प्रिंट-ऑन-डिमांड – बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय

तुम्ही कल्पक आहात का? तुमच्या कल्पकतेचा तुम्ही योग्य वापर करत आहात का? तुमची नोकरी अथवा व्यवसाय सांभाळून तुम्हाला तुमच्या कल्पकतेचा वापर करून सोप्या आणि खात्रीशीर मार्गाने चांगले पैसे कमवायचे आहेत का? मग तुम्हाला ‘प्रिंट-ऑन-डिमांड’ या मॉडेलद्वारे आपल्या भन्नाट कल्पकतेचा वापर करण्याची सुवर्णसंधी तर आहेच पण त्याचबरोबर कोणतीही गुंतवणूक न करता स्वतःचा एक वेगळा ई-कॉमर्स व्यवसायही तुम्ही सुरु करू शकता. पण काय आहे हे प्रिंट-ऑन-डिमांड ? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ‘मागणी तशी छपाई’ आणि ती पण ग्राहकाला आवडेल त्या वस्तूवर. अधिक समजून घेण्यासाठी ही काही प्रिंट-ऑन-डिमांड उत्पादने पहा.

  1. मेसेज असलेला टी-शर्ट                                   2) आवडता मेसेज छापलेले मोबाईल कव्हर
प्रिंट-ऑन-डिमांड - बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय

3) डिझाईन छापून बनविलेला कॉफी मग                      4) पाहिजे तो मेसेज छापून बनविलेली कॅप

प्रिंट-ऑन-डिमांड - बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय

5) आपल्या आवडीचे डिझाईन छापून तयार केलेले वेगवेगळे प्रॉडक्ट्स

प्रिंट-ऑन-डिमांड - बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय

अशाच प्रकारे तुम्ही जिम बॅग, जॅकेट्स, बेडशीट्स, पिलो-कव्हर्स, टॉवेल्स, ऑफिसची डायरी, वॉल स्टिकर यासारख्या १००० हून अधिक प्रॉडक्ट्सवर तुमचे डिझाईन छापून जगभरातील अनेक ग्राहकांना ते विकू शकता.

तर आता तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल प्रिंट-ऑन-डिमांड काय आहे ते. आता तुम्ही म्हणाल ते सगळे ठीक आहे पण हा व्यवसाय सुरु करण्यासाठी किती भांडवल लागते? तर याच उत्तर आहे शून्य. निव्वळ शून्य रुपयात तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता, तुमची कल्पकता हेच तुमचं भांडवल आणि डिझाईन म्हणजे फक्त ग्राफिक्स नव्हे तर एखादा शब्द, एखादे वाक्य, एखादी म्हण, एखादा श्लोक, एखादी घोषणा यांचासुद्धा तुम्ही कल्पकतेने वापर करू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीचे डिझाईन तयार करून ते तुम्हाला सोयीस्कर असणाऱ्या कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप, पिंटरेस्ट, ब्लॉग, ई-कॉमर्स वेबसाइट) प्रदर्शित करा, ज्या ग्राहकाला ते डिझाईन आवडेल तो ग्राहक ते उत्पादन ऑर्डर करेल आणि मग ज्या प्रिंट-ऑन-डिमांड कंपनीला तुम्ही ही ऑर्डर द्याल ते तुमचे प्रॉडक्ट तुमच्या डिझाईनची छपाई करून तुमच्या ग्राहकाला घरपोच वितरण करतील. मग यातून तुम्हाला काय मिळणार? तुमच्या डिझाईनचा मोबदला. म्हणजे उदाहरणसाठी समजा एक टी-शर्ट जर कंपनी ग्राहकाला तुमच्या डिजाईन सहित ५०० रुपयांना विकत असेल तर तुम्हाला त्यातून नक्कीच १०० ते १५० रुपयांचा थेट नफा मिळणार. अश्याचप्रकारे महिन्याला विविध प्रकारचे हजारो प्रॉडक्ट्स विकून अनेक तरुण आणि अनेक कंपन्या लाखो रुपये कमवीत आहेत. विश्वास बसत नाही तर ही पहा काही यशस्वी उदाहरणे.

  • चार्ल्स स्मिथ नावाच्या अटलांटामध्ये राहणाऱ्या एका गृहस्थांनी प्रिंट-ऑन-डिमांड मॉडेलद्वारे एका वर्षात $१,००,००० हून अधिक कमाई केली आणि आज ‘Black Father Exists’ या त्यांच्या डिझाईनला जगभरात प्रचंड मागणी आहे.
प्रिंट-ऑन-डिमांड - बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय
  • मुबेद सयीद हे ‘माय ड्रीम स्टोर’ या त्यांच्या प्रिंट-ऑन-डिमांड प्लॅटफॉर्मद्वारे दिवसाला १००० हून अधिक विविध प्रॉडक्ट्सची विक्री करून महिन्याला लाखो रुपये कमवीत आहेत        
प्रिंट-ऑन-डिमांड - बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय
  • चार मुलांची आई असणाऱ्या लीऑरा गोरेन या घर सजावटीच्या विविध उत्पादनांचे आकर्षक डिझाइन्स बनवून ते ‘प्रिंटिफाय’ या प्रिंट-ऑन-डिमांड प्लॅटफॉर्मद्वारे प्रदर्शित करून महिन्याला उत्तम अर्थार्जन करीत आहेत.
प्रिंट-ऑन-डिमांड - बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय

काय वाटते तुम्हाला, प्रिंट-ऑन-डिमांड हा व्यवसाय सोप्पा आहे का नाही ? हो नक्कीच सोप्पा आहे पण या सोप्या कामात सुद्धा अनेक जण अयशस्वी होतात कारण या व्यवसायाबद्दल योग्य माहिती न घेता ते या क्षेत्रात उतरतात. मग कुठे मिळेल या व्यवसायाचे योग्य मार्गदर्शन – आमच्या या लेखात.

ई -कॉमर्स व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी या लेखात प्रिंट-ऑन-डिमांड म्हणजे काय? प्रिंट-ऑन-डिमांड व्यवसायाची प्रक्रिया, प्रिंट-ऑन-डिमांड व्यवसायाचे फायदे व तोटे, प्रिंट-ऑन-डिमांड क्षेत्रात चालणारे प्रॉडक्ट्स, प्रिंट ऑन डिमांड प्लॅटफॉर्म्स या सर्व बाबींची अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे.

प्रिंटऑनडिमांड व्यवसाय का करावा ?

  • सहज आणि सोपा व्यवसाय सेट-अप
  • कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची गरज नाही
  • कोणतीही गुंतवणूक नाही – तुमचे डिझाईन हेच तुमचे भांडवल 
  • प्रॉडक्ट साठवणूक करण्याची गरज नाही
  • प्रॉडक्टचे उत्पादन, त्याचे शिपिंग व डिलिव्हरी याचा खर्च नाही
  • १२ ही महिने मागणी असलेला व्यवसाय
  • तुमचे प्रॉडक्ट छापून देण्यासाठी भारतात २५० हून अधिक प्रिंट-ऑन-डिमांड कंपन्या
  • एकदाच बनवा – हजारदा विका या प्रकारचे सर्वात किफायतशीर बिजनेस मॉडेल

मित्रांनो, कशी वाटली ही वेगळ्या उद्योगाची कल्पना ? सोपी, खात्रीशीर आणि फायदेशीर सुद्धा. अनेकजण आपली भन्नाट कल्पनायुक्ती वापरून या व्यवसायात उत्तम अर्थार्जन करत आहेत. प्रिंट ऑन डिमांड या ई-कॉमर्स मॉडेलद्वारे अर्थार्जन करणे नक्कीच सोपे आहे आणि याची मागणी भविष्यात संपूर्ण जगभर ही वाढतच जाणार आहे आणि म्हणूनच या व्यवसायाचे अनेक बारकावे आम्ही सविस्तरपणे आमच्या विविध लेखांद्वारे आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. या उपयुक्त खजिन्यासाठी आजच आमच्या पोर्टलला सबस्क्राईब करा आणि अश्याच नवनवीन उद्योगधंद्याची संपूर्ण माहिती मिळवा.

चला तर मग, या वेगळ्या ई-कॉमर्स व्यवसायाची सविस्तर माहिती घेऊ:

Table of Content

प्रिंटऑनडिमांड म्हणजे काय?

प्रिंटऑनडिमांड व्यवसायाची प्रक्रिया

प्रिंटऑनडिमांड व्यवसायाचे फायदे व तोटे

प्रिंटऑनडिमांड क्षेत्रात चालणारे प्रॉडक्ट्स

प्रिंटऑनडीमांड व्यवसायासाठी उपयुक्त POD प्लॅटफॉर्म्स

  • प्रिंटऑनडिमांड म्हणजे काय?

प्रिंट-ऑन-डीमांड ही ई-कॉमर्स व्यवसाय प्रकारातील एक फायदेशीर संकल्पना असून ज्याद्वारे तुमच्या ग्राहकांना तुम्ही बनविलेल्या कल्पक डिझाइन्स त्यांना हव्या असलेल्या उत्पादनांवर तुमच्या POD पार्टनरमार्फत छापून ती उत्पादने घरपोच पाठवली जातात. म्हणजेच तुम्ही फक्त आर्कषक डिझाइन्स बनविण्याचे काम करतात आणि त्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया ही तुमच्या POD पार्टनरद्वारे राबविली जाते. नवनवीन दर्जेदार आणि आकर्षक डिझाइन्स बनविणे, खात्रीशीर POD पार्टनर्स शोधणे व त्यांच्यासोबत व्यवसाय प्रस्थापित करणे आणि तुमच्या डिझाइन्सचे योग्य मार्केटिंग करणे ही प्रामुख्याने तुमची जबाबदारी असते. एक व्यावसायिक म्हणून तुमचा प्रवास सुरु करायचा असेल तर कोणतेही भांडवल उभे करण्यापेक्षा ही कामे करणे कधीही सोपे आहे हे तुम्ही नक्कीच समजू शकाल. जेव्हा ग्राहक तुमच्या POD उत्पादनांची मागणी करेल तेव्हाच तुमचा POD पार्टनर छपाई व वितरणाची प्रक्रिया सुरु करतो आणि एकदा का ते उत्पादन ग्राहकाला वितरित झाले की त्या डिझाईनचा मोबदला तुम्हाला दिला जातो.

