तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ?

तुम्ही बस-स्टॉप, रेल्वे-स्थानक, उद्यान किंवा सार्वजनिक ठिकाणी असाल तर एक गोष्ट हमखास तुमच्या लक्षात येईल की १० पैकी किमान ७ जण हे कानात हेडफोन्स लावून मनोरंजन किंवा तत्सम गोष्टींद्वारे स्वतःच्या आवडी-निवडी जपत असतात. कोणी गाणी ऐकत असतो, कोणी सिनेमा पाहत असतो तर कोणी ऑनलाईन शिक्षण घेत असतो आणि आजकाल तर काही ज्येष्ठ नागरिक वर्तमानपत्रे वाचण्याऐवजी ती चक्क ऐकत असतात. या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे या प्रत्येक कृती मागे लपलेला आवाज. आवाजाची ही दुनियाच अजब आहे जी पूर्वी फक्त संगीत आणि सिनेमांपुरती मर्यादित होती ती आता एवढी पुढे गेली आहे की त्याचा संबंध हा आता प्रत्येक क्षेत्राशी जोडला जात आहे. तंत्रज्ञानातील वेगवान बदलांमुळे आजच्या या ऑनलाईन दुनियेत आवाजाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. हे नक्की काय चालू आहे हे कळायला जड जात आहे का ? मग ही काही उदाहरणे पाहू म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही नक्की कोणत्या संधीची तुम्हाला सविस्तर ओळख करून देणार आहोत.

तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ?

(image source – https://sugarmediaz.com/bahubali-voice-cast/)

‘बाहुबली’ या बॉक्स-ऑफिसचे अनेक रेकॉर्ड तोडलेल्या चित्रपटातील मूळ नायक असलेल्या प्रभासचा म्हणजेच बाहुबलीचा हिंदी भाषेतील आवाज हा मराठमोळ्या शरद केळकर यांचा आहे आणि याद्वारे त्यांना अनेक नवीन प्रोजेक्ट्स तर मिळालेच शिवाय प्रसिद्धी आणि कमाई सुद्धा उत्तम झाली.

तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ?

(image source – https://yourstory.com/2017/05/sonal-kaushal)

डोरेमॉन हे कार्टून तर आपल्या सगळ्यांना माहीतच असेल पण याचा आवाज कोणाचा आहे ठाऊक आहे का ? तर तो आहे सोनल कौशल या तरुणीचा. २००५ सालापासून ती या आणि इतर अनेक आवडत्या कार्टून्सला आपल्या आवाजाद्वारे घरोघरी पोहचवून बच्चे कंपनीच चांगल मनोरंजन करीत आहे.

तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ?

(image source – https://www.newsbytesapp.com/timeline/entertainment/62053/290888/jasleen-bhalla-the-voice-behind-coronavirus-caller-tune)

वरील फोटोतील महिला कोण आहे हे तुमच्यातील खूप कमी लोकांना ठाऊक असेल पण त्यांचा आवाज हा भारतातील प्रत्येक नागरिकाने अनेक वेळा ऐकला असेल. या आहेत दिल्लीस्थित जसलीन भल्ला. कोरोना काळात कोणालाही फोन केल्यावर माहिती देणाऱ्या महिलेचा आवाज हा जसलीन यांचा होता आणि या व्हॉईस-ओव्हर प्रोजेक्टच काम त्यांनी आपल्या घरातूनच केलं होत ज्याद्वारे त्यांना देशभर एक वेगळीच ओळख मिळाली आहे.

तर मित्रांनो वरील उदाहरणांवरून आम्ही तुम्हाला हेच सांगू इच्छितो की जर तुमच्या आवाजात एक वेगळीच जादू असेल तर तुम्ही या उपजत देणगीचा वापर करून विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सद्वारे उत्तम अर्थार्जन करू शकता. ऑनलाईन विश्वाचा जसजसा प्रसार आणि विकास होत आहे तसतसे यातील अनेक नवनवीन संधींचा उलगडा होत आहे. याच संधींचा योग्य अभ्यास करून कोणी आपले ज्ञान, कोणी आपले शब्द तर कोणी आपले अनोखे कौशल्य वापरून वेगवेगळ्या मार्गाने घरबसल्या उत्तम प्रकारे ऑनलाईन पैसे कमवीत आहेत. पण यातीलही काही संधी या अजूनही योग्यप्रकारे लोकांसमोर सादर झालेल्या नाहीत ज्याद्वारे अनेकजण घरबसल्या आणि अगदी मोजकीच गुंतवणूक करून अतिरिक्त कमाईचा आनंद घेऊ शकतात. त्यातीलच एक भन्नाट संधी म्हणजे ‘व्हॉईस ओव्हर’ म्हणजेच तुमचा आवाज वापरून तुम्ही वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सद्वारे चांगली कमाई करू शकता, तेही तुमची सुरु असेलेली नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून सुद्धा.

