घरी मेणबत्ती बनविण्याचा फायदेशीर व्यवसाय

काही तरी नवीन उद्योग करायचा विचार आहे किंवा घरबसल्या काहीतरी व्यवसाय सुरु करावा असे वाटत असेल तर बाजारात चांगली मागणी असलेल्या मेणबत्या, ते ही घरच्या घरी आणि फार भांडवल न गुंतवता करण्याचा व्यवसाय तुम्ही नक्की विचारात घेऊ शकता. मेणबत्त्या हे उत्पादन नेहमी मागणी असलेले व्यावहारिक उत्पादन म्हणता येतील. यात सुद्धा तुम्ही किती कौशल्य प्राप्त करू शकता आणि खास तुमचा ठसा असलेल्या विविध प्रकारच्या, आकर्षक मेणबत्त्या बनवू शकता त्यावर तुम्ही किती कमाई या व्यवसायातून करू शकाल याचे प्रमाण ठरणार आहे.

अर्थात कमाईचे हे प्रमाण केवळ तुमच्या मेणबत्त्या आकर्षक आहेत म्हणून ठरणार नाही तर त्यांचे मार्केटिंग योग्य प्रकारे करणे हाही महत्वाचा भाग आहेच. आज बाजारात अक्षरशः शेकडो प्रकारच्या मेणबत्त्या उपलब्ध आहेत. पारंपारिक मेणबत्त्या आहेत त्याचप्रमाणे डेकोरेटीव्ह म्हणजे सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या, अरोमा थेरपी मध्ये वापरल्या जाणाऱ्या, गिफ्ट देण्यासाठीचे विविध प्रकार सुद्धा बाजारात चांगले खपत आहेत. ज्यांना मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे, ते यातील अनेक प्रकार सहज बनवू शकतात. नवशिके व्यावसायिक सुद्धा हे कौशल्य सहज मिळवू शकतात.

मेणबत्त्या अनेक प्रकारच्या आहेत आणि बाजारात त्या हातोहात खपतात. आज पण विशेष प्रकारची मेणबत्ती कशी बनविली जाते याची माहिती येथे घेणार आहोत. सोया मेणबत्ती या नावाने ती बाजारात मिळते. नावावरून सहज समजते की ही मेणबत्ती सोयाबीन पासून बनविली जाते.

घरी बनविलेल्या मेणबत्त्या का?

मेणबत्ती ही बहुतेक सर्वाना गरजेची असलेली आणि लोकप्रिय वस्तू आहे. घरी खास आकार देऊन बनविलेल्या विविध प्रकारच्या मेणबत्त्या या घर सजावटीचा एक प्रमुख भाग बनल्या आहेत. कदाचित विश्वास बसणार नाही पण अनेक अहवाल असे सांगतात की २०२० मध्ये हा उद्योग ६६४ अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठेल.

घर सजावट उद्योगात मेणबत्ती प्राथमिक श्रेणीमध्ये समाविष्ट आहेतच पण ग्राहकांकडून सुद्धा मेणबत्ती प्रकारात अधिक रस दाखविला जात असल्याचे दिसून येत आहे. यात अनेक नवीन ट्रेंड दिसतात. मनप्रसन्न करणाऱ्या सुवासिक मेणबत्तीने घर भरून जावे यासाठी, अरोमा थेरपी साठी जशी मेणबत्त्यांना मागणी आहे तसेच खरेदीची आवड असणाऱ्याना खरेदीसाठी प्रोत्साहित करणारा हा ‘हॉट डेकोर आयटम’ बनला आहे हेही सत्य आहे.

