मिनी दाळ मिल

 भारतातल्या गरीब लोकांना स्वस्तात प्रथिनांचा पुरवठा करण्याची क्षमता असलेले पीक म्हणून दाळीकडे पाहिले जाते. अगदीच दारिद्य्र रेषेच्या खालचे जीवन जगणारा माणूस त्या रेषेच्या वर आला की आधी डाळींची मागणी करायला लागतो. म्हणूनच भारतात डाळींची मागणी सतत वाढत आहे. विशेष म्हणजे भारताच्या सगळ्या राज्यांत, शाकाहारी आणि मांसाहारी लोकही डाळींचे सेवन करीत असतात. त्यातल्या त्यात शाकाहारात डाळ जास्त वापरली जाते. भारतात  अगदीच गरीब लोक डाळींचे सेवन फारसे करीत नाहीत पण त्यांचा डाळींचा वापर जसजसे जीवनमान सुधारत आहे तसतसा वाढत जाणार आहे. 

भारतात गहू आणि तांदूळ ही दोन पिके घेतली जातात आणि याच पिकांवर प्रक्रिया करण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत पण त्यांच्या खालोखाल डाळींच्या उत्पादनाचाच क्रमांक लागतो.  मध्य प्रदेशात डाळींचा व्यवसाय सर्वात मोठा आहे. देशातल्या एकूण डाळींपैकी २३ टक्के डाळी एकट्या मध्य प्रदेशात तयार होतात. त्या पाठोपाठ महाराष्ट्र आणि राजस्थानात हा उद्योग मोठा आहे. हा उद्योग अगदी लहान प्रमाणावरही करता येतो आणि कोट्यवधी रुपये गुंतवून मोठ्या प्रमाणावरही करता येतो मात्र आपण शेतकर्‍यांना जोड धंदा म्हणून तो कसा करता येईल याचा विचार करणार आहोत.

शेतकरी तुरी पिकवतो. ती तूर बाजारात ५० ते ५५ रुपये किलो भावाने विकली जाते. ती मोठ्या प्रमाणावर खरेदी करणारे कारखानदार तिच्यावर प्रक्रिया करून तयार होणारी डाळ १०० ते १२५ रुपये किलो दराने विकतात. म्हणजे शेतकर्‍यांच्या डाळीत भरमसाठ मूल्यवृद्धी होते आणि ती त्या कारखानदाराच्या पदरात पडते. त्याऐवजी शेतकर्‍यांनी स्वत:च्या तुरीवर प्रक्रिया करून स्वत:च डाळ तयार केली तर तिच्या मुळे होणारी मूल्यवाढ शेतकर्‍याच्या पदरात पडेल. ही गोष्ट सगळ्याच शेतीमालाला लागू आहे. पण त्यातल्या त्यात डाळी तयार करण्याचा धंदा शेतकरी सहज करू शकतात. कारण हा धंदा लहान प्रमाणावरही करता येतो. 

शेतकर्‍यांना आपल्या शेतावर बसवता येईल एवढी लहान म्हणजे मिनी दाळ मिल त्याला स्वत:च्या शेतातल्या कडधान्यांवर प्रक्रिया करायलाही चांगली आहेच पण तिच्या साह्याने तो आपल्या गावातल्या इतर शेतकर्‍यांनाही त्यांच्या कडधान्यांच्या दाळी तयार करून देऊ शकतो. अकोल्याच्या  डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने विविध आकाराच्या आणि क्षमतेच्या मिनी डाळ मिल विकसित केल्या आहेत. तिथे संपर्क साधून आपण त्यांची माहिती तर मिळवू शकतोच पण तिथून मिनी डाळ मिल विकत घेणारांना ती तयार करण्याचे प्रशिक्षणही विद्यापीठात दिले जाते.

डाळी तयार करण्याची रीत

डाळ तयार करण्याची रीत साधारणत: सारखीच आहे पण त्यांच्या स्वरूपावरून त्या पद्धतीत काहीसे बदल आहेत. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात स्वत:च्या शेतातल्या कडधान्यांवर घरीच प्रक्रिया करून त्यापासून तयार केलेल्या डाळी घरात वापरल्या जात असत. त्यामुळे परंपरेने आपल्याला डाळी तयार करण्याची रीत माहीत आहे. 