 • व्हॉईस-ओव्हर-आर्टिस्ट ला मिळणारे फायदे:
 • कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची गरज नाही
 • तुमचा आवाज हेच तुमचे सामर्थ्य
 • कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही
 • ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर चांगली मागणी
 • तुमच्या सोयीनुसार घरूनसुद्धा काम करता येते
 • इतर कलाकारांप्रमाणे कामासाठी स्टुडिओमध्ये येण्याचे बंधन नाही
 • भारताबाहेरील कंपन्यांसोबत काम करण्याची संधी
 • तासानुसार कामाचा मोबदला
 • जितका जास्त अनुभव तितके चांगले मानधन

काय मग.. कसा वाटतोय हा ऑनलाईन कमाईचा वेगळा पर्याय?? उत्तमच..मग करताय ना सुरुवात तुमच्या आवाजाची किमया अनुभवायला?? नाही ना..याच थोड अजून सखोल ज्ञान किंवा माहिती मिळाली असती तर सगळ्या शंकाच दूर झाल्या असत्या.. काळजी करू नका, आम्ही आहोत ना. ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अश्याच प्रकारच्या अनेक नवनवीन संधीचे सविस्तर लेख आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला या अनोख्या संधीची अगदी सविस्तर माहिती देत आहोत ज्याद्वारे तुम्हाला व्हॉईस ओव्हर म्हणजे नक्की काय? व्हॉईस ओव्हरच्या कामांसाठी लागणारे साहित्य किंवा गुंतवणूक? व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून स्वतःचा ठसा कसा उमटवावा? व्हॉईस ओव्हर कामे मिळविण्यासाठी उपयुक्त ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स कोणती? आणि व्हॉईस-ओव्हर कामांद्वारे किती कमाई होऊ शकते? या सर्व प्रश्नांची अगदी समर्पक उत्तरे देणार आहोत. अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आजच आमच्या पोर्टलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन उद्योगधंद्याची संपूर्ण माहिती मिळवा.

चला तर मग जाऊन घेऊ व्हॉईस-ओव्हर आर्टिस्ट या संधीचे आवश्यक बारकावे…

Table of Content:

 • व्हॉईस ओव्हर म्हणजे नक्की काय?
 • व्हॉईस ओव्हरच्या कामांसाठी लागणारे साहित्य किंवा गुंतवणूक?
 • व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून स्वतःचा ठसा कसा उमटवावा?
 • व्हॉईस ओव्हर कामे मिळविण्यासाठी उपयुक्त ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स
 • व्हॉईस-ओव्हर कामांसाठी मिळणार मोबदला
 • व्हॉईस ओव्हर म्हणजे नक्की काय?

नावाप्रमाणेच व्हॉईस म्हणजे आवाज आणि ओव्हर म्हणजे कोणत्या तरी कृतीवर तुमचा आवाज वापरणे. टेलिव्हिजनवर आपण अनेक हिंदी जाहिराती या मराठी किंवा इतर भाषेत प्रस्तुत केलेल्या पाहतो ज्यातील आवाज हा हुबेहूब पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांसारखाच वाटतो. तसे पाहिले तर कार्टून्स ही मूक चरित्रे असतात पण त्यांना दिलेल्या आवाजामुळे ती जिवंत बनून आपले भरपूर मनोरंजन करतात. गायकाचा श्रवणीय आवाज आणि त्याला संगीताची अनोखी साथ आपल्या जीवनात रोज वेगवेगळे रंग भरत असतात. अनेक हॉलिवूडचे चित्रपट हिंदी किंवा मराठी भाषेत संवादित केल्यामुळे समजायला सोपे होतात. ऑनलाईन शिक्षणात व्हिडिओ लर्निंग व त्याच्या मागे असलेला शिक्षकी आवाज विद्यार्थांना आपण खरंच वर्गात बसलो आहोत की काय असा भास होण्यास भाग पाडते. तर ही आहे सगळी व्हॉईस-ओव्हर ची कमाल. आज संगीतापासून ते शिक्षणापर्यंत अनेक क्षेत्रात व्हॉईस-ओव्हरचा वापर केला जात आहे.