यामुळेही घरी काही व्यवसाय करू इच्छिणारे मेणबत्ती व्यवसाय नक्कीच विचारात घेऊ शकतात, गुगल ट्रेंड्स पाहिले तर असे दिसून येते की घरी मेणबत्ती कशी तयार करावी यावर मोठ्या प्रमाणात आणि सतत सर्च केला जात आहे. जगभरात मेणबत्तीचा वापर अनेक कारणांनी केला जात आहे. पण जगभरातील गुगल ट्रेंडचा विचार केला तर घरगुती मेणबत्त्या कश्या तयार करायच्या याचा सर्वाधिक सर्च उत्तर अमेरिका, पश्चिम युरोप मध्ये होत आहे. याचा उपयोग मेणबत्ती व्यवसाय करणाऱ्यांना बाजापेठ कुठे आहे हे समजण्यासाठी करून घेता येतो.

गुगल ट्रेंडवर विविध प्रकारच्या मेणबत्त्यांविषयी विपुल प्रमाणात माहिती मिळते. त्यात सोया मेणबत्ती पासून ते सुगंधित मेणबत्त्या अशी मोठी व्हरायटी सामील आहे. यात ग्राहकचा मोठ्या प्रमाणावर इंटरेस्ट आहे हे सहज लक्षात येते. नवउद्योजक जेव्हा अश्या प्रकारची उत्पादने बनविण्याचा निर्णय घेतो तेव्हा हे ज्ञान त्याला उपयोगी पडते.

घरात मेणबत्त्या का बनवायच्या याची अनेक कारणे देता येतात.

  • खर्च कमी- मेणबत्ती बनविण्यासाठी येणारा खर्च कमी आहे हे कुणीही मान्य करेल. पण घरगुती पद्धतीने बनविलेल्या काही विशेष मेणबत्त्या अन्य साध्या मेणबत्त्यांच्या तुलनेत महाग पडतात. अर्थात असे असले तरी घरीच हा व्यवसाय करू इच्छिणारे स्वतः थोडे पैसे गुंतवून शहाणपणाने हा व्यवसाय सुरु करू शकतात.
  • मेणबत्ती हे हातोहात खपणारे उत्पादन आहे. त्यामुळे तुम्ही वैयक्तिक पातळीवर, स्थानिक बाजारात, शिवाय ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा मेणबत्त्या विकू शकता.
  • तुम्हाला मेणबत्तीची अनेक डिझाईन अगोदरपासून अवगत असली किंवा तुम्ही नवशिके असलात तरीही दोन्हीसाठी मेणबत्ती बनविण्याची बेसिक पद्धत सारखीच आहे हे लक्षात घेतले पाहिजे. मेणबत्ती बनविणे सहज सोपे आणि त्याचा प्राथमिक फॉर्म्युला साधा आहे.
  • मेणबत्त्या अनेक प्रकारच्या बनविता येतात हा यातला मुख्य फायदा. यामुळे ग्राहकांच्या आवडी, गरजा जाणून घेतल्या तर त्याच्यासाठी कस्टमाइज मेणबत्त्या तुम्ही घरी बनवू शकता. त्याला वैयक्तिक टच देऊन तुम्ही तुमचे उत्पादन अन्य स्पर्धकांपेक्षा वेगळ्याच प्रकारे पेश करू शकता. स्वतःचा खास टच देऊन मेणबत्त्या तयार करणे हे कौशल्याचे काम असले तरी त्याचा वापर करून तुम्ही कमाईचा प्रवाह सतत वाहता ठेऊ शकता.

यासाठी मेणबत्ती बनविणे, त्याला खास टच देणे, ग्राहकांना कोणते प्रकार अधिक पसंत पडतात, कोणते प्रकार अधिक लोकप्रिय आहेत याचा आढावा घेणे फायद्याचे होते. मेणबत्त्यांचे प्रकार असंख्य आहेत आणि हाच या व्यवसायाचा मोठा फायदा आहे. तुमच्या व्यवसायासाठी अनुकूल मेणबत्त्या कुठल्या आणि त्या कशा बनवायच्या याचे शिक्षण त्यासाठी घ्यायला हवे. ग्राहकांना आकर्षून घेण्यात एखादा खास प्रकार कारणीभूत ठरतो हे समजून घेऊन आपण कशापासून सुरवात करायची, कुठे करायची याचा निर्णय घेण्यापूर्वी काही टॉप प्रकार आधी शोधा. त्यावरून तुम्ही तुमची व्यवसाय योजना तयार करू शकता. मेणबत्त्यांचे काही प्रकार खाली दिले आहेत.

