद्धा आपण डबे बनवू शकतो.

मेनू व्हरायटी-

डबा जेवण पुरविताना त्याच चवीचे आणि तेच तेच पदार्थ खाणे कुणालाही कंटाळवाणे होते हे लक्षात घेऊन आपला मेन्यू ठरवावा लागतो. यासाठी आठवडाभराचा मेनू अगोदरच निश्चित केला तर त्यात व्हरायटी आणता येते आणि आवश्यक सामानाची खरेदी अगोदर करून ठेवता येते. कोणत्याची परिस्थितीत जेवण चवदार असेल आणि चांगल्या क्वालिटीचे असेल यावर लक्ष दिलेच पाहिजे. अन्यथा चवीत तोच तोच पणा येत राहिला तर ग्राहक अन्यत्र जाण्याची शक्यता वाढते.

तुम्ही जेथे पदार्थ बनविता त्या जागेची स्वच्छता काटेखोर पणे केली गेली पाहिजे. जेवण आरोग्यपूर्ण असेल आणि त्यापासून ग्राहकांना कोणतीही बाधा होणार नाही यासाठी क्वालिटी बाबत अति काळजी घेतली गेली पाहिजे आणि ग्राहक सुद्धा त्याबाबतीत समाधानी राहिला पाहिजे.

आठवड्यातून एकदा सरप्राईज मेनू दिल्यास ग्राहक खुश होतो असा अनुभव या क्षेत्रातील व्यावसायिक सांगतात. कधीतरी एखादे पक्वान्न, कधीतरी जेवणाऐवजी पोटभरीची पावभाजी, कधी डाळ ढोकळी असे वेगळे पदार्थ, किंवा कोशिंबीर देण्याऐवजी कधी ढोकळा, भजी, कोथिंबीर वडी, अळू वडी असे छोटे बदल सुद्धा ग्राहक पसंत करतात.

स्पर्धा कुणाशी-

घरगुती डबे देणाऱ्या व्यावसायिकांना मुख्य स्पर्धा करावी लागते ती  रेस्टॉरंटस, फूड व्हेंडर्स, स्ट्रीट फूड आणि अन्य डबे व्यावसायिक यांच्याबरोबर. त्यामुळे विविध पदार्थ, स्वच्छता, उत्तम चव, रुची आणि स्वाद या बाबत नेहमीच सावध राहिले तर तुमचे ग्राहक अन्यत्र जाणार नाहीत.

घरगुती जेवणात तेल, मसाले यांचा वापर कमी केला पाहिजे अन्यथा पदार्थ जळजळीत होतात आणि रोजचे जळजळीत खाणे ग्राहकाला पोटाला मानवत नाही. त्याचबरोबर पदार्थ व्यवस्थित शिजलेले अथवा भाजलेले देणे, कृत्रिम रंगांचा वापर टाळणे, प्रिझर्वेटीव्हचा वापर शक्यतो न करणे अशी काळजी घेऊन ताजे पदार्थ देण्याकडे रोख ठेवणे सुद्धा फायद्याचे ठरते. कारण समाधानी ग्राहक हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे.

ही काळजी घ्या

समजा तुम्ही नेहमीच्या मेनू मध्ये काही नवीन पदार्थ सामील करणार आहात तर प्रथम तुमच्या ग्राहकांना सँम्पल टेस्टिंग साठी देऊन त्यांच्या प्रतिक्रिया घ्याव्यात. हे पदार्थ आवडले का, काही बदल हवा का याचाही आढावा घ्यावा. तुमच्या व्यवसायाला योग्य नाव देणे हेही गरजेचे आहे.

डबे देताना लंच बॉक्स तुम्हीच देणार असाल तर त्या आकर्षक स्वरुपात असतील याची काळजी घ्या. अन्न गरम ठेवणारे डबे थोडे महाग पडतात पण ही एकवेळची गुंतवणूक असते त्यामुळे हा खर्च करायला हरकत नाही. जेवण डब्यात भरताना योग्य प्रकारे सजवून देण्याची पद्धत ठेवावी. उदाहरण द्यायचे तर व्यवस्थित घडी घातलेली पोळी, भाजी कोशिंबीरच्या प्रकारानुसार ओले खोबरे, कोथिंबीर घालणे, लिंबाची फोड, छोट्या डब्यात लोणचे किंवा ओली चटणी असे दिले तर डबा उघडताच ग्राहकाचे समाधान होते.

