इवेंट डेकोरेशन व्यवसाय

इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करण्याच्या व्यवसायाला आज प्रचंड मागणी आहे. साध्या साध्या, अगदी घरगुती कार्यक्रमासाठी सुद्धा आज काल इव्हेंट मॅनेज करण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिकांना बोलावले जाते. एक तर वेळेची कमतरता शिवाय कार्यक्रम तयारीसाठी द्यावा लागणारा वेळ, अनेकदा जागेची अडचण असल्यास हॉल बुकिंग पासून करावी लागणारी तयारी हे सारे व्याप इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिकांवर सोपविणे अनेक अर्थानी सोयीचे ठरते असा अनुभव येतो व त्यामुळेच या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे. अर्थात या व्यवसायात पैसे भरपूर मिळतात हे खरे असले तरी कामाचा प्रचंड ताण असतो त्यामुळे हा व्यवसाय तसा दगदगीचा आहे. त्यासाठी खूप प्लॅनिंग व नियंत्रण क्षमता आवश्यक आहे.

तुम्हाला सुद्धा या क्षेत्रात काही व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे आणि शक्यतो घरच्या घरी तो मॅनेज करता येत असेल तर अधिक योग्य ठरणार आहे तर तुम्ही तो नक्की करू शकता. फक्त सुरवात करताना संपूर्ण इव्हेंट मॅनेजमेंट घेण्यापेक्षा त्यातील एखाद्या कॅटेगरी पासून करावी.

उदाहरण द्यायचे तर तुम्हाला डेकोरेशन मध्ये रुची आहे, त्यात चांगले कौशल्य आहे तर तुम्ही इव्हेंट डेकोरेशन हा एकच भाग करू शकता. घरबसल्या सुद्धा हा व्यवसाय करता येतो. या व्यवसायात संधी किती, व्यवसायाचा आराखडा कसा करायचा, गुंतवणूक किती, व्यवस्थापन कसे करायचे आणि व्यवसायाचे मार्केटिंग कसे करायचे याची माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे.

हे आहेत पर्याय-

हा व्यवसाय सुरु करण्याचा तुमचा विचार असेल तर त्यासाठी दोन पर्याय आहेत. एक पर्याय आहे तो इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायात असलेल्या लोकांशी भागीदारी करायची आणि दुसरा पर्याय म्हणजे स्वतःच स्पेशलायझेशन डेकोरेशन करायचे. दुसरा पर्याय या साठी आहे की सरसकट सर्व पार्टीज किंवा फंक्शन मध्ये इव्हेंट मॅनेजमेंट मॅनेजरवर ग्राहक अवलंबून नसतो. ग्राहक स्वतःच कार्यक्रम योजना आखतो व सहकार्य समन्वय साधून कार्यक्रम पार पाडतो. अश्यावेळी तुम्ही थेट डेकोरेशन पार्टनर म्हणून काम करू शकता.

सर्वात महत्वाचे म्हणजे या व्यवसायात उत्पादन नसते तर हा व्यवसाय सेवा व्यवसाय म्हणून ओळखला जात असल्याने ग्राहकाला दाखविण्यासारखे तुमच्या हाताशी काही उत्पादन नाही. त्यामुळे तुम्ही डेकोरेटर म्हणून केलेली कामे, ग्राहकांकडून तुम्हाला मिळालेल्या प्रतिक्रिया, तुम्ही केलेल्या कामांची संख्या हेच तुमचे मुख्य भांडवल असते. तुमच्या सेवेचा दर्जा उत्तम असेल तर तुम्हाला सर्वत्र संधी आहेत. विवाह, वाढदिवस, बारसे, डोहाळजेवण, साखरपुडा, कार्पोरेट समारंभ, विशेष सभा, सार्वजनिक कार्यक्रम अशी अनेक कामे तुम्ही मिळवू शकता.

