टोमॅटो प्रक्रिया उद्योग

खरे तर आपल्याला टोमॅटो ही भाजी दुसर्‍या महायुद्घापर्यंत फारशी माहिती नव्हती पण आता तिचा आपल्या जेवणातला आणि त्यातल्या त्यात न्याहरीतला वापर फार वाढला आहे. फळभाज्यात ती सर्वाधिक पिकवली जाणारी दुसर्‍या क्रमांकाची भाजी ठरली आहे. वांगे आणि टोमॅटो यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. असे असले तरी वांग्यांवर कसलीही प्रक्रिया केली जात नाही.टोमॅटो मात्र अनेक प्रकारची प्रक्रिया करून वापरले जात.


टोमॅटोची प्रक्रिया काहीशी अवघड आहे आणि तिच्यासाठी गुंतवणूकही मोठी करावी लागते. त्यामुळे टोमॅटो सॉस, केचप, पावडर, टोमॅटोचे काप इत्यादी प्रक्रियाकृत उत्पादने म्हणावी तेवढी मिळत नाहीत. त्यांचा वापर मात्र वाढत आहे. विशेषत: टोमॅटो सूपसाठी लागणारी पावडर आणि सॉस या गोष्टी आपल्या खाण्यात अगदी सामान्य तसेच नित्याच्या झाल्या आहेत. म्हणजे कच्चे टोमॅटो भरपूर उपलब्ध होत असतील आणि बर्‍यापैकी गुंतवणूक करण्याची क्षमता असेल तर हा उद्योेग करायला काही हरकत नाही.


या व्यवसायात पाळावयाच्या दोन गोष्टी म्हणजे तयार होणार्‍या पदार्थांची चव आणि तो तयार करतानाचे आरोग्याचे नियम. यावर संबंधित शासकीय अधिकार्‍यांची करडी नजर असते. दुसरी बाब म्हणजे आकर्षक पॅकिंग. चांगल्या पॅकिंगशिवाय टोमॅटो सॉस विकला जाणार नाही. टोमॅटोचे वैशिष्ट्य असे की, तो काही पूर्वी ठराविक हंगामातच मिळायचा. साधारणत: हा हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून सुरू होत असे आणि मार्चपर्यंत चाले. या काळात टोमॅटो स्वस्त मिळतात. आता आता गैरहंगामी  टमाटोही मिळायला लागले आहेत. पण त्यांचे दर जास्त असतात. तेव्हा नफ्याचे गणित करताना कच्च्या मालाच्या किंमती गृहित धरताना या महागाच्या काळातलाच दर धरला पाहिजे. 

टोमॅटोच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे प्रकिया आणि प्रक्रिया करून तयार केले जाणारे पदार्थ यांची निर्यात करण्यास मोठी संधी आहे. निर्यातीसाठी जे नियम असतात ते नीट पाळले तर निर्यातीतून चांगली कमायी करता येते. भारतात प्रक्रिया उद्योग फार केला जात नाही. अमेरिकेत उत्पादित होणारी फळे आणि भाज्यांपैकी  ७० टक्के मालावर प्रक्रिया केली जाते.  ब्राझीलमध्ये हे प्रमाण ३० टक्के तर मलेशियात ८२ टक्के आहे. भारतात केवळ १६ टक्के मालावर प्रक्रिया होते. ते प्रमाण निदान २५ टक्के तरी व्हावे असा सरकारचा प्रयत्न आहे.
टोमॅटोचे प्रक्रियाकृत पदार्थ अनेक आहेत. त्यातल्या त्यात टोमॅटो सॉस, केचप, पावडर, ज्यूस, डबाबंद टोमॅटो हे लोकप्रिय प्रकार आहेत. प्रक्रिया उद्योगात, हॉटेलांत, स्नॅक्स बारमध्ये आणि घरातही हे पदार्थ वापरले जातात. आपले राहणीमान वाढत चालले आहे आणि शहरीकरणही वाढत आहे. त्यामुळे टोमॅटोवर प्रक्रिया करून तयार केलेल्या उत्पादनाला मागणी वाढणार आहे.