प्रिंट-ऑन-डिमांड व्यवसाय काय आहे हे नक्कीच तुम्हाला आता कळले असेल. पण एवढ्याच माहितीने लगेच व्यवसाय सुरु करण्याची घाई करू नका कारण अनेकजण वाचून सोपे वाटते म्हणून या व्यवसायाची सखोल प्रक्रिया समजून न घेता लगेच POD व्यवसायात उडी मारतात आणि फसतात. पुढील मुद्यात प्रिंट-ऑन-डिमांड व्यवसाय सुरु करण्याची सविस्तर प्रक्रिया आम्ही अतिशय सोप्या भाषेत सादर केली आहे. ती बारकाईने वाचा व समजून घ्या !

  • प्रिंटऑनडिमांड व्यवसायाची प्रक्रिया:
  • तुमचा आवडता Niche निवडा:

तुम्ही Niche हा शब्द या पूर्वी ऐकला आहे का? हो..तर मग पुढे जाऊ आणि नाही तर मग आधी त्याचा अर्थ समजून घेऊ.

Niche म्हणजे विशिष्ट प्रकारच्या उत्पादन किंवा सेवेसाठी बाजारपेठेचा एक विशिष्ट विभाग. म्हणजे योगा हा जर टॉपिक तुम्ही निवडत असाल तर त्यात महिलांसाठी योगा, पुरुषांसाठी योगा, गर्भवती महिलांसाठी योगा, युवकांसाठी योगा, ऑफिसमध्ये करता येण्यासारखा योगा हे जे काही विशेष भाग आहेत त्यांना Niche म्हणतात. थोडक्यात सांगायचे तर Micro Level वर करावयाचे काम.

एकदा का तुमची Niche ची निवड करून झाली की त्या अनुषंगाने तुम्हाला डिझाईन्सची तयारी करणे सोपे जाईल. तुम्ही एकाच Niche वर लक्ष केंद्रित करावे असे नाही पण सुरुवात ही तुमच्या आवडत्या म्हणजेच ज्या विषयाबद्दल तुम्हाला भरपूर माहिती आहे किंवा एखाद्या विषयाशी निगडित सतत तुम्हाला काही ना काही भन्नाट सुचत असते त्या विषयापासून करा आणि मग ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा अभ्यास करून त्याला पूरक इतर Niche संबंधित डिझाईन्सचे नियोजन करा.

  • तुमचे ई-कॉमर्स स्टोअर प्रस्थापित करा:

आता तुमचा Niche तर निवडून झाला आहे मग पुढे काय? तर आता तुमच्याकडे दोन मुख्य पर्याय उपलब्ध आहेत:

  • तुम्ही स्वतः ई-कॉमर्स स्टोअर बनवा अथवा वेब-डेव्हलपरकडून ते बनवून घ्या  :

ई-कॉमर्स स्टोअर हे एक प्रकारे वेबसाईटचेच स्वरूप असून यात तुम्ही उपलब्ध करून देत असलेल्या उत्पादनांची ग्राहकांना विक्री करता. प्रिंट-ऑन-डिमांड या प्रकारात तुमचे हे ई-स्टोअर तुमच्या उत्पादनांची छपाई आणि वितरण करणाऱ्या POD पार्टनर सोबत जोडावे लागते जेणेकरून तुमच्या ई-स्टोअरद्वारे प्राप्त होणाऱ्या ऑर्डर्स या थेट त्यांनाच दर्शविल्या जातात. तुमच्यापैकी खूप लोकांना असे वाटत असेल की आपला ई-कॉमर्स व्यवसाय हा आपल्या स्वतंत्र वेबसाईटद्वारे सुरु करणे सोपे जाईल तर मग खालील गोष्टीत तुम्ही निपुण असाल तरच या पर्यायाचा विचार करा:

  • वेब डिझायनिंग व त्यांच्याशी निगडित बाबींचे तुम्हाला चांगले ज्ञान आहे
  • तुम्हाला वेब डेव्हलपमेंट मध्ये रस असून याचे तांत्रिक ज्ञान तुमच्याकडे आहे
  • वरील दोन्ही गोष्टी नसून सुद्धा एखादा वेब डेव्हलपर निवडून त्याची फी (किमान ४० ते ६० हजार) देण्याची तुमची आर्थिक कुवत आहे.
  • Shopify किंवा BigCommerce च्या सहयोगाने ई-कॉमर्स स्टोअर सुरु करा:

एक यशस्वी नवउद्योजक होण्याचे तुमचे स्वप्न साकार करायचे असेल तर उत्तम आणि किफायतशीर सुरुवात नक्कीच फायद्याची ठरू शकते आणि यासाठीच नव्याने जर तुम्ही प्रिंट-ऑन-डिमांड किंवा इतर कोणताही ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असाल तर आम्ही तुम्हाला Shopify किंवा BigCommerce यासारख्या खास POD व्यवसायासाठी बनविलेल्या प्लॅटफॉर्मचा वापर करा हे प्राधान्याने सुचवू. का ? तर हे पहा या प्लॅटफॉर्म्सचे फायदे:

  • ई-स्टोअर सुरु करण्याचा सर्वात स्वस्त आणि उपयुक्त मार्ग
  • कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची गरज नाही
  • तुम्हाला पाहिजे तसे तुमचे ई-स्टोअर प्रस्थापित करण्यासाठी अनेक पर्याय व Customize Themes ची उपलब्धता
  • नवीन उत्पादने अद्ययावत करणे एकदम सोपे
  • तुमचे सेल्स आणि मार्केटिंगशी निगडित सुधार किंवा वाढ करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध 
  • स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट पेक्षाही जलद वेग आणि SEO चे उत्तम व्यवस्थापन
  • ड्रॉपशिपिंग आणि प्रिंट-ऑन-डिमांडसाठी लागणाऱ्या सर्व आधुनिक पर्यायांची उपलब्धता
  • गुगल शॉपिंगच्या (Google Merchant Store) पॅनेलमध्ये तुमच्या ई-स्टोअरला प्रदर्शित करणे खूप सोपे
  • तुमच्या ई-स्टोअरशी निगडित सर्व आकडेवारी व विविध रिपोर्ट्सचे वेळोवेळी योग्य संकलन  
  • कोणत्याही तांत्रिक समस्येचे निराकरण करण्यासाठी २४/७ मदतनीस टीम उपलब्ध

कोणतीही व्यक्ती तांत्रिक गोष्टींत न अडकता स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याचे आपले स्वप्न Shopify किंवा BigCommerce यासारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून नक्कीच साकार करू शकते.

(स्वतःची स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट बनविण्यापेक्षा Shopify चा वापर का करावा याची सविस्तर माहिती आमच्या या लेखात दिली आहे.)

  • डिझाईन तयार करा:

आता तुमचा niche निवडून झाला आहे, प्लॅटफॉर्मची सुद्धा निवड झाली आहे मग आता खरे कल्पक काम इथून सुरु होते. तुमच्या niche मध्ये ग्राहकांच्या पसंतीच्या विविध उत्पादनांचा शोध घ्या आणि त्या उत्पादनांच्या अनुषंगाने तुमच्या डिझाईन्स बनवायला सुरुवात करा. तुमच्या डिझाईन्स बनविताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:

  • डिझाईन म्हणजे फक्त ग्राफिक्स नव्हे तर एखादा शब्द, एखादे वाक्य, एखादी म्हण, एखादा श्लोक, एखादी घोषणा यांचासुद्धा तुम्ही कल्पकतेने वापर करू शकता.
  • शक्यतो डिझाईन हे स्पष्ट आणि आकर्षक असावे. गुंतागुंतीचे व पटकन न समजणारे डिझाईन ग्राहकांच्या पसंतीस पडत नाही असे दिसून येते.
  • तुमचे डिझाईन हे इतरांपेक्षा नक्कीच वेगळे असावे किंवा ते एकदम नवे असावे.
  • इतर कोणाच्याही डिझाईनचा वापर करून, त्यात थोडे बदल करून ते पुन्हा नव्याने सादर करायचा प्रयत्न करू नका – असे प्रयत्न यापूर्वी ज्यांनी केले आहेत ते तितकेसे यशस्वी होऊ शकले नाहीत.
  • तुम्हाला जो संदेश डिझाईनद्वारे द्यायचा आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून त्याला अनुरूप असे डिझाईन एलिमेंट्स वापरा.
  • डिझाईनचे प्रत्यक्ष काम सुरु करण्याआधी त्याचा कच्चा आरखडा बनवून ठेवा जेणेकरून प्रत्यक्ष काम करत असताना तुम्ही भरकटणार नाहीत.

डिझाईनच्या कामावर तुमचा ७०% व्यवसाय अवलंबून असल्याने हे काम करत असताना प्रामाणिकपणा, कल्पकता आणि चिकाटी यांची योग्य सांगड घाला.

  • तुमच्या डिझाईनची छपाई आणि वितरण करण्यासाठी खात्रीशीर POD पार्टनर निवडा:

एकदा का तुमचे डिझाईन तयार झाले की ते विविध उत्पादनांवर छापून तुमच्या ग्राहकांना वितरित करण्यासाठी तुम्हाला POD सप्लायरची गरज पडते कारण छपाई व वितरण यासाठी अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागते ज्याचा खर्च हा मोठ्या व्यावसायिकांनाच परवडू शकतो.(जसे की मशीन सामग्री, कारखान्याची जागा, कामगार, उत्पादनांचा साठा ई.). तुमच्या प्रिंट-ऑन-डिमांड सप्लायरची निवड करतात खालील गोष्टी ध्यानात ठेवा:

