पर्यटन आज जगभरात वेगाने वाढत असलेल्या उद्योग क्षेत्रापैकी एक क्षेत्र आणले असून भारतात हा लोकप्रिय व्यवसाय बनला आहे. भारतात पर्यटन क्षेत्र व्यवसायात वर्षाला १४ टक्के वाढ नोंदविली जात आहे हे लक्षात घेतले तर या क्षेत्रात व्यवसाय संधी मोठी आहे हे सहज समजू शकते. त्यामुळे स्वतःचा काही तरी व्यवसाय करावा अशी इच्छा आणि प्रवासाची खरी आवड असेल तर या व्यवसायाचा विचार तुम्ही करू शकता.
सर्वात महत्वाचे म्हणजे हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्ही स्वतः सगळीकडे फिरले पाहिजे ही अट नाही. पण ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना आवश्यक माहिती देऊन त्या प्रवासासाठीच्या बुकिंग, स्टे सारख्या सुविधा तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता. हा व्यवसाय योग्य प्रकारे केला तर त्यातून चांगले पैसे मिळविता येतात. दुसरे म्हणजे इंटरनेट मुळे तुम्ही घरच्या घरी बसून सुद्धा हा व्यवसाय मॅनेज करू शकता.
हा व्यवसाय सुरु करावा असे वाटत असेल तर त्यासाठी प्रथम काय करायला हवे याची माहिती घेऊ. सर्वप्रथम तुम्ही एखाद्या बड्या प्रवासी कंपनीसाठी एजंट म्हणून काम करणार आहात का स्वतःच स्वतंत्रपणे संस्था चालविणार याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. तुम्ही स्वतः स्वतंत्रपणे व्यवसाय करणार असाल तर एखाद्या प्रवासी संस्थेत काम केल्याचा अनुभव तुमच्या गाठीशी असेल तर ते अधिक योग्य ठरेल. दुसरे म्हणजे व्यवसाय सुरु करायचा ठरवले आणि एक महिन्यात तो सुरु केला असे या व्यवसायाबाबत करता येणार नाही. साधारण ६ महिने ते १ वर्ष तुम्ही त्यासाठी तयारी करणे योग्य आहे.
ट्रॅव्हलिंग प्रकारची निवड
या क्षेत्रात स्पर्धा खूप आहे आणि आज अनेक नामवंत कंपन्या भक्कमपणे उभ्या आहेत. त्यामुळे तुम्हाला या क्षेत्रातील तुमचे अस्तित्व पर्यटकांना जाणवून देणे हेच मोठे आव्हान मानले पाहिजे. त्यासाठी ट्रॅव्हलिंगचा नक्की कोणता प्रकार निवडायचा याचा निर्णय घ्यायला हवा. आज जगभर ट्रॅव्हलिंगचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ धार्मिक पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, साहसी पर्यटन, रोमँटिक पर्यटन, निसर्ग पर्यटन, हनिमून स्पेशल, शाळा, महाविद्यालये ट्रिप्स, जंगल पर्यटन, बीच पर्यटन असे हे अनेक प्रकार आहेत. त्यातील कोणता प्रकार तुम्ही निवडणार हे अगोदर ठरवून त्याप्रमाणे व्यवसायाचे धोरण ठरविणे योग्य ठरते.
व्यवसायाच्या काही पायऱ्या-
- तुम्ही घरगुती आणि छोट्या स्वरुपात हा व्यवसाय सुरु करणार असला तर प्रथम तुमचा ग्राहक वर्ग निश्चित करायला हवा. म्हणजे शाळेच्या ट्रीप, का खास महिला स्पेशल, तरुणाई का ज्येष्ठ नागरिक, विवाहित जोडपी का कार्पोरेट क्षेत्र हे निश्चित करायला हवे.
- तुम्ही किती दिवसांच्या टूर देणार, देशांतर्गत देणार की विदेशात सुद्धा देणार हे ठरवा.
- टूरचे दर हा कळीचा मुद्दा. हे दर ठरविताना होणारा खर्च आणि आपल्या योग्य तो नफा गृहीत धरून ठरवावे लागतील.
- मार्केटिंग धोरण म्हणजे आपण व्यवसायाचे प्रमोशन कसे करणार? न्यूजपेपर, मासिके, फेसबुक जाहिराती वगैरे
- हिशोब व्यवस्थापन साठी योग्य बिझिनेस सोफ्टवेअरची निवड, कॅश फ्लो व कंत्राट व्यवस्थापन
मार्केट रिसर्च-
तुम्ही ज्या भागात व्यवसाय सुरु करणार तेथील समुदाय किंवा समाज कसा आहे याची पूर्ण जाणीव तुम्हाला अगोदर करून घ्यावी लागेल. आज काल अनेक पर्यटक त्यांना कुठे आणि कसे जायचे आहे याचा आराखडा घेऊन त्याप्रमाणे सोय करून देण्याची मागणी करतात. याला कस्टमाईज्ड ट्रॅव्हलिंग असे म्हणता येईल. तुम्ही अशी सुविधा ग्राहकांना देऊ शकता का याचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे जुळणी करावी लागेल.