पल्पपासून सुरूवात 

टोमॅटोपासून तयार केल्या जाणार्‍या अन्नपदार्थांचे प्रकार अनेक असले तरी कोणताही पदार्थ तयार करण्याआधी टमाटोचा पल्प तयार करून घ्यावा लागतो आणि पदार्थानुसार त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. म्हणजे आधी टोमॅटो स्वच्छ धुतले जातात आणि ते उकळून घेतले जातात. हे काम वाफेवर चालणार्‍या मोठ्या केटल्समध्ये केले जाते. नंतर हे टोमॅटो पल्परमध्ये घातले जाऊन त्याची साल वेगळी काढून बियाही काढल्या जातात. अशा रितीने बिया आणि साल काढलेला टोमॅटोचा लगदा नंतर विविध पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जातो.


आपण जेवढे टोमॅटो प्रक्रिया करण्यासाठी घेतले असतील त्याच्या वजनाच्या ४० ते ५० टक्के  एवढा हा पल्प किंवा लगदा तयार होतो. हे प्रमाण टोमॅटोच्या दर्जावर अवलंबून असते. साधारणत: काही उत्पादनांसाठी ही प्रक्रिया असली तरी टोमॅटोचा ज्यूस तयार करताना टोमॅटो वाफाळून घेण्याच्या आधी सरळ आहे तसेच म्हणजे साल आणि बिया न काढताच चिरडून घेतले जातात. 
सॉस तयार करताना हा पल्प नियंत्रित उष्णता आणि कूकरसरख्या हवाबंद कंटेनर्समध्ये प्रक्रिया करून दाट करून घेतला जातो. मग त्यात मीठ, साखर, व्हिनेगार, मसाले, कांदा आदि योग्य त्या प्रमाणात मिसळले जाते. हे मिश्रण नंतर वाफेवर उकळून घेतात. आपण यासाठी वापरलेेल्या टोमॅटोचा साधारणत: १२ टक्के एवढा भाग असा सॉस बनतो. मात्र आपण त्यात या सगळ्या गोष्टी मिसळल्या असल्याने ते वजन घेतलेल्या कच्च्या टोमॅटोच्या २८ टक्क्यांपर्यंत होऊ शकते. 
यानंतर हा सारा साका काही चाळण्यांमधून पुढे नेला जातो. या चाळण्यांत त्याचे काही तंतुमय भाग गाळले जातात. हे मिश्रण थंड करून त्यात प्रिझर्वेटिव्ह मिसळले जाते आणि ते नंतर बाटल्यांत भरून विक्रीस पाठवतात. 


केचप तयार करताना हीच सारी प्रक्रिया अवलंबिली जाते मात्र त्यात सॉसपेक्षा वेगळे घटक मिसळले जातात. म्हणजे त्यात आले, लवंग, मिरे, लसूण मिसळले जातात. शिवाय मीठ, साखर, व्हिनेगार तर असतेच पण काही वेगळ्या प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्हज मिसळले जातातच. टोमॅटो पेस्ट तयार करताना हा लगदा किंवा पल्प जास्तच घट्ट होईपर्यंत उकळतात. म्हणजे सॉस तयार करताना पल्प १२ टक्के होतो तर पेस्ट तयार करताना तो ९ टक्के राहीपर्यंत उकळतात. टोमॅटोची पावडर याच पद्धतीने तयार करतात पण त्यासाठी पल्पवर प्रक्रिया करताना वेगळे तंत्रज्ञान वापरले जात असते.