योजना हवी-

इव्हेंट डेकोरेशन हा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय तुम्ही घेतला असेल तर तो सुरु करण्यापूर्वी या व्यवसायाची संपूर्ण आणि सखोल माहिती तुम्ही मिळवायला हवी. कारण त्यावरच तुम्ही या व्यवसायातून किती आणि कशी कमाई करू शकणार हे ठरते. व्यवसाय पूर्ण वेळ करायचा की पार्ट टाईम याचाही निर्णय अगोदर घ्यायला हवा. त्यानुसार या व्यवसायासाठी आवश्यक साहित्य खरेदीचा निर्णय घेता येतो. लागणारे साहित्य भाड्याने आणणार की विकत घेणार यावर तुम्हाला व्यवसायात किती पैसे गुंतवावे लागतील ते ठरते. अर्थात जम बसेपर्यंत डेकोरेशन साहित्य खरेदी करू नये. त्या ऐवजी ऑर्डर आली की गरजेनुसार मटेरियल सप्लायर कडून सामान आणणे सोयीचे असते. यामुळे तुमचा पैसा गुंतून पडत नाही.

जागेची गरज

डेकोरेशन साहित्य भाड्याने आणले गेले तर हे सामान सांभाळून ठेवण्यासाठी जागा लागत नाही शिवाय सामान देखभालीचा व्याप कमी होतो. यामुळे व्यवसायासाठी कमी जागा पुरते. व्यवसायाचे स्वरूप पाहून अगदी मध्यम आकाराचे ऑफिस पुरते. ऑफिस मधील रिसेप्शन काउंटर योग्य प्रकारे आखले गेले असेल तर त्यातूनही ग्राहकाला तुमच्याबद्दल विश्वास वाटू शकतो. व्यवसाय थोडा वाढला की काही ठराविक डेकोरेशन साहित्य विकत घेऊन गोडावून मध्ये साठविता येते. गोडावून भाड्याने घेणे शक्य असते आणि ते कुठे आहे याला महत्व कमी असल्याने जरा बऱ्या ठिकाणी गोडावून घेऊन खर्च कमी करता येतो.

लेबर-

या व्यवसायात लेबर म्हणजे कामगार वर्ग ही मोठी गरज आहे. तुमच्याकडे कमी मजूर असतील तर डेकोरेशनचे काम व्यवस्थित आणि क्लासिक करणे काही वेळा अवघड ठरू शकते. विशेषतः मोठे कॉन्ट्रक्ट असेल तेव्हा ही अडचण होऊ शकते. आपले काम ठराविक वेळेत पूर्ण करण्यासाठी थोडे जास्त लेबर असणे या व्यवसायासाठी महत्वाचे आहे. यामुळे व्यवसाय वाढीला हातभार लागतो. कामगार नेमताना कुशल आणि अकुशल असे दोन्ही प्रकार हवेत. शिवाय हिशोब, प्लॅनिंग, व्यवस्थापन यातील कुशल माणसेही हवीत. तुमची थोडी अधिक गुंतवणूक करण्याची तयारी असेल आणि शक्य असेल तर एखादा डिझायनर सुद्धा नेमावा. यामुळे लेटेस्ट ट्रेंड लगेच समजतात आणि त्यानुसार आपल्या कामाची व्हरायटी वाढविता येते.

साहित्य –

आपल्याला मिळालेली ऑर्डर यशस्वी पणे पूर्ण करायची असेल तर कामात कोणतेही अडथळे येऊन चालणार नाही. त्यामुळे आपल्या कामासाठी जे साहित्य लागणार आहे ते हाताशी तयार हवे. अगदी छोट्या छोट्या वस्तू जवळपासच्या दुकानातून विकत आणता येतात पण महाग वस्तूही लागतात त्या भाड्याने आणायच्या की आपल्या संग्रही ठेवायच्या याचा निर्णय घेतलेला असेल तर ते सोयीचे जाते. महाग वस्तू भाड्याने आणल्या तर गुंतवणूक कमी करावी लागते. यातही आपण कोणत्या वस्तू वारंवार वापरतो याची वेगळी यादी केलेली असेल तर त्या विकत घ्यायच्या की भाड्याने आणत राहायचे हे ठरविता येते.