व्हॉईस-ओव्हर कामाचे मुळात दोन प्रकार पडतात – १. व्हॉईस-ओव्हर / नॅरेशन, २. डबिंग. पहिल्या प्रकारात तुम्हाला वेगवेगळ्या कामांसाठी तुमच्या आवाजाचा वापर करायचा असतो जसे की टी.व्ही. किंवा रेडिओवरील जाहिरात, गाणे, ऑनलाईन शिक्षणात वापरल्या जाणाऱ्या व्हिडिओज, पुस्तकांचे वाचन इत्यादी. दुसऱ्या प्रकारात तुम्हाला तुमचा आवाज पडद्यावरील नायक किंवा नायिकेशी मिळताजुळता काढावा लागतो त्याचप्रकारे ऍनिमेशन किंवा कार्टून्स यांच्या प्रत्यक्ष हालचालींनुसार तुम्हाला ते कॅरॅक्टर प्रेक्षकांसमोर जिवंत करावे लागते.

म्हणजेच तुमचा आवाज जिथे जिथे कामी येऊ शकतो तिथे तिथे त्याचा वापर करणे एवढाच या कामाचा मूळ गाभा आहे.

आता तुम्हाला नक्कीच कळाले असेल व्हॉईस ओव्हर हे क्षेत्र कशाकशाशी जोडलेले आहे. मग तुम्ही विचार कराल माझ्याकडे आवाज तर आहे पण तो संचय किंवा रेकॉर्ड कसा करायचा. चला तर मग पाहू अगदी घरीबसून सुद्धा तुम्ही आपला आवाज कशा प्रकारे रेकॉर्ड करू शकता.

 • व्हॉईस ओव्हरच्या कामांसाठी लागणारे साहित्य किंवा गुंतवणूक?

काही वर्षांपूर्वी व्हॉईस-ओव्हरची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्टुडिओ मध्येच जावे लागत असे कारण या कामांसाठी लागणारी तांत्रिक साधने ही फक्त त्याच लोकांकडे उपलब्ध असायची परंतु जसजसा या क्षेत्राचा विकास होत गेला आणि या कामांना प्रचंड मागणी येऊ लागली तसतसे व्हॉइस-ओव्हर कलाकार आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेले स्टुडिओ यांचे गणित बिघडू लागले. यामुळेच अनेक कलाकारांनी घरीच स्टुडिओचे साहित्य जमवून त्याप्रकारचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जो की चांगलाच यशस्वी झाला. आजच्या घडीला बहुतांश व्हॉइस-ओव्हर कलाकार हे घरूनच आपली कामे पूर्ण करून देतात कारण बाजारात या कामांसाठी लागणारे तांत्रिक साहित्य सहजरित्या उपलब्ध होत आहे आणि तेही अगदी कमी किंमतींत. जर तुम्हालाही व्हॉइस-ओव्हरची कामे आपल्या घरातूनच करायची असतील तर खालील गोष्टींमध्ये गुंतवणूक करावी लागेल:

 • माइक्रोफोन
 • माईक स्टॅन्ड
 • हेडफोन्स
 • व्हॉईस-ओव्हर कामांशी निगडित विविध सॉफ्टवेअर्स

सुरुवातीला या चार साहित्यांचा वापर करून तुम्ही व्हॉईस-ओव्हरची कामे निश्चितच करू शकाल आणि जसजसा तुमचा या क्षेत्रात दबदबा निर्माण होत जाईल तशी तुमची कामेही वाढू लागतील तेव्हा वरील साहित्यांबरोबरच तुम्ही प्री-अँम्प, शॉकमाऊंट, पॉप-फिल्टर, अकौस्टिक ट्रीटमेंट यासारख्या आधुनिक साहित्यांचा वापर करून तुमच्या घरातच प्रत्यक्ष स्टुडिओ साकारू शकाल. प्रत्येक व्हॉईस-ओव्हरच्या कामासाठी स्टुडिओमध्ये जाण्यापेक्षा मोजक्या साहित्यासहितच तुम्ही ती कामे घरुनही करू शकता आणि तेही कमी खर्चात.