सोया मेणबत्ती (सोया कॅन्डल)

आज बाजारात सोया कॅन्डलचा खप चांगला आहेच पण या मेणबत्त्या लोकप्रिय आहेत. सोया मेणापासून या मेणबत्त्या बनविल्या जातात म्हणजे त्या वनस्पतीज मेणापासून बनतात. त्यामुळे त्या नैसर्गिक मानल्या जातात. त्या त्यामुळे नेहमीचे तेल आणि पॅराफिन पेक्षा वेगळ्या ठरतात. रेन्यूएबल पदार्थापासून बनलेल्या शिवाय दीर्घकाळ तेवणाऱ्या आणि स्वच्छ प्रकाश देणाऱ्या ही त्यांची आणखी काही वैशिष्ठे.

या मेणबत्त्या जास्त काळ तेवतात यामुळे ग्राहक त्यासाठी जास्त किंमत मोजण्यास तयार होतो. म्हणजे नेहमीची मेणबत्ती समजा १५-२० मिनिटात पूर्ण जळत असेल तर या मेणबत्त्या तास दोन तास जळू शकतात.

सुवासिक अरोमा थेरपी मेणबत्ती

सुवासिक मेणबत्ती हा सर्वसामान्य प्रकार आहे. अरोमा थेरपी मेणबत्त्या अनेक प्रकारच्या आहेत. त्या अनेक प्रकारच्या सुगंधात येतात. काही ग्राहकांना घरात प्रसन्न करणारा सुवास दरवळावा अशी अपेक्षा असते ते अश्या मेणबत्त्या घेतातच पण अनेकदा घरात रेंगाळणारे नकोसे वास दूर करण्यासाठी सुद्धा सुगंधी मेणबत्ती लावली जाते. सुगंधी मेणबत्ती प्रकारात डझनावारी विविध सुवासाच्या मेणबत्त्या मिळतात. त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीचा सुगंध त्याला सहज मिळू शकतो.

अरोमा थेरपी मेणबत्ती मात्र काही ठराविक फायदे देते. विशेषतः यात आवश्यक तेलाचा वापर मेणबत्ती तयार करताना केला जात असतो. शारीरिक, मानसिक प्रसन्नता मिळावी हा त्याचा मुख्य उद्देश. उदाहरण द्यायचे तर लव्हेंडर सुवास हा तनमनावरील ताण दूर करणारा आहे. त्यामुळे विरंगुळा मिळतो, ताण सैल होतात, विश्रांती मिळते.

वेगन कॅण्डल

वेगन कॅण्डल किंवा वेगन मेणबत्ती या प्रकाराला ग्राहकांची ज्या प्रमाणात पसंती मिळते आहे ते पाहता हा प्रकार व्यावसायिक उत्पादन श्रेणी मध्ये सामील होऊ शकतो. कोणत्याही प्राणीज पदार्थाचा वापर न करता या मेणबत्त्या बनविल्या जातात. सर्वसामान्य मेणबत्त्या बनविताना बेसिक पदार्थ म्हणून वापरले जाणारे मेण प्राण्यांचे बायप्रोडक्ट असतात. उदाहरण मधमाशीच्या पोळ्यातून मिळणारे मेण.