बेसिक साहित्य म्हणजे शिड्या, पिना, पडदे, लाईट्स, सेटिंग साठीची हत्यारे कोणत्याही डेकोरेशन साठी आवश्यक असतात. पण याशिवाय ग्राहकाने काय ऑर्डर दिली आहे त्यानुसार काही वेगळे साहित्य सुद्धा लागते.

डेकोरेशन साहित्याची देखभाल-

डेकोरेशन साठी जे साहित्य वापरले जाणार त्याची योग्य देखभाल केली गेलेली असली पाहीजे. तुम्ही हे साहित्य किती वेळा वापरले हा प्रश्न नसतो तर दरवेळी हे सहित्य जुनाट न वाटता नवे वाटले पाहिजे. त्यातून तुमच्या कामाचा दर्जा, गुणवत्ता राखणे शक्य होत असते. त्यामुळे साहित्य देखभालीसाठी थोडा खर्च करायची तयारी हवी. जे साहित्य बरेच वेळा वापरले गेले आहे आणि थोडे खराब वाटते आहे त्याची ताबडतोब विल्हेवाट लावणेही गरजेचे असते. त्यामुळे देखभालीचा खर्च वाचतो आणि खर्चात बचत होते.

कामाच्या रेटची आकारणी-

सेवा क्षेत्रातील व्यवसायात ग्राहकाला रेट कसे लावायचे हा थोडा क्रिटीकल भाग आहे. तुमच्या व्यवसायाचा जीव त्यावरच अवलंबून असतो. त्यामुळे निदान सुरवातीला ग्राहकाचे समाधान होईल याची काळजी घेऊन रेट सांगायला हवेत. एकदा तुमचे नाव झाले की मग तुम्ही जादा रेट सांगितला तरी तुम्ही आकारत असलेले दरच तुमच्या सेवेच्या गुणवत्तेबद्दल बोलतील. रेट आकारताना ठराविक किंमत नसावी तर त्यात व्यवसाय प्रसिद्धी खर्चाचाही समावेश केलेला असावा. प्रमोशनल रेट म्हणून काही डिस्काऊंट, ऑफर्स देता येतात.

ऑर्डर आल्यावर ही काळजी घ्यायला हवी-

तुम्ही व्यवसाय सुरु केला आणि ग्राहकाकडून तुम्हाला कामाची ऑर्डर यायला लागली की काही गोष्टींची काळजी आवर्जून घ्यायला हवी. कारण सेवा उद्योगासाठी हे फार महत्वाचे आहे. ऑर्डर पूर्ण करताना काही त्रुटी राहिल्या आणि ग्राहक नाराज झाला तर तुमची वाईट प्रसिद्धी लगोलग होते आणि आपण ग्राहकाचा गमावलेला हा विश्वास पुन्हा कमावणे अवघड होते. शिवाय व्यवसायाची गाडी रुळावरून घसरण्याचा धोका राहतो ते वेगळे.

  • समारंभाचे जे ठिकाण आणि वेळ आहे त्याची नोंद तुमच्या डायरीत हवी. त्यानुसार डेकोरेशन करायला किती वेळ लागणार त्यानुसार अगोदरच डेकोरेशनची सुरवात करता येते. त्यानुसार प्लॅनिंग करता येते.
  • डेकोरेशन साठी लागणारया काही वस्तू तुमच्याकडे नाहीत पण त्या लागणार आहेत त्या खरेदी कराव्या लागतात. एखाद्या ग्राहकाने अगदी युनिक डेकोरेशन सांगितले असेल तर त्यासाठी खरेदी करावी लागते. उदाहरण द्यायचे तर बहुतेक डेकोरेशन मध्ये कृत्रिम फुले वापरली जातात पण एखाद्याने ताजी व त्यातही काही विशेष प्रकारची फुले सांगितली असतील तर त्याची खरेदी करावी लागते. फुलांची खरेदी अगोदर पासून करता येत नाही कारण ती ताजी राहायला हवीत यामुळे ऐनवेळी खरेदी करावी लागतात.
  • काम सुरु करण्यापुर्वी सर्व तयारी जय्यत हवी. म्हणजे साहित्य, कर्मचारी वर्ग वेळेवर हजर असेल याची काळजी घ्यावी लागते.