चला आता झाले व्हॉईस-ओव्हर कामे आणि त्यासाठी लागणारे साहित्य याची सविस्तर माहिती, पण तुम्ही व्हॉईस-ओव्हर कलाकार आहात किंवा तुमच्या आवाजात एक वेगळीच अनुभूती आहे हे जगाला सांगणेही किंवा कळणे गरजेचे आहे. व्हॉईस-ओव्हर कलाकार म्हणून कसे लोकांपर्यत पोहचावे हे आपण पाहू.

 • व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून स्वतःचा ठसा कसा उमटवावा?

Google या जगप्रसिद्ध Search Engine कंपनीने आपल्या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग हा उच्चशिक्षित लोकांपासून ते अगदी तळागाळातील लोकांनासुद्धा करता यावा यासाठी Video, Voice आणि Vernacular (प्रादेशिकता) या तीन V वर अधिक लक्ष केंद्रित केले आहे आणि यामुळेच या तीन गोष्टींशी संबंधित कामांना जगभरातून वाढती मागणी आहे. तुम्ही जर व्हॉईस-ओव्हर कलाकार बनून अशा प्रकारची कामे मिळवू इच्छित असाल तर खालील टिपा नीट समजून त्यांचा वापर करा.

 • तुमच्या आवाजाचे वेगवेगळ्या कामांसाठी उपयोगात येऊ शकणारे नमुने (Samples) रेकॉर्ड करून ठेवा.
 • तुम्ही व्हॉईस-ओव्हर कलाकार आहात हे तुमच्या विविध सोशल मीडिया अकाउंट्स वर हायलाईट करा.
 • तुम्ही रेकॉर्ड केलेले नमुने या सोशल मीडिया अकाउंट्स वर वेळोवेळी पोस्ट करत राहा.
 • यापूर्वी जर तुम्ही काही व्हॉईस-ओव्हरची कामे केली असतील तर ती प्रोड्युसरच्या पूर्वपरवानगीने तुमच्या प्रोफाइल मध्ये जोडा.
 • संधी मिळेल तेव्हा तुमचा आवाज प्रत्यक्ष लोकांसमोर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सादर करत राहा, त्यासाठी लाज आणि भीती बाळगू नका.
 • या क्षेत्रातील इतर कलाकारांसोबत चांगले संबंध जोडून त्यांच्या संपर्कात राहा.
 • तुमचे नातेवाईक, ऑफिसमधील सहकारी, मित्रपरिवार यांनाही तुमच्या या कलागुणांची माहिती असू द्या
 • या क्षेत्रात काम मिळवण्यासाठी तसेच यामध्ये खूप काळ टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली इतर कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
 • तुमचा आवाज फक्त एखाद्या कामासाठीच मर्यादित न ठेवता इतर अनेक प्रोजेक्ट्ससाठी सुद्धा तो कसा वापरता येऊ शकता हे तपासत रहा.
 • या क्षेत्रात इतर कलाकारांना मिळणारे मानधन, कोणते प्रोजेक्ट्स हे मागणीत आहेत आणि या क्षेत्रातील ट्रेंड्स यावर बारीक नजर ठेवा.

वरील सर्व टिपांचा योग्य वापर केल्यास तुम्ही एक चांगले व्हॉईस-ओव्हर कलाकार म्हणून नावारूपाला नक्कीच याल आणि त्याद्वारे तुम्हाला विविध कामे मिळवणे सोपे होईल

चला आता तुम्हाला व्हॉईस-ओव्हर कामांबद्दलची बरीचशी आवश्यक माहिती मिळाली असेलच पण अजूनही तुम्हाला एक शंका असेलच की ही व्हॉईस-ओव्हरची कामे नक्की मिळतात कुठे? चिंता करू नका कारण विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्समुळे व्हॉईस-ओव्हरची कामे घरबसल्याही मिळवणे सोपे झाले आहे. चला तर मग पाहू नक्की कोणते प्लॅटफॉर्म्स तुम्हाला व्हॉईस-ओव्हरची कामे मिळवून देतील.