आजकाल अनेक लोक रोजच्या जीवनात प्राणीज पदार्थांचा वापर करत नाहीत. त्याला वेगन म्हटले जाते. म्हणजे आहारात सुद्धा ते प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ, दुध, मास, चरबी याचा वापर करत नाहीत. त्यामुळे मेणबत्तीची निवड करताना सुद्धा ते मधमाशीच्या पोळ्यातून मिळणारे मेण प्राणीज म्हणून वापरणार नाहीत. अश्या लोकांची संख्या वाढती आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी नव्याने बनविलेल्या फॉर्म्युल्यापासून सोया मेणापासून किंवा वनस्पतीपासून मिळणारे तेल, अन्य आवश्यक नैसर्गिक तेले यांच्यापासून, नैसर्गिक सुगंधांचा वापर करून बनविल्या जातात.

सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या मेणबत्त्या

घराचे सौंदर्य वाढविणाऱ्या, सजावटीसाठी किंवा शोभा आणणाऱ्या अशा मेणबत्त्या गृहसजावटीच्या दुकानात सहज पाहायला मिळतात. या अनेक आकर्षक रंगांच्या आणि विविध आकाराच्या असतात. त्यांचा मुख्य उद्देश सजावट हाच असल्याने त्यात अनेक डिझाइन्स, आकार असतात. त्या सुगंधी असतीलच असेही नाही. त्या बनविण्यासाठी काही खास प्रकारच्या साहित्याची गरज नसते. पण त्यांच्या आकारात वैविध्य, सहज आकर्षून घेणारी डिझाईन हवीत. या मेणबत्त्या बनविताना काही वेगळ्या अॅक्सेसरिज सुद्धा त्यात सामील कराव्या लागतात.

मेणबत्ती बनवायची कशी

तुम्हाला यात खरोखरच रस असेल तर तुम्ही अगदी घरात, तुमच्या स्वयंपाकघरात विविध प्रकारच्या मेणबत्त्या बनवू शकता. आपण येथे सोया कॅण्डल कशी बनवायची याची माहिती उदाहरण म्हणून घेऊ. हेच बेसिक साहित्य वापरून तुमची स्वतःची खास कौशल्ये पणाला लावून तुम्ही विविध प्रकारच्या मेणबत्त्या बनवू शकता.

सोया मेणबत्तीसाठी लागणारे साहित्य

  • सोया मेण
  • कॉटनच्या वाती
  • सुपर ग्ल्यू
  • आवडीचे सुगंधी तेल
  • स्पॅच्युला
  • डबल बॉयलर
  • थर्मामीटर
  • विविध आकाराची काचेची भांडी

यात विविध आकाराच्या काचेच्या आकर्षक जार मध्ये आपण मेणबत्ती बनविणार आहोत. ही काचेची भांडी आपल्याला बाजारात सहज मिळू शकतात. सोया मेण मोठ्या प्रमाणावर घेतले तर साधारण प्रती किलो १६० रुपये दराने मिळते.

ज्यात मेण भरायचे ते विविध आकाराचे जार इंडिया मार्ट, अमेझॉन या ऑनलाईन साईटवर मिळू शकतात. तेथे विविध सवलती सुरु असतात अश्यावेळी ही खरेदी करून ठेवता येते. अन्यथा स्थानिक ठोक बाजारात सुद्धा ते कधीही मिळतात. कमी किमतीचे, जास्त किमतीचे असे सर्व प्रकार तेथे उपलब्ध होऊ शकतात. मेणबत्तीसाठी आवश्यक असलेली तेले बाजारात सहज मिळतात. बाकी वस्तू कोणत्याही दुकानातून आणू शकता.

मेण व कंटेनर तयारी

मेणबत्ती बनविण्यास्ठी अगोदर आपल्याला मेण तयार करायची प्रक्रिया समजून घ्यावी लागेल. प्रथम सोया मेण म्हणजे वॅक्स डबल बॉयलर मध्ये वितळवून घ्यायचे आहे. डबल बॉयलर म्हणजे दोन भांडी असलेला कुकर असे म्हणता येईल. यात खालच्या भांड्यात पाणी भरायचे आणि वरच्या भांड्यात मेण घालायचे. गॅस सुरु करून मध्यम आचेवर मेण ढवळत राहायचे. त्यासाठी स्पॅच्युलाचा वापर करायचा आहे. मेणातील सर्व खडे मोडून मेण एकदम मऊ बनवायचे आहे.