प्रसिद्धी साठी सोशल मिडिया-

तुम्हाला व्यवसायात जलद प्रगती करायची असेल तर तुमची उपस्थिती मोठ्या संख्यने ग्राहकांच्या नजरेत भरायला हवी. यासाठी सोशल मिडिया हे उत्तम माध्यम आहे. अनेक ग्राहक विविध सेवांसाठी सोशल मीडियावर अवलंबून असतात. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमचे स्थान निर्माण करायला हवे.

त्यासाठी जेथे जेथे तुम्ही सेवा दिली आहे तेथील डेकोरेशनचे फोटो अपलोड करणे, माहिती देणे, डेकोरेशन साठी येणाऱ्या खर्चाची कल्पना देणे आवश्यक आहे. त्यातून ग्राहक त्याला अनुरूप निवड करू शकतो. सोशल मीडियावर सुद्धा नक्की कुठे, कुणाशी संवाद साधायचा याचा योग्य निर्णय घ्यावा लागतो. उदाहरण द्यायचे तर तुम्ही हॉस्पिटल व्यवस्थापनाशी संवाद साधून उपयोग नसतो कारण तेथे डेकोरेशनची गरजच नसते.

तंत्रज्ञान वापर-

आपला व्यवसायात जम बसू लागला की तो पुढच्या पायरीवर नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेणे उपयोगी ठरते. त्यामुळे विविध टार्गेट पर्यंत पोहोचणे शक्य होते. एखादे अॅप डेवलप केले तर ग्राहक तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकतात. या अॅपच्या मदतीने तुम्ही कोणत्या प्रकारची सेवा देता, तुमची ओळख, तुम्ही केलेल्या कामाचे काही व्हिडीओ ग्राहकांना पाहायला मिळू शकतात.

क्रिएटीव्ह रहा-

इवेंट डेकोरेशन या व्यवसायाचा क्रिएटीव्हीटी म्हणजे सर्जनशीलता हा पाया आहे. तुमची सर्जनशीलता प्रत्येक कामात दिसली पाहिजे. या क्षेत्रातील तुमच्या स्पर्धकाची स्टाईल, लेटेस्ट ट्रेंड यावर बारीक नजर हवी. सर्वात महत्वाचे म्हणजे कल्पनांना बंधन नको.

ग्राहकाची आवड ऐकून घेणे हे महत्वाचे आहेच आणि ग्राहकाचे समाधान हे मुख्य ध्येय असले पाहिजे. डेकोरेशन करताना तुम्ही त्यात काही वेगळेपणा आणणार असला तरी ग्राहकाला ते आवडेल, ग्राहक खुश राहील याची काळजी घ्यायला हवी. येथे परफेक्शन सर्वात महत्वाचे आहे. ग्राहकाच्या अपेक्षेपेक्षा थोडे अधिक त्याला देता यावे यासाठी प्रयत्न केले तर तुमचे चांगले नाव होऊ शकते.

व्यवसायाचे परफेक्ट म्हणजे काटेखोर नियोजन केले असेल तर खर्चात बचत करून सुद्धा उत्तम सेवा देणे शक्य आहे हे लक्षात घ्यायला हवे.

दिलेले काम वेळेत पूर्ण न करणे म्हणजे कामाला उशीर करणे हे व्यवसायासाठी अत्यंत मारक ठरते. त्यामुळे कामाकडे बिलकुल दुर्लक्ष होऊ देता कामा नये.

अशी काही पथ्ये पाळली तर हा व्यवसाय तुम्हाला चांगली कमाई करून देतो.

शेअर करा

Leave a Comment

error: Alert: Content is protected !!