शहरांची वाढती लोकसंख्या फूड ट्रक व्यवसायासाठी फायद्याची ठरत असते याचा अनुभव आता भारतात सुद्धा येऊ लागला आहे. भारतात फूड ट्रक किंवा रेस्टॉरंट ऑन व्हील्स म्हणजे फिरती उपहारगृहे चांगलीच लोकप्रिय होताना दिसत आहेत. त्यामुळे ज्यांना या व्यवसायात उतरण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक चांगली व्यवसाय संधी निर्माण झाली आहे असे नक्की म्हणता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे फूड ट्रकला ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. यामुळेच गेल्या काही वर्षात या व्यवसायाची वाढ वेगाने होताना दिसते आहे.
त्याचा थेट परिणाम खाद्यान्न उद्योगात फूड ट्रक व्यवसायाची हिस्सेदारी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते आहे. तुम्हाला जर या व्यवसायात उतरण्याची इच्छा असेल तर त्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन या लेखातून करण्याचा प्रयत्न केला आहे.
या लेखातून काय माहिती मिळेल?
या लेखातून फूड ट्रक व्यवसाय संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात तुम्हाला
- फूड ट्रक इतिहास आणि व्यवसायाचे व्यूह शास्त्र
- भारतात फूड ट्रक व्यवसाय सुरु करण्यासाठी १० महत्वाची मार्गदर्शक तत्वे
- फूड ट्रक साठी आवश्यक स्वयंपाक उपकरणे व आवश्यक कच्चा माल
- व्यवसाय परवाना अर्ज, आवश्यक परवानग्या, परमिट
- हा व्यवसाय सुरळीत सुरु ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ
- तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक पीओएस सॉफ्टवेअर
- फूड ट्रक कर्मचारी वर्गासाठी गणवेश ठरविणे
- व्यवसायासाठी बाजारपेठ
- ब्रँडिंग
- हा व्यवसाय सुरु करण्यासाठी येणारा खर्च, फायदे आणि व्यवसायातील आव्हाने यासारख्या बाबी
फूड ट्रक इतिहास आणि व्यूह शास्त्र म्हणजे लॉजिस्टिक्स
भारतापुरता विचार करायचा तर येथे सध्या दोन प्रकारचे फूड ट्रक ऑपरेटर सेवा देत आहेत. त्यात छोटे ट्रक आणि मोठे म्हणजे बसटॉरंट म्हणजे डबल डेकर सेट अप यांचा समावेश आहे.
छोटे ट्रक – जेथे छोट्या ट्रक मध्ये व्यवसाय केला जातो आहे तेथे ब्रँडिंग फारसे करावे लागत नाही तसेच कमी उपकरणे आणि मर्यादित खाद्य पदार्थ श्रेणी ठेऊन हा व्यवसाय केला जातो आहे. यात प्रामुख्याने टिफिन म्हणजे डबे देणे, उपहाराचे पदार्थ म्हणजे स्नॅक्स, आणि चायनीज पदार्थ विकले जातात. हा छोटा ट्रक एक किंवा दोन वाहनांसाठी डिझाईन केलेल्या पार्किंग जागेत सुद्धा मावतो आणि थोडीही जागा वाया जात नाही.
बसटॉरंट – म्हणजे डबल डेकर सेटअप. हे चालते फिरते वाहन असते. अश्या प्रकारचे वाहन सर्वप्रथम ‘मुव्हिंग कार्ट’ ने सर्वप्रथम वापरात आणले. एप्रिल २०१३ मध्ये मुव्हिंग कार्ट कंपनी आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग यांनी परस्पर सहकार्यातून असा फूड ट्रक सुरु केला. याच कंपनीकडून पहिला फूड ट्रक चेन्नई येथे चालविला जात आहे.
राष्ट्रीय उपहारगृह संघटनेचा २०१७ चा अहवाल सांगतो, या वर्षापर्यंत फूड ट्रक व्यवसायातील महसूल २.७ अब्ज डॉलर्सवर होता. फूड ट्रकचा मुख्य फायदा म्हणजे हे वाहून एका जागेवरून दुसऱ्या जागी नेता येते. विविध ठिकाणी जाऊन फूड ट्रक व्यावसायिक व्यवसाय करू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रेस्टॉरंट किंवा उपहारगृह सुरु करण्यासाठी जेवढे भांडवल गुंतवावे लागते त्यापेक्षा फूड ट्रक साठी खूपच कमी भांडवल गुंतवावे लागते.
यामुळे फूड ट्रकही आज या क्षेत्रात क्रेझ बनले आहेत आणि भारतात मोठ्या शहरात जागोजागी फूड ट्रक दिसू लागले आहेत. शहराचा विचार केला तर या व्यवसायाची वार्षिक वाढ ८.४ टक्के आहे. याचा परिणाम असा होतो आहे की छोट्या उपहारगृहाचे मालक सुद्धा फुड ट्रक मध्ये गुंतवणूक करू लागले आहेत. स्थानिक जागी एक रेस्टॉरंट सुरु करण्यापेक्षा फूड ट्रक अधिक चांगला पर्याय का ठरतो आहे याची माहिती त्यासाठी करून घ्यायला हवी.
महत्वाच्या मार्गदर्शक १० पायऱ्या
व्यवसाय आखणी म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट – व्यवसाय सुरु करताना भविष्यातील विस्ताराचा विचार केला जातो. व्यवसाय किती मोठा अथवा छोटा याचा विचार करून व्यवसाय आखणी आणि त्याचा व्यवसाय आराखडा ज्याला प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतात तो तयार करावा लागतो. अर्थात त्यासाठी प्राथमिक मार्गदर्शन हवे. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना खालील प्रमुख बाबी लक्षात घ्याव्या लागतात.
- बाजाराचे विश्लेषण – फूड ट्रक व्यवसायाचा विचार करताना सर्वप्रथम ज्या शहरात आपण व्यवसाय सुरु करणार आहोत त्या शहराची खासियत किंवा खास वैशिष्ठे लक्षात घ्यायला हवीत. शहरात लोकप्रिय असलेले पदार्थ, चव यांचा विचार करताना तुम्ही कोणत्या भागात व्यवसाय करणार ते नक्की करून त्याप्रमाणे योजना बनवायला हवी. त्यासाठी शहराचे कायदे, नियम व्यवस्थित समजावून घेणे आवश्यक आहे.
- गरजांचा शोध – व्यवसाय चालविण्यासाठी तुमची मालकी, त्यासाठीचे परवाने, परवानग्या असणे गरजेचे आहे. यामुळे व्यवसाय सुरळीत सुरु ठेवणे शक्य होते.
- बजेट – पहिल्या वर्षात व्यवसाय सुरु राहण्यासाठी लागणारया पैशांची तरतूद अगोदरच करणे योग्य ठरते. कारण व्यवसाय सुरु केल्याच्या पहिल्या काही महिन्यात नफा मिळेलच याची खात्री देता येत नाही.
- ट्रक – व्यवसायासाठी तुम्ही जो ट्रक निवडणार तो तुमच्या व्यवसायाचा सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यामुळे सुरवात करताना फायदे तोटे समजावून घेऊन ट्रक भाड्याने घ्यायचा की विकत घ्यायचा याचा निर्णय घेता येतो.
- आकर्षक मेन्यू आणि रास्तदर – फूड ट्रकच्या व्यवसायाचा हा मूळ मंत्र मानायला हवा. आकर्षक मेन्यू आणि रास्त दर यामुळे सुरवातीला नफा कदाचित कमी मिळेल पण त्यामुळे तुमचे ग्राहक कायम तुमच्याशी जोडले राहतील. काही काळानंतर पदार्थात विविधता आणून जास्त दर लावले तरी ग्राहकाचा विश्वास संपादन केल्यामुळे जास्त दर असले तरी ग्राहक येत राहतील.
- सोशल मीडियाचा लाभ – व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी स्वतःची वेबसाईट तयार करण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा आणि पैसा खर्च करायला हवा. तुमच्या शहरात तुम्ही कोठे व्यवसाय करणार तेथील समुदाय, समाजाचा विचार करून वेबसाईट तयार केली तर स्थानिक बोलबाला होतोच पण या माध्यमातून तुम्ही चर्चा, संवाद घडवून आणू शकता.
- बिल रक्कम पध्दत – या व्यवसायात स्पर्धा तगडी आहे. त्यामुळे ग्राहक परत जायला नको असेल तर त्याला बिल देताना अनेक पर्याय उपलब्ध करून द्यायला हवेत. तुम्ही फक्त रोख बिल घेत असला तर त्यात ग्राहक तुमच्या स्पर्धकाकडे जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आज उपलब्ध असलेल्या गुगल पे, पेटीएम, डेबिट कार्ड मशीन अश्या सुविधा ग्राहकाला उपलब्ध करायला हव्यात.
योग्य फूड ट्रकची निवड
व्यवसाय सुरु करताना सर्वप्रथम योग्य फूड ट्रक किंवा व्यावसायिक वाहन निवडणे आवश्यक आहे. तुम्ही कोणते पदार्थ विकणार त्यावर फूड ट्रकचा आकार ठरत असतो. समजा तुम्ही इटालियन, कॉंटीनेंटल प्रकारचे खाद्यपदार्थ विकणार असलात तर त्यासाठी १८ फुट लांबीचे व्यावसायिक वाहन योग्य ठरेल. आणि असे नवे वाहन घ्यायचे तर किमान ८ ते १० लाख रुपये लागणार. बाजारात आज टाटा, महिंद्र, अशोक लेलँड कंपन्यांचे अनेक प्रकारचे ट्रक त्यासाठी उपलब्ध आहेत. त्यातून तुम्ही निवड करू शकता.
व्यवसायात तुम्हाला सुरवातीला कमी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही जुना ट्रक खरेदी करू शकता. असे ट्रक तुम्हाला अर्ध्या किमतीत मिळू शकतात. पण जुना ट्रक खरेदी करताना ट्रकची अवस्था, ट्रकची स्थिती पाहायला हवी त्याचबरोबर वाहन फिटनेस प्रमाणपत्र, नोंदणी, पथकर पावती, विमा या कागदपत्रांची तपासणी करायला विसरू नये. शक्यतो पाच वर्षापेक्षा अधिक जुना ट्रक घेऊ नये. कारण अनेक राज्यांनी प्रदूषण कमी करण्यासाठी १० वर्षापेक्षा जुन्या वाहनांवर बंदी आणली आहे.
एकदा ट्रक ची निवड झाली की बाकी खर्चाचा विचार करायला हवा. जुना ट्रक घेतला असेल तर तुमच्या गरजांनुसार त्यात आवश्यक बदल करून घ्यावे लागतील. त्यासाठी १ लाखाचा जादा खर्च धरावा. जुन्या ट्रक साठी साधारण ५ लाख रुपये गुंतवायला हवेत. आता असाही विचार कुणी करेल की इतक्या पैशात ४५० चौरस फुट दुकान भाड्याने घेतले तर जास्तीत जास्त ४० हजार भाडे द्यावे लागेल म्हणजे ते स्वस्त पडेल. पण दीर्घकाळचा विचार केला फूड ट्रक साठी किती किंमत द्यावी लागतेय याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल.
याचे कारण म्हणजे ट्रक साठी तुम्हाला भाडे भरावे लागणार नाही आणि भरावे लागले तरी ते अगदी कमी असेल. हे भाडे तुम्ही कोणत्या परिसरात व्यवसाय करता आहात त्यावर ठरत असते.
स्वयंपाक उपकरणे आणि कच्चा माल
ट्रकची निवड झाली की पुढचा खर्च आहे तो पदार्थ बनविण्यासाठी लागणारी उपकरणे आणि त्यासाठीचा कच्चा माल. स्वयंपाक उपकरणांसाठी साधारण ३ लाख रुपये गुंतवावे लागतील. त्यात मायक्रोवेव्ह, ज्यूसर, मिक्सर, फ्रिजर, रेफ्रिजरेटर, ग्रीलर, स्टीमर, कामासाठी टेबल, गॅस शेगडी, एग्झॉस्ट फॅन, जनरेटर किंवा मोठ्या बॅटरीचा इन्व्हर्टर याचा मुख्य समावेश आहे. ही बहुतेक उपकरणे इलेक्ट्रोनिक असल्याने नवीन घेणे चांगले. कारण नव्या उपकरणावर १ वर्षाची वॉरंटी मिळते. परिणामी रोज देखभालीच्या खर्चाची काळजी रहात नाही. फ्रिजर, रेफ्रिजरेटर सारखी काही उपकरणे सेकंड हँड घेतली तर पैसा वाचू शकेल आणि तो अन्यत्र वापरता येईल. तसेच भांडी कुंडी, डिशेस सारख्या वस्तू, ग्राहकांसाठी खुर्च्या हा खर्च विचारात घ्यायला हवा.
कच्चा माल भरताना तो साधारण एक आठवडा पुरेल इतकाच घ्यावा. त्यासाठी अंदाजे ३० हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकेल. व्यवसायाचे पाहिले काही आठवडे तरी हीच पद्धत ठेवली तर दरवेळी ताजा माल मिळेल आणि तुमच्या पदार्थांची विक्री कशी होते हे पाहून कुठली पद्धत अधिक फायदेशीर याचा अंदाज घेता येईल.
परवाना, परवानगी
भारतात अजून तरी फूड ट्रक / रेस्टॉरंट व्यवसायासाठी स्वच्छ किंवा क्लिअर कट कायदे किंवा नियम नाहीत. या व्यवसाय परवानगीसाठी नक्की कुठली कागदपत्रे आवश्यक आहेत त्यात स्पष्टता नाही. तरीही व्यवसाय परवाना मिळविण्यासाठी काही परवानग्या लागतात. तसेच तुमचा फूड ट्रक शहराच्या कुठल्याही भागात नेण्यासाठी सुद्धा काही परवानग्या घ्याव्या लागतात. त्या खालील प्रमाणे
- आगसुरक्षा प्रमाणपत्र
- शॉप, एस्टॅब्लीशमेंट परवाना
- प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आरटीओ चे एनओसी म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र
- महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र
- एफएसएसएआय चा मोबाईल व्हेंडर परवाना
- किचन विमा
या सर्व कागदपत्र पूर्ततेसाठी साधारण ५० हजाराचा खर्च येऊ शकतो. अर्थात ही कागदपत्रे मिळविण्यासाठी अनेक सल्लागार संस्था आहेत.
मनुष्यबळ
फूड ट्रकचा व्यवसाय करायचा असेल तर किमान दोन शेफ म्हणजे पदार्थ तयार करणारे, एक मदतनीस हवेतच. शेफचा सरासरी पगार महिना १४ ते १५ हजार तर मदतनीसचा पगार महिना साधारण ८ हजार गृहीत धरायला हवा.
तुम्हाला डिलीव्हरी मॉडेल फूड ट्रक व्यवसाय करायचा असेल तर किमान दोन डिलीव्हरी बॉईज किंवा पदार्थ देणारी मुले हवीत. अथवा खाद्यपदार्थ डिलीव्हरी देणाऱ्या लॉजिस्टिक कंपन्यांची म्हणजे स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांची मदत घेऊ शकता. या कंपन्या एका डिलीव्हरीसाठी साधारण ४० ते ५० रुपये आकारतात. डिलीव्हरी सेवा या व्यवसायात चांगली ठरते कारण त्यामुळे फूड सेवा बाजारात तुमची ओळख निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे किमान १ डिलीव्हरी बॉय नेमायला हवा. तातडीच्या वेळी हाच मुलगा कच्चा माल पुरविण्यास सुद्धा मदत करू शकतो.
पीओएस सॉफ्टवेअर (पॉइंट ऑफ सेल सॉफ्टवेअर)
व्यवसाय करत असताना तुमच्या विक्रीचे तपशील, डेटा सुरक्षित राहील आणि तो साठवून ठेवता येईल यासाठी पीओएस सॉफ्टवेअर एक चांगला पर्याय आहे. त्यात तुमचा उद्योग, विक्री याची सविस्तर माहिती साठवून ठेवता येईल. आजची या क्षेत्रातली स्पर्धा पाहता उत्तम प्रकारच्या पीओएस सॉफ्टवेअरची निवड करायला हवी.
क्यूएसआर व अन्य फूड व्यावसायिक ग्राहकांचा डेटा, रिपीट ऑर्डर मिळण्यासाठी तसेच ग्राहकांच्या प्रतिक्रिया पाहता याव्यात यासाठी असे उत्तम दर्जाचे पॉइंट ऑफ सेल म्हणजे पीओएस हवे. यासाठी वर्षाला साधारण २४ हजार म्हणजे महिना २ हजार खर्च येईल.
स्टाफ गणवेश
तुमच्या व्यवसायाला ब्रांड फील येण्यासाठी कर्मचाऱ्यांचा गणवेश हातभर लावत असतो. यामुळे ग्राहकांच्या तुमच्यावरील विश्वास वाढण्यास मदत मिळते. गणवेशात साधारणपणे स्टँड कॉलर टी शर्ट किमंत अंदाजे १५० रुपये, शेफ साठी शेफ कोट प्रत्येकी दोन, किंमत अंदाजे ३५० रुपये आणि अन्य कर्मचाऱ्यांना टी शर्ट व टोपी असा विचार केला तर हा खर्च ५ कर्मचाऱ्यांसाठी ६ ते ७ हजारापेक्षा अधिक होत नाही.
व्यवसाय विपणन म्हणजे बिझिनेस मार्केटिंग
ठराविक जागी चालविली जाणारी रेस्टॉरंट आणि फूड ट्रक यांची तुलना केली तर असे म्हणता येईल की क्यूआरएस पेक्षा फूड ट्रकना ते पुरवत असलेले पदार्थ सांगणारी पत्रके कमी प्रमाणात लागतात. याचे मुख्य कारण म्हणजे फूड ट्रकचा प्राथमिक व्यवसाय डिलीव्हरी पेक्षा ग्राहकांची प्रत्यक्ष भेट यावर आधारित असतो. तरीही या व्यवसायाची सुरवात करताना १५ हजार प्रसिद्धी प्रत्रके छापून घेणे श्रेयस्कर. त्यासाठी साधारण २० हजार खर्च येतो. शिवाय तुम्ही व्यवसाय करणार असलेल्या भागात काही बिलबोर्ड, बॅनर्स लावायला हवीत. त्यासाठी साधारण १० हजार रुपये खर्च येऊ शकेल.
एक लक्षात ठेवले पाहिजे की व्यवसाय प्रसिद्धी साठी आजच्या इंटरनेट युगात केवळ ऑफलाईन बझ किंवा चर्चा उपयोगाची नाही. यासाठी व्यवसाय चर्चेत राहावा, त्याची योग्य जाहिरात व्हावी यासाठी सोशल मिडिया म्हणजे समाज माध्यमांचा वापर करणे आवश्यक बनते.
सोशल मीडियावर तुमचे अस्तित्व असेल तर तुमचे ग्राहक, तुमचे फॉलोअर्स तुमचा फूड ट्रक कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी आणि कधी याची माहिती त्यांना मिळत राहते. त्यामुळे तुमचा जो ग्राहक वर्ग आहे तो सतत तुमच्याकडे येत राहील. एकदा का तुमचा ब्रांड ग्राहकांच्या मनावर ठसला, की तुमचे ग्राहकच तुमच्या व्यवसायाची जाहिरात करणारे माध्यम बनतील. याचा लाभ व्यवसाय वाढीसाठी होईल. तुम्ही देत असलेले डिस्काऊंट, नवीन पदार्थांचा तुम्ही तुमच्या मेन्यूत केलेला समावेश यावर भर देऊन तुम्ही डिजिटल मार्केटिंग हुशारीने कसे करता येईल याचा विचार करायला हवा.
याशिवाय संमेलने, सभा, सण, उत्सव, फूड फेस्टिव्हल, या निमित्ताने एकत्र जमणारे लोक, लोकप्रिय उद्याने, बागा या ठिकाणी तुमचा ट्रक लावत असलात तर अधिक चांगले. त्याचबरोबर कार्यक्रम संयोजकांशी टाय अप करणे, ग्राहकांबरोबर वैयक्तिक संबंध, कार्यक्रमाच्या ठिकाणी लकी ग्राहकांसाठी काही भेट वस्तू, तुमच्या ब्रांडच्या नावाचे टीशर्ट, मग्ज वाटप यांचाही वापर करून घेता येतो. या गोष्टींचा उपयोग व्यवसाय वाढीला हातभार लागण्यासाठी नक्कीच होतो.
चांगले पण आक्रमक स्वरूपाचे मार्केटिंग आणि प्रचार तुमच्या व्यवसायाचे यश ठरवीत असतात. ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रचारासाठी काही कळीचे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत.
ऑनलाईन प्रसिद्धी किंवा प्रमोशन
तुमच्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी अनेक गोष्टी डिजिटली करता येतात. त्यातील काही महत्वाचे मुद्दे असे –
- तुमची स्वतःची वेबसाईट, अॅप आणि ब्रांड बनवा. या वेबसाईटवर तुमच्या व्यवसायाची कथा व्यवस्थित आणि प्रभावीपणे मांडा. त्यासाठी आकर्षक फोटो, तुम्ही देत असलेले डिस्काऊंट यांचा वापर करा.
- स्विगी, झोमॅटो सारख्या बड्या इंडिअन ऑनलाईन फूड अॅग्रीगेटर्स बरोबर टाय अप करा.
- सोशल मिडियावर तुमचे अस्तित्व ठळकपणे दिसेल याची काळजी घ्या. त्यासाठी इन्स्टाग्राम, फेसबुक सारख्या माध्यमांचा वापर जरूर करा. त्यामुळे तुमचा ब्रांड बनण्यास हातभार लागेल. सोशल मिडिया वाहिन्यावर सतत युजरच्या नजरेसमोर राहण्याची काळजी घ्या, त्यासाठी सतत समाज माध्यमांवर अॅक्टीव्ह राहा.
- सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन साठी काही की वर्ड निवडा. हे की वर्ड म्हणजे कळीचे शब्द असे असायला हवेत कि त्यातून तुमच्या व्यवसायाची माहिती मिळेल. पेज लोड होण्यासाठी किती वेळ लागतो याचा अंदाज घ्या. तुम्ही मेगा टॅगिंग आणि डायरेक्ट लिस्टिंग मध्ये असाल तर गुगल वर सहज सापडू शकता.
- ऑनलाईन जाहिरातीचा उपयोग सर्च इंजिन, सोशल मिडियावर केला तर ऑनलाईन ऑर्डर वाढण्यास आणि तुमच्या ब्रांडची प्रतिमा अधिक स्पष्ट होऊन तुमच्या ब्रांड बाबत अधिक जागृती होऊ शकते. या कामासाठी काही पैसे बाजूला ठेवले पाहिजेत. प्रथम तुमचा ग्राहक वर्ग निश्चित करा. कस्टम ऑडीयन्स सेल्स वापरून तुम्ही तुमची जाहिरात करू शकता.
- सीआरएम अभियान, म्हणजे पॉइंट ऑफ सेल सॉफ्टवेअरच्या मदतीने ग्राहकांचे डीटेल्स तुमच्याकडे नोंदविले गेलेले असतात. त्याचा वापर करून एसएमएस, ईमेल्स चा वापर या अभियानासाठी करता येतो.
- डिजिटल मार्केटिंग
- डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.
- अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
ऑफलाईन प्रसिद्धी, प्रमोशन
- ऑफलाईन प्रसिद्धीसाठी पत्रके किंवा छापील जाहिरातींचा वापर करू शकता.
- स्थानिक विक्रेते, कार्यक्रम संयोजक याच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करणे अनेकदा उपयुक्त ठरते.
- वेळोवेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी काही स्पर्धा आयोजित करणे, लकी ग्राहकांसाठी काही बक्षिसे अश्या क्लुप्त्या वापरू शकता.
- आपला फूड ट्रक ज्या ठिकाणी आहे तेथे मोफत वायफायची व्यवस्था करू शकता.
- वेळोवेळी भरणारे खाद्य महोत्सव चुकवू नका. कुठे, कधी असे महोत्सव आहेत त्यावर लक्ष ठेवा.
ब्रँडिंग
तुमच्या ब्रँडिंग साठी ग्राहकांशी सहज जुळेल अशी एक आकर्षक, एकदम वेगळेपणा जपणारी गोष्ट तयार करणे फार महत्वाचे ठरते.
ब्रँड साठी गोष्ट तयार करताना ही काळजी घ्यावी
- सर्वप्रथम तुमचा ग्राहक कोण हे ठरवा. म्हणजे तरुण वर्ग, कुटुंब वगैरे. यामुळे तुमचा मार्केटिंग साठीचा कंटेंट बनविणे आणि समाज माध्यमांवर त्यासाठी योग्य अशी रणनीती बनविणे सोपे होईल.
- तुमचे स्पर्धक कोणते खाद्यपदार्थ ग्राहकांना उपलब्ध करून देतात, त्यांच्या प्रचारासाठी कोणती माध्यमे वापरतात, त्यांची खास वैशिष्टे अशी जेवढी म्हणून माहिती मिळविता येईल तेवढी मिळवा. तुमचा ब्रांड निर्माण करताना ही माहिती निश्चित उपयोगी येईल.
- गर्दीत तुमचा फूड ट्रक उठून दिसायला हवा यासाठी तुमचे वेगळेपण ग्राहकांच्या ठळकपणे समोर यायला हवे. ग्राहकाने तुमच्याकडूनच का खरेदी करावी याची स्पष्ट उत्तरे तुमच्याकडे तयार हवीत.
- ब्रांडचे नाव ठरविताना तुमचा जो ग्राहक वर्ग तुम्ही निश्चित केला आहे, त्यांना ते चटकन आपलेसे, ओळखीचे वाटेल असे नाव ठरवावे. उदाहरण द्यायचे तर ‘ इट अँड रन’, ‘ ओ बॉय’, व्हॉट ए ट्रक’ अशी काही देता येतील.
- ब्रँडिंग साठी लोगो महत्वाचा भाग आहे. त्यातून तुमच्या व्यवसायाचे डिझाईन, पद्धत प्रतीत होईल. शिवाय तुमचा फूड ट्रक, तुमचे फलक किंवा बॅनर्स, प्रसिद्धी, तुमचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म सर्वत्र दिसायला हवा.
अन्य बारीक सारीक पण महत्वाच्या बाबी
आरोग्य व स्वच्छता – फूड ट्रक बहुतेकवेळा छोट्या जागेत पदार्थ तयार करणे आणि विक्री अशी कामे करत असतात. त्यामुळे जेथे पदार्थ बनत आहेत त्या जागेची किंवा स्वयंपाकघराची स्वच्छता, वायू प्रदूषण पातळी, कचऱ्याची, वाया जाणाऱ्या पदार्थांची विल्हेवाट या विषयी विशेष दक्षता घ्यावी लागते. पर्यावरण प्रदूषणाचा फूड ट्रक व्यवसायावर मोठा प्रभाव पडू शकतो हे लक्षात ठेवायला हवे.
आरोग्य, स्वच्छताकाहीमुद्दे
- हवा प्रदूषण नियंत्रणासाठी चिमणीचा वापर करू शकता.
- वाया जाणारे पदार्थ किंवा निर्माण होणारा कचरा दिवसातून दोन वेळा साफ करून किचन जागा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
- आपला स्टाफ वाया जाणाऱ्या अन्नाची व्यवस्थित विल्हेवाट लावतोय आणि स्वच्छतेची काळजी घेतोय ना याकडे लक्ष द्यावे. कचरा पेट्या ट्रक शेजारी ठेऊन त्या वेळोवेळी स्वच्छ करणे या सारखे उपाय त्यासाठी योजता येतात.
- या शिवाय फूड ट्रकची सुरवात करताना किमान दोन मोबाईल फोन, गणक यंत्र म्हणजे कॅलक्यूलेटर, नोंदणी रजिस्टर, डेली बुक, परिसर स्वच्छ राहावा यासाठी २-३ मोठ्या कचरा पेट्या यांची तरतूद करावी.
खाद्य उद्योग क्षेत्रात फूड ट्रकचा व्यवसाय सुरु करताना त्याचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. ते कोणते हे समजून घेऊ.
जेथे स्थिर जागी हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालविली जातात तेथे अनेकदा जागा किंवा व्यवसायाचे स्थान अडचणीचे असू शकते. फूड ट्रक सुरु करताना अगोदरच जागा निश्चिती करण्याची सुविधा मिळते. त्यामुळे बाजार माहिती संशोधन करून योग्य जागा निवडता येते. फूड ट्रक साठी भाडे भरावे लागत नाही किंवा भाड्याने ट्रक घेतला असेल तरी स्थिर जागेपेक्षा हे भाडे बरेच कमी असते. फूड ट्रक साठी वीज बिल भरावे लागत नाही, कमी भांडवल पुरते आणि असा ट्रक चालविण्यासाठीचा खर्च ही तुलनेने कमी असतो.
याची दुसरी बाजू पण विचारात घेतली पाहिजे. फूड ट्रक व्यवसायात अनिश्चितता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यासाठी सरकारची स्पष्ट मार्गदर्शक तत्वे नाहीत किंवा वेगळे कायदे नाहीत. पण जबाबदारीने आणि काळजीपूर्वक आखणी केली तर फुट ट्रक व्यवसाय चांगला ठरतो. विशेषतः गुंतवणूकीच्या तुलनेत चांगला फायदा मिळविता येतो. अर्थात भाड्याने जागा घेऊन रेस्टॉरंट सुरु करण्यापेक्षा फूड ट्रक साठी थोडे अधिक भांडवल गुंतवावे लागते पण व्यवसाय चालविण्याचा खर्च कमी येतो.
भारतात फूड ट्रक सुरु करण्याचे फायदे
- प्रथम म्हणजे कमी गुंतवणूक असल्याने धोका कमी. व्यवस्थित आखणी करून खर्च केला तर साधारण १० लाखात हा व्यवसाय सुरु होऊ शकतो. यात ट्रक सेकंड हँड घेतला असे गृहीत धरले आहे.
- याचा मोठा फायदा म्हणजे अगदी कमी मनुष्यबळावर, अगदी १-२ लोकांच्या मदतीने सुद्धा हा व्यवसाय सुरु करता येतो.
- फूड व्यवसायाशी संबंधित माहिती, विविध कामांची माहिती असेल तर फूड ट्रक व्यवसायासाठी ती चांगली सुरवात ठरू शकते. या माहितीमध्ये डेटा विश्लेषण, ग्राहकांच्या चवीची, आवडी निवडीची खोलात जाऊन करून घेतलेली ओळख, ग्राहकांना सर्वाधिक आवडणारे पदार्थ, मार्केटिंग व्यवस्थापन, प्रमोशन अश्या माहितीचा समावेश होतो.
- रोजच्या व्यवसायातून दिवसाला ८ ते ९ हजाराची विक्री होऊ शकते. त्याचबरोबर अनेक कार्यक्रम, केटरिंग सुविधा देऊन प्राप्ती वाढविता येते. कार्पोरेट इव्हेंट, लहान मोठे समारंभ अश्या ठिकाणी केटरिंग सुविधा दिली तर एका कार्यक्रमातून २५ ते ३० हजाराची कमाई करता येते.
फूड ट्रक मालकांसमोरची आव्हाने
हवामान – हा व्यवसाय करताना तुम्ही पदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, व्यवसाय योजना यावर नियंत्रण ठेऊ शकता पण हवामानावर नियंत्रण ठेऊ शकत नाही. त्यामुळे हवामान खराब असल्यास त्याला तोंड देण्याची तयारी आणि योग्य तरतूद करावी लागते.
लोकेशनकिंवास्थान– व्यवसायाची जागा निवडताना तुम्ही जो ग्राहकवर्ग नजरेसमोर ठरविला आहे तो या जागी मोठ्या प्रमाणात यायला हवा, तुमच्या ट्रक कडे आकर्षित व्हायला हवा याची खबरदारी घ्यावी लागते. गर्दीची ठिकाणे, गर्दीच्या वेळा त्यासाठी महत्वाच्या ठरतात.
पार्किंग– तुमचा फूड ट्रक ज्या ठिकाणी तुम्ही उभा करणार त्याच्या आसपास पुरेशी मोकळी जागा असणे उत्तम. तसेच पार्किंगची परवानगी मिळेल याची खात्री असायला हवी. त्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क असणे सोयीचे ठरते.
स्थान– लोक वारंवार भेटी देतात अशी उद्याने, बागा, थियेटर्स, विद्यापीठे, मंदिरे अथवा अन्य धार्मिक स्थळे अश्या जागी ट्रक लावता येणे महत्वाचे ठरते.
स्पर्धक– या व्यवसायातील तुमच्या स्पर्धकाचे व्यवसाय ठिकाण कुठे याची काळजी घेऊन तुमचे व्यवसाय ठिकाण ठरवावे लागते.
परवाना– फुट ट्रक साठी नक्की कोणता परवाना हवा याची स्पष्टता कायद्यात किंवा नियमात नाही. त्यामुळे व्यवसायात खंड पडू नये यासाठी स्थानिक महापालिका, व्यवसायाशी संबंधित सरकारी अधिकारी आणि संपर्क साधने हाताशी असायला हवीत. तसेच एफडीए, वाहतूक पोलीस, पोलीस विभाग यांची ना हरकत प्रमाणपत्रे, किचन साठीचा अग्नीशमन परवाना आवश्यक आहे.
हेही लक्षात ठेवले पाहिजे की कोणत्याही शहरात सध्या पार्किंग ही मोठी समस्या आहे. त्यासंबंधीचे नियम स्पष्ट नाहीत. त्याचाही परिणाम व्यवसायावर होऊ शकतो.
——————