एकीकडे मेण वितळत असताना ज्या काचेच्या भांड्यात तुम्ही मेणबत्ती बनविणार त्या भांड्याच्या तळात वात ग्ल्यूने घट्ट चिकटवून घ्यावी आणि ग्ल्यू पूर्ण वाळू द्यावा. यामुळे मेण ओतत असताना वात हलणार नाही.

मेण वितळले की या मिश्रणात आवश्यक तेल घालून ढवळावे. एक पौंड मेणासाठी हे प्रमाण साधारण एक औंस तेल असे असते. मेणाला विशिष्ठ रंग द्यायचा असेल तर बिनविषारी क्रेयोन म्हणजे तेलकट रंगीत खडू मेणात विरघळवून घ्यायचे असतात. हे मिश्रण वितळून एकजीव झाले की गॅस बंद करून ते थंड होण्यासठी ठेवायचे. हे मेण १३० ते १४० फॅरनहाईट तापमान होई पर्यंत ठेवायचे. तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर करायचा. योग्य तापमान झाले की जार मध्ये हे मिश्रण ओतायचे. जार साधारण ३/४ भरायचा. मेण ओतत असताना वात वर पकडून ठेवायची. वात सरळ राहावी म्हणून एखाद्या पेनाला गुंडाळून ते पेन जारच्या तोंडावर ठेवावे.

जार मधील मेण घट्ट होत आले की शेवटची ओतणी करायची आहे. दुसऱ्यांदा मेण ओतताना वातीच्या भोवती काही भोके पडलेली दिसू शकतात. पण त्याची काळजी करायचे कारण नाही. आपण पुन्हा वरून जे उरलेले १/४ मेण ओतणार आहोत त्यात ही भोके पूर्ण बुजतात. या प्रकारे उरलेले मेण ओतून जार पूर्ण भरा. तो पूर्ण थंड झाला की जास्तीची वात कात्रीने कापावी. आता तुमची मेणबत्ती प्रकाशण्यासाठी तयार आहे.

पॅकिंग

या प्रमाणे तुमच्या मेणबत्त्या तयार करून झाल्या की त्याचे पॅकिंग करायचे. त्यासाठी तुम्ही निवडलेल्या बॉक्स मध्ये मेणबत्त्या ठेऊन जी रिकामी जागा राहील ती अन्य पॅकिंग मटेरियलने पूर्ण भरावी. बबलरॅप, पेपर यांचा वापर करू शकता. मग बॉक्स टेप लावून पूर्ण बंद करायचा आणि त्यावर फ्रॅजाइल म्हणजे जपून हाताळा अशी सूचना ठळक दिसेल अशी लिहायची.

घरी बनविलेल्या मेणबत्त्यांचे विपणन म्हणजे मार्केटिंग कसे कराल

तुम्हाला उत्तम दर्जाच्या मेणबत्त्या बनविण्यात यश आले किंवा हमखास चांगल्या मेणबत्त्या बनविण्याची तुमची कृती यशस्वी झाली. पण आता या मेणबत्त्या विकायच्या कशा हा पुढचा आणि महत्वाचा प्रश्न येतो. अर्थात कोणत्याही उत्पादनासाठी ग्राहक मिळविणे हे व्यावसायिकापुढचे मोठे आव्हान असतेच. त्यामुळे बावरून जाण्याचे कारण नसते तर आपण आपले उत्पादन कुठे, कसे विकू शकतो याचे धोरण आखावे लागते.