  • प्रिंट-ऑन-डिमांड या व्यवसायात ग्राहकांना आवडणाऱ्या किंवा सतत मागणी असणाऱ्या उत्पादनांचा कोणते POD सप्लायर योग्य साठा आणि पुरवठा करू शकतात हे शोधून पहा. यासाठी Google किंवा इंटरनेटच्या माध्यमातून POD सप्लायरची वेबसाईट तपासून पहा आणि गरज पडल्यास प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करून घ्या.
  • तुम्ही निवडलेल्या POD सप्लायर्सला तुमच्याबद्दल योग्य माहिती देऊन तुम्हीही प्रिंट-ऑन-डिमांड हा व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक आहात हे सांगा.
  • जे पुरवठादार तुम्हाला योग्य आणि विश्वासू वाटतात त्यांच्याकडून काही सॅम्पल प्रॉडक्ट्स ऑर्डर करून त्यांच्या उत्पादनांचा दर्जा, त्यांची वितरण पद्धत, रिटर्न पॉलीसी आणि ग्राहक सेवा तपासून पहा.
  • कोणते POD सप्लायर हे फसवे असू शकतात:
  • व्यवसाय करण्यासाठी किंवा त्यांची उत्पादने विकण्यासाठी मासिक किंवा वार्षिक मेम्बरशिपची अट ठेवणारे
  • सॅम्पल किंवा प्रे-ऑर्डर उत्पादनांसाठी बाजारमूल्यापेक्षा जास्त किंमत आकारणारे
  • कमीत कमी उत्पादनांच्या ऑर्डरची अट घालणारे
  • खोटी संपर्क माहिती असलेले     

वरील गोष्टी व्यवस्थित समजून त्या वेळोवेळी अमलात आणल्यास खात्रीशीर POD सप्लायर शोधणे तुमच्यासाठी नक्कीच सोपे होईल. (यापुढील माहितीमध्ये आम्ही काही लोकप्रिय POD प्लॅटफॉर्मचा आढावा घेतला आहे.)

  • तुमच्या POD डिझाईनचे किंवा उत्पादनांचे मार्केटिंग करा:

आता तुम्हाला नक्कीच कळले असेल की प्रिंट-ऑन-डिमांड व्यवसाय कसा सुरु करावा पण डिझाईन बनविण्यापुरतेच तुमचे काम मर्यादित नसेल तर तुमची डिझाईन्स आणि त्यांची छपाई केलेली विविध उत्पादने तुम्हाला लोकांपर्यत पोहचवावी लागतील. यासाठी डिजिटल मार्केटिंग तुम्हाला खूप फायद्याचे ठरेल. यासाठी खालील टिपा समजून घ्या:

  • काळानुरूप कोणकोणती डिजिटल माध्यमे लोकप्रिय आहेत याचा आढावा घ्या. (जसे की Facebook, Instagram, Pinterest, Whatsapp, Twitter, LinkedIn ई.)
  • तुमच्या niche मध्ये रस असणारा ग्राहकवर्ग कोणकोणती डिजिटल माध्यमे कधी आणि कशी वापरतात ते समजून घ्या.
  • ‘जैसा देश वैसा भेस’ म्हणजेच प्रत्येक डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहिरात करायची पद्धत वेगळी आहे. त्या जाहिरात पद्धतींचा योग्य अभ्यास करा व त्या अनुषंगाने तुमची पोस्ट किंवा जाहिरात तयार करा.
  • डिजिटल जाहिरात माध्यम हे जरी स्वस्त असले तरी त्याचा योग्य वापरच तुम्हाला ग्राहकवर्ग मिळवून देऊ शकेल.
  • सर्वात फायदेशीर मार्ग म्हणजे Influence बना. आजच्या डिजिटल युगात Influencer म्हणून उदयास येण्यासाठी १० हून अधिक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचा टॅलेंट संपूर्ण जगात पोहचवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्युब, लिंक्डइन, पोडकास्ट यासारख्या अनेक प्लॅटफॉर्म्सवर तुम्हीसुद्धा Influencer म्हणून नाव कमावू शकाल आणि त्याद्वारे तुमच्या डिझाईन्स अनेक लोकांपर्यत पोहचवू शकता. (डिजिटल इन्फ्लुएन्सर कसे आणि का बनावे? यासाठी आमचा हा सविस्तर लेख वाचा.)
  • तुमचा परिवार, तुमचे मित्र, तुमचे सहकारी यांच्यासोबतसुद्धा तुमच्या डिझाईन्स व तुमची POD उत्पादने शेअर करा. 
  • तुमचा POD पार्टनर डिजिटल मार्केटिंगमध्येसुद्धा तुम्हाला मदत करणार असेल किंवा त्या संबंधित टूल्स उपलब्ध करून देणार असेल तर त्याची माहिती घ्या.

तुम्ही डिजिटल मार्केटिंग किंवा ट्रॅडिशनल मार्केटिंग करा पण यामागचा उद्देश एकच असू द्या योग्य वेळी तुमचे उत्पादन योग्य ग्राहकांसमोर दिसले पाहिजे जेणेकरून ते तुमच्या उत्पादनांची खरेदी करण्यास प्रेरित होतील.

