जगभरात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. पण तरीही भारताचा विचार केला तर आजही लाखो महिला केवळ गृहिणी म्हणून जगत आहेत. वाढत्या महागाई मुळे घरखर्च चालविण्यासाठी पती पत्नी दोघांनाही नोकरी करावी लागते मात्र अनेक महिला घरातील जबाबदारी मुळे घराबाहेर पडून नोकरी अथवा उद्योग व्यवसाय करू शकत नाहीत. घरातील खर्चाला हातभार लावावा आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे अशी अनेकींची इच्छा असते. अश्यावेळी आपल्या छंदाचे, आवडीचे रुपांतर आपण घरगुती म्हणजे घरबसल्या करता येणाऱ्या व्यवसायात करू शकतो. यामुळे आवड जपल्याचे, छंद पुरे करण्याचे समाधान मिळेल शिवाय अर्थार्जन सुद्धा होईल.
या प्रकारचे अनेक व्यवसाय आहेत जे महिला घरबसल्या, फावल्या वेळात करू शकतात आणि हे व्यवसाय यशस्वी ठरले तर त्याची व्याप्ती वाढवून पूर्ण वेळ व्यावसायिक म्हणूनही काम करू शकतात. अर्थात स्वतंत्र व्यवसाय म्हटले म्हणजे त्यात थोडी रिस्क आहे. काही व्यवसायांना प्रशिक्षणाची गरज नाही तर काही व्यवसायांसाठी प्रशिक्षण घेणे किंवा त्या क्षेत्रातले शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे. असे कोणते व्यवसाय घरबसल्या करता येतील याची थोडी माहिती येथे देत आहोत.
कोणताही व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्याला बाजार किंवा मार्केट कसे आहे याची माहिती करून घ्यावी लागते. घरच्या घरी व्यवसाय सुरु करताना महिलांनी त्यांची कौशल्ये आणि त्यांना नक्की काय करायला आवडते हे स्वतःशी नक्की ठरवून घेणे गरजेचे आहे. तसेच आपल्याला उपलब्ध असणारा वेळ, जागा, व्यवसायासाठी लागणारया साहित्याची उपलब्धता यांचाही विचार केला पाहिजे. तसेच आपण बनविणार असलेल्या वस्तूंना मागणी कशी किंवा आपल्या घरगुती व्यवसायाची ग्राहकाला किती प्रमाणात आवश्यकता आहे याचाही विचार करायला हवा.
फॅशन डिझायनिंग
अनेक महिलांना शिवणकला अवगत असते आणि विविध प्रकारचे, फॅशनचे कपडे शिवता येत असतात. अगदी शिवण येत नसेल तरी काही महिला आकर्षक पद्धतीने कपडे डिझाईन करू शकतात. कपडे, दागिने या महिलांच्या आवडीच्या विषयांशी संबंधित हा व्यवसाय असून तुम्ही तुमच्या छंदाचे रुपांतर व्यवसायात करू शकता. या व्यवसायात जम बसला तर चांगली कमाई करता येते. कमी गुंतवणूक करून हा व्यवसाय घरच्या घरी सुरु करता येतो.
यासाठी घरातील एक छोटी जागा तुमच्या कामाचे ठिकाण म्हणून वापरता येते. सुरवात करताना मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी यांच्यापासून करू शकता. तुमचे डिझाईन केलेले कपडे त्यांना आवडत असतील तर त्यांचेही कपडे डिझाईन करून द्या. ज्या महिला यशस्वी फॅशन डिझायनर आहेत त्यांनी त्यांचा व्यवसाय कसा वाढविला हे जाणून घ्या. व्यवसाय चांगला चालला तर स्वतःचा ब्रांड बनवून व्यावसायिक पातळीवर उद्योग करू शकता.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
डे केअर सेवा
शहरी भागात डे केअर सेंटर किंवा पाळणाघरे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. ज्या महिलांना लहान मुलांची आवड आहे त्यांच्यासाठी पाळणाघर किंवा डे केअर हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो. नोकरदार महिला आपल्या मुलांना घराच्या सारखे वातावरण मिळावे आणि मायेने तसेच आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन मुले सांभाळली जातील अश्या पाळणाघरांना प्राधान्य देताना दिसतात. त्यामुळे घरच्या घरी करता येणारा हा व्यवसाय फायदेशीर ठरतो.