ब्रांड नेम –
या व्यवसायासाठी तुम्हाला ब्रांड नेम लागेल. व्यवसायाचे ब्रांड नेम ठरविताना तुमचे कार्यालय, वेबसाईट पाहून ग्राहक तुमची सेवा घेणार हे लक्षात ठेवायला हवे. इतरांपेक्षा हटके तुम्ही काय देता, कोणत्या युनिक सेवा तुम्ही देऊ शकता याचे प्रतिबिंब ब्रांड नेम मध्ये उमटले पाहिजे. उदाहरण द्यायचे तर ज्या ठिकाणी तुम्ही सहल आयोजित करून देणार तेथील स्थानिक लोकांसमवेत भागीदारी करून पर्यटकांना खास सेवा तुम्ही देऊ शकता. बरेचदा पर्यटकांना ही सुविधा मिळत नाही.
परवाने, परवानग्या–
तुम्ही तुमचे बिझिनेस स्ट्रक्चर निश्चित केल्यावर त्यानुसार परवाने किंवा परवानग्या घ्याव्या लागतील. त्या प्रत्येक देश, राज्य, शहरे यासाठी वेगळ्या असू शकतात. व्यवसायाचे नाव ठरविल्यावर त्याची नोंदणी करून जीएसटी नोंदणी करावी लागते. त्यानंतर जीएसटीआयएन नंबर मिळतो.
गुंतवणूक-
सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा व्यवसाय सुरु करताना महागडी उपकरणे, यंत्र सामुग्री याची गरज नसते.
निदान सुरवातीला तरी मोठ्या जागेची गरज नसते तरीही काही गुंतवणूक करावी लागतेच. उदाहरण द्यायचे तर समजा तुम्ही व्यवसायाची जागा भाडे तत्वावर घेणार असाल तर त्यासाठी डीपॉझीट द्यावे लागेल आणि महिना भाडे भरावे लागेल. सुरवातीचे ब्रांडिंग, प्रमोशन साठी खर्च येईल. पण छोट्या ट्रॅव्हल एजन्सी साठी बरेचदा स्वतःचा साठविलेला पैसा किंवा कुटुंबाच्या पाठबळावर हा आवश्यक खर्च करणेही शक्य आहे. अन्यथा लघु व्यवसाय कर्ज बँकेकडून घेता येते.
हा व्यवसाय घरातूनच सुरु करणार असला तर त्याचे काही फायदे आहेत. विशेष म्हणजे त्यामुळे आपला खर्च कमी होतो आणि कामाच्या वेळा लवचिक ठेवता येतात. अर्थात घरातून व्यवसाय करणार असलात तरी तुमचा इंटरनेट प्रेझेन्स आणि तुम्ही ऑनलाईन असणे अत्यंत महत्वाचे आहे.
कर्मचारी वर्ग-
छोट्या स्वरुपात हा व्यवसाय करण्यासाठी कर्मचारी वर्ग हवाच असे नाही. तुम्ही स्वतः तो मॅनेज करू शकता. पण व्यवसायाचा व्याप थोडा जरी वाढला तरी एखादा मदतनीस घेणे योग्य ठरते. ई मेल, फायलिंग, फोनवरून ग्राहकांना माहिती देणे अशी कामे त्याच्याकडे सोपविली तर तुम्ही नवीन ग्राहकावर तुमचे पूर्ण लक्ष केंद्रित करू शकता.
प्रमोशन-
व्यवसाय चांगला चालायचा तर त्याची माहिती तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचणे सर्वात महत्वाचे आहे हे लक्षात घेऊन प्रमोशन धोरण ठरविले गेले पाहिजे. तोंडी प्रसिद्धी सर्वात उत्तम. तुमची सेवा घेतलेल्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया, वर्तमानपत्रे, मासिके, पर्यटन विशेषांक यातून जाहिराती, स्थानिक जाहिराती, पोस्टर्स या प्रकारच्या ऑफलाईन जाहिराती थोड्या खर्चिक वाटल्या तरी हा खर्च करायला हवा. त्याचबरोबर वॉटसअप ग्रुप, फेसबुक, ट्विटर अश्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा हुशारीने वापर व्यवसाय प्रसिद्धी साठी करून घ्यायला हवा.
जाहिरात करताना कॅची हेडलाईन हवीच ज्यामुळे ग्राहकाच्या नजरेत जाहिरात भरेल. वेबसाईट आकर्षक पद्धतीने बनवावी. त्यात प्रवासाची रम्य ठिकाणे, अनुभव, येणाऱ्या अडचणी, तुम्ही त्यासाठी देत असलेल्या सुविधा, पर्यटन स्थळांचे वर्णन, तेथील खास ठिकाणे याची माहिती द्यावी. उत्तम फोटो असावेत.