लागणारी यंत्र सामुग्री
महत्त्वाची बाब म्हणजे आजकाल अन्न प्रक्रिया उद्योगात हाताने काम करण्याचे कटाक्षाने टाळले जातेे. हातांनी काम करण्याने मनुष्यबळावरचा खर्च तर वाढतोच पण आरोग्याच्या दृ्रटीनेही ते घातक मानले जाते. म्हणून स्वयंचलित यंत्रांचा वापर केला जातो. शेकडो मजूर जे काम काही तासात करतील तेच काम एक यंत्र काही मिनिटांत करते. ही गोष्ट टोमॅटोच्या प्रक्रियेच्या बाबतीत प्रकर्षाने दिसून आली आहे.


आपण जर या क्षेत्रात उतरण्याच्या विचारात असाल तर फार लहान प्रमाणावर हा उद्योग करून चालणार नाही. आपण करोडो रुपये गुंतवून महाकाय यंत्रे आणू शकत नाही पण तरीही काही लाखांची गुंतवणूक करताना शक्यतो आपल्या आवाक्यात असणारी पण स्वयंचलित यंत्रेच वापरावीत. आपल्याला टोमॅटो सॉस सारखी उत्पादना काय भाव विकली जातात हे तर नित्यच दिसत असते आणि टोमॅटो काय भाव मिळतात हेही दिसते. त्यावरून आपण  या धंद्यातल्या नफ्याचा अंदाज बांधू शकतो. सध्याच्या किंमतीचा विचार करता साधारणत: पाच ते सहा कोटीची गुंतवणूक केली तर दोन हजार मेट्रिक टन उत्पादन होते आणि नफा काही लाखात जातो.   

टोमॅटो केचप किंवा सॉस तयार करण्याची पद्धतच आपल्याला त्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री कोणती हे दाखवून देईल. त्यासाठी लागणारी सारी यंत्रे एकत्र करून टोमॅटो सॉस मेकिंग मशीन म्हणून बाजारात मिळते. यातली सर्वात लहान मशीन ५० हजाराला मिळते. किमान ५०हजार ते काही कोटी पर्यंत त्यांच्या किंमती आहेत.मशीन जेवढी लहान असेल तेवढी त्यातली काही कामे हाताने करावी लागतील. मात्र सगळीच कामे मशीनने करायची असतील तर १. वॉशर  – प्रक्रियेसाठी वापरले जाणारे टमाटो आधी स्वच्छ धुतले जातात. त्यासाठी मोठे वॉशर वापरतात. ते काही फार गुंतागुंतीचे यंत्र नाही. एका पट्टयावरून टमाटो पास होतात आणि त्यावर पाण्याचा किंवा वाफेचा फवारा सोडून ते स्वच्छ केले जातात. 


२. स्टील जॅकेटेड कॅटल– असे धुतलेले टमाटो स्टीलच्या मोठ्या जॅकेट मध्ये एकत्र करतात. 
बॉयलर   – या बॉयलरमध्ये पाण्याची वाफ तयार केली जाते. ती जॅकेट मधील टमाट्यावर सोडली जाते. जोपर्यंत त्या टमाट्याचा लगदा तयार होत नाही तोपर्यंत वाफ सोडली जाते. 
पल्पर   –  असा हा लगदा नंतर पल्पर मध्ये सोडला जातो. तिथे बिया आणि साली टमाट्याच्या लगद्यापासून वेगळे केल्या जातात. हा लगदा पुन्हा जॅकेटमध्ये येतो. तिथे त्याला पुन्हा गरम केले जाते. घट्ट साका तयार होत असतानाच त्यात मसाले आणि सोडियम बेन्झोएट घातले जाते.  पुरेसा घट्टपणा आला की, हा घट्ट लगदा 
व्हॅक्युम फीलर कडे पाठवला जातो. तिथे पॅकिंग केले जाते. 
अशा रितीने वॉशर, जॅकेट, पल्पर आणि पॅकेजिंग मशीन अशी यंत्रे वापरावी लागतात. त्यांच्या किंमती किमान ३० हजारापासून काही लाख रुपयांपर्यंत असतात. 

डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

शेअर करा

Leave a Comment

error: Alert: Content is protected !!