कुकिंग क्लासेस- घरबसल्या कमाईचा एक खास मार्ग

माणसाच्या आयुष्यात अनेक महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्यातील एक जिव्हाळ्याची म्हणजे जिभेची तृप्ती करणारी आणि परिणामी मनाला आनंद देणारी गोष्ट म्हणजे खादाडी. माणूस जन्माला आल्यापासून ही खादाडी सुरु होते ती जीवनाचा अंत होईपर्यंत सुरूच असते. अक्षरशः लाखो प्रकारचे पदार्थ आपल्या जिव्हेची तृप्ती करण्यासाठी बनविले जातात. मग सर्व मानव जातीच्या या गरजेचा वापर आपणही कमाई करण्यासाठी का करायचा नाही ? अनेकांना घराबाहेर पडून पैसे मिळविणे अनेक कारणांनी शक्य नसते. त्यासाठी घरात बसल्या बसल्या कमाई कशी करता येईल या साठी अनेकांना काही मार्गदर्शन मिळावे असेही वाटत असते. या लेखाचा उद्देश असे मार्गदर्शन देणे हाच आहे.

तुम्ही विविध पदार्थ बनविण्यात कुशल असाल तर घरबसल्या कमाईचा रस्ता तुमच्यासाठी खुला आहे. असे अनेकदा घडते की आपल्या हातचे काही विशिष्ट पदार्थ अनेकांना खूप आवडत असतात. याची प्रचीती आपल्याला घरातून, नातेवाईक, मित्रमंडळी याच्याकडून वेळोवेळी मिळत असते. मग पदार्थ बनविण्याचे आपले कौशल्य दुसऱ्यांना शिकविणे म्हणजेच कुकिंग क्लास घेण्याचा विचार का करायचा नाही?

आज टीव्ही, सोशल मिडियावर नामवंत शेफ विविध पदार्थ करून दाखवीत असतात हे आपण पाहतो. मास्टर शेफ सारख्या स्पर्धा तुफान चालतात तर सर्व वाहिन्यांवर महिलांसाठी ‘आम्ही सारे खवैये’ सारखे विविध प्रकारचे पदार्थ करून दाखविण्याच्या कार्यक्रमांना प्रचंड प्रेक्षक वर्ग लाभतो. म्हणजेच या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. याचा फायदा तुम्ही घरबसल्या तुमचे स्वतःचे कुकिंग क्लास सुरु करून कमाई करण्यासाठी करून घेऊ शकता. अर्थात त्यासाठी काही तयारी करायला हवी. ती कोणती आणि कशी करायची याची माहिती आपण येथे घेणार आहोत.

कुकिंग क्लास मधली विविधता

कुकिंग क्लास अनेक प्रकारचे आहेत. साधा स्वयंपाक शिकविणारे क्लासेस आहेत तसेच देश विदेशातील विविध खास पाककृती शिकविणारे क्लासेस सुद्धा आहेत. पारंपरिक पदार्थ, बेकरी पदार्थ, मधल्या वेळेच्या खाण्याचे पदार्थ, पक्वान्ने, जुने विस्मरणात गेलेल्या आजीच्या रेसिपी, लोणची, मसाले, जाम जेली, चॉकलेट, रेस्टॉरंट स्टाईल पदार्थ, चायनीज, इटालियन, स्पॅनिश, कॉन्टिनेंटल अश्या विविध देशांच्या पाककृती, खास पुरुषवर्गासाठी स्वयंपाक वर्ग, लहान मुलांना सहज बनविता येतील अशा रेसिपी, मधुमेहींसाठी खास पदार्थ, फिटनेस साठी योग्य पदार्थ, साखरेविना बनविले जाणारे गोड पदार्थ, डाएट फूड, विना तेलाचे पदार्थ, स्ट्रीट फूड, दुधाचे पदार्थ, मायक्रोवेव्ह मध्ये बनविता येतील असे पदार्थ, खास पार्टी मेन्यू असे विविध क्लासेस आज घेतले जातात.

यातील तुमची खासियत कशात आहे हे प्रथम निश्चित करणे हे कुकिंग क्लास सुरु करण्यातील पहिली पायरी म्हणता येईल. शाकाहारी आणि मांसाहारी आणि आजकाल ट्रेंड मध्ये असलेले वेगन फूड हेही पर्याय आहेत. एकदा तुम्ही कोणते पदार्थ शिकविणार हे ठरले की मग तुम्हाला हा उद्योग फावल्या वेळात करायचा आहे की पूर्ण वेळेसाठी हे ठरवावे लागते. कारण त्यावर तुम्हाला या व्यवसायात किती आणि कशी गुंतवणूक करावी लागेल हे ठरणार आहे.

अशा प्रकारे घेता येतात क्लासेस

कुकिंग क्लास विविध प्रकारे घेतले जातात. घराच्या घरी कुकिंग क्लासची जाहिरात देऊन नोंदणी केलेल्या सदस्यांसाठी क्लास घेता येतात त्यात पदार्थ तुम्ही करून दाखविणे आणि उपस्थित सदस्यांनी तो करताना पाहणे व नोंदी घेणे असा एक प्रकार आहे तसेच भाडे तत्वावर घेतलेल्या किचन मध्ये तुम्ही पदार्थ करत असताना विद्यार्थ्यांनी तो पाहून तेथेच बनविणे हाही एक प्रकार आहे. शिवाय आज इंटरनेट मुळे जग जवळ आल्याने ऑनलाईन क्लासेस सुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहेत. तुम्ही सुद्धा असे ऑनलाईन क्लास घेऊ शकता.

ज्या प्रकारचे पदार्थ तुम्ही शिकविणार असाल त्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे, स्वयंपाकाची भांडी, पदार्थ सजविण्यासाठी खास भांडी आपल्या संग्रही हवीत. म्हणजे समजा तुम्ही बेकिंग क्लास घेणार असला तर केक, बिस्कीटासाठी आवश्यक बेकिंग ट्रे, ओव्हन, आयसिंग साठी लागणारे सामान, डेकोरेशन मटेरियल, केकचे विविध आकारांचे साचे हवेत.

हे प्रश्न अगोदर स्वतःला विचारा

कुकिंग क्लास सुरु करायचे हे ठरले असेल तर तुम्ही सर्वप्रथम स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत. ते म्हणजे कोणत्या ग्राहक वर्गाला तुम्ही यात टार्गेट करणार आहात?

दुसरा प्रश्न, असे क्लासेस घेण्यामागचा तुमचा उद्देश काय?

तुम्ही या साठी किती वेळ देऊ शकता?

तुमचे नक्की ध्येय कोणते आणि त्यात सर्वाना सामील करून घेता येईल का?

यासाठी गुंतवणूक किती करावी लागेल?

आणि कोणत्या प्रकारे तुम्हाला हे क्लासेस घेणे शक्य आहे, म्हणजे घरात, क्लासच्या जागेत की ऑनलाईन?

वरील प्रश्नाची उत्तरे तुम्ही नक्की केलीत की पुढची तयारी करायला हवी. एक सल्ला असा देता येईल की सुरवातीला तुमचे ध्येय सहज साध्य होईल असेच असू दे. त्यातून काय संधी निर्माण होतात हे लक्षात आले की क्लासचा विस्तार करण्याची योजना आखणे सोपे होते. आज हजारोच्या संखेने कुकिंग क्लासेस घेतले जात आहेत. तेव्हा येथे प्रचंड स्पर्धा आहे याची जाणीव अजिबात सुटू देता कामा नये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गर्दीतील एक होण्यापेक्षा काही तरी युनिक देण्याचा प्रयत्न करायला हवा.

ऑनलाईन क्लासेस

आज अनेकांना कुकिंग शिकण्याची इच्छा आहे पण वेळेअभावी क्लासला प्रत्यक्ष जाणे शक्य नसते. त्यामुळे ऑनलाईन कुकिंग क्लासेसची सध्या खूप चलती आहे. ऑनलाईन क्लास मुळे तुम्हाला केवळ तुमच्या परिसरातीलच नाही तर शहर, राज्ये, देश विदेशातून विद्यार्थी मिळू शकतात. तुम्ही ऑनलाईन क्लास घेण्याचा विचार करत असला तर त्यासाठी सुद्धा तयारी हवीच.

मार्केट रिसर्च

तुमचा स्वतःच ऑनलाईन क्लास सुरु करण्यापूर्वी तुम्हाला मार्केट रिसर्च म्हणजे बाजाराचा आढावा घ्यायला हवा. यात तुम्ही जे पदार्थ शिकविण्याचा विचार करता आहात त्या क्षेत्रात लोकप्रिय शेफ कसे क्लासेस घेतात हे समजून घ्यायला हवे. हे क्लासेस कसे ऑर्गनाइज केले जातात हे जाणून घेणे आवश्यक. प्रेक्षकांशी संवाद कसा साधला जातो याचे निरीक्षण करायला हवे, प्रेझेंटेशन कसे केले जाते याचेही बारकाईने निरीक्षण करायला हवे. यातून तुम्हाला तुमचे कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

समजा एखाद्याला हे शक्य नाही तर अश्यावेळी तुम्ही तुमची मित्रमंडळी, नातेवाईक, परिवार, शेजारी यानाही तुम्ही बनवीत असलेले खास पदार्थ खिलवून त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊ शकता आणि काही सूचना असतील तर त्याप्रमाणे बदल करू शकता.

ऑनलाईन प्लॅटफॉर्म

ऑनलाईन कुकिंग क्लास घ्यायचा निर्णय तुम्ही घेतला असेल तर तुमची स्वतःची वेबसाईट असणे केव्हाही चांगले. वेबसाईट तयार करून देणाऱ्या अनेक संस्था आहेत त्यांची या कामी मदत घेता येते. मात्र वेबसाईट तयार करताना बेसिक फिचर्स सह अन्य काही विशेष फिचर्स त्यात समाविष्ट केली जातील हे पहावे. उदाहरण द्यायचे तर वेबसाईटवर अॅक्सेस, इच्छुकांना पेमेंट करण्याची व्यवस्था, रिव्ह्यू स्वीकारणे,, रेटिंग सेट करून घेणे अशी फिचर्स सुद्धा दिली गेली तर अधिक सोयीचे होते.

ऑनलाईन कोर्स बनविणे कोणासाठी फायद्याचे आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर आम्ही सांगू इच्छितो की कोणीही स्वतःचा ऑनलाईन कोर्स बनवून तो विकू शकतो कारण यासाठी ना कुठल्या मोठ्या भांडवलाची गरज आहे ना की कुठल्या तंत्रज्ञानात प्राविण्य मिळविण्याची गरज आहे. तुम्हाला इतरांपेक्षा काय वेगळे माहिती आहे आणि त्याचे तुम्ही कोर्स स्वरूपात कसे रूपांतर करू शकतात एवढेच इथे महत्वाचे आहे.

डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

ऑनलाईन क्लासेस कसे घ्यावे यावरील माहिती साठी खालील लेख वाचू शकता :-

प्रमोशन किंवा प्रसिद्धी

अनेक अन्य व्यवसायांप्रमाणेच कुकिंग क्लास साठी सुद्धा प्रसिद्धी आवश्यक आहे. त्यासाठी अनेक मार्ग आहेत. जाहिराती, सोशल मिडिया, पत्रके, वर्तमानपत्रातून टाकली जाणारी पत्रके, तोंडी प्रसिद्धी असे अनेक मार्ग त्यासाठी अवलंबिता येतात. ऑनलाईन क्लास सुरु करताना तुम्ही ब्रांड नेम, लोगो तयार करून सोशल मिडीयावर त्याची प्रसिद्धी कशी करता येईल याचे मार्ग शोधले पाहिजेत. वेबसाईट प्रमोशन साठी क्लासची खासियत, फ्री इव्हेंट्स अरेंज करणे, व्हिडीओ शेअर करणे, डिस्काऊंट कुपन्स, स्पेशल ऑफर्स, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांचे फोटो देणे असे अनेक मार्ग चोखाळले जातात. त्यातील आपल्याला सोयीचे असतील त्याचा वापर करून घेता येतो.

फी आकारणी कशी करावी

तुमचा कुकिंग क्लास घरात असो वा ऑनलाईन. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून फी घेतली जातेच. तुम्ही अनेक प्रकारचे पदार्थ बनविण्याची वेगवेगळे क्लास घेणार असाल, म्हणजे स्नॅक्स, टेबल डेकोरेशन, सॅलड किंवा भाज्या कापण्याचे कौशल्य, बेकिंग असे विविध प्रकार शिकविणार असाल तर त्याला येणाऱ्या खर्चानुसार आणि लागणाऱ्या वेळेनुसार फी ठरविता येते. काही ठिकाणी प्रत्येक क्लास साठी स्वतंत्र फी घेतली जाते तर काही ठिकाणी सिरीज क्लासेस साठी मेंबरशिप घेतली जाते.

सर्वात महत्वाचे

कोणताही उद्योग व्यवसाय सुरु केला म्हणजे लगेच तो जोरात चालेल अशी अपेक्षा करणे बरोबर नाही. काही जणांना अल्पवधीत प्रचंड यश मिळते तर काही जणांना दीर्घ काळ प्रयत्न करावे लागतात. दुसऱ्याचा व्यवसाय जोरात चालला म्हणजे माझाही चालेल या भ्रमात न राहता आपण जो व्यवसाय सुरु केला आहे तो पूर्ण प्रयत्नांनी सुरु ठेवणे, प्रचंड कष्ट करण्याची तयारी, वेळोवेळी आपल्या व्यवसायातील त्रुटी शोधण्याची आणि त्या दूर करण्याची तत्परता, वेळेचे विशेष नियोजन, दर वेळी आपल्या क्षेत्रात नवीन काय येतेय याचा आढावा घेण्याची तयारी हवी.

दुसरे म्हणजे गुंतवणूक जितकी कमी तितकी रिस्क कमी हे लक्षात घेऊन आपली आवड आणि ऐपत पाहून व्यवसायाचा व्याप किती मोठा ठेवायचा याचा निर्णय अगोदरच घ्यायला हवा. व्यवसाय यशस्वी ठरला तर त्याचा विस्तार करणे सहज शक्य होते त्यामुळे सुरवात एकदम मोठ्या गुंतवणुकीने करण्यापूर्वी सर्व बाजूनी नीट माहिती मिळवून, व्यवसायातील धोके, फायदे लक्षात घेऊन मग निर्णय घ्यावा.

शेअर करा
error: Alert: Content is protected !!