  • इन्स्टाग्राम –

रोजच्या वापरातील अनेक वस्तू, लाईफ स्टाईल ब्रांड इन्स्टाग्रामवर खूप यशस्वी ठरले आहेत हे तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल. उत्पादनाचे आकर्षक फोटो येथे पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या विविध मेणबत्त्यांचे, तुमच्या ब्रांडशी संबंधित आकर्षक फोटो येथे देऊ शकता. तुमच्या मेणबत्त्यांचे स्टेज फोटो खूप मोठ्या संख्येने ग्राहकांना पाहता यावेत, दिसावेत यासाठी हे करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्या उत्पादनाची माहिती देणारा मजकूर चांगल्या लेखकाकडून लिहून घेऊन तो येथे प्रसिध्द करता येतील. त्यामुळे तुम्ही मेणबत्त्या कशा बनविता, त्याची खास वैशिष्टे ग्राहकांसमोर मांडता येतात.

.सोशल मिडिया चा मोठ्या प्रमाणावर चा वापर करून अधिक ग्राहक आणि अधिक प्रेक्षकांपर्यंत आपली उत्पादने पोहोचवू  शकतात.

डिजिटल मार्केटिंग

जर तुम्ही व्यावसायिक बनून ऑनलाईन माध्यमातून पैसे कमवायचा विचार करत असाल तर डिजिटल मार्केटिंगशिवाय हे कदापि शक्य होणार नाही. तुम्ही व्यवसाय ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा – डिजिटल मार्केटिंग ही काळजी गरज आहे याची पक्की खूणगाठ तुम्हाला बांधून ठेवावी लागेल आणि त्यासाठीच डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल.

पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. 

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

विक्रीचे मार्ग

मेणबत्ती हा तसा कॉम्पॅक्ट पॅक करता येणारा आयटम म्हणता येतील. हे पॅकिंग बॉक्स एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे फार कष्टाचे किंवा अवघड काम नाही. त्यामुळे आपल्या मेणबत्त्या विक्रीसाठी वेळोवेळी आणि जागोजागी भरणारे मार्केट बुथ, पॉपअप शॉप, तंबू मार्केट, विविध प्रदर्शने, फ्ली मार्केट याचा वापर करून घ्यायला हवा. विशेष म्हणजे येथे तुम्ही ग्राहकांच्या थेट प्रतिक्रिया मिळवू शकता पण त्याचे काही अन्य फायदेही आहेत.

ग्राहकांचा थेट फिडबॅक किंवा प्रतिक्रिया मिळत असल्याने तुम्ही तुमच्या उत्पादनात आवश्यक वाटणाऱ्या सुधारणा करू शकता. वैयक्तिक पातळीवर विक्रीचा हा चांगला मार्ग आहे. तुम्ही ग्राहकांना भेटू शकता, त्यांचे म्हणणे ऐकून त्याच्या नोंदी करून घेऊ शकता. यातून तुम्हाला अनेक नवीन कल्पना समजू शकतात त्याचा वापर तुम्ही उत्पादन श्रेणी वाढविण्यासाठी करून घेऊ शकता.

ठोक विक्री म्हणजे बी टू बी पर्याय. म्हणजे उत्पादकाने आपली उत्पादने दुसऱ्या व्यापाऱ्याला थेट विकायची. यासाठी विविध ठिकाणी भरणारे बाजार मेळे, शेतकरी बाजार या योग्य जागा ठरतात. येथे तुम्ही ठोक विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या ओळखी करून घेऊ शकता त्यांच्या बरोबर व्यावसायिक नाते निर्माण करू शकता.

नेटवर्किंग व प्रेरणा

तुम्ही जशा मेणबत्त्या बनविता त्याच व्यवसायात असणाऱ्या अन्य व्यावसायिकांशी संपर्क साधून नेटवर्क तयार करणे हाही एक महत्वाचा भाग आहे. विविध प्रदर्शने, जत्रा, अशा ठिकाणी ही संधी मिळू शकते. त्यांच्यापासून तुम्हाला व्यवसायाची प्रेरणा, नवीन कल्पना, मदत मिळू शकते. त्यातून तुम्हाला तुमच्या व्यवसायात येत असलेल्या अडचणींवर उपाय मिळू शकतात.