फायदे तोटे-

अन्य सर्व व्यवसायाप्रमाणेच या व्यवसायाचे फायदे तोटे आहेत. तेही समजून घेतले पाहिजेत.

या व्यवसायात फायद्यांची संख्या जास्त आहे. एकतर नफ्याचे प्रमाण ग्राहक संख्येनुसार ठरले तरी ते किमान ४० टक्के असते. सेवा क्षेत्रातील हा उद्योग महत्वाचा असून गरजू ग्राहकांना अन्न पुरविणे यातील समाधान मोठे असते. ग्राहक आनंदी असेल तर हे समाधान अनेक पटीने वाढते.

सोशल नेटवर्किंग वाढते. समाजाच्या अनेक थरात आपली ओळख पोहोचते त्याचा परिणाम व्यवसाय वाढीवर होतो. सकाळ सायंकाळ असे दोन्ही वेळा डबे द्यायचे असतील तर सकाळचे काही तास आणि सायंकाळचे काही तास धावपळीचे, कामाच्या गर्दीचे असतात. पण तरीही दुपारचा वेळ मोकळा मिळू शकतो.

व्यवसायातील तोटे म्हणण्यापेक्षा आव्हाने म्हणणे येथे अधिक सयुक्तिक ठरेल. अशी आव्हाने म्हणजे मदतनीस किंवा नोकर सांभाळून ठेवावे लागतात. कोण कधी नोकरी सोडेल याचा अंदाज करता येत नाही. ऐनवेळी दुसरा मदतनीस लगेच मिळेल याची खात्री नसते त्यामुळे वेळ पडल्यास स्वतः उभे राहून काम पूर्ण करावे लागते आणि तेही नेहमीचा दर्जा राखून.

स्पर्धा खूप असल्याने दर स्पर्धात्मक ठेवावे लागतात. ग्राहक कायम राहावा यासाठी मासिक मेंबरशिप देण्याची पद्धत या व्यवसायात आहे. असे महिनाभराचे चार्जेस सब्सिडाइज्ड ठेवावे लागतात. त्यामुळे काही वेळा भाज्या महाग मिळाल्या, अचानक तेलाचे दर वाढले, धान्य महाग झाले तरी अगोदर ठरलेल्या दरानेच जेवण पुरवावे लागते त्यामुळे नफा कमी जास्त होऊ शकतो.

व्यवसायातील काही धोके-

हा व्यवसाय ग्राहकाच्या उदरभरणाशी संबंधित आहे आणि त्यामुळे ग्राहकाचे समाधान होणे फार महत्वाचे आहे. पदार्थ बिघडला, चव आवडली नाही या कारणाने सुद्धा ग्राहक अन्य पर्याय शोधतात याचे भान ठेवावे लागते.

स्पर्धात्मक दर ठरविताना तडजोड किती करायची याला काही मर्यादा येतात. तुम्ही उत्तम क्वालिटीचा माल वापरत असलात तर त्यासाठी अधिक पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे स्वस्त माल वापरून व्यवसाय करणारे तुमच्यापेक्षा स्वस्त दराने डबे देत असतील तरी तुम्हाला त्याची बरोबरी करणे शक्य नसते. त्यामुळे आपल्या दर्जाबद्दल ग्राहकचा विश्वास कायम राहील याची काळजी घ्यावी लागते.

सुधारणेला संधी ठेवा

आज शहरात शिक्षण, नोकरी, व्यवसाय वा अन्य अनेक कारणांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते आहे. विविध गावातूनच नाही तर परराज्यातून येणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. त्यामुळे डबे देताना ग्राहकाला काय आवडते, आपल्या जेवणाची चव त्याला आवडते का, त्यात काही बदल हवा का याची विचारणा वारंवार करायला हवी आणि शक्य असतील ते बदल नक्की करायला हवेत.

—————–

शेअर करा

Leave a Comment