(डिजिटल मार्केटिंग कसे करावे हे समजून घेण्यासाठी आमचा हा सविस्तर लेख वाचा)

  • प्रिंट ऑन डिमांड व्यवसायाचे फायदे व तोटे:

कोणत्याही भांडवलाशिवाय फक्त कल्पकता आणि योग्य मार्केटिंग करून तुम्ही प्रिंट-ऑन-डिमांड व्यवसायात नक्कीच चांगली प्रगती करू शकता. या व्यवसायाचे काही महत्वाचे फायदे तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी अजून प्रोत्साहीत करतील:

  • कोणतीही गुंतवणूक नाही:

ज्याप्रकारे कोणत्याही रिटेल व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या भांडवलाची किंवा गुंतवणुकीची गरज लागते अगदी त्याच्या विरुद्ध प्रिंट-ऑन-डिमांड व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही. तुमची कल्पकता, वेळ, आणि मार्केटिंग कौशल्य हीच तुमची मोलाची गुंतवणूक आहे.

  • सुरुवात करण्यासाठी अतिशय सोपे:

कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष उत्पादनांची निर्मिती आणि त्याची साठवणूक करायची नसल्यामुळे प्रिंट-ऑन-डिमांड सारखा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करणे हे खूपच सहज आणि सोपे आहे. तुमच्या डोक्यावर खालीलपैकी कोणत्याही बाबींचे ओझे नसेल:

  • गोडाऊनचे भाडे किंवा त्याची खरेदी आणि इतर देखभाल खर्च
  • हिशोब व ताळेबंदीसाठी वेळोवेळी ठेवावी लागणारी उत्पादनांची यादी
  • उत्पादनांचे पॅकिंग व त्यांचे वितरण
  • रिटर्न आलेल्या वस्तूंची व्यवस्था व हाताळणी
  • मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादनांचा स्टॉक करून ठेवणे
  • कमीत कमी खर्च – जास्तीत जास्त नफा:

प्रिंट-ऑन-डिमांड या व्यवसायासाठी कोणत्याही दुकानाची किंवा गोडाऊनची गरज नाही कारण डिझाईन्स व मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला फक्त संगणक / लॅपटॉप, इंटरनेट आणि व्यवसाय चातुर्य यावरच खर्च करावा लागणार आहे. अनेक यशस्वी POD व्यावसायिक तर घरबसल्या आपला हा व्यवसाय चालवीत असून त्याद्वारे मोठी बचत तर करत आहेतच शिवाय या बचतीचा योग्य वापर करून आपला व्यवसायही वृद्धिंगत करत आहेत.

  • जागेचे बंधन नाही:

हा व्यवसाय तुम्ही जगात कुठेही बसून करू शकता अगदी पुण्यातील तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये बसूनसुद्धा तुम्ही अमेरिकेतील तुमच्या एखाद्या ग्राहकाची तुमच्या उत्पादनासाठी आलेली मागणीही पूर्ण करू शकता. जोपर्यंत तुमच्याकडे जलद इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे आणि तुम्ही पुरवठादारांच्या तसेच ग्राहकांच्या उत्तमरीत्या संपर्कात आहात तोपर्यंत तुमचा POD व्यवसाय अविरत चालू राहील अगदी तुम्ही झोपलेला असेल तेव्हा सुद्धा.

  • अगणित उत्पादनांची उपलब्धता:

POD मध्ये तुम्हाला कोणतेही उत्पादन नव्याने तयार करायचे नसून तुमच्या ग्राहकांना हवी असलेली उत्पादने तुमच्या डिझाईनसह छापून ती ग्राहकांना वितरित करायची असतात. आजच्या घडीला ११००+ उत्पादने ही विविध POD व्यावसायिकांकडून वापरली गेली असून अनेक POD सप्लायर तुम्हाला ती उपलब्ध करून देऊ शकतात.

  • व्यवसाय वाढविणे सोपे:

तुमचे काम हे फक्त आकर्षक डिझाईन्स बनवून त्यासाठी ग्राहकांची मागणी मिळवणे इथेपर्यंतच मर्यादित असल्याने मार्केटिंगच्या विविध क्लुप्त्या वापरून तुम्ही तुमचा व्यवसाय जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी अधिक मेहनत घेऊ शकता. ग्राहकांना प्रॉडक्ट घरपोच वितरित करण्याचे काम हे POD पुरवठादाराचे असल्याने तुमचा वाचणारा बराच वेळ तुम्ही व्यवसाय वाढीच्या तुमच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वापरू शकता.

चला हे तर झाले POD व्यवसायाचे फायदे. पण फायदे आले तिथे तोटे तर आपोआप येणारच. घाबरू नका ! या व्यवसायातील तोटे तुमचे कोणतेही नुकसान करणारे नसून ते आम्ही फक्त तुम्हाला व्यवसाय सुरु करताना कोणती काळजी घ्यावी लागेल यासाठी दर्शवित आहोत:

  • कोणत्याही गुंतवणुकीशिवाय हा व्यवसाय सुरु करता येत असल्याने जगभर अनेक लोक यात नव्याने उतरत आहेत, त्यामुळे यातील स्पर्धा ही वाढली आहे आणि पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी अनेक जण अगदी नगण्य किमतीत सुद्धा डिझाईन्स किंवा उत्पादने विकत असून यामुळे इतर POD व्यावसायिकांनासुद्धा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कमी नफा ठेवून आपले प्रॉडक्ट्स विकावे लागतात.
  • तुमच्या पुरवठादाराची उपलब्ध उत्पादनांची यादी अद्ययावत नसेल आणि तीच उत्पादने तुम्ही डिझाईनसह छपाईसाठी उपलब्ध आहेत असे जर ग्राहकांना सांगत असाल तर त्या उत्पादनांचे वितरण होण्यास नक्कीच उशीर होतो म्हणून तुम्ही या व्यवसायात पुरवठादाराच्या कार्यपद्धतीवर अवलंबून राहता.
  • तुमच्या पुरवठादाराकडून उत्पादनांची निर्मिती अथवा वितरणामध्ये काही चूक झाल्यास याचा फटका तुमच्या या व्यवसायातील प्रतिमेला बसू शकतो.
  • तुम्ही स्वतः उत्पादनाची निर्मिती करणार नसल्याने तुमचा पुरवठादार देईल त्याच दर्जाचे प्रॉडक्ट्स तुमच्या ग्राहकांना वितरित केले जातात. उत्पादनांचा दर्जा घसरल्यास त्याचा फटका तुमच्या व्यवसायालासुद्धा बसू शकतो.

इथेपर्यंत तुम्हाला POD व्यवसाय, त्याचे स्वरूप, फायदे-तोटे या गोष्टी नक्कीच समजल्या असतील, पण या व्यवसायात ग्राहकांना नक्की काय आवडते याचा योग्य कल ज्याला बांधता आला तो यशाला नक्कीच गवसणी घालू शकेल. या ऑनलाईन व्यवसायात कोणकोणती उत्पादनांची चलती आहे ते आपण पाहू.

  • प्रिंट ऑन डिमांड क्षेत्रात चालणारे प्रॉडक्ट्स:

तुम्हाला आता प्रिंट ऑन डिमांड व्यवसाय काय आहे हे तर कळले आहे पण या व्यवसायात उतरण्यासाठी अभ्यासपूर्ण तयारी करावी लागेल म्हणजेच या व्यवसायात नक्की कोणकोणत्या उत्पादनांना चांगली मागणी आहे हे जर तुम्ही समजून घेतले तर त्यानुसार तुम्हाला तुमची कल्पकता अजून योग्य पद्धतीने सादर करता येईल. POD या क्षेत्रात चालणारी काही महत्वाची उत्पादने खाली दिलेली आहेत:

  • कपडे (Apparel):

कपड्यांची खरेदी आधी फक्त सणासुदीला किंवा लग्नकार्यात केली जायची पण ऑनलाईन शॉपिंगच्या प्रसारामुळे फक्त महिलाच नव्हे तर पुरुषवर्ग सुद्धा आता हवे तेव्हा कपड्यांची खरेदी करत आहेत आणि म्हणूनच या श्रेणीतील उत्पादनांना बाराही महिने चांगलीच मागणी असते. या श्रेणीत चालणारी काही उत्पादने खालीलप्रमाणे:

  • टी-शर्ट
  • हूडीज
  • लॉन्ग स्लीव्ह टॉप्स
  • फ्लिप फ्लॉप्स
  • सॉक्स
  • लहान मुलांचे कपडे
  • प्राण्यांचे कपडे
  • केसेस किंवा कव्हर्स:

आजच्या घडीला जवळपास प्रत्येक माणसाकडे स्मार्टफोन किंवा फोन हा असतोच आणि त्यातील अनेकजण आपल्या फोनला हवे तसे कव्हर (Cover) किंवा केस (Case) लावण्याला प्राधान्य देतात आणि म्हणूनच आकर्षक फोने केसेसच्या उत्पादनांना जगभरातून प्रचंड मागणी आहे. जसे प्रत्येक फोनचा आकार वेगळा तसे प्रत्येक फोनचे कव्हर वेगळे, म्हणजेच तुम्ही हजारो फोन्स किंवा अशा उत्पादनांसाठी डिझाईन्स बनवू शकता. खालील उत्पादनांसाठी तुम्ही भन्नाट डिझाईन्स तयार करू शकता:

  • फोन
  • स्मार्टफोन
  • टॅबलेट
  • लॅपटॉप
  • स्टेशनरी:

आपण कितीही डिजिटल झालेलो असलो तरी स्टेशनरीचा आपला दैनंदिनी जीवनातील वापर हा कमी झालेला नाही आणि तो तसाच सुरु राहणार आहे. शालेय विद्यार्थी ते व्यावसायिक, प्रत्येकजण कोणत्या न कोणत्या स्वरूपात स्टेशनरी उत्पादनांचा वापर करतच असतो आणि त्यातच POD च्या उपलब्धतेमुळे लोकांचा कल कस्टमाइझ स्टेशनरीकडे वाढत आहे. या श्रेणीमध्ये तुम्ही खालील उत्पादनांसाठी डिझाईन्स बनवू शकता:

  • वह्या
  • स्टिकर्स
  • कॅलेंडर्स
  • गिफ्ट पेपर
  • Wrapping पेपर
  • भेटकार्ड
  • ऑफिस डायरी
  • गृह सजावट:

घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याची सजावट हा तर बऱ्याच लोकांचा आवडीचा भाग आहे. आपले घर प्रसन्न व सुंदर कसे दिसेल यासाठी अनेकजण गृह सजावटीच्या विविध उत्पादनांची खरेदी करत असतात. खालील काही उत्पादने या श्रेणीत प्रामुख्याने मागणीत असतात:

  • नेम प्लेट्स
  • डिझायनर पडदे
  • पिलो कव्हर्स
  • गालिचे
  • शोभेच्या वस्तू
  • वॉल स्टिकर्स
  • वृक्ष लागवडीच्या कुंड्या व इतर सामान

ही तर काही मोजक्या उत्पादनांची यादी झाली, या व्यतिरिक्त विविध श्रेणींमधील हजारो उत्पादने तुम्ही विविध POD प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असल्याचे पाहू शकता. वर नमूद केलेलीच उत्पादने तुम्ही विचारात घेतली पाहिजेत असे काहीही नसून तुम्हाला ज्या श्रेणीमध्ये रस आहे आणि ज्याला बाजारात चांगली मागणी आहे किंवा मागणी येऊ शकते आणि जी POD पुरवठादारांकडून सहजरीत्या उपलब्ध होऊ शकतील अश्या उत्पादनांचा योग्य अभ्यास करून त्यासाठी तुम्ही चांगले डिझाईन्स बनवून उत्तम कमाई करू शकता.

  • प्रिंट ऑन डिमांड व्यवसायासाठी उपयुक्त POD प्लॅटफॉर्म्स:

प्रिंट-ऑन-डिमांड व्यवसायात तुमचे डिझाईन जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्व तुमच्या POD पार्टनरला सुद्धा आहे कारण दर्जेदार डिझाईन सोबतच उत्पादनांचा दर्जा आणि वितरणाचा कालावधी या गोष्टींवर तुमच्या व्यवसायाची वाढ अवलंबून आहे. खाली काही लोकप्रिय POD प्लॅटफॉर्म्सची नावे आम्ही सुचवीत आहोत.

  • Printrove.com :

Printrove.com हा अतिशय लोकप्रिय असा भारतीय प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे तुम्ही १५०० हून अधिक उत्पादनांसाठी POD सेवा पुरवू शकता.

प्रिंट-ऑन-डिमांड - बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय
  • Printship.in:

टी -शर्ट, मग किंवा पोस्टर्स यासारख्या उत्पादनांना जर तुमचे प्राधान्य असेल तर Printship.in हा एक उत्तम प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही POD व्यवसायाला सुरुवात करू शकता.

प्रिंट-ऑन-डिमांड - बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय
  • Hothatt.com:

२०१२ साली सुरु केलेला हा प्लॅटफॉर्म आज भारतातील नावाजलेला आणि खात्रीशीर ड्रॉपशिपिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जातो. (ड्रॉपशिपिंग काय आहे हे जाणून घेण्यासाठी आमचा हा माहितीपूर्ण लेख वाचा).

प्रिंट-ऑन-डिमांड - बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय

ही तर काही मोजकी नावे झाली पण याव्यतिरिक्त तुम्ही अनेक जगप्रसिद्ध POD प्लॅटफॉर्म्स जसे की – RedBubble, Printify, Merch by Amazon, Zazzle, Printful, TeeSpring यांचाही विचार करू शकता. शेवटी जो POD पार्टनर तुमच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करेल त्याचीच तुम्ही निवड करा.

शेवटी काय तर..

तुमची कल्पकता ही फक्त तुमच्या मनात, तुमच्या विचारात किंवा तुमच्या डोक्यात साठवून ठेवण्यापेक्षा तिचा प्रत्यक्षात वापर करून नाव, प्रसिद्धी आणि सोबतच उत्तम अर्थार्जन करण्याची संधी तुम्हाला प्रिंट-ऑन-डिमांड या व्यवसाय प्रकारामुळे प्राप्त होत आहे. तुमचे डिझाईन हे तुमच्या ग्राहकांच्या भावनांना हात घालणारे किंवा त्यांच्या मनाला चटकन भावणारे असेल तर या व्यवसायात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. तुमच्या डिझाईन कौशल्यासोबतच तुम्हाला मार्केटिंगच्या नवनवीन संकल्पना आत्मसात कराव्या लागतील जेणेकरून त्याद्वारे तुम्ही जास्तीत जास्त विक्री आणि समाधानकारक नफा मिळवू शकाल. खात्रीशीर POD पार्टनर निवडणे, बाजारात कोणत्या प्रकारच्या उत्पादनांना मागणी राहील याचा योग्य अंदाज बांधणे आणि ग्राहकांना आकर्षित करतील अशा डिझाईन्स बनविणे या गोष्टींवर तुमची व्यवसायातील प्रगती अवलंबून राहील. प्रिंट-ऑन-डिमांड हा व्यवसाय कोणत्याही गुंतवणुकीशिवाय तर सुरु करता येतोच पण या व्यवसायात यश आणि चांगला नफा मिळविण्यासाठी निदान सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी तुम्हाला नक्कीच द्यावा लागेल.

शेअर करा

Leave a Comment