 • व्हॉईस ओव्हर कामे मिळविण्यासाठी उपयुक्त ११ ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स:

आपण आत्तापर्यंत पाहिलेच आहे की आवजाचा उपयोग कुठेकुठे आणि कसा केला जात आहे. खाली काही अतिशय उपयुक्त आणि व्हॉईस-ओव्हर क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या ११ प्लॅटफॉर्म्सची संक्षिप्त माहिती दिलेली आहे. या प्लॅटफॉर्म्सद्वारे कामे मिळविण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर त्यांच्या गरजेनुसार स्वत्रंत असे प्रोफाइल तुम्हाला बनवावे लागेल हे लक्षात ठेवा.

 1. Voice.com:

तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ?

अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केलेले Voices.com हे इ-लर्निंग, मोबाईल अँप, ऑडिओबुक्स, चित्रपट, व्हिडिओ याप्रकारची अनेक कामे व्हॉईस-ओव्हर कलाकारांना घरबसल्या उपलब्ध करून देत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मोफत प्रोफाइल बनवून किंवा प्रीमियम मेम्बरशिप घेऊन वेगवेगळी व्हॉईस-ओव्हरची कामे मिळवू शकतात.

 1. ACX:

तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ?

तुमचा आवाज भारदस्त आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर पुस्तकांचे वाचन करून सुद्धा तुम्ही चांगली कमाई करू शकता आणि याचसाठीचा लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे ACX. विविध भाषेतील ऑडिओ रूपात सादर केलेल्या पुस्तकांना आजच्या काळात संपूर्ण जगातून चांगली मागणी आहे आणि म्हणूनच अनेक लेखक हे त्यांची पुस्तके ऑडिओ रूपात सादर करून घेण्यासाठी व्हॉईस-ओव्हर कलाकारांच्या शोधात असतात.

 1. Ear Works:

तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ?

मनोरंजनाच्या दुनियेत तर व्हॉईस-ओव्हर कलाकारांना विशेष मागणी असते आणि अशाच प्रकारची कामे मिळविण्याचा एक खास प्लॅटफॉर्म म्हणजे EarWorks. आपल्या वेगवेगळ्या ग्राहकांसाठी किंवा प्रोजेक्टससाठी EarWorks व्हॉईस-ओव्हर कलाकारांना चांगली संधी आणि मानधनही देऊ करतात.

 1. Snap Recordings:

तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ?

मोबाईलद्वारे कोणाशी संपर्क करत असताना अनेकदा तो नंबर व्यस्त किंवा कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे असे आपण ऐकतो आणि हा संदेश सुद्धा व्हॉईस-ओव्हर कलाकारांकडूनच रेकॉर्ड करून घेतलेला असतो. अशाच प्रकारची व्यावसायिक आणि टेलिफोन क्षेत्रात लागणारी व्हॉईस-ओव्हरची कामे उपलब्ध करून देणारा प्लॅटफॉर्म म्हणजे SnapRecording.

 1. Filmless:

तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ?

व्हॉईस-ओव्हरच्या विविध कामांचा तुम्हाला चांगला अनुभव असेल तर Filmless हा तुमच्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर जगभरातून अनुभवी व्हॉईस-ओव्हर कलाकारांना चांगली कामे मिळत आहेत.

 1. Voice Bunny:

तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ?

(image source – https://bunnystudio.com/voice/)

इंग्रजी तसेच इतर भाषांमधील व्हॉईस-ओव्हरची कामे ही VoiceBunny या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतात. इथे मिळणाऱ्या कामांचा मोबदला हा तुम्ही तुमच्या सोयीनुसार आकारू शकता. या प्लॅटफॉर्मद्वारे चांगली कमाई होत असल्याने इथे तुमचे स्पर्धकही चांगल्या संख्येने उपलब्ध आहेत आणि म्हणूनच तुमच्या आवाजातील वेगळेपण तुम्हाला वेळोवेळी इथे सिद्ध करावे लागते.

      7.Voice123:

तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ?

Voices.com यासारखाच दुसरा प्लॅटफॉर्म म्हणजे Voice123 हा आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे सुद्धा तुम्ही अनेक व्हॉइस-ओव्हर ची कामे मिळवू शकता आणि याद्वारे मिळणारे मानधन हे कोणत्याही एजन्ट शिवाय थेट तुम्हालाच दिले जाते.