आधी कडधान्य भिजवले जाते आणि ते वाळवले जाते. या प्रक्रियेत त्याची साल सैल सुटते आणि ती भरडून सहजतेने काढून टाकता येते. भरडतानाच अख्ख्या कडधान्याचे दोन भाग करून  त्यापासून खाण्या योग्य डाळ तयार होते. या प्रक्रियेत खाली पडणारा भुस्सा, डाळीचा चुरा आणि फोलपटे ही जनावरांना  खायला दिली जातात. ज्यांच्याकडे जनावरे नसतील किंवा त्यांना खायला घालूनही हा चाराचुरा (कळणा) उरत असेल ते तो विकू शकतात. ही डाळ तयार करण्याची रीत झाली खरी पण आपण घरात या रितीने जी डाळ तयार करतो तिच्यात काही प्रमाणात कडधान्याच्या टरफलाचा थोडासा अंश राहू शकतो. 

आधुनिक पद्धतीच्या यांत्रिकी डाळ मिलमध्ये ही टरफले अजिबात रहात नाहीत. राहू दिली जात नाहीत. ग्रामीण भागात घरीच तयार होणारी डाळ ही दिसायला चमकदार असलीच पाहिजे असे काही नाही. मात्र जी डाळ विकायला बाजारात आणायची असते ती स्वच्छ आणि चमकदार असावी लागते. म्हणजे उद्योग म्हणून डाळ तयार करायची असेल तर डाळीला पॉलीश करणे गरजेचे असते. खरे तर अशा पॉलीश केलेल्या डाळीतून अनेक जीवनसत्त्वे निघून जातात पण लोक त्या चमकदारपणालाच महत्त्व देतात. म्हणून डाळ मिलमध्ये पॉलीश करावे लागते आणि त्यासाठी गोडेतेल वापरावे लागते. 

१०० किलो कडधान्यापासून कमीत कमी ८५ किलो आणि जास्तीत जास्त ९० किलो डाळ तयार होते. हे प्रमाण डाळ तयार करणार्‍यांचे कौशल्य आणि कडधान्याचा दर्जा यावर अवलंबून असते. मात्र शेतकरी जी तूर ५० रुपयांना विकतो त्या तुरीची ९० किलो म्हणजे ९० रुपयांची डाळ तयार होते. म्हणजे शेतकर्‍यांनी कडधान्य विकण्याऐवजी डाळ तयार करून विकली तर पोत्यामागे ४ हजार रुपये जास्त मिळतात. गावागावात सुशिक्षित बेकारांनी मिनी डाळ मिल टाकल्या तर त्यांवर एक पोते तूर प्रक्रिया करण्यास २०० रुपये करणावळ घेतली जाते. म्हणजे ती खर्चात धरली तर पोत्यामागे तीन हजार रुपयांचे मूल्यवर्धन शेतकर्‍यांच्या पदरात पडते. 

साधारण दोन लाख रुपये गुंतवणुकीच्या मिनी डाळ मिलमध्ये दररोज सहा पोते डाळ तयार होते. म्हणजे साधारणत: हजार ते बाराशे रुपयांचे उत्पन्न त्या डाळ मिलवाल्या सुशिक्षित बेकाराला मिळू शकते. मात्र मजुरी घेऊन दुसर्‍यांना डाळी तयार करून देण्याच्या ऐवजी त्याने स्वत:च स्थानिक बाजारपेठेत कडधान्य खरेदी करून डाळ तयार करून ती स्वत: विकली तर म्हणजे डाळ मिल म्हणून त्याने ती चालवली तर त्याला महिन्याला लाख ते दीड लाखाचा नक्त नफा होऊ शकतो. 

शेतकर्‍यांच्या मालावर प्रक्रिया करणारे श्रीमंत होतात पण शेतकरी आपला कच्चा माल विकून आहे तिथेच रहातो. मात्र शेतकर्‍यांनी जमेल तशा मिनी डाळ मिल टाकल्या तर गावातल्या कच्च्या  मालावर गावातच प्रक्रिया होईल आणि शेतकर्‍यांची एक प्रकारच्या शोषणातून मुक्ती होईल. शिवाय कोणाही शेतकर्‍याला अशी मिनी डाळ मिल आपल्या शेतावर बसवता येते आणि शेती बघत बघत डाळ मिलही चालवता येते. म्हणजे हा एक चांगला जोडधंदा होईल. अशा प्रकारे तयार केलेली विविध प्रकारची डाळ किरकोळीने विक्री करण्याचे सर्वात चांगले ठिकाण म्हणजे आठवड्याचे बाजार. अन्य मोठ्या बाजारात डाळींचे भाव काय आहेत हे पाहून त्यापेक्षा चार दोन  रुपये कमी दराने अशी डाळ विक्री स्वत:च केल्यास शेतकर्‍याच्या पदरात कडधान्याचे चांगले पैसे पडतील.  

शेअर करा
error: Alert: Content is protected !!