ऑनलाईन मार्केटिंग-
प्रवासासंदर्भातली बहुतेक सर्व बुकिंग ऑनलाईन करता येतात. तुमच्या ग्राहकांना नुसती प्रवास तिकिटे बुक करून देण्याची सुविधा दिली तर हा लॉयल कस्टमर तुमच्याकडे सातत्याने येत राहतो असा अनुभव आहे. मात्र त्यासाठी तुमची ऑनलाईन उपस्थिती भक्कम हवी.
डिजिटल मार्केटिंग
डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
दर निश्चिती-
हा व्यवसाय सुरु केल्यावर कोणत्या सेवेसाठी काय दर आकारायाचा हे ठरवावे लागेल. सुरवातीला आपले दर अगदी कमी किंवा जास्त ठरवू नयेत. दर ठरविण्यापूर्वी याच क्षेत्रातील अन्य व्यावसायिक कोणत्या सेवेसाठी काय दर लावतात याची माहिती मिळवावी त्यानुसार स्पर्धात्मक दर आपण ठरवू शकतो.
ही माहिती संबंधित व्यावसायिकाच्या कार्यालयात एक साधा फोन करून सुद्धा मिळविता येते. त्याचे ब्रोशर मिळवून सुद्धा ही माहिती घेता येते.
तुमचे दर निश्चित करताना तुमचे सर्व खर्च त्यात अंतर्भूत करून ठरविणे आवश्यक आहे. कोणताही व्यवसाय सुरु करणे सोपे असेल पण तो यशस्वीपणे चालविणे हे मोठे आव्हान आहे याची जाणीव हवी. ग्राहकांचा कोणताही गैरसमज होऊ न देता त्याचे समाधान करणे आणि तुम्ही देत असलेल्या सेवा या किमतीत सर्वोत्तम आहेत हे त्याला पटवून देणे आणि त्याचे समाधान करणे हे कौशल्याचे काम आहे.
ग्राहकानुसार दर आकारणी–
तुम्ही ग्राहकांना काही आकर्षक पॅकेज देण्याची सुविधा देणे व्यवसाय वाढीला हातभर लावणारे ठरते. उदहारण द्यायचे तर लष्करी लोकांसाठी विशेष सुविधा, प्रथम येणाऱ्या ग्राहकाला काही सवलती, उद्योजक, व्यावसायिक याच्यासाठी डिस्काऊंट, ग्रुप डिस्काऊंट, ज्येष्ठ नागरिकाना काही खास सवलती, २५ वर्षांवरील महिला वर्गासाठी खास सुविधा असे अनेक प्रकार त्यात समाविष्ट करता येतात.
व्यवसाय संधी-
भारतात ट्रॅव्हलिंग टुरिझम व्यवसायाची उलाढाल जीडीपीच्या ९.६ टक्के असून आयबीएएफ च्या अहवालानुसार हा व्यवसाय २०२१ मध्ये १४७.९६ अब्ज डॉलर्स वर जाईल. त्यामुळे या व्यवसायात संधी खूप आहेत.
अन्य उत्पन्न असे मिळविता येईल
ट्रॅव्हलिंग व्यवसाय करत असतानाच तुम्ही या व्यवसायाशी संबंधित अन्य मार्गाने उत्पन्न वाढवू शकता. व्यवसाय सांभाळून हे सहज करता येते.
ब्लॉगिंग– तुम्ही खूप प्रवास करत असाल किंवा केला असेल तर ब्लॉग लिहू शकता. त्यात पार्क व्हिजीटपासून विविध पर्यटन स्थळांचा अनुभव शेअर करू शकता. ब्लॉग ही एकप्रकारची ऑनलाईन जर्नल असतात. तुम्ही कोणता ब्लॉग लिहिता आणि त्याला फॉलोअर्स किती हे पाहून यातून पैसे मिळू शकतात किंवा काही मोफत सुविधा मिळू शकतात.
यातलाच दुसरा प्रकार म्हणजे रायटिंग. यात पर्यटन विषयावरची तुमची आर्टिकल मासिके, ब्लॉग याना देऊन त्यातून पैसे मिळविता येतात. ऑनलाईन, ऑफलाईन या दोन्ही प्रकारे हे रायटिंग करता येते. एखाद्या प्रकाशकाला पर्यटनावरचे पुस्तक लिहिणाऱ्या लेखकासाठी लेखनिक किंवा रायटरची गरज भासते ते काम तुम्ही करू शकता.
तुम्ही सहलीवर असताना काढलेले फोटोग्राफ काढून पब्लिशर्सना ते विकू शकता. ऑनलाईन डीजीटल फोटोग्राफी साईटच्या माध्यमातून सुद्धा असे फोटो विकले जातात.
एकाद्या पर्यटन स्थळीच तुमचा निवास असेल तर टूर गाईड म्हणून तुम्ही काम करून पैसे मिळवू शकता. पर्यटकांना सल्ला देऊन पैसे कमाई करता येते तसेच फक्त तिकिटे बुकिंग, हॉटेल बुकिंग देऊन त्यातून कमिशन मिळविता येते.