अर्थात या प्रकारच्या विक्रीसाठी कौशल्य हवे. एकाच ठिकाणी विक्री करण्याबरोबरच तुम्ही शॉपी पीओएस सारख्या मोबाईल पॉइंट सेल सिस्टीमचा वापर करू शकता. त्यामुळे तुम्ही तुमचा स्टॉल किंवा दुकान कोणत्या मार्केट, शेतकरी बाजार, फ्ली मार्केट, क्राफ्ट फेअर, उत्पादन मेळावा येथे लावणार आहात याची माहिती संबंधितांपर्यंत वेळेत पोहोचविणे शक्य होते.

ऑनलाईन विक्री

ऑनलाईन विक्री हे आजचे प्रमुख आकर्षण बनले असून त्यामुळे अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर आपण एकच वेळी करू शकतो. सोशल मिडिया, तुमची स्वतःची ई कॉमर्स साईट अश्या माध्यमातून आज जगभरच्या ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. अर्थात प्रत्येक डिजिटल माध्यम विक्रीसाठी आदर्श प्लॅटफॉर्म असेलच असे गृहीत धरता येणार नाही. पण काही जागा सुरवात म्हणून व्यावसायिक किंवा उद्योजक नक्कीच ट्राय करू शकतो. ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला गरज आहे एका व्हर्चुअल (आभासी) दुकानाची आणि यासाठी तुम्ही एकतर स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट सुरु करू शकता किंवा Shopify सारख्या खास ई-स्टोअर सुरु करण्यासाठी आवश्यक सर्व बाबी पुरविणाऱ्या जबरदस्त प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. एक यशस्वी नवउद्योजक होण्याचे तुमचे स्वप्न साकार करायचे असेल तर उत्तम आणि किफायतशीर सुरुवात नक्कीच फायद्याची ठरू शकते आणि यासाठीच नव्याने जर तुम्ही एखादा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असाल तर आम्ही तुम्हाला Shopify चा वापर करा हे प्राधान्याने सुचवू. का ?

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा

मेणबत्ती बनविण्याचा निर्णय पक्का झाला?

घराच्या घरी स्वतः मेणबत्त्या बनविण्याचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार तुम्ही पक्का केला असेल तर हेही लक्षात घ्या. भारतात सुद्धा मेणबत्तीला चांगले मार्केट आहे. भारतात मेणबत्तीचा संबंध धार्मिक भावनांशी जोडलेला दिसेल. वेदात असे सांगितले गेले आहे की आपल्या अंतरात्म्यामध्ये सुद्धा एक दीप प्रज्वलित असतो. त्यामुळे बऱ्या वाईट घटनांनी भरलेल्या मानवी आयुष्यात दिवा उजळाविण्याची प्रथा आहे. सण उत्सव काळात दिव्यांना मोठी मागणी असते.

तुम्ही व्यावसायिक पातळीवर मेणबत्त्या बनविण्याचा निर्णय घेत असला तर त्यापूर्वी तज्ञ लोकांचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा. तुम्ही अगदी एकट्याने दिवसातले काही तास काम केलेत तरी महिन्याकाठी १५ ते २५ हजार रुपयांची कमाई यातून तुम्हाला होऊ शकते. बाजाराची संपूर्ण माहिती, विक्रीतील खाचाखोचा, तुमच्या कौशल्यावर तुमची जबरदस्त हुकुमत आणि मेणबत्तीचा उत्तम दर्जा किंवा गुणवत्ता सांभाळता आली तर हा व्यवसाय चांगला फायदा देणारा व्यवसाय ठरू शकतो.

शेअर करा