घरातच थोडी रिकामी, मोकळी हवा येणारी जागा असेल तर तेथेच हा व्यवसाय सुरु करता येतो. महिलांमध्ये मुळातच वात्सल्य हा गुण असतो. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या मुलांचा तुम्ही प्रेमाने सांभाळ करता असे एकदा दिसून आले की तुमच्या डे केअर ची जाहिरात या मुलांच्या पालकांकडूनच मोठ्या प्रमाणावर केली जाते. जास्त संख्येने मुले असतील तर कुटुंबियांची मदत लागेल किंवा मदतनीस ठेवावी लागते. तसेच जेथे मुले आहेत तेथील जागेची स्वच्छता, शांतता, मुलांच्या खाण्यापिण्याची चोख व्यवस्था ठेवणे आवश्यक असते. मुलांना खेळण्यासाठी पुरेशी खेळणी, त्यांना झोपाविण्यासाठी योग्य व्यवस्था हवी. थोडे भांडवल घालून अशी व्यवस्था करता येते. तुम्ही किती मुले सांभाळणार यावर या व्यवसायातून होणारी कमाई ठरते.
लहान मुलांसाठी छंद वर्ग
तुमच्या अंगात कला कौशल्य आहे आणि तुम्हाला लहान मुलांची आवड आहे तसेच शिकविण्याची कला आत्मसात असेल तर लहान मुलांसाठी छंदवर्ग चालविणे हा एक चांगलाच फायदेशीर व्यवसाय आहे. नवीन पालक नोकरी व्यवसायात गुंतलेले असल्याने त्यांना मुलांच्या छंदासाठी वेळ देणे अनेकदा जमत नाही. शिवाय शाळेतील शिक्षणाव्यतिरिक्त मुलांना समृध्द बनवतील अशी काही अन्य काही कला कौशल्ये अवगत व्हावीत अशीही पालकांची इच्छा असते.
या परिस्थितीत तुम्हाला काही कला अवगत असतील तर त्याचा उपयोग असे छंद वर्ग घेण्यासाठी करता येतो. गोष्टी सांगणे, हस्तकौशल्याच्या वस्तू बनविणे, रंगकाम, योग, मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे लिखाण, कातरकाम, चित्रकला असे अनेक छंद वर्ग घेता येतात. आजकाल संस्कार वर्गाचे प्रमाण सुद्धा वाढते असून त्यात श्लोक, गोष्टी, लहानांनी कसे वागावे या बद्दल संस्कार केले जातात तसेच आपल्या संस्कृतीची ओळख मुलांना करून दिली जाते. यासाठी खास प्रशिक्षणाची गरज नाही. शिवाय घरात, दिवसभरात कोणत्याही सोयीच्या वेळी हे वर्ग घेता येतात. तुमच्या छंद वर्गात काय काय घेतले जाते याची माहिती मित्रमंडळी, सोसायटी, परिचित आणि नातेवाईक याना दिली तर जाहिरात आपोआप होऊ शकते.
ई कॉमर्स वस्तू विक्री
ई कॉमर्स या आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. आणि खरेदी विक्री साठी बाजार गाठायची गरज संपली असून बोटांच्या थोड्याश्या हालचाली करून घरबसल्या हव्या त्या वस्तू मागविणे किंवा विकणे सहजसाध्य झाले आहे. याचा फायदा ज्यांना घरबसल्या व्यवसाय करायचा आहे त्यांना नक्कीच होऊ शकतो. तुमच्यातील कला किंवा तुम्ही बनविलेल्या वस्तू, पदार्थ घरोघरी जाऊन विकण्यापेक्षा ई कॉमर्सची मदत घेऊन तुम्ही अशी विक्री करू शकता.
अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वर किंवा ETSY सारख्या अनेक ई कॉमर्स साईटवर तुम्ही तुमच्या उत्पादनांचे डिस्प्ले करू शकता. तुम्हाला तुमची उत्पादने, वस्तू विक्री करून देणारे विक्रेते मिळू शकतात. साबण, मेणबत्त्या, होममेड पदार्थ, कलाकुसरीच्या वस्तू, पेंटींग्स, भेट देण्यायोग्य आकर्षक वस्तू असे अनेक प्रकार यात येतात. त्यातून सुद्धा चांगली कमाई करता येते.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
अर्बन लँडस्केप
तुमच्याकडे सौंदर्यदृष्टी आहे आणि निसर्गाची आवड आहे तर अर्बन लँडस्केप आर्टिस्ट म्हणून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. आजकाल शहरात, महानगरात सर्वत्र सिमेंटची जंगले माजली आहेत. हिरवळ नावालाही शिल्लक नाही. त्यामुळे घरात, सोसायटी परिसरात तुम्ही तुमच्या कौशल्याचा वापर करून असे हिरवे कोपरे निर्माण करू शकता. अर्थात यासाठी तुम्हाला बागकामाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
घरातल्या घरात ग्राहकांना छोटीशी बाग करून देणे, सोसायटी मधील मोकळ्या जागेचा वापर करून हिरवाई फुलविणे असे या व्यवसायाचे स्वरूप असते. मात्र तुम्हाला त्यासाठी सेंद्रीय बागकामाची माहिती, नैसर्गिक कीटकनाशके, सेंद्रीय उत्पादने याची पूर्ण माहिती हवी. मुंबई, बंगलोर सारख्या शहरातून व्यावसायिक गार्डनरना खूप मागणी आहे.
फ्री लान्स रायटिंग
तुमच्यात लेखन कौशल्य असेल आणि एखाद्या विषयाची मांडणी तुम्ही आकर्षक पणे करू शकत असाल तर फ्री लान्स रायटिंग हा महिलांना घरबसल्या कमाई करून देणारा चांगला व्यवसाय ठरू शकतो. आजकाल ई कॉमर्स व्यवसाय प्रचंड वेगाने वाढतो आहे. त्यासाठी थोडक्यात, आकर्षक स्वरुपात, सहज सोपा, व्यवसायाची माहिती करून देणारा मजकूर लिहून देणे असे या कामाचे स्वरूप आहे. व्यवसायात स्पर्धा वाढल्याने स्पर्धकापेक्षा आपली उत्पादने अधिक चांगली कशी हे ग्राहकांवर ठसविण्यासाठी अश्या मजकुराची आवश्यकता असते. कॅप्शन लिहून देणे, जाहिरात मजकूर लिहून देणे असे हे काम आपल्या सवडीच्या वेळात करता येणारे आहे. यात शब्दांवर पैसे आकारणी केली जाते. एका शब्दाला १ रुपया ते पाच रुपये असे दर आकारले जातात. तुमच्यातील लेखन कौशल्यावर हे दर ठरतात.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
कुकरी क्लासेस
बहुतेक सर्व भारतीय महिला स्वयंपाक बनविण्यात पारंगत असतात. घरातील व्यक्ती, मुलांसाठी आरोग्यपूर्ण आणि चविष्ट पदार्थ बनविणे हे मोठे आव्हान असले तरी महिला ते सहज पेलताना दिसतात. त्यात ज्या महिलांना विविध पदार्थ बनविण्याची आवड आहे त्यांना ही आवड व्यवसायात रुपांतरीत करता येते. अगदी साध्या साध्या पदार्थ प्रयोगातून नवीन पाककृतींचा शोध लावता येतो.
मुख्य म्हणजे ही आवड व्यवसाय म्हणून करायची असेल तरी त्यासाठी गुंतवणूक अगदी कमी लागते. पदार्थ तयार करून देण्याअगोदर तुम्ही व्यवसायाची सुरवात छोटे छोटे कुकिंग क्लास घेऊन करू शकता. तुमच्या पाककृती दुसऱ्यांबरोबर शेअर करणे, तुम्ही बनवीत असलेल्या पदार्थांचे फोटो इन्स्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर टाकणे यातून तुम्ही तुमची ओळख करून देऊ शकता.
क्लासेस घेता घेताच तुमच्या स्वयंपाकघरातून थेट ग्राहकांच्या डायनिंग टेबल वर अशी सेवा देऊ शकता. यासाठी सुरवातीला २० ते ३० हजाराची गुंतवणूक पुरते पण त्यात नफ्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के आहे.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
मेणबत्त्या बनविणे
आजकाल नवीन घरात जाताना म्हणजे गृहप्रवेश, वाढदिवस, गेट टुगेदर, काही सामाजिक कार्यक्रम यांच्या निमित्ताने भेट वस्तू देण्याचे प्रमाण वाढले आहे, छान, आकर्षक आणि उपयुक्त वस्तू निवडण्याकडे संबंधित व्यक्तीचा कल असतो. तुम्ही आकर्षक, विविध रंगी, विविध डिझाईनच्या मेणबत्त्या घरबसल्या बनवून त्यांची विक्री वरील कारणासाठी करू शकता. आजकाल घरात, कार्यालयात सजावट म्हणूनही अशा मेणबत्त्यांना मागणी आहे. यात कल्पना शक्तीला खूप वाव मिळतो, त्यासाठी नवीन कल्पना इंटरनेटवरूनही मिळू शकतात. शिवाय मेणबत्ती साठी लागणारा कच्चा माल सहज उपलब्ध होतो.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
ज्युवेलरी मेकिंग
तरुणाई, मध्यम वयीन महिला यांच्यामध्ये फॅशन आणि स्टाईल याबाबत मोठ्या प्रमाणावर जागृती झालेली आहे. त्यामुळे ज्युवेलरी मेकिंग हा घरी बसून काही उद्योग करण्याची इच्छा असलेल्या महिलांना चांगला पर्याय ठरू शकतो.
अर्थात त्यासाठी चालू फॅशन ट्रेंडबद्दल माहिती, दागिन्यांची आवड असणे आवश्यक आहे. थोडी गुंतवणूक करून हा व्यवसाय करता येतो हे खरे असले तरी इमिटेशन ज्युवेलरीचे प्रशिक्षण घेतलेले अधिक फायदेशीर ठरते. असे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक फॅशन संस्था आहेत तसेच इंटरनेटवरूनही बरीच माहिती मिळविता येते. या व्यवसायासाठी साधारण २० हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते आणि नफ्याचे प्रमाण ५ ते १५ टक्के आहे.
डाएट इंस्ट्रक्टर म्हणजे आहार सल्ला देणे
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आपल्या आरोग्याकडे पाहायला वेळ मिळत नाही. त्यामुळे आपल्याला काय चालेल यापेक्षा भूक लागली की समोर येईल ते खाणे ही आजही संस्कृती बनली आहे. त्यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. परिणामी वैयक्तिक डाएट इंस्ट्रक्टर ना चांगली मागणी येऊ लागली आहे.
तुम्ही आहाराशास्त्राचे शिक्षण घेतलेले असेल तर तुम्ही हा व्यवसाय घराच्या घरी बसूनही करू शकता. त्यात तुम्हाला तुमच्या ग्राहकाच्या खाण्या पिण्याच्या सवयी लक्षात घेऊन त्याच्यासाठी अन्न सेवनाचे वेळापत्रक ठरवून देण्याचे काम करावे लागते. अश्यावेळी ग्राहकाला कोणता आहार योग्य हे ठरविताना त्याच्या आवडी जपल्या जातील अश्या प्रकारे हे वेळापत्रक ठरवावे लागते. पदार्थात विविधता आणून ग्राहक त्याचे डाएट सांभाळेल याची काळजी घ्यावी लागते. एकदा तुम्हाला व्यवसायाची ही नस सापडली की ग्राहक त्यासाठी कितीही पैसे मोजायला तयार होतात असा अनुभव आहे.