 1. Voice Crafters:

तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ?

तुमच्या घरातूनच व्हॉईस-ओव्हरची कामे करून देण्याची उत्तम सोय असेल आणि वेगवेगळ्या भाषेंवर सुद्धा तुमचे प्रभुत्व असेल तर VoiceCrafter या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला चांगली कामे मिळू शकतील.

 1. Upwork:

तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ?

फ्रीलान्सींगद्वारे (म्हणजेच वैयक्तिकरित्या) वेगवेगळी कामे मिळवायची असतील तर UpWork हा अतिशय उपयुक्त असा प्लॅटफॉर्म आहे. ज्याप्रकारे लिखाणाची किंवा डिझाईनची कामे ही चांगल्या संख्येने उपलब्ध आहेत त्याचप्रकारे संगीत किंवा जिथे आवाजाचा उपयोग होऊ शकतो अशी कामे या प्लॅटफॉर्मवर संपूर्ण जगभरातून उपलब्ध होतात. तुम्हाला कोणते काम मिळत आहे आणि ते कोण देत आहे यावर तुमचा मोबदला अवलंबून असतो. नव्याने व्हॉईस-ओव्हर या क्षेत्रात येणाऱ्या लोकांसाठी UpWork हा चांगला प्लॅटफॉर्म सिद्ध झालेला आहे.

     10.Fiverr:

तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ?

Fiverr हा नवउद्योजक किंवा नव्याने फ्रीलान्सिंगची सुरुवात करणाऱ्यांचा एक आवडता प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही तुमचे आकर्षक प्रोफाइल आणि त्याच्या जोडीला तुमच्या आवाजाचे नमुने आणि व्हॉईस-ओव्हरसाठी तुम्ही देऊ शकत असलेल्या विविध सर्व्हिसेसचे उत्तम सादरीकरण करा. तुमच्या विविध व्हॉईस-ओव्हर कामांसाठी तुम्ही तासाला $५ या मोबदल्यानुसार आकारणी करू शकाल कारण हा प्लॅटफॉर्म कुठल्याही सर्व्हिसेस किंवा प्रॉडक्ट्स $५ या किंमतीत लोकांना उपलब्ध करून देतो.

     11.TakeLessons.com.

तुमचा आवाज वापरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे ?

संगीत क्षेत्राशी निगडित जर तुम्हाला उत्तम पार्श्वभूमी असेल किंवा तुमचे संगीताचे ज्ञान हे वाखाणण्याजोगे असेल तर TakeLessons या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही इतरांना संगीताचे धडे ऑनलाईन स्वरूपात देऊ शकाल. तुमचे ऑनलाईन क्लास, त्याची फी आणि इतर तांत्रिक बाबींची जबाबदारी ही TakeLessons स्वतः घेत असल्याने तुम्ही तुमच्या सोयीनुसार इच्छुकांना संगीत तसेच व्हॉईस-ओव्हरचेही शिक्षण देऊ शकता.

हे सर्व प्लॅटफॉर्म्स तुम्हाला व्हॉईस-ओव्हरचे काम देणाऱ्या संस्थांशी किंवा लोकांशी ऑनलाईनच्या माध्यमातून जोडण्याचे काम करते परंतु काही फसवे लोक सुद्धा या प्लॅटफॉर्म्सवर खोटी कामे टाकून त्यासाठी तुमच्याकडून पैश्यांची मागणी करतील तेव्हा अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून दोन हात लांबच राहा. वरील ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही काम मिळवू इच्छित असाल त्यांची वेबसाईट तपासून त्यांच्या नियम व अटी नीट समजून घेऊन मगच व्हॉईस-ओव्हरच्या कामाला सुरुवात करा.

या सर्वांव्यतिरिक्त तुम्हाला स्वतःचा आवाज वापरून कोणाकडेही काम न करता जर पैसे कमवायचे असतील तर तुम्ही YouTube या लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर पिक्चर, ऍनिमेशन आणि तुमचा आवाज यांचा भन्नाट वापर करून स्टोरीटेलिंगचा चॅनेल सुरु करू शकता (म्हणजेच गोष्टी सांगणे) तसेच पोडकास्टींगच्या माध्यमातूनही तुम्ही चांगले अर्थार्जन करू शकता. याची सविस्तर माहिती आम्ही स्वतंत्र लेखात सादर करून याही संधीचे दार तुम्हाला दाखवून देऊ.

ऑनलाईन कोर्स बनविणे कोणासाठी फायद्याचे आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर आम्ही सांगू इच्छितो की कोणीही स्वतःचा ऑनलाईन कोर्स बनवून तो विकू शकतो कारण यासाठी ना कुठल्या मोठ्या भांडवलाची गरज आहे ना की कुठल्या तंत्रज्ञानात प्राविण्य मिळविण्याची गरज आहे. तुम्हाला इतरांपेक्षा काय वेगळे माहिती आहे आणि त्याचे तुम्ही कोर्स स्वरूपात कसे रूपांतर करू शकतात एवढेच इथे महत्वाचे आहे.

ऑनलाईन क्लासेस कसे घ्यावे यावरील माहिती साठी खालील लेख वाचू शकता 

ऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे ? (संपूर्ण माहिती)

 
 

आता सर्वात महत्वाचे म्हणजे व्हॉईस -ओव्हर कामांसाठी नक्की किती मोबदला मिळू शकतो ते आपण पाहू

 

 • व्हॉईस-ओव्हर कामांसाठी मिळणार मोबदला:

व्हॉईस-ओव्हर क्षेत्रात मिळणारा मोबदला हा उत्तम आवाज, वेगवेगळ्या कामांचा अनुभव आणि तुमची इतर कौशल्ये यावर अवलंबून असतो. खाली आम्ही उपलब्ध माहितीनुसार वेगवेगळ्या व्हॉईस-ओव्हर कामांसाठी अंदाजे मिळू शकणारे मानधन दाखवीत आहोत.

 • ऍनिमेशन प्रोजेक्ट – १० ते १५ हजार (डायलॉगच्या लांबीनुसार यात बदल होऊ शकतात)
 • व्यावसायिक व्हिडिओ किंवा जिंगल – अंदाजे १०,००० रु.
 • इ-लर्निंग कामे – ६०० ते ७०० रुपये प्रत्येक तासाला किंवा प्रत्येक पानाला
 • डबिंग किंवा टी.व्ही. सिरीयल मधील कामे – प्रत्येक एपिसोडला ५ ते ८ हजार रुपये
 • डॉक्युमेंटरी कामे – २५ ते ५० हजार रुपये

म्हणजेच एक चांगला व्हॉईस-ओव्हर कलाकार महिन्याला विविध कामांद्वारे ३५ ते ७० हजार रुपये कमवू शकतो. काही प्रसिद्ध व्हॉईस-कलाकार तर तासाला १० ते २० हजार रुपये सुद्धा कमवीत आहेत. पण हे सगळे एका रात्रीत निश्चितच घडणार नाही यासाठी तुम्हाला तुमच्या आवाजाचा दर्जा, तुमचा अनुभव, तुमचा नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा कल, तुमचा संयम आणि मेहनत करण्याची तुमची क्षमता यावर विशेष लक्ष द्यावे लागेल.

शेवटी काय तर…

तुमचा आवाज हे तुमचे सामर्थ्य असेल, तुमच्या आवाजाच्या जादूने तुम्हाला चांगली कमाई करायची असेल तर व्हॉईस-ओव्हर हे क्षेत्र तुमच्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देत आहे. अगदी थोडक्याच साहित्यांचा वापर करून तुम्ही घरबसल्या वर दिलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा योग्य वापर करून व्हॉईस-ओव्हरची कामे मिळवू शकता आणि त्याद्वारे अतिरिक्त कमाई करून स्वावलंबी होण्याची वाटचाल सुरु करू शकता. या क्षेत्रातील तुमची स्पर्धा ही जगभरातील इतर व्हॉईस-ओव्हर कलाकारांशी असल्याने आवाजातील विविधतेबरोबरच तंत्रज्ञानातील इतर कौशल्ये आत्मसात करणे कालसुसंगत ठरेल. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सद्वारे तुमचा आवाज वापरून जगभरात नाव कमविण्याबरोबरच चांगले पैसेही देणाऱ्या व्हॉईस-ओव्हर या क्षेत्राचा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे.

शेअर करा